“तीन ज्ञानी लोक” कोण होते?
“तीन ज्ञानी लोक” कोण होते?
येशूच्या जन्माच्या दृश्यात सहसा, आपल्या उटांसह असलेले उंची झगे घातलेले तीन पुरूष दाखवले जातात जे एका तबेल्यात, गव्हाणीत ठेवलेल्या बाळ येशूला पाहायला येतात. उंची पोशाख घातलेल्या या पुरूषांना सर्रासपणे, तीन ज्ञानी लोक असे म्हटले जाते. बायबल या लोकांविषयी काय सांगते?
बायबलनुसार, हे तथाकथित ज्ञानी लोक “पूर्वेकडून” आले होते आणि त्यांना तेथेच येशूच्या जन्माची खबर मिळाली होती. (मत्तय २:१, २, ९) यहुदीयाला यायला या लोकांना बरेच दिवस लागले असतील. कारण ते येईपर्यंत तर येशू तबेल्यातले नवजात जन्मलेले बाळ नव्हते. ते आले तेव्हा मरीया आणि “तो बाळक” एका घरात राहात होते.—मत्तय २:११.
बायबल या लोकांना मागी किंवा “ज्योतिषी” म्हणते आणि त्यांची संख्या ते सांगत नाही. (पं.र.भा. समास) द ऑक्सफर्ड कंपॅनियन टू द बायबल नुसार: “जादूटोणा आणि फलज्योतिष यांत असलेला संबंध, या लोकांना बेथलेहेमास येण्यासाठी मार्ग दाखवणाऱ्या ताऱ्याविषयी त्यांना असलेल्या उत्सुकतेवरून दिसून येतो.” बायबलमध्ये सर्व प्रकारच्या जादूटोण्याचा आणि ताऱ्यांद्वारे माहिती मिळवण्याच्या बॅबिलोनी प्रथांचा स्पष्टपणे निषेध करण्यात आला आहे.—अनुवाद १८:१०-१२; यशया ४७:१३.
या लोकांना मिळालेल्या माहितीचा काही चांगला परिणाम झाला नाही. उलट, हेरोद राजाचा द्वेषपूर्ण क्रोध यामुळे भडकला. आणि याचा परिणाम असा झाला की योसेफ व मरीयेला, येशूला घेऊन मिसरला पळून जावे लागले आणि बेथलेहममधील ‘दोन वर्षांच्या व त्याहून कमी वयाच्या’ सर्व मुलग्यांची कत्तल करण्यात आली. ज्योतिषांकडून मिळालेल्या माहितीनुसार हेरोदाने काळजीपूर्वक येशूच्या जन्माच्या वेळेचा अंदाज काढला होता. (मत्तय २:१६) या लोकांच्या येण्यामुळे ज्या सर्व पीडा आल्या त्यांवरून आपण असा उचित निष्कर्ष काढू शकतो, की या लोकांनी पाहिलेला तारा आणि ‘यहुद्यांच्या राजाच्या जन्माची’ खबर ही देवाचा शत्रू सैतान याच्याकडून होती; त्याला येशूला ठार मारायचे होते.—मत्तय २:१, २.