व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सत्याचे वचन नीट सांगण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

सत्याचे वचन नीट सांगण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

सत्याचे वचन नीट सांगण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

एका वृत्तपत्रात नाटकांची समीक्षा लिहिणारा एक टीकाकार एकदा एक नाटक पाहायला गेला. त्याला काही ते नाटक पसंत पडले नाही, त्यामुळे त्याने त्या संदर्भात असे लिहिले: “पचकळपणाच्या शौकीनांनी हे नाटक अवश्‍य पाहावे.” नाटकाच्या आयोजकांनी नंतर एक जाहिरात प्रसिद्ध केली ज्यात या टीकाकाराच्या समीक्षेतील एक वाक्य उद्धृत केले होते. आणि ते वाक्य म्हणजे, “हे नाटक अवश्‍य पाहावे”! जाहिरातीत टीकाकाराचे अचूक शब्द दिले होते यात शंका नाही, पण मागचा पुढचा संदर्भ न देता हे वाक्य उद्धृत केल्यामुळे टीकाकाराच्या मूळ दृष्टिकोनाचा पूर्णपणे विपर्यास करण्यात आला होता.

या उदाहरणावरून दिसून येते की कोणत्याही विधानाचा संदर्भ किती महत्त्वाचा असतो. संदर्भ वगळून नुसते एखादे विधान उचलल्यास अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. येशूला परीक्षेत पाडण्याच्या प्रयत्नात सैतानाने शास्त्रवचनांचा अशाचप्रकारे विपर्यास केला होता. (मत्तय ४:१-११) दुसरीकडे पाहता, विधानाचा संदर्भ लक्षात घेतला तर आपल्याला त्या विधानाचा अचूक अर्थ अधिक स्पष्टपणे समजू शकतो. म्हणूनच बायबलच्या एखाद्या वचनाचा अभ्यास करताना, त्या वचनाचा संदर्भ किंवा पार्श्‍वभूमी लक्षात घेणे केव्हाही चांगले असते कारण यामुळे लेखक नेमके काय सांगू इच्छितो हे आपल्याला अधिक चांगल्याप्रकारे समजू शकेल.

नीट उपयोग करणे

एका शब्दकोशात संदर्भ या शब्दाची पुढीलप्रमाणे व्याख्या देण्यात आली आहे: “एखाद्या लिखित अथवा तोंडी विधानाचे भाग जे विशिष्ट शब्दाच्या अथवा उताऱ्‍याच्या आधी किंवा नंतर येतात आणि ज्यांचा त्या शब्दाच्या वा उताऱ्‍याच्या अर्थावर अथवा परिणामावर प्रभाव पडतो.” संदर्भ हा शब्द “एका विशिष्ट घटनेशी अथवा प्रसंगाशी संबंधित असलेल्या परिस्थितीला किंवा वस्तूस्थितींना” देखील सूचित करू शकतो. या दुसऱ्‍या अर्थानुसार “संदर्भ” याकरता “पार्श्‍वभूमी” हा पर्यायी शब्द देखील वापरता येईल. प्रेषित पौलाने तीमथ्याला लिहिलेले पुढील शब्द लक्षात घेतल्याने आपल्याला एखाद्या शास्त्रवचनाच्या संदर्भाचा विचार करणे किती महत्त्वाचे आहे हे समजेल: “तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर.” (२ तीमथ्य २:१५) देवाचे वचन नीट सांगण्याकरता आपण त्याचा अर्थ नीट समजून घेणे आणि मग तो प्रामाणिकपणे आणि अचूकपणे इतरांना समजावून सांगणे आवश्‍यक आहे. बायबलचा लेखक यहोवा याच्याबद्दल आदर असल्यास आपल्याला आपोआपच असे करण्याची प्रेरणा मिळेल आणि संदर्भ लक्षात घेणे याकरता विशेष सहायक ठरेल.

दुसरे तीमथ्य याची पार्श्‍वभूमी

उदाहरणार्थ, आपण बायबलमधील दुसरे तीमथ्य या पुस्तकाचे परीक्षण करू या. * आपल्या या परीक्षणाची सुरवात करण्याकरता आपण या पुस्तकाच्या पार्श्‍वभूमीसंबंधी काय प्रश्‍न विचारू शकतो. दुसरे तीमथ्य हे पुस्तक कोणी लिहिले? केव्हा? कोणत्या परिस्थितीत? मग आपण विचारू शकतो, की या पुस्तकाच्या शीर्षकात आढळणाऱ्‍या ‘तीमथ्याचे’ हे पुस्तक लिहिण्यात आले तेव्हा काय स्थिती होती? या पुस्तकातील माहितीची त्याला का गरज होती? या प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला या पुस्तकातील माहिती अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यास मदत करेल आणि आज आपण त्यापासून कशाप्रकारे फायदा मिळवू शकतो हे समजण्यास मदत करेल.

दुसरे तीमथ्य यातील सुरवातीची काही वचने असे सूचित करतात की हे पुस्तक मुळात प्रेषित पौलाने तीमथ्याला लिहिलेले एक पत्र आहे. इतर वचनांवरून असे दिसून येते की पौलाने ते लिहिले तेव्हा त्याला सुवार्तेमुळे तुरुंगात डांबण्यात आले होते. अनेकांनी त्याची साथ सोडून दिल्यामुळे पौलाला वाटत होते की त्याचा अंत आता आला आहे. (२ तीमथ्य १:१५, १६; २:८-१०; ४:६-८) त्याअर्थी, हे पुस्तक त्याने सा.यु. ६५ च्या सुमारास त्याच्या दुसऱ्‍या तुरुंगवासादरम्यान लिहिले असावे. यानंतर लवकरच नीरो याने त्याला मृत्यूदंड ठोठावला.

ही, दुसरे तीमथ्य या पुस्तकाची पार्श्‍वभूमी आहे. पण असे असूनही, पौलाने तीमथ्याला स्वतःच्या समस्या अथवा गाऱ्‍हाणी सांगण्याकरता पत्र लिहिले नाही हे विशेष लक्ष देण्याजोगे आहे. उलट त्याने तीमथ्याला पुढे सोसाव्या लागणाऱ्‍या कठीण परिस्थितीविषयी सावध केले आणि त्याने आपल्या या मित्राला लक्ष विचलित करणाऱ्‍या गोष्टी टाळण्याचे व ‘बलवान होत जाण्याचे’ प्रोत्साहन दिले; तसेच या सूचना इतरांनाही सांगण्याचा त्याने तीमथ्याला सल्ला दिला. या उद्देशाने, की असे केल्यामुळे या लोकांनी देखील आणखी इतर लोकांना मदत करण्यास समर्थ व्हावे. (२ तीमथ्य २:१-७) स्वतः कठीण परिस्थितीतून जात असतानाही इतरांविषयी निःस्वार्थ कळकळ व्यक्‍त करण्याचे किती हे अप्रतिम उदाहरण आहे! आणि आज आपल्याकरता यात किती बोध आहे!

पौलाने तीमथ्याला “प्रिय मुलगा” संबोधले. (२ तीमथ्य १:२) तरुण तीमथ्याचा ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत कित्येकदा पौलाचा विश्‍वासू साथीदार म्हणून उल्लेख येतो. (प्रेषितांची कृत्ये १६:१-५; रोमकर १६:२१; १ करिंथकर ४:१७) पौलाने हे पत्र लिहिले तेव्हा तीमथ्य तिशीत होता—त्याअर्थी अजूनही तरुणच होता. (१ तीमथ्य ४:१२) पण तरीसुद्धा त्याच्या विश्‍वासूपणाचा उत्तम रेकॉर्ड होता कारण त्याने जवळजवळ १४ वर्षे ‘पौलासोबत सेवा’ केली होती. (फिलिप्पैकर २:१९-२२) तीमथ्य अद्याप कमी वयाचा असूनही पौलाने त्याच्यावर, इतर वडिलांना ‘शब्दयुद्ध न करता’ विश्‍वास आणि धीर उत्पन्‍न करण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची ताकीद देण्याची जबाबदारी सोपवली होती. (२ तीमथ्य २:१४) तीमथ्याला मंडळीतील पर्यवेक्षकांना व सेवा सेवकांना नेमण्याचाही अधिकार देण्यात आला होता. (१ तीमथ्य ५:२२) पण कदाचित त्याला या अधिकाराचा वापर करण्यात थोडीबहुत भीती वाटत असावी.—२ तीमथ्य १:६, ७.

या तरुण वडिलासमोर काही गंभीर आव्हाने होती. एक तर, हुमनाय व फिलेत या दोन व्यक्‍ती “पुनरुत्थान होऊन गेले आहे” असे म्हणून, ‘कित्येकांच्या विश्‍वासाचा नाश करत होत्या.’ (२ तीमथ्य २:१७, १८) त्यांचा असा विश्‍वास होता की पुनरुत्थान केवळ एकाच प्रकारचे अर्थात आध्यात्मिक होते आणि ख्रिस्ती जनांकरता हे पुनरुत्थान होऊन गेले होते. ख्रिस्ती जन आपल्या पातकांमुळे मृत झालेले होते पण देवाच्या आत्म्याच्या द्वारे त्यांना जिवंत करण्यात आले या आशयाचे पौलाने केलेले विधान कदाचित ते पुढचा मागचा संदर्भ लक्षात न घेता उद्धृत करत असावेत. (इफिसकर २:१-६) अशाप्रकारचा धर्मत्यागी प्रभाव वाढेल अशी पौलाने ताकीद दिली होती. त्याने लिहिले: “ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, . . . आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल.” (२ तीमथ्य ४:३, ४) पौलाच्या या आगाऊ सूचनेने दाखवून दिले की तीमथ्याने प्रेषित पौलाच्या सल्ल्याचे काळजीपूर्वक पालन करण्याची निकडीची गरज होती.

या पुस्तकाचे आजच्या काळातील महत्त्व

वरील माहितीवरून, आपल्याला दिसून येते की पौलाने दुसरे तीमथ्य हे पुस्तक निदान पुढील कारणांमुळे लिहिले: (१) आपला मृत्यू जवळ आल्याची त्याला खात्री झाली होती, आणि तीमथ्याला आधार देण्याकरता आपण नसू त्या वेळेकरता तीमथ्याला तयार करण्याचा त्याचा प्रयत्न होता. (२) आपल्या देखरेखीखाली असलेल्या मंडळ्यांचे धर्मत्याग व इतर अपायकारक प्रभावांपासून संरक्षण करण्याची त्याची इच्छा होती. (३) त्याला तीमथ्याला यहोवाच्या सेवेत व्यस्त राहण्याचे आणि खोट्या शिकवणुकींविरुद्ध खंबीर भूमिका घेताना प्रेरित शास्त्रवचनांच्या अचूक ज्ञानावर अवलंबून राहण्याचे प्रोत्साहन द्यायचे होते.

ही पार्श्‍वभूमी समजून घेतल्यामुळे दुसरे तीमथ्य हे पुस्तक आपल्याकरता अधिक अर्थपूर्ण बनते. आजही हुमनाय आणि फिलेत यांच्यासारखे काही धर्मत्यागी आहेत जे स्वतःच्या विचारांचा पुरस्कार करून आपल्या विश्‍वासाचा नाश करू इच्छितात. शिवाय, पौलाने भाकीत केलेले ‘शेवटल्या काळातील कठीण दिवस’ देखील आले आहेत. पौलाच्या पुढील सूचनेची सत्यता अनेकांनी अनुभवली आहे: “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्‍तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.” (२ तीमथ्य ३:१, १२) आपण कशाप्रकारे खंबीर राहू शकतो? तीमथ्याप्रमाणे आपण यहोवाची अनेक वर्षांपासून सेवा केलेल्यांच्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे. तसेच वैयक्‍तिक अभ्यास, प्रार्थना आणि ख्रिस्ती सहचर्य यांद्वारे आपण यहोवाच्या अपात्री कृपेने ‘बलवान होऊ’ शकतो. शिवाय, अचूक ज्ञानाच्या शक्‍तीवर विश्‍वास ठेवून आपण पौलाच्या उपदेशाकडे लक्ष देऊ शकतो: ‘सुवचनांचा नमुना दृढपणे राख.’—२ तीमथ्य १:१३.

“सुवचनांचा नमुना”

पौल ज्यांविषयी बोलला ती ‘सुवचने’ काय होती? त्याने खऱ्‍या ख्रिस्ती सिद्धान्ताच्या संदर्भात या शब्दाचा उपयोग केला. तीमथ्याला लिहिलेल्या पहिल्या पत्रात, पौलाने स्पष्ट केले की ‘सुवचने’ ही मुळात “प्रभू येशू ख्रिस्ताची” आहेत. (१ तीमथ्य ६:३) सुवचनांच्या नमुन्याचे अनुकरण केल्यामुळे एका व्यक्‍तीला सुजाण मन, प्रेमळ मनोवृत्ती राखण्यास आणि इतरांबद्दल विचारपूर्वक असण्यास मदत मिळू शकते. येशूचे सेवाकार्य आणि शिकवणुकी सबंध बायबलमधील इतर शिकवणुकींच्या एकवाक्यतेत असल्यामुळे ‘सुवचने’ हा शब्द पर्यायाने बायबलच्या सर्व शिकवणुकींना लागू होतो.

सर्व ख्रिस्ती वडिलांप्रमाणेच तीमथ्याकरताही सुवचनांचा नमुना एका ‘चांगल्या ठेवीप्रमाणे’ होता ज्याला राखावयाचे होते. (२ तीमथ्य १:१३, १४) तीमथ्याला ‘वचनाची घोषणा करण्यास, सुवेळी अवेळी तयार राहण्यास, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखवण्यास, निषेध करण्यास व बोध करण्यास’ सांगण्यात आले होते. (२ तीमथ्य ४:२) तीमथ्याच्या काळात धर्मत्यागी शिकवणुकी पसरत होत्या हे लक्षात घेतल्यावर आपल्याला समजते की पौलाने सुवचनांचे शिक्षण देण्यावर इतक्या निकडीने का जोर दिला. तसेच तीमथ्याला सहनशीलतेने व उत्तम शिक्षण कौशल्यासहित ‘दोष दाखवून, निषेध करून व बोध करून’ कळपाचे संरक्षण करण्याची गरज पडणार होती हेही आपल्याला समजते.

कोणाला वचनाची घोषणा करण्यास तीमथ्याला सांगण्यात आले होते? संदर्भावरून दिसून येते की तीमथ्याला एक वडील या नात्याने ख्रिस्ती मंडळीत वचनाची घोषणा करावयाची होती. विरोधकांनी आणलेल्या दबावांचा विचार करता, तीमथ्याला मानवी तत्त्वज्ञानाची, वैयक्‍तिक कल्पनांची किंवा निरुपयोगी अंदाजांची नव्हे तर आपले आध्यात्मिक संतुलन कायम राखून देवाच्या वचनाची धैर्याने घोषणा करायची होती. अर्थात, चुकीच्या मनोवृत्तीच्या काही लोकांकडून त्याला विरोध होण्याची शक्यता होती. (२ तीमथ्य १:६-८; २:१-३, २३-२६; ३:१४, १५) पण पौलाच्या सल्ल्याचे पालन केल्यामुळे तीमथ्याला पौलाप्रमाणेच धर्मत्यागाला विरोध करण्यास सामर्थ्य प्राप्त होणार होते.—प्रेषितांची कृत्ये २०:२५-३२.

वचनाची घोषणा करण्यासंबंधी पौलाचे शब्द मंडळीच्या बाहेरच्या लोकांना प्रचार करण्यासंबंधी लागू होतात का? होय, होतात आणि हे आपल्याला संदर्भावरून दिसून येते. पौल पुढे म्हणतो: “तू तर सर्व गोष्टींविषयी सावध ऐस, दुःखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर.” (२ तीमथ्य ४:५) सुवार्ता प्रचार—अर्थात तारणाची सुवार्ता अविश्‍वासू जनांना घोषित करणे हा ख्रिस्ती सेवाकार्यातील केंद्रबिंदू आहे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) आणि ज्याप्रकारे देवाचे वचन “अवेळी” देखील मंडळीत घोषित केले जाते त्याचप्रकारे आपण देखील कठीण परिस्थितीत असतानाही मंडळीच्या बाहेरच्या लोकांना वचनाची घोषणा करत राहतो.—१ थेस्सलनीकाकर १:६.

आपल्या सर्व प्रचार व शिक्षणाच्या कामाचा आधार म्हणजे देवाचे वचन. आपल्याला बायबलवर पूर्ण विश्‍वास आहे. पौलाने तीमथ्याला सांगितले: “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍याकरिता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६) हे शब्द सहसा बायबल हे देवाचे प्रेरित वचन आहे हे सिद्ध करण्याकरता अचूकपणे उद्धृत केले जातात. पण हे शब्द लिहिण्यामागे पौलाचा काय उद्देश होता?

पौल एका वडिलाशी बोलत होता; एका अशा वडिलाशी ज्याला मंडळीत ‘दोष दाखवण्याचा, सुधारणूक करण्याचा, नीतिशिक्षण देण्याचा’ अधिकार होता. त्याअर्थी तो तीमथ्याला लहानपणापासून ज्याविषयी त्याला बोध मिळाला होता त्या प्रेरित वचनाच्या सुज्ञतेवर विश्‍वास ठेवण्याची आठवण करून देत होता. वडिलांना देखील तीमथ्याप्रमाणेच वेळोवेळी चुका करणाऱ्‍यांचे दोष दाखवावे लागतात. असे करत असताना त्यांनी नेहमी बायबलवर विश्‍वास ठेवला पाहिजे. शिवाय, शास्त्रवचने देवाने प्रेरित केलेली असल्यामुळे त्यांच्या आधारावर दिलेली सुधारणूक साहजिकच देवाकडून असलेली सुधारणूक आहे. बायबलवर आधारित असलेली सुधारणूक झिडकारणारे खरे तर कोणा मानवांचे विचार नव्हे तर यहोवाकडून येणारा प्रेरित सल्ला नाकारत असतात.

दुसरे तीमथ्य यात किती मोठ्या प्रमाणात ईश्‍वरी बुद्धी सापडते! आणि आपण यातील सल्ला संदर्भासहित विचारात घेतो तेव्हा तो किती अधिक अर्थपूर्ण वाटू लागतो! या लेखात आपण या पुस्तकातील अद्‌भुत, प्रेरित माहितीची केवळ वरकरणी माहिती लक्षात घेतली पण बायबलमध्ये आपण जे काही वाचतो त्याचा संदर्भ लक्षात घेणे किती महत्त्वाचे आहे हे दाखवण्याकरता हे पुरेसे आहे. आपण खरोखरच ‘सत्याचे वचन नीट’ सांगत आहोत याची खात्री करण्याकरता हे आपली मदत करेल.

[तळटीप]

^ परि. 7 अधिक माहितीकरता, शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी या यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातील खंड २, पृष्ठे ११०५-८ यावर पाहा.

[२७ पानांवरील चित्र]

पौलाने तीमथ्याला मंडळ्यांचे संरक्षण करण्यास सांगितले

[३० पानांवरील चित्र]

पौलाने तीमथ्याला प्रेरित वचनातील सुबुद्धीवर विश्‍वास ठेवण्याची आठवण करून दिली