व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या नजरेत प्रत्येक दिवसाचे सार्थक कसे करावे?

यहोवाच्या नजरेत प्रत्येक दिवसाचे सार्थक कसे करावे?

यहोवाच्या नजरेत प्रत्येक दिवसाचे सार्थक कसे करावे?

“हरवले आहेत. काल, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या मधल्या काळात कोठेतरी. दोन सोनेरी तास. प्रत्येकाला साठ मिनिटांची रत्ने जडलेली. आणून देणाऱ्‍याकरता कोणतेही बक्षीस घोषित केलेले नाही. कारण ते कायमचे गेले आहेत.” —लिडिया एच. सिगर्नी, अमेरिकन लेखिका (१७९१-१८६५).

आपल्या जीवनातले दिवस फार थोडे आहेत आणि तेही पाहता पाहता निघून जातात. क्षणभंगूर जीवनाविषयी चिंतन करणाऱ्‍या स्तोत्रकर्त्या दाविदाला पुढील प्रार्थना करण्याची प्रेरणा झाली: “हे परमेश्‍वरा, माझा अंतकाळ केव्हा आहे, व माझे आयुष्यमान किती आहे, हे मला समजू दे; म्हणजे मी किती नश्‍वर आहे हे मला कळेल. पाहा, तू माझे दिवस वीतभर केले आहेत; माझ्या आयुष्याचा काळ तुझ्यापुढे काही नाही.” दाविदाला अशारितीने आपले जीवन व्यतीत करण्याची इच्छा होती, की जेणेकरून त्याच्या शब्दांमुळे व कृत्यांमुळे देवाला संतोष वाटेल. आपण पूर्णपणे देवावर विसंबून आहोत हे दाखवीत तो पुढे म्हणतो, “माझी आशा तुझ्याच ठायी आहे.” (स्तोत्र ३९:४, ५,) यहोवाने त्याची प्रार्थना ऐकली. त्याने दाविदाच्या कार्यांचे परीक्षण केले आणि त्यांनुसार त्याला प्रतिफळ दिले.

कधीकधी दिवसातला प्रत्येक मिनिट आपण कामात गुंतलेलो असतो; धकाधकीच्या जीवनात आणि न संपणाऱ्‍या कामांच्या व्यापात नकळत एकेक दिवस जात असतो. इतक्या कमी वेळात इतके काही करायचे व अनुभवायचे असते, की या विचाराने कधीकधी आपण काळजीत पडतो. पण आपल्यालाही दावीदाप्रमाणेच, देवाला संतोष वाटेल अशारितीने आपले जीवन व्यतीत करण्याची इच्छा आहे का? नक्कीच, यहोवा आपल्यापैकी प्रत्येकाची दखल घेतो आणि आपले काळजीपूर्वक परीक्षण करतो. देवाला भिऊन वागणाऱ्‍या ईयोबाने जवळजवळ ३,६०० वर्षांआधी हे कबूल केले होते की यहोवा त्याचे मार्ग पाहतो आणि त्याची सर्व पावले गणतो. ईयोबाने प्रश्‍न केला: “त्याने झडती घेतली म्हणजे मी त्याला काय उत्तर देईन?” (ईयोब ३१:४-६, १४, पं.र.भा.) देवाच्या नजरेत प्रत्येक दिवसाचे सार्थक करणे अशक्य नाही. पण त्यासाठी आपण आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे, देवाच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे आणि आपल्या वेळेचा सुज्ञतेने उपयोग केला पाहिजे. या गोष्टींकडे जरा जवळून लक्ष देऊ या.

आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य द्या

“जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे,” या शब्दांतून प्रेरित शास्त्रवचने आपल्याला योग्यपणे आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देण्याचे प्रोत्साहन देतात. श्रेष्ठ कशाला म्हणता येईल? या प्रश्‍नाचे उत्तर ‘ज्ञान व सर्व प्रकारच्या विवेकाशी’ संबंधित आहे. (फिलिप्पैकर १:९, १०) यहोवाच्या उद्देशांविषयी ज्ञान प्राप्त करण्यासाठी वेळेचा सदुपयोग करणे महत्त्वाचे आहे. पण आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य दिल्यामुळे आपल्याला खात्रीने जीवनात उत्तम प्रतिफळ व समाधान मिळेल.

प्रेषित पौल आपल्याला आठवण करून देतो की आपण ‘प्रभूला काय संतोषकारक आहे ते पारखून घेत जावे.’ हे पारखून घेण्याकरता आपण आपल्या मनातील हेतूंचे आणि इच्छा-आकांक्षांचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. प्रेषित पौल पुढे म्हणतो: “प्रभूची इच्छा काय आहे ते समजून घ्या.” (इफिसकर ५:१०, १७) तर मग, यहोवाला काय संतोषकारक आहे? बायबलमधील एका नीतिसूत्रात आपल्याला याचे उत्तर सापडते: “ज्ञान [“बुद्धी,” NW] ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर; आपली सर्व संपत्ति वेचून सूज्ञता संपादन कर. त्याला उच्च पद दे म्हणजे ते तुझी उन्‍नती करील.” (नीतिसूत्रे ४:७, ८) एखादी व्यक्‍ती देवाची बुद्धी संपादन करते आणि त्यानुसार वागते तेव्हा देवाला तिच्याविषयी आनंद वाटतो. (नीतिसूत्रे २३:१५) या बुद्धीचे वैशिष्ट्य म्हणजे ती हिरावून घेतली जाऊ शकत नाही किंवा नष्ट केली जाऊ शकत नाही. उलट ती ‘कुमार्गापासून व विवेकशून्य गोष्टी करणाऱ्‍या मनुष्यांपासून’ संरक्षण करणारे कवच ठरते.—नीतिसूत्रे २:१०-१५.

खरोखर, आध्यात्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ लागते तेव्हा तिचा प्रतिकार करणे किती सुज्ञतेचे आहे! आपण आपल्या मनात यहोवाच्या वचनांबद्दल कृतज्ञ मनोवृत्ती आणि त्याच्याविषयी योग्यप्रकारचे भय उत्पन्‍न केले पाहिजे. (नीतिसूत्रे २३:१७, १८) अशी मनोवृत्ती जीवनात केव्हाही संपादन करणे शक्य असले तरीसुद्धा तरुण वयातच या योग्य मार्गावर चालू लागणे आणि बायबलची तत्त्वे आपल्या व्यक्‍तिमत्त्वात ठसवणे सर्वात उत्तम. सुज्ञ राजा शलमोन याने म्हटले: “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.”—उपदेशक १२:१.

यहोवाविषयी कृतज्ञ मनोवृत्ती उत्पन्‍न करण्याचा सर्वात वैयक्‍तिक स्वरूपाचा मार्ग म्हणजे दररोज त्याला प्रार्थना करणे. दावीद राजाने यहोवाजवळ आपले मन मोकळे करण्याचे महत्त्व ओळखले होते कारण त्याने यहोवाला अशी याचना केली: “हे परमेश्‍वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या धाव्याकडे कान लाव; माझे अश्रु पाहून उगा राहू नको.” (स्तोत्र ३९:१२) आपण यहोवाला अश्रू ढाळून आपल्या भावना सांगाव्यात, इतका त्याच्याशी आपला घनिष्ट संबंध आहे का? खरोखर आपण आपल्या मनातल्या अगदी खासगी बाबींविषयी यहोवाशी बोलतो आणि त्याच्या वचनावर मनन करतो तसतसा तो आपल्या जवळ येतो.—याकोब ४:८.

आज्ञाधारक राहण्यास शिका

आणखी एक विश्‍वासू पुरुष ज्याने देवावर अवलंबून राहण्याचे महत्त्व ओळखले होते, तो म्हणजे मोशे. दाविदाप्रमाणेच मोशेलाही जाणीव होती की जीवन असंख्य समस्यांनी भरलेले आहे. म्हणूनच त्याने देवाला याचना केली की ‘मला माझे दिवस असे गणण्यास शिकीव की, मला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.’ (स्तोत्र ९०:१०-१२) सुज्ञ अंतःकरण केवळ यहोवाच्या नियमांचे व तत्त्वांचे ज्ञान घेऊन त्यांच्या एकवाक्यतेत वागण्यामुळे प्राप्त होऊ शकते. मोशेला हे माहीत होते आणि म्हणूनच, इस्राएल लोक प्रतिज्ञात देशाचा ताबा घेण्याच्या बेतात असताना ते सत्य त्यांच्या मनावर बिंबवण्याकरता मोशेने त्यांना देवाचे नियम व आज्ञा पुनःपुन्हा सांगितल्या. इस्राएलवर राज्य करण्याकरता यहोवा भविष्यात ज्या कोणा मानवी राजाला निवडेल, त्यालासुद्धा नियमशास्त्राची एक प्रत तयार करून जीवनभर तिचे वाचन करण्याची आज्ञा देण्यात आली होती. का? जेणेकरून तो देवाचे भय मानण्यास शिकेल. ही राजाच्या आज्ञाधारकतेची परीक्षा ठरणार होती. या आज्ञेचे पालन केल्यामुळे त्याचे हृदय आपल्या भाऊबंदांच्याबाबतीत उन्मत्त होणार नाही आणि इस्राएलात त्याच्या राज्याची वृद्धी होईल. (अनुवाद १७:१८-२०) यहोवाने दाविदाचा पुत्र शलमोन यालाही पुन्हा हीच प्रतिज्ञा दिली: “तू आपला बाप दावीद याजप्रमाणे माझ्या मार्गांनी चालून माझे नियम व माझ्या आज्ञा पाळिशील तर मी तुझ्या आयुष्याची वृद्धि करीन.”—१ राजे ३:१०-१४.

आज्ञापालन ही देवाच्या नजरेत एक गंभीर गोष्ट आहे. यहोवाचे नियम व त्याच्या आज्ञा यांपैकी काहींच्या बाबतीत आपण, ‘यात काय विशेष’ अशाप्रकारची मनोवृत्ती बाळगली, व त्यांना क्षुल्लक लेखले तर निश्‍चितच आपली ही मनोवृत्ती यहोवाच्या नजरेतून सुटणार नाही. (नीतिसूत्रे १५:३) हे ओळखून आपण यहोवाच्या सर्व निदेशांबद्दल, मग त्यांचे पालन करणे सोपे नसले तरीसुद्धा त्यांच्याविषयी मनःपूर्वक आदर बाळगला पाहिजे. आपण देवाच्या नियमांचे व आज्ञांचे पालन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सैतान आपल्याला ‘अडवण्याचा’ सर्वतोपरी प्रयत्न करतो.—१ थेस्सलनीकाकर २:१८.

खासकरून उपासनेकरता आणि बंधुंच्या सहवासाकरता एकत्र मिळण्याच्या शास्त्रवचनातील आज्ञेचे पालन करणे महत्त्वाचे आहे. (अनुवाद ३१:१२, १३; इब्री लोकांस १०:२४, २५) आपण स्वतःला असे विचारू शकतो: ‘जे खरोखर मोलाचे आहे ते करण्याकरता लागणारा दृढसंकल्प आणि चिकाटी माझ्याठायी आहे का?’ आर्थिक सुरक्षितता मिळवण्याच्या प्रयत्नात ख्रिस्ती सभांमधील बांधवांचा सहवास आणि शिक्षण यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे यहोवासोबतचा आपला नातेसंबंध कमकुवत होईल. प्रेषित पौलाने लिहिले: “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण [यहोवाने] स्वतः म्हटले आहे, ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.’” (इब्री लोकांस १३:५) यहोवाच्या आज्ञांचे मनापासून पालन करण्याद्वारे आपण दाखवतो की तो आपली काळजी वाहील याविषयी आपल्याला पूर्ण भरवसा आहे.

येशू आज्ञा पाळण्यास शिकला होता आणि याचे त्याला उत्तम प्रतिफळ मिळाले. हेच आपल्याबाबतीतही घडू शकते. (इब्री लोकांस ५:८) आपण जितकी जास्त आज्ञाधारकता विकसित करू तितकीच ती लहानसहान बाबतीतही दाखवणे आपल्याला सोपे जाईल. अर्थात आपल्या विश्‍वासामुळे कदाचित आपल्याला इतरांकडून वाईट किंवा क्रूर वागणूकही सहन करावी लागू शकते. खासकरून हे कामाच्या ठिकाणी, शाळेत किंवा वेगवेगळे विश्‍वास असलेल्या कुटुंबात घडू शकते. पण इस्राएल लोकांना दिलेल्या पुढील अभिवचनातून आपल्याला सांत्वन मिळते, की जर त्यांनी ‘परमेश्‍वरावर प्रीति करून त्याची वाणी ऐकली व त्याला धरून राहिले तर त्यातच त्यांचे जीवन आहे व त्यामुळेच ते दीर्घायु होतील.’ (अनुवाद ३०:२०) हीच प्रतिज्ञा आज आपल्यालाही देण्यात आली आहे.

वेळेचा सुज्ञतेने उपयोग करा

आपल्या वेळेचा सदुपयोग केल्याने आपल्याला यहोवाच्या नजरेत प्रत्येक दिवसाचे सार्थक करण्यास मदत मिळेल. पैशाची बचत करता येते पण वेळ खर्च करावाच लागतो, नाहीतर तो आपल्या हातून निघून जातो. जाणारा प्रत्येक तास कायमचा जातो. पण आपल्याजवळ नेहमीच आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम असल्यामुळे आपण विचार केला पाहिजे, की मी माझ्या जीवनातल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेकरता माझ्या वेळेचा उपयोग करत आहे का? सर्व ख्रिस्ती लोकांच्या जीवनातील एक मुख्य उद्दिष्ट म्हणजे, राज्याच्या प्रचाराच्या कार्यात आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात नियमित सहभाग घेणे.—मत्तय २४:१४; २८:१९, २०.

आपल्याला वेळेच्या मोलाची जाणीव होते तेव्हाच आपण त्याचा सुज्ञतेने उपयोग करू शकतो. म्हणूनच इफिसकर ५:१६ आपल्याला ‘वेळ विकत घेण्याचा’ सल्ला देते; कमी महत्त्वाच्या गोष्टींचे बलिदान देऊन तो मिळवण्याचा अर्थ यातून सूचित होतो. याचा अर्थ आपण वेळखाऊ कामांत कपात केली पाहिजे. खूप वेळ टीव्ही पाहणे किंवा इंटरनेटमध्ये माहिती शोधणे, निरुपयोगी जगीक साहित्य वाचणे किंवा करमणुकीत आवश्‍यकतेपेक्षा जास्त वेळ देणे यांमुळे आपण पुरते थकून जाऊ शकतो. यासोबत, भौतिक साधनसंपत्ती जमवण्याचा ध्यास घेतल्यामुळेही सुज्ञ अंतःकरण मिळवण्याकरता खर्च करता येण्यासारखा वेळ आपण गमावून बसतो.

विचारपूर्वक वेळेचे नियोजन देण्याचा सल्ला देणारे म्हणतात: “सुनिश्‍चित ध्येये डोळ्यापुढे न ठेवता वेळेचा सदुपयोग करणे शक्यच नाही.” ध्येये निवडण्याकरता ते पाच निकष सुचवतात: ध्येये सुस्पष्ट, मापता येण्यासारखी, गाठता येण्यासारखी, वास्तवादी आणि वेळेचे बंधन असलेली असावीत.

एक उत्तम ध्येय म्हणजे बायबल वाचनात सुधारणा करणे. पहिले पाऊल म्हणजे आपले ध्येय सुस्पष्ट असले पाहिजे, अर्थात संपूर्ण बायबल वाचण्याचे. दुसरे म्हणजे हे ध्येय मापता आले पाहिजे. यामुळे आपल्याला आपली किती प्रगती झाली हे कळेल. ध्येयांनी आपल्याला आपला अवाका वाढवण्यास व विकसित होण्यास मदत केली पाहिजे. तसेच ध्येये गाठता येण्यासारखी आणि वास्तववादी असली पाहिजेत. वैयक्‍तिक कार्यक्षमता, कौशल्ये आणि उपलब्ध असलेला वेळ लक्षात घेतला पाहिजे. काहींना कदाचित विशिष्ट ध्येय गाठण्यास अधिक वेळ लागू शकतो. शेवटी, आपल्या ध्येयाला आपण वेळेचे बंधन घातले पाहिजे. विशिष्ट गोष्ट साध्य करण्याकरता एक निश्‍चित तारीख ठरवल्यामुळे त्या दिशेने प्रगती करण्यास आपल्याला निश्‍चितच अधिक प्रेरणा मिळेल.

जागतिक बेथेल कुटुंबाच्या सर्व सदस्यांना, म्हणजे यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयात अथवा त्याच्या शाखांमध्ये सेवा करणाऱ्‍यांना बेथेलच्या पहिल्या वर्षी सबंध बायबल वाचण्याचे ध्येय गाठायचे असते. त्यांना जाणीव आहे की अतिशय मोलवान अशा या बायबल वाचनामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती होते आणि आपल्याकरता जे हितकारक ते शिकवणाऱ्‍या यहोवासोबतचा संबंध अधिक जवळचा होतो. (यशया ४८:१७) आपणही नियमित बायबल वाचनाचे ध्येय ठेवू शकतो का?

प्रत्येक दिवसाचे सार्थक करण्याचे उत्तम परिणाम

आध्यात्मिक गोष्टींना सर्वाधिक महत्त्व दिल्याने अनेक आशीर्वाद प्राप्त होतात. एक म्हणजे, यामुळे जीवनात काहीतरी साध्य केल्याचे समाधान आणि एक उद्देश सापडतो. मनःपूर्वक प्रार्थनेत यहोवासोबत नियमित संवाद केल्यामुळे आपण त्याच्या जवळ जातो. प्रार्थना करण्याच्या कृतीतूनच आपल्याला त्याच्यावर भरवसा आहे हे दिसून येते. दररोज बायबलचे आणि ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ पुरवलेल्या बायबल आधारित प्रकाशनांचे वाचन केल्यामुळे देव आपल्याला जे सांगू इच्छितो ते ऐकण्याची आपली तयारी आहे हे आपण दाखवतो. (मत्तय २४:४५-४७) हे आपल्याला सुज्ञ अंतःकरण संपादन करण्यास मदत करते जेणेकरून आपण जीवनात योग्य निर्णय घेऊ शकतो.—स्तोत्र १:१-३.

यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्यास आपल्याला आनंद वाटतो, हे आपल्याला ओझ्यासमान वाटत नाही. (१ योहान ५:३) आपण प्रत्येक दिवस यहोवाच्या नजरेत सार्थक करण्याचा प्रयत्न करतो तसतसा आपला त्याच्यासोबतचा नातेसंबंध बळावत जातो. तसेच आपल्या सहविश्‍वासू ख्रिस्ती बांधवांकरता आपण आध्यात्मिक आधारस्तंभाप्रमाणे ठरतो. हे सर्व केल्यामुळे यहोवा देवाला आनंद होतो. (नीतिसूत्रे २७:११) आणि आज व सर्वकाळपर्यंत यहोवाची कृपा व संमती मिळण्यापेक्षा इतर कोणताच मोठा आशीर्वाद असू शकत नाही!

[२१ पानांवरील चित्र]

आध्यात्मिक गोष्टींकडे ख्रिस्ती गंभीरतेने पाहतात

[२२ पानांवरील चित्रे]

तुम्ही आपल्या वेळेचा सुज्ञतेने उपयोग करत आहात का?

[२३ पानांवरील चित्र]

प्रत्येक दिवस यहोवाच्या नजरेत सार्थक केल्याने आपण त्याच्यासोबतचा नातेसंबंध अधिक बळकट करत असतो