व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“जागृत राहा”!

“जागृत राहा”!

“जागृत राहा”!

“जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.”—मार्क १३:३७.

१, २. (अ) आपल्या संपत्तीचे रक्षण करण्याविषयी एका माणसाला कोणता धडा शिकायला मिळाला? (ब) चोराविषयी येशूने दिलेल्या उदाहरणावरून आपल्याला जागृत राहण्यासंबंधी काय कळून येते?

ख्वान आपल्या मौल्यवान वस्तू घरातच ठेवत असे. पलंगाखाली, जे त्याच्या मते घरातले सर्वात सुरक्षित स्थान होते, तेथे तो त्या ठेवत असे. पण एका रात्री तो व त्याची पत्नी झोपलेली होती तेव्हा एक चोर त्यांच्या बेडरूममध्ये घुसला. त्या चोराला नेमके कोठे जावे हे जणू माहीत होते. त्याने हळूच पलंगाखालून एकेक मोलवान वस्तू काढली तसेच पलंगाशेजारच्या टेबलात ख्वानने ठेवलेले पैसे देखील त्याने काढून घेतले. दुसऱ्‍या दिवशी ख्वानला आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या दुर्घटनेने दुःखी झालेल्या ख्वानला एक धडा मिळाला होता, असा धडा जो कायमचा त्याच्या लक्षात राहील: झोपलेला माणूस आपल्या संपत्तीची रक्षा करू शकत नाही.

आध्यात्मिकदृष्ट्या देखील हे खरे आहे. आपण झोपी गेलो तर आपल्या आशेचे आणि विश्‍वासाचे रक्षण आपण करू शकत नाही. म्हणूनच, पौलाने असे निक्षून सांगितले: “आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे.” (१ थेस्सलनीकाकर ५:६) जागृत राहणे किती महत्त्वाचे आहे हे दाखवण्याकरता येशूने एका चोराचे उदाहरण दिले. तो न्याय करण्यासाठी येईल त्याआधी घडणाऱ्‍या घटनांचे वर्णन केल्यानंतर त्याने अशी ताकीद दिली: “म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही. आणखी हे समजा की, कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता, आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीहि सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” (मत्तय २४:४२-४४) चोर कधी सांगून येत नाही. उलट, कोणीही अपेक्षा करणार नाही अशा वेळी येण्याचा तो प्रयत्न करतो. त्याचप्रकारे येशूने म्हटल्याप्रमाणे, या व्यवस्थीकरणाचा अंत ‘आपल्याला कल्पना नाही अशा घटकेस येईल.’

“सावध असा, विश्‍वासात स्थिर राहा”

३. लग्नाला गेलेल्या धन्याची वाट पाहणाऱ्‍या दासांचा दृष्टान्त वापरून येशूने जागृत राहण्याचे महत्त्व कशाप्रकारे स्पष्ट केले?

लूक शुभवर्तमानात लिहिल्याप्रमाणे, येशूने ख्रिश्‍चनांची तुलना लग्नाला गेलेल्या आपल्या धन्याची वाट पाहात असलेल्या दासांशी केली. धनी परत येईल तेव्हा जागृत व त्याचे स्वागत करण्यास तयार राहता यावे म्हणून त्यांना सतर्क राहण्याची गरज आहे. त्याचप्रकारे येशूने म्हटले: “तुम्हास वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” (लूक १२:४०) यहोवाची बऱ्‍याच वर्षांपासून सेवा करत असलेल्या काहींना कदाचित आपण राहात असलेल्या काळाच्या तातडीची तितकी जाणीव आता राहिलेली नसेल. ते कदाचित अशाही निष्कर्षावर येऊ शकतात की अंत येण्यास अजूनही बराच काळ आहे. पण अशा विचारसरणीमुळे आपले लक्ष आध्यात्मिक गोष्टींवरून विचलित होऊन आपण भौतिक ध्येयांमागे लागण्याची शक्यता आहे. यामुळे आपण आध्यात्मिकरित्या सुस्त होऊ शकतो.—लूक ८:१४; २१:३४, ३५.

४. कशाविषयी खात्री बाळगल्यामुळे आपल्याला जागृत राहण्याची प्रेरणा मिळेल आणि येशूने हे कशाप्रकारे स्पष्ट केले?

येशूच्या या दृष्टान्तातून आपण आणखी कोणता धडा शिकू शकतो. दासांना धनी नेमक्या कोणत्या घटकेस परत येईल हे माहीत नसले तरीही तो त्या विशिष्ट रात्री परत येणार आहे हे मात्र त्यांना माहीत होते असे दिसते. तो दुसऱ्‍या कोणत्यातरी रात्री पण परतू शकतो असे त्यांना वाटले असते तर साहजिकच सबंध रात्रभर जागृत राहणे त्यांना कठीण गेले असते. पण तसे नव्हते; तो कोणत्या रात्री परतणार हे त्यांना ठाऊक होते आणि यामुळेच त्यांना जागृत राहण्याचे विशेष प्रोत्साहन मिळाले. त्याच प्रकारे, बायबलच्या भविष्यवाण्या स्पष्टपणे दाखवून देतात की आपण आज शेवटल्या काळात जगत आहोत; पण अंत कोणत्या दिवशी किंवा घटकेला येईल हे मात्र आपल्याला सांगितलेले नाही. (मत्तय २४:३६) अंत येणार हा विश्‍वास असल्यास आपल्याला जागृत राहण्यात मदत जरूर होते पण यहोवाचा दिवस खरोखरच जवळ आहे याची आपल्याला मनात खात्री वाटत असल्यास आपल्याला सतत जागृत राहण्याची जोरदार प्रेरणा मिळेल.—सफन्या १:१४.

५. “सावध असा” या पौलाच्या आग्रही सल्ल्यास आपण कशाप्रकारे प्रतिसाद देऊ शकतो?

करिंथ येथील ख्रिश्‍चनांना लिहिताना पौलाने म्हटले: “सावध असा, विश्‍वासात स्थिर राहा.” (१ करिंथकर १६:१३) होय, जागृत राहण्याचा संबंध ख्रिस्ती विश्‍वासात स्थिर राहण्याशी आहे. आपण कशाप्रकारे जागृत राहू शकतो? देवाच्या वचनाचे अधिक गहन ज्ञान आत्मसात करण्याद्वारे. (२ तीमथ्य ३:१४, १५) वैयक्‍तिक अभ्यासाच्या व सभांना नियमित उपस्थित राहण्याच्या उत्तम सवयी आपल्याला असल्यास आपला विश्‍वास अधिक मजबूत होऊ शकतो आणि यहोवाचा दिवस नेहमी डोळ्यापुढे ठेवणे हा आपल्या विश्‍वासाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. याकरता, आपण या व्यवस्थीकरणाच्या अंताच्या अगदी जवळ आलो आहोत हे दाखवणाऱ्‍या शास्त्रवचनीय पुराव्याची वेळोवेळी उजळणी करत राहिल्यास त्या येणाऱ्‍या नाशाविषयीची महत्त्वाची सत्ये कधीही नजरेआड न होऊ देण्यास आपल्याला मदत मिळेल. * तसेच बायबलमधील भविष्यवाण्यांची पूर्णता करणाऱ्‍या जागतिक घटनांकडे लक्ष देणेही महत्त्वाचे आहे. जर्मनी येथे राहणाऱ्‍या एका बांधवाने असे लिहिले: “मी जेव्हा जेव्हा बातम्या पाहतो—लढाया, भूकंप, हिंसाचार आणि पृथ्वीचे प्रदूषण याविषयी ऐकतो तेव्हा तेव्हा मला अंत किती जवळ आला आहे याची अधिकच प्रकर्षाने आठवण होते.”

६. काळपरत्वे आध्यात्मिक सावधगिरी कमी होत जाण्याची प्रवृत्ती येशूने कोणत्या उदाहरणावरून स्पष्ट केली?

मार्कच्या शुभवर्तमानातील १३ व्या अध्यायात येशूने आपल्या अनुयायांना सावध राहण्यास सांगितल्याचा आणखी एक अहवाल वाचायला मिळतो. या अध्यायानुसार, येशू त्यांच्या परिस्थितीची तुलना परदेशी गेलेल्या धन्याच्या परतण्याची वाट पाहात असलेल्या द्वारपाळाशी करतो. धनी कोणत्या घटकेस परत येईल हे त्या द्वारपाळास माहीत नव्हते. त्याला केवळ जागृत राहण्याची आज्ञा देण्यात आली होती. धनी जेव्हा परतू शकतो अशा, रात्रीच्या चार वेगवेगळ्या प्रहरींचा येशूने उल्लेख केला. चौथा प्रहर पहाटे तीन वाजेपासून सूर्योदयापर्यंत असे. या शेवटल्या प्रहरात द्वारपाळाला सहज डुलकी लागण्याची शक्यता होती. सहसा, सैनिकही सूर्योदयाआधीचा हा प्रहर बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करण्याकरता सर्वात उत्तम समजतात. त्याचप्रकारे शेवटल्या काळातील या शेवटल्या प्रहरात, सबंध जग आध्यात्मिक अर्थाने निश्‍चिंत झोपलेले असताना आपल्याला कदाचित जागृत राहण्याकरता सर्वात जास्त प्रयास करावा लागू शकतो. (रोमकर १३:११, १२) म्हणूनच येशूने या दृष्टान्तात वारंवार असे आर्जवून सांगितले: “सावध असा, जागृत राहा . . . म्हणून जागृत राहा . . . जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.”—मार्क १३:३२-३७.

७. कोणता खरोखरचा धोका आपल्यासमोर आहे आणि हे लक्षात घेता आपल्याला बायबलमध्ये कोणते प्रोत्साहन वारंवार वाचण्यास मिळते?

येशूने आपल्या सेवाकार्यादरम्यान आणि पुनरुत्थानानंतर कित्येकदा सावध राहण्याचे प्रोत्साहन दिले. किंबहुना, ज्या ज्या ठिकाणी शास्त्रवचनांत या व्यवस्थीकरणाच्या अंताविषयी उल्लेख करण्यात आला आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला जागृत राहण्याची किंवा सावध राहण्याचीही सूचना दिलेली आढळते. * (लूक १२:३८, ४०; प्रकटीकरण ३:२; १६:१४-१६) यावरून हेच स्पष्ट होते की आध्यात्मिक सुस्ती किती धोकेदायक असू शकते. या सूचनांची आपल्या सर्वांना गरज आहे!—१ करिंथकर १०:१२; १ थेस्सलनीकाकर ५:२,.

जागे न राहू शकलेले तीन प्रेषित

८. गेथशेमाने बागेत येशूने जागे राहण्याची विनंती केल्यावर त्याच्या तीन प्रेषितांनी काय केले?

जागृत राहण्याकरता केवळ प्रामाणिक हेतू असणे पुरेसे नाही. हे आपल्याला पेत्र, याकोब व योहान यांच्या उदाहरणावरून पाहायला मिळते. हे तीन आध्यात्मिक पुरुष होते, ज्यांनी एकनिष्ठपणे येशूला साथ दिली होती आणि त्याच्यावर त्यांचे मनःपूर्वक प्रेम होते. पण सा.यु. ३३ सालच्या निसान १४ तारखेच्या रात्री ते जागे राहू शकले नाही. माडीवरच्या खोलीत वल्हांडण सण साजरा केल्यानंतर तेथून बाहेर पडून येशूसोबत हे तीन प्रेषित गेथशेमाने बागेत आले. येथे येशूने त्यांना म्हटले: “माझा जीव मरणप्राय, अति खिन्‍न झाला आहे, तुम्ही येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.” (मत्तय २६:३८) तीन वेळा येशूने आपल्या स्वर्गीय पित्याला कळकळीने प्रार्थना केली आणि तिन्ही वेळा आपल्या या मित्रांकडे परतल्यावर येशूला ते झोपलेलेच आढळले.—मत्तय २६:४०, ४३, ४५.

९. कदाचित कशामुळे प्रेषितांना झोप लागली असावी?

या विश्‍वासू माणसांनी त्या रात्री येशूची घोर निराशा का केली? शारीरिक थकवा हे यामागचे कारण होते. बराच उशीर झालेला होता, कदाचित मध्यरात्र सरून गेली असावी आणि झोपेने “त्यांचे डोळे जड झाले होते.” (मत्तय २६:४३) तरीसुद्धा येशूने म्हटले: “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्‍त आहे.”—मत्तय २६:४१.

१०, ११. (अ) थकवा असूनही येशू गेथशेमाने बागेत जागृत का राहू शकला? (ब) येशूने जागे राहण्यास सांगितल्यावर तीन प्रेषितांच्या बाबतीत जे घडले त्यावरून आपण काय शिकू शकतो?

१० त्या ऐतिहासिक रात्री येशूही थकलेला असेल यात शंका नाही. पण झोपी जाण्याऐवजी त्याने स्वतंत्रतेच्या त्या शेवटल्या काही क्षणांचा उपयोग कळकळीने प्रार्थना करण्याकरता केला. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या अनुयायांना प्रार्थना करण्याकरता असे म्हणून आग्रह केला: “तुम्ही तर होणाऱ्‍या ह्‍या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.” (लूक २१:३६; इफिसकर ६:१८) आपण येशूच्या सल्ल्याचे पालन केले आणि प्रार्थनेच्या बाबतीत त्याच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण केले तर यहोवाला केलेल्या आपल्या मनःपूर्वक याचनांमुळे आपल्याला आध्यात्मिकरित्या जागृत राहण्यास मदत मिळेल.

११ अर्थात, त्या वेळी शिष्यांना माहीत नव्हते, पण येशूला माहीत होते की काही वेळातच त्याला अटक होऊन मृत्यूदंड दिला जाईल. शेवटली व सर्वात कठीण परीक्षा म्हणजे त्याला वधस्तंभावर खिळले जाईल हेही त्याला माहीत होते. त्याने आपल्या प्रेषितांनाही या घटनांविषयी ताकीद दिली होती पण त्यांना त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला नव्हता. म्हणूनच, तो प्रार्थना करत जागृत राहिला तरीसुद्धा ते मात्र झोपी गेले. (मार्क १४:२७-३१; लूक २२:१५-१८) प्रेषितांप्रमाणेच आपले शरीर देखील अशक्‍त आहे आणि अद्याप अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांविषयी आपल्याला माहीत नाही. तरीपण, आपण राहात असलेल्या या काळाची निकड आपण विसरलो तर आध्यात्मिक अर्थाने आपणही झोपी जाण्याची शक्यता आहे. केवळ सतर्क राहिल्यानेच आपल्याला जागृत राहता येईल.

तीन अत्यावश्‍यक गुण

१२. पौलाने सावध राहण्याशी कोणत्या गुणांचा संबंध असल्याचे दाखवले?

१२ काळाची निकड आपण नेहमी आठवणीत कशी ठेवू शकतो? प्रार्थना करण्याच्या आणि यहोवाचा दिवस डोळ्यापुढे ठेवण्याच्या महत्त्वाविषयी आपण आधीच पाहिले आहे. यासोबतच पौलाने अशा तीन अत्यावश्‍यक गुणांविषयी सांगितले जे आपण विकसित केले पाहिजेत. त्याने म्हटले: “जे आपण दिवसाचे आहो त्या आपण सावध असावे, विश्‍वास व प्रीति हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे.” (१ थेस्सलनीकाकर ५:८) आध्यात्मिकरित्या जागृत राहण्यात विश्‍वास, आशा व प्रीती या गुणांची कोणती भूमिका आहे याविषयी थोडक्यात पाहू या.

१३. सतर्क राहण्यात विश्‍वासाची कोणती भूमिका आहे?

१३ यहोवा अस्तित्वात आहे आणि “त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे” यावर आपला अटळ विश्‍वास असला पाहिजे. (इब्री लोकांस ११:६) अंताविषयीच्या येशूच्या भविष्यवाणीची पहिल्या शतकातील पूर्णता आपल्या काळात मोठ्या प्रमाणात होणार असलेल्या पूर्णतेवर आपला विश्‍वास बळकट करते. आणि आपला विश्‍वास आपल्याला यहोवाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहण्यास मदत करतो कारण “[भविष्यसूचक दृष्टान्त] येईलच, त्याला, विलंब लागावयाचा नाही” याविषयी आपल्याला पूर्ण खात्री आहे.—हबक्कूक २:३.

१४. जागृत राहण्याकरता आशा कितपत महत्त्वाची आहे?

१४ आपली निश्‍चित आशा आपल्या “जिवाचा नांगर” आहे. देवाच्या अभिवचनांच्या खात्रीलायक पूर्णतेकरता आपल्याला प्रतीक्षा करावी लागली तरीसुद्धा त्यादरम्यान आपल्या मार्गात येणाऱ्‍या सर्व अडचणींना तोंड देण्यास ती आपली मदत करते. (इब्री लोकांस ६:१८, १९) मार्गरेट नावाच्या नव्वदी पार केलेल्या आत्म्याने अभिषिक्‍त भगिनी ज्यांचा ७० वर्षांपूर्वी बाप्तिस्मा झाला होता त्या कबूल करतात: “१९६३ साली माझ्या पतीला कर्करोग झाला होता व ते मरणासन्‍न स्थितीत होते तेव्हा मला खरोखर वाटले की अंत लवकर आला तर किती बरे होईल. पण आता मला जाणीव झाली आहे की तेव्हा मी केवळ माझ्या स्वार्थाचा विचार करत होते. त्या वेळी आम्ही कल्पनाही केली नव्हती की राज्याच्या कार्याचा सबंध जगात इतका प्रसार होईल. आजही अनेक ठिकाणी कार्य नुकतेच सुरू करण्यात आले आहे. यहोवाने आजवर सहनशीलता दाखवली आहे याचा मला आनंद वाटतो.” प्रेषित पौल आपल्याला आश्‍वासन देतो: “धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते; आणि आशा लाजवीत नाही.”—रोमकर ५:३-५.

१५. आपण बऱ्‍याच काळापासून प्रतीक्षा करत आहोत असे वाटत असले तरीसुद्धा प्रीती कशाप्रकारे आपल्याला प्रेरित करेल?

१५ ख्रिस्ती प्रीति एक उल्लेखनीय गुण आहे कारण आपण जे काही करतो त्यामागची प्रेरणा ही ख्रिस्ती प्रीति असते. आपले यहोवावर प्रेम असल्यामुळेच, त्याची नियुक्‍त वेळ येईपर्यंत आपण त्याची सेवा करतो. शेजाऱ्‍यांवर प्रीती असल्यामुळे आपल्याला राज्याची सुवार्ता सांगण्याची प्रेरणा प्राप्त होते; देवाची इच्छा असेपर्यंत आणि त्यासाठी त्याच लोकांच्या घरी वारंवार जावे लागले तरीसुद्धा आपण हे कार्य करण्यास तयार असतो. पौलाने लिहिल्याप्रमाणे “विश्‍वास, आशा, प्रीति ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यात प्रीति श्रेष्ठ आहे.” (१ करिंथकर १३:१३) प्रीती आपल्याला टिकून राहण्यास आणि सतत जागृत राहण्यास मदत करते. “[प्रीती] सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. प्रीति कधी अंतर देत नाही.”—१ करिंथकर १३:७, ८.

“तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा”

१६. कार्यात मंद होण्याऐवजी आपण कोणती मनोवृत्ती विकसित केली पाहिजे?

१६ आपण आज अत्यंत महत्त्वाच्या काळात जगत आहोत, ज्यात जागतिक घटना सतत आपल्याला आठवण करून देतात की आपण शेवटल्या काळाच्या शेवटल्या भागात राहात आहोत. (२ तीमथ्य ३:१-५) ही वेळ कार्यात मंद होण्याची नसून ‘आपल्याजवळ आहे ते दृढ धरून राहण्याची’ आहे. (प्रकटीकरण ३:११) ‘प्रार्थना करण्यासाठी सावध असल्यास’ आणि विश्‍वास, आशा व प्रीती हे गुण विकसित केल्यास परीक्षेची घटका येईल तेव्हा आपण तयार असू. (१ पेत्र ४:७) प्रभूच्या कार्यात आपल्याजवळ करण्यासारखे भरपूर काम आहे. सुभक्‍तीच्या कार्यांत व्यस्त राहिल्यामुळे आपल्याला पूर्णपणे जागृत राहण्यास मदत मिळेल.—२ पेत्र ३:११.

१७. (अ) कधीकधी आपल्या आशा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपण निराश का होऊ नये? (२१ पृष्ठावरील पेटी पाहा.) (ब) आपण कशाप्रकारे यहोवाचे अनुकरण करू शकतो आणि असे करणाऱ्‍यांना कोणते आशीर्वाद मिळतील?

१७ यिर्मयाने लिहिले, “परमेश्‍वर माझा वतनभाग आहे.” तो पुढे म्हणतो, “म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन. जे परमेश्‍वराची आशा धरून राहतात त्यांस, जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्‍वर प्रसन्‍न होतो. परमेश्‍वरापासून येणाऱ्‍या तारणाची वाट पाहणे आणि तीहि मुकाट्याने पाहणे बरे आहे.” (विलापगीत ३:२४-२६) आपल्यापैकी काहीजण केवळ काही काळापासून वाट पाहात आहेत. इतरांनी अनेक वर्षे यहोवाच्या तारणाची प्रतीक्षा केली आहे. पण पुढील चिरकालिक जीवनाचा विचार करता, हा प्रतीक्षेचा काळ खरे तर किती थोडा आहे! (२ करिंथकर ४:१६-१८) यहोवाच्या नियुक्‍त वेळेची वाट पाहत असताना आपण अत्यावश्‍यक असे ख्रिस्ती गुण विकसित करू शकतो आणि इतरांनाही यहोवाच्या सहनशीलतेचा फायदा उचलण्यास व सत्याचा स्वीकार करण्यास मदत करू शकतो. तर मग आपण सर्व जण सावध व जागृत राहण्याचा निर्धार करू या. यहोवाचे अनुकरण करून आपणही सहनशील वृत्ती दाखवू आणि त्याने आपल्याला दिलेल्या आशेबद्दल त्याला कृतज्ञता व्यक्‍त करू. विश्‍वासूपणे सतर्क राहून सार्वकालिक जीवनाच्या आशेला आपण दृढ धरून राहू. असे केल्यास पुढील भविष्यवाद आपल्या बाबतीत नक्कीच खरा ठरेल: “[यहोवा] तुझी उन्‍नति करून तुला पृथ्वीचे वतन देईल; दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.”—स्तोत्र ३७:३४.

[तळटीप]

^ परि. 5 आपण ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत हे सूचित करणाऱ्‍या टेहळणी बुरूज, जानेवारी १५, २००० अंकातील पृष्ठे १२-१३ यांत स्पष्ट केलेल्या सहा पुराव्यांवर विचार करणे सहायक ठरू शकेल.—२ तीमथ्य ३:१.

^ परि. 7 “सावध राहा” असे भाषांतर केलेल्या ग्रीक क्रियापदाविषयी माहिती देताना शब्दकोशकार डब्ल्यु. ई. व्हाईन सांगतात की या क्रियापदाचा शब्दशः अर्थ ‘झोपेला पळवून लावणे’ असा होतो “यातून केवळ जागृत राहण्याचाच अर्थ सूचित होत नाही, तर विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित केलेल्या व्यक्‍तीच्या सतर्कतेचाही अर्थ यातून सूचित होतो.”

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• या व्यवस्थीकरणाचा अंत जवळ आला आहे याविषयीची खात्री आपण कशी बळकट करू शकतो?

• पेत्र, याकोब व योहान यांच्या उदाहरणांवरून काय शिकता येते?

• कोणत्या तीन गुणांमुळे आपल्याला आध्यात्मिकरित्या सतर्क राहण्यास मदत मिळेल?

• ‘आपल्याजवळ आहे ते दृढ धरून राहण्याची’ ही वेळ आहे असे का म्हणता येते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चौकट/चित्र]

‘जो धीर धरील तो धन्य.’—दानीएल १२:१२

एका इमारतीचे रक्षण करणाऱ्‍या पहारेकऱ्‍याला त्या इमारतीच्या परिसरात एक चोर प्रवेश करणार असल्याचा संशय येतो अशी कल्पना करा. अंधार पडतो तसा पहारेकरी चोराची चाहूल लागण्याच्या अपेक्षेत जराही आवाज आल्यास लक्षपूर्वक ऐकतो. एकेक तास जातो तसतसा तो आपल्या कानांना आणि डोळ्यांना अधिक ताण देतो. वाऱ्‍यामुळे होणारा पानांचा आवाज किंवा मांजरीने पाडलेल्या एखाद्या वस्तूचा आवाज आला तरीही त्याला चोरच आला असे वाटते, पण हे समजण्यासारखे आहे.—लूक १२:३९, ४०.

‘आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या प्रगट होण्याची वाट पाहणाऱ्‍यांच्या’ बाबतीतही असेच घडू शकते. (१ करिंथकर १:७) प्रेषितांना वाटले की येशू आपल्या पुनरुत्थानानंतर लगेच ‘इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित’ करेल. (प्रेषितांची कृत्ये १:६) बऱ्‍याच वर्षांनंतर थेस्सलनीका येथील ख्रिश्‍चनांनाही याची आठवण करून देण्याची गरज पडली की येशूची उपस्थिती भविष्यात होणार होती. (२ थेस्सलनीकाकर २:३,) पण यहोवाचा दिवस येण्याविषयीच्या अपेक्षा काही वेळा फोल ठरल्या तरीसुद्धा येशूच्या त्या आरंभीच्या अनुयायांनी जीवनाचा मार्ग त्यागला नाही.—मत्तय ७:१३.

आपल्या काळात या व्यवस्थीकरणाचा नाश येण्यास उशीर लागत असल्याचे भासल्यामुळे निराशा वाटली तरीसुद्धा यामुळे आता दक्षता बाळगण्याची गरज नाही असे कधीही समजू नये. सतर्क पहारेकऱ्‍याचा अंदाज एखाद्या वेळी खोटा संकेत ठरू शकतो पण तरीसुद्धा त्याने सतत सावध राहिलेच पाहिजे! तेच त्याचे काम आहे. ख्रिस्ती लोकांच्या बाबतीतही हेच खरे आहे.

[१८ पानांवरील चित्र]

यहोवाचा दिवस जवळ आला आहे याची तुम्हाला खात्री आहे का?

[१९ पानांवरील चित्रे]

सभा, प्रार्थना, आणि अभ्यासाच्या चांगल्या सवयी आपल्याला सावध राहण्यास मदत करतात

[२२ पानांवरील चित्र]

मार्गरेटप्रमाणे आपणही धीरोदात्त वृत्तीने जागृत व क्रियाशील राहावे