व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

एखाद्या ख्रिश्‍चनाने कोर्टामध्ये, बायबलवर हात ठेवून जे काही सांगणार, सत्य सांगणार अशी शपथ घेणे शास्त्रवचनांनुसार बरोबर आहे का?

प्रत्येक व्यक्‍तीने याबाबतीत व्यक्‍तिगत निर्णय घेतला पाहिजे. (गलतीकर ६:५) पण, कोर्टात सत्य बोलण्यासाठी शपथ घेण्यास बायबल मनाई करीत नाही.

शपथ घेण्याची पद्धत अनेक काळापासून सर्वसामान्य आहे. उदाहरणार्थ, प्राचीन काळी ग्रीक लोक आकाशाकडे हात वर करून किंवा वेदीला स्पर्श करून शपथ घ्यायचे. रोमन लोक शपथ घेताना हातात एक दगड घेत आणि अशी शपथ घेत: “मी जर मुद्दामहून खोटं बोललो तर, नगर आणि बालेकिल्ल्याचे संरक्षण करणाऱ्‍या ज्युपिटरने, मी जसा हा दगड माझ्या हातून फेकून देतो तसेच माझ्या जीवनातल्या सर्व चांगल्या गोष्टी काढून फेकून द्याव्यात.”—जॉन मॅक्लिंनटॉक आणि जेम्स स्ट्राँग यांचे सायक्लोपिडिआ ऑफ बिब्लिकल, थिओलॉजिकल, ॲण्ड एक्लेसिॲस्टिकल लिटरेचर, खंड ७, पृष्ठ २६०.

शपथ घेण्याच्या रीतीवरून हे सूचित होते, की मानवजातीला, आपल्याला पाहू शकणाऱ्‍या व आपण ज्यास जबाबदार आहोत अशा एका ईश्‍वरी शक्‍तीच्या अस्तित्वाची जाणीव आहे. प्राचीन काळापासून, यहोवाच्या खऱ्‍या उपासकांनी जाणले आहे, की ते जे काही बोलतात किंवा करतात ते यहोवाला माहीत आहे. (नीतिसूत्रे ५:२१; १५:३) त्यांनी, देव जणू त्यांच्या समोर आहे किंवा साक्षीदार म्हणून उपस्थित आहे त्याप्रमाणे शपथ घेतली. जसे की, बवाज, दावीद, शलमोन, सिदकिया यांसर्वांनी अशाचप्रकारे शपथ घेतली. (रूथ ३:१३; २ शमुवेल ३:३५; १ राजे २:२३, २४; यिर्मया ३८:१६) खऱ्‍या देवाच्या उपासकांनीसुद्धा, इतरांच्या नावाने शपथ घेतली होती. अब्राहाम व येशू ख्रिस्ताने असे केले.—उत्पत्ति २१:२२-२४; मत्तय २६:६३, ६४.

यहोवासमोर शपथ घेणारी व्यक्‍ती कधीकधी विशिष्ट हावभाव अथवा कृतीतून हे व्यक्‍त करत असे. सदोमचा राजा यास अब्रामने (अब्राहाम) म्हटले: ‘परमेश्‍वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी याजसमोर मी बाहु उभारून [“शपथ घेतो,” NW].’ (उत्पत्ति १४:२२) संदेष्टा दानीएल याच्याशी बोलताना एका देवदूताने ‘आपला उजवा व डावा हात आकाशाकडे वर करून, जो सदाजीवी त्याची शपथ वाहिली.’ (दानीएल १२:७) देवही लाक्षणिकरीत्या शपथ वाहण्यासाठी आपला बाहू वर करत असल्याचे म्हटले आहे.—अनुवाद ३२:४०; यशया ६२:८.

शपथ घेण्यास शास्त्रवचने मनाई करीत नाहीत. परंतु, ख्रिश्‍चन व्यक्‍तीला आपल्या प्रत्येक वाक्याचा पुरावा देण्यासाठी शपथ घेण्याची गरज नाही. येशूने म्हटले: “तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे.” (मत्तय ५:३३-३७) (तिरपे वळण आमचे.) शिष्य याकोबानेही काहीसा असाच मुद्दा सांगितला. “शपथ वाहू नका” असे त्याने म्हटले तेव्हा तो, बारीकसारीक गोष्टींसाठी शपथ न घेण्याची ताकीद देत होता. (याकोब ५:१२) कोर्टासमोर सत्य बोलताना शपथ घेणे चुकीचे आहे असे येशूने किंवा याकोबानेही म्हटले नाही.

परंतु, एखाद्या ख्रिश्‍चनाला कोर्टात, त्याची साक्ष खरी आहे हे शाबीत करण्यासाठी शपथ घेण्यास सांगितले तर? अशा वेळी त्याला कदाचित शपथ घेण्यात काही गैर वाटणार नाही. किंवा, कदाचित त्याला तो जे काही बोलतो ते असत्य नाही याची सर्वांसमक्ष ग्वाही देण्याची अनुमती दिली जाईल.—गलतीकर १:२०.

शपथ घेताना हात वर करणे किंवा बायबलवर हात ठेवणे, हे कोर्टाचे नियम असतील तर एखादा ख्रिश्‍चन या नियमांचे पालन करण्याची निवड करेल. शपथेसोबत एखादा हावभाव करण्याची शास्त्रवचनांतील उदाहरणे कदाचित त्याच्या मनात असतील. परंतु, शपथ घेताना एखादा हावभाव करण्यापेक्षा एखाद्या ख्रिश्‍चनाने आठवणीत ठेवण्याजोगी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, तो सत्य सांगण्यासाठी देवासमोर शपथ घेत आहे. अशाप्रकारची शपथ ही एक गंभीर बाब आहे. अशा परिस्थितीत आपण एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकतो आणि दिलेच पाहिजे असे जर एखाद्या ख्रिश्‍चनाला वाटत असेल तर त्याने हे लक्षात ठेवावे की तो सत्य सांगण्यास बांधील आहे; आणि अर्थातच ख्रिश्‍चन व्यक्‍ती नेहमी सत्य बोलणे पसंत करेल.