व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आधी आणि पश्‍चात देवाच्या वचनाचा प्रभाव

आधी आणि पश्‍चात देवाच्या वचनाचा प्रभाव

“देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल”

आधी आणि पश्‍चात देवाच्या वचनाचा प्रभाव

टोनीने नुकतेच किशोरावस्थेत पदार्पण केले होते तेव्हा तुम्ही त्याला भेटला असता तर तुम्हाला एक उद्धट, मारामारी करणारा व ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतील बदनाम ठिकाणी जाणारा मुलगा दिसला असता. त्याचे दोस्त गुंड होते. ते सहसा चोऱ्‍या, टोळी युद्ध आणि रस्त्यावरील गोळीबार यात सामील होत असत.

टोनी नऊ वर्षांचा होता तेव्हापासून धूम्रपान करू लागला. १४ वर्षांचा होईपर्यंत तो नियमितपणे गांजा ओढू लागला होता आणि त्याला वाईट वळण लागले होते. १६ वर्षांचा होईपर्यंत तो हेरोईनचा व्यसनी झाला, नंतर तो कोकेन आणि एलएसडीसारखे मादक पदार्थही घेऊ लागला. किंबहुना, टोनी म्हणतो, “नशा आणणारा कसलाही पदार्थ मी घेऊ लागलो होतो.” त्यानंतर दोन कुप्रसिद्ध गुन्हेगार टोळींशी अंमली पदार्थांसाठी त्याने संबंध जोडले. बघता बघता, ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्‍यावर अंमली पदार्थांचा पुरवठा करणारा सर्वात विश्‍वसनीय व्यक्‍ती म्हणून त्याची ख्याती होती.

टोनीच्या हेरोईन आणि गांजा ओढण्याच्या सवयीमुळे त्याला दिवसाला ८,००० ते १६,००० रुपये खर्च करावे लागत होते. पण त्याच्या कुटुंबाला याचा भुर्दंड बसत होता. तो म्हणतो, “आम्ही राहायचो त्या ठिकाणी कित्येकदा गुन्हेगार, अंमली पदार्थ आणि पैशांकरता येऊन मला आणि माझ्या पत्नीला बंदूक आणि चाकूचा धाक दाखवायचे.” तीन वेळा तुरुंगात जाऊन आल्यावर टोनीने आपल्या जीवनशैलीचे परीक्षण करायचा निर्णय घेतला.

टोनी चर्चला जात होता परंतु नरकामध्ये शिक्षा म्हणून सर्वकाळासाठी पापी लोकांना जाळणाऱ्‍या देवाबद्दल त्याला आपुलकी वाटत नव्हती. पण दोन यहोवाच्या साक्षीदारांनी टोनीला भेट दिल्यावर देव अशी व्यक्‍ती नाही हे जाणून त्याला फार आश्‍चर्य वाटले. शिवाय, आपल्या जीवनात बदल करून तो देवाकडून आशीर्वाद प्राप्त करू शकतो हे ऐकून तर त्याला अधिकच आनंद झाला. येशू ख्रिस्ताचे हे शब्द टोनीकरता हृदयस्पर्शी ठरले: “देवाला सर्व काही शक्य आहे.” (मार्क १०:२७) खासकरून पुढील प्रोत्साहक शब्दांचा टोनीवर अधिक प्रभाव पडला: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.”—याकोब ४:८.

आता टोनीसमोर बायबल दर्जांनुसार आपल्या जीवनात बदल करण्याचे आव्हान होते. तो म्हणतो: “सर्वात आधी मी धूम्रपान सोडले; हा प्रयत्न मी आधी कित्येकदा करून फसलो होतो. यहोवाच्या मदतीने मी, १५ वर्षांपासून मला जखडून ठेवलेल्या हेरोईन आणि गांजासारख्या अंमली पदार्थांच्या विळख्यातून सुटू शकलो. या सवयी मी सोडू शकेन असं मला कधीच वाटलं नव्हतं.”

नरकात लोकांना सर्वकाळची यातना देणाऱ्‍या देवाची (बायबलमध्ये कोठेही न सापडणारी एक शिकवण) भीती बाळगण्याऐवजी टोनी आणि त्याच्या पत्नीने परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाच्या आशेचा स्वीकार केला. (स्तोत्र ३७:१०, ११; नीतिसूत्रे २:२१) टोनी कबूल करतो, “देवाच्या दर्जांनुरूप माझ्या जीवनात फेरबदल करायला मला पुष्कळ वेळ लागला आणि फार कठीणही गेले, पण यहोवाच्या मदतीने मी हे करू शकलो.”

होय, पूर्वी अंमली पदार्थांचा व्यसनी असलेला हा मनुष्य एक ख्रिस्ती बनला. त्याने व त्याच्या पत्नीने स्वेच्छेने आपला वेळ आणि साधनसंपत्ती देऊन बायबलच्या शैक्षणिक कार्यात हजारो तास घालवले आहेत. देवाला भिऊन वागणाऱ्‍या दोन मुलांचेही ते संगोपन करत आहेत. हा पूर्ण स्वरूपाचा बदल केवळ देवाचे वचन, बायबल याच्या शक्‍तिशाली प्रभावामुळे शक्य झाला आहे. प्रेषित पौलाने म्हटल्याप्रमाणे खरोखरच “देवाचे वचन सजीव, सक्रिय” आहे.—इब्री लोकांस ४:१२.

अशी सकारात्मक उदाहरणे असतानाही, यहोवाच्या साक्षीदारांचे बायबल-आधारित शैक्षणिक कार्य कुटुंबांचा नाश करते आणि तरुण लोकांमधील हितकर नीतिमूल्ये नष्ट करते असा काहीजण खोटा आरोप लावतात. टोनीच्या उदाहरणाने या आरोपाला निश्‍चितच खोटे ठरवले आहे.

टोनीप्रमाणे अनेकांनी जाणले आहे की, घातक ठरणाऱ्‍या व्यसनांवर मात करणे शक्य आहे. कसे? देवावर विश्‍वास ठेवून आणि त्याच्यावर व त्याच्या वचनावर भरवसा ठेवून त्याचप्रमाणे काळजी करणाऱ्‍या आणि प्रेमळ ख्रिस्ती साथीदारांची मदत घेऊन हे शक्य आहे. टोनी आनंदाने म्हणतो: “बायबलची तत्त्वे माझ्या मुलांकरता संरक्षण देणारी कशी ठरली आहेत हे मी पाहिले आहे. बायबलच्या शिकवणींनी माझे वैवाहिक जीवन उद्ध्‌वस्त होण्यापासून वाचले. शिवाय माझे शेजारीही शांतीने झोपू शकतात कारण आता त्यांना माझ्याकडून कसलाही धोका नाही.”

[९ पानांवरील संक्षिप्त आशय]

‘१५ वर्षांपासून मला जखडून ठेवलेल्या अंमली पदार्थांच्या विळख्यातून मी यहोवाच्या सामर्थ्याने सुटू शकलो’

[९ पानांवरील चौकट]

बायबल तत्त्वांचा परिणाम

बायबलच्या विविध तत्त्वांनी अंमली पदार्थांचे व्यसन असलेल्या अनेकांना या कमकुवत बनवणाऱ्‍या सवयीपासून मुक्‍त केले आहे. यांपैकी काही तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत:

“देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.” (२ करिंथकर ७:१) अंमली पदार्थ घेणे देवाच्या नियमाविरुद्ध आहे.

“परमेश्‍वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय; आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय.” (नीतिसूत्रे ९:१०) अचूक ज्ञानामुळे देवाबद्दल आणि त्याच्या मार्गांबद्दल आदरयुक्‍त भय असल्यामुळे अनेकांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून सुटका प्राप्त करायला मदत मिळाली आहे.

“तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीतिसूत्रे ३:५, ६) देवावर अंतकरणातून भरवसा ठेवून आणि त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहून नाशकारक सवयींपासून मुक्‍त होता येते.