व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शिक्षक होण्यास आपल्याला समर्थ करणारा वैयक्‍तिक अभ्यास

शिक्षक होण्यास आपल्याला समर्थ करणारा वैयक्‍तिक अभ्यास

शिक्षक होण्यास आपल्याला समर्थ करणारा वैयक्‍तिक अभ्यास

“तुझी प्रगति सर्वांस दिसून यावी म्हणून तू ह्‍या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्‍यांत गढून जा. आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव.”१ तीमथ्य ४:१५, १६.

१. वेळ आणि वैयक्‍तिक अभ्यास यांच्या बाबतीत काय म्हणता येईल?

“सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो” असे आपण बायबलमध्ये उपदेशक ३:१ येथे वाचतो. अर्थातच हे शब्द वैयक्‍तिक अभ्यासालाही लागू होतात. योग्य वेळ आणि योग्य ठिकाण नसल्यास, बऱ्‍याच लोकांना आध्यात्मिक गोष्टींवर मनन करण्यास कठीण जाते. उदाहरणार्थ, दिवसभरच्या कामावरून थकून आल्यावर आणि पोटभर जेवल्यावर, जर तुम्ही टीव्हीसमोर तुमच्या आवडत्या आरामखुर्चीत बसला असाल तर खरच तुम्हाला अभ्यास करावासा वाटेल का? शक्यता कमी आहे. मग या समस्येवर काय उपाय आहे? आपल्या प्रयत्नांचा पुरेपूर फायदा मिळवण्याकरता अभ्यासाची वेळ आणि ठिकाण विचारपूर्वक निवडणे महत्त्वाचे आहे.

२. वैयक्‍तिक अभ्यासाकरता सर्वोत्तम वेळ कोणती?

काहींना पहाटे उठून अभ्यास करायला आवडते; त्यांना ही वेळ सर्वात उत्तम वाटते कारण त्या वेळी ते अगदी तल्लख बुद्धीने अभ्यास करू शकतात. काहीजण दुपारच्या सुटीत, थोडा वेळ का होईना पण अभ्यास करतात. खालील काही उदाहरणांत महत्त्वाच्या आध्यात्मिक कार्यांकरता वेळेच्या संदर्भात काय म्हटले आहे याकडे लक्ष द्या. प्राचीन इस्राएलचा राजा दावीद याने लिहिले: “प्रातःकाळी तुझ्या वात्सल्याचे शब्द मला ऐकू दे; कारण तुझ्यावर माझा भाव आहे; ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळीव कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लाविले आहे.” (स्तोत्र १४३:८) संदेष्टा यशया यानेही अभ्यासाबद्दल अशाच प्रकारे कदर व्यक्‍त करून म्हटले: “शिणलेल्यांस बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभु परमेश्‍वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे; तो रोजरोज सकाळी मला जागे करितो; शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडितो.” तात्पर्य हे की अभ्यास आणि यहोवासोबत संवाद साधण्याकरता आपण जेव्हा मानसिकरित्या सतर्क असतो अशी वेळ निवडली पाहिजे, मग ते दिवसभरात केव्हाही असो.—यशया ५०:४, ५; स्तोत्र ५:३; ८८:१३.

३. परिणामकारक अभ्यास करण्याकरता कशाप्रकारचे वातावरण असले पाहिजे?

अभ्यास परिणामकारक होण्याकरता आणखी एक सूचना म्हणजे आरामदायक खुर्चीवर अथवा सोफ्यावर बसून अभ्यास करण्याचा प्रयत्न करू नका. अशाने तुम्हाला सतर्क राहता येणार नाही. अभ्यास करताना आपले मन उत्साहित असले पाहिजे; पण शरीर आरामदायी स्थितीत असल्यास याचा उलट परिणाम होतो. अभ्यास व मनन करण्याकरता वारंवार लक्ष विचलित होणार नाही असे शांत वातावरण असले पाहिजे. रेडिओ, टीव्ही सुरू असताना किंवा मुलांना तुमच्यासोबत खेळायचे असते तेव्हा अभ्यास करायला बसल्यास तुम्हाला परिणामकारकरित्या अभ्यास करता येणार नाही. येशू मनन करण्याकरता शांत ठिकाणी निघून जात असे. त्याने प्रार्थनेकरता एकांत ठिकाणाचे महत्त्व देखील सांगितले.—मत्तय ६:६; १४:१३; मार्क ६:३०-३२.

उत्तरे देण्याकरता मदत करणारा वैयक्‍तिक अभ्यास

४, ५. अपेक्षा माहितीपत्रक कशाप्रकारे उपयोगी ठरू शकते?

एखाद्या विषयावर अधिक सखोल अभ्यास करण्याकरता, खासकरून कोणाच्या प्रामाणिक प्रश्‍नांचे उत्तर देण्याकरता जेव्हा आपण वेगवेगळ्या बायबल अभ्यास साधनांचा उपयोग करतो तेव्हा हा वैयक्‍तिक अभ्यास अतिशय समाधानकारक ठरतो. (१ तीमथ्य १:४; २ तीमथ्य २:२३) सुरवात म्हणून बरेच नवीन लोक देव आपल्याकडून काय अपेक्षितो? * या माहितीपत्रकाचा अभ्यास करत आहेत; हे माहितीपत्रक आज २६१ भाषांत उपलब्ध आहे. यातील माहिती अगदी साधी पण मुद्देसूद आहे आणि पूर्णतया बायबलवर आधारित आहे. खऱ्‍या उपासनेच्या संबंधाने देवाच्या अपेक्षा काय आहेत हे अगदी कमी काळात समजून घेण्यास ते वाचकांना मदत करते. पण याची रचना अशाप्रकारची आहे की प्रत्येक विषयाची सविस्तर माहिती देणे शक्य नाही. त्यामुळे, जर चर्चा करत असताना विशिष्ट बायबल विषयांवर तुमच्यासोबत बायबल अभ्यास करणाऱ्‍याने प्रामाणिक प्रश्‍न उपस्थित केले तर त्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याकरता बायबलमधून अधिक माहिती मिळवण्यास तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता?

ज्यांच्याजवळ स्वतःच्या भाषेत वॉचटावर लायब्ररीच्या सीडी-रॉम्स आहेत त्यांना कम्प्युटरवर अनेक प्रकाशनांतून भरपूर माहिती मिळवणे अगदी सोपे जाईल. पण ज्यांच्याजवळ ही सुविधा नाही त्यांच्याविषयी काय? अपेक्षा माहितीपत्रकातील दोन विषयांचे आपण परीक्षण करून पाहू, की आपण एखादा विषय अधिक चांगल्याप्रकारे समजून अधिक सविस्तर उत्तर कशाप्रकारे देऊ शकतो; खासकरून जेव्हा एखादी व्यक्‍ती विचारते की देव कोण आहे? आणि येशूचे व्यक्‍तिमत्त्व कशाप्रकारचे होते?—निर्गम ५:२; लूक ९:१८-२०; १ पेत्र ३:१५.

देव कोण आहे?

६, ७. (अ) देवाच्या संबंधाने कोणता प्रश्‍न उद्‌भवतो? (ब) एका पाळकाने आपल्या व्याख्यानात कोणती महत्त्वाची गोष्ट गाळली?

अपेक्षा माहितीपत्रकातील दुसऱ्‍या पाठात, देव कोण आहे? या महत्त्वाच्या प्रश्‍नाचे उत्तर सापडते. हा एक पायाभूत मुद्दा आहे कारण खऱ्‍या देवाची ओळख नसेल किंवा त्याच्या अस्तित्वाविषयी शंका असतील तर एक व्यक्‍ती त्याची उपासना करू शकत नाही. (रोमकर १:१९, २०; इब्री लोकांस ११:६) पण जगभरात देवाबद्दल लोकांच्या असंख्य संकल्पना आहेत. (१ करिंथकर ८:४-६) देवाविषयीच्या प्रश्‍नांना प्रत्येक धार्मिक तत्त्वज्ञानात वेगळे उत्तर दिले आहे. ख्रिस्ती धर्मजगतातील बहुतेक धर्मांत देवाला त्रिएक रूपात मानले जाते. अमेरिकेच्या एका पाळकाने “तुम्ही देवाला ओळखता का?” या विषयावर व्याख्यान दिले पण त्या सबंध भाषणात त्याने कित्येक वेळा इब्री शास्त्रवचनांतील उतारे उद्धृत करूनही एकदाही देवाच्या नावाचा उल्लेख केला नाही. अर्थात, त्यांनी हे उतारे एका अशा बायबल भाषांतरातून वाचून दाखवले ज्यात यहोवा किंवा याव्हे हे नाव वापरण्याऐवजी “प्रभू” हा अस्पष्ट आणि निनावी शब्द वापरला आहे.

यिर्मया ३१:३३, ३४ ही वचने उद्धृत करताना या पाळकाने एक महत्त्वाचा मुद्दा गमावला: “परमेश्‍वर [इब्री, यहोवा] म्हणतो “‘यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्‍यास, कोणी आपल्या बंधूस, “परमेश्‍वराला ओळखा” [इब्री “यहोवाला ओळखा”], असा बोध करणार नाहीत; कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील.’” त्या पाळकाने वापरलेल्या भाषांतरात देवाचे वैशिष्ट्यपूर्ण नाव, यहोवा, गाळलेले होते.—स्तोत्र १०३:१, २.

८. देवाच्या नावाचा उपयोग करण्याचे महत्त्व कशावरून स्पष्ट होते?

यहोवाच्या नावाचा उपयोग करणे इतके महत्त्वाचे का आहे हे स्तोत्र ८:९ (पं.र.भा.) यावरून स्पष्ट होते: “हे यहोवा, आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीत तुझे नाव किती थोर आहे!” याची तुलना आता पुढील भाषांतराशी करून पाहा: “हे परमेश्‍वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे!” (द होली बायबल मराठी—आर. व्ही.; मराठी कॉमन लँग्वेज बायबल, इझी-टू-रीड व्हर्शन देखील पाहा.) होय, या आधीच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे आपण देवाच्या वचनाची मदत घेतली तर आपल्याला “देवाविषयीचे ज्ञान” प्राप्त होऊ शकते. पण देवाच्या नावाच्या महत्त्वासंबंधी प्रश्‍नांची उत्तरे कोणत्या बायबल अभ्यास साधनांत सापडतील?—नीतिसूत्रे २:१-६.

९. (अ) देवाच्या नावाचा उपयोग करण्याच्या महत्त्वाविषयी आपल्याला कोणत्या प्रकाशनात स्पष्टीकरण सापडेल? (ब) कशाप्रकारे बऱ्‍याच भाषांतरकारांनी देवाच्या नावाला आदर दाखवला नाही?

आपण तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळ जगू शकाल या पुस्तकाची मदत घेऊ शकतो. या पुस्तकाचा १३१ भाषांत अनुवाद झाला आहे. * “देव—तो कोण आहे?” या चवथ्या प्रकरणातील (पृष्ठे ४१-४४) भागात स्पष्टपणे दाखवले आहे की इब्री टेट्राग्रमॅटन (“चार अक्षरे” या अर्थाचा ग्रीक शब्द) प्राचीन इब्री मूळग्रंथांत जवळजवळ ७,००० वेळा आढळते. आणि तरीसुद्धा पाळकवर्गाने व यहुदी धर्माच्या आणि ख्रिस्ती धर्मजगताच्या भाषांतरकारांनी आपल्या बहुतेक भाषांतरांतून हे नाव गाळले आहे. * जर ते देवाचे नाव कबूल करण्यास तयार नाहीत तर मग ते देवाला ओळखण्याचा आणि त्याच्यासोबत स्वीकार्य नातेसंबंध असण्याचा दावा कसा करू शकतात? त्याचे खरे नाव आपल्याला त्याचे उद्देश काय आहेत आणि तो कोण आहे याची ओळख करून देतात. शिवाय, जर देवाचे नाव वापरलेही जात नसेल तर मग “हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानिले जावो” या येशूच्या आदर्श प्रार्थनेतील वाक्याला काय अर्थ राहील?—मत्तय ६:९; योहान ५:४३; १७:६.

येशू ख्रिस्त कोण आहे?

१०. येशूच्या जीवनाविषयी व सेवाकार्याविषयी अधिक सविस्तर माहिती आपल्याला कोठे मिळू शकते?

१० अपेक्षा माहितीपत्रकात पाठ क्र. ३ “येशू ख्रिस्त कोण आहे?” या शीर्षकावर आधारित आहे? केवळ सहा परिच्छेदांत, यात येशूची सुरवात आणि या पृथ्वीवर येण्यामागील त्याचा उद्देश याविषयी अगदी संक्षिप्त रूपरेषा दिली आहे. पण जर तुम्हाला त्याच्या जीवनाचा संपूर्ण अहवाल वाचायचा असेल तर—खुद्द शुभवर्तमान अहवालांचा अपवाद सोडल्यास—सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या १११ भाषांत उपलब्ध असलेल्या प्रकाशनापेक्षा अधिक चांगला पर्याय सापडणार नाही. * या पुस्तकात ख्रिस्ताच्या जीवनाविषयी व शिकवणुकींविषयी चार शुभवर्तमानांच्या आधारावर कालक्रमानुसार संपूर्ण अहवाल सादर करण्यात आला आहे. यातील १३३ अध्यायांत येशूच्या जीवनाविषयी व सेवाकार्याविषयी इत्थंभूत माहिती आहे. काहीशा वेगळ्या, विश्‍लेषक पद्धतीने सादर केलेली माहिती हवी असल्यास तुम्ही सूक्ष्मदृष्टी, खंड २ यात “येशू ख्रिस्त” या शीर्षकाखाली पाहू शकता.

११. (अ) यहोवाच्या साक्षीदारांचे येशूविषयीचे विश्‍वास कशाप्रकारे वेगळे आहेत? (ब) कोणती काही शास्त्रवचने त्रैक्याच्या शिकवणुकीचे सरळसरळ खंडन करतात आणि या विषयावर कोणते प्रकाशन सहायक ठरू शकते?

११ ख्रिस्ती धर्मजगतात येशूच्या संदर्भात असलेला मुख्य वाद म्हणजे तो नेमका कोण आहे “देवाचा पुत्र” की “देव जो पुत्र.” दुसऱ्‍या शब्दांत, कॅथकिसम ऑफ द कॅथलिक चर्चने ज्याला “ख्रिस्ती विश्‍वासातील प्रमुख रहस्य” म्हटले तो त्रियेकवाद. ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मांपासून वेगळी भूमिका घेऊन यहोवाच्या साक्षीदारांचा असा विश्‍वास आहे की येशूला देवाने निर्माण केले आहे आणि तो देव नाही. या विषयावर तुम्ही त्रैक्य मानावे का?* या माहितीपत्रकात अतिशय सुरेख स्पष्टीकरण दिले आहे. या माहितीपत्रकाचा ९५ भाषांत अनुवाद करण्यात आला आहे.* त्रैक्याच्या सिद्धान्ताचे खंडन करण्याकरता वापरलेल्या अनेक शास्त्रवचनांपैकी मार्क १३:३२ आणि १ करिंथकर १५:२४, २८ यांसारखी वचने आहेत.

१२. आणखी कोणत्या प्रश्‍नांकडे लक्ष देणे जरूरीचे आहे?

१२ देव व येशू ख्रिस्त यांच्याविषयी वरील चर्चेतून आपल्याला काही मार्ग दिसून आले ज्यांद्वारे आपण बायबल सत्याशी फारसे परिचित नसणाऱ्‍यांना अचूक ज्ञान घेण्यास मदत करण्याच्या उद्देशाने वैयक्‍तिक अभ्यास करू शकतो. (योहान १७:३) पण जे लोक ख्रिस्ती मंडळीत अनेक वर्षांपासून आहेत त्यांच्याविषयी काय? एव्हाना त्यांनी बरेच बायबल ज्ञान मिळवले आहे, मग त्यांनीही यहोवाच्या वचनाच्या वैयक्‍तिक अभ्यासाकडे लक्ष देणे जरूरीचे आहे का?

‘नीट लक्ष ठेवणे’ का महत्त्वाचे?

१३. काहींना वैयक्‍तिक अभ्यासासंबंधाने कोणता गैरसमज असू शकतो?

१३ मंडळीत अनेक वर्षांपासून असलेल्या काही सदस्यांना, यहोवाचे साक्षीदार बनल्यावर त्यांनी पहिल्या काही वर्षांत जे ज्ञान मिळवले होते त्यावरच अवलंबून राहण्याची सवय लागते. एक व्यक्‍ती सहज असा तर्क करू शकते: “मला नवीन लोकांइतका अभ्यास करण्याची गरज नाही. आतापर्यंत मी बायबल कितीदा तरी वाचून काढले आहे शिवाय बायबल प्रकाशनेही मी भरपूर वाचली आहेत.” हे असे म्हणण्यासारखे ठरेल: “आता मला माझ्या आहाराकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, कारण आतापर्यंत मी कितीदातरी जेवलो आहे.” आपल्या शरीराला सुदृढ व सक्रिय ठेवण्याकरता सकस व चांगल्या प्रकारे तयार केलेल्या आहाराची सतत गरज आहे याची आपल्याला जाणीव आहे. मग आपल्या आध्यात्मिक आरोग्याच्या आणि ताकदीच्या संबंधाने हे अधिकच खरे नाही का?—इब्री लोकांस ५:१२-१४.

१४. आपण स्वतःकडे नीट लक्ष का दिले पाहिजे?

१४ आपण बऱ्‍याच काळापासून बायबल विद्यार्थी असोत वा नसोत पण पौलाने तीमथ्याला, तो एक प्रौढ व जबाबदार पर्यवेक्षक असताना दिलेला सल्ला आपण सर्वांनीच मनावर घेतला पाहिजे: “आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव. त्यातच टिकून राहा, कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्‍यांचेहि तारण साधिशील.” (१ तीमथ्य ४:१५, १६) आपण पौलाचा हा सल्ला मनावर का घेतला पाहिजे? कारण तुम्हाला आठवत असेल, की आपल्याला ‘सैतानाच्या डावपेचांशी’ आणि ‘आकाशातल्या दुरात्म्यांशी’ लढा द्यायचा आहे हे देखील पौलाने सांगितले होते. शिवाय, प्रेषित पेत्राने ताकीद दिली होती की दियाबल हा “कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो,” आणि या वचनात वापरलेल्या “कोणाला” या शब्दात आपल्यापैकी कोणाचाही समावेश होऊ शकतो. आपण थोडी जरी ढिलाई केली तर सैतानाला हवी असलेली संधी त्याला मिळू शकते.—इफिसकर ६:११, १२; १ पेत्र ५:८.

१५. आपल्याजवळ कोणते आध्यात्मिक संरक्षण उपलब्ध आहे आणि आपण ते कशाप्रकारे कायम राखू शकतो?

१५ आपल्याकडे आत्मसंरक्षणाचे कोणते मार्ग आहेत? प्रेषित पौल आपल्याला आठवण करून देतो: “तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करिता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या.” (इफिसकर ६:१३) ही आध्यात्मिक शस्त्रसामग्री केवळ सुरवातीलाच उत्तम प्रतीची असणे पुरेसे नाही तर नियमित काळजी घेण्याद्वारे ती कायम सुस्थितीत ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. देवाच्या संपूर्ण शस्त्रसामग्रीत त्याच्या वचनाच्या अद्ययावत ज्ञानाचा समावेश असणे महत्त्वाचे आहे. यासाठी यहोवाने त्याच्या वचनाच्या व विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या माध्यमाने प्रकट केलेल्या सत्याशी आपण सुपरिचित असले पाहिजे. बायबलचा आणि बायबल आधारित प्रकाशनांचा नियमित वैयक्‍तिक अभ्यास आपली आध्यात्मिक शस्त्रसामग्री सुस्थितीत ठेवण्याकरता अत्यावश्‍यक आहे.—मत्तय २४:४५-४७; इफिसकर ६:१४, १५.

१६. आपल्या ‘विश्‍वासाची ढाल’ उत्तम स्थितीत आहे याची खात्री करण्याकरता आपण काय करू शकतो?

१६ पौल आपल्या संरक्षक शस्त्रसामग्रीतील एका महत्त्वाच्या भागाचा उल्लेख करतो, अर्थात, “विश्‍वासाची ढाल” जिच्या साहाय्याने आपण खोटे आरोप व धर्मत्यागी शिकवणुकी यांसारखे सैतानाचे जळते बाण विझवू शकतो. (इफिसकर ६:१६) म्हणूनच, आपली विश्‍वासाची ढाल किती मजबूत आहे आणि ती तशीच ठेवण्याकरता, किंबहुना तिला अधिक मजबूत बनवण्याकरता काय करता येईल हे आपण वेळोवेळी तपासून पाहिले पाहिजे. उदाहरणार्थ, आपण स्वतःला असे विचारू शकतो: ‘टेहळणी बुरूजच्या साहाय्याने साप्ताहिक बायबल अभ्यासाची मी कशाप्रकारे तयारी करतो? सभेत, माझ्या विचारपूर्वक दिलेल्या टिप्पण्यांच्या माध्यमाने इतरांना ‘प्रीति व सत्कर्मे यांकरता उत्तेजन’ देता येईल इतक्या चांगल्याप्रकारे मी तयारी केली आहे का? अभ्यास लेखात जी वचने उद्धृत केलेली नाहीत, केवळ ज्यांचा उल्लेख केला आहे ती बायबलमधून उघडून मी वाचतो का? सभेत उत्साहीपणे सहभाग घेण्याद्वारे मी एकमेकांना उत्तेजन देतो का?’ आपले आध्यात्मिक अन्‍न जड असल्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा करून घेण्याकरता ते चांगल्याप्रकारे पचवणे आवश्‍यक आहे.—इब्री लोकांस ५:१४; १०:२४.

१७. (अ) आपल्या आध्यात्मिकतेला कमकुवत करण्यासाठी सैतान कोणत्या विषाचा उपयोग करण्याचा प्रयत्न करत आहे? (ब) सैतानाच्या विषावर औषध काय?

१७ सैतानाला अपरिपूर्ण शरीराच्या कमतरता चांगल्या ठाऊक आहेत आणि त्यामुळे त्याचे डावपेच देखील अत्यंत धूर्त असतात. त्याचा दुष्ट प्रभाव पसरवण्याचे एक माध्यम म्हणजे पोर्नोग्राफी (अश्‍लील साहित्य) जे त्याने टीव्ही, इंटरनेट, व्हिडिओ आणि छापील साहित्यात अगदी सहजपणे उपलब्ध करून दिले आहे. काही ख्रिश्‍चनांनी स्वतःचे आत्मिक संरक्षण करण्यात ढिलाई केल्यामुळे ते या विषाला बळी पडले आहेत; यामुळे मंडळीत त्यांच्याकडून काही सुहक्क काढून घेण्यात आले आहेत किंवा काहींना तर याहूनही गंभीर दुष्परिणाम भोगावे लागले आहेत. (इफिसकर ४:१७-१९) सैतानाच्या या आध्यात्मिक विषावर उपाय कोणता आहे? आपण आपला नियमित बायबल अभ्यास, आपल्या ख्रिस्ती सभा आणि देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री यांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. या सर्व गोष्टी आपल्याला योग्य व अयोग्य यांतला फरक ओळखण्यास आणि देव ज्याचा द्वेष करतो त्याचा द्वेष करण्यास मदत करतात.—स्तोत्र ९७:१०; रोमकर १२:९.

१८. आपल्या आध्यात्मिक सुयुद्धात “आत्म्याची तरवार” कशाप्रकारे आपली मदत करू शकते?

१८ आपण नियमित बायबल अभ्यासाची सवय ठेवल्यास देवाच्या वचनातील अचूक ज्ञानाने आपल्याला केवळ संरक्षणच मिळणार नाही तर “आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन,” याच्या साहाय्याने सैतानाचा प्रतिकार देखील करू शकू. देवाचे वचन “कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्‍यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्‍यांचे परीक्षक असे आहे.” (इफिसकर ६:१७; इब्री लोकांस ४:१२) या ‘तरवारीचा’ उपयोग करण्यात आपण निपुण झालो, तर आपल्यासमोर मोहात पाडणारी परिस्थिती आल्यास आपण तिला बळी पडणार नाही; ज्या वरवर अनपायकारक, किंबहुना आकर्षक दिसतात अशा गोष्टी मुळात दुष्ट सैतानाचे जीवघेणे पाश आहेत हे ओळखण्यास आपल्याला मदत होईल. बायबलचे पुरेपूर ज्ञान व समज असल्यामुळे जे दुष्ट आहे त्याचा धिक्कार करून चांगले ते करण्यास आपण प्रवृत्त होऊ. म्हणूनच आपण सर्वांनी स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘माझी तरवार धारदार आहे, की गंजलेली आहे? सैतानाचा प्रतिकार करण्याकरता उपयोगी पडतील अशी शास्त्रवचने आठवायला मला कठीण जाते का?’ वैयक्‍तिक बायबल अभ्यासाची नियमित सवय ठेवून आपण यशस्वीपणे दियाबलाचा प्रतिकार करू या.—इफिसकर ४:२२-२४.

१९. आपण वैयक्‍तिक अभ्यासाची सवय ठेवल्यास आपल्याला कोणते फायदे मिळू शकतील?

१९ पौलाने लिहिले: “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍यांकरिता उपयोगी आहे. ह्‍यासाठी की, देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.” तीमथ्याला पौलाने दिलेला हा सल्ला आपण अनुसरला तर आपण आध्यात्मिकरित्या अधिक सुदृढ होऊन सेवेतही अधिक परिणामकारक होऊ शकतो. आध्यात्मिक प्रवृत्तीचे वडील आणि सेवा सेवक मंडळीत अतिशय मोलाचा हातभार लावू शकतात आणि आपण सर्वजण विश्‍वासात अविचल राहू शकतो.—२ तीमथ्य ३:१६, १७; मत्तय ७:२४-२७.

[तळटीपा]

^ परि. 4 सहसा, अपेक्षा माहितीपत्रकाचा अभ्यास करणारी नवीन आस्थेवाईक व्यक्‍ती सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकाचाही अभ्यास करते. ही दोन्ही प्रकाशने यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केली आहेत. येथे दिलेल्या सूचना, आध्यात्मिक प्रगतीला बाधा ठरू शकणाऱ्‍या प्रश्‍नांचे समाधान करण्यात सहायक ठरतील.

^ परि. 9 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित. ज्यांच्याजवळ शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी हे प्रकाशन स्वतःच्या भाषेत आहे ते दुसऱ्‍या खंडात “यहोवा” या शीर्षकाखालील माहिती पाहू शकतात.

^ परि. 9 बऱ्‍याच स्पॅनिश व कॅटलोनियन भाषांतरांत इब्री टेट्राग्रमॅटनचे अपवादात्मक रूप वापरले आहे, उदाहरणार्थ “यावे,” “याहवे,” “जाहवे,” आणि “खेओवा.”

^ परि. 10 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

तुम्हाला आठवते का?

• परिणामकारक वैयक्‍तिक अभ्यासाला कोणत्या गोष्टी हातभार लावतात?

• देवाच्या नावाच्या संबंधाने बरेच बायबल अनुवाद कोणती चूक करतात?

• त्रैक्याच्या शिकवणुकीचे खंडन करण्याकरता तुम्ही कोणत्या बायबल वचनांचा उपयोग कराल?

• आपण अनेक वर्षांपासून खरे ख्रिस्ती असलो तरीसुद्धा सैतानाच्या डावपेचांपासून स्वतःचे संरक्षण करण्याकरता आपण काय केले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१९ पानांवरील चित्रे]

परिणामकारक वैयक्‍तिक अभ्यास करण्याकरता लक्ष विचलित करणाऱ्‍या कमीत कमी गोष्टी असतील असे योग्य वातावरण असले पाहिजे

[२३ पानांवरील चित्रे]

तुमची “तरवार” धारदार आहे की गंजलेली?