व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एक मिशनरी नेमणूकच आमचं घर झाली

एक मिशनरी नेमणूकच आमचं घर झाली

जीवन कथा

एक मिशनरी नेमणूकच आमचं घर झाली

डिक वॉल्ड्रन यांच्याद्वारे कथित

१९५३ सालच्या सप्टेंबर महिन्यातली ती एक रविवारची दुपार होती. आम्ही नुकतेच नैर्ऋत्य आफ्रिकेत (आता नामिबिया) राहायला आलो होतो. आम्हाला येऊन एक आठवडासुद्धा झाला नव्हता; आम्ही राजधानी, विन्डहोक येथे एक सार्वजनिक सभा सुरू करण्याच्या बेतात होतो. पण कोणत्या कारणामुळे आम्ही ऑस्ट्रेलियाहून या आफ्रिकन देशात आलो होतो? आम्ही दोघं पतीपत्नी आणि आमच्याबरोबर आणखी तीन तरुण स्त्रिया असे आम्ही सर्वजण देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करणारे मिशनरी म्हणून इथं आलो होतो.—मत्तय २४:१४.

माझ्या जीवनाची सुरवात पृथ्वीच्या एका टोकाला अर्थात ऑस्ट्रेलियात १९१४ या ऐतिहासिक वर्षी झाली. महामंदीच्या काळात मी किशोरावस्थेत होतो आणि आमच्या कुटुंबाचं पालन-पोषण करण्यासाठी मलाही कष्ट करावं लागलं. मला काही विशिष्ट काम नव्हतं, म्हणून मी स्वतःच एक काम शोधून काढलं; ऑस्ट्रेलियात खूप जंगली ससे मिळायचे. या सशांची शिकार करण्याची एक नवीन पद्धत मी शोधून काढली. अशाप्रकारे मी घरात नेहमी सशाचं मटन आणून द्यायचो.

१९३९ साली दुसऱ्‍या महायुद्धाची सुरवात झाली तोपर्यंत मला कसंबसं मेलबर्न शहरांतील ट्रॅम्स व बसेसमध्ये काम मिळालं. जवळजवळ ७०० लोकांना या बसेसमध्ये पाळीची कामं होती आणि प्रत्येक पाळीला मी एका वेगळ्या ड्रायव्हरला आणि कंडक्टरला भेटायचो. मी नेहमी त्यांना विचारायचो, “तुम्ही कोणत्या धर्माचे आहात?” आणि मग त्यांच्या विश्‍वासांबद्दल ऐकून घ्यायचो. मी इतक्या लोकांबरोबर बोललो पण फक्‍त एकानंच मला समाधानकारक उत्तर दिलं होतं; आणि तो होता एक यहोवाचा साक्षीदार. त्यानं मला बायबलमधून, पृथ्वीला परादीस बनवण्याविषयीचा संदेश समजावून सांगितला; या परादीसमध्ये देवाला भिऊन वागणारे लोक सदासर्वकाळ जगणार आहेत, असं त्यानं मला सांगितलं.—स्तोत्र ३७:२९.

याच दरम्यान माझ्या आईची देखील यहोवाच्या साक्षीदारांबरोबर ओळख झाली. पुष्कळदा असे व्हायचे की मी शेवटली पाळी करून घरी यायचो तेव्हा टेबलावर माझ्या जेवणाच्या ताटाशेजारी एक कन्सोलेशन (आता ज्याला सावध राहा! म्हटलं जातं) मासिकसुद्धा ठेवलेलं असायचं. मी जे काही त्यातून वाचायचो ते मला पटायचं. कालांतराने हाच धर्म खरा असल्याची माझी खात्री पटली आणि मग मी त्यात सक्रियपणे भाग घेऊ लागलो आणि १९४० सालच्या मे महिन्यात माझा बाप्तिस्मा झाला.

मेलबर्नमध्ये एक पायनियरगृह होते; तिथं जवळजवळ २५ यहोवाच्या साक्षीदारांचे पूर्ण-वेळेचे सेवक राहायचे. मी त्यांच्याबरोबर राहायला गेलो. दररोज मला प्रचारकार्यातील त्यांचे अनुभव ऐकायला मिळायचे आणि मग माझ्याही मनात पायनियर व्हायच्या इच्छेने जन्म घेतला. शेवटी मी पायनियर सेवेसाठी अर्ज देखील भरला. माझा अर्ज स्वीकारण्यात आला आणि मला यहोवाच्या साक्षीदारांच्या ऑस्ट्रेलिया शाखा दफ्तरात कामासाठी बोलावण्यात आलं. अशाप्रकारे मी बेथेल कुटुंबाचा एक सदस्य बनलो.

तुरुंगवास आणि बंदी

बेथेलमध्ये मला नेमण्यात आलेल्या कामांपैकी एक काम होतं, लाकडाच्या चिरकामाची गिरणी चालवणे. तिथं आम्ही कोळसा बनवण्यासाठी लाकडं कापायचो. इंधनासाठी म्हणून कोळसा, शाखेतील गाड्यांसाठी वापरला जायचा; कारण, युद्धामुळे पेट्रोल मिळणे शक्य नव्हते. या कामासाठी आम्ही १२ जण होतो आणि आम्हाला सर्वांना सक्‍तीने लष्करात भरती केले जाऊ शकत होते. लष्करात काम करायला आम्ही बायबल आधारित कारणामुळे नकार दिल्यामुळे काही दिवसांतच आम्हाला, सहा महिन्यांसाठी तुरुंगात टाकण्यात आलं. (यशया २:४) आम्हाला तुरुंगाच्या एका मळ्यावरील कामगार छावणीत पाठवण्यात आलं. तिथं आम्हाला काय काम दिलं असेल बरं? बेथेलमध्ये आम्ही जे काम करायला शिकलो होतो ते काम, लाकडं कापायचं काम!

लाकडं कापायच्या कामात आम्ही तरबेज झाल्यामुळे तुरुंगाच्या गव्हर्नरनं आमच्यावर खूष होऊन आम्हाला बायबल आणि आमची बायबल साहित्ये आणून दिली; या गोष्टी आम्हाला दिल्या जाऊ नयेत असा कडक हुकूम असताना देखील आम्हाला त्यानं त्या आणून दिल्या. याच काळादरम्यान मी आपापसांतील नातेसंबंधाविषयी एक लाभदायक धडा शिकलो. बेथेलमध्ये काम करत असताना एका बांधवाबरोबर माझं केव्हाही पटायचं नाही. आमच्या दोघांची व्यक्‍तिमत्त्वे अगदी भिन्‍न होती. पण, तुरुंगात माझ्या कोठडीत कोण असेल ओळखा पाहू? तोच बांधव! इथं आम्हाला एकमेकांना समजून घ्यायला वाव मिळाला आणि याचा परिणाम असा झाला की आमच्यामध्ये एक घनिष्ट व अतूट मैत्री निर्माण झाली.

काही काळानंतर, ऑस्ट्रेलियातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी आली. सर्व निधी जप्त करण्यात आला, बेथेलमधल्या बांधवांकडे खूप कमी पैसे होते. एकदा, एक जण माझ्याकडे आला आणि मला म्हणाला: “डिक, मला शहरात प्रचाराला जायचं होतं, पण माझ्याकडे चांगली बूटं नाहीत, कामाची बूटं आहेत.” मी त्याला माझी बूटं दिली आणि तो ती घालून प्रचाराला गेला.

नंतर, आम्हाला कळलं की प्रचार केल्याबद्दल त्याला अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं. हे ऐकून मला काही राहावेना; मी त्याला एक चिठी लिहिली: “तुला जे झालं ते ऐकून वाईट वाटलं. बरं झालं, ती बूटं घातलेला मी नव्हतो!” मी असं त्याला मजेत म्हणालो खरं, पण थोड्या दिवसांनी मलासुद्धा अटक करून दुसऱ्‍यांदा माझ्या तटस्थ भूमिकेसाठी तुरुंगात टाकण्यात आलं. तुरुंगातून सुटल्यावर मी बेथेलला गेलो तेव्हा तिथं मला, कुटुंबाला अन्‍न पुरवणाऱ्‍या मळ्यावर काम करण्यास नेमण्यात आलं. आतापर्यंत, तर कोर्टात आमच्या बाजूनं निकाल लागला होता आणि यहोवाच्या साक्षीदारांवरची बंदी उठवण्यात आली.

आवेशी सुवार्तिक माझी पत्नी बनते

मळ्यावर असताना, मी गंभीरपणे लग्नाचा विचार करू लागलो आणि मला कॉर्ली क्लोगन नावाची एक तरुण पायनियर आवडू लागली होती. कॉर्लीची आजी, त्यांच्या संपूर्ण कुटुंबात बायबलच्या संदेशात आवड दाखवणारी पहिली व्यक्‍ती होती. मरतेवेळी तिनं कॉर्लीच्या आईला, विराला सांगितलं: “तुझ्या मुलांना देवावर प्रेम करायला आणि त्याची सेवा करायला शिकव, एक दिवशी आपण पृथ्वीवरील परादीसमध्ये भेटू.” नंतर, एक पायनियर बांधव विराच्या घरी आला आणि त्याने तिला आता जिवंत असलेले कोट्यवधी कधीही मरणार नाहीत (इंग्रजी) हे प्रकाशन वाचायला दिलं तेव्हा विराला आपल्या आईचे शब्द समजले. ही पुस्तिका वाचल्यावर तिची खात्री पटली, की मानवजातीनं पृथ्वीवरील परादीसमध्ये जीवनाचा आनंद लुटावा हा देवाचा उद्देश आहे. (प्रकटीकरण २१:४) १९३० दशकाच्या सुरवातीला तिचा बाप्तिस्मा झाला आणि तिच्या आईनं तिला उत्तेजन दिल्याप्रमाणे तिनं आपल्या तिन्ही मुलींना—लूसी, जीन आणि कॉर्ली—यांना देवावर प्रेम करण्यास शिकवलं. पण कॉर्लीच्या वडिलांनी मात्र, कुटुंबांविषयी येशूने भाकीत केल्याप्रमाणे कडा विरोध केला.—मत्तय १०:३४-३६.

संपूर्ण क्लोगन कुटुंबाला संगीताचं वेड होतं; प्रत्येक मुलीला एक संगीत वाद्य वाजवता येत होतं. कॉर्ली व्हायलिन वाजवायची; १९३९ साली वयाच्या १५ व्या वर्षी तिने संगीतात डिप्लोमा मिळवला. दुसऱ्‍या महायुद्धाची सुरवात झाली तेव्हा कॉर्ली आपल्या भविष्याचा गंभीरपणे विचार करू लागली. ती पुढे आपल्या जीवनात काय करणार होती याचा निर्णय घेण्याची वेळ आली होती. एकीकडे तिला संगीतात नाव कमावता येत होतं. नाहीतरी तिला मेलबर्न सिंफनी ऑर्केस्ट्रात व्हायलिन वादक म्हणून आमंत्रणही मिळालं होतं. आणि दुसऱ्‍या बाजूला, ती राज्याच्या संदेशाचा प्रचार करण्याच्या महान कार्यात आपला वेळ खर्च करू शकत होती. खूप विचार केल्यावर, कॉर्ली आणि तिच्या दोन बहिणींनी १९४० साली बाप्तिस्मा घेतला आणि पूर्ण-वेळेचे सुवार्तिक कार्य सुरू करण्याच्या तयारीस लागल्या.

कॉर्लीनं पूर्ण-वेळेच्या सेवेत उतरण्याचा निश्‍चय केला होता आणि तेव्हाच ऑस्ट्रेलिया शाखा दफ्तरात जबाबदार पदी असलेले बंधू लॉईड बॅरी कॉर्लीशी बोलले. या बंधूंनी नंतर यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळात सेवा केली. मेलबर्नमध्ये त्यांनी नुकतेच एक भाषण दिले होते आणि ते कॉर्लीला म्हणाले: “मी बेथेलला पुन्हा ट्रेननं चाललोय. तुलाही बेथेलला यायचं का?” कॉर्ली त्यांच्याबरोबर जायला एका पायावर तयार झाली.

कॉर्ली आणि बेथेल कुटुंबातील इतर बहिणींनी, युद्धाच्या काळात आपल्या कामावर बंदी असताना ऑस्ट्रेलियातील बांधवांना बायबल आधारित प्रकाशनांचा पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनीच खरे तर, बंधू मालक्म वॉल यांच्या देखरेखीखाली छपाईची बहुतेक कामं केली. नवे जग आणि मुले ही पुस्तके इंग्रजीत छापून त्यांची बांधणी केली जायची; बंदीचा काळ दोनपेक्षा अधिक वर्ष होता पण टेहळणी बुरूज नियतकालिकाचा एकही अंक त्या काळात छापायचा चुकला नाही.

पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी १५ वेळा छापखान्याचे ठिकाण बदलावे लागले होते. एकदा तर, एका इमारतीत वरून दाखवण्यासाठी वेगळ्या प्रकारची छपाई केली जायची परंतु इमारतीच्या तळघरात मात्र बायबल साहित्यांची छपाई गुप्तपणे होत होती. रिसेपशनमध्ये बसलेल्या बहिणीला धोक्याची चाहुल लागताच ती एक बटन दाबायची ज्याची घंटा तळघरात ऐकू यायची आणि मग तळघरातील भगिनी कोणी यायच्या आधी प्रकाशने लपवून ठेवायच्या.

अशीच एकदा तपासणी चालली होती; आणि भगिनींच्या लक्षात आलं की एका टेबलवर टेहळणी बुरूज नियतकालिकाचा एक अंक वरच राहिला होता; ते पाहून त्या बिचाऱ्‍या भगिनींची गाळण उडाली. पण झालं असं, की तपासणीसाठी आलेल्या पोलिसाचं त्या अंकाकडे लक्ष गेलं नाही, त्यानं आपली ब्रिफकेस अगदी त्या नियतकालिकावरच ठेवली आणि मग तो इकडे-तिकडे शोधायला लागला. त्याला काही दिसलं नाही तेव्हा त्यानं आपली ब्रिफकेस उचलली आणि चालता झाला!

बंदी उठल्यानंतर व शाखेची मालमत्ता पुन्हा बांधवांना मिळाल्यानंतर पुष्कळांना खास पायनियर म्हणून क्षेत्रात जाण्याची संधी देण्यात आली. तेव्हाच कॉर्लीनं ग्लेनीनीसला जाण्याची इच्छा प्रदर्शित केली. जानेवारी १, १९४८ साली आमचं लग्न झाल्यावर मीही तिकडेच गेलो. तिथून दुसऱ्‍या नेमणुकीला जाईपर्यंत तिथं एक मंडळी तयारी झाली होती जिच्यात वाढ होत होती.

आमची दुसरी नेमणूक रॉकहॅम्पटन होती; पण तिथं आम्हाला राहायला जागा मिळाली नाही. त्यामुळे मग आम्ही एका आस्थेवाईक व्यक्‍तीच्या शेतमळ्यावर एक तंबू टाकला आणि तिथं राहायला लागलो. पुढील नऊ महिन्यांसाठी हाच तंबू आमचं घर होतं. कदाचित आम्ही जास्त दिवस या तंबूत राहिलो असतो; पण पावसाळ्यात जोराचं वादळ आलं आणि आमच्या तंबूच्या चिंधड्या झाल्या. *

विदेशी नेमणुकीकडे स्थलांतर

रॉकहॅम्पटन इथं असताना आम्हाला मिशनरी प्रशिक्षणासाठी असलेली वॉचटावर बायबल गिलियड प्रशाला याच्या १९ व्या वर्गात उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले. १९५२ साली पदवी मिळाल्यानंतर इथूनच आम्हाला नैर्ऋत्य आफ्रिका असे पूर्वी म्हटल्या जाणाऱ्‍या देशात जाण्याची नेमणूक मिळाली.

ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांनीसुद्धा कसलाही उशीर न लावता आमच्या मिशनरी कार्याबद्दल प्रतिक्रिया दाखवली. सलग सहा आठवड्यांसाठी त्यांनी दर रविवारी व्यासपीठावरून आपल्या मंडळींमध्ये आमच्यापासून सावध राहायला सांगितले. त्यांनी लोकांना सांगितलं, की आम्ही आलो तर दार उघडायचं नाही आणि बायबलमधून काहीही वाचू द्यायचं नाही, कारण त्यामुळे त्यांचा गोंधळ होईल. एका क्षेत्रात, आम्ही खूप प्रकाशनांचे वाटप केले पण आमच्यानंतर एक पाळक आला आणि घरोघरी जाऊन त्यानं ती प्रकाशनं गोळा केली. एकदा आम्ही पाळकाच्या घरी चर्चेसाठी गेलो तेव्हा आम्ही त्याच्या घरात बरीच प्रकाशनं पाहिली.

स्थानीय अधिकारी देखील आमच्या कामाविषयी लगेच उत्सुकता दाखवू लागले. यात काही शंका नाही, की पाळकांनी त्यांना चिथावल्यामुळे ते, आमचा कम्युनिस्ट लोकांबरोबर संबंध असेल अशी आमच्यावर शंका घेऊ लागले. त्यामुळे त्यांनी आमच्या बोटांचे ठसे घेतले आणि आम्ही ज्या लोकांना भेटी दिल्या होत्या त्यांची त्यांनी उलटतपासणी घेतली. इतका सर्व विरोध असताना देखील आमच्या सभांची उपस्थिती मात्र सतत वाढत राहिली.

आम्ही राहायला आल्यापासूनच आम्हाला, ओवाम्बो, हेहेरो आणि नामा या मूळ रहिवाशांना बायबलचा संदेश सांगायची तीव्र इच्छा होती. पण हे इतकं सोपं नव्हतं. त्या काळात, नैर्ऋत्य आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदी सरकाराच्या हद्दीत यायचे. आम्हा गोऱ्‍या लोकांना सरकारी परवान्याशिवाय काळ्या लोकांच्या क्षेत्रात जायची परवानगी नव्हती. आम्ही वेळोवेळी परवान्यासाठी अर्ज भरत राहिलो आणि अधिकारी काही कारण नसताना आमचा अर्ज नाकारत राहिले.

आमच्या या परदेशीय नेमणुकीत दोन वर्ष पूर्ण झाल्यावर एक अनपेक्षित गोष्ट घडली. कॉर्लीला दिवस गेले होते. १९५५ सालच्या ऑक्टोबर महिन्यात आमची मुलगी शार्लेट हिचा जन्म झाला. आता आम्ही मिशनरी म्हणून सेवा करू शकत नसलो तरी, मला एक अर्ध-वेळेची नोकरी मिळाली आणि सोबतच मी माझं पायनियरींग सुरू ठेवलं.

आमच्या प्रार्थनांचं उत्तर

१९६० साली आमच्यापुढे आणखी एक पेचप्रसंग आला. कॉर्लीला एक पत्र आलं; त्यात म्हटलं होतं, की तिच्या आईची तब्येत नाजूक होती आणि कॉर्ली जर तिला लगेच भेटायला आली नाही तर ती तिला पुन्हा कधी पाहू शकणार नाही. त्यामुळे मग आम्ही नैर्ऋत्य आफ्रिका सोडून ऑस्ट्रेलियाला जाण्याचा विचार केला. आणि ज्या आठवडी आम्ही निघणार होतो नेमक्या त्याच आठवडी मला स्थानीय अधिकाऱ्‍यांकडून, काटुटूरा या काळ्या लोकांच्या वस्तीत जाण्याचा परवाना मिळाला. आम्ही काय केलं असेल? ज्याच्यासाठी आम्ही सात वर्ष झटलो होतो तो परवाना परत करायचा? आम्ही सुरू केलेलं काम दुसरं कोणीतरी पुढे चालवू शकतं, असं आम्ही सहजपणे म्हणू शकलो असतो. पण हा यहोवाकडून एक आशीर्वाद आणि आमच्या प्रार्थनांचं उत्तर नव्हतं का?

मी लगेच निश्‍चय केला. मी एकटा मागे राहीन; मला अशी भीती वाटली, की आम्ही सर्वच जर ऑस्ट्रेलियाला गेलो तर कायमचं राहण्यासाठी असलेला परवाना मिळवण्यासाठी आम्ही करत असलेले प्रयत्न निष्कळ ठरतील. दुसऱ्‍याच दिवशी मी लगेच जाऊन माझं बोटीचं बुकींग रद्द करून आलो आणि फक्‍त कॉर्ली व शार्लेटला एका मोठ्या सुटीसाठी ऑस्ट्रिलायला पाठवलं.

त्या दोघी गेल्यावर मग मी त्या काळ्या लोकांच्या क्षेत्रात साक्षकार्यासाठी जाऊ लागलो. तिथल्या लोकांनी भरपूर आस्था दाखवली. कॉर्ली आणि शार्लेट पुन्हा आल्या तेव्हा काळ्या क्षेत्रातील अनेक लोक आमच्या सभांना उपस्थित राहू लागले होते.

आतापर्यंत माझ्याजवळ एक जुनी कार होती; यात मी आस्थेवाईक लोकांना बसवून सभांना घेऊन जात असे. दर सभेला मी चार ते पाच खेपा घालून प्रत्येक वेळी सात, आठ किंवा नऊ लोकांना नेत असे. शेवटली व्यक्‍ती कारमधून उतरल्यावर कॉर्ली मला चिडवायची: “सीटच्या खाली किती लोकांना लपवलंय?”

प्रचारकार्यात आणखी प्रभावी होण्याकरता, आम्हाला या मूळ रहिवाशांसाठी त्यांच्या भाषेत साहित्य हवं होतं. त्यामुळे, हेरेरो, नामा, न्डाँगा आणि क्वान्यामा या चार भाषांत शांतीदायक नवीन जगातील जीवन या पत्रिकेच्या भाषांतराची व्यवस्था करण्याचा सुहक्क मला मिळाला. भाषांतर करणारे लोक हे, आम्ही ज्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास करत होतो तेच होते, ते खूप शिकलेले लोक होते; पण प्रत्येक वाक्याचं भाषांतर अचूक होतंय की नाही हे पाहण्यासाठी मला सतत त्यांच्याबरोबरच बसावं लागायचं. नामा भाषेचा शब्दसंग्रह अतिशय मर्यादित आहे. जसं की, मी त्यांना हे समजावून सांगायचा प्रयत्न करत होतो, की “सुरवातीला आदाम एक परिपूर्ण मनुष्य होता.” भाषांतरकारानं जरा डोकं खाजवलं आणि म्हटलं, की “परिपूर्ण” या शब्दासाठी नामा भाषेत शब्द असल्याचं त्याला आठवत नाही. पण मग अचानक तो म्हणाला: “हो, मिळाला! सुरवातीला आदाम एका पिकलेल्या पीच फळासारखा होता!”

आमच्या नेमलेल्या घरात समाधानी

सध्या नामिबिया म्हटल्या जाणाऱ्‍या ठिकाणी आम्हाला ४९ वर्ष पूर्ण झाली आहेत. आता आम्हाला काळ्या लोकांच्या क्षेत्रात जायला परवान्याची गरज लागत नाही. नामिबियात एक नवे सरकार आहे जे कोणत्याही एका जातीय संस्थेवर आधारित नाही. आज, विन्डहोकमध्ये चार मोठमोठ्या मंडळ्या आहेत ज्या ऐसपैस राज्यसभागृहात जमतात.

“तुमच्या विदेशी नेमणुकीला आपलं घर समजा,” या गिलियडमध्ये ऐकलेल्या शब्दांवर आम्ही नेहमी विचार करतो. यहोवानं ज्या पद्धतीनं सर्व काही घडवून आणलं, त्यावरून आमची खात्री पटली आहे की या विदेशी भूमिला आम्ही आमचं घर समजावं, अशी त्याची इच्छा होती. भिन्‍नभिन्‍न व लक्षवेधक संस्कृतीच्या बांधवांवर आम्ही प्रेम करू लागलो आहोत. त्यांच्या सुखात आम्ही त्यांच्याबरोबर हसलो त्यांच्या दुःखात आम्ही त्यांच्याबरोबर रडलो. काही नवीन लोक, ज्यांना आम्ही आमच्या कारमध्ये कोंबून सभांना नेत असू ते आज त्यांच्या मंडळ्यांमध्ये आधारस्तंभ म्हणून सेवा करत आहेत. १९५३ साली आम्ही जेव्हा या विस्तृत देशात आलो होतो तेव्हा सुवार्तेची घोषणा करणारे दहापेक्षा कमी स्थानीय प्रचारक होते. त्या लहानशा सुरवातीनंतर आता आमची संख्या १,२०० पेक्षा अधिक वाढली आहे. यहोवानं वचन दिल्याप्रमाणे खरोखरचं आम्ही व इतरांनी जिथं जिथं सत्याचं बीज ‘लावून पाणी’ घातलं तिथं तिथं त्यानं ते वाढवलं.—१ करिंथकर ३:६.

आधी ऑस्ट्रेलियातील आणि मग नामिबियातील आमच्या अनेक वर्षांच्या सेवेकडे आम्ही मागे वळून पाहतो तेव्हा कॉर्ली आणि मला अगदी मनापासून समाधान वाटते. आता आणि चिरकालासाठी त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी यहोवा आम्हाला शक्‍ती देत राहील अशी आम्ही आशा व प्रार्थना करतो.

[तळटीप]

^ परि. 22 वॉल्ड्रन्स दांपत्य या कठीण नेमणुकीत कसे टिकून राहिले त्याचा रोमांचक व निनावी अहवाल, टेहळणी बुरूज डिसेंबर १, १९५२, पृष्ठे ७०७-८ (इंग्रजी) वर आला आहे.

[२६, २७ पानांवरील चित्र]

ऑस्ट्रेलियातील रॉकहॅम्पटनला आमच्या नेमणुकीसाठी जाताना

[२७ पानांवरील चित्र]

गिलियड प्रशालेच्या मार्गावर असलेल्या बंदरावर

[२८ पानांवरील चित्र]

नामिबियात साक्षकार्य करण्यास आम्हाला आनंद वाटतो