व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोशवाच्या स्मरणात राहिलेल्या गोष्टी

यहोशवाच्या स्मरणात राहिलेल्या गोष्टी

यहोशवाच्या स्मरणात राहिलेल्या गोष्टी

यहोवाने म्हटले: “माझा सेवक मोशे मृत्यु पावला आहे; तर आता ऊठ व ह्‍यांना अर्थात इस्राएल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्‍या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा.” (यहोशवा १:२) यहोशवासमोर किती कठीण कामगिरी होती! त्याने ४० वर्षांपर्यंत मोशेचा सेवक म्हणून कार्य केले होते. आणि आज त्याला त्याच्या स्वामीची जागा घेण्यास आणि ताठ मानेच्या इस्राएल पुत्रांना प्रतिज्ञात देशात नेण्यास सांगण्यात आले होते.

यहोशवाने पुढच्या कार्याचा विचार केला असेल, तेव्हा कदाचित यापूर्वी त्याने तोंड दिलेले व मात केलेले सर्व परीक्षाप्रसंग भराभर त्याच्या डोळ्यासमोरून गेले असतील. यहोशवाच्या स्मरणात राहिलेल्या गोष्टी निश्‍चितच त्या वेळी त्याला सहायक ठरल्या असतील आणि आजही ख्रिश्‍चनांकरता त्या उपयोगी ठरू शकतात.

गुलामापासून सेनापतीपर्यंतचा प्रवास

गुलामीची अनेक वर्षे यहोशवाच्या स्मृतीपटलावर कोरलेली होती. (निर्गम १:१३, १४; २:२३) त्या काळादरम्यान यहोशवाला नेमके कोणते अनुभव आले असतील याची आपण केवळ कल्पना करू शकतो कारण बायबल या बाबतीत तपशील देत नाही. यहोशवाला ईजिप्तमधील गुलामीच्या वर्षांत उत्तम संयोजन करण्याचे प्रशिक्षण मिळाले असावे आणि कदाचित इब्री लोक व “मोठा मिश्र समुदाय” यांनी त्या देशातून पलायन केले तेव्हा यहोशवाने कदाचित त्यांना व्यवस्थित रितीने बाहेर पडण्यास साहाय्य केले असावे.—निर्गम १२:३८.

यहोशवा एफ्राइम वंशाच्या एका घराण्यातला होता. त्याचे आजोबा अलीशामा वंशाचे सरदार होते आणि इस्राएलच्या तीन वंशाच्या एका विभागातील १,०८,१०० शस्त्रधारी सैनिकांच्या पथकाचे प्रमुख होते. (गणना १:४, १०, १६; २:१८-२४; १ इतिहास ७:२०, २६, २७) तरीसुद्धा, ईजिप्तमधून निघाल्यावर लगेच अमालेकी लोकांनी इस्राएलवर आक्रमण केले तेव्हा त्यांचा प्रतिकार करण्यासाठी पुरुषांना संघटित करण्यासाठी मोशेने यहोशवाला नेमले. (निर्गम १७:८, ९अ) पण मोशेने यहोशवालाच का निवडले, त्याच्या आजोबांना किंवा

वडिलांना त्याने हे कार्य का सोपवले नाही? एक शक्यता आहे: “तो एफ्राइमच्या महत्त्वपूर्ण वंशाचा प्रमुख होता आणि नियोजन कौशल्यांत निपुण असल्याची त्याने ख्याती मिळवली होती. तसेच लोकांना त्याच्यावर पूर्ण भरवसा होता. त्यामुळे, सैनिकांना निवडून त्यांना संघटित करण्याकरता सर्वात उत्तम नेता [यहोशवाच] ठरेल असा मोशेने निष्कर्ष काढला असेल.”

कारण यांपैकी कोणतेही असले तरीसुद्धा यहोशवाने, ही जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आल्यावर मोशेच्या आज्ञेनुसारच केले. इस्राएल राष्ट्राला युद्धाचा फारसा अनुभव नसतानाही, देव त्यांना मदत करेल याची यहोशवाला खात्री होती. “उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन,” असे मोशेने म्हटले तेव्हा यहोशवाने पुढे काहीच प्रश्‍न विचारले नाहीत. थोड्याच काळापूर्वी यहोवाने कशाप्रकारे त्या काळातल्या सर्वात शक्‍तिशाली लष्करी सैन्याचा सर्वनाश केला होता हे यहोशवाला आठवले असावे. दुसऱ्‍या दिवशी मोशेने सूर्यास्त होईपर्यंत आपले हात वर करून ठेवले तेव्हा शत्रू त्यांच्यावर वरचढ होऊ शकला नाही आणि अशारितीने अमालेकी लोकांचा पराभव झाला. मग यहोवाने मोशेला या घटनेविषयी एका पुस्तकात लिहून ठेवण्यास आणि देवाचा एक निर्णय ‘यहोशवाच्या कानी घालण्यास’ सांगितले; तो असा की “मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून अजिबात पुसून टाकीन.” (निर्गम १७:९ब-१४) होय, यहोवा ही दंडाज्ञा पूर्ण केल्याशिवाय राहणार नव्हता.

मोशेच्या सेवकाच्या भूमिकेत

अमालेकच्या या घटनेमुळे यहोशवा आणि मोशे यांच्यात नक्कीच पूर्वीपेक्षा अधिक जवळीक निर्माण झाली असेल. यहोशवाला आपल्या “तरुणपणापासून” मोशेचा मृत्यू होईपर्यंत, म्हणजे जवळजवळ ४० वर्षे मोशेचा वैयक्‍तिक मदतनीस अथवा “सेवक” होण्याचा बहुमान मिळाला.—गणना ११:२८.

या पदावर राहण्यात अनेक विशेषाधिकार व जबाबदाऱ्‍या अंतर्भूत होत्या. उदाहरणार्थ, मोशे, अहरोन, अहरोनाचे पुत्र आणि इस्राएलचे ७० वडीलधारी पुरूष सिनाय पर्वतावर चढून गेले व त्यांना यहोवाच्या तेजाचे दर्शन घडले तेव्हा यहोशवा देखील त्यांच्यापैकी एक असावा. मोशेचा सेवक या नात्याने यहोशवा मोशेसोबत पर्वतावर अधिक वरपर्यंत चढून गेला आणि जेव्हा यहोवाच्या तेजाच्या मेघात मोशेने प्रवेश केला तेव्हा काही अंतरावर यहोशवा त्याच्याकरता थांबून राहिला असावा असे दिसते. विशेष म्हणजे, यहोशवाला चाळीस दिवस व चाळीस रात्री त्या डोंगरावर थांबावे लागले असेल. पण तो विश्‍वासूपणे आपल्या स्वामीची वाट पाहात राहिला असे दिसते, कारण मोशे जेव्हा साक्षपटाच्या पाट्या घेऊन उतरू लागला तेव्हा त्याला भेटण्याकरता यहोशवा तेथे होता.—निर्गम २४:१, २, ९-१८; ३२:१५-१७.

इस्राएलने सोनेरी वासराची मूर्तिपूजा केल्याच्या घटनेनंतर यहोशवा दर्शनमंडपात छावणीच्या बाहेर मोशेची सेवा करत राहिला. तेथे यहोवा मोशेशी अमोरासमोर बोलत असे. पण मोशे छावणीत परतल्यावरही यहोशवा “मंडप सोडून बाहेर येत नसे.” कदाचित, इस्राएल लोकांनी अशुद्ध असताना त्या मंडपात प्रवेश करू नये म्हणून यहोशवाला तेथे थांबावे लागत असेल. पण ती जबाबदारी देखील यहोशवाने किती गांभीर्याने घेतली!—निर्गम ३३:७, ११.

इतिहासकार जोसीफस याच्या मते मोशे यहोशवापेक्षा ३५ वर्षांनी मोठा होता, त्यामुळे मोशेच्या सहवासाने निश्‍चितच यहोशवाचा विश्‍वास अतिशय बळावला असेल. त्यांच्यातील नात्याला “प्रौढता आणि तारुण्य, गुरू आणि शिष्य यांच्यातील बंधन” म्हणण्यात आले आहे, ज्यामुळे यहोशवा “एक दृढ संकल्पी आणि विश्‍वासार्ह पुरुष” बनू शकला. आज आपल्यामध्ये मोशेसारखे संदेष्टे नाहीत पण यहोवाच्या लोकांच्या मंडळ्यांमध्ये अनेक वडीलधारी जन आहेत; त्यांच्या अनुभवामुळे व आध्यात्मिक वृत्तीमुळे त्यांच्याकडून सर्वांना बळ आणि प्रोत्साहन मिळू शकते. तुम्हाला त्यांच्याविषयी कदर वाटते का? त्यांच्या सहवासापासून तुम्ही फायदा करून घेत आहात का?

कनानमध्ये एक हेर

इस्राएल राष्ट्राला नियमशास्त्र मिळाल्यानंतर काही काळातच यहोशवाच्या जीवनात एक महत्त्वाची घटना घडली. प्रतिज्ञात देशाची माहिती काढून आणण्याकरता आपल्या वंशाचे प्रतिनिधीत्व करण्याकरता त्याला निवडण्यात आले. ही गोष्ट सर्वांच्या परिचयाची आहे. एकूण १२ हेर पाठवण्यात आले होते आणि त्या सर्वांनी सांगितले की यहोवाने प्रतिज्ञा केल्यानुसारच त्या देशात “दुधामधाचे प्रवाह” वाहत आहेत. पण दहा हेरांनी यहोवावर विश्‍वास दाखवला नाही आणि प्रतिज्ञात देशाच्या रहिवाशांच्या हातून तो देश इस्राएलांना घेता येणार नाही अशी भीती व्यक्‍त केली. फक्‍त यहोशवा आणि कालेब यांनी लोकांना घाबरून जाऊन बंड न करण्याची विनंती केली कारण यहोवा नक्कीच त्यांच्या पाठीशी राहील असा त्यांना विश्‍वास होता. त्यांनी असे म्हणताच सर्व मंडळी त्यांच्या विरोधात ओरड करू लागली आणि त्या दोघांना दगडमार करण्याची भाषा करू लागली. त्याच क्षणाला यहोवाने आपले तेज प्रकट केले नसते तर कदाचित त्यांनी खरच त्यांना दगडमार केला असता. त्यांच्या अल्पविश्‍वासामुळे यहोवाने त्यांच्याविरुद्ध असा दंड घोषित केला की इस्राएल राष्ट्रात गणना झालेल्यांपैकी २० वर्षे व त्याहून अधिक वयाचे कनान देशात प्रवेश करेपर्यंत जिवंत राहणार नाहीत. या लोकांपैकी फक्‍त यहोशवा, कालेब व लेवीय जिवंत राहिले.—गणना १३:१-१६, २५-२९; १४:६-१०, २६-३०.

सर्वच लोकांनी ईजिप्तमध्ये यहोवाची महत्कृत्ये पाहिली नव्हती का? मग बहुतेक लोकांनी देवाच्या मदतीवर शंका घेतली असताना यहोशवाला देवावर पूर्ण विश्‍वास बाळगणे का शक्य झाले? निश्‍चितच यहोशवाने यहोवाची सर्व वचने आणि ती त्याने कशी पूर्ण केली हे नेहमी डोळ्यापुढे ठेवले असेल, त्यावर मनन केले असेल. कित्येक वर्षांनंतरही तो म्हणू शकला की “देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही. . . . त्या सर्व सिद्धीस गेल्या.” (यहोशवा २३:१४) यावरून यहोशवाला विश्‍वास होता की भविष्याबद्दलही यहोवाने ज्या सर्व प्रतिज्ञा केल्या होत्या त्या देखील अवश्‍य पूर्ण होतील. (इब्री लोकांस ११:६) आपण सर्वांनी स्वतःला विचारले पाहिजे: ‘माझ्याबद्दल काय? यहोवाच्या प्रतिज्ञांविषयी अभ्यास करण्यासाठी व त्यांवर मनन करण्यासाठी मी जो वेळ व शक्‍ती खर्च केली आहे त्यावरून त्या पूर्णपणे विश्‍वासार्ह असल्याची मला खात्री पटली आहे का? येणाऱ्‍या महासंकटातून देव त्याच्या लोकांसहित माझेही संरक्षण करू शकतो याविषयी मला विश्‍वास वाटतो का?’

यहोशवाने केवळ विश्‍वासच बाळगला नाही तर त्याने असाधारण मनोधैर्य प्रकट केले. सर्व मंडळी त्यांना दगडमार करण्याची मागणी करत असताना केवळ तो व कालेब एका बाजूला होते. अशा परिस्थितीत तुम्हाला कसे वाटले असते? भीती वाटली असती का? यहोशवा घाबरणाऱ्‍यांपैकी नव्हता. त्याने व कालेबने आपल्याला काय वाटते हे स्पष्टपणे बोलून दाखवले. यहोवाला निष्ठावान राहण्याकरता असेच करण्याची आज न उद्या आपल्यावरही पाळी येऊ शकते.

हेरांच्या या अहवालातून आपल्याला आणखी एक माहिती मिळते ती अशी की यहोशवाचे नाव बदलण्यात आले होते. त्याचे मूळ नाव होशा होते व त्याचा अर्थ “तारण” असा होतो. मोशेने त्याच्या नावात देवाच्या नावाकरता वापरली जाणारी अक्षरे जोडली आणि त्याला यहोशवा म्हणजे “यहोवा तारण आहे” असे नाव दिले. सेप्टुअजिंट भाषांतरात त्याचे नाव “येशू” देण्यात आले आहे. (गणना १३:८, १६) या महान नावाप्रमाणेच यहोशवाने धैर्याने घोषित केले की यहोवाच तारण करतो. यहोशवाचे नाव काही उगाच बदलण्यात आले नसावे. त्यावरून दिसून येते की यहोशवाच्या व्यक्‍तिमत्त्वाविषयी मोशेच्या मनात किती आदर होता; शिवाय हे नवे नाव भविष्यात इस्राएलच्या नव्या पिढीला प्रतिज्ञात देशात नेणाऱ्‍या यहोशवाच्या विशेष भूमिकेला अगदी अनुरूप होते.

चाळीस कष्टप्रद वर्षे अरण्यात भटकताना इस्राएलचे वडीलधारी पुरुष एकामागोमाग एक मरण पावले. त्यादरम्यान यहोशवाविषयी आपल्याला काहीच माहिती देण्यात आलेली नाही. पण निश्‍चितच या अनुभवाने त्याला बरेच काही शिकवले असेल. कोरह, दाथान व अबीराम आणि त्यांचे साथीदार तसेच बआलपौराच्या घृणित उपासनेत सहभागी झालेल्यांवर आलेला न्यायदंड कदाचित त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला असेल. तसेच मरीबाच्या पाण्याच्या घटनेत यहोवाला महिमा न दिल्यामुळे मोशे देखील प्रतिज्ञात देशात प्रवेश करू शकणार नाही हे कळल्यावर यहोशवाला अत्यंत दुःख झाले असेल यात शंका नाही.—गणना १६:१-५०; २०:९-१३; २५:१-९.

मोशेचा नियुक्‍त उत्तराधिकारी

मोशेचा अंतकाळ समीप येऊ लागला तेव्हा त्याने देवाला त्याच्या उत्तराधिकाऱ्‍यास नेमण्याची विनंती केली जेणेकरून इस्राएल राष्ट्र “मेंढपाळ नसलेल्या शेरडांमेंढरांप्रमाणे होणार नाही.” यहोवाने कोणाला निवडले? यहोशवाला, कारण “त्याच्या ठायी माझा आत्मा वसत आहे” असे यहोवाने म्हटले. त्याला सबंध मंडळीसमोर अधिकारारूढ करण्याची देवाने आज्ञा दिली. सर्व मंडळीने त्याचे मानावे असेही देवाने सांगितले. स्वतः देवाने त्याची शिफारस केली! यहोवाने यहोशवाचा विश्‍वास व त्याचा कर्तबगारपणा पाहिला होता. इस्राएलच्या नेतृत्वाची जबाबदारी पेलण्यास तोच सर्वात योग्य होता. (गणना २७:१५-२०) पण या कामात यहोशवाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार असल्याचे मोशेला ठाऊक होते. म्हणूनच त्याने आपल्या या उत्तराधिकाऱ्‍यास “खंबीर हो, हिंमत धर” असे प्रोत्साहन दिले व यहोवा सतत तुझ्या पाठीशी राहील असे त्याला आश्‍वासन दिले.—अनुवाद ३१:७, ८.

स्वतः देवाने देखील यहोशवाला हेच आश्‍वासन दिले आणि पुढे म्हटले: “माझा सेवक मोशे ह्‍याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ; ते सोडून उजवीडावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशःप्राप्ति घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नको, कचरू नको; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्‍वर तुझ्याबरोबर असेल.”—यहोशवा १:७-९.

यहोवाचे शब्द कानात घुमत असताना आणि पदरी अनुभव असताना यहोशवाला शंका वाटण्याचे कारणच नव्हते. प्रतिज्ञात देशावर त्यांचा विजय निश्‍चित होता. अर्थात, अडचणी येणार होत्या आणि त्यातली पहिली, म्हणजे ओसंडून वाहणारी यार्देन नदी पार करण्याचे आव्हान काही कमी जिकरीचे नव्हते. पण यहोवाने स्वतः आज्ञा दिली होती: ‘उठ व ही यार्देन ओलांडून जा.’ मग कसली अडचण?—यहोशवा १:२.

यहोशवाच्या जीवनातील पुढील घटना—यरीहो शहरावर विजय, शत्रूंवर क्रमाक्रमाने वर्चस्व आणि देशाची विभागणी इत्यादी घडत असताना त्याने कधीही देवाच्या प्रतिज्ञा नजरेआड होऊ दिल्या नाहीत असे दिसून येते. आपल्या जीवनाच्या शेवटास यहोवाने इस्राएल राष्ट्राला त्यांच्या शत्रूंपासून विसावा दिला तेव्हा यहोशवाने त्यांना एकत्रित केले आणि देवाच्या आजवरच्या सर्व कार्यांची त्यांना आठवण करून दिली व त्याची मनोभावे सेवा करण्याचे त्यांना प्रोत्साहन दिले. परिणामस्वरूप, इस्राएलने यहोवासोबत केलेल्या कराराची पुनरुक्‍ती केली आणि आपल्या नेत्याच्या आदर्शातून प्रेरणा मिळाल्यामुळेच की काय, ‘यहोशवाच्या हयातीत इस्राएल लोकांनी परमेश्‍वराची सेवा केली.’—यहोशवा २४:१६, ३१.

यहोशवाचे आपल्याकरता एक उत्तम उदाहरण आहे. आज ख्रिस्ती लोकांना विश्‍वासाच्या अनेक परीक्षांना तोंड द्यावे लागते. या परीक्षांना यशस्वीपणे तोंड देणे महत्त्वाचे आहे कारण असे केले तरच आपल्याला यहोवाची संमती मिळेल आणि शेवटी आपण त्याच्या प्रतिज्ञांची पूर्ती अनुभवू शकू. यहोशवाच्या दृढ विश्‍वासामुळेच त्याला यश मिळाले. आपण यहोशवाप्रमाणे देवाची महत्कृत्ये डोळ्यांनी पाहिलेली नाहीत हे कबूल आहे पण जर कोणाला शंका असेल तर यहोशवा नावाच्या बायबलमधील पुस्तकात यहोवाच्या अभिवचनांच्या विश्‍वसनीयतेची एका प्रत्यक्ष साक्षीदाराने दिलेली हमी आहे. यहोशवाप्रमाणे आपणही देवाचे वचन रोज वाचले आणि काळजीपूर्वक त्याचे पालन केले तर आपण अवश्‍य बुद्धीने कार्य करू व यशस्वी होऊ.

कधीकधी तुम्हाला सहख्रिस्ती बांधवांच्या वागण्यामुळे वाईट वाटते का? यहोशवाच्या धीराची आठवण करा. स्वतःची काहीही चूक नसताना त्याला आपल्या अविश्‍वासू साथीदारांसोबत अकारण ४० वर्षे अरण्यात भटकावे लागले. कधीकधी तुम्हाला आपल्या मताचे समर्थन करणे कठीण जाते का? यहोशवाने व कालेबने काय केले याची आठवण करा. त्यांच्या विश्‍वासाचे व आज्ञाधारकतेचे त्यांना उत्तम प्रतिफळ मिळाले. होय यहोशवाला खरोखरच विश्‍वास होता की यहोवा त्याच्या सर्व प्रतिज्ञा अवश्‍य पूर्ण करेल. हेच आपल्याबाबतीतही घडो.—यहोशवा २३:१४.

[१० पानांवरील चित्र]

यहोशवा व कालेब यांना यहोवाच्या सामर्थ्यावर भरवसा होता

[१० पानांवरील चित्र]

मोशेच्या सहवासामुळे यहोशवाचा विश्‍वास बळावला

[१० पानांवरील चित्र]

यहोशवाच्या नेतृत्वामुळे लोकांना यहोवाला जडून राहण्याची प्रेरणा मिळाली