व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

छळाच्या धगधगत्या भट्टीत पारख

छळाच्या धगधगत्या भट्टीत पारख

जीवन कथा

छळाच्या धगधगत्या भट्टीत पारख

परक्लीझ यानोरिस यांच्याद्वारे कथित

त्या कुबट वासाच्या कोठडीच्या गारव्यामुळे माझी हाडंसुद्धा गारठली होती. अंगावर एक पातळ रग ओढून मी एकटाच बसलो होतो तेव्हा, दोन दिवसांपूर्वी नागरिकी सेनेचे लोक माझ्या घरात येऊन मला फरफटत नेत असताना, माझ्या तरुण पत्नीचा चेहरा कसा भावरहित झाला होता हे मला आठवलं; माझी पत्नी आमच्या दोन लहान आजारी बाळांबरोबर एकटीच राहिली होती. नंतर काही दिवसांनी, तिनं मला एक पाकीट आणि एक चिठ्ठी पाठवली; ती तेव्हा सत्यात नव्हती. पत्रात तिनं लिहिलं होतं: “तुम्हाला काही पाव पाठवत आहे, हे पाव खाऊन आपल्या मुलांसारखेच आजारी व्हाल अशी आशा करते.” मी माझ्या कुटुंबाला पाहायला जिवंत माघारी जाईन का?

ख्रिस्ती विश्‍वासासाठी मला द्याव्या लागलेल्या दीर्घ व कठीण लढ्यातला हा केवळ एक भाग होता; मला, कुटुंबाकडून येणाऱ्‍या विरोधाचा सामना करावा लागला, समाजानं मला वाळीत टाकलं, अनेक कायदेशीर प्रकरणे लढावी लागली आणि अगदी क्रूर छळाचा सामना करावा लागला. पण शांत स्वभावाचा व देवाला भिऊन वागणारा मी अशा या भयंकर ठिकाणी कसा व का आलो होतो? सांगतो मी तुम्हाला.

थोर स्वप्न पाहणारा गरीब मुलगा

क्रीट, स्टाव्रोमेनो येथे १९०९ साली माझा जन्म झाला तेव्हा देश युद्ध, दारिद्र्‌य आणि दुष्काळ यांनी पछाडलेला होता. त्यानंतर आलेल्या स्पॅनिश फ्लूच्या तडाख्यातून माझी चार भावंडं व मी मरता मरता वाचलो. मला आठवतं, फ्लूची साथ आम्हाला लागू नये म्हणून आमच्या आईवडिलांनी आम्हाला काही आठवड्यांपर्यंत घरातच कोंडून ठेवलं होतं.

माझे बाबा, गरीब शेतकरी होते पण खूप धार्मिक आणि खुल्या मनाचे होते. फ्रान्स आणि मदागास्करमध्ये राहून आल्यामुळे धर्माच्या बाबतीत त्यांची विचारसरणी संकोचित नव्हती. तरीपण आमचं कुटुंब ग्रीक ऑर्थडॉक्स चर्चशी एकनिष्ठ राहिलं; दर रविवारी आम्ही मासला जायचो आणि स्थानिक बिशप वर्षातून एकदा भेट द्यायला यायचे तेव्हा त्यांच्या राहण्याची सोय आमच्याच घरात व्हायची. मी कॉयरबॉय होतो आणि पाळक व्हायचं माझं स्वप्न होतं.

१९२९ साली मी पोलिस दलात भरती झालो. एकदा, ग्रीसच्या उत्तरेकडील थेस्सलनायकात माझी ड्यूटी लागली होती तेव्हाच बाबा वारले. सांत्वन आणि प्रबोधन मिळावं म्हणून मी, माऊंट एथोसच्या पोलिस दलात बदली करून घेतली; कारण तिथंच जवळपास एक मठ होता ज्याला ऑर्थडॉक्स ख्रिस्ती अगदी आदराने “पवित्र पर्वत” असं संबोधायचे. * तिथं मी चार वर्षे सेवा केली आणि मठवासींची जीवनशैली अगदी जवळून पाहिली. देवाजवळ येण्याऐवजी मी मठवासींची अगदी उघडपणे चालणारी अनैतिकता व भ्रष्टाचार पाहून थक्क झालो. एका आर्कीमॅनड्रीटनं (ज्याचा मी खूप आदर करत होतो) माझ्याबरोबर घाणेरडे चाळे करायचा प्रयत्न केला तेव्हा तर मला अतिशय किळस वाटली. माझी खूप निराशा झाली होती तरीपण, मला देवाची सेवा करायची इच्छा होती आणि पाळक व्हायचे होते. मी आठवणीसाठी, पाळकाचा झगा घालून एक फोटोसुद्धा काढला होता. कालांतरानं मी पुन्हा क्रीटला आलो.

“तो सैतान आहे!”

१९४२ साली मी फ्रोसीनी नावाच्या एका देखण्या मुलीबरोबर लग्न केलं; फ्रोसीनी एका प्रतिष्ठित कुटुंबातली होती. लग्नानंतर पाळक व्हायचा माझा निश्‍चय आणखी पक्का झाला कारण, माझ्या सासरकडचे लोक अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे होते. * अथेन्सला थिओलॉजिल सेमीनरीत जाण्याचा मी पक्का निश्‍चय केला. १९४३ सालच्या शेवटी मी क्रीटच्या इराक्लिओन बंदरावर गेलोसुद्धा पण अथेन्सला जाऊ शकलो नाही. कदाचित, या वेळेदरम्यान मला वेगळ्या स्रोताकडून आध्यात्मिक तजेला मिळाला होता. नेमकं काय झालं होतं?

काही वर्षांपासून, यहोवाच्या साक्षीदारांबरोबर संबंधित असलेले एक तरुण आवेशी प्रचारक, इमॅनवेल लिओनुडाकीस हे संपूर्ण क्रीटमध्ये उद्‌बोधनकारक बायबल सत्य शिकवत होते. * साक्षीदार देवाच्या वचनांची स्पष्ट समज देत असल्यामुळे काही लोक खोटा धर्म सोडून त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. सिटीआ नावाच्या जवळपासच्या एका शहरात, साक्षीदारांचा एक आवेशी गट संघटित झाला होता. यामुळे स्थानीय बिशप क्रोधीत झाले कारण, अमेरिकेत राहून आल्यामुळे यहोवाचे साक्षीदार प्रचारक म्हणून किती प्रभावशाली असू शकतात हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते. आपल्या क्षेत्रात चाललेल्या या ‘पाखंडाचे’ उच्चाटन करण्याचा त्यांनी निश्‍चय केला होता. त्यांच्या चिथावणीमुळे पोलिस नेहमी साक्षीदारांना वेगवेगळ्या खोट्या आरोपांखाली कारागृहात किंवा कोर्टात खेचून न्यायचे.

या साक्षीदारांपैकी एकाने मला बायबल सत्य समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण त्याचा असा ग्रह झाला की मला आस्था नाही. त्यामुळे दुसऱ्‍या एका अनुभवी सेवकाला माझ्याबरोबर बोलण्यासाठी त्याने पाठवले. माझ्या फटकळ प्रतिसादामुळे, या दुसऱ्‍या साक्षीदाराने, साक्षीदारांच्या या लहान गटाला जाऊन असे सांगितले, की “परक्लीझ कधी साक्षीदार होणार नाही! तो सैतान आहे!”

विरोधाचा पहिला अनुभव

पण आनंदाची गोष्ट म्हणजे, देवाचं माझ्याबाबतीत असं मत नव्हतं. १९४५ सालच्या ऑक्टोबर महिन्यात माझा भाऊ, डिमोस्थनीझ याची खात्री पटली होती, की यहोवाचे साक्षीदार सत्य शिकवतात; त्यानं मला सर्व दुखितांना सांत्वन द्या * ही पुस्तिका दिली. पुस्तिकेतील माहिती वाचून मी प्रभावित झालो. आम्ही लगेच ऑर्थोडॉक्स चर्चला जायचं सोडून दिलं, सिटीआ येथील साक्षीदारांच्या गटात सामील झालो आणि नव्याने मिळालेल्या विश्‍वासाबद्दल आम्ही आमच्या इतर भावंडांना सांगू लागलो. सर्वांनी बायबल सत्य स्वीकारलं. मी अपेक्षा केल्याप्रमाणे, खोटा धर्म सोडण्याच्या माझ्या निर्णयामुळे मला वाळीत टाकण्यात आलं आणि माझ्या पत्नीनं व तिच्या कुटुंबानं माझा कडाडून विरोध केला. इतकंच काय, तर माझ्या सासऱ्‍यांनी तर माझ्याबरोबर काही काळपर्यंत बोलायचंसुद्धा सोडून दिलं. घरात नेहमी वाद व्हायचे, तणावाचं वातावरण असायचं. इतकं असूनही, मे २१, १९४५ रोजी बंधू मिनोस कोकीनाकीस यांनी डिमोस्थनीझला व मला बाप्तिस्मा दिला. *

सरतेशेवटी माझं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि आता मी देवाचा खराखुरा सेवक म्हणून सेवा करू शकत होतो! घरोघरच्या सेवेतला माझा पहिला दिवस मला अजूनही आठवतो. माझ्या बॅगेत ३५ पुस्तिका घेऊन मी एकटाच बसने एका गावात गेलो. लाजत लाजतच मी घरोघरी जाऊ लागलो. पण मी जितकं पुढं जात राहिलो तितकं धैर्य मला मिळू लागलं. एक चिडलेला पाळक मला भेटला आणि तो मला पोलिस स्टेशनात यायची खूप गळ घालत होता तरीपण मी मात्र धैर्याने त्याच्याकडे लक्षच दिले नाही. मी त्याला सांगितलं, की संपूर्ण गावाला भेट दिल्यानंतरच मी इथून जाणार आहे; आणि मी तसंच केलं. मला इतका आनंद झाला होता की, बस येईपर्यंत मला थांबवेना; मी १५ किलोमीटर चालत घरी आलो!

क्रूर गुंडांच्या हातात

१९४५ सालच्या सप्टेंबर महिन्यात, सिटीआत नव्याने तयार झालेल्या एका मंडळीत मला जादा जबाबदाऱ्‍या देण्यात आल्या. त्यानंतर काही दिवसांतच ग्रीसमध्ये यादवी युद्ध सुरू झाले. पक्षांध गट एकमेकांवर हिंस्र पशूंप्रमाणे तुटून पडले. या परिस्थितीचा फायदा उचलून बिशपने एका स्थानीय गनिमी गटाला, कोणत्याही मार्गाने साक्षीदारांचा नायनाट करायची गळ घातली. (योहान १६:२) हा गट बसने आमच्या गावाकडे येत होता तेव्हा, बसमध्ये असलेल्या एका ओळखीच्या बाईने, ‘देवाने आज्ञापिलेल्या’ त्यांच्या कार्याची चर्चा ऐकली आणि तिनं लगेच आम्हाला सावध केलं. आम्ही लपून बसलो, आमच्या एका नातेवाईकानं आम्हाला खूप मदत केली. आमचे जीव वाचले.

परंतु यामुळे पुढच्या संकटांसाठी जणू मार्ग तयार झाला. मारहाण, धमक्या रोजचीच गोष्ट झाली. आमच्या विरोधकांनी आम्हाला चर्चला पुन्हा जाण्यास, आमच्या मुलांना बाप्तिस्मा देण्यास आणि क्रॉसचे चिन्ह करण्यास बळजबरीनं अनेक प्रयत्न केले. एकदा तर त्यांनी माझ्या भावाला, तो मेला असे समजेपर्यंत बेदम मारलं. माझ्या दोन बहिणींचे कपडे फाडून त्यांना मारहाण करण्यात आली तेव्हा तर मला खूप वाईट वाटलं. त्या काळात, चर्चनं यहोवाच्या साक्षीदारांच्या आठ मुलांना जबरदस्तीनं बाप्तिस्मा दिला.

१९४९ साली आई वारली. तेव्हाही पाळक पुन्हा आले; अंत्यविधीच्या परवानगीशी संबंधित असलेले कायदेशीर नियम आम्ही पाळले नाही असा त्यांनी आमच्यावर आरोप केला. मला कोर्टात नेण्यात आलं आणि नंतर माझी निर्दोष मुक्‍तता झाली. यामुळे सर्वांना अतिशय चांगली साक्ष मिळाली, कारण प्रकरणाच्या सुरवातीला यहोवाचं नाव घेण्यात आलं होतं. “आम्हाला ताळ्यावर आणण्याचा” फक्‍त एकच मार्ग आमच्या शत्रूंकडं उरला होता; व तो म्हणजे आम्हाला अटक करून बंदिवासात पाठवायचं. १९४९ सालच्या एप्रिल महिन्यात त्यांनी तेच केलं.

धगधगत्या भट्टीत

अटक केलेल्या तीन बांधवांपैकी मी एक होतो. माझी बायको तर स्थानीय पोलिस स्टेशनमध्ये मला पाहायलासुद्धा आली नाही. आमचा पहिला मुक्काम, इराक्लिओन, क्रीट इथल्या तुरुंगात होता. लेखाच्या सुरवातीला वर्णन केल्याप्रमाणे मी एकटा पडलो होतो, निराश झालो होतो. साक्षीदार नसलेल्या बायकोला आणि दोन लहान बाळांना मागे सोडून मी आलो होतो. मदतीसाठी मी यहोवाला कळकळीनं प्रार्थना केली. इब्री लोकांस १३:५ मधील, “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही” हे देवाचे शब्द मला आठवले. देवावर संपूर्ण भरवसा ठेवण्यातच सुज्ञपणा आहे हे मी जाणलं.—नीतिसूत्रे ३:५.

ग्रीसमधील अटीका किनाऱ्‍यापासून दूर, मॅक्रोनीसोस नावाच्या एका ओसाड बेटावरील तुरुंगात आम्हाला सोडण्यात येणार असल्याचं आम्हाला समजलं. मॅक्रोनीसोस हे फक्‍त नावच ऐकून लोक गार व्हायचे; कारण, त्या तुरुंगात भयंकर यातना व कैद्यांकडून जबरदस्त काम करून घेतले जायचे. तिथं जात असताना आम्ही पायरीस शहरात थांबलो. आमच्या हातात बेड्या होत्या; पण काही सहविश्‍वासू बांधव आम्हाला बोटीवर भेटायला आले, त्यांनी आम्हाला मिठी मारली त्यामुळे आम्हाला खूप उत्तेजन मिळालं.—प्रेषितांची कृत्ये २८:१४, १५.

मॅक्रोनीसोसमध्ये जीवन एक दुःस्वप्न होते. सैनिक सकाळपासून रात्रीपर्यंत कैद्यांचे हालहाल करायचे. साक्षीदार नसलेले पुष्कळ कैदी अक्षरशः वेडे झाले, काही मरण पावले, पुष्कळजण अधू झाले. रात्री आम्हाला, कैद्यांच्या रडण्याचा, कण्हण्याचा आवाज ऐकू यायचा. माझ्याजवळच्या पातळ रगीमुळे मला रात्रीच्या थंडीत थोडीशीच ऊब मिळायची.

हळूहळू, छावणीतील सर्व लोक यहोवाच्या साक्षीदारांना ओळखू लागले; कारण दररोज सकाळी हजेरी घेतली जायची तेव्हा त्यांची नावं घेतली जायची. यामुळे आम्हाला साक्ष देण्याच्या पुष्कळ संधी मिळायच्या. मला तर, पूर्वी राजकीय कैदी असलेल्या एका मनुष्याला बाप्तिस्मा देण्याचा सुहक्कही मिळाला; यहोवाला आपले जीवन समर्पण करण्याइतपत त्याने प्रगती केली होती.

तुरुंगात असताना मी, माझ्या बायकोकडून मला माझ्या पत्रांची उत्तरं मिळत नव्हती तरीपण मी तिला पत्र लिहीत राहिलो. मी तिला अतिशय प्रेमळ शब्दांत पत्र लिहायचो, तिला सांत्वन द्यायचो, हा फक्‍त एक तात्पुरता दुरावा आहे आणि लवकरच आपण पुन्हा एकदा सुखानं जगू अशी मी तिला खात्री द्यायचो.

कालांतराने, साक्षीदारांची संख्या वाढतच राहिली. एकदा कार्यालयात काम करत असताना छावणीच्या कमांडींग कोलोनेलशी मी ओळख करून घेतली. यांना साक्षीदारांबद्दल आदर असल्यामुळे, अथेन्समधल्या आमच्या दफ्तरातून आम्हाला काही बायबल साहित्य मिळेल का, असं मी माझं संपूर्ण धैर्य एकवटून त्यांना विचारलं. “मिळू शकेल. तुमचे लोक एक काम का करत नाहीत, तुमचं सामान ते माझ्या नावावर पाठवू शकतात,” असं ते मला म्हणाले. हे ऐकून मी तर अवाक झालो! काही दिवसांनंतर, आम्ही एका बोटीवरचं सामान खाली उतरवत होतो तेव्हा एका पोलिसानं कोलोनलला सलामी मारली आणि म्हटलं: “साहेब, तुमचं सामान आलंय.” कोलोनल म्हणाले: “सामान?” मी तिथंच जवळपास होतो आणि त्यांचं बोलणं मला ऐकू आलं, म्हणून मी त्यांना हळूच म्हटलं: “मला वाटतं ते कदाचित तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या नावावर आलेलं आमचं सामान असेल.” यहोवा आम्हाला या एका मार्गानं आध्यात्मिक अन्‍न पुरवत राहिला.

अनपेक्षित आशीर्वाद —मग पुन्हा संकटे

१९५० सालच्या शेवटी मला सोडण्यात आलं. मी घरी गेलो तेव्हा खूप आजारी, निस्तेज, अशक्‍त झालो होतो, घरी माझं कशाप्रकारे स्वागत होईल याची मला खात्री नव्हती. पण माझ्या बायकोला आणि मुलांना पाहून मला खूप आनंद वाटला. इतकंच नव्हे तर फ्रोसीनी बदलल्याचे पाहून मला आश्‍चर्य वाटलं; पूर्वीचा तिचा राग निवळला होता! तुरुंगात असताना मी लिहिलेल्या पत्रांचा तिच्यावर प्रभाव पडला होता. माझी सहनशीलता व चिकाटी पाहून ती खूप प्रभावित झाली होती. काही दिवसांनंतर, मी तिच्याबरोबर खूप वेळपर्यंत समेटासाठी चर्चा केली. तिनं बायबलचा अभ्यास करण्याची तयारी दाखवली आणि यहोवा व त्याच्या अभिवचनांवर तिचाही विश्‍वास वाढू लागला. १९५२ साली, माझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा दिवस तो होता जेव्हा फ्रोसीनीला मी यहोवाची एक समर्पित सेविका म्हणून बाप्तिस्मा देऊ शकलो.

१९५५ साली आम्ही, ख्रिस्ती धर्मजगत की ख्रिस्ती धर्म—यांपैकी “जगाचा प्रकाश” कोणता आहे? (इंग्रजी) या पत्रिकेची एक प्रत प्रत्येक पाळकाला देण्याची एक मोहीम सुरू केली. मला पुन्हा अटक करण्यात आली आणि पुष्कळ सहसाक्षीदारांबरोबर मला कोर्टासमोर उभं करण्यात आलं. यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध इतकी प्रकरणं होती, की कोर्टाला त्यांच्या सुनावणीसाठी एक खास सत्र ठेवावं लागलं. त्या दिवशी प्रांतातील संपूर्ण कायदेशीर मंडळ उपस्थित होतं आणि कोर्टरूममध्ये पाळकांची गर्दी जमली होती. आणि खुर्च्यांमधल्या मोकळ्या जागेत बिशपाच्या चकरा चालल्या होत्या. एका पाळकानं माझ्यावर धर्मपरिवर्तनाचा आरोप लावला. तेव्हा न्यायाधिशांनी त्याला विचारलं: “तुमचा विश्‍वास इतका कमकुवत आहे का, की फक्‍त एकच माहितीपत्रक वाचल्यावर तुमचं धर्मपरिवर्तन करता आलं?” हे ऐकून तर त्या पाळकाला काय बोलायचं तेच सुचलं नाही. माझी निर्दोष मुक्‍तता झाली पण काही बांधवांना सहा महिन्यांसाठी तुरुंगवास सुनावण्यात आला.

त्यानंतरच्या वर्षांमध्ये आमची पुष्कळदा धरसोड झाली; कोर्ट प्रकरणे वाढतच राहिली. आमची प्रकरणे सोडवण्यासाठी आमच्या वकिलांची चांगलीच दमछाक व्हायची. मला एकूण १७ वेळा कोर्टात नेण्यात आलं आहे. इतका विरोध असूनसुद्धा आम्ही नियमितरीत्या प्रचार कार्य करीत राहिलो. आम्ही आनंदानं हे आव्हान स्वीकारलं आणि या जळजळत्या कसोट्यांनी आमचा विश्‍वास शुद्ध केला.—याकोब १:२, ३.

नवीन सुहक्क आणि आव्हाने

१९५७ साली आम्ही अथेन्सला राहायला गेलो. तिथं मला, नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या मंडळीत सेवा करण्यास नियुक्‍त करण्यात आलं. माझ्या पत्नीनं मला पूर्णपणे पाठींबा दिल्यामुळे आम्ही आमची जीवनशैली अतिशय साधीसुधी ठेवू शकलो आणि आध्यात्मिक गोष्टींना आमच्या जीवनात प्राधान्य देऊ शकलो. यामुळेच आम्ही आमचा बहुतेक वेळ प्रचार कार्यात खर्च करू शकलो. पुष्कळदा आम्हाला, जिथं जास्त गरज आहे अशा वेगवेगळ्या मंडळ्यांमध्ये जाऊन सेवा करण्यास सांगण्यात आलं.

१९६३ साली, माझा मुलगा २१ वर्षांचा झाला आणि त्याला सक्‍तीनं लष्करात भरती होण्यास सांगण्यात आलं. परंतु ज्या सर्व साक्षीदारांना असं सांगण्यात आलं त्यांनी तटस्थ भूमिका घेतल्यामुळे त्यांना मारहाण, थट्टा आणि अपमान यांना तोंड द्यावं लागलं. माझा मुलगाही यातून सुटला नाही. त्यामुळे, पूर्वीच्या सर्व सचोटी राखणाऱ्‍या बंधूभगिनींच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यास त्याला उत्तेजन देण्यासाठी मी, मॅक्रोनीसोसहून आणलेली ती पातळ रग त्याला दिली. एका लष्करी कोर्टानं, बोलवलेल्या बांधवांची उलटतपासणी घेतली आणि सहसा त्यांना दोन किंवा चार वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येई. सुटका झाल्यावर त्यांना पुन्हा बोलावून तुरुंगात पाठवले जाई. धार्मिक सेवक म्हणून मी विविध तुरुंगांना भेटी देऊ शकलो पण माझ्या मुलाला आणि इतर विश्‍वासू साक्षीदारांना खूप कमी भेटू शकलो. माझा मुलगा सहापेक्षा अधिक वर्षांपर्यंत तुरुंगात होता.

यहोवानं आम्हाला सांभाळलं

ग्रीसमध्ये धार्मिक स्वातंत्र्य पुन्हा मिळाल्यावर मला ऱ्‍होड्‌सच्या द्वीपावर तात्पुरत्या काळासाठी खास पायनियर म्हणून सेवा करण्याचा विशेषाधिकार मिळाला. मी माझ्या ख्रिस्ती करिअरची जेथून सुरवात केली होती त्या क्रीटमधील सिटीआमध्ये १९८६ साली बांधवांची गरज होती. लहानपणापासून मी ओळखत असलेल्या माझ्या प्रिय बंधूभगिनींबरोबर सेवा करण्याची नेमणूक मी आनंदानं स्वीकारली.

माझ्या कुटुंबात मी सर्वात थोरला असल्यामुळे, मला आमच्या एकूण जवळजवळ ७० नातेवाईकांना यहोवाची सेवा एकनिष्ठपणे करत असल्याचे पाहण्यास आनंद वाटतो. आणखी पुष्कळ नातेवाईक सत्यात येत आहेत. काहींनी, वडील, सेवा सेवक, पायनियर, बेथेल सदस्य, प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा केली आहे. ५८ वर्षांपेक्षा अधिक वर्षांपासून, संकटांच्या धगधगत्या भट्टीत माझ्या विश्‍वासाची पारख झाली आहे. आता मी ९३ वर्षांचा आहे आणि माझ्या सरलेल्या आयुष्याचा विचार करतो तेव्हा मला देवाची सेवा केल्याचा जराही पस्तावा होत नाही. “माझ्या मुला, तू आपले चित्त मला दे, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवोत” या प्रेमळ हाकेस प्रतिसाद देण्यास त्यानं मला शक्‍ती दिली आहे.—नीतिसूत्रे २३:२६.

[तळटीपा]

^ परि. 9 टेहळणी बुरूज डिसेंबर १, १९९९, पृष्ठे ३०-१ पाहा.

^ परि. 11 ग्रीक ऑर्थडॉक्स चर्चच्या पाळकांना लग्न करण्याची मुभा होती.

^ परि. 12 टेहळणी बुरूज, सप्टेंबर १, १९९९, पृष्ठे २५-९ वर इमॅनवेल लिओनुडाकीस यांची जीवन कथा आहे.

^ परि. 15 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, पण सध्या छापले जात नाही.

^ परि. 15 टेहळणी बुरूज, सप्टेंबर १, १९९३, पृष्ठे २७-३१ वर, मिनोस कोकीनाकीस यांच्याशी संबंधित असलेल्या एका कायदेशीर विजयाबाबतची माहिती पाहा.

मॅक्रोनीसोस —भयभीत करणारे द्वीप

१९४७ ते १९५७ पर्यंत म्हणजे दहा वर्षांसाठी मॅक्रोनीसोसच्या रुक्ष आणि निर्जन द्वीपावर, १,००,००० पेक्षा अधिक कैदी राहायचे. यांपैकी पुष्कळजण विश्‍वासू साक्षीदार होते ज्यांना आपल्या ख्रिस्ती तटस्थतेसाठी येथे पाठवण्यात आले होते. साक्षीदारांना हद्दपार करण्यास प्रवृत्त करणारे सहसा ग्रीक ऑर्थडॉक्स पाळक असायचे; साक्षीदार कम्युनिस्ट आहेत असा खोटा आरोप ते त्यांच्यावर लावायचे.

मॅक्रोनीसोसच्या तुरुंगात वापरल्या जाणाऱ्‍या ‘सुधारणुकीच्या’ प्रक्रियेविषयी पॅपिरोस लारुस ब्रिटॅनिका नावाच्या ग्रीक विश्‍वकोशात असे म्हटले आहे: “क्रूर यातना पद्धती, . . . सुसंस्कृत राष्ट्राला अमान्य असेल असे राहणीमान आणि कैद्यांना रक्षक देत असलेली गैरवागणूक . . . ग्रीकच्या इतिहासावर काळीमा फासणारे आहेत.”

काही साक्षीदारांना सांगण्यात आले होते, की जोपर्यंत ते आपले धार्मिक विश्‍वास सोडून देत नाहीत तोपर्यंत त्यांची येथून सुटका होणार नाही. पण, कोणीही साक्षीदारांच्या एकनिष्ठेचा भंग करू शकले नाहीत. एवढेच नव्हे तर, साक्षीदारांबरोबर संपर्क आल्यामुळे काही राजकीय कैद्यांनी बायबल सत्य स्वीकारले.

[२७ पानांवरील चित्र]

मॅक्रोनीसोसच्या पीनल द्वीपावर असताना, मिनोस कोकीनाकीस (उजवीकडून तिसरे) आणि मी (डावीकडून चौथा)

[२९ पानांवरील चित्र]

सिटीआ, क्रीटमध्ये मी तरुणपणी सेवा केली तेथे एका सहसाक्षीदाराबरोबर सेवा करताना