व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कामाविषयी संतुलित दृष्टिकोन कसा निर्माण करावा

कामाविषयी संतुलित दृष्टिकोन कसा निर्माण करावा

कामाविषयी संतुलित दृष्टिकोन कसा निर्माण करावा

जागतिक बाजारपेठा, गळेकापू स्पर्धा आणि जास्त उत्पादनाच्या दबावपूर्ण जगात पुष्कळ लोकांना दररोज कामावर जाताना उत्सुकता नसते. तरीपण, आपल्याला काम करण्यात आनंद वाटला पाहिजे. का? कारण आपल्याला देवाच्या प्रतिरूपात निर्माण केले आहे—आणि देवाला काम करण्यास आनंद वाटतो. उदाहरणार्थ, निर्मितीच्या सहा ‘दिवसांच्या’ किंवा दीर्घ काळांच्या शेवटी “आपण केलेले सर्व काही फार चांगले आहे असे देवाने पाहिले,” असे उत्पत्ति १:३१ म्हणते.

यहोवाला ‘आनंदित देव’ असे म्हणण्यामागचे एक कारण कदाचित त्याला काम करणे खूप आवडते, हे असावे. (१ तीमथ्य १:११) त्यामुळे, त्याचे अनुकरण आपण जितके अधिक करू तितकेच आनंदी आपण होऊ हे समजण्याजोगे नाही का? याबाबतीत, एक सुप्रसिद्ध वास्तुशिल्पकार आणि व्यवस्थापक असलेला प्राचीन इस्राएलचा राजा शलमोन, याने लिहिले: “प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीहि देवाची देणगी आहे.”—उपदेशक ३:१३.

आज कामाच्या ठिकाणी क्षणाक्षणाला बदल होत असताना कामाविषयी संतुलित, हितकर दृष्टिकोन बाळगणे कठीण असू शकते. पण आपले प्रेमळ मार्गदर्शन स्वीकारणाऱ्‍यांना यहोवा देव आशीर्वादित करतो. (स्तोत्र ११९:९९, १००) हे लोक बहुमोल, विश्‍वासू कामगार बनतात आणि म्हणून त्यांची नोकरी जाण्याची शक्यता कमी असते. ते जीवनाकडे व कामाकडे केवळ पैशांच्या दृष्टिकोनातून नव्हे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहू लागतात. यामुळे ते जीवनात जबाबदारीने निर्णय घेऊ शकतात आणि पाहू शकतात की, त्यांचा आनंद व सुरक्षेची भावना नोकरीवर किंवा अस्थिर रोजगार क्षेत्रावर अवलंबून नाही. (मत्तय ६:३१-३३; १ करिंथकर २:१४, १५) यामुळे त्यांना नोकरीविषयी संतुलित दृष्टिकोन ठेवायला मदत मिळते.

कामाविषयी ईश्‍वराला प्रसन्‍न करणारी मनोवृत्ती बाळगा

काही लोकांना कामाचे व्यसन लागलेले असते; त्याशिवाय त्यांना काहीच दिसत नसते. इतरजणांना, दिवस कधी एकदाचा संपतो आणि कधी एकदाचे आपण घरी जातो असे वाटत असते. संतुलित दृष्टिकोन कोणता आहे? बायबल उत्तर देते: “कष्टाचे व वाऱ्‍याच्या मागे लागण्याचे ओंजळभर यापेक्षा स्वस्थपणाचे मूठभर बरे.” (उपदेशक ४:६, पं.र.भा.) खूप जास्त किंवा खूप वेळपर्यंत काम केल्याने उलट निकृष्ट दर्जाचे काम होते—हे वायफळ, ‘वाऱ्‍याच्या मागे लागण्यासारखे’ आहे. का? कारण यामुळे आपल्याला सर्वात जास्त आनंद देणाऱ्‍या गोष्टींनाच अर्थात कुटुंब आणि मित्रांसोबतचा आपला नातेसंबंध, आपली आध्यात्मिकता, आपले आरोग्य, आपले दीर्घायुष्य, यांना हानी पोहंचू शकते. (१ तीमथ्य ६:९, १०) ओंजळभर कष्ट करून दुःखाने ग्रासलेले असण्यापेक्षा थोडक्यात संतुष्ट असून थोडीफार मनःशांती असणे हा संतुलित दृष्टिकोन आहे.

संतुलित दृष्टिकोनासाठी प्रोत्साहन देताना बायबल आळशीपणाला संमती देत नाही. (नीतिसूत्रे २०:४) आळशीपणाने एखाद्याचा आत्म-सन्मान आणि इतरांना आपल्याबद्दल वाटणारा आदर हळूहळू नाहीसा होतो. विशेष म्हणजे, यामुळे देवासोबतचा आपला नातेसंबंध बिघडतो. बायबल स्पष्टपणे सांगते की, ज्याला काम करण्याची इच्छा नसेल त्याने इतरांच्या जिवावर आपले पोट भरू नये. (२ थेस्सलनीकाकर ३:१०) उलट, त्याने आपले मार्ग बदलावेत आणि कष्ट करावेत व अशाप्रकारे स्वतःचे आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्‍यांचे सन्मानाने भरणपोषण करावे. कष्ट करून तो खरोखर गरजू असलेल्यांनाही मदत करू शकेल—याला देवाच्या वचनात प्रोत्साहन दिले आहे.—नीतिसूत्रे २१:२५, २६; इफिसकर ४:२८.

बालपणापासून कामाला महत्त्व देण्याचे शिक्षण

चांगल्या सवयी आपोआप निर्माण होत नसतात; त्या लहानपणी अंगवळणी पाडाव्या लागतात. यास्तव, बायबल पालकांना असे उत्तेजन देते: “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” (नीतिसूत्रे २२:६) पालकांनी, कष्ट करणारे म्हणून स्वतःचे चांगले उदाहरण राखण्याव्यतिरिक्‍त मुलांच्या वयानुसार त्यांना घरातली कामे नेमली पाहिजेत. काही कामांसाठी मुले कधी कधी चीडचीड करतील पण आईवडिलांनी विशेषकरून एखादे काम चांगले झाल्यावर मुलांची वाहवाह केली तर त्यांना हे दिसून येईल की घरामध्ये त्यांची कदर केली जाते. दुःखाची गोष्ट म्हणजे, काही पालक, आपण मुलांवर प्रेम करत आहोत या चुकीच्या भावनेने त्यांना डोक्यावर बसवतात. अशा पालकांनी नीतिसूत्रे २९:२१ (मराठी आर.व्ही व्हर्शन) या वचनाचा विचार करावा; त्यात म्हटले आहे: “बाळपणापासून एखाद्या गुलामाला [किंवा अपत्याला] लाडात वाढविले, तर तो शेवटी कृतघ्न ठरेल.”

जबाबदार पालक आपल्या मुलांच्या शिक्षणातही रस घेतात व त्यांना अभ्यासात लक्ष घालायला व मेहनत घ्यायला उत्तेजन देतात. नंतर, नोकरी करतेवेळी मुलांना याचा फायदा होईल.

कामाच्या निवडीबाबत सुज्ञ असा

आपण कोणते काम करावे आणि कोणते करू नये हे बायबल आपल्याला सांगत नसले तरी त्यात आपल्याकरता उत्तम मार्गदर्शन दिले आहे ज्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती, देवाप्रती सेवा आणि इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍यांकडे दुर्लक्ष होणार नाही. उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने लिहिले: “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे. ह्‍यासाठी की, . . . जे ह्‍या जगाचा उपयोग करितात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करीत नसल्यासारखे असावे; कारण ह्‍या जगाचे बाह्‍य स्वरूप लयास जात आहे.” (१ करिंथकर ७:२९-३१) या सद्य व्यवस्थीकरणात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी किंवा पूर्णपणे स्थिर नाही. आपला सगळा वेळ आणि शक्‍ती त्यासाठी खर्च करणे म्हणजे सतत प्रलय येत असलेल्या क्षेत्रात घर बांधण्यासाठी आयुष्यभर कमावलेली मिळकत खर्च करण्यासारखे होईल. ही किती मूर्खपणाची गुंतवणूक ठरेल!

इतर बायबल अनुवादांमध्ये, ‘त्याचा उपयोग पूर्णपणे करत नसणे’ हा शब्दांश “त्यातच गर्क होऊन जाऊ नये” असा वापरण्यात आला आहे. (सुबोध भाषांतर) सुज्ञ व्यक्‍ती कधीही विसरणार नाहीत की, सद्य व्यवस्थीकरणासाठी काळाचा “संक्षेप” करण्यात आला असल्यामुळे त्यातच “गर्क होऊन” गेल्याने निराशा व पस्तावा होणे अनिवार्य ठरेल.—१ योहान २:१५-१७.

‘देव तुला टाकणार नाही’

आपल्यापेक्षा यहोवाला आपल्या गरजा अधिक ठाऊक आहेत. त्याच्या उद्देशाच्या पूर्णतेत आपली काय भूमिका आहे हे देखील त्याला ठाऊक आहे. म्हणून तो अशी आठवण करून देतो: “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण [देवाने] स्वतः म्हटले आहे, ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.’” (इब्री लोकांस १३:५) हे शब्द किती सांत्वनदायक आहेत! देवाला आपल्या लोकांकरता असलेल्या प्रेमळ काळजीचे अनुकरण करत, येशूने कामाबद्दल आणि भौतिक गोष्टींबद्दल आपल्या शिष्यांना योग्य दृष्टिकोन शिकवण्यासाठी डोंगरावरील प्रवचनात याविषयी बरेच काही सांगितले.—मत्तय ६:१९-३३.

यहोवाचे साक्षीदार या शिकवणींचे पालन करायचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, एका मालकाने आपल्याकडे इलेक्ट्रिशियनचे काम करणाऱ्‍या एका साक्षीदाराला नियमितपणे ओव्हरटाईम करायला सांगितले तेव्हा त्याने नकार दिला. का? कारण, आपली नोकरी, कुटुंबासाठी आणि आध्यात्मिक गोष्टींसाठी दिलेल्या वेळेच्या आड येऊ नये असे त्याला वाटत होते. तो एक कुशल आणि भरवसालायक कामगार असल्यामुळे त्याच्या मालकाने त्याच्या इच्छेचा आदर केला. अर्थात, सर्वांच्याच बाबतीत असे घडणार नाही; काहींना संतुलित जीवनशैली जगण्यासाठी दुसरी एखादी नोकरी शोधावी लागेल. परंतु, यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍यांना सहसा हा प्रत्यय येतो की, त्यांच्या सदाचरणामुळे व कामासूपणामुळे मालक त्यांच्यावर संतुष्ट असतो.—नीतिसूत्रे ३:५, ६.

सगळे काम फलदायी असेल तेव्हा

सध्याच्या अपरिपूर्ण व्यवस्थीकरणात, नोकऱ्‍यांसंबंधी किंवा नोकऱ्‍या मिळण्यासंबंधी समस्या उद्‌भवणार नाहीत किंवा अनिश्‍चितता नसेल असे कधीही होणार नाही. किंबहुना, जगाची स्थिती अधिक अस्थिर होईल आणि अर्थव्यवस्थेत चढउतार होतील किंवा ती कोलमडेल तेव्हा परिस्थिती अधिकच बिकट होऊ शकते. पण ही परिस्थिती काही काळापुरतीच आहे. लवकरच, असा काळ येईल जेव्हा कोणीही बेकार नसेल. शिवाय, सगळे काम रोचक आणि फलदायी असेल. हे कसे शक्य आहे? हा बदल कशामुळे घडेल?

संदेष्टा यशया याच्याद्वारे यहोवाने या काळाची भविष्यवाणी केली. यहोवा म्हणाला, “पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करितो; पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.” (यशया ६५:१७) तो स्वतःच्या नवीन सरकाराविषयी सांगत होता ज्यामध्ये एक नवीन आणि वेगळा मानवी समाज वास्तवात उतरेल.—दानीएल २:४४.

लोक ज्या प्रकारे राहतील आणि कार्य करतील त्याविषयी ती भविष्यवाणी पुढे म्हणते: “ते घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यांत दुसरे राहतील, ते लावणी करितील आणि फळ दुसरे खातील, असे व्हावयाचे नाही; कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत, कारण परमेश्‍वराने आशीर्वाद दिलेली ती संतति आहे, व त्यांची मुले त्यांजवळ राहतील.”—यशया ६५:२१-२३.

देवाचे ते नवीन जग किती वेगळे असेल! जेथे तुमचे “परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत” तर तुमच्या श्रमाचे “फळ” तुम्हाला पूर्णपणे मिळेल अशा जगात राहायला तुम्हाला आवडणार नाही का? पण हे आशीर्वाद कोणाला प्राप्त होतील याकडे लक्ष द्या. ‘परमेश्‍वराने आशीर्वाद दिलेल्या संततीला’ हे आशीर्वाद प्राप्त होतील. यहोवाविषयी शिकून त्याच्या अपेक्षा पूर्ण करून तुम्ही या ‘आशीर्वाद दिलेल्या संततीपैकी’ एक होऊ शकता. येशूने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे [“त्यांचे ज्ञान घ्यावे,” NW].” (योहान १७:३) देवाचे वचन, बायबल याच्या पद्धतशीर अभ्यासाद्वारे ते जीवन देणारे ज्ञान प्राप्त करण्यास यहोवाचे साक्षीदार तुमची आनंदाने मदत करतील.

[६ पानांवरील चौकट]

“त्यांच्यासाठी सतत मागणी असते”

“जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा,” असे बायबल म्हणते. (कलस्सैकर ३:२३) जो आपल्या कामासंबंधी हे उत्तम तत्त्व लागू करतो तो निश्‍चितच एक इष्ट कामगार बनेल. म्हणूनच, अदृश्‍य कसे व्हावे (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात जे. जे. लुना, कामगारांच्या शोधात असलेल्या मालकांना असा सल्ला देतात की, त्यांनी विशिष्ट धार्मिक गटाच्या सक्रिय सदस्यांचा शोध घ्यावा; ते पुढे म्हणतात: “पण सहसा, [यहोवाच्या] साक्षीदारांनाच कामावर ठेवले जाते.” याला कारणीभूत असलेल्या विविध कारणांमध्ये ते त्यांच्या इमानदारपणाचा उल्लेख करतात व म्हणतात की यामुळेच विविध क्षेत्रांमध्ये “त्यांच्यासाठी सतत मागणी असते.”

[५ पानांवरील चित्रे]

आध्यात्मिक कार्यहालचाली आणि मनोरंजन यांसोबत कामाचा समतोल साधल्याने समाधान मिळते