व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दुःखितांना सांत्वन

दुःखितांना सांत्वन

दुःखितांना सांत्वन

देव दुःखाला परवानगी का देतो या प्रश्‍नाने शतकानुशतके अनेक तत्त्वज्ञ आणि थिओलॉजिन गोंधळून गेले आहेत. काहींनी असा दावा केला आहे की, देव सर्वशक्‍तिमान असल्यामुळे सरतेशेवटी तोच दुःखाला कारणीभूत असावा. द क्लेमेंटाईन होमिलीज या दुसऱ्‍या शतकातील काल्पनिक ग्रंथाचे लेखक यांचा असा दावा होता की, देव दोन्ही हातांनी जगावर राज्य करतो. “डावा हात” अर्थात सैतान याच्याकरवी तो दुःखणे आणि पीडा आणतो आणि “उजवा हात” अर्थात येशू याच्याकरवी तारण साधतो आणि आशीर्वाद देतो.

देव दुःखाला कारणीभूत नसला तरी तो त्यास परवानगी देऊ शकतो हे मानायला तयार नसलेले इतरजण दुःखाचे अस्तित्व नाकारतात. “दुष्टाई हा एक भास आहे, त्याला खरा आधार नाही,” असे मॅरी बेकर एडी यांनी लिहिले. “पाप, आजारपण आणि मृत्यू या अस्तित्वहीनतेच्या अवस्था समजल्या असत्या तर त्या नाहीशा झाल्या असत्या.”—शास्त्रवचनांचे रहस्य उलगडणारे विज्ञान आणि आरोग्य (इंग्रजी).

इतिहासातील दुर्घटनांमुळे, विशेषतः, पहिल्या महायुद्धापासून आतापर्यंत घडलेल्या दुःखद घटनांमुळे अनेकांचा असा ग्रह झाला आहे की, देव दुःखावर नियंत्रण करू शकत नाही. यहुदी विद्वान डेव्हिड वुल्फ सिल्व्हरमन यांनी लिहिले: “माझ्या मते, हिटलरच्या शासनातील हत्याकांडामुळे देव सर्वशक्‍तिमान असल्याची संकल्पना अक्षरशः नाहीशी झाली आहे. देव कोण आहे याचे आकलन आपल्याला व्हायचे असल्यास, दुष्टाईच्या अस्तित्वाशी त्याच्या चांगुलपणाचा मेळ बसला पाहिजे; तो सर्वशक्‍तिमान नसेल तरच हे शक्य आहे.”

परंतु, दुःखाला देव कारणीभूत आहे, दुःख टाळण्यास तो असमर्थ आहे किंवा दुःख ही आपलीच एक कल्पना आहे असा दावा केल्याने दुःख सोसणाऱ्‍यांना सांत्वन मिळत नाही. शिवाय, हे विश्‍वास, बायबलमधल्या न्यायी, शक्‍तिमान आणि प्रेमळ देवाच्या वर्णनाच्या अगदीच विरोधात आहेत. (ईयोब ३४:१०, १२; यिर्मया ३२:१७; १ योहान ४:८) तर मग, दुःखाला परवानगी का देण्यात आली त्याविषयी बायबल काय म्हणते?

दुःखाची सुरवात कशी झाली?

देवाने मानवांना दुःख सोसण्याकरता निर्माण केले नाही. उलट, त्याने पहिले मानवी दांपत्य, आदाम आणि हव्वा यांना परिपूर्ण मन आणि शरीर दिले, त्यांना राहण्यासाठी एक सुंदर बाग दिली आणि त्यांना अर्थपूर्ण व समाधानकारक असे काम नेमून दिले. (उत्पत्ति १:२७, २८, ३१; २:८) परंतु, देवाचे शासन व त्यांच्याकरता भलेबुरे ठरवण्याचा त्याचा अधिकार मान्य करण्यावरच त्यांचा चिरकालिक आनंद अवलंबून होता. ‘बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणारे झाड’ हे देवाच्या त्या आज्ञेचे सूचक होते. (उत्पत्ति २:१७) त्या झाडाचे फळ न खाण्याची आज्ञा पाळून आदाम आणि हव्वा देवाला अधीनता दाखवू शकत होते. *

दुःखाची गोष्ट म्हणजे, आदाम आणि हव्वा देवाची आज्ञा पाळण्यात उणे पडले. दियाबल सैतान म्हणून ओळखलेल्या एका बंडखोर आत्मिक प्राण्याने हव्वेला पटवले की, देवाची आज्ञा पाळण्यात तिचे भले नव्हते. उलट, त्याचे म्हणणे होते की, देव तिला अत्यंत इष्ट असलेल्या एका गोष्टीपासून वंचित ठेवत आहे: ती गोष्ट म्हणजे, स्वातंत्र्य, स्वतःकरता चांगले आणि वाईट ठरवण्याचा अधिकार. सैतानाचा असा दावा होता की, तिने झाडाचे फळ खाल्ले तर, ‘तिचे डोळे उघडतील आणि ती देवासारखी बरेवाईट जाणणारी होईल.’ (उत्पत्ति ३:१-६; प्रकटीकरण १२:९) स्वातंत्र्य मिळवण्याचा मोह झाल्यामुळे हव्वेने मना केलेले फळ खाल्ले आणि आदामाने तिचे अनुकरण केले.

त्याच दिवशी, आदाम आणि हव्वेला त्यांच्या बंडाळीचे परिणाम जाणवू लागले. देवाच्या शासनाचा अस्वीकार केल्यामुळे देवाच्या अधीन असताना त्यांना मिळालेले संरक्षण आणि आशीर्वाद ते गमावून बसले. देवाने त्यांना परादीसमधून बाहेर हाकलले आणि आदामाला म्हटले: “तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील; तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुनः मातीला जाऊन मिळशील.” (उत्पत्ति ३:१७, १९) आदाम आणि हव्वेवर आजारपण, दुःखणे, म्हातारपण आणि मृत्यू या गोष्टी आल्या. दुखणे हा मनुष्याच्या जीवनाचा भाग बनला.—उत्पत्ति ५:२९.

वादविषय मिटवणे

कोणी म्हणेल, ‘देवाला आदाम आणि हव्वेच्या पापाकडे दुर्लक्ष करता आले नसते का?’ नाही, कारण तसे कल्याने त्याच्या अधिकाराबद्दल त्यांचा आदर आणखीनच कमी झाला असता; एवढेच नव्हे तर कदाचित भावी बंडखोरांना प्रोत्साहन मिळाले असते आणि अधिक दुःख वाढले असते. (उपदेशक ८:११) शिवाय, अशा अवज्ञेला सहन करून देवही त्या अपराधात सामील झाला असता. बायबलचा लेखक मोशे आपल्याला आठवण करून देतो: “तो विश्‍वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीति नाही; तो न्यायी व सरळ आहे.” (अनुवाद ३२:४) आपल्या सिद्धान्तांनुसार, देवाला आदाम आणि हव्वेला त्यांच्या अवज्ञेचे परिणाम भोगू द्यावे लागले.

देवाने, या बंडाळीमागे असलेला अदृश्‍य सैतान याच्यासह पहिले मानवी दांपत्य यांना तेव्हाच्या तेव्हाच नष्ट का केले नाही? त्याच्याकडे तसे करण्याचे सामर्थ्य होते. आदाम आणि हव्वेच्या संततीला वारशात दुःख आणि मृत्यू मिळाला नसता. तथापि, ईश्‍वरी शक्‍तीच्या या प्रदर्शनामुळे आपल्या बुद्धिवान प्राण्यांवरील देवाच्या अधिकाराचा योग्यपणा सिद्ध झाला नसता. शिवाय, आदाम आणि हव्वेला मुले न होता ते मरण पावले असते तर त्यांच्या परिपूर्ण संततीने पृथ्वी भरून टाकण्यासंबंधी देवाचा उद्देश निष्फळ ठरला असे झाले असते. (उत्पत्ति १:२८) आणि “देव माणूस नाही . . . जर परमेश्‍वराने सांगितले की तो एखादी गोष्ट करील तर तो ती करीलच. जर परमेश्‍वराने वचन दिले तर तो ते वचन दिलेली गोष्ट करीलच.”—गणना २३:१९, ईजी-टू-रीड व्हर्शन.

आपल्या परिपूर्ण बुद्धीनुसार, यहोवा देवाने एका मर्यादित काळापर्यंत बंडाळीला परवानगी देण्याचे ठरवले. मग बंडखोरांना देवापासून मिळवलेल्या स्वातंत्र्याचे परिणाम भोगायला पुरेसा वेळ मिळणार होता. आणि इतिहासातून हे सिद्ध होईल की, मानवजातीला देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि मानवांच्या किंवा सैतानाच्या शासनापेक्षा देवाचे शासन श्रेष्ठ आहे. त्याच वेळी, पृथ्वीसंबंधाने आपला मूळ उद्देश पूर्ण होईल याची खात्री करण्यासाठी देवाने काही पावले उचलली. त्याने वचन दिले की, एक “संतती” येईल आणि ती ‘सैतानाचे डोके फोडील’ ज्यामुळे त्याची बंडाळी आणि त्या बंडाळीचे हानीकारक परिणाम एकदाचे मिटवले जातील.—उत्पत्ति ३:१५.

येशू ख्रिस्त ती वाग्दत्त संतती होती. १ योहान ३:८ येथे आपल्याला वाचायला मिळते की, ‘देवाचा पुत्र सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी प्रगट झाला.’ आपले परिपूर्ण मानवी जीवन अर्पण करून आदामाच्या संततीला वारशात मिळालेल्या पाप व मृत्यूपासून तिची सुटका करण्यासाठी खंडणी देऊन त्याने हे केले. (योहान १:२९; १ तीमथ्य २:५, ६) येशूच्या बलिदानावर खरोखर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना दुःखापासून कायमची सुटका मिळण्याचे आश्‍वासन आहे. (योहान ३:१६; प्रकटीकरण ७:१७) हे केव्हा घडेल?

दुःखाचा अंत

देवाच्या अधिकाराचा अस्वीकार केल्याची परिणती अंतहीन दुःखात झाली आहे. त्यामुळे, देवाने मानवी दुःखाचा अंत करण्यासाठी आणि पृथ्वीसंबंधी आपला मूळ उद्देश साध्य करण्यासाठी एका खास मार्गाने त्याचा अधिकार वापरला पाहिजे. येशूने आपल्या अनुयायांना, “हे आमच्या स्वर्गातील पित्या, . . . तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो,” ही प्रार्थना करायला शिकवले तेव्हा त्याने देवाच्या या व्यवस्थेचा उल्लेख केला. (तिरपे वळण आमचे.)—मत्तय ६:९, १०.

देवाने मानवांना स्वतःच्या सरकारांचा प्रयोग करून पाहण्यासाठी दिलेला अवधी आता समाप्त होत आला आहे. बायबल भविष्यवाणीच्या पूर्णतेत, त्याचे राज्य १९१४ साली स्वर्गात स्थापन झाले आणि येशू ख्रिस्त त्याचा राजा झाला. * लवकरच, ते सर्व मानवी सरकारांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करणार आहे.—दानीएल २:४४.

पृथ्वीवरील आपल्या संक्षिप्त सेवाकार्यादरम्यान, देवाच्या शासनाच्या पुन:निर्माण कार्यामुळे मानवजातीला मिळणाऱ्‍या आशीर्वादांची येशूने पूर्वझलक दिली. मानवी समाजातील गरीब आणि पीडित लोकांना येशूने दया दाखवल्याचा पुरावा शुभवर्तमानांमध्ये आहे. त्याने आजाऱ्‍यांना बरे केले, भुकेलेल्यांना खाऊ घातले आणि मृतांना जिवंत केले. इतकेच काय तर, निसर्गाच्या शक्‍तींवरही त्याचे नियंत्रण होते. (मत्तय ११:५; मार्क ४:३७-३९; लूक ९:११-१६) सर्व आज्ञाधारक मानवजातीच्या फायद्याकरता येशू खंडणी बलिदानाद्वारे शुद्धीकरण घडवून आणील तेव्हा तो काय साध्य करील याची कल्पना करा! बायबल असे वचन देते की, ख्रिस्ताच्या शासनाद्वारे, देव, “[मानवांच्या] डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही” राहणार नाही.—प्रकटीकरण २१:४.

दुःखितांना सांत्वन

आपला प्रेमळ आणि सर्वशक्‍तिमान देव, यहोवा, आपली काळजी वाहतो आणि लवकरच तो मानवजातीला सर्व समस्यांतून मुक्‍त करणार आहे हे जाणल्यावर आपल्याला दिलासा मिळत नाही का? सहसा, अगदी गंभीररीत्या आजारी असलेली व्यक्‍ती बरे होण्यासाठी त्रासदायक उपचार देखील करायला तयार असते. त्याचप्रकारे, देवाच्या पद्धतीने सार्वकालिक आशीर्वाद मिळतील हे समजल्यावर आपणही तात्पुरत्या अडचणी सहन करायला तयार होऊ.

आधीच्या लेखात उल्लेखिलेला रिकार्डो बायबलमधील वचनांतून सांत्वन मिळवण्यास शिकला. तो आठवून सांगतो की, “माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर मी एकान्तात राहावं असं मला तीव्रतेने वाटू लागलं, पण मला लगेच जाणवलं की असं केल्यामुळे माझी पत्नी काही पुन्हा येणार नाही आणि माझी मनःस्थिती आणखीनच खराब होईल.” याउलट, रिकार्डोने ख्रिस्ती सभांना जाण्याचा आणि इतरांना बायबलचा संदेश सांगण्याचा नित्यक्रम सोडला नाही. रिकार्डो म्हणतो, “यहोवाच्या प्रेमळ आधाराचा मला प्रत्यय आला आणि अगदी लहानसहान गोष्टींमध्येही माझ्या प्रार्थनांची तो उत्तरे देतो हे मी पाहिले तेव्हा त्याच्यासोबत माझी जवळीक अधिकच वाढली. देवाच्या प्रेमाची ही जाणीव झाल्यामुळेच माझ्या आयुष्यातल्या सर्वात कठीण प्रसंगातून मी सावरू शकलो.” तो कबूल करतो: “मला अजूनही माझ्या पत्नीची खूप आठवण येते, पण माझा असा पक्का विश्‍वास आहे की, यहोवा जे प्रसंग आपल्यावर येऊ देतो त्यांनी आपले कायमचे नुकसान होऊ शकत नाही.”

तुम्ही देखील रिकार्डो आणि लाखो इतर लोकांप्रमाणे, मानवजातीच्या सद्यकाळातील दुःखे “कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत” त्या काळाची उत्सुकतेने वाट पाहत आहात का? (यशया ६५:१७) “परमेश्‍वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा,” या बायबलमधील सल्ल्याचे पालन केल्यास देवाच्या राज्याचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करता येतील याची शाश्‍वती तुम्ही बाळगू शकता.—यशया ५५:६.

तुम्हाला हे करण्यास मदत करण्यासाठी, देवाच्या वचनाच्या वाचनाला आणि काळजीपूर्वक अभ्यासाला तुमच्या जीवनात प्राधान्य द्या. देवाला आणि त्याने पाठवलेल्या येशू ख्रिस्ताला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. देवाच्या दर्जांनुरूप जगण्याचा होता होईल तितका प्रयत्न करा आणि दाखवून द्या की, तुम्ही त्याच्या सार्वभौमत्वाच्या अधीन होण्यास इच्छुक आहात. असे केल्यामुळे, तुमच्यावर परीक्षा आल्या तरीही तुम्हाला अधिक आनंद प्राप्त होईल. आणि भविष्यात तुम्हाला दुःखांपासून मुक्‍त असलेल्या जगात जीवनाचा आनंद लुटण्यास मदत मिळेल.—योहान १७:३.

[तळटीपा]

^ परि. 7 उत्पत्ति २:१७ च्या तळटीपेत, द जरूसलेम बायबल म्हणते की, “बऱ्‍यावाइटाचे ज्ञान” म्हणजे “योग्य आणि अयोग्य काय हे ठरवून त्यानुसार वागण्याची शक्‍ती, पूर्ण नैतिक स्वातंत्र्याचा दावा ज्याद्वारे मानव, स्वतः निर्मित व्यक्‍ती असल्याचे नाकारतो.” ते पुढे म्हणते: “पहिले पाप देवाच्या सार्वभौमत्वावर एक हल्ला होता.”

^ परि. 17 सन १९१४ शी संबंधित असलेल्या बायबल भविष्यवाणीवरील तपशीलवार चर्चेकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातील १० आणि ११ अध्याय पाहा.

[६, ७ पानांवरील चौकट]

आपण दुःखाचा सामना कसा करू शकतो?

“[देवावर] तुम्ही आपली सर्व चिंता टाका.” (१ पेत्र ५:७) आपण स्वतः दुःख अनुभवतो किंवा आपल्या प्रिय व्यक्‍तीला दुःख अनुभवताना पाहतो तेव्हा गोंधळून जाणे, राग येणे आणि आपल्याला त्यागले आहे असे वाटणे साहजिक आहे. तरीही, यहोवा आपल्या भावना समजतो याची शाश्‍वती बाळगा. (निर्गम ३:७; यशया ६३:९) प्राचीन काळातील विश्‍वासू पुरुषांप्रमाणे, आपण त्याच्याजवळ आपले अंतःकरण मोकळे करू शकतो आणि आपल्या शंका व चिंता त्याला सांगू शकतो. (निर्गम ५:२२; ईयोब १०:१-३; यिर्मया १४:१९; हबक्कूक १:१३) आपल्या परीक्षा तो चमत्कारिकपणे दूर करणार नाही पण आपल्या मनःपूर्वक प्रार्थनांच्या उत्तरात तो त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला बुद्धी आणि सामर्थ्य देऊ शकतो.—याकोब १:५, ६.

“तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका.” (१ पेत्र ४:१२) येथे पेत्र छळाविषयी बोलत आहे, पण त्याचे हे शब्द एका उपासकावर येणाऱ्‍या कोणत्याही संकटाला तितकेच लागू होऊ शकतात. मानवांना मूलभूत गरजांपासून वंचित राहणे, आजारपण आणि प्रिय व्यक्‍तींचा मृत्यू या गोष्टी सहन कराव्या लागतात. बायबल म्हणते की, “समय व प्रसंग हे सर्वांना घडतात.” (उपदेशक ९:११) या गोष्टी सध्या मानवांच्या जीवनाचा भाग आहेत. हे ओळखल्याने एखादी दुःखद गोष्ट किंवा दुर्घटना घडते तेव्हा तिचा सामना करायला आपल्याला मदत होते. (१ पेत्र ५:९) “परमेश्‍वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात” या आश्‍वासनाची आठवण केल्यावर खासकरून आपल्याला दिलासा मिळेल.—स्तोत्र ३४:१५; नीतिसूत्रे १५:३; १ पेत्र ३:१२.

“आशेने हर्षित व्हा.” (रोमकर १२:१२) गतकाळातल्या आनंदाचा सतत विचार करत राहण्यापेक्षा दुःखाचा अंत करण्याविषयी देवाने दिलेल्या वचनावर आपण मनन करू शकतो. (उपदेशक ७:१०) ही साधार आशा डोक्यावरील शिरस्त्राणासारखे आपले संरक्षण करील. आशा, जीवनातल्या आघातांची तीव्रता कमी करते आणि हे आघात आपल्या मानसिक, भावनिक किंवा आध्यात्मिक आरोग्याचा बळी घेणार नाहीत याची खात्री करते.—१ थेस्सलनीकाकर ५:८.

[५ पानांवरील चित्र]

आदाम आणि हव्वेने देवाचे शासन स्वीकारले नाही

[७ पानांवरील चित्र]

दुःखांपासून मुक्‍त असलेल्या जगाचे देव वचन देतो