व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाईटाचा विजय झाला आहे का?

वाईटाचा विजय झाला आहे का?

वाईटाचा विजय झाला आहे का?

चांगल्या आणि वाईटाच्या शक्‍तींमधील विश्‍वव्यापी संघर्षामुळे इतिहासातील लेखकांनी आणि तत्त्वज्ञांनी यावर अंतहीन तर्कवितर्क केले आहेत. परंतु, देव आणि सैतान यांच्यातील युद्धाचा अचूक अहवाल देणारे एक पुस्तक मात्र आहे. ते पुस्तक म्हणजे बायबल. या संघर्षात निर्माण झालेल्या वादविषयांबद्दल ते सांगते आणि नेमका कोणाचा विजय झाला हे कसे ठरवायचे तेही सांगते.

पहिल्या पुरूष आणि स्त्रीची निर्मिती झाल्यावर, दियाबल सैतान या अदृश्‍य आत्मिक प्राण्याने देवाच्या शासनाला आव्हान दिले. कसे? त्याने अप्रत्यक्षपणे असे सुचवले की, देव आपल्या निर्मितीला काही चांगल्या गोष्टींपासून वंचित ठेवत आहे आणि त्याच्यापासून मानव स्वतंत्र झाले तर त्यांचे अधिक भले होईल.—उत्पत्ति ३:१-५; प्रकटीकरण १२:९.

नंतर, कुलपिता ईयोब याच्या काळात, सैतानाने आणखी एक वादविषय उपस्थित केला. देवाप्रती ईयोबाची सचोटी मोडण्याचा प्रयत्न करून सैतान म्हणाला: “त्वचेसाठी त्वचा! मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.” (ईयोब २:४) हे केवढे मोठे आव्हान! सैतानाने ईयोबाचे नाव वापरण्याऐवजी, मनुष्य हा सर्वांना लागू होणारा शब्द वापरून प्रत्येक मनुष्याच्या सचोटीवर संशय घेतला. त्याने जणू असा दावा केला: ‘एक मनुष्य आपला प्राण वाचवण्यासाठी काहीही करेल. मला एक संधी दिली तर मी कोणालाही देवाविरुद्ध करून दाखवेन.’

देव आणि सैतानामधील युद्धात कोण विजयी ठरले हे दोन प्रश्‍नांच्या उत्तरावरून ठरवता येते: मनुष्य यशस्वीपणे स्वतःवर राज्य करू शकतो का? सैतानाला सर्वांना देवापासून वळवण्यात यश मिळाले आहे का?

मानव स्वतःवर यशस्वीरित्या शासन करू शकतात का?

हजारो वर्षांपासून मानवांनी विविध प्रकारच्या सरकारांचा प्रयोग करून पाहिला आहे. राजेशाही, उमरावशाही, लोकशाही, निरंकुश सत्ता, फॅसिझम आणि साम्यवाद अशा भिन्‍न भिन्‍न सरकारांचा इतिहासात प्रयोग करून पाहिला आहे. या वेगवेगळ्या सरकारांचा प्रयोग करून पाहण्याची सतत गरज असते यावरून या शासनपद्धती अपुऱ्‍या ठरतात असे दिसून येत नाही का?

“रोमी लोक नकळत एका प्रचंड व्यवस्थापन प्रयोगात अडकले होते,” असे एच. जी. वेल्स, १९२२ साली प्रकाशित झालेल्या जगाचा इतिहास (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात लिहितात. ते पुढे म्हणतात: “त्यात नेहमी बदल होत असे, ते कधीच स्थिर झाले नाही. एका दृष्टीने, हा प्रयोग अयशस्वी ठरला. दुसऱ्‍या दृष्टीने पाहिल्यास, तो प्रयोग अजूनही अपुरा आहे, आणि सर्वप्रथम रोमन लोकांसमोर जागतिक राज्यकारभार हाताळण्यासंबंधीच्या ज्या समस्या होत्या त्या सोडवण्याचा अजूनही युरोप आणि अमेरिका प्रयत्न करत आहेत.”

सरकारे बदलून पाहण्याचा प्रयोग २० व्या शतकापर्यंत चालत आला आहे. त्या शतकाच्या शेवटी, लोकशाही सत्तेला पूर्वीपेक्षा अधिक लोकप्रियता मिळाली. तात्त्विक दृष्टीने पाहता, लोकशाही सत्ता सर्वांना सामील करते. परंतु, मानव देवाविना यशस्वीपणे शासन करू शकला आहे हे लोकशाही सत्तेने सिद्ध केले आहे का? भारताचे भूतपूर्व पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लोकशाही चांगली आहे असे म्हटले, परंतु त्यांनी पुढे म्हटले: “हे मी यासाठी म्हणतो कारण इतर शासनपद्धती अगदीच निकामी आहेत.” भूतपूर्व फ्रेंच राष्ट्रपती व्हॅलरी गिसकार्ड द एस्टे म्हणाले: “प्रतिनिधीत्व लोकशाहीने आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याचे आम्ही पाहत आहोत.”

सा.यु.पू. पाचव्या शतकात देखील ग्रीक तत्त्वज्ञानी प्लेटो याने लोकशाही शासनपद्धतीमधील एक दोष ओळखला. राजकीय तत्त्वाचा इतिहास (इंग्रजी) या पुस्तकानुसार त्याने “लोकशाही [शासनपद्धतींचा] प्रमुख शाप, अर्थात, राजकीय नेत्यांचा अजाणपणा आणि अक्षमता” यावर हल्ला केला. आज सरकारात काम करण्यासाठी लायक असे कुशल लोक मिळत नसल्यामुळे पुष्कळ नेत्यांना खंत वाटते. “मोठमोठ्या समस्यांचा सामना करतेवेळी अक्षम नेते पाहून [लोकांना] चीड येते,” असे द वॉल स्ट्रीट जर्नल यात म्हटले होते. त्यात पुढे म्हटले होते: “मार्गदर्शनाची गरज असताना [नेत्यांमधील] निर्णय घेण्याची असमर्थता आणि भ्रष्टाचार पाहून त्यांची घोर निराशा होते.”

आता प्राचीन इस्राएलमधील राजा शलमोनाच्या शासनकाळाचा विचार करा. यहोवा देवाने शलमोनाला विशेष शहाणपण दिले. (१ राजे ४:२९-३४) शलमोनाच्या ४० वर्षांच्या शासनादरम्यान इस्राएल राष्ट्राची काय स्थिती होती? बायबल सांगते की, “यहूदा व इस्राएल हे समुद्रकिनाऱ्‍याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत; ते खाऊनपिऊन चैनीत असत.” तो अहवाल असेही सांगतो: “दानापासून बैर-शेब्यापर्यंत सारे यहूदी व इस्राएल आपआपली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्‍यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकीर्दीत निर्भय राहत होते.” (१ राजे ४:२०, २५) सार्वभौम अदृश्‍य शासक, यहोवा देव याचा दृश्‍य प्रतिनिधी या नात्याने त्यांच्यावर एक बुद्धिमान राजा शासन करत असल्यामुळे इस्राएल राष्ट्रात कमालीचे स्थैर्य, संपन्‍नता आणि आनंद होता.

मानवाच्या आणि देवाच्या शासनातील केवढा मोठा फरक! शासनाच्या वादविषयात सैतान जिंकला असे खरोखर म्हणता येईल का? नाही, कारण संदेष्ट्या यिर्मयाने अचूक भाकीत केले होते: “हे परमेश्‍वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.”—यिर्मया १०:२३.

सैतान सर्वांना देवापासून दूर नेऊ शकतो का?

सर्वांना देवापासून दूर करण्याचा सैतानाचा दावा खरा ठरला आहे का? इब्री लोकांस या बायबलच्या पुस्तकातील ११ व्या अध्यायात प्रेषित पौल ख्रिस्त-पूर्व काळातील अनेक विश्‍वासू स्त्री-पुरूषांची नावे देतो. मग तो म्हणतो: “गिदोन, बाराक, शमशोन, इफताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे, ह्‍यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही.” (इब्री लोकांस ११:३२) पौल, देवाच्या या निष्ठावान सेवकांना ‘मोठा साक्षीरूपी मेघ’ असे संबोधतो. (इब्री लोकांस १२:१) येथे, ‘मेघ’ यासाठी वापरलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ, निश्‍चित आकारमानाचा आणि आकृतीचा स्पष्ट रूपरेषा असलेला एक वेगळा मेघ नव्हे तर मोठा, आकारहीन मेघ असा होतो. हा अर्थ उचित आहे कारण देवाचे इतके असंख्य विश्‍वासू सेवक होऊन गेले आहेत की ते एका प्रचंड मेघासारखे आहेत. होय, आजतागायत, अगणित लोकांनी स्वेच्छेने यहोवा देवाला निष्ठावान राहण्याचे निवडले आहे.—यहोशवा २४:१५.

आपल्या काळात आपल्याला काय दिसते? जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांची संख्या, २० व्या शतकात छळ आणि विरोध असूनही ६० लाखांहून अधिक झाली आहे. त्यांच्यासोबत आणखी ९० लाख लोक सहवास राखतात, आणि यांपैकी बहुतेक जण देवासोबत निकटचा व्यक्‍तिगत नातेसंबंध बनवण्यासाठी निर्णायक पावले उचलत आहेत.

सैतान मानवांना यहोवापासून बहकवू शकतो या दाव्याचे उत्तर स्वतः देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याने योग्यरित्या दिले. वधस्तंभावरील असह्‍य वेदनाही त्याची सचोटी भंग करू शकल्या नाहीत. शेवटला श्‍वास घेताना येशू ओरडून म्हणाला: “हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.”—लूक २३:४६.

सैतान मानवांना आपल्या ताब्यात ठेवण्याकरता आपल्या सामर्थ्यानुसार—मोहपाशांपासून छळापर्यंत—सर्व गोष्टींचा उपयोग करतो. “देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी” यांचा उपयोग करून तो एकतर लोकांना यहोवापासून दूर ठेवतो किंवा दूर नेतो. (१ योहान २:१६) सैतानाने ‘लोकांची मने देखील आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, ख्रिस्ताच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.’ (२ करिंथकर ४:४) आणि सैतान आपला हेतू साध्य करण्याकरता धमक्यांचा किंवा मनुष्याच्या भीतीचा उपयोग करण्यासही मागेपुढे पाहत नाही.—प्रेषितांची कृत्ये ५:४०.

तथापि, जे देवाच्या बाजूला आहेत त्यांच्यावर सैतान मात करू शकत नाही. त्यांनी यहोवा देवाला जाणून घेतले आहे; ते ‘त्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती करतात.’ (मत्तय २२:३७) होय, येशू ख्रिस्ताच्या आणि अगणित मानवांच्या अचल निष्ठेमुळे दियाबल सैतानाचा मोठा पराजय झाला आहे.

भविष्यात काय आहे?

मानव असेच वेगवेगळ्या सरकारांचा प्रयोग करत राहतील का? संदेष्टा दानीएलाने भाकीत केले: “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” (दानीएल २:४४) स्वर्गाचा देव जे राज्य आणील ते येशू ख्रिस्ताच्या शासनाचे स्वर्गीय सरकार असेल. याच राज्याविषयी येशूने आपल्या अनुयायांना प्रार्थना करायला सांगितले. (मत्तय ६:९, १०) ते राज्य ‘सर्वसमर्थ देवाच्या येणाऱ्‍या मोठ्या दिवसाच्या लढाईत’ सर्व मानवी सरकारांना नष्ट करील.—प्रकटीकरण १६:१४, १६.

सैतानाचे काय होईल? या भावी घटनेविषयी बायबल असे वर्णन देते: “[यहोवाच्या देवदूताने] दियाबल, व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर ह्‍यास धरले, आणि त्याने एक हजार वर्षेपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले; आणि ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांस आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला.” (प्रकटीकरण २०:१-३) सैतानाला निष्क्रियतेच्या अथांग डोहात टाकल्यानंतरच येशू ख्रिस्ताचा हजार वर्षांचा शासनकाळ सुरू होईल.

मग ही पृथ्वी एक आल्हाददायक ठिकाण बनेल. दुष्टाईचा आणि तिला कारणीभूत असलेल्या लोकांचा नाश झालेला असेल. बायबल वचन देते: “दुष्कर्म करणाऱ्‍यांचा उच्छेद होईल; . . . पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्र ३७:९-११) त्यांच्या शांतीला मानवांकडून किंवा इतर प्राण्यांकडून धोका संभवणार नाही. (यशया ११:६-९) अजाणतेमुळे आणि यहोवाला जाणण्याची संधी न मिळाल्यामुळे सैतानाची बाजू घेतलेल्या गतकाळातील कोट्यवधी लोकांनाही पुन्हा जिवंत केले जाईल आणि ईश्‍वरी शिक्षण दिले जाईल.—प्रेषितांची कृत्ये २४:१५.

हजार वर्षांच्या शासनकाळाच्या शेवटी, पृथ्वीचे परादीसात रूपांतर होईल आणि तिच्यावरील मानवजातीला परिपूर्ण स्थितीत आणले जाईल. मग सैतानाला “थोडा वेळ” सोडले जाईल आणि त्यानंतर देवाचा व त्याच्या शासनाचा विरोध करणाऱ्‍या सर्वांचा सर्वकाळासाठी नाश केला जाईल.—प्रकटीकरण २०:३, ७-१०.

तुम्ही कोणाची बाजू घ्याल?

विसाव्या शतकात सैतानाने पृथ्वीवर खळबळ माजवली. त्याचा विजय झाला आहे असे दिसण्याऐवजी, पृथ्वीवरील परिस्थिती, आपण या दुष्ट जगाच्या शेवटल्या काळात जगत आहोत, असे सुचवते. (मत्तय २४:३-१४; प्रकटीकरण ६:१-८) कोणाचा विजय झाला हे पृथ्वीवरील दुष्टाईचे प्रमाण किंवा बहुतांश लोकांचा दृष्टिकोन यावरून ठरवले जात नाही. तर कोणाची शासनपद्धत उत्तम आहे आणि देवावर प्रेम असल्यामुळे कोणी त्याची सेवा केली आहे का याद्वारे ठरवले जाते. आणि या दोन्ही बाबतीत यहोवाचाच विजय झाला आहे.

नेमलेल्या वेळेत सैतानाला खोटे ठरवण्यात आले आहे पण देवाने अजूनही दुष्टाईला परवानगी का दिली आहे? यहोवा धीर धरत आहे कारण “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) देवाची अशी इच्छा आहे की, “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.” (१ तीमथ्य २:४) तुम्ही उरलेल्या वेळात बायबलचा अभ्यास करावा आणि ‘एकाच खऱ्‍या देवाचे व ज्याला त्याने पाठवले त्या येशू ख्रिस्ताचे ज्ञान’ घ्यावे अशी आम्ही आशा करतो. (योहान १७:३) हे ज्ञान मिळवण्यासाठी यहोवाचे साक्षीदार आनंदाने तुमची मदत करतील जेणेकरून तुम्ही देखील इतर लाखो लोकांसोबत विक्रमी पक्षाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहाल.

[५ पानांवरील चित्रे]

सचोटी राखून यहोवाच्या साक्षीदारांनी सैतानाचा पराजय झाला आहे याला पुष्टी दिली आहे

[७ पानांवरील चित्र]

अनेक निष्ठावान लोक यहोवाच्या बाजूने आहेत