आनंदित करणारे देणे
आनंदित करणारे देणे
ईशान्य ब्राझीलच्या एका झोपडपट्टीत राहणारा झनीवॉ, एका दवाखान्यातील सेक्यूरिटी गार्डच्या तुटपुंज्या मिळकतीवर आपल्या बायको-मुलांची देखभाल करतो. आर्थिक तंगी असूनही, झनीवॉ नियमाने दशमांश देत असे. पोटावर हात ठेवून तो म्हणतो, “काही वेळा माझ्या कुटुंबाला उपाशी राहावे लागायचे, पण कितीही त्याग करावा लागला तरी देवाला सर्वोत्तम देण्याची माझी इच्छा होती.”
नोकरी गमावल्यावरही झनीवॉ दशमांश मात्र देत राहिला. त्याच्या पाळकाने त्याला सांगितले की, एक मोठी देणगी देऊन देवाची परीक्षा पाहा. देव निश्चित तुला आशीर्वादित करील अशी हमी त्या पाळकाने त्याला दिली. म्हणून झनीवॉने आपले घर विकून चर्चला सगळा पैसा द्यायचा विचार केला.
झनीवॉसारखे अनेक प्रामाणिक लोक आहेत. एकदम गरीब असलेले पुष्कळ लोक नियमाने दशमांश देतात कारण ही बायबलची अपेक्षा आहे असे त्यांना चर्चमध्ये शिकवले जाते. हे खरे आहे का?
दशमांश आणि नियमशास्त्र
दशमांश देण्याची आज्ञा ३,५०० पेक्षा अधिक वर्षांआधी प्राचीन इस्राएलच्या १२ गोत्रांना यहोवा देवाने दिलेल्या नियमशास्त्राचा भाग होती. त्या नियमानुसार भूमीच्या उत्पन्नाचा व झाडांच्या फळांचा दशमांश तसेच गुरेढोरे व शेरडेमेंढरांच्या वाढीतला दशमांश, निवासमंडपातील सेवेकरता लेवीच्या गोत्राला द्यावयाचा होता.—लेवीय २७:३०, ३२; गणना १८:२१, २४.
नियमशास्त्र ‘तुम्हाला अवघड वाटणार नाही’ अशी हमी यहोवाने इस्राएलांना दिली. (अनुवाद ३०:११) जोपर्यंत ते यहोवाच्या आज्ञांचे, दशमांश देण्यासंबंधीच्या आज्ञेचे देखील विश्वासूपणे पालन करणार होते तोपर्यंत त्यांना देवाकडून विपुलतेत पीक मिळण्याची खात्री होती. आणि संरक्षणासाठी, वर्षाचा आणखी एक दशमांश नियमितपणे बाजूला ठेवला जात असे; याचा उपयोग धार्मिक सणावारांसाठी संपूर्ण राष्ट्र एकत्र येई तेव्हा केला जाई. अशाप्रकारे, ‘गावातला उपरी, अनाथ व विधवा ह्यांनाही पोटभर खायला मिळे.’—अनुवाद १४:२८, २९; २८:१, २, ११-१४.
दशमांश न दिल्याबद्दल नियमशास्त्रात कोणतीही शिक्षा सांगितलेली नव्हती, पण प्रत्येक इस्राएली व्यक्तीवर अशातऱ्हेने खऱ्या उपासनेला आधार देण्याची भारी नैतिक जबाबदारी होती. उलट, मलाखीच्या दिवसात जे इस्राएली दशमांश देत नव्हते ते ‘दशमांश व अर्पणे यांसंबंधाने यहोवाला ठकवत होते’ असा त्याने आरोप केला. (मलाखी ३:८) हाच आरोप दशमांश न देणाऱ्या ख्रिश्चनांनाही लागू होऊ शकतो का?
आपण यावर विचार करू या. एखाद्या राष्ट्राचे नियम त्याच्या सरहद्दीच्या बाहेर सहसा लागू होत नसतात. उदाहरणार्थ, डाव्या बाजूने गाडी चालवण्याचा ब्रिटनमधील नियम फ्रान्समधील चालकांना लागू होत नाही. त्याचप्रमाणे, दशमांशाचा नियम देव आणि इस्राएल राष्ट्रात झालेल्या एका विशेष कराराचा भाग होता. (निर्गम १९:३-८; स्तोत्र १४७:१९, २०) ते बंधन केवळ इस्राएली लोकांवर होते.
शिवाय, देव जरी बदलत नसला तरी त्याच्या अपेक्षा काही वेळा बदलतात. (मलाखी ३:६) बायबलमध्ये असे स्पष्टपणे म्हटले आहे की, सा.यु. ३३ मध्ये येशूच्या मृत्यूच्या बलिदानाने नियमशास्त्र आणि त्यासोबतच “दशमांश घेण्याची आज्ञा” देखील ‘खोडली गेली’ किंवा ‘नाहीशी’ करण्यात आली.—कलस्सैकर २:१३, १४; इफिसकर २:१३-१५; इब्री लोकांस ७:५, १८.
ख्रिस्ती देणग्या
तरीपण, खऱ्या उपासनेकरता अद्यापही देणग्यांची आवश्यकता होती. येशूने आपल्या शिष्यांवर ‘पृथ्वीच्या शेवटापर्यंत साक्षी होण्याची’ कामगिरी नेमली होती. (प्रेषितांची कृत्ये १:८) उपासकांची संख्या वाढत गेली तशी ख्रिस्ती शिक्षकांची आणि मंडळीला भेटी देण्यासाठी व तिची उभारणी करण्यासाठी पर्यवेक्षकांची गरज देखील वाढली. काही वेळा, विधवा, अनाथ आणि इतर गरजू लोकांची काळजी घ्यावी लागायची. हे सर्व खर्च भागवण्यासाठी पहिल्या शतकातले ख्रिस्ती काय करत होते?
सा.यु. ५५ च्या सुमारास, युरोप आणि आशिया मायनर येथील विदेशी ख्रिश्चनांकडे यहूदीयातील गरीब मंडळीकरता मदतीची विनंती करण्यात आली. करिंथच्या मंडळीला लिहिलेल्या पत्रांमध्ये प्रेषित पौलाने ‘पवित्र जनांसाठी गोळा केलेल्या वर्गणीची’ योजना कशी केली होती तिचे वर्णन दिले आहे. (१ करिंथकर १६:१) ख्रिस्ती देणग्यांविषयी पौलाच्या शब्दांवरून जे स्पष्ट होते त्याने तुम्ही अचंबित व्हाल.
प्रेषित पौलाने, सहउपासकांना देणगी देण्यासाठी त्यांना जबरदस्ती केली नाही. उलट, “संकटाच्या बिकट परीक्षेत” व “कमालीचे दारिद्र्य” असलेले मासेदोनियातील ख्रिस्ती, ‘पवित्र जनांची सेवा करण्यात आपल्याला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी असे आग्रहपूर्वक मागत’ राहिले.—२ करिंथकर ८:१-४.
हे खरे की, पौलाने करिंथ येथील सुस्थितीत असलेल्या ख्रिश्चनांना मासेदोनियातील आपल्या उदार बांधवांचे अनुकरण करण्याचे उत्तेजन दिले. तरीपण, एका संदर्भानुसार, त्याने ‘हुकूम दिला नाही, तर तो विनवणी करत होता, सुचवत होता, उत्तेजन देत होता किंवा याचना करत होता. करिंथकरांवर जबरदस्ती करण्यात आली असती तर त्यांच्या देण्यात आपलेपणाची आणि कळकळीची भावना राहिली नसती.’ पौलाला ठाऊक होते की, “दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून” देणारा नव्हे तर “संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.”—२ करिंथकर ९:७.
भक्कम विश्वास आणि ज्ञान त्याचप्रमाणे सह-ख्रिश्चनांबद्दल खरी प्रीती यामुळे करिंथकर ख्रिस्ती मनापासून देण्यास प्रवृत्त झाले असावेत.—२ करिंथकर ८:७, ८.
“प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे”
किती रक्कम किंवा किती टक्के बाजूला ठेवावेत असे सांगण्याऐवजी पौलाने केवळ असे उत्तेजन दिले की, “दर रविवारी तुम्ही आपापल्या उत्पन्नाच्या मानाने . . . काही रक्कम वेगळी काढून ठेवावी.” (तिरपे वळण आमचे; १ करिंथकर १६:२, मराठी कॉमन लँग्वेज) नियमाने योजना करून काही रक्कम वेगळी ठेवल्याने पौल आल्यावर करिंथकरांवर दुःखी होऊन किंवा भावनाविवश होऊन देण्यास दबाव येणार नव्हता. प्रत्येक ख्रिश्चनाकरता, किती द्यायचे ही व्यक्तिगत गोष्ट होती, ‘आपआपल्या मनात ठरवण्याची’ गोष्ट होती.—२ करिंथकर ९:५, ७.
विपुल प्रतिफळ मिळण्याकरता करिंथकरांना उदारपणे पेरणी करण्याची गरज होती. ‘नुकसान सोसून द्या’ असे त्यांना मुळीच सुचवण्यात आले नव्हते. उलट ‘तुमच्यावर भार घालावा असे होऊ नये’ असे म्हणून पौलाने त्यांना आश्वासन दिले. कारण देणग्या विशेषकरून ‘जे कोणापाशी नाही त्याप्रमाणे नव्हे, तर जे कोणापाशी आहे त्याप्रमाणे मान्य होतात.’ (२ करिंथकर ८:१२, १३; ९:६, पं.र.भा.) नंतरच्या एका पत्रात, प्रेषिताने असा इशारा दिला: “जर कोणी . . . आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे.” (१ तीमथ्य ५:८) या तत्त्वाचे उल्लंघन करून देणगी देण्यास पौलाने उत्तेजन दिले नाही.
लक्षवेधक गोष्ट अशी की, पौलाने गरजू असलेल्या ‘पवित्र जनांसाठी वर्गणी’ गोळा करण्याच्या कामाची देखरेख प्रेषितांची कृत्ये ३:६) मंडळ्यांकडून मिळणाऱ्या बक्षीसांबद्दल पौल नेहमी कृतज्ञ असला तरी आपल्या बांधवांवर “भार होऊ नये” याची त्याने जाणीवपूर्वक काळजी घेतली.—१ थेस्सलनीकाकर २:९; फिलिप्पैकर ४:१५-१८.
केली. शास्त्रवचनांमध्ये आपण कोठेही असे वाचत नाही की, पौलाने किंवा इतर प्रेषितांनी स्वतःच्या सुवार्ता प्रचाराच्या कार्याचा खर्च भागवण्यासाठी वर्गणी जमा केली किंवा दशमांश गोळा केले. (आज स्वेच्छिक दान
स्पष्टतः, पहिल्या शतकात ख्रिस्ताच्या अनुयायांमध्ये दशमांश देण्याची प्रथा नव्हे तर स्वेच्छिक दान देण्याची प्रथा होती. परंतु, सुवार्तेच्या प्रचार कार्याचा खर्च भागवण्यासाठी आणि गरजवंत ख्रिश्चनांची काळजी घेण्यासाठी ही पद्धत आजही परिणामकारक आहे का अशी शंका तुमच्या मनात असेल.
पुढील गोष्टीचा विचार करा. १८७९ मध्ये, या मासिकाच्या संपादकांनी उघडपणे असे म्हटले की, ते “कधीही भीक मागणार नाहीत किंवा मदतीसाठी लोकांना याचना करणार नाहीत.” या निर्णयामुळे बायबल सत्याचा प्रसार करण्यात यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रयत्नात काही अडखळण आले आहे का?
सध्या, साक्षीदार २३५ देशांमध्ये बायबल, ख्रिस्ती पुस्तके आणि इतर प्रकाशनांचे वितरण करतात. बायबल आधारित टेहळणी बुरूज या नियतकालिकाच्या महिन्याला ६,००० प्रती एका भाषेत एकेकाळी वितरित होत होत्या. आता ते पंधरवड्याला प्रकाशित होत असून १४६ भाषांमध्ये त्याच्या २,४०,००,००० हून अधिक प्रती छापल्या जातात. आपले जागतिक बायबल शैक्षणिक कार्य सुव्यवस्थितपणे चालण्यासाठी साक्षीदारांनी ११० देशांमध्ये व्यवस्थापक शाखा बांधल्या आहेत किंवा प्राप्त केल्या आहेत. याशिवाय, बायबल आधारित सूचना प्राप्त करण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या सुविधेसाठी त्यांनी हजारो स्थानिक सभेच्या इमारती त्याचप्रमाणे मोठी संमेलन गृहे बांधली आहेत.
लोकांच्या आध्यात्मिक गरजांना प्राधान्य देत असताना यहोवाचे साक्षीदार सहउपासकांच्या भौतिक गरजांकडे दुर्लक्ष करत नाहीत. त्यांच्या बांधवांना युद्धे, भूकंप, दुष्काळ आणि वादळांचे दुष्परिणाम सोसावे लागतात तेव्हा ते तातडीने औषधपाणी, अन्नधान्य, कपडालत्ता व इतर आवश्यक
गोष्टी पुरवतात. याच्यासाठी लागणारा खर्च, व्यक्तिगत ख्रिश्चनांच्या व मंडळ्यांच्या वर्गणीतून दिला जातो.स्वेच्छिक अनुदान परिणामकारक असण्याव्यतिरिक्त यामुळे आधी उल्लेखलेल्या झनीवॉसारख्या गरीब लोकांवरील भार कमी होतो. पण, आपले घर विकण्याआधी झनीवॉची भेट, यहोवाच्या साक्षीदारांची पूर्ण-वेळेची सेविका, मारिया हिच्याशी झाली. “तिच्यासोबत झालेल्या संभाषणामुळे माझं कुटुंब मोठ्या अडचणीतून वाचलं,” असे झनीवॉ आठवून सांगतो.
झनीवॉला हे कळाले की, देवाचे कार्य दशमांशांवर अवलंबून नाही. किंबहुना, आता दशमांश देणे ही एक शास्त्रीय अपेक्षा राहिलेली नाही. त्याला कळाले की, उदारपणे दिल्यास ख्रिश्चनांना आशीर्वाद मिळतो खरा परंतु आपल्याला जमते त्यापेक्षा जास्त देण्याचे बंधन त्यांच्यावर नाही.
स्वेच्छिक दान दिल्यामुळे झनीवॉला खरा आनंद मिळाला आहे. त्याविषयी तो म्हणतो: “माझ्याच्याने कधी १० टक्के देणे होते, तर कधी होत नाही पण जे काही दान मी टाकतो त्याचा मला आनंद वाटतो आणि यहोवाला देखील आनंद वाटतो अशी मला खात्री वाटते.”
[६ पानांवरील चौकट/चित्रे]
प्रारंभिक चर्च धर्मगुरूंनी दशमांश देण्याची शिकवण दिली का?
“आपल्यातील धनवान, गरजवंतांची मदत करतात . . . जे सुसंपन्न आणि इच्छुक आहेत ते प्रत्येकाला योग्य वाटेल त्याप्रमाणे देतात.”—द फर्स्ट ॲपलॉजी, जस्टिन मार्टर, सा.यु. १५० च्या सुमारास.
“यहूद्यांनी आपल्या सर्व मालकीच्या गोष्टींचा दहावा हिस्सा देवाला समर्पित केला होता, पण स्वातंत्र्य मिळालेल्यांनी तर आपले सर्व काही प्रभूच्या कार्यासाठी बाजूला राखले आहे, . . . त्या गरीब विधवेप्रमाणे जिने आपले सर्वस्व देवाच्या दानपेटीत टाकले.”—पाखंड मताविरुद्ध (इंग्रजी), आयरीनीयस, सा.यु. १८० च्या सुमारास.
“आमच्याकडे दानपेटी असली तरी त्यात खरेदीचे पैसे नसतात जसे इतर धर्मांमध्ये घेतले जातात. महिन्याच्या एखाद्या दिवशी, ज्याला वाटते तो त्यात छोटेसे दान टाकतो; आणि तेही स्वखुषीने व त्याला जमत असेल तरच: कारण कोणावरही जबरदस्ती नाही; सर्वकाही स्वेच्छिक आहे.”—अपॉलजी, टर्टुलियन, सा.यु. १९७ च्या सुमारास.
चर्चचा विस्तार होऊ लागला आणि अनेक संस्था निर्माण झाल्या तेव्हा पाळकांची योग्य व कायमची व्यवस्था होईल म्हणून काही नियम बनवण्याची गरज भासली. तेव्हा जुन्या नियमशास्त्रातल्या दशमांश देण्याच्या पद्धतीचे अनुसरण करण्यात आले . . . या विषयावर सर्वात जुना निश्चित नियम ५६७ मध्ये टुर्स येथे जमलेल्या बिशपांच्या पत्रात व ५८५ मध्ये मॉकन सभेच्या [नियमावलीत] आढळतो.”—द कॅथलिक एन्सायक्लोपिडिया.
[चित्राचे श्रेय]
नाणे, वर डावीकडे: Pictorial Archive (Near Eastern History) Est.
[४, ५ पानांवरील चित्र]
स्वेच्छिक दानांमुळे आनंद मिळतो
[७ पानांवरील चित्रे]
स्वेच्छिक अनुदानांमुळे प्रचाराचे कार्य, तातडीचे मदतकार्य आणि सभांच्या इमारतींचे बांधकाम यासाठी अर्थसाहाय्य लाभते