व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘एकमेकांवर प्रीती करा’

‘एकमेकांवर प्रीती करा’

‘एकमेकांवर प्रीती करा’

“तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहान १३:३५.

१. येशूने आपल्या मृत्यूच्या काही काळाआधी कोणत्या गुणावर जोर दिला?

“मुलांनो.” (योहान १३:३३) हे हळवे संबोधन वापरून येशू आपल्या मृत्यूच्या आदल्या संध्याकाळी आपल्या प्रेषितांशी बोलला. त्यांच्याशी बोलताना येशूने याआधी कधी या प्रेमळ संबोधनाचा वापर केल्याचा शुभवर्तमानांत अहवाल नाही. पण त्या खास रात्री आपल्या अनुयायांबद्दल वाटणारी मनस्वी प्रीती व्यक्‍त करण्यासाठी येशू हे प्रेमळ संबोधन वापरण्यास प्रवृत्त झाला. किंबहुना, त्या रात्री येशूने जवळजवळ ३० वेळा प्रीतीचा उल्लेख केला. या गुणाला त्याने इतके महत्त्व का दिले?

२. प्रीती दाखवणे ख्रिश्‍चनांकरता इतके महत्त्वाचे का आहे?

प्रेम इतके महत्त्वाचे का आहे याविषयी येशूने स्पष्ट केले. त्याने म्हटले: “त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५; १५:१२, १७) ख्रिस्ताचे अनुयायी होण्यात व आपल्या बांधवांबद्दल प्रेम व्यक्‍त करण्यात जवळचा संबंध आहे. खरे ख्रिस्ती विशिष्ट प्रकारच्या पोशाखाने किंवा काही आगळ्यावेगळ्या रितीभातींनी ओळखले जात नाहीत, तर ते एकमेकांना दाखवत असलेल्या उबदार व कोमल प्रीतीमुळे ओळखले जातात. अशाप्रकारची उल्लेखनीय प्रीती याआधीच्या लेखाच्या सुरवातीला उल्लेख केल्याप्रमाणे, ख्रिस्ताचे शिष्य होण्याकरता असलेल्या मुख्य अटींपैकी दुसरी आहे. ही अट पूर्ण करण्याकरता कोणती गोष्टी आपली मदत करेल?

“उत्तरोत्तर अधिक करावी”

३. प्रेषित पौलाने प्रेमासंबंधी काय सल्ला दिला?

पहिल्या शतकातील ख्रिस्ताच्या अनुयायांत होते त्याप्रमाणे, ही उल्लेखनीय प्रीती आज ख्रिस्ताच्या खऱ्‍या शिष्यांतही दिसून येते. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना प्रेषित पौलाने लिहिले: “बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हास लिहावे ह्‍याची तुम्हास गरज नाही; कारण एकमेकांवर प्रीति करावी, असे तुम्हाला देवानेच शिकविले आहे. आणि . . . सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करीतच आहा.” तरीसुद्धा पौलाने पुढे म्हटले: “ती उत्तरोत्तर अधिक करावी.” (१ थेस्सलनीकाकर ३:१२; ४:९, १०) आपणही पौलाचा सल्ला मनावर घेऊन एकमेकांप्रती “उत्तरोत्तर अधिक” प्रीती दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

४. पौलाने व येशूने सांगितल्यानुसार आपण कोणाची खास दखल घेतली पाहिजे?

त्याच प्रेरित पत्रात, पौलाने त्याच्या सहविश्‍वासू बांधवांना “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या” आणि “अशक्‍तांना आधार द्या” असे प्रोत्साहन दिले. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) दुसऱ्‍या वेळी त्याने ख्रिस्ती लोकांना आठवण करून दिली की ‘जे सशक्‍त आहेत त्यांनी अशक्‍तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे.’ (रोमकर १५:१) येशूनेही जे दुर्बल आहेत त्यांना मदत करण्यासंबंधी सूचना दिल्या. त्याला अटक होणार होती त्या रात्री पेत्र आपल्याला सोडून जाईल असे भाकीत केल्यानंतर येशूने पेत्राला असे सांगितले की “तू वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.” का? कारण त्यांनीही येशूला सोडलेले असेल आणि त्याअर्थी त्यांनाही मदतीची गरज असेल. (लूक २२:३२; योहान २१:१५-१७) म्हणूनच देवाचे वचन आपल्याला आध्यात्मिकरित्या दुर्बल असलेल्यांना आणि ख्रिस्ती मंडळीशी ज्यांचा संबंध तुटला आहे अशांनाही प्रेम दाखवण्याचे निर्देशन देते. (इब्री लोकांस १२:१२) आपण असे का केले पाहिजे? येशूने दिलेल्या दोन दृष्टान्तांवरून या प्रश्‍नाचे उत्तर मिळते.

हरवलेले मेंढरू आणि हरवलेला शिक्का

५, ६. (अ) येशूने कोणते दोन संक्षिप्त दृष्टान्त दिले? (ब) या दृष्टान्तांवरून यहोवाबद्दल आपल्याला काय दिसून येते?

खऱ्‍या मार्गापासून भटकलेल्यांबद्दल यहोवाचा कसा दृष्टिकोन आहे हे आपल्या श्रोत्यांना शिकवण्याकरता येशूने दोन संक्षिप्त दृष्टान्त दिले. यांपैकी एक दृष्टान्त एका मेंढपाळाचा होता. येशूने म्हटले: “तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यातून एक हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करीत नाही? ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो; आणि घरी येऊन मित्रांस व शेजाऱ्‍यांस एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यांना पश्‍चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्‍या आनंदापेक्षा पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल स्वर्गांत अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो.”—लूक १५:४-७.

दुसरा दृष्टान्त एका स्त्रीविषयी होता. येशूने म्हटले: “अशी कोण स्त्री आहे की, तिच्याजवळ रुप्याची दहा नाणी असता त्यातून एक नाणे हरवले तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही? ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे, पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो.”—लूक १५:८-१०.

७. हरवलेल्या मेंढरांच्या आणि हरवलेल्या नाण्याच्या दृष्टान्तांवरून आपण काय शिकू शकतो?

या लहानशा दोन दृष्टान्तांवरून आपण काय शिकू शकतो? ते आपल्याला दाखवतात की (१) आध्यात्मिकदृष्ट्या अशक्‍त झालेल्यांविषयी आपल्या भावना कशा असाव्यात आणि (२) त्यांना मदत करण्यासाठी आपण काय केले पाहिजे. या मुद्द्‌यांवर आपण विचार करू या.

हरवलेले परंतु मोलाचे

८. (अ) आपल्या हरवलेल्या गोष्टीबद्दल मेंढपाळाची व स्त्रीची कशी प्रतिक्रया होती? (ब) त्यांच्या प्रतिक्रियेवरून त्यांच्या हरवलेल्या गोष्टीबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनाविषयी काय स्पष्ट होते?

दोन्ही दृष्टान्तात काहीतरी हरवल्याचा उल्लेख आहे, पण ज्यांचे हरवले आहे त्या त्या मालकांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष द्या. मेंढपाळाने असे म्हटले नाही: ‘एक मेंढरू हरवले तर काय, माझ्याजवळ ९९ तर आहेत! एकाने काही फरक पडणार नाही.’ किंवा त्या स्त्रीने असे म्हटले नाही, की ‘एका नाण्यासाठी काय रडत बसायचे? अजून माझ्याजवळ नऊ नाणी आहेत आणि ती माझ्याकरता पुरेशी आहेत.’ असा विचार करण्याऐवजी, मेंढपाळ आपले हरवलेले मेंढरू शोधायला गेला जणू त्याच्याजवळ ते एकच मेंढरू होते. आणि त्या स्त्रीलाही हरवलेल्या नाण्याची इतकी कमी भासली जणू तिच्याजवळ आणखी नाणीच नव्हती. या दोन्ही उदाहरणांत हरवलेली गोष्ट मालकाच्या मनात अद्यापही मोलाची होती. यावरून काय स्पष्ट होते?

९. मेंढपाळ व स्त्री यांनी दाखवलेल्या काळजीतून काय स्पष्ट होते?

दोन्ही वेळेस येशूने काय निष्कर्ष काढला याकडे लक्ष द्या: “पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल स्वर्गांत अधिक आनंद होईल” आणि “पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो.” मेंढपाळाने व स्त्रीने दाखवलेली काळजी काही प्रमाणात यहोवाच्या व त्याच्या स्वर्गीय प्राण्यांच्या भावनांची झलक आपल्याला देते. हरवलेल्या गोष्टी ज्याप्रमाणे मेंढपाळाच्या व स्त्रीच्या नजरेत मोलवान राहिल्या त्याचप्रमाणे जे भटकले आहेत आणि देवाच्या लोकांसोबत ज्यांचा आता संपर्क राहिलेला नाही ते देखील यहोवाच्या नजरेत मोलवान राहतात. (यिर्मया ३१:३) अशाप्रकारच्या व्यक्‍ती कदाचित आध्यात्मिकरित्या दुर्बल असतील पण त्यांच्यात विद्रोही वृत्ती असेलच असे म्हणता येणार नाही. दुर्बल असूनही कदाचित ते अजूनही निदान काही प्रमाणात यहोवाच्या अपेक्षा पूर्ण करत असतील. (स्तोत्र ११९:१७६; प्रेषितांची कृत्ये १५:२९) म्हणूनच पुरातन काळाप्रमाणेच, यहोवा त्यांना लगेच ‘आपल्यासमोरून दूर करत नाही.’—२ राजे १३:२३.

१०, ११. (अ) मंडळीपासून दूर गेलेल्यांकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहावे? (ब) येशूच्या दोन दृष्टान्तांनुसार आपण अशा व्यक्‍तींबद्दल काळजी कशी व्यक्‍त करू शकतो?

१० यहोवा व येशूप्रमाणे आपल्यालाही जे आध्यात्मिकरित्या दुर्बल आहेत आणि ख्रिस्ती मंडळीशी आता सहवास राखत नाहीत त्यांच्याविषयी मनापासून काळजी वाटते. (यहेज्केल ३४:१६; लूक १९:१०) आध्यात्मिकरित्या दुर्बल व्यक्‍तीला आपण हरवलेले मेंढरू या दृष्टीने पाहतो, पण त्यांच्याविषयी पूर्णपणे आशा सोडून देत नाही. आपण असा विचार करत नाही, की ‘आध्यात्मिकरित्या मागे पडलेल्या एखाद्याबद्दल कशाला काळजी करायची? त्याच्यावाचून मंडळीचे कुठे काय बिघडते?’ उलट जे मंडळीपासून दूर गेले आहेत पण जे परत येऊ इच्छितात त्यांना यहोवाप्रमाणेच आपणही मोलवान समजले पाहिजे.

११ पण आपण आपली काळजी कशी व्यक्‍त करू शकतो? येशूचे दोन दृष्टान्त दाखवतात की आपण (१) पुढाकार घेऊन, (२) दयाळूपणे वागून आणि (३) प्रामाणिक वृत्ती दाखवून आपली काळजी व्यक्‍त करू शकतो. यांपैकी प्रत्येक गोष्टीकडे एकेक करून पाहू या.

पुढाकार घ्या

१२. ‘हरवलेल्याचा शोध करतो’ या शब्दांवरून आपल्याला मेंढपाळाच्या वृत्तीबद्दल काय दिसून येते?

१२ दोन दृष्टान्तांपैकी पहिल्या दृष्टान्तात येशू म्हणतो की मेंढपाळ ‘हरवलेल्या मेंढराचा शोध करतो.’ ते मेंढरू शोधण्याकरता मेंढपाळ पुढाकार घेतो आणि हेतूपूर्वक प्रयत्न करतो. कठीण, धोकेदायक परिस्थिती व अंतर या गोष्टींमुळे तो मागेपुढे पाहात नाही. उलट जे हरवले आहे ते “सापडेपर्यंत” तो त्याचा शोध घेत राहतो.—लूक १५:४.

१३. पुरातन काळातील विश्‍वासू पुरुषांनी दुर्बल झालेल्यांना कशाप्रकारे मदत केली आणि अशा बायबल उदाहरणांचे आपण कशाप्रकारे अनुकरण करू शकतो?

१३ त्याचप्रकारे, प्रोत्साहनाची गरज असलेल्या एखाद्या व्यक्‍तीची मदत करण्यासाठी सहसा त्याच्यापेक्षा सुदृढ असलेल्या व्यक्‍तीला पुढाकार घ्यावा लागतो. पुरातन काळातील विश्‍वासू जनांना याची जाणीव होती. उदाहरणार्थ, शौल राजाचा पुत्र योनाथान याला दावीद या आपल्या जिवलग मित्राला प्रोत्साहनाची गरज आहे असे दिसले तेव्हा योनाथान “दाविदाकडे [जीफ नावाच्या] उंचवट्यावरील झाडीत गेला; देवाच्या ठायी त्याचा भरवसा दृढ करून त्याच्या हाताला त्याने बळकटी दिली.” (१ शमुवेल २३:१५, १६) कित्येक शतकांनंतर, अधिपती नहेम्या याला त्याच्या काही यहुदी बांधवांचे मनोबल कमी झाले आहे असे दिसले तेव्हा तो देखील ताबडतोब ‘उठला’ आणि ‘परमेश्‍वराचे स्मरण’ करण्याचे प्रोत्साहन त्याने त्यांना दिले. (नहेम्या ४:१४) आज आपणही दुर्बल असलेल्यांना धैर्य देण्याकरता ‘उठले’ पाहिजे, अर्थात, पुढाकार घेतला पाहिजे. पण मंडळीत ही कोणाची जबाबदारी आहे?

१४. मंडळीत दुर्बल व्यक्‍तीची मदत कोणी केली पाहिजे?

१४ खासकरून ख्रिस्ती वडिलांवर ‘गलित हस्त दृढ करण्याची, लटपटणारे गुडघे बळकट करण्याची आणि घाबऱ्‍या मनाच्यांस धीर धरा, भिऊ नका असे म्हणण्याची’ जबाबदारी आहे. (यशया ३५:३, ४; १ पेत्र ५:१, २) पण “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्‍तांना आधार द्या” असा सल्ला पौलाने केवळ वडिलांना दिला नव्हता. उलट पौलाचे हे शब्द ‘थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला’ उद्देशून त्याने लिहिले होते. (१ थेस्सलनीकाकर १:१; ५:१४) त्याअर्थी, एखाद्या दुर्बल व्यक्‍तीचे साहाय्य करण्याचे काम सर्व ख्रिश्‍चनांचे आहे. दृष्टान्तातील मेंढपाळाप्रमाणे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीला ‘हरवलेल्याचा शोध करण्याची’ प्रेरणा झाली पाहिजे. अर्थात, हे परिणामकारक रितीने करण्यासाठी वडिलांसोबत सहकार्य करणे आवश्‍यक आहे. तुम्ही तुमच्या मंडळीतील एखाद्या दुर्बल व्यक्‍तीला मदत करण्यासाठी काही करू शकता का?

दयाळुपणे वागा

१५. मेंढपाळ ज्याप्रकारे वागला त्यामागे कोणती कारणे असू शकत होती?

१५ मेंढपाळाला शेवटी आपले हरवलेले मेंढरू सापडते तेव्हा तो काय करतो? ‘तो ते खांद्यावर घेतो.’ (लूक १५:५) किती हृदयस्पर्शी आणि अर्थपूर्ण माहिती! हे मेंढरू कित्येक दिवस व रात्री अनोळखी परिसरात भटकले असेल, कदाचित हिंस्र सिंहांनीही त्याचा पाठलाग करण्याची भीती होती. (ईयोब ३८:३९, ४०) शिवाय खायला काही न मिळाल्यानेही ते दुर्बल झाले असेल. आपल्या कळपापर्यंत परत येताना मार्गातल्या वेगवेगळ्या अडथळ्यांवर स्वतःच्या शक्‍तीने मात करणे त्याला शक्य नसेल. म्हणूनच, मेंढपाळ खाली वाकतो, हळुवारपणे त्या मेंढराला उचलून घेतो आणि सर्व अडथळ्यांपासून त्याचे संरक्षण करत त्याला पुन्हा कळपापर्यंत आणतो. या मेंढपाळाने व्यक्‍त केलेली काळजी आपण कशी दाखवू शकतो?

१६. मेंढपाळाने भटकलेल्या मेंढराबद्दल दाखवलेली कोमलता आपण का दाखवली पाहिजे?

१६ मंडळीशी संपर्क तुटलेली व्यक्‍ती आध्यात्मिक अर्थाने कदाचित थकून गेलेली असेल. मेंढपाळापासून ताटातूट झालेल्या मेंढराप्रमाणे ही व्यक्‍ती देखील या जगाच्या अमैत्रिपूर्ण वातावरणात उगाच भटकली असेल. मेंढवाड्यात अर्थात ख्रिस्ती मंडळीत मिळणाऱ्‍या संरक्षणाच्या अभावामुळे, ही व्यक्‍ती ‘गर्जणाऱ्‍या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे हे शोधीत फिरणाऱ्‍या’ दियाबलाच्या हल्ल्यांना अधिकच भेद्य असते. (१ पेत्र ५:८) शिवाय आध्यात्मिक अन्‍नाच्या अभावामुळे ती अतिशय कमजोर झालेली असते. त्यामुळे, मंडळीत परत येताना मार्गात सामना कराव्या लागणाऱ्‍या अडथळ्यांवर मात करण्याची शक्‍ती या व्यक्‍तीजवळ नसते. म्हणूनच आपण जणू खाली वाकून, या दुर्बल व्यक्‍तीला हळुवारपणे उचलून घेतले पाहिजे आणि तिला परत आणले पाहिजे. (गलतीकर ६:२) हे कसे करता येईल?

१७. आध्यात्मिकरित्या कमजोर झालेल्या एखाद्या व्यक्‍तीला भेटायला गेल्यावर आपण प्रेषित पौलाचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतो?

१७ प्रेषित पौलाने म्हटले: “एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय?” (२ करिंथकर ११:२९; १ करिंथकर ९:२२) पौलाला लोकांबद्दल, दुर्बळ लोकांबद्दलही सहानुभूती होती. आपणही आध्यात्मिकरित्या कमजोर झालेल्यांबद्दल अशीच सहानुभूती दाखवू इच्छितो. अशा एखाद्या व्यक्‍तीला भेटायला जाताना आपण त्याला याची खात्री करून दिली पाहिजे की यहोवाच्या नजरेत ती मोलवान आहे आणि तिच्या साक्षीदार बांधवांना तिची खूप कमी भासते. (१ थेस्सलनीकाकर २:१७) या व्यक्‍तीला जाणीव करून द्या की सर्वजण तिला आधार देण्यास तयार आहेत आणि तिच्याकरता ‘विपत्कालासाठी निर्माण झालेला बंधू’ होण्यास उत्सुक आहेत. (नीतिसूत्रे १७:१७; स्तोत्र ३४:१८) आपल्या मनःपूर्वक शब्दांमुळे कदाचित ही व्यक्‍ती हळूहळू अशा स्थितीपर्यंत येऊ शकेल जेथून तिला कळपात परत येणे शक्य होईल. मग यानंतर आपण काय करावे? नाणे हरवलेल्या स्त्रीच्या दृष्टान्तातून आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन मिळेल.

प्रामाणिक वृत्ती ठेवा

१८. (अ) दृष्टान्तातली स्त्री पूर्णपणे आशा का सोडत नाही? (ब) नाणे हरवलेली स्त्री कशाप्रकारे मन लावून प्रयत्न करते आणि याचा काय परिणाम होतो?

१८ नाणे हरवलेल्या स्त्रीला याची जाणीव होती की ते परत मिळवणे कठीण आहे पण अशक्य नाही. जर ते एखाद्या मोठ्या झुडपाळ ठिकाणी किंवा दलदलीत पडले असते तरी कदाचित तिने त्याची आशा सोडून दिली असती. पण नाणे घरातच कोठेतरी आहे, ते सापडणे अशक्य नाही हे माहीत असल्यामुळे ती चांगल्याप्रकारे व मन लावून त्याचा शोध घेते. (लूक १५:८) सर्वात आधी ती आपल्या अंधाऱ्‍या घरात प्रकाश येण्याकरता दिवा पेटवते. मग ती केरसुणीने घर झाडून काढते, या आशेने की नाणे जमिनीवर असेल तर ते खणखणेल. शेवटचा प्रयत्न म्हणून, ती घराच्या कानाकोपऱ्‍यांत मन लावून शोध घेते. अचानक, दिव्याच्या प्रकाशात चांदीचे एक नाणे चकाकते. तिच्या मनस्वी प्रयत्नांचे चीज होते!

१९. दुर्बल व्यक्‍तींना मदत करण्यासंबंधी दृष्टान्तातल्या नाणे हरवलेल्या स्त्रीच्या वागण्यावरून आपल्याला काय शिकता येते?

१९ दृष्टान्तातील बारकावे या गोष्टीची आपल्याला आठवण करून देतात, की एका दुर्बल ख्रिस्ती व्यक्‍तीला मदत करण्याचे शास्त्रवचनीय कर्तव्य पूर्ण करणे आपल्या अवाक्याबाहेर नाही. त्याच वेळेस आपल्याला हे देखील कळून येते की प्रयत्नांशिवाय हे साध्य होत नाही. कारण प्रेषित पौलाने इफिस येथील मंडळीच्या वडिलांना असे म्हटले: “तुम्हीहि श्रम करून दुर्बळांना साहाय्य करावे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५अ) या स्त्रीला घरात इकडेतिकडे, वरवर केवळ आठवण येईल तेव्हा अधूनमधून पाहिल्यावर नाणे सापडत नाही हेही आठवणीत असू द्या. उलट, “ते सापडेपर्यंत” पद्धतशीरपणे शोध घेतल्यामुळेच तिला यश मिळते. त्याचप्रकारे, आध्यात्मिकरित्या दुर्बल व्यक्‍तीला परत मिळवण्याकरता आपण प्रयत्न करतो तेव्हा आपले प्रयास मनःपूर्वक आणि उद्देशपूर्ण असले पाहिजेत. आपण काय करू शकतो?

२०. दुर्बल व्यक्‍तींना मदत करण्यासाठी काय केले जाऊ शकते?

२० आध्यात्मिकरित्या कमजोर झालेल्या व्यक्‍तीच्या मनात विश्‍वास व कृतज्ञता उत्पन्‍न करण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो? एखाद्या योग्य ख्रिस्ती प्रकाशनातून वैयक्‍तिक बायबल अभ्यास घेण्याची कदाचित या व्यक्‍तीला गरज असेल. किंबहुना, अशा कमजोर व्यक्‍तीसोबत बायबल अभ्यास केल्याने आपल्याला तिला नियमितपणे आणि चांगल्याप्रकारे मदत करण्याची संधी मिळते. कदाचित मंडळीचे सेवा पर्यवेक्षक ठरवू शकतात की ही मदत पुरवण्याकरता कोण सर्वात योग्य ठरेल. ते कदाचित कोणत्या विषयांवर अभ्यास केला जावा आणि कोणते प्रकाशन सर्वात उपयुक्‍त ठरेल हे देखील सुचवू शकतात. दृष्टान्तातल्या स्त्रीने आपला उद्देश साध्य करण्यासाठी उपयोगी साधनांची मदत घेतली त्याप्रमाणे दुर्बल व्यक्‍तींना साहाय्य करण्याची देवाने सोपवलेली जबाबदारी पार पाडण्याकरता आज आपल्याकडेही अनेक साधने उपलब्ध आहेत. आपली दोन नवीन साधने किंवा प्रकाशने यासाठी उपयोगी ठरू शकतील. ती आहेत, एकच खऱ्‍या देवाची उपासना करा आणि यहोवाच्या जवळ या * (इंग्रजी) ही पुस्तके.

२१. दुर्बलांना मदत केल्यामुळे कशाप्रकारे सर्वांना आशीर्वाद प्राप्त होतात?

२१ दुर्बलांना मदत केल्याने सर्वांना आशीर्वाद मिळतात. ज्याला मदत केली जाते त्याला आपल्या खऱ्‍या मित्रांसोबत पुन्हा मिलाफ झाल्याचा आनंद अनुभवता येतो. आपल्यालाही इतरांना काही देण्याचा मनःपूर्वक आनंद उपभोगता येतो. (लूक १५:६, ९; प्रेषितांची कृत्ये २०:३५ब) मंडळीतील प्रत्येक सदस्य इतरांविषयी प्रेमळ काळजी व्यक्‍त करू लागतो तसतसे सबंध मंडळीतले प्रेम वृद्धिंगत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यहोवा व येशू या आपली काळजी वाहणाऱ्‍या मेंढपाळांचा यामुळे गौरव होतो; कारण दुर्बलांना मदत करण्याची त्यांची इच्छा त्यांच्या पृथ्वीवरील सेवकांच्या वागण्यातून व्यक्‍त होते. (स्तोत्र ७२:१२-१४; मत्तय ११:२८-३०; १ करिंथकर ११:१; इफिसकर ५:१) त्यामुळे, ‘एकमेकांवर प्रीती करण्याची’ आपल्याकडे बरीच सबळ कारणे नाहीत का?

[तळटीप]

^ परि. 20 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• प्रेम दाखवणे आपल्यापैकी प्रत्येकाकरता महत्त्वाचे का आहे?

• जे दुर्बल आहेत त्यांना आपण प्रेम का दाखवावे?

• हरवलेल्या मेंढराच्या आणि हरवलेल्या नाण्याच्या दृष्टान्तांतून आपल्याला काय शिकायला मिळते?

• एखाद्या दुर्बल व्यक्‍तीला मदत करण्यासाठी आपण कोणती व्यावहारिक पावले उचलू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६, १७ पानांवरील चित्रे]

कमजोर व्यक्‍तींना मदत करताना आपण पुढाकार घेतो व त्यांच्याशी दयाळूपणे आणि प्रामाणिक वृत्तीने वागतो

[१६, १७ पानांवरील चित्र]

दुर्बलांना साहाय्य केल्याने सर्वांना आशीर्वाद मिळतात