व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला सुवार्तेवर खरोखर विश्‍वास आहे का?

तुम्हाला सुवार्तेवर खरोखर विश्‍वास आहे का?

तुम्हाला सुवार्तेवर खरोखर विश्‍वास आहे का?

“देवाचे राज्य जवळ आले आहे; पश्‍चात्ताप करा व सुवार्तेवर विश्‍वास ठेवा.”—मार्क १:१५.

१, २. मार्क १:१४, १५ ही वचने तुम्ही कशी स्पष्ट कराल?

सा.यु. ३०. येशू ख्रिस्ताने नुकतेच गालीलात आपले सेवाकार्य सुरू केले होते. तो “देवाची सुवार्ता” गाजवीत होता आणि कित्येक गालीलकर त्याच्या पुढील विधानामुळे प्रेरित झाले: “काळाची [“नियुक्‍त वेळेची,” NW] पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे; पश्‍चात्ताप करा व सुवार्तेवर विश्‍वास ठेवा.”—मार्क १:१४, १५.

येशूने आपले सेवाकार्य सुरू करण्याची आणि लोकांनी देवाची संमती मिळवण्याकरता योग्य निर्णय घेण्याची ‘नियुक्‍त वेळ’ तेव्हा आली होती. (लूक १२:५४-५६) ‘देवाचे राज्य जवळ आले होते’ कारण त्या राज्याचा नियुक्‍त राजा येशू तेथे होता. त्याच्या प्रचार कार्याने सात्विक हृदयाच्या लोकांना पश्‍चात्ताप करण्याची प्रेरणा दिली. पण आपला “सुवार्तेवर विश्‍वास” असल्याचे त्यांनी कसे प्रकट केले आणि आज आपण ते कसे प्रकट करू शकतो?

३. काय करण्याद्वारे लोकांनी आपला सुवार्तेवर विश्‍वास असल्याचे दाखवले आहे?

येशूप्रमाणे प्रेषित पेत्रानेही लोकांना पश्‍चात्ताप करण्याचा आग्रह केला. सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी जेरूसलेम येथे यहुद्यांना संबोधून बोलताना पेत्राने म्हटले: “पश्‍चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.” हजारो जणांनी पश्‍चात्ताप केला, बाप्तिस्मा घेतला आणि ते येशूचे अनुयायी बनले. (प्रेषितांची कृत्ये २:३८, ४१; ४:४) सा.यु. ३६ साली पश्‍चात्तापी गैरयहुदी लोकांनीही ही पावले उचलली. (प्रेषितांची कृत्ये १०:१-४८) आपल्या काळातही सुवार्तेवर विश्‍वास ठेवल्यामुळे हजारो लोक आपल्या पापांविषयी पश्‍चात्ताप करून देवाला समर्पण करत आहेत व बाप्तिस्मा घेत आहेत. त्यांनी तारणाची सुवार्ता अंगीकारली आहे आणि येशूच्या खंडणी बलिदानावर ते विश्‍वास ठेवत आहेत. शिवाय ते नीतिमत्तेने चालत आहेत आणि त्यांनी देवाच्या राज्याचा पक्ष घेतला आहे.

४. विश्‍वास म्हणजे काय?

पण विश्‍वास म्हणजे काय? प्रेषित पौलाने लिहिले: “विश्‍वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्‍या गोष्टींबद्दलची खातरी आहे.” (इब्री लोकांस ११:१) या विश्‍वासामुळेच आपल्याला पूर्ण खात्री आहे की देवाने आपल्या वचनात प्रतिज्ञा केलेली प्रत्येक गोष्ट जणू ती घडल्याप्रमाणे आहे. जणू विशिष्ट मालमत्ता आपल्या मालकीची आहे हे घोषित करणारे खरेदीखत आपल्याजवळ आहे. विश्‍वास हा न पाहिलेल्या गोष्टींबद्दलची “खातरी” किंवा भरवसा ठेवण्याकरता ठोस आधार आहे. मानसिक आकलन झाल्यामुळे आणि अंतःकरणापासून कदर वाटत असल्यामुळे, ज्या गोष्टी आपण पाहिलेल्या नाहीत त्या देखील आपल्याला अगदी खऱ्‍या वाटतात.—२ करिंथकर ५:७; इफिसकर १:१८.

आपल्याला विश्‍वासाची गरज आहे!

५. विश्‍वास इतका महत्त्वाचा का आहे?

आपल्या सर्वांच्या उपजत आध्यात्मिक गरजा आहेत पण विश्‍वास हा उपजत मिळालेला नाही. किंबहुना बायबल म्हणते, “सर्वांच्या ठायी विश्‍वास आहे असे नाही.” (२ थेस्सलनीकाकर ३:२) पण देवाच्या प्रतिज्ञांची पूर्तता अनुभवायची असेल तर ख्रिश्‍चनांनी विश्‍वास ठेवणे आवश्‍यक आहे. (इब्री लोकांस ६:१२) विश्‍वासाची अनेक उदाहरणे सांगितल्यावर पौलाने म्हटले: “तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो म्हणून आपणहि सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे; आपण आपल्या विश्‍वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्‍याच्याकडे पाहत असावे.” (इब्री लोकांस १२:१, २) “सहज गुंतविणारे पाप” म्हणजे काय आहे? हे पाप म्हणजे विश्‍वासाचा अभाव किंवा एकेकाळी वाटत असलेला विश्‍वास पूर्णपणे गमावून बसणे. आपला विश्‍वास मजबूत ठेवण्याकरता आपण “येशू ह्‍याच्याकडे पाहत असावे” आणि त्याच्या आदर्शाचे अनुकरण करावे. तसेच आपण अनैतिकतेचा धिक्कार केला पाहिजे, देहाच्या कामांविरुद्ध लढा दिला पाहिजे आणि भौतिकवाद, जगिक तत्त्वज्ञान आणि शास्त्रवचनांच्या विरोधात असलेल्या रूढीपरंपरा टाळल्या पाहिजेत. (गलतीकर ५:१९-२१; कलस्सैकर २:८; १ तीमथ्य ६:९, १०; यहूदा ३, ४) शिवाय, देव आपल्यासोबत आहे आणि त्याच्या वचनातील मार्गदर्शन आपल्याकरता खरोखर उपयुक्‍त आहे याची आपल्याला खात्री असली पाहिजे.

६, ७. विश्‍वासाकरता प्रार्थना करणे का उचित आहे?

आपण स्वतःच्या बळावर विश्‍वास उत्पन्‍न करू शकत नाही. विश्‍वास हा देवाच्या आत्म्याच्याद्वारे अर्थात त्याच्या सक्रिय शक्‍तीच्याद्वारे निष्पन्‍न होणाऱ्‍या फळात समाविष्ट असलेला गुण आहे. (गलतीकर ५:२२, २३) आपला विश्‍वास मजबूत करायचा असेल तर आपण काय करावे? येशूने म्हटले: “तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?” (लूक ११:१३) होय, आपण पवित्र आत्म्याकरता प्रार्थना करू या कारण तो आपल्यात अतिशय कठीण परिस्थितीतही देवाची इच्छा पूर्ण करण्याकरता लागणारा विश्‍वास उत्पन्‍न करू शकतो.—इफिसकर ३:२०.

अधिक विश्‍वासाकरता प्रार्थना करणे उचित आहे. येशू एका लहान मुलामधून दुरात्मा बाहेर काढणार होता तितक्यात त्या मुलाच्या पित्याने अशी विनंती केली: “माझा विश्‍वास आहे, पण तो अधिक वाढावा म्हणून तुम्हीच मला साहाय्य करा.” (मार्क ९:२४, सुबोध भाषांतर) येशूच्या शिष्यांनी म्हटले: “आमचा विश्‍वास वाढवा.” (लूक १७:५) त्यामुळे आपण विश्‍वासाकरता प्रार्थना करत राहू, या आत्मविश्‍वासाने की देव अशा प्रार्थनांचे उत्तर देतो.—१ योहान ५:१४.

देवाच्या वचनावर विश्‍वास अतिशय महत्त्वाचा

८. देवाच्या वचनावरील विश्‍वासामुळे आपल्याला कशाप्रकारे साहाय्य प्राप्त होते?

येशूने आपल्या जीवनाचे बलिदान देण्याच्या केवळ काही काळाआधी आपल्या अनुयायांना सांगितले: “तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्‍वास ठेवा आणि माझ्यावरहि विश्‍वास ठेवा.” (योहान १४:१) ख्रिस्ती या नात्याने आपला देवावर आणि त्याच्या पुत्रावर विश्‍वास आहे. पण देवाच्या वचनाविषयी काय? आपण त्याचा अभ्यास केला आणि त्यातील मार्गदर्शन व सल्ला आपल्याकरता सर्वात उत्तम आहे असा पूर्ण विश्‍वास बाळगून त्यानुसार वागलो तर देवाचे हे वचन आपल्या जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घडवून आणू शकते.—इब्री लोकांस ४:१२.

९, १०. याकोब १:५-८ येथे विश्‍वासासंबंधी जे म्हटले आहे त्याचे तुम्ही कशाप्रकारे स्पष्टीकरण द्याल?

आपण अपरिपूर्ण मानव असल्यामुळे आपले जीवन दुःखाने परिपूर्ण आहे. पण देवाच्या वचनावर विश्‍वास ठेवल्यास तो आपला खरोखर सहायक ठरू शकतो. (ईयोब १४:१) उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट परीक्षेला कसे तोंड द्यावे हे आपल्याला कळत नसेल. देवाचे वचन आपल्याला असा सल्ला देते: “जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्‍वासाने मागावे; कारण संशय धरणारा वाऱ्‍याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यांत चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये.”—याकोब १:५-८.

१० ज्ञानात कमी पडल्यामुळे प्रार्थना केल्याबद्दल यहोवा देव आपल्याला दोष लावणार नाही. उलट आपल्या परीक्षाप्रसंगाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहण्याकरता तो आपली मदत करेल. आपल्या सहविश्‍वासू बांधवांकडून किंवा आपल्या स्वतःच्या अभ्यासातून मदतदायी शास्त्रवचनांची कदाचित तो आपल्याला आठवण करून देईल. किंवा दुसऱ्‍या कोणत्या मार्गाने यहोवाचा पवित्र आत्मा आपली मदत करेल. आपण ‘संशय न धरता विश्‍वासाने मागत राहिलो’ तर यहोवा आपल्या परीक्षांना तोंड देण्याकरता लागणारे सुज्ञान आपल्याला अवश्‍य देईल. पण आपण वाऱ्‍याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखे असलो तर देवाकडून काहीही मिळण्याची आपल्याला अपेक्षा करता येणार नाही. का? कारण याचा अर्थ आपण प्रार्थनेच्या किंवा इतर गोष्टींच्या बाबतीत—अगदी विश्‍वास धरण्याच्या बाबतीतही चंचल आणि द्विबुद्धीचे आहोत. म्हणूनच आपला देवाच्या वचनावर आणि त्यातील मार्गदर्शनावर दृढ विश्‍वास असणे गरजेचे आहे. देवाचे वचन कशाप्रकारे साहाय्य व मार्गदर्शन पुरवते याची काही उदाहरणे पाहू या.

विश्‍वास व मूलभूत गरजा

११. देवाच्या वचनावरील विश्‍वासामुळे आपल्या दररोजच्या गरजांसंबंधी आपल्याला कोणते आश्‍वासन मिळते?

११ सध्या कदाचित आपल्या जीवनावश्‍यक गरजा भागत नसतील किंवा आपण गरिबीत दिवस कंठत असू. देवाच्या वचनावरील विश्‍वास आपल्यालाही ही खात्री देतो की यहोवा आपल्या दररोजच्या गरजांची काळजी वाहील आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांकरता भविष्यात सर्वकाही विपुल प्रमाणात पुरवेल. (स्तोत्र ७२:१६; लूक ११:२, ३) यहोवाने आपला संदेष्टा एलीया याच्याकरता दुष्काळी परिस्थितीत कशाप्रकारे अन्‍न पुरवले यावर विचार केल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळू शकते. नंतर देव, पीठ व तेलाचा चमत्कारिकपणे पुरवठा करत गेला व त्यामुळे एक स्त्री, तिचा पुत्र आणि एलीया जिवंत राहू शकले. (१ राजे १७:२-१६) त्याचप्रकारे बॅबिलोनने जेरूसलेम शहराला वेढा दिला होता तेव्हा यहोवाने यिर्मया संदेष्ट्याकरताही अशाचप्रकारे अन्‍न पुरवले होते. (यिर्मया ३७:२१) यिर्मया व एलीया यांना पोटभर जेवण मिळत नसले तरीसुद्धा यहोवाने त्यांची काळजी घेतली. आजही त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांकरता तो असेच करतो.—मत्तय ६:११, २५-३४.

१२. पोट भरण्यापुरते मिळवण्यास विश्‍वास आपले कसे साहाय्य करेल?

१२ विश्‍वास ठेवल्यामुळे व बायबलच्या तत्त्वांचे पालन केल्यामुळे आपण कदाचित श्रीमंत होणार नाही, पण निदान पोट भरण्यापुरते आपल्याला निश्‍चितच मिळेल. उदाहरणार्थ: बायबल आपल्याला प्रामाणिक, कुशल व मेहनती असण्याचा सल्ला देते. (नीतिसूत्रे २२:२९; उपदेशक ५:१८, १९; २ करिंथकर ८:२१) कामकरी म्हणून उत्तम नाव कमावण्याचे महत्त्व आपण कधीही क्षुल्लक लेखू नये. चांगल्या पगाराच्या नोकऱ्‍या मिळणे कठीण आहे अशा ठिकाणीही, प्रामाणिक, कुशल व मेहनती कामगारांचा इतरांपेक्षा चांगला निभाव लागतो. या कामकऱ्‍यांजवळ कदाचित भौतिक दृष्टीने फारसे नसेल, पण त्यांच्या मूलभूत गरजा सहसा पूर्ण होतात आणि स्वकष्टाने कमवलेली भाकर खाण्याचे समाधान त्यांना मिळते.—२ थेस्सलनीकाकर ३:११, १२.

विश्‍वास धीराने दुःख सोसण्यास साहाय्य करतो

१३, १४. विश्‍वास आपल्याला दुःख सोसण्यास कशी मदत करतो?

१३ आपल्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा दुःखी होणे स्वाभाविक आहे, हे देवाच्या वचनात नमूद करण्यात आले आहे. विश्‍वासू कुलपिता अब्राहाम याच्या प्रिय पत्नीचा अर्थात साराचा मृत्यू झाला तेव्हा त्याने शोक व विलाप केला. (उत्पत्ति २३:२) दाविदालाही आपला पुत्र अबशालोम गेल्याची बातमी कळली तेव्हा तो शोकमग्न झाला. (२ शमुवेल १८:३३) परिपूर्ण पुरुष येशू देखील आपला मित्र लाजार याचा मृत्यू झाल्यावर रडला. (योहान ११:३५, ३६) प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा आपल्याला असह्‍य दुःख होते, पण देवाच्या वचनातील प्रतिज्ञांवर असलेला विश्‍वास आपल्याला हे दुःख सोसण्यास मदत करतो.

१४ पौलाने म्हटले: ‘नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल अशी आशा मी देवाकडे पाहून धरितो.’ (प्रेषितांची कृत्ये २४:१५) आपणही असंख्य मृतांना परत जिवंत करण्याच्या देवाच्या तरतुदीवर विश्‍वास ठेवला पाहिजे. (योहान ५:२८, २९) यांत अब्राहाम व सारा, इसहाक व रिबेका, याकोब व लिआ हे सर्व असतील, जे आज मृतावस्थेत असून देवाच्या नव्या जगात त्यांचे पुनरुत्थान होईल. (उत्पत्ति ४९:२९-३२) या सर्व प्रिय व्यक्‍ती या पृथ्वीवर जगण्याकरता पुन्हा जिवंत होतील तो किती आनंदाचा क्षण असेल! (प्रकटीकरण २०:११-१५) दरम्यान, आपला विश्‍वास सर्व दुःखे तर काढून टाकणार नाही, पण तो आपल्याला देवाच्या समीप राहण्यास मदत करेल आणि देवच आपल्याला आपले दुःख सहन करण्यास मदत करेल.—स्तोत्र १२१:१-३; २ करिंथकर १:३.

विश्‍वास निराश झालेल्यांना बळ देतो

१५, १६. (अ) विश्‍वास बाळगणाऱ्‍यांना निराशेच्या भावना येणे नवलाचे नाही असे का म्हणता येईल? (ब) निराशेच्या भावनांवर मात करण्याकरता काय केले जाऊ शकते?

१५ देवाचे वचन दाखवते की विश्‍वास बाळगणारेही निराशेला बळी पडू शकतात. ईयोबाला कठीण परीक्षेला तोंड द्यावे लागले तेव्हा त्याला वाटले की देवाने त्याला त्यागले आहे. (ईयोब २९:२-५) जेरूसलेम व त्याच्या पडलेल्या तटांचा विचार करून नहेम्या खिन्‍न झाला. (नहेम्या २:१-३) येशूला नाकारल्यानंतर पेत्राला इतके वाईट वाटले की तो “मोठ्या दुःखाने रडला.” (लूक २२:६२) आणि पौलाने थेस्सलनीका मंडळीतील सह विश्‍वासू बांधवांना असे प्रोत्साहन दिले की त्यांनी ‘निराश झालेल्यांचे सांत्वन करावे.’ (१ थेस्सलनीकाकर ५:१४, NW) म्हणून, आजही विश्‍वास बाळगणारे कधीकधी निराश होतात हे काही नवल नाही. निराशेच्या भावनांना आपण कसे तोंड द्यावे?

१६ कदाचित आपण एकाच वेळी अनेक गंभीर समस्यांना तोंड देत असल्यामुळे निराश झालो असू. पण अशावेळी, आपल्यावर एक मोठे संकट कोसळले आहे असे समजण्याऐवजी बायबलच्या तत्त्वांचे पालन करण्याद्वारे आपण एकेका समस्येचे निरसन करण्याचा प्रयत्न करू शकतो. असे केल्याने आपली निराशा कमी होऊ शकते. तसेच कामाच्या बाबतीत संतुलन राखण्याद्वारे आणि पुरेशी विश्रांती घेतल्यानेही आपल्याला मदत मिळू शकेल. एक गोष्ट पक्की आहे: देवावरील व त्याच्या वचनावरील विश्‍वासामुळे आपले आध्यात्मिक आरोग्य सुधारते कारण यहोवा आपली काळजी वाहतो हा आपला आत्मविश्‍वास अधिक बळकट होतो.

१७. यहोवाला आपली काळजी आहे हे आपल्याला कसे समजते?

१७ पेत्र हे सांत्वनदायक आश्‍वासन देतो: “देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्‍यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे; त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.” (१ पेत्र ५:६, ७) स्तोत्रकर्त्याने म्हटले: “पतन पावणाऱ्‍या सर्वांना परमेश्‍वर आधार देतो व वाकलेल्या सर्वांना उभे करितो.” (स्तोत्र १४५:१४) आपण या सर्व अभिवचनांवर भरवसा बाळगला पाहिजे कारण ते देवाच्या वचनात सापडतात. निराशेच्या भावना लगेच निघून जाणार नाहीत, पण आपण आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्यावर सर्व चिंता सोपवू शकतो ही जाणीव आपल्या विश्‍वासास बळकट करत नाही का?

विश्‍वास व इतर परीक्षा

१८, १९. विश्‍वास आपल्याला आजारपणाला तोंड देण्यास व सह विश्‍वासू बांधवांना सांत्वन देण्यास कशी मदत करतो?

१८ आपल्या स्वतःला किंवा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्‍तीला गंभीर आजारपणाला तोंड द्यावे लागते तेव्हा आपल्या विश्‍वासाची परीक्षा होऊ शकते. एपफ्रदीत, तीमथ्य व त्रफिम यांचे आजारपण चमत्कारिकपणे दूर केले गेले असे बायबलमध्ये कोठेही सांगितलेले नाही, पण तरीसुद्धा यहोवाने या सर्वांना सहनशक्‍ती दिली यात शंका नाही. (फिलिप्पैकर २:२५-३०; १ तीमथ्य ५:२३; २ तीमथ्य ४:२०) शिवाय, स्तोत्रकर्त्याने, “जो दीनांची चिंता वाहतो” त्याच्याविषयी भजनात असे म्हटले: “तो रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्‍वर त्याला सांभाळील, तो रोगी असता तू त्याचे अंथरूण बदलितोस.” (स्तोत्र ४१:१-३) स्तोत्रकर्त्याचे शब्द आजारी सहविश्‍वासू बांधवांना सांत्वन देण्याकरता आपली कशाप्रकारे मदत करतात?

१९ आध्यात्मिक मदत देण्याचा एक मार्ग म्हणजे जे आजारी आहेत त्यांच्यासोबत व त्यांच्यासाठी प्रार्थना करणे. आज आपण चमत्कारिकपणे बरे होण्याची विनंती करत नाही पण आजारपण धैर्याने सोसण्यास आणि दुर्बलतेच्या या काळात टिकून राहण्याकरता त्यांना आध्यात्मिक बळ देण्याची आपण देवाला विनंती करू शकतो. यहोवा त्यांना सांभाळेल आणि “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही” त्या काळाची वाट पाहण्याद्वारे त्यांचा विश्‍वास अधिक मजबूत होईल. (यशया ३३:२४) पुनरुत्थित येशू ख्रिस्ताद्वारे आणि देवाच्या राज्याच्या माध्यमाने आज्ञाधारक मानवजातीला पाप, आजार व मृत्यूपासून कायमची सुटका मिळेल हे जाणून किती सांत्वन मिळते! या भव्य आशा आपल्याला देणाऱ्‍या यहोवाचे आपण आभार मानतो, तो आपले ‘सर्व रोग बरे करेल.’—स्तोत्र १०३:१-३; प्रकटीकरण २१:१-५.

२०. वार्धक्याच्या ‘अनिष्ट दिवसांत’ विश्‍वास आपल्याला निभावून नेईल असे का म्हणता येईल?

२० म्हातारपणाच्या ‘अनिष्ट दिवसांत,’ जेव्हा आरोग्य आणि बळ कमी होत जाते, तेव्हा देखील विश्‍वास आपले साहाय्य करू शकतो. (उपदेशक १२:१-७) आपल्यातील वयोवृद्ध जन, वृद्ध स्तोत्रकर्त्याप्रमाणे अशी प्रार्थना करू शकतात: “हे प्रभू, परमेश्‍वरा, तूच माझे आशास्थान आहेस. . . . उतारवयात माझा त्याग करू नको; माझी शक्‍ति क्षीण होत चालली असता मला सोडू नको.” (स्तोत्र ७१:५,) यहोवाच्या आधाराची आपल्याला गरज आहे याची स्तोत्रकर्त्याला जाणीव होती; देवाची सेवा करत करत आता जीवनाच्या संधीकाली येऊन पोचलेल्या आपल्या अनेक ख्रिस्ती बांधवांनाही ही गरज जाणवते. त्यांच्या विश्‍वासामुळे, ते आश्‍वस्त राहू शकतात की यहोवाचे सनातन बाहू त्यांना सतत आधार देतील.—अनुवाद ३३:२७.

देवाच्या वचनावर विश्‍वास ठेवा

२१, २२. आपल्याला विश्‍वास असल्यास, देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर याचा कसा परिणाम होईल?

२१ सुवार्तेवर व देवाच्या सबंध वचनावर विश्‍वास ठेवल्यामुळे आपण यहोवाच्या अधिकाधिक जवळ येऊ शकतो. (याकोब ४:८) खरोखर तो आपला सार्वभौम प्रभू आहे, इतकेच नव्हे तर तो आपला निर्माणकर्ता व पिता देखील आहे. (यशया ६४:८; मत्तय ६:९; प्रेषितांची कृत्ये ४:२४) स्तोत्रकर्त्याने म्हटले: “तू माझा पिता, माझा देव, माझा तारणाचा दुर्ग आहेस.” (स्तोत्र ८९:२६) आपण यहोवावर व त्याच्या प्रेरित वचनावर विश्‍वास ठेवल्यास आपणही त्याला आपल्या “तारणाचा दुर्ग” म्हणू शकतो. किती हा बहुमोल विशेषाधिकार!

२२ यहोवा हा आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या ख्रिश्‍चनांचा तसेच पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्या त्यांच्या सोबत्यांचा पिता आहे. (रोमकर ८:१५) आपल्या स्वर्गीय पित्यावर विश्‍वास ठेवल्यास आपली कधीही निराशा होणार नाही. दाविदाने म्हटले: “माझ्या आईबापांनी मला सोडिले तरी परमेश्‍वर मला जवळ करील.” (स्तोत्र २७:१०) शिवाय, आपल्याला पुढील आश्‍वासन देण्यात आले आहे: “परमेश्‍वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही.”—१ शमुवेल १२:२२.

२३. यहोवासोबत कायमचा नातेसंबंध जोपासण्याकरता कशाची आवश्‍यकता आहे?

२३ यहोवासोबत कायमचा नातेसंबंध ठेवण्याकरता, आपला सुवार्तेवर विश्‍वास असला पाहिजे आणि शास्त्रवचनांना आपण देवाचे वचन म्हणून स्वीकारले पाहिजे कारण हीच वस्तुस्थिती आहे. (१ थेस्सलनीकाकर २:१३) यहोवावर आपला संपूर्ण भरवसा असला पाहिजे आणि आपण त्याच्या वचनाला आपल्या मार्गाला प्रकाश होऊ दिले पाहिजे. (स्तोत्र ११९:१०५; नीतिसूत्रे ३:५, ६) त्याची कोमल कृपा, दया आणि मदत मिळण्याच्या पूर्ण खात्रीसह जेव्हा आपण त्याला प्रार्थना करतो तेव्हा आपोआपच आपला विश्‍वास वाढेल.

२४. रोमकर १४:८ यात कोणता सांत्वनदायक विचार प्रस्तुत केला आहे?

२४ विश्‍वासामुळेच आपण सर्वकाळाकरता देवाला आपले जीवन समर्पित केले. आपला विश्‍वास मजबूत आहे कारण आपण मेलो तरीसुद्धा आपण त्याचे समर्पित सेवक आहोत व आपल्याला पुनरुत्थानाची आशा आहे. होय, “आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहो.” (रोमकर १४:८) हा सांत्वनदायक विचार नेहमी मनात बाळगून आपण देवाच्या वचनावर शेवटपर्यंत भरवसा ठेवू आणि सदैव सुवार्तेवर विश्‍वास ठेवू.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• विश्‍वास म्हणजे काय आणि आपल्याला या गुणाची का गरज आहे?

• सुवार्तेवर आणि देवाच्या सबंध वचनावर आपला विश्‍वास असणे का महत्त्वाचे आहे?

• विश्‍वास आपल्याला निरनिराळ्या परीक्षांना तोंड देण्यास कशी मदत करतो?

• विश्‍वास टिकवून ठेवण्याकरता आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२ पानांवरील चित्रे]

यहोवाने यिर्मया व एलीया यांना सांभाळले कारण त्यांना विश्‍वास होता

[१३ पानांवरील चित्रे]

ईयोब, पेत्र आणि नहेम्या यांचा दृढ विश्‍वास होता

[१५ पानांवरील चित्रे]

यहोवासोबत कायमचा नातेसंबंध अनुभवण्याकरता आपला सुवार्तेवर विश्‍वास असला पाहिजे