व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“देवाजवळ या”

“देवाजवळ या”

“देवाजवळ या”

“देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.”याकोब ४:८.

१, २. (अ) मनुष्य सहसा कोणता दावा करतो? (ब) याकोबाने काय उपदेश दिला आणि हा उपदेश देण्याची काय गरज होती?

“देव आम्हासोबत आहे.” अनेक राष्ट्रीय प्रतिकांवर व सैनिकांच्या गणवेषांवरही हे शब्द आढळतात. “आमचा भरवसा देवावर आहे” हे शब्द आधुनिक चलनाच्या असंख्य शिक्क्यांवर व नोटांवर लिहिलेले आढळतात. मनुष्य सहसा देवासोबत जवळचा नातेसंबंध असल्याचा दावा करतो. पण असा हा नातेसंबंध खरोखर असण्यासाठी केवळ त्याविषयी बोलणे किंवा घोषवाक्ये लिहिणे पुरेसे नाही असे तुम्हालाही वाटत नाही का?

बायबल सांगते की मनुष्य देवासोबत नातेसंबंध जोडू शकतो. पण याकरता प्रयत्न करण्याची गरज आहे. पहिल्या शतकातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनाही यहोवा देवासोबत आपला नातेसंबंध दृढ करण्याकरता प्रयत्न करण्याची गरज होती. ख्रिस्ती मंडळीवर देखरेख करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्‍या याकोबाला मंडळीतल्या काही लोकांना दैहिक प्रवृत्ती व आध्यात्मिक अशुद्धतेविषयी ताकीद देण्याची गरज पडली. या संदर्भात त्यांना मार्गदर्शन देताना त्याने, “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल” असा आग्रहपूर्वक उपदेश त्यांना दिला. (याकोब ४:१-१२) ‘जवळ या’ असे याकोबाने कोणत्या अर्थाने लिहिले?

३, ४. (अ) “देवाजवळ या” हे शब्द वाचून याकोबाच्या पहिल्या शतकातल्या वाचकांना कशाची आठवण झाली असावी? (ब) देवाजवळ येणे शक्य आहे असे आपण खात्रीने का म्हणू शकतो?

याकोबाने वापरलेली ही संज्ञा त्याच्या बहुतेक वाचकांच्या परिचयाची होती. मोशेच्या नियमशास्त्रात याजकांना लोकांच्या वतीने ‘परमेश्‍वराकडे येण्याकरता’ काय करावे यासंबंधात विशिष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. (निर्गम १९:२२) त्याअर्थी याकोबाच्या वाचकांनी हे शब्द वाचले तेव्हा त्यांना या गोष्टीची आठवण झाली असावी की ते यहोवाला गृहीत धरू शकत नव्हते. तो या विश्‍वातल्या सर्वश्रेष्ठ पदावर आहे.

दुसरीकडे पाहता, एका बायबल अभ्यासकाने सांगितल्याप्रमाणे “[याकोब ४:८] येथील उपदेशातून अत्यंत आशावादी अशी भावना व्यक्‍त होते.” याकोबाला माहीत होते की यहोवा नेहमीच अपरिपूर्ण मानवांना आपल्याजवळ येण्याचे प्रेमळ आमंत्रण देत आला आहे. (२ इतिहास १५:२) येशूच्या बलिदानामुळे अधिक परिपूर्णरितीने यहोवाजवळ जाण्याचा मार्ग मोकळा झाला. (इफिसकर ३:१०-१२) आज देवाकडे येण्याचा मार्ग लाखो लोकांकरता खुला आहे! पण आपण या अद्‌भुत सुसंधीचा कशाप्रकारे फायदा करून घेऊ शकतो? आपण अशा तीन मार्गांविषयी विचार करू या ज्यांद्वारे आपण यहोवा देवाच्या जवळ येऊ शकतो.

देवाविषयी ‘ज्ञान घेत’ राहणे

५, ६. देवाचे ‘ज्ञान घेण्यात’ काय समाविष्ट आहे हे लहानग्या शमुवेलाच्या उदाहरणावरून कशाप्रकारे स्पष्ट होते?

योहान १७:३ (NW) या वचनानुसार येशूने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुझे व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताचे त्यांनी ज्ञान घ्यावे.” अनेक भाषांतरांत या वचनाचा अनुवाद नवे जग भाषांतर (इंग्रजी) यापेक्षा वेगळ्याप्रकारे करण्यात आला आहे. “ज्ञान घ्यावे” असे म्हणण्याऐवजी त्यात केवळ देवाला “ओळखावे” किंवा देवाला “ओळखणे” हे क्रियापद वापरले आहे. पण बऱ्‍याच विद्वानांच्या मते मूळ ग्रीक भाषेत वापरलेल्या शब्दात यापेक्षा अधिक अर्थ सामावलेला आहे. त्या शब्दांतून एका चालू प्रक्रियेचा अर्थ सूचित होतो, अशी प्रक्रिया जिची दुसऱ्‍या व्यक्‍तीशी घनिष्ट संबंध निर्माण होण्यात परिणती होऊ शकते.

देवाची जवळून ओळख घडण्याची कल्पना येशूच्या काळात काही नवीन नव्हती. उदाहरणार्थ, इब्री शास्त्रवचनांत आपण असे वाचतो, की शमुवेल लहान असताना, ‘अद्यापि त्यास परमेश्‍वराची ओळख झाली नव्हती.’ (१ शमुवेल ३:७) याचा अर्थ शमुवेलला त्याच्या देवाविषयी फार कमी माहिती होती असा होतो का? नाही. निश्‍चितच त्याच्या आईवडिलांनी त्याला बरेच काही शिकवले असेल. पण या वचनात वापरलेल्या इब्री शब्दाचा “सर्वात जवळच्या माणसांच्या संदर्भात वापर” केला जाऊ शकतो. त्याअर्थी, शमुवेलाला यहोवाची अगदी जवळून ओळख झालेली नव्हती; ती नंतर, म्हणजे तो यहोवाच्या प्रवक्‍त्‌याच्या भूमिकेत सेवा करू लागल्यानंतर घडणार होती. शमुवेल मोठा होऊ लागला तसतशी त्याला खऱ्‍या अर्थाने यहोवाची ओळख घडली आणि अशारितीने त्याचा देवासोबत एक घनिष्ठ वैयक्‍तिक नातेसंबंध जुळला.—१ शमुवेल ३:१९, २०.

७, ८. (अ) बायबलच्या गहन शिकवणुकींच्या विषयी आपल्याला भीती का वाटू नये? (ब) देवाच्या वचनातील कोणती काही गहन सत्ये आहेत ज्यांविषयी अभ्यास करणे श्रेयस्कर ठरेल?

यहोवाची जवळून ओळख घडण्याइतपत तुम्ही त्याच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहात का? यासाठी तुम्हाला देवाने पुरवलेल्या आध्यात्मिक अन्‍नाची ‘इच्छा धरावी’ लागेल. (१ पेत्र २:२) केवळ मूलभूत गोष्टींचे ज्ञान मिळवून समाधान मानू नका. बायबलमध्ये असलेल्या गहन शिकवणुकी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. (इब्री लोकांस ५:१२-१४) या शिकवणुकी खूप कठीण असतील अशी तुम्हाला भीती वाटते का? असल्यास, यहोवा आपला “महान शिक्षक” आहे हे विसरू नका. (यशया ३०:२०) अपरिपूर्ण मानवी बुद्धीला ग्रहण करता येईल अशाप्रकारे ही गहन सत्ये प्रकट कशी करावी हे तो जाणतो. आणि तो जे शिकवतो ते समजून घेण्याचा तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करता तेव्हा तो तुम्हाला निश्‍चितच आशीर्वादित करेल.—स्तोत्र २५:४.

‘देवाच्या काही गहन गोष्टींविषयी’ आपल्याला कितपत ज्ञान आहे ते तपासून पाहायला तुम्हाला आवडेल का? (१ करिंथकर २:१०) थिऑलॉजीचे अभ्यासक आणि पाळक ज्यांविषयी तर्कवितर्क करतात असे कंटाळवाणे विषय हे आहेत असे समजू नका. उलट हे अतिशय समर्पक असे सिद्धान्त आहेत जे आपल्याला आपल्या प्रेमळ पित्याच्या बुद्धीची व अंतःकरणातील भावनांची ओळख घडवतात. उदाहरणार्थ, खंडणी, “[पवित्र] गूढ,” आणि यहोवाने आपल्या लोकांना आशीर्वादित करण्याकरता व आपले उद्देश पूर्ण करण्याकरता कायम केलेले विविध करार—असे अनेक विषय वैयक्‍तिक संशोधन आणि अभ्यासाकरता अतिशय आनंददायक आणि समाधानकारक विषय आहेत.—१ करिंथकर २:७.

९, १०. (अ) गर्विष्ठ होण्यात कोणता धोका आहे आणि ही प्रवृत्ती टाळण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? (ब) यहोवाच्या ज्ञानाच्या संदर्भात, आपण नेहमीच नम्र वृत्ती बाळगण्याचा का प्रयत्न करावा?

गहन आध्यात्मिक विषयांवरील तुमचे ज्ञान वाढत असताना ज्ञानासोबत जी दुसरी एक गोष्ट निर्माण होऊ शकते तिच्याविषयी सावध असा, ती म्हणजे गर्व. (१ करिंथकर ८:१) गर्व धोकेदायक आहे कारण तो मनुष्याला देवापासून दुरावतो. (नीतिसूत्रे १६:५; याकोब ४:६) कोणत्याही मनुष्याला खरे तर त्याच्याजवळ असलेल्या ज्ञानाविषयी फुशारकी मारण्याचे कारण नाही. उदाहरणार्थ, मनुष्याच्या अत्याधुनिक वैज्ञानिक प्रगतीविषयी विश्‍लेषण करणाऱ्‍या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत काय म्हटले आहे हे लक्षात घ्या: “आपल्याला जितके अधिक ज्ञान प्राप्त होते तितकीच आपल्याला अधिक प्रकर्षाने जाणीव होते की आपल्याजवळ किती अल्प ज्ञान आहे. . . . अजून आपल्याला किती शिकायचे आहे याचा विचार केल्यास, आजपर्यंत आपण जे काही शिकलो ते नगण्य वाटू लागते.” हे प्रामाणिक विधान वाचून आनंद वाटतो. पण सर्वश्रेष्ठ ज्ञानाचा, अर्थात यहोवा देवाच्या ज्ञानाचा विचार केल्यास आपण आणखीनच नम्रता बाळगण्याची गरज आहे. का?

१० बायबलमध्ये यहोवाबद्दल केलेली काही विधाने लक्षात घ्या. “तुझे विचार फार गहन आहेत.” (स्तोत्र ९२:५) “[यहोवाची] बुद्धि अमर्याद आहे.” (स्तोत्र १४७:५) “[यहोवाची] बुद्धि अगम्य आहे.” (यशया ४०:२८) “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे!” (रोमकर ११:३३) स्पष्टपणे, यहोवाबद्दलचे पूर्ण ज्ञान आपल्याला कधीही मिळणार नाही. (उपदेशक ३:११) त्याने आपल्याला अनेक अद्‌भुत गोष्टींची माहिती दिली आहे, पण तरीसुद्धा आपल्यासमोर सर्वकाळ ज्ञानाचा अमर्याद साठा असेल ज्यातून आपण अधिकाधिक ज्ञान आत्मसात करू शकू. हा विचार रोमांचक पण त्याच वेळेस आपल्याला नमवणारा नाही का? तर मग ज्ञान घेत असताना आपण त्या ज्ञानाचा उपयोग स्वतःला इतरांपेक्षा वरचढ दाखवण्याकरता नव्हे, तर यहोवाच्या अधिकाधिक जवळ येण्याकरता आणि इतरांनाही असे करण्यास मदत करण्याकरता करू या.—मत्तय २३:१२; लूक ९:४८.

यहोवाबद्दल वाटणारे प्रेम व्यक्‍त करा

११, १२. (अ) यहोवाविषयी आपण जे ज्ञान घेतो त्याचा आपल्यावर कसा परिणाम झाला पाहिजे? (ब) एका व्यक्‍तीचे देवावर खरे प्रेम आहे हे कशावरून ठरवता येते?

११ प्रेषित पौलाने ज्ञान व प्रीती यांत संबंध असल्याचे दाखवले. त्याने लिहिले: “माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीति ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी.” (फिलिप्पैकर १:९) गर्वाने फुगण्याऐवजी यहोवाविषयी आणि त्याच्या उद्देशांविषयी आपण शिकलेल्या प्रत्येक सत्याने आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल आपल्याला वाटणारे प्रेम वाढत गेले पाहिजे.

१२ अर्थात देवावर प्रेम असल्याचा दावा करणारे बरेच लोक प्रत्यक्षात असे करत नाहीत. कदाचित त्यांच्या मनात उचंबळून येणाऱ्‍या भावना प्रांजळ असतीलही. या भावना अचूक ज्ञानावर आधारित असल्यास त्या योग्य, नव्हे प्रशंसनीय देखील आहेत. पण केवळ या भावना असल्या म्हणजे एका व्यक्‍तीचे देवावर खरे प्रेम असल्याचे सिद्ध होत नाही. का नाही? देवाचे वचन खऱ्‍या प्रेमाची अशी व्याख्या देते: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय.” (१ योहान ५:३) त्याअर्थी, यहोवावर असलेले प्रेम आज्ञापालनातून व्यक्‍त होते.

१३. देवाचे भय आपल्याला त्याच्याविषयी प्रीती व्यक्‍त करण्यास कशाप्रकारे मदत करेल?

१३ देवाचे भय आपल्याला त्याच्या आज्ञांचे पालन करण्यास मदत करेल. आपण यहोवाबद्दल ज्ञान घेतो, त्याचे अमर्याद पावित्र्य, तेज, सामर्थ्य, न्याय, बुद्धी आणि प्रीती यांविषयी शिकतो तेव्हा आपोआप त्याच्याबद्दल एक विस्मययुक्‍त आदर आपल्या मनात निर्माण होतो. देवाच्या जवळ येण्याकरता त्याचे भय वाटणे अत्यावश्‍यक आहे. किंबहुना स्तोत्र २५:१४ या वचनात तर असे म्हटले आहे: “परमेश्‍वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्‍याशी असते.” जर आपण आपल्या प्रिय स्वर्गीय पित्याला दुखावण्याचे हितकारक भय बाळगले तर आपण त्याच्यासोबत एक घनिष्ट नातेसंबंध कायम करू शकू. देवाचे भय आपल्याला नीतिसूत्रे ३:६ मधील सल्ल्याचे पालन करण्यास मदत करेल: “तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” याचा काय अर्थ होतो?

१४, १५. (अ) दररोजच्या जीवनात आपल्याला कोणते निर्णय घ्यावे लागतात? (ब) निर्णय घेण्याच्या बाबतीत आपल्याला देवाचे भय वाटते हे आपण कसे दाखवू शकतो?

१४ दररोज तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात, काही महत्त्वाचे तर काही क्षुल्लक. उदाहरणार्थ, सह कर्मचाऱ्‍यांसोबत, शाळा सोबत्यांबरोबर किंवा शेजाऱ्‍यांसोबत तुम्ही कशाप्रकारचे संभाषण कराल? (लूक ६:४५) तुमच्यासमोर असलेले काम तुम्ही मेहनतीने पार पाडाल का की कमीत कमी प्रयत्न करून कशीतरी चालढकल कराल? (कलस्सैकर ३:२३) ज्यांना यहोवाबद्दल जराही प्रेम नाही अशा लोकांशी तुम्ही सहवास वाढवाल का, की आध्यात्मिक प्रवृत्तीच्या लोकांशी तुमची नाती अधिक मजबूत करण्याच्या दिशेने प्रयत्न कराल? (नीतिसूत्रे १३:२०) देवाच्या राज्याच्या हिताकरता तुम्ही लहानसहान मार्गांनी का होईना, पण काही कराल का? (मत्तय ६:३३) जर वर उल्लेखलेल्या शास्त्रवचनीय तत्त्वांच्या आधारावर तुम्ही दैनंदिन निर्णय घेत असाल तर मग खरोखरच तुम्ही “आपल्या सर्व मार्गांत” यहोवाचा आदर करत आहात असे म्हणता येईल.

१५ एका अर्थाने, प्रत्येक निर्णय घेताना आपण आधी हा विचार केला पाहिजे: ‘यहोवाची माझ्याकडून काय अपेक्षा असेल? कोणता मार्ग निवडल्यास त्याला सर्वात जास्त संतोष वाटेल?’ (नीतिसूत्रे २७:११) अशाप्रकारे देवाचे भय बाळगणे हा यहोवाबद्दलची प्रीती व्यक्‍त करण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. देवाचे भय आपल्याला आध्यात्मिक, नैतिक आणि शारीरिकदृष्ट्या शुद्ध, निष्कलंक राहण्यास प्रवृत्त करेल. याकोबाने “देवाजवळ या” असे ज्या वचनात प्रोत्साहन दिले त्यातच त्याने पुढे असेही म्हटले: “अहो पापी जनहो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा.”—याकोब ४:८.

१६. यहोवाला काही देऊन आपण कधीच काय करू शकत नाही पण असे करताना आपण नेहमी काय साध्य करू शकतो?

१६ अर्थात, यहोवाबद्दल प्रेम व्यक्‍त करण्यात केवळ वाईटापासून दूर राहणेच समाविष्ट नाही. प्रीती आपल्याला चांगले ते करण्याची देखील प्रेरणा देते. उदाहरणार्थ, यहोवाच्या अमर्याद उदारतेला आपण कसा प्रतिसाद देतो? याकोबाने लिहिले: “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, [कारण] ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.” (याकोब १:१७) यहोवाला काही वस्तू देऊन आपण त्याच्या संपत्तीत भर पाडू शकत नाही हे तर स्पष्टच आहे. अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू व साधनसंपत्ती त्याच्याच मालकीची आहे. (स्तोत्र ५०:१२) आणि जेव्हा आपण यहोवाच्या कार्याकरता आपला वेळ व शक्‍ती खर्च करतो तेव्हा देखील आपण त्याच्यावर उपकार करत नाही. देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यास आपण नकार दिला, तर तो धोंड्यांनाही घोषणा करण्यास लावू शकतो! मग यहोवाला आपण आपली संपत्ती, आपला वेळ व शक्‍ती का दिली पाहिजे? कारण असे केल्यामुळे आपण त्याच्यावर पूर्ण मनाने, जिवाने, बुद्धीने आणि शक्‍तीने प्रेम करतो हे प्रदर्शित करतो.—मार्क १२:२९, ३०.

१७. कोणती गोष्ट आपल्याला यहोवाला आनंदाने देण्यास प्रवृत्त करेल?

१७ यहोवाला काही देताना आपण ते आनंदाने दिले पाहिजे कारण “संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” (२ करिंथकर ९:७) अनुवाद १६:१७ यात दिलेले तत्त्व आपल्याला आनंदाने देण्यास मदत करू शकते. “तुझा देव परमेश्‍वर ह्‍याने आशीर्वाद दिला असेल त्या मानाने प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावे.” यहोवाने किती उदारतेने आपल्याला सर्व काही दिले आहे याचा आपण विचार करतो तेव्हा साहजिकच आपल्यालाही त्याला मुक्‍तहस्ते देण्याची इच्छा होते. आपल्या लहान मुलाने दिलेल्या लहानशा भेटवस्तूचेही आईवडिलांना मनापासून कौतुक वाटते त्याचप्रमाणे आपण यहोवाला उदारतेने देतो तेव्हा त्याला मनापासून संतोष वाटतो. अशाप्रकारे आपले प्रेम व्यक्‍त केल्याने आपण यहोवाच्या जवळ येऊ शकतो.

प्रार्थनेच्या माध्यमाने जवळीक निर्माण करा

१८. आपल्या प्रार्थनांची गुणवत्ता वाढवण्याविषयी विचार करणे का महत्त्वाचे आहे?

१८ वैयक्‍तिक प्रार्थनेचे क्षण आपल्याला आपल्या स्वर्गीय पित्याशी मनातल्या, गूजगोष्टी करण्याची संधी देतात. (फिलिप्पैकर ४:६) प्रार्थना हा देवाजवळ येण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग असल्यामुळे आपण आपल्या प्रार्थनांची गुणवत्ता तपासून पाहिली पाहिजे. अर्थात आपल्या प्रार्थना उत्तम वक्‍तृत्वाच्या आणि सुव्यवस्थित मांडणीच्या बाबतीत उल्लेखनीय असाव्यात असे नाही, पण आपण जे काही बोलतो ते आपल्या अंतःकरणातून आले पाहिजे. मग आपल्या प्रार्थनांची गुणवत्ता आपण कशी वाढवू शकतो?

१९, २०. प्रार्थना करण्याआधी मनन करणे का महत्त्वाचे आहे आणि कोणत्या विषयांवर आपण मनन करू शकतो?

१९ प्रार्थना करण्याआधी काहीवेळ मनन करण्याची आपण सवय लावू शकतो. जर आपण असे केले तर आपण नेहमीचेच पाठ झालेले शब्द किंवा लगेच आठवणीत येणारे परिचयाचे शब्द पुन्हा पुन्हा प्रार्थनेत म्हणणार नाही तर विशिष्ट मुद्द्‌यांवर आणि अर्थपूर्ण रितीने प्रार्थना करू शकू. (नीतिसूत्रे १५:२८, २९) कदाचित, येशूने शिकवलेल्या आदर्श प्रार्थनेतील काही मुद्द्‌यांवर विचार करणे आणि मग त्यांचा आपल्या परिस्थितीनुसार कसा अवलंब करता येईल यावर विचार करणे सहायक ठरू शकेल. (मत्तय ६:९-१३) उदाहरणार्थ, पृथ्वीवर यहोवाच्या इच्छेप्रमाणे व्हावे म्हणून आपल्याला कोणती लहानशी भूमिका पार पाडायला आवडेल याचा आपण विचार करू शकतो. यहोवाच्या इच्छेच्या पूर्तीकरता आपल्याकडून होईल तितके करण्याची आपली इच्छा असल्याचे आपण त्याच्याजवळ व्यक्‍त करू शकतो का? आपल्याला आपल्या भौतिक गरजांविषयी काळजी वाटते का? कोणत्या पापांची आपण क्षमा मागू इच्छितो आणि कोणाच्याप्रती अधिक क्षमाशील वृत्ती बाळगण्याची गरज आपल्याला जाणवते? आपल्यासमोर कोणते मोह आहेत आणि त्यांना तोंड देण्याकरता आपल्याला यहोवाच्या संरक्षणाची किती निकडीची गरज आहे याची आपल्याला जाणीव आहे का?

२० शिवाय, आपण इतर लोकांविषयी विचार करू शकतो ज्यांना यहोवाच्या मदतीची विशेष गरज आहे. (२ करिंथकर १:११) तसेच, आभार मानण्यासही आपण विसरू नये. जर आपण थांबून थोडा विचार केला तर दररोज यहोवाच्या अपार कृपेविषयी त्याची उपकारस्तुती करण्याची अनेक कारणे आपल्याला सापडतील. (अनुवाद ८:१०; लूक १०:२१) असे केल्यामुळे एक अतिरिक्‍त फायदा आपल्याला मिळतो, तो असा की जीवनाकडे आपण अधिक आशावादी, आभारयुक्‍त दृष्टीकोनाने पाहू लागतो.

२१. यहोवाला प्रार्थना करताना कोणत्या शास्त्रवचनीय उदाहरणांचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला मदत मिळेल?

२१ अभ्यास केल्यामुळेही आपल्या प्रार्थनांचा दर्जा वाढतो. देवाच्या वचनात विश्‍वासू स्त्री पुरुषांनी केलेल्या उल्लेखनीय प्रार्थना नमूद आहेत. उदाहरणार्थ, आपल्यासमोर एखादे मोठे आव्हान असल्यास व त्यामुळे आपल्या स्वतःवर आणि आपल्या प्रियजनांवर कसा परिणाम होईल याविषयी आपल्याला चिंता वाटत असल्यास आपण याकोबाची प्रार्थना वाचू शकतो जी त्याने शत्रूत्वाच्या भावना बाळगणाऱ्‍या आपल्या भावाशी, एसावशी भेट होण्यापूर्वी केली होती. (उत्पत्ति ३२:९-१२) किंवा दहा लाख कुशी लोकांनी देवाच्या लोकांवर आक्रमण केले असता, राजा आसा याने केलेली प्रार्थना आपण विचारात घेऊ शकतो. (२ इतिहास १४:११, १२) अथवा एखाद्या समस्येमुळे यहोवाच्या श्रेष्ठ नावावर कलंक येईल अशी आपल्याला भीती वाटत असल्यास कर्मेल पर्वतावर बआलाच्या उपासकांसमोर एलीयाने केलेल्या किंवा जेरूसलेमच्या शोचनीय अवस्थेविषयी नहेम्याने केलेल्या प्रार्थनेचा आपण विचार करू शकतो. (१ राजे १८:३६, ३७; नहेम्या १:४-११) अशा प्रार्थना वाचून त्यांवर मनन केल्यामुळे आपला विश्‍वास बळकट होतो आणि आपल्याला हताश करणाऱ्‍या समस्या यहोवाजवळ कशा व्यक्‍त कराव्या हे देखील आपल्याला सुचण्यास मदत होते.

२२. २००३ सालाकरता वार्षिक वचन कोणते आहे आणि या संपूर्ण वर्षभरात आपण स्वतःला वेळोवेळी काय विचारू शकतो?

२२ निश्‍चितच, “देवाजवळ या” या याकोबाने दिलेल्या सल्ल्याचे पालन करण्यापेक्षा मोठा सन्मान, यापेक्षा मोठे ध्येय असूच शकत नाही. (याकोब ४:८) देवाविषयीच्या ज्ञानात प्रगती करण्याद्वारे, त्याबद्दल प्रीती व्यक्‍त करण्याचा प्रयत्न करण्याद्वारे आणि प्रार्थनांच्या माध्यमाने त्याच्याशी जवळीक वाढवण्याद्वारे देवाजवळ येण्याचा प्रयत्न आपण करत राहू या. सबंध २००३ सालादरम्यान आपले वार्षिक वचन असलेल्या याकोब ४:८ या वचनाला आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण खरोखर यहोवाच्याजवळ येत आहोत किंवा नाही याचे परीक्षण आपण करत राहू या. पण या वचनाच्या उर्वरित भागाविषयी काय? यहोवा कोणत्या अर्थाने “तुम्हाजवळ येईल,” आणि यामुळे तुम्हाला कोणते आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात? पुढच्या लेखात याविषयी चर्चा केली जाईल.

तुम्हाला आठवते का?

• यहोवाच्या जवळ येणे हा गांभिर्याने विचार करावयाचा विषय का आहे?

• यहोवाविषयी ज्ञान घेण्याच्या संदर्भात आपण कोणती काही ध्येये बाळगू शकतो?

• आपल्याला यहोवाविषयी मनःपूर्वक प्रेम आहे हे आपण कसे प्रदर्शित करू शकतो?

• आपण यहोवासोबत प्रार्थनेतून अधिक घनिष्ट संबंध कसा निर्माण करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]

२००३ सालाचे वार्षिक वचन: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.”—याकोब ४:८.

[८, ९ पानांवरील चित्र]

शमुवेल मोठा होत गेला तसतसा त्याचा यहोवासोबत एक घनिष्ट नातेसंबंध जुळला

[१२ पानांवरील चित्र]

कर्मेल पर्वतावर एलीया संदेष्ट्याने केलेली प्रार्थना आपल्याकरता एक उत्तम उदाहरण आहे