आपले हात बळकट करा
आपले हात बळकट करा
बायबलमध्ये, हाताचा उल्लेख १,८०० पेक्षा अधिक वेळा आलेला आहे. हाताविषयीचे वाक्प्रचार विविध अर्थ सूचित करण्याकरता उपयोगात आणले जातात. उदाहरणार्थ, स्वच्छ हात निष्कपटता दर्शवतात. (२ शमुवेल २२:२१; स्तोत्र २४:३, ४) हाताचा सढळ असण्याचा अर्थ, इतरांना उदारता दाखवणे असा होतो. (अनुवाद १५:११; स्तोत्र १४५:१६) आपला जीव धोक्यात घालणाऱ्या मनुष्याबद्दल असे म्हटले जाते की त्याने आपले शिर आपल्या हातावर घेतले आहे. (१ शमुवेल १९:५) हात गळणे म्हणजे खचून जाणे. (२ इतिहास १५:७) आणि हात बळकट करणे म्हणजे, कार्यासाठी दृढ होणे, शक्ती मिळवणे.—१ शमुवेल २३:१६.
आज, आपले हात बळकट करण्याची निकडीची गरज आहे. आपण ‘शेवटल्या काळच्या कठीण दिवसात’ जगत आहोत. (२ तीमथ्य ३:१) निराश झाल्यावर, हात टेकणे, हात गळणे हा मानवी स्वभाव आहे. किशोरवयीनांनी शाळा सोडल्याचे, पतीने आपल्या कुटुंबाला सोडल्याचे, आईने आपल्या मुलांना सोडल्याचे आपण सर्रासपणे पाहतो. ख्रिस्ती या नात्याने देवाची सेवा करत असताना आपल्या समोर येणाऱ्या परीक्षांत टिकून राहण्यासाठी आपल्याला आपले हात बळकट करण्याची गरज आहे. (मत्तय २४:१३) असे केल्याने आपण यहोवाचे मन आनंदित करतो.—नीतिसूत्रे २७:११.
हात बळकट कसे केले जातात
जेरुसलेममधील यहोवाच्या मंदिराच्या पुनःबांधणीचे काम करण्यासाठी एज्राच्या दिवसांतील यहुद्यांना आपले हात बळकट करण्याची गरज होती. ते त्यांनी कसे केले? अहवाल म्हणतो: “त्यांनी बेखमीर भाकरीचा सण सात दिवस आनंदाने पाळिला, कारण परमेश्वराने त्यांस आनंदित केले होते आणि इस्राएलाचा देव ह्याच्या मंदिराच्या कामी त्यांच्या हातास जोर यावा म्हणून त्याने अश्शूरच्या राजाचे मन त्यास अनुकूल केले होते.” (एज्रा ६:२२) स्पष्टतः, यहोवाने आपल्या कार्यकारी शक्तीद्वारे, आपल्या लोकांना पाठवण्यास “अश्शूरच्या राजाचे मन” अनुकूल केले; शिवाय या शक्तीने लोकांनाही प्रेरणा दिली ज्यामुळे त्यांनी सुरू केलेले काम ते पूर्ण करू शकले.
नंतर, जेरुसलेमच्या तटांची डागडुजी करायची होती तेव्हा नहेम्याने या कामासाठी आपल्या सहबांधवांचे हात बळकट केले. त्याविषयी आपण असे वाचतो: “माझ्या देवाचा चांगला हात जो माझ्यावर होता त्याविषयी आणि राजाने जी वचने मला दिली होती तीही मी त्यांना सांगितली. तेव्हा आपण उठून बांधू असे त्यांनी म्हटले, आणि त्यांनी चांगल्या कामाला आपले हात दृढ केले.” दृढ हातांनी नहेम्या आणि त्याचे सहयहुदी, अवघ्या ५२ दिवसांत जेरुसलेमचा तट बांधून काढू शकले!—नहेम्या २:१८, पं.र.भा.; ६:९, १५.
अशाचप्रकारे, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याकरता यहोवा आपले हात बळकट करतो. (मत्तय २४:१४) ‘त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास आपल्याला प्रत्येक चांगल्या कामासाठी सिद्ध’ करण्याद्वारे तो आपले हात बळकट करतो. (इब्री लोकांस १३:२१) त्याने आपल्याला सर्वोत्कृष्ट दर्जाची साधने दिली आहेत. संपूर्ण जगभरातील लोकांना देण्यासाठी आपल्याजवळ, बायबल, बायबल आधारित पुस्तके, नियतकालिके, माहितीपत्रके, पत्रिका, ऑडिओ आणि व्हिडिओ कॅसेट्स आहेत. खरे तर, ३८० भाषांमध्ये आपली प्रकाशने उपलब्ध आहेत. याशिवाय, मंडळीच्या सभांद्वारे, संमेलनांद्वारे, अधिवेशनांद्वारे यहोवा ईश्वरशासित शिक्षण देतो आणि आपली सेवा पूर्ण करण्यासाठी आपण या साधनांचा उपयोग कसा करावा त्याचे प्रशिक्षणही देतो.
यहोवा तर अनेक मार्गांनी आपले हात बळकट करतो; परंतु आपणही प्रयत्न केले पाहिजेत अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. संदेष्टा अलिशाकडे अरामाच्या सैन्याविरुद्ध लढण्यास मदत मिळावी म्हणून आलेल्या राजा योवाशला त्याने काय सांगितले त्याची आठवण करा. अलिशाने राजाला काही बाण घेऊन ते जमिनीवर मारण्यास सांगितले. बायबल अहवाल म्हणतो: “तो तीनदा मारून थांबला. देवाचा माणूस त्याजवर रागावून म्हणाला, तू पाचसहा वेळा बाण मारावयाचे असते, म्हणजे अरामाचा क्षय होईपर्यंत तू त्यास मार दिला असतास; आता तू त्यास तीन वेळा मात्र मार देशील.” (२ राजे १३:१८, १९) योवाशने झटून प्रयत्न न केल्यामुळे त्याला अरामाविरुद्ध लढल्यावर विशिष्ट प्रमाणातच यश मिळाले.
यहोवाने आपल्याला दिलेले काम पूर्ण करण्याची आपली इच्छा असल्यास वरील तत्त्व लागू होते. आपल्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांची किंवा आपल्याला दिलेली नेमणूक किती कठीण आहे याची चिंता करण्याऐवजी आपण पूर्ण मनाने व झटून प्रयत्न केले पाहिजेत. मदतीसाठी यहोवावर विसंबून राहून आपण आपले हात बळकट केले पाहिजेत.—यशया ३५:३, ४.
यहोवा आपले हात बळकट करतो
आपल्याला मदत करण्यात आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपले हात बळकट करण्यात यहोवा कसलीही कसर सोडणार नाही. अर्थात, चमत्काराद्वारे तो आपल्यासाठी सर्वकाही करणार नाही. तर, आपण स्वतः—बायबलचे वाचन करून, सभांची तयारी करून नियमितरीत्या उपस्थित राहून, क्षेत्र सेवेत आपल्याला होता होईल तितक्यांदा जाऊन व त्याला सतत प्रार्थना करून प्रयत्न केले पाहिजेत अशी तो अपेक्षा करतो. संधी मिळते त्यानुसार आपण विश्वासूपणे व मनापासून आपली बाजू पूर्ण करत राहतो तेव्हा यहोवा देखील आपल्याकडून तो जे काही अपेक्षितो ते करण्यास शक्ती देतो.—फिलिप्पैकर ४:१३.
एका ख्रिस्ती बांधवाचे उदाहरण विचारात घ्या. एकाच वर्षात त्यांची पत्नी आणि आई देखील मरण पावली. त्यातून ते सावरतात तोच, त्यांची सून त्यांच्या मुलाला सोडून गेली आणि तिने सत्याचा मार्ग देखील सोडून दिला. हा बांधव म्हणतो: “मी एक गोष्ट शिकलो; आपण परीक्षा निवडू शकत नाही, त्या कोणत्या समयी व किती वेळा आल्या पाहिजेत हे ठरवू शकत नाही.” या सर्व दुःखद अनुभवातही टिकून राहायला त्याला शक्ती कोठून मिळते? “प्रार्थना आणि व्यक्तिगत अभ्यास हे एखाद्या जीवन-रक्षक जॅकेटप्रमाणे मला, समस्यांच्या डोहात बुडून जाण्यापासून राखतात. याशिवाय, माझ्या आध्यात्मिक बंधूभगिनींनी मला खूप सांत्वन दिलं आहे. या सर्वांपेक्षा मला कठीण परिस्थिती यायच्या आधीच, यहोवाबरोबर उत्तम व्यक्तिगत नातं बनवण्याचं महत्त्व समजलं आहे.”
जीवनात तुमचा कोणताही अनुभव असला तरी, यहोवावर पूर्ण भरवसा ठेवण्याचा आणि तुमचे हात बळकट करण्यासाठी त्याने केलेल्या सर्व तरतुदींचा चांगल्याप्रकारे उपयोग करण्याचा निश्चय करा. तेव्हाच तुम्ही यहोवाची सर्वोत्कृष्ट दर्जाची सेवा करू शकाल आणि याद्वारे त्याच्या अमोल नावाची स्तुती व गौरव कराल.—इब्री लोकांस १३:१५.
[३१ पानांवरील चित्र]
योवाशने झटून प्रयत्न न केल्यामुळे त्याला अरामाविरुद्ध लढल्यावर कमी यश मिळाले