व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनाचा वैयक्‍तिक अभ्यास आनंददायक बनवा

देवाच्या वचनाचा वैयक्‍तिक अभ्यास आनंददायक बनवा

देवाच्या वचनाचा वैयक्‍तिक अभ्यास आनंददायक बनवा

“मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननहि करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन.”—स्तोत्र ७७:१२.

१, २. (अ) आपण मनन करण्याकरता वेळ का काढला पाहिजे? (ब) “मनन” व “चिंतन” यांचा काय अर्थ होतो?

आपण येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत. त्याअर्थी देवासोबतचा आपला नातेसंबंध आणि ज्यांमुळे आपण त्याची सेवा करत आहोत ती कारणे आपल्याला सर्वात महत्त्वाची वाटली पाहिजे. पण आज बहुतेक लोक इतके धकाधकीचे जीवन जगतात की मनन करण्याकरता ते जराही वेळ काढत नाहीत. संपत्ती मिळवण्यात, निरनिराळ्या वस्तू विकत घेण्यात आणि उद्देशहीन सुखविलासाच्या अनंत चक्रात जणू ते अडकलेले आहेत. आपण असे व्यर्थ उद्योग कशाप्रकारे टाळू शकतो? त्यासाठी, ज्याप्रमाणे आपण जेवणे व झोपणे यांसारख्या अत्यावश्‍यक गोष्टींसाठी दररोज वेळ काढतो त्याचप्रमाणे आपण यहोवाच्या कार्यांविषयी व व्यवहारांविषयी मनन करण्याकरता दररोज काही वेळ काढला पाहिजे.—अनुवाद ८:३; मत्तय ४:४.

तुम्ही कधी काही क्षण थांबून मनन करता का? मनन करण्याचा काय अर्थ होतो? मनन या शब्दाची व्याख्या एका शब्दकोशात पुढीलप्रमाणे केली आहे: “विशिष्ट गोष्टीवर विचारकेंद्रित करणे: विचार करणे किंवा चिंतन करणे.” आणि “चिंतन” या शब्दाचा अर्थ, “ध्यान करणे: . . . खासकरून शांतपणे, गंभीरतेने आणि खोलात शिरून विचार करणे.” याचा आपल्याकरता काय अर्थ होतो?

३. आध्यात्मिक प्रगतीचा कशाशी थेट संबंध आहे?

पहिली गोष्ट म्हणजे यावरून आपल्याला पौलाने त्याचा सह सेवक तीमथ्य याला काय लिहिले होते याची आठवण झाली पाहिजे: “मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण ह्‍याकडे लक्ष ठेव. . . . तुझी प्रगति सर्वांस दिसून यावी म्हणून तू ह्‍या गोष्टींचा अभ्यास [“चिंतन कर,” NW] ठेव; ह्‍यांत गढून जा.” होय, तीमथ्याकडून प्रगतीची अपेक्षा होती आणि पौलाच्या शब्दांवरून दिसून येते की आध्यात्मिक गोष्टींविषयी चिंतन करण्याचा प्रगतीशी थेट संबंध होता. आजही हेच खरे आहे. आध्यात्मिक प्रगती केल्याचे समाधान अनुभवण्याकरता आपणही देवाच्या वचनाशी संबंधित असलेल्या बाबींवर ‘चिंतन’ केले पाहिजे आणि त्यांत ‘गढून’ गेले पाहिजे.—१ तीमथ्य ४:१३-१५.

४. यहोवाच्या वचनाचे नियमित चिंतन करण्याकरता तुम्ही कोणत्या सहायक साधनांचा उपयोग करू शकता?

तुमच्याकरता मनन करण्याची सर्वात उत्तम वेळ कोणती ठरेल हे तुमच्या स्वतःच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या नित्यक्रमावर अवलंबून आहे. बरेचजण पहाटे शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे पुस्तिकेतून दैनिक वचन वाचतात व त्या बायबल वचनावर विचार करतात. किंबहुना, सबंध जगातील बेथेल गृहांत राहणारे जवळजवळ २०,००० स्वयंसेवक दैनिक वचनावर १५ मिनिटे विचार करून आपल्या दिवसाची सुरवात करतात. दररोज सकाळी बेथेल कुटुंबातील केवळ दोनचार सदस्य त्या दिवसाच्या वचनावर टिप्पणी देतात, पण बाकीचे सर्वजण जे सांगितले व वाचले जाते त्यावर चिंतन करतात. इतर साक्षीदार कामाला जाताना प्रवासात यहोवाच्या वचनावर विचार करतात. काहीजण बायबलच्या व टेहळणी बुरूज सावध राहा! नियतकालिकांच्या काही भाषांतून उपलब्ध असलेल्या ऑडियो कॅसेट्‌स लावून ऐकतात. बऱ्‍याच गृहिणी घरात काम करत असताना या कॅसेट्‌स ऐकतात. खरे पाहता हे सर्वजण पुढील शब्द लिहिणाऱ्‍या स्तोत्रकर्ता आसाफ याचे अनुकरण करतात: “मी परमेशाची महत्कृत्ये वर्णीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्‌भुत कृत्यांचे स्मरण करीन. मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननहि करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन.”—स्तोत्र ७७:११, १२.

योग्य मनोवृत्तीमुळे होणारे चांगले परिणाम

५. वैयक्‍तिक अभ्यासाला आपण का महत्त्व दिले पाहिजे?

आपल्या या आधुनिक काळात टीव्ही, व्हिडिओ आणि कम्प्युटर्स यांमुळे लोक फारसे वाचन करताना दिसत नाहीत. पण यहोवाच्या साक्षीदारांमध्ये निश्‍चितच असे व्हायला नको. काही झाले तरी, बायबलचे वाचन जणू यहोवाशी आपला संबंध जोडणारी नाळ आहे. हजारो वर्षांपूर्वी मोशेचा उत्तराधिकारी म्हणून यहोशवा इस्राएल राष्ट्राचा पुढारी बनला. यहोवाचा आशीर्वाद मिळवण्याकरता, यहोशवाला देवाचे वचन वाचण्यास सांगण्यात आले होते. (यहोशवा १:८; स्तोत्र १:१, २) आणि आज देखील हेच अपेक्षित आहे. फारसे शिक्षण न झाल्यामुळे काहींना नीट वाचता येत नसेल किंवा त्यांना ते कंटाळवाणे वाटत असेल. पण देवाचे वचन वाचण्याची व त्याचा अभ्यास करण्याची इच्छा जागृत करण्यासाठी काय सहायक ठरू शकेल? नीतिसूत्रे २:१-६ वचनांत राजा शलमोन याच्या शब्दांतून या प्रश्‍नाचे उत्तर मिळू शकते. कृपया आपले बायबल उघडून ही वचने वाचा. मग आपण त्यांवर चर्चा करू.

६. देवाच्या ज्ञानाविषयी आपण कशी मनोवृत्ती बाळगावी?

अगदी सुरवातीलाच आपल्याला हे आग्रहपूर्वक शब्द वाचायला मिळतात: “माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेविशील, आपला कान ज्ञानाकडे देशील, आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील . . . ” (नीतिसूत्रे २:१, २) या शब्दांवरून आपण काय शिकतो? हेच, की देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकाची आहे. एक अट आहे, “जर तू माझी वचने स्वीकारशील.” हा “जर” शब्द फार महत्त्वाचा आहे कारण जगातले बहुतेक लोक देवाच्या वचनाकडे मुळीच लक्ष देत नाहीत. पण देवाच्या वचनाचा अभ्यास आनंददायक करण्यासाठी आपण यहोवाची वचने स्वीकारण्यास तयार असले पाहिजे आणि आपण गमावू इच्छित नाही अशा मोलवान खजिन्याप्रमाणे त्यांना समजले पाहिजे. देवाच्या वचनाविषयी आपल्या मनात बेपर्वा मनोवृत्ती निर्माण होईल अथवा त्याविषयी शंका निर्माण होईल इतपत आपण आपल्या दैनंदिन नित्यक्रमात व्यग्र किंवा त्यामुळे विचलित होता कामा नये.—रोमकर ३:३, ४.

७. अगदीच अशक्य असते तेव्हाचा अपवाद सोडता, आपण नेहमी ख्रिस्ती सभांमध्ये उपस्थित राहून त्यांत लक्ष देणे का महत्त्वाचे आहे?

ख्रिस्ती सभांमध्ये देवाच्या वचनाचे स्पष्टीकरण दिले जात असताना आपण ‘कान देऊन,’ अर्थात लक्षपूर्वक ऐकतो का? (इफिसकर ४:२०, २१) सुज्ञानाकडे ‘मन लावतो’ का? व्यासपीठावरून बोलणारा कदाचित अतिशय अनुभवी वक्‍ता नसेल, पण ज्याअर्थी तो देवाच्या वचनाच्या आधारावर बोलत आहे, त्याअर्थी त्याच्या बोलण्याकडे पूर्णपणे लक्ष देण्याचे आपले कर्तव्य आहे. अर्थात, आपल्याला अगदीच अशक्य होते तेव्हाचा अपवाद सोडता, यहोवाच्या सुज्ञानाकडे लक्ष देण्याकरता आपण प्रत्येक ख्रिस्ती सभेत उपस्थित असले पाहिजे. (नीतिसूत्रे १८:१) सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी जेरूसलेममध्ये त्या माडीवरील खोलीतली सभा चुकवलेल्यांना नंतर किती पस्तावा झाला असेल याची कल्पना करा! आपल्या सभा जरी त्या सभेइतक्या रोमांचक नसल्या तरीसुद्धा या सभांमध्ये आपले मूलभूत पाठ्यपुस्तक बायबल याच्या आधारावर चर्चा केली जाते. त्याअर्थी, आपण जर लक्ष दिले आणि आपल्या वक्‍त्‌याने सांगितलेले वचन स्वतःच्या बायबलमधून उघडून वाचले तर प्रत्येक सभेतून आपल्याला आध्यात्मिक आशीर्वाद निश्‍चितच प्राप्त होऊ शकतो.—प्रेषितांची कृत्ये २:१-४; इब्री लोकांस १०:२४, २५.

८, ९. (अ) वैयक्‍तिक अभ्यासाकरता आपल्याला काय करावे लागेल? (ब) देवाविषयीच्या ज्ञानाची बहुमोल सोन्याशी कशाप्रकारे तुलना करता येईल?

सुज्ञ राजा पुढे म्हणतो: “जर तू विवेकाला हाक मारिशील, सुज्ञतेची आराधना करिशील, . . . ” (नीतिसूत्रे २:३) या शब्दांतून कशाप्रकारची मनोवृत्ती दिसून येते? यहोवाचे वचन समजून घेण्यास प्रामाणिकपणे उत्सुक असलेली मनोवृत्ती. या शब्दांतून, सुज्ञता प्राप्त करण्याच्या व यहोवाची इच्छा काय आहे हे समजून घेण्याच्या उद्देशाने अभ्यास करण्याची तयारी सूचित होते. अर्थात, याकरता मेहनत घेणे आवश्‍यक आहे आणि शलमोनाचे पुढील शब्द व रूपक याच्याशीच संबंधित आहे.—इफिसकर ५:१५-१७.

तो पुढे म्हणतो: “जर तू रुप्याप्रमाणे त्याचा [ज्ञानाचा] शोध करिशील, व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढिशील, . . . ” (नीतिसूत्रे २:४) यावरून खाणीत काम करणाऱ्‍या माणसांचे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. चांदी व सोन्यासारखे तथाकथित मौल्यवान धातू मिळवण्याकरता मनुष्याने शतकानुशतके खाणींत शोध घेतला आहे. सोन्याकरता तर लोकांनी एकमेकांचा जीव घ्यायलाही कमी केले नाही. काहींनी त्याच्या शोधाकरता आपले अखंड आयुष्य वेचले. पण सोने खरोखर इतके मोलाचे आहे का? तुम्ही एखाद्या रुक्ष वाळवंटात वाट चुकला आहात आणि तहान लागल्याने तुमचा जीव जात आहे अशी कल्पना करा; अशा वेळी तुम्ही काय निवडाल: सोन्याचे दागदागिने की पाण्याचा पेला? आणि तरीसुद्धा कृत्रिम आणि चंचल मोल असलेल्या या सोन्याच्या शोधात माणसाने आकाश पाताळ एक केले आहे! * मग देवाविषयी आणि त्याच्या इच्छेविषयी बुद्धी, सुज्ञान व समज मिळवण्याकरता आपण किती जास्त आवेशाने प्रयत्न केला पाहिजे! पण या प्रयत्नांतून कोणते फायदे आपल्याला प्राप्त होऊ शकतात?—स्तोत्र १९:७-१०; नीतिसूत्रे ३:१३-१८.

१०. देवाच्या वचनाचा अभ्यास केल्यास आपल्याला काय प्राप्त होईल?

१० शलमोन पुढे वर्णन करतो: “तर परमेश्‍वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.” (नीतिसूत्रे २:५) हा किती विस्मयकारक विचार आहे—की आपण पापी मनुष्य चक्क “देवाविषयीचे ज्ञान,” म्हणजे या विश्‍वाच्या सार्वभौम प्रभू यहोवाविषयीचे ज्ञान मिळवू शकतो! (स्तोत्र ७३:२८; प्रेषितांची कृत्ये ४:२४) या जगातील तत्त्ववेत्त्यांनी व तथाकथित विद्वानांनी शतकानुशतके जीवनाची व या विश्‍वाची रहस्ये उकलण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांना “देवाविषयीचे ज्ञान” प्राप्त झालेले नाही. का? कारण हजारो वर्षांपासून हे ज्ञान देवाच्या वचनात अर्थात बायबलमध्ये असूनही या विद्वानांनी त्याला खूपच साधे समजून स्वीकारले नाही आणि त्यामुळे त्याची समज त्यांना प्राप्त होऊ शकली नाही.—१ करिंथकर १:१८-२१.

११. वैयक्‍तिक अभ्यासाचे काही फायदे कोणते?

११ अभ्यासाकरता प्रेरित करणाऱ्‍या आणखी एका कारणाकडे शलमोन आपले लक्ष वेधतो: “कारण ज्ञान परमेश्‍वर देतो; त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात.” (नीतिसूत्रे २:६) जो कोणी प्रामाणिकपणे शोध घेऊ इच्छितो त्याला यहोवा बुद्धी, ज्ञान आणि समज आनंदाने आणि मुक्‍तहस्ते देतो. देवाच्या वचनाच्या वैयक्‍तिक अभ्यासाकरता मेहनत, आत्मशिस्त आणि त्यागाची गरज आहे, पण तरीसुद्धा आपल्याला तो मनापासून प्रिय वाटावा अशी अनेक कारणे आहेत. निदान आपल्याजवळ छापील स्वरूपात बायबल आहे आणि प्राचीन काळातील काहींना करावे लागत होते त्याप्रमाणे आपल्याला हाताने लिहून बायबलच्या प्रती तयार करण्याची गरज नाही!—अनुवाद १७:१८, १९.

यहोवाला शोभेल असे वागावे म्हणून

१२. देवाचे ज्ञान संपादन करण्यामागचा आपला काय उद्देश असावा?

१२ वैयक्‍तिक अभ्यास करण्यामागचा आपला उद्देश काय असावा? इतरांपेक्षा आपण चांगले आहोत असे दिसावे म्हणून? इतरांपेक्षा आपल्याजवळ जास्त ज्ञान आहे हे दाखवता यावे म्हणून? चालता-फिरता बायबल ज्ञानकोश बनण्याकरता? नाही. आपले ध्येय हे चालताना, फिरताना, प्रत्येक कृती करताना खरे ख्रिस्ती असण्याचे, ख्रिस्ताच्या विश्रांतीदायक व्यक्‍तिमत्त्वाप्रमाणेच सदैव इतरांना मदत करायला तयार असण्याचे आहे. (मत्तय ११:२८-३०) प्रेषित पौलाने ताकीद दिली: “ज्ञान फुगविते, प्रीती उन्‍नति करिते.” (१ करिंथकर ८:१) म्हणूनच आपण यहोवाला पुढील विनंती करणाऱ्‍या मोशेसारखीच नम्र मनोवृत्ती बाळगली पाहिजे: ‘तुझे मार्ग मला दाखीव, म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टि माझ्यावर होईल.’ (निर्गम ३३:१३) होय, आपण मनुष्यांवर छाप पाडण्यासाठी नव्हे, तर देवाला संतोषविण्यासाठी ज्ञान घेण्यास उत्सुक असले पाहिजे. आपण देवाला शोभतील असे त्याचे नम्र सेवक होऊ इच्छितो. हे ध्येय आपल्याला कसे साध्य करता येईल?

१३. देवाचा योग्य सेवक बनण्याकरता काय आवश्‍यक आहे?

१३ देवाला कसे संतुष्ट करावे याविषयी पौलाने तीमथ्याला असा सल्ला दिला: “तू सत्याचे वचन नीट सांगणारा [“हाताळणारा,” NW], लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर.” (२ तीमथ्य २:१५) “नीट हाताळणारा” ही संज्ञा ग्रीक भाषेतील एका संयुक्‍त क्रियापदापासून बनली आहे ज्याचा मूळ अर्थ “सरळ कापणे” असा होतो. (किंग्डम इंटरलिनिअर) काहींच्या मते, यावरून एखाद्या नमुन्यानुसार कापड कापणाऱ्‍या शिंप्याची किंवा शेत नांगरणाऱ्‍या शेतकऱ्‍याची आठवण होते. अर्थात, शेवटला परिणाम योग्य किंवा सरळ असला पाहिजे. मुद्दा असा आहे, की देवाच्या नजरेत योग्य आणि त्याच्या पसंतीस उतरलेला सेवक होण्याकरता तीमथ्याला याची खात्री करायची होती, की त्याची शिकवणूक व आचरण सत्याच्या वचनाशी सुसंगत आहे किंवा नाही; आणि यासाठी त्याने ‘होईल तितके’ प्रयत्न करणे आवश्‍यक होते.—१ तीमथ्य ४:१६.

१४. आपल्या वैयक्‍तिक अभ्यासाचा आपल्या वागण्याबोलण्यावर कशाप्रकारे प्रभाव पडला पाहिजे?

१४ पौलाने हाच मुद्दा स्पष्ट केला व कलस्सै येथील सह ख्रिस्ती बांधवांना ‘प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ देऊन देवाच्या पूर्ण ज्ञानात वृद्धी करून सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागण्याचे’ प्रोत्साहन दिले. (कलस्सैकर १:१०) यहोवाला शोभेल असे वागण्याचा संबंध पौल ‘प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ देण्याशी’ व “देवाच्या पूर्ण ज्ञानाने वृद्धी करण्याशी” जोडतो. दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, आपल्याला ज्ञान किती महत्त्वाचे वाटते हेच केवळ यहोवा पाहात नाही, तर आपल्या वागण्याबोलण्यात आपण देवाच्या वचनाचे कितपत पालन करतो हे देखील तो पाहतो. (रोमकर २:२१, २२) याचा अर्थ असा होतो, की आपल्या वैयक्‍तिक अभ्यासाचा आपल्या विचारसरणीवर आणि आपल्या आचरणावरही प्रभाव पडला पाहिजे; तरच आपण देवाला संतोषवू शकतो.

१५. आपण आपल्या मनाचे व विचारांचे संरक्षण आणि त्यांच्यावर नियंत्रण कसे करू शकतो?

१५ आज सैतान मानसिक संघर्षाच्या माध्यमाने आपली आध्यात्मिकता नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. (रोमकर ७:१४-२५) म्हणूनच, देवाला शोभेल असे वागण्याकरता आपण आपल्या मनाचे व विचारांचे संरक्षण आणि त्यांच्यावर नियंत्रण केले पाहिजे. आपल्याजवळ असलेले शस्त्र म्हणजे ‘देवाचे ज्ञान,’ आहे, व या ज्ञानात ‘प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावण्याचे’ सामर्थ्य आहे. यामुळे आपल्याला दैनंदिन बायबल अभ्यासाकडे लक्ष देण्याचे अधिकच प्रोत्साहन मिळते कारण त्याच्या साहाय्याने आपण स्वार्थी, दैहिक विचार आपल्या मनांतून काढून टाकू शकतो.—२ करिंथकर १०:५.

बोधकारक साधने

१६. यहोवा आपल्याला शिकवत असताना आपण स्वतःचा फायदा कसा करून घेऊ शकतो?

१६ यहोवाच्या ज्ञानामुळे आध्यात्मिक व शारीरिक फायदेही होतात. ते धर्मविज्ञानाच्या रूक्ष, पुस्तकी ज्ञानाप्रमाणे नाही. म्हणूनच बायबल आपल्याला सांगते: “तुला जे हितकारक ते मी परमेश्‍वर तुझा देव तुला शिकवितो. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.” (यशया ४८:१७) यहोवा आपल्याला त्याच्या हितकारक मार्गाने कशाप्रकारे चालायला लावतो? पहिले म्हणजे त्याचे प्रेरित वचन, पवित्र बायबल आपल्याजवळ आहे. हे आपले मूलभूत पाठ्यपुस्तक आहे, ज्याची आपण पदोपदी मदत घेतो. म्हणूनच ख्रिस्ती सभांमध्ये बायबल उघडून वक्‍त्‌यासोबत सांगितलेली वचने वाचणे चांगले आहे. असे केल्यामुळे कोणते चांगले परिणाम होऊ शकतात हे प्रेषितांची कृत्ये ८ व्या अध्यायातील कुशी षंढाच्या अहवालावरून पाहायला मिळते.

१७. कुशी षंढाच्या बाबतीत काय घडले आणि यावरून काय स्पष्ट होते?

१७ कुशी षंढाचे यहुदी धर्मात मतांतर झाले होते. त्याचा देवावर विश्‍वास होता आणि तो शास्त्रवचनांचा अभ्यासू होता. आपल्या रथात प्रवास करत असताना तो यशयाचे पुस्तक वाचत होता; तेव्हा फिलिप्प त्याच्या रथासोबत धावू लागला आणि त्याने त्याला विचारले: “आपण जे वाचीत आहा ते आपल्याला समजते काय?” षंढाने काय उत्तर दिले? “‘कोणी मार्ग दाखविल्याखेरीज मला कसे समजणार?’ मग त्याने फिलप्पाला आपल्याजवळ येऊन बसावयास वर बोलावले.” पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने फिलिप्पाने त्या षंढाला यशयाची भविष्यवाणी समजून घेण्यास मदत केली. (प्रेषितांची कृत्ये ८:२७-३५) यावरून काय स्पष्ट होते? हेच, की वैयक्‍तिक बायबल वाचन पुरेसे नाही. यहोवा आपल्याला योग्य समयी त्याचे वचन समजावण्याकरता त्याच्या आत्म्याद्वारे विश्‍वासू व बुद्धिमान दासाचा उपयोग करतो. कशाप्रकारे?—मत्तय २४:४५-४७; लूक १२:४२.

१८. विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्ग आपल्याला कशाप्रकारे मदत करतो?

१८ दास वर्गाला “विश्‍वासू व बुद्धिमान” म्हटले असले तरीसुद्धा त्यांच्याकडून चूक घडणारच नाही असे येशूने म्हटले नव्हते. विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या या गटातही अपरिपूर्ण ख्रिस्तीच आहेत. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांप्रमाणे, सर्वात चांगला मनोदय बाळगूनही त्यांच्याकडूनही चुका घडू शकतात. (प्रेषितांची कृत्ये १०:९-१५; गलतीकर २:८, ११-१४) पण त्यांचे हेतू शुद्ध आहेत आणि यहोवा त्याच्या वचनावर व त्याच्या प्रतिज्ञांवर आपला विश्‍वास बळकट करण्याकरता बायबल अभ्यासाची साधने पुरवण्याकरता त्यांचा उपयोग करत आहे. दास वर्गाने वैयक्‍तिक अभ्यासाकरता आपल्याला पुरवलेले मूलभूत साधन म्हणजे पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर. आज ते पूर्ण अथवा त्याचे काही भाग ४२ भाषांत उपलब्ध असून अनेक आवृत्तींच्या रूपात त्याच्या ११.४ कोटी प्रती छापल्या गेल्या आहेत. या साधनाचा आपण आपल्या वैयक्‍तिक अभ्यासाकरता परिणामकारकरित्या कसा उपयोग करू शकतो?—२ तीमथ्य ३:१४-१७.

१९. वैयक्‍तिक अभ्यासात उपयोगी पडू शकतील अशी न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन—विथ रेफरेन्सेस बायबलची कोणती वैशिष्ट्ये आहेत?

१९ न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स—विथ रेफरेन्सेस या बायबलचे उदाहरण घ्या. त्यात समर्पक संदर्भ, तळटीपा, आणि “बायबल शब्दांची सूची” व “तळटीपांतील शब्दांची सूची” यांच्या रूपात एक लघू काँकर्डन्स आणि ४३ विषयांवर सविस्तर माहिती तसेच नकाशे व तक्‍ते असलेले परिशिष्ट देखील आहे. यासोबत, या आगळ्यावेगळ्या बायबल भाषांतराकरता उपयोगात आणलेल्या अनेक मूळग्रंथांविषयी बरेच स्पष्टीकरण देणारी “प्रस्तावना” देखील सुरवातीला आहे. तुम्हाला समजणाऱ्‍या एखाद्या भाषेत हे बायबल उपलब्ध असल्यास, वरील पैलूंविषयी अवश्‍य माहिती करून घ्या आणि त्यांचा उपयोग करा. काही झाले तरी, आपल्या अभ्यासाची सुरवात बायबलनेच होते आणि न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन हे असे भाषांतर आहे ज्यात देवाच्या राज्यावर आणि त्याच्या नावावर योग्य जोर देण्यात आला आहे.—स्तोत्र १४९:१-९; दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०.

२०. वैयक्‍तिक अभ्यासासंबंधी कोणत्या प्रश्‍नांची उत्तरे आवश्‍यक आहेत?

२० कदाचित कोणी असे विचारेल: ‘बायबल अधिक स्पष्टपणे समजून घेण्याकरता आणखी कोणती मदत आवश्‍यक आहे? आपण वैयक्‍तिक अभ्यासाकरता वेळ कसा काढू शकतो? आपण हा अभ्यास अधिक फलदायी कसा बनवू शकतो? आपल्या अभ्यासामुळे इतरांवर कसा प्रभाव पडला पाहिजे?’ आपल्या ख्रिस्ती प्रगतीतील या महत्त्वपूर्ण बाबींची पुढील लेखात चर्चा केली जाईल.

[तळटीप]

^ परि. 9 १९७९ सालापासून सोन्याची किंमत १९८० साली $८५०.०० प्रति ३१ ग्रॅमपर्यंत चढून १९९९ साली $२५२.०० प्रति ३१ ग्रॅमपर्यंत घसरली आहे.

तुम्हाला आठवते का?

• “मनन” व “चिंतन” करण्याचा काय अर्थ होतो?

• देवाच्या वचनाच्या अभ्यासाप्रती आपली कशी मनोवृत्ती असली पाहिजे?

• वैयक्‍तिक अभ्यासामागचा आपला हेतू काय असावा?

• बायबलचे ज्ञान मिळवण्याकरता आपल्याकडे कोणती साधने आहेत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

बायबल वचनावर विचार करून दिवसाची सुरवात करण्याची तरतूद बेथेल कुटुंबाच्या सदस्यांना आध्यात्मिकरित्या पोषक वाटते

[१५ पानांवरील चित्रे]

प्रवासात बायबलच्या कॅसेट्‌स ऐकल्यामुळे बहुमोल वेळेचा चांगला उपयोग केला जाऊ शकतो

[१६ पानांवरील चित्र]

मनुष्याने सोने मिळवण्याकरता वर्षानुवर्षे कष्ट केले. देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याकरता तुम्ही किती प्रयत्न करता?

[चित्राचे श्रेय]

Courtesy of California State Parks, २००२

[१७ पानांवरील चित्रे]

बायबल एक खजिना आहे जो सार्वकालिक जीवनाकडे नेतो