व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

माझ्या जीवनाचा कायापालट करणारी चिठ्ठी

माझ्या जीवनाचा कायापालट करणारी चिठ्ठी

जीवन कथा

माझ्या जीवनाचा कायापालट करणारी चिठ्ठी

इरेन हॉकस्टनबॉक यांच्याद्वारे कथित

ही १९७२ सालच्या एका मंगळवार संध्याकाळची गोष्ट आहे. तेव्हा मी १६ वर्षांची होते आणि नेदरलंडमधील ब्राबंट प्रांताच्या आईन्डहोव्हन नावाच्या एका शहरात चाललेल्या एका धार्मिक सभेला माझ्या आईवडिलांबरोबर मी गेले होते. मला अस्वस्थ वाटत होतं, कुठेतरी दुसरीकडे जावं असं मला वाटत होतं. मग, दोन तरुण स्त्रिया माझ्याजवळ आल्या आणि त्यांनी मला एक चिठ्ठी दिली; त्यावर लिहिलं होतं: “प्रिय इरेन, तुला मदत करायला आम्हाला आवडेल.” या चिठ्ठीनं माझ्या जीवनाचा कायापालट होईल असा मी तेव्हा जराही विचार केला नाही. पुढे काय झालं हे सांगण्याआधी मी तुम्हाला माझ्या पार्श्‍वभूमीविषयी सांगते.

इंडोनेशियातील बेलिटंग नावाच्या एका द्वीपावर माझा जन्म झाला होता. त्या उष्णकटिबंधीय द्वीपावरील काही आवाज—वाऱ्‍याने सळसळणाऱ्‍या नारळाच्या झावळ्यांचा आवाज, जवळपासच्या एका नदीचा खळखळाट, आमच्या घराशेजारी बागडणाऱ्‍या मुलांच्या मिश्‍किल हसण्याचा आवाज आणि आमच्या घरातील संगीताचा आवाज हे सर्व मला आठवतात. मी चार वर्षांची होते तेव्हा म्हणजे १९६० साली आमचं कुटुंब इंडोनेशियाहून नेदरलंडला राहायला गेलं. आम्ही हा लांबचा प्रवास जहाजानं केला; मी सोबत नेलेल्या माझ्या एका आवडत्या खेळण्याचा आवाज मला खासकरून आठवतो—एक लहानसा विदूषक आणि त्याचे दोन ढोल. वयाच्या सातव्या वर्षी आजारामुळे माझी श्रवणशक्‍ती नाहीशी झाली आणि तेव्हापासून मला माझ्या आजूबाजूचा कसलाही आवाज ऐकू येईनासा झाला. आवाजांच्या आठवणीच तेवढ्या माझ्याजवळ राहिल्या आहेत.

श्रवणशक्‍तीविना मोठी होणे

माझ्या आईवडिलांच्या प्रेमळ काळजीमुळे मला, श्रवणशक्‍ती नसल्याचे परिणाम इतके स्पष्टपणे जाणवले नाहीत. लहान असताना मला वापरावे लागत असलेले मोठे श्रवणयंत्र हे मला एखाद्या खेळण्याप्रमाणेच वाटायचे; तेव्हा मला त्याचा इतका उपयोग झाला नाही. आमच्या शेजारपाजारची मुलं खडूनं, फुटपाथवर त्यांना काय म्हणायचं आहे ते लिहून माझ्याबरोबर बोलायची; मला माझा स्वतःचा आवाज ऐकू येत नव्हता तरीसुद्धा मी त्यांना उत्तर द्यायचे.

पण मी जसजशी मोठी होत गेले तसतसे मला जाणवू लागले, की मी इतर लोकांपेक्षा वेगळी होते. काही लोक माझ्या बहिरेपणाची थट्टा करत आहेत, काही लोक मला टाळत आहेत हे मला जाणवू लागले. मला एकटं-एकटं वाटू लागलं. बहिरे असण्याचा अर्थ मला समजू लागला आणि जसजशी मी मोठी होत गेले तसतसे मला, श्रवणशक्‍ती असलेल्यांच्या दुनियेत वावरण्याची भीती वाटू लागली.

बहिऱ्‍यांसाठी असलेल्या एका खास शाळेत मला जाता यावे म्हणून आईवडिलांसह आमचं संपूर्ण कुटुंब, लिंबर्ग प्रांतातील एका गावापासून आईन्डहोव्हन नावाच्या एका शहरात राहायला गेलं. तिथं बाबांनी काम शोधलं आणि माझी धाकटी भावंडं एका नवीन शाळेत जाऊ लागली. माझ्यासाठी त्यांना कराव्या लागलेल्या सर्व फेरफारांबद्दल मी त्यांचे आभार मानते. शाळेत मला, माझ्या स्वतःच्या आवाजाच्या पातळीशी जुळवून घेण्यास, स्पष्टोच्चार करण्यास शिकवण्यात आलं. शिक्षकांनी मला मुकबधिरांची भाषा शिकवली नाही पण माझ्या वर्गमित्रांनी मला ती शिकवली.

माझ्याच जगात राहणे

मी जसजशी मोठी होत गेले तसतसे आईबाबांनी माझ्याशी दळणवळण करण्याचा बराच प्रयत्न केला, पण पुष्कळ गोष्टी मला समजायच्या नाहीत. जसे की, माझे आईबाबा यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करत आहेत हे मला समजत नव्हतं. पण एकदा आमचं कुटुंब एका ठिकाणी गेलं होतं जिथं पुष्कळ लोक खुर्च्यांवर बसल्याचं मला आठवतं. ते सर्व पुढे पाहत होते, अधूनमधून टाळ्या वाजत होते, अधूनमधून उठून उभे राहत होते—पण हे सर्व लोक असे का करत आहेत हे मला समजत नव्हतं. कित्येक वर्षांनंतर मला समजलं, की मी यहोवाच्या साक्षीदारांच्या एका अधिवेशनाला गेले होते. माझे आईबाबा मला आईन्डहोव्हन शहराच्या एका छोट्याशा सभागृहात देखील न्यायचे. मला तिथं जायला आवडायचं, कारण सर्व लोक दयाळू होते, माझ्या कुटुंबाला आनंद वाटायचा, पण आम्ही तिथं सारखं का जात होतो ते मात्र मला समजायचं नाही. आता मला समजतं, की ते लहानसे सभागृह यहोवाच्या साक्षीदारांचे राज्य सभागृह होते.

पण, या सभांमध्ये होणारा कार्यक्रम कोणालाही, मला माझ्या भाषेत समजावून सांगता येत नव्हता. आता मला कळतं, की त्या लोकांना मला मदत करायची इच्छा होती पण कशी करायची ते त्यांना माहीत नव्हतं. या सभांमध्ये मला एकटं-एकटं वाटू लागायचं आणि मी विचार करायचे की ‘इथं असण्यापेक्षा मी शाळेत असते तर किती बरं झालं असतं.’ मी असा विचार करत असतानाच दोन तरुण स्त्रियांनी मला एक चिठ्ठी दिली. याच चिठ्ठीचा मी सुरवातीला उल्लेख केला आहे. मला तेव्हा जरासुद्धा जाणीव नव्हती, की या चिठ्ठीमुळे एका अमुल्य मैत्रीचं नातं सुरू होणार होतं ज्यामुळे मी माझ्या एकटेपणाच्या विश्‍वातून बाहेर पडणार होते.

अमूल्य नातं वाढवणं

कोलेट आणि हर्मीन या दोघींनी मला ती चिठ्ठी पाठवली होती; दोघी २०-२१ वर्षांच्या होत्या. नंतर मला समजलं, की मी ज्या मंडळीला भेट देण्यासाठी आले होते तिथं त्या दोघी सामान्य पायनियर किंवा पूर्ण-वेळेच्या सेविका म्हणून सेवा करायला आल्या होत्या. कोलेट आणि हर्मीनला मुकबधिरांची भाषा येत नव्हती, पण त्यांच्या ओठांच्या हालचालीवरून मी त्यांचे बोलणे समजू शकत होते आणि अशाप्रकारे आम्ही बऱ्‍याच प्रमाणात संभाषण करू शकलो.

कोलेट आणि हर्मीननं, माझ्याबरोबर बायबल अभ्यास करण्याविषयी विचारलं तेव्हा माझ्या आईवडिलांना खूप आनंद वाटला; पण या दोघींनी माझ्यासाठी आणखी पुष्कळ केलं. त्या दोघींनी राज्य सभागृहातील सभा समजावण्यास आणि मंडळीतील इतरांबरोबर माझा सहवास वाढवण्यास मला खूप मदत केली. प्रचार कार्यात उपयोगात आणण्याकरता त्या माझ्यासोबत बायबल सादरतांची तालीम घ्यायच्या आणि ईश्‍वरशासित सेवा प्रशालेतील विद्यार्थी भाषण तयार करण्यासाठी मला मदत करायच्या. कल्पना करा, आता मला, ऐकू येणाऱ्‍या लोकांच्या एका समूहापुढे भाषण देण्याचे धैर्य आले होते!

याशिवाय, कोलेट आणि हर्मीननं माझा विश्‍वास संपादला होता. त्या दोघी सहनशील होत्या, माझं ऐकून घ्यायच्या. आम्ही तिघी माझ्या चुकांवर बहुतेकदा हसायचो, पण त्यांनी कधीही माझी थट्टा केली नाही किंवा मी त्यांच्याबरोबर असताना त्यांना माझी कधी लाज वाटली नाही. त्यांनी माझ्या भावना समजून घेतल्या आणि मला त्यांच्या बरोबरीनेच वागवले. या मुलींनी मला एक सुंदर देणगी दिली—त्यांचं प्रेम आणि मैत्री.

सर्वांहून महत्त्वाचं म्हणजे, कोलेट आणि हर्मीननं, आपला देव यहोवा याला विश्‍वास करण्याजोगा मित्र म्हणून आपण जाणून घेतलं पाहिजे हे शिकवलं. त्यांनी मला समजावून सांगितलं, की यहोवानं मला राज्य सभागृहात बसलेलं पाहिलं आहे आणि बहिऱ्‍या व्यक्‍तीला तो समजू शकतो. यहोवाबद्दल आमच्या तिघींना असलेल्या सारख्या प्रेमामुळे आम्ही मैत्रिणी बनून एकमेकांच्या जवळ आलो याबद्दल मी खरोखरच आभारी आहे! माझी यहोवाला किती काळजी आहे या जाणीवेने मी खूप प्रभावीत झाले आणि त्याच्यावरील माझ्या प्रेमामुळे मी १९७५ सालच्या जुलै महिन्यात पाण्यानं बाप्तिस्मा घेण्याद्वारे माझं समर्पण जाहीरपणे व्यक्‍त केलं.

एका खास मित्राबरोबर सहवास

हळूहळू माझी ओळख आणखी ख्रिस्ती बंधूभगिनींबरोबर झाली. एक बांधव माझा खास मित्र झाला आणि १९८० मध्ये आम्ही लग्न केलं. त्यानंतर काही दिवसांनी मी पायनियर म्हणून सेवा करू लागले आणि १९९४ साली आम्हा दोघांना म्हणजे मला व हॅरीला मुकबधिरांच्या डच भाषेच्या क्षेत्रात सेवा करण्यासाठी खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं. त्याच्या पुढील वर्षी, मला एक आव्हानात्मक नेमणूक मिळाली. पर्यायी विभागीय पर्यवेक्षक म्हणून मंडळीला भेट देताना माझ्या पतीसोबत (ज्यांना ऐकू येत होते) मला जायचं होतं.

तेव्हा मी काय करते ते मी तुम्हाला सांगते. आम्ही पहिल्यांदा एखाद्या मंडळीला भेट देत असतो तेव्हा, मी लगेच शक्य तितक्या बंधूभगिनींजवळ जाऊन स्वतःची ओळख करून देते. मी त्यांना सांगते, की मी बहिरी आहे आणि माझ्याबरोबर बोलताना त्यांनी माझ्याकडे पाहून हळू बोलावे. मंडळीच्या सभांमध्ये देखील मी उत्तर देण्याचा प्रयत्न करते. आणि त्या आठवडी होणाऱ्‍या सभांसाठी व क्षेत्र सेवेसाठी कोणी मला समजावून सांगण्यास मदत करू इच्छितो का, असेही मी विचारते.

ही पद्धत अनेकदा इतकी उपयोगी ठरली आहे, की काही वेळा माझे बंधूभगिनी विसरून जातात, की मला ऐकू येत नाही; यामुळे पुष्कळ विनोदी घटना घडतात. जसे की, ते मला सांगतात, की शहरात ते मला चालत असताना पाहतात तेव्हा मला नमस्ते म्हणण्यासाठी ते आपल्या कारचा हॉर्न वाजवतात, पण माझ्याकडून त्यांना काही प्रतिसाद मिळत नाही. कधीकधी मीसुद्धा विसरून जाते, की मला ऐकू येत नाही—जसे की, एखादी गुप्त गोष्ट मी माझ्या नवऱ्‍याच्या कानात कुजबुजण्याचा प्रयत्न करते तेव्हा. त्यांना एकदम लाजल्यासारखे होते तेव्हा मला कळतं, की माझं “कुजबुजणं” सर्वांना ऐकू येईल इतकं मोठ्यानं होतं.

मुलंही मला आगळ्यावेगळ्या मार्गांनी मदत करतात. एका मंडळीला आम्ही पहिल्यांदाच भेट देत होतो तेव्हा एका नऊ वर्षांच्या मुलानं पाहिलं, की राज्य सभागृहातील काही लोक माझ्याशी बोलायला कचरत होते; त्यानं काहीतरी करायचं ठरवलं. तो माझ्याजवळ आला, माझा हात धरला आणि मला राज्य सभागृहाच्या मध्ये आणून अगदी मोठ्यानं म्हणाला: “यांचं नाव इरेन आहे—त्यांना ऐकू येत नाही!” मग, उपस्थित असलेले माझ्याजवळ येऊन स्वतःची ओळख करून देऊ लागले.

विभागीय कार्यात मी ह्‍यांच्याबरोबर जात असल्यामुळे मला अनेक बंधूभगिनींबरोबर मैत्री करता येते. माझं आताचं जीवन पूर्वीपेक्षा किती वेगळं आहे; पूर्वी मला टाकून दिल्यासारखं, एकटं-एकटं वाटायचं. कोलेट आणि हर्मीननं त्या संध्याकाळी मला दिलेल्या त्या चिठ्ठीनंतर, मला मैत्रीच्या शक्‍तीची प्रचिती आली आहे आणि असे लोक भेटले आहेत जे माझ्यासाठी खास बनले आहेत. या सर्वांपेक्षा, माझी ओळख सर्वात मौल्यवान मित्र यहोवा, याच्याशी झाली आहे. (रोमकर ८:३८, ३९) त्या लहानशा चिठ्ठीनं माझ्या जीवनाचा कायापालटच केला!

[२४ पानांवरील चित्र]

माझ्या आवडत्या खेळण्याचा आवाज मला आठवतो

[२५ पानांवरील चित्रे]

क्षेत्र सेवेत आणि माझे पती, हॅरी यांच्याबरोबर