व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कौटुंबिक वर्तुळात प्रेम व्यक्‍त करा

कौटुंबिक वर्तुळात प्रेम व्यक्‍त करा

कौटुंबिक वर्तुळात प्रेम व्यक्‍त करा

“हिंमत असेल तर जाळ! जाळ ना!” टोरूने आपल्या बायकोला, योकोला * आव्हान केले. “जाळतेच,” असे म्हणून तिने दोघांचा काढलेला फोटो जाळण्यासाठी काडी पेटवली. आणि मग अचानक खेकसून म्हणाली, “मी घरंच जाळते!” टोरूने तिच्या थोबाडीत मारली; बाचाबाचीचे रूपांतर हातापायीत झाले.

तीन वर्षांपूर्वी, टोरू आणि योको यांनी आनंदी जोडप्याप्रमाणे आपला संसार सुरू केला होता. मग पाणी कोठे मुरत होते? टोरूचा स्वभाव चांगला आहे असे वरून दिसत असले तरी, त्याच्या पत्नीला वाटत होते, की त्याला तिच्याबद्दल प्रेम नव्हते, तिच्या भावनांची त्याला जराही कदर नव्हती. आपल्या प्रेमाला तो प्रतिसाद देत नव्हता असे तिला वाटत होते. हे सर्व अनावर झाल्यामुळे योको अतिशय रागीष्ट व चिडखोर बनली. तिला, निद्रानाश, चिंता, भूक न लागणे, चिडचिडेपणा, तणाव यांसारखे त्रास सुरू झाले आणि कधीकधी भीतीचे झटकेही येऊ लागले. एवढे होऊनही, टोरूने आपल्या घरातल्या तणावपूर्ण वातावरणाकडे दुर्लक्ष केले. त्याला त्यात काही नवल वाटत नव्हते.

“कठीण दिवस”

अशाप्रकारच्या समस्या आज सर्वसामान्य आहेत. या काळाचे एक चिन्ह म्हणजे लोक “ममताहीन,” होतील असे प्रेषित पौलाने आपल्या काळाविषयी भाकीत केले. (तिरपे वळण आमचे.) (२ तीमथ्य ३:१-५) “ममताहीन” असे येथे भाषांतरीत केलेल्या ग्रीक शब्दाचा, कौटुंबिक सदस्यांमध्ये दिसणारे स्वाभाविक प्रेम या अर्थाच्या शब्दाशी जवळून संबंध आहे. आपल्या काळात तर अशाप्रकारच्या प्रेमाचा निश्‍चितच अभाव दिसून आला आहे. आणि प्रेम असले तरी, कुटुंबातील सदस्य क्वचितच ते एकमेकांना व्यक्‍त करतात.

आज पुष्कळ पालकांना आपल्या मुलांना प्रेम, ममता व्यक्‍त करायचे माहीत नाही. काही जण, ममता नसलेल्या कुटुंबात लहानाचे मोठे झाले आहेत त्यामुळे ममता मिळाल्यावर व व्यक्‍त केल्यावर जीवन आणखी आनंदी, आणखी सुखदायक होऊ शकते याची त्यांना जाणीव नसते. टोरूच्या बाबतीत असेच झाले असावे असे दिसते. लहानपणी त्याचे वडील नेहमी कामात व्यस्त असायचे आणि रात्री उशिरा घरी यायचे. टोरूबरोबर त्यांचे क्वचितच बोलणे व्हायचे, आणि जे व्हायचे तेही रागातच व्हायचे. टोरूची आईसुद्धा कामाला जायची त्यामुळे तिलाही टोरूबरोबर वेळ घालवायला मिळायचे नाही. टीव्ही संच त्याचा बेबी-सीटर होता. कुटुंबात उबदार प्रशंसा नव्हती किंवा दळणवळण नव्हते.

संस्कृतीसुद्धा एक कारण असू शकते. लॅटिन अमेरिकेच्या काही भागांत, एखाद्या पुरूषाला आपल्या पत्नीबद्दल प्रेम व्यक्‍त करायचे असेल तर त्याला संस्कृतीचे नियम तोडावे लागतील. पुष्कळ पौर्वात्य आणि आफ्रिकन देशांत, शब्दांत किंवा कृतींत प्रेम व्यक्‍त करणे हे त्यांच्या संस्कृतीत बसत नाही. पतीला आपल्या पत्नीला “तू मला आवडतेस” किंवा मुलांना, “आमचं तुमच्यावर प्रेम आहे,” असे म्हणायला खूप जड जाते. तरीपण आपण, सर्वात पहिल्या कौटुंबिक नातेसंबंधातून एक असा धडा शिकू शकतो जो दीर्घकाळापासून खरा व व्यावहारिक ठरला आहे.

अनुकरणीय कौटुंबिक नातेसंबंध

यहोवा देव आणि त्याचा एकुलता एक पुत्र यांच्यात असलेला निकटचा नातेसंबंध, कुटुंबासाठी सर्वात उत्तम आदर्श आहे. एका परिपूर्ण पद्धतीने ते एकमेकांना आपले प्रेम व्यक्‍त करतात. अगणीत वर्षांच्या कालावधीत, नंतर येशू ख्रिस्त बनलेल्या आत्मिक प्राण्याचा आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर निकटचा आनंदी नातेसंबंध होता. त्यांच्यातील नातेसंबंधाचे वर्णन त्याने अशाप्रकारे केले: “मी त्याला नित्य आनंददायी [होतो]; त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे.” (नीतिसूत्रे ८:३०) येशूला आपल्या पित्याच्या प्रेमाची इतकी खात्री होती, की त्याने इतरांसमोर असे घोषित केले, की यहोवा त्याच्याविषयी नित्य आनंददायी होता. आपल्या पित्याच्या सहवासात त्याला नेहमी आनंद वाटत असे.

मानव म्हणून पृथ्वीवर आल्यावरही येशूला देवाने आपला पुत्र म्हणून सखोल प्रीतीची खात्री दिली. येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर त्याने आपल्या पित्याचा आवाज ऐकला: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्‍याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” (मत्तय ३:१७) पृथ्वीवरील येशूच्या कामगिरीच्या सुरवातीलाच प्रेमाची ही अभिव्यक्‍ती किती प्रोत्साहनदायक असावी! स्वर्गातील जीवनाच्या आठवणींची घडी जसजशी त्याच्या नजरेसमोरून उलगडत गेली तसतसे आपल्या पित्याचे हे स्वीकृती दर्शवणारे शब्द त्याच्या हृदयाला स्पर्शले असावेत.

अशाप्रकारे, आपल्या विश्‍वव्यापी कुटुंबाला पूर्ण मात्रेत प्रेम व्यक्‍त करण्यात यहोवाने सर्वोत्तम उदाहरण मांडले आहे. आपण येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तर आपणही यहोवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊ शकतो. (योहान १६:२७) आपल्याला स्वर्गातून कोणतीही आकाशवाणी ऐकायला मिळणार नसली तरी, आपण निसर्गातून, येशूच्या खंडणी बलिदानातून व इतर मार्गांतून यहोवाचे प्रेम व्यक्‍त होताना पाहू शकतो. (१ योहान ४:९, १०) यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो आणि आपला अधिक लाभ होईल त्या उचित प्रकारे तो त्यांचे उत्तर देतो. (स्तोत्र १४५:१८; यशया ४८:१७) यहोवाबरोबर आपण निकटचे नाते जोडतो तेव्हा त्याच्या प्रेमळ काळजीबद्दल आपण अधिक कृतज्ञ होतो.

इतरांना सहानुभूती, त्यांच्याप्रती विचारशीलता, दयाळुपणा, काळजी कशी दाखवायची हे येशू आपल्या पित्याकडून शिकला होता. त्याने म्हटले: “जे काही तो करितो ते पुत्रहि तसेच करितो. कारण पिता पुत्रावर प्रीति करितो आणि स्वतः जे काही करितो ते सर्व त्याला दाखवितो.” (योहान ५:१९, २०) तेव्हा आपणही, येशू पृथ्वीवर असताना त्याने मांडलेल्या उदाहरणाचे जवळून परीक्षण करण्याद्वारे ममता व्यक्‍त करण्याची कला शिकून घेऊ शकतो.—फिलिप्पैकर १:८.

कुटुंबात ममता—कशी दाखवता येईल?

“देव प्रीति” असल्यामुळे व आपल्याला ‘देवाच्या प्रतिरुपात’ निर्माण करण्यात आल्यामुळे आपल्यात प्रेम अनुभवण्याची व व्यक्‍त करण्याची क्षमता आहे. (१ योहान ४:८; उत्पत्ति १:२६, २७) परंतु, ही क्षमता असली तरीसुद्धा प्रेम आपोआप व्यक्‍त होत नाही. प्रेम अथवा ममता व्यक्‍त करण्याकरता आधी आपल्याला, आपल्या वैवाहिक जोडीदाराबद्दल, आपल्या मुलांबद्दल प्रेम वाटले पाहिजे. त्यांना न्याहाळून पाहा, त्यांच्यातील चांगल्या गुणांकडे, मग ते कितीही लहान अथवा क्षुल्लक असले तरीसुद्धा लक्ष द्या आणि त्यांच्यावर विचार करा. तुम्ही म्हणाल, ‘माझ्या नवऱ्‍यात [बायकोत, मुलांमध्ये] खास असं काही नाही.’ ज्यांचे विवाह ठरवून झाले आहेत, त्यांना कदाचित आपल्या जोडीदाराबद्दल इतके प्रेम नसेल. काही जोडप्यांना मुले नको असतील. पण, यहोवाला आपली लाक्षणिक पत्नी, इस्राएल राष्ट्राबद्दल सा.यु.पू. दहाव्या शतकात काय वाटले ते पाहा. यहोवाचा संदेष्टा एलीया याने जेव्हा यहोवाला म्हटले, की इस्राएलच्या दहा-गोत्र राष्ट्रांत त्याचा एकही उपासक नव्हता तेव्हा यहोवाने राष्ट्राची कसून तपासणी केल्यावर त्याला बरेच लोक—एकूण ७,००० लोक—आढळले ज्यांच्याजवळ यहोवाचे मन आनंदित करणारे गुण होते. तुम्ही देखील तुमच्या कौटुंबिक सदस्यांतील चांगले गुण पाहून यहोवाचे अनुकरण करता का?—१ राजे १९:१४-१८.

कुटुंबातील सदस्यांबद्दल तुम्हाला प्रेम आहे हे त्यांना तुम्हाला जाणवू द्यायचे असेल तर तुम्हाला ते व्यक्‍त करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागेल. कोणतीही प्रशंसा करण्याजोगी गोष्ट दिसल्यावर लगेच तुमची प्रशंसा शब्दांत मांडा. सद्‌गुणी पत्नीचे वर्णन करताना, तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या एका खास वैशिष्ट्याबद्दल देवाच्या वचनात सांगितले आहे: “तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराहि उठून तिची प्रशंसा” करतो. (नीतिसूत्रे ३१:२८) घरातील सदस्य त्यांना वाटत असलेली कदर किती मोकळेपणाने व्यक्‍त करतात ते पाहा. शब्दांद्वारे आपल्या पत्नीची प्रशंसा करणारा पिता, आपल्या पुत्रासमोर एक उत्तम उदाहरण मांडतो; या मुलाचे लग्न झाल्यावर त्यालाही आपल्या जोडीदाराची भरपूर प्रशंसा करण्याचे प्रोत्साहन मिळते.

तसेच, पालकांनी आपल्या मुलांची देखील प्रशंसा केली पाहिजे. यामुळे मुलांच्या मनात स्वाभिमान निर्माण होतो. कारण, एखाद्या व्यक्‍तीला स्वतःबद्दलच आदर नसेल तर तो “आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति” कशी करू शकेल? (मत्तय २२:३९) आणि, पालक नेहमीच आपल्या मुलांची टीका करत राहिले, त्यांची त्यांनी कधीच प्रशंसा केली नाही तर साहजिकच ही मुले आपला स्वाभिमान गमावून बसतील आणि इतरांना प्रेम दाखवण्यास त्यांना जड जाऊ शकते.—इफिसकर ४:३१, ३२.

तुम्हाला मदत मिळू शकते

तुमचे संगोपन प्रेमळ वातावरण असलेल्या घरात झालेले नसेल तर? तरीसुद्धा तुम्ही प्रेम व्यक्‍त करण्यास शिकू शकता. पहिली पायरी म्हणजे, तुम्ही समस्या ओळखून सुधारणा करण्याची गरज आहे हे कबूल केले पाहिजे. याबाबतीत देवाचे वचन बायबल तुम्हाला मदत करू शकेल. बायबलची तुलना एखाद्या दर्पणाशी करता येऊ शकते. बायबलमधील दर्पणासमान असलेल्या शिकवणुकींमध्ये आपण स्वतःचे परीक्षण करतो तेव्हा आपल्याला आपल्या विचारसरणीतील अवगुण किंवा दोष लगेच दिसून येतात. (याकोब १:२३) बायबलच्या शिकवणुकींच्या सामंजस्यात आपण आपल्यातील कोणत्याही चुकीच्या वृत्ती सुधारू शकतो. (इफिसकर ४:२०-२४; फिलिप्पैकर ४:८, ९) असे आपण, ‘कंटाळा न करता’ नियमितरीत्या केले पाहिजे.—गलतीकर ६:९.

काहींना, त्यांच्या संगोपनामुळे अथवा संस्कृतीमुळे प्रेम व्यक्‍त करायला जड वाटू शकते. परंतु अलीकडील अभ्यासातून स्पष्ट झाले आहे, की या अडथळ्यांवर मात करता येते. मनोरोग तज्ज्ञ डॉ. डॅन्यल गोलमन म्हणतात, की ‘लहानपणी शिकलेल्या, अगदी अंतःकरणात खोलवर रुजलेल्या सवयी देखील बदलता येऊ शकतात.’ १९ पेक्षा अधिक शतकांआधी बायबलने हे सूचित केले की देवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने हृदयात अगदी खोल मुळावलेल्या प्रवृत्ती देखील बदलता येतात. ते असा सल्ला देते: ‘जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाका आणि जो नवा मनुष्य . . . तो धारण करा.’—कलस्सैकर ३:९, १०.

कुटुंबे, आपली नेमकी समस्या ओळखल्यावर आपल्या गरजांनुसार बायबल अभ्यास करू शकतात. उदाहरणार्थ, ‘प्रेमळपणा’ याविषयी बायबल काय म्हणते यावर संशोधन करायला काय हरकत आहे? तुम्हाला कदाचित हे वचन वाचायला मिळेल: “तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतु होता तो तुम्ही पाहिला आहे ह्‍यावरून प्रभु फार कनवाळू [प्रेमळ] व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले.” (याकोब ५:११) मग, बायबलमधून ईयोबाचा अहवाल वाचा आणि ईयोबाच्या बाबतीत यहोवा कनवाळू व दयाळू कसा होता यावर लक्ष केंद्रित करा. मग, आपल्या कुटुंबाशी कनवाळूपणे, दयाळुपणे वागण्याचा प्रयत्न करून तुम्ही यहोवाचे अनुकरण करू शकता.

परंतु अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्या बोलण्याद्वारे “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो.” (याकोब ३:२) कौटुंबिक वर्तुळात कदाचित आपण एकमेकांना प्रोत्साहन मिळेल अशाप्रकारे बोलण्यात कमी पडू. यासाठीच, प्रार्थनेची व यहोवावर विसंबून राहण्याची गरज आहे. परंतु हार मानू नका. “निरंतर प्रार्थना करा.” (१ थेस्सलनीकाकर ५:१७) कुटुंबात, प्रेमासाठी आसुसलेल्यांना त्याचप्रमाणे प्रेम दाखवण्यास उत्सुक असलेल्या परंतु तसे करण्यास जड जाणाऱ्‍यांना यहोवा मदत करेल.

याशिवाय, यहोवाने दयाळुपणे ख्रिस्ती मंडळीद्वारे देखील मदत पुरवली आहे. याकोबाने लिहिले: “तुम्हांपैकी कोणी [आध्यात्मिक अर्थाने] दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी.” (याकोब ५:१४) होय, यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीतील वडील, अशा कुटुंबांना बरीच मदत करू शकतात ज्यांना, आपल्या कुटुंबात प्रेम दाखवण्यास जड जाते. हे वडील मनोरोगोपचार तज्ज्ञ नसले तरीसुद्धा ते धीराने आपल्या सहविश्‍वासू बंधूभगिनींना मदत करू शकतात; त्यांनी काय केले पाहिजे हे ते त्यांना सांगणार नाहीत तर त्यांना यहोवाच्या दृष्टिकोनाची आठवण करून देतील आणि त्यांच्याबरोबर व त्यांच्यासाठी प्रार्थना करतील.—स्तोत्र ११९:१०५; गलतीकर ६:१.

टोरू आणि योकोच्या बाबतीत, ख्रिस्ती वडिलांनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांना सांत्वन दिले. (१ पेत्र ५:२, ३) काही प्रसंगी, एखादे वडील आपल्या पत्नीसह योकोला भेटायला जायचे जेणेकरून योकोला या अनुभवी ख्रिस्ती स्त्रीच्या सहवासाचा फायदा होऊ शकेल आणि ही अनुभवी स्त्री योकोला ‘आपल्या नवऱ्‍यावर प्रेम करण्यास शिकवू [ताळ्यावर आणू] शकेल.’ (तीत २:३, ४) सहख्रिश्‍चनांचे दुःख व समस्या समजून घेऊन सहानुभूती दाखवण्याद्वारे वडील जन “वाऱ्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा” असे होतात.—यशया ३२:१, २.

दयाळु वडिलांच्या साहाय्यामुळे टोरूला कळू लागले की आपल्या भावना व्यक्‍त करण्याची त्याला समस्या होती आणि या ‘शेवटल्या काळात’ सैतान कौटुंबिक व्यवस्थेवरच घाला घालत आहे. (२ तीमथ्य ३:१) टोरूने आपल्या समस्येवर मात करायचे ठरवले. लहानाचे मोठे होत असताना त्याला प्रेम मिळाले नव्हते त्यामुळे तोही आता प्रेम व्यक्‍त करू शकत नव्हता, हे त्याने जाणले. गंभीरपणे बायबलचा अभ्यास व प्रार्थना करण्याद्वारे टोरू हळूहळू योकोच्या भावनिक गरजांना प्रतिसाद देऊ लागला.

योकोला टोरूचा राग येत असला तरी, तिने त्याची कौटुंबिक पार्श्‍वभूमी समजून घेतली आणि स्वतःतील दोष पाहिल्यावर, आपल्या नवऱ्‍यांतील चांगले गुण पाहण्याचा तीही गंभीररीत्या प्रयत्न करू लागली. (मत्तय ७:१-३; रोमकर ५:१२; कलस्सैकर ३:१२-१४) आपल्या नवऱ्‍यावर प्रेम करीत राहायला आपल्याला मदत करावी म्हणून ती यहोवाला विनंती करीत राहिली. (फिलिप्पैकर ४:६, ७) हळूहळू टोरू आपले प्रेम व्यक्‍त करू लागला आणि यामुळे योकोला आनंद झाला.

होय, कुटुंबात प्रेम अनुभवणे व ते व्यक्‍त करणे तुम्हाला जड जात असले तरी तुम्ही या समस्येवर मात करू शकता. देवाचे वचन आपल्याला अतिशय लाभदायक मार्गदर्शन देते. (स्तोत्र १९:७) या गोष्टीचे गांभीर्य समजण्याद्वारे, तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे चांगले गुण पाहण्याद्वारे, देवाच्या वचनाचा अभ्यास करून त्याचा आपल्या जीवनात अवलंब करण्याद्वारे, कळकळीने प्रार्थना करून यहोवावर पूर्णपणे विसंबून राहण्याद्वारे व प्रौढ ख्रिस्ती वडिलांची मदत घेण्याद्वारे, तुम्ही, तुमच्या कुटुंबाच्या आणि तुमच्या मध्ये भिंतीसमान असलेल्या मोठ्या अडखळणास पाडू शकता. (१ पेत्र ५:७) संयुक्‍त संस्थानांतील एका पतीप्रमाणे तुम्हीही आनंद मानू शकता. त्याला आपल्या पत्नीला प्रेम व्यक्‍त करण्याचे उत्तेजन देण्यात आले. त्याने आपले सर्व धैर्य एकवटून तिला, “मला तू आवडतेस” असे म्हटले तेव्हा, तिची प्रतिक्रिया पाहून तो आश्‍चर्यचकित झाला. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले, ती त्याला म्हणाली: “मलाही तुम्ही आवडता, पण २५ वर्षांत तुम्ही पहिल्यांदा मला असं म्हणताय.” तेव्हा, आपल्या जोडीदाराला आणि मुलांना आपले प्रेम व्यक्‍त करायला इतका उशिर लावू नका!

[तळटीप]

^ परि. 2 काही नावे बदलण्यात आली आहेत.

[२८ पानांवरील चित्र]

यहोवा आपले वचन बायबल याद्वारे मदत देतो