वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
प्रकटीकरण २०:८ वरून आपण असा निष्कर्ष काढावा का, की शेवटल्या परीक्षेच्या वेळी सैतान असंख्य लोकांना बहकवण्यात यशस्वी होईल?
मशिही राज्याच्या हजार वर्षांच्या राजवटीच्या शेवटी पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर सैतान शेवटला हल्ला करील असे वर्णन प्रकटीकरण २०:८ मध्ये करण्यात आले आहे. सैतानाविषयी ते म्हणते: “तो पृथ्वीच्या चार कोपऱ्यातील गोग व मागोग राष्ट्रांस ठकवावयास व त्यास लढाईसाठी एकत्र करावयास बाहेर येईल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे.”
वैज्ञानिक पद्धतींमध्ये व साधनांमध्ये बरीच प्रगती झालेली असली तरीसुद्धा, ‘समुद्राच्या वाळूइतक्या’ संख्येचे नेमके किती प्रमाण आहे किंवा नेमकी किती संख्या आहे हे अद्यापही कोणालाच माहीत नाही. त्यामुळे हा वाक्यांश अज्ञात, अगणित संख्येला सूचित करतो, असे म्हटले जाऊ शकते. परंतु त्याचा अर्थ, तो प्रचंड, भारावून टाकणाऱ्या, आकलन होऊ न शकणाऱ्या संख्येला सूचित करतो का की केवळ अज्ञात परंतु बऱ्याच मोठ्या संख्येला सूचित करतो?
बायबलमध्ये, “समुद्राच्या वाळूइतकी” हा वाक्यांश वेगवेगळ्या अर्थाने वापरण्यात आला आहे. उदाहरणार्थ, उत्पत्ति ४१:४९ मध्ये आपण वाचतो: “योसेफाने समुद्राच्या वाळूसारखा धान्याचा महापूर संचय करून ठेविला; त्याने ते मोजावयाचे सोडिले, कारण ते अगणित होते.” येथे, संख्या अगणित असण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच, यहोवा म्हणतो: “आकाशसैन्याची गणती करवत नाही, समुद्राच्या वाळूचे मापन करवत नाही, त्याप्रमाणे माझा सेवक दावीद यांची संतति . . . मी बहुगुणित करीन.” आकाशातील तारे आणि समुद्राची वाळू जशी खात्रीने अगणित असते तसेच यहोवा देखील खात्रीने दावीदाला दिलेले आपले वचन पूर्ण करील.—यिर्मया ३३:२२.
सहसा, ‘समुद्राची वाळू’ हा वाक्यांश, प्रचंडतेला व मोठ्या प्रमाणाला किंवा आकाराला सूचित करतो. गिलगाल येथील इस्राएली लोक, मिखमाश येथे “समुद्रकिनाऱ्यावरील वाळूइतके” जमलेले विपुल पलिष्टी लोक पाहून भेदरून गेले होते. (१ शमुवेल १३:५, ६; शास्ते ७:१२) “देवाने शलमोनास अलोट शहाणपण व बुद्धि दिली आणि समुद्रकाठच्या वाळूसारखे विशाल मन दिले.” (१ राजे ४:२९) या प्रत्येक बाबतीत ज्या संख्येविषयी सांगण्यात आले आहे ती प्रचंड असली तरीसुद्धा सीमित होती.
“समुद्राच्या वाळूइतकी” हा वाक्यांश, संख्येची प्रचंडता सूचित न करता अज्ञात संख्येला सूचित करू शकतो. यहोवाने अब्राहामाला सांगितले: “यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धिच वृद्धि करून तुझी संतति आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी होईल असे करीन.” (उत्पत्ति २२:१७) अब्राहामाचा नातू याकोब यालाही हे अभिवचन देताना यहोवाने “पृथ्वीच्या रजाइतकी” हा वाक्यांश वापरला आणि याकोबाने ते अभिवचन पुन्हा बोलून दाखवताना म्हटले, की त्याची संतती “समुद्राच्या वाळूसारखी” होईल. (उत्पत्ति २८:१४; ३२:१२) पुढे, अब्राहामाच्या संतानाची संख्या, येशू ख्रिस्ताला वगळून १,४४,००० इतकी झाली; याच संतानाला येशूने ‘लहान कळप’ असे संबोधले.—लूक १२:३२; गलतीकर ३:१६, २९; प्रकटीकरण ७:४; १४:१, ३.
या सर्व उदाहरणांवरून आपण काय शिकतो? “समुद्राच्या वाळूइतकी” या वाक्यांशाचा अर्थ नेहमीच असीमित, अतिभव्य संख्या असा होत नाही; किंवा, प्रचंड अथवा भारावून टाकणाऱ्या प्रमाणाचे वर्णन करण्याकरता देखील त्याचा नेहमी उपयोग केला जात नाही. सहसा तो वाक्यांश, अज्ञात परंतु मोठ्या संख्येला चित्रित करतो. त्यामुळे, देवाच्या लोकांवर सैतानाच्या शेवटल्या हल्ल्याच्या वेळी त्याच्या बाजूने अतिप्रचंड लोकसंख्या नसली तरीसुद्धा जिच्यापासून धोका संभावू शकतो अशी बरीच मोठी लोकसंख्या असेल. परंतु ही संख्या सध्या तरी अज्ञात आहे.