वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
“जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता” असे म्हणण्यामागे पौलाचा काय अर्थ होता?
येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीच्या स्थापनेविषयी बोलताना पौलाने लिहिले: “जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता.” (१ करिंथकर ११:२५, २६) काहींना वाटते, की येथे वापरण्यात आलेला “जितक्यांदा” या शब्दावरून हे सूचित होते, की ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी वारंवार अर्थात अनेक वेळा साजरा केला पाहिजे. म्हणूनच ते हा स्मारकविधी वर्षातून एकदाच नव्हे तर अनेकदा साजरा करतात. पौलाला हेच म्हणायचे होते का?
येशूने आपल्या मृत्यूच्या स्मारकविधीची स्थापना करून जवळजवळ २,००० वर्षे पूर्ण होत आलीत. तेव्हा, वर्षातून एकदा स्मारकविधी साजरा करण्याचा अर्थ तो सा.यु. ३३ पासून अनेकदा साजरा करण्यात आला आहे. परंतु, १ करिंथकर ११:२५, २६ चा संदर्भ पाहता पौल, किती वेळा स्मारक साजरा केला पाहिजे हे नव्हे तर तो कसा साजरा केला पाहिजे हे सांगत होता. मूळ ग्रीक भाषेत त्याने, “अनेकदा” किंवा “वारंवार” असा अर्थ असलेला पोलाकीस हा शब्द वापरला नाही. तर, त्याने होसाकीस हा शब्द वापरला ज्याचा अर्थ “जितक्यांदा” असा होतो; किंवा “जेव्हा जेव्हा,” “प्रत्येक वेळी” अशा अर्थाचा वाक्यप्रचार त्याने वापरला. म्हणजेच, पौल म्हणत होता की, ‘जेव्हा जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तेव्हा तुम्ही प्रभूच्या मरणाची घोषणा करता.’
मग, येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी किती वेळा साजरा केला पाहिजे? वर्षातून एकदाच साजरा करणे उचित आहे. त्यालाच, स्मारक म्हणतात आणि स्मारके सहसा वर्षातून एकदाच साजरी केली जातात. याशिवाय, येशूचा मृत्यू यहुदी वल्हांडणाच्या दिवशी झाला आणि हा वल्हांडणाचा सण वर्षातून एकदाच साजरा केला जात होता. उचितपणे मग, पौलाने येशू ख्रिस्ताला ‘आपला वल्हांडण’ असे संबोधले; कारण, पहिल्या वल्हांडण बलिदानामुळे इजिप्तमधील इस्राएलींचा ज्येष्ठ वाचला आणि इस्राएल राष्ट्राची दास्यत्वातून सुटका होण्यासाठी ज्याप्रमाणे मार्ग खुला झाला त्याचप्रकारे येशूच्या बलिदानरूपी मृत्यूमुळे आध्यात्मिक इस्राएलकरता मार्ग खुला झाला. (१ करिंथकर ५:७; गलतीकर ६:१६) यहुद्यांच्या वार्षिक वल्हांडणाबरोबर जोडण्यात आलेला हा संबंध, आणखी पुरावा देतो की ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक वर्षातून केवळ एकदाच साजरा केला पाहिजे.
शिवाय, पौलाने येशूच्या मृत्यूची तुलना आणखी एका यहुदी सणाबरोबर, प्रायश्चित्त दिनाबरोबर केली जो वर्षातून एकदाच साजरा केला जात असे. इब्री लोकांस ९:२५, २६ मध्ये आपण असे वाचतो: “जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी [प्रायश्चित दिनी] स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो, तसे त्याला [येशूला] वारंवार स्वतःचे अर्पण करावयाचे नव्हते; . . . पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रगट झाला आहे.” वार्षिक प्रायश्चित्त दिनाच्या बलिदानाची जागा येशूच्या बलिदानाने घेतल्यामुळे त्याच्या मृत्यूचा स्मारक उचितपणे वर्षातून एकदाच साजरा केला जातो. एकापेक्षा अनेक वेळा स्मारकविधी साजरा करण्यासंबंधी शास्त्रवचनांत कोणतेही कारण दिलेले नाही.
या अनुषंगाने, इतिहासकार जॉन लॉरन्स वॉन मोशीम यांनी असा अहवाल दिला की आशिया मायनरमधील दुसऱ्या शतकातील ख्रिश्चनांचा, येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी “पहिल्या यहुदी महिन्याच्या [निसान] चौदाव्या दिवशी” साजरा करण्याचा रिवाज होता. नंतरच्या काळातच खरे तर ख्रिस्ती धर्मजगतात हा स्मारकविधी वर्षातून अनेक वेळा साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.