व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

अतिप्रसंगाच्या वेळी एखाद्या व्यक्‍तीने मोठमोठ्याने ओरडावे असे बायबल का सांगते?

बलात्कारी व्यक्‍तीच्या क्रूर हल्ल्याची शिकार झालेल्या व्यक्‍तीवर काय गुदरते हे, त्या परिस्थितीतून न गेलेल्या व्यक्‍तीला मुळीच समजणार नाही; बळी पडलेल्या व्यक्‍तीचे जीवन या अनुभवाने पार उद्‌ध्वस्त होऊ शकते. हा अनुभव त्या स्त्रीसाठी इतका भयजनक असू शकतो की संपूर्ण आयुष्यभर तो तिला सतावत राहू शकतो. * काही वर्षांपूर्वी एका ख्रिस्ती तरुणीवर एका बलात्कारी व्यक्‍तीने हल्ला केला; ती म्हणते: “त्या रात्री मला किती भीती वाटली होती किंवा तेव्हापासून मला झालेल्या मानसिक धक्क्याची तीव्रता मी शब्दांत व्यक्‍त करू शकत नाही.” त्यामुळे पुष्कळ जणी या भीतीदायक विषयाचा विचारही का करू इच्छित नाहीत हे समजण्याजोगे आहे. तरीपण, बलात्काराचे भय हे या दुष्ट जगातील एक वास्तविकता आहे.

बायबल, गत काळात घडलेल्या बलात्काराच्या किंवा बलात्काराचा प्रयत्न करण्यात आलेल्या घटनांविषयी सांगण्याचे टाळत नाही. (उत्पत्ति १९:४-११; ३४:१-७; २ शमुवेल १३:१-१४) परंतु एखादीवर असा प्रसंग येतो तेव्हा काय केले जाऊ शकते याबाबत ते सल्ला देते. याबाबतीत नियमशास्त्र काय म्हणते ते अनुवाद २२:२३-२७ मध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये दोन परिस्थितींचा उल्लेख करण्यात आला आहे. पहिल्या परिस्थितीत, एक पुरूष एखाद्या स्त्रीला शहरात पाहतो आणि तो तिच्याशी संबंध ठेवतो. अशा वेळी ती स्त्री मदतीसाठी आरडाओरडा करत नाही. परिणामतः मग, “तिने गावात असून आरडाओरड केली नाही” म्हणून तिला दोषी ठरवण्यात येते. तिने आरडाओरड केली असती तर जवळपासचे लोक कदाचित तिच्या मदतीला धावून आले असते. दुसऱ्‍या परिस्थितीत, एक पुरूष एका तरुण स्त्रीला गावाच्या बाहेर पाहतो आणि “तिच्यावर बलात्कार” करतो. प्रतिकारात, ती स्त्री “ओरडली तेव्हा तिचा बचाव करावयाला कोणी नव्हते.” दुसऱ्‍या परिस्थितीत स्त्रीने पहिल्या परिस्थितीप्रमाणे बलात्कारी व्यक्‍तीला संमती दिली नाही. तिने त्याला झटून विरोध केला, मदतीसाठी आरडाओरडा केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तिने आरडाओरडा केला यावरून हे सिद्ध होते, की तिच्यावर जबरदस्ती करण्यात आल्यामुळे ती निर्दोष होती.

आज ख्रिस्ती लोक मोशेच्या नियमशास्त्राधीन नसले तरीसुद्धा, त्यातील तत्त्वे त्यांना मार्गदर्शन देऊ शकतात. वरील अहवाल, प्रतिकार करण्याच्या व मदतीसाठी आरडाओरड करण्याच्या महत्त्वावर जोर देतो. अतिप्रसंगाच्या वेळी आरडाओरडा करणे हा अजूनही सर्वात सुज्ञ मार्ग समजला जातो. गुन्हेगारी रोखण्याच्या संबंधाने असलेले एक तज्ज्ञ म्हणतात: “एखाद्या स्त्रीवर हल्ला होतो तेव्हा, स्वतःचा बचाव करण्यासाठी तिच्या जवळ असलेले सर्वात उत्तम शस्र म्हणजे मोठमोठ्याने ओरडणे.” स्त्रीच्या ओरडण्याकडे इतरांचे लक्ष जाऊ शकते व ते मदतीला येऊ शकतात किंवा तिच्या ओरडण्याने हल्ला करणारा गोंधळून जाऊन कदाचित पळून जाऊ शकतो. एका मनुष्याने एका ख्रिस्ती तरुणीवर हल्ला केला तेव्हा ती म्हणते: “मी बेंबीच्या देठापासून ओरडत राहिले त्यामुळे तो मनुष्य मागे सरला. पण पुन्हा जेव्हा तो माझ्याकडे येऊ लागला तेव्हासुद्धा मी किंचाळू लागले आणि पळाले. पूर्वी मला वाटायचं, की ‘वासनेनं पिसाळलेल्या एखाद्या शक्‍तिशाली मनुष्यानं मला जर धरलं तर माझ्या ओरडण्याचा काही फायदा होईल का?’ पण माझ्यावर खरोखर तो प्रसंग आला तेव्हा मला समजलं, की ओरडण्याचा खरोखर फायदा होऊ शकतो!”

एखाद्या स्त्रीवर जेव्हा शक्‍तीचा वापर करून बलात्कार होतो तेव्हा देखील तिने केलेला प्रतिकार किंवा मदतीसाठी केलेली ओरड ही वाया जात नाही. उलट, याद्वारे हेच सिद्ध होते, की हल्ला करणाऱ्‍याचा तिने तिच्या शक्‍तीनिशी प्रतिकार केला. (अनुवाद २२:२६) तिच्यावर बलात्कार झाला असला तरी, तिचा विवेक शुद्ध राहील, ती आत्म-सन्मान बाळगू शकेल आणि ही खात्री बाळगू शकेल की देवाच्या नजरेत ती निष्कलंक आहे. या भयंकर अनुभवामुळे तिला मानसिक आघात होईल खरा परंतु, हल्ल्याचा प्रतिकार करण्यास तिने तिच्या परीने सर्व प्रयत्न केला होता ही जाणीव तिला हळूहळू सावरण्यास खूप मदत करील.

अनुवाद २२:२३-२७ ही वचने समजून घेत असताना, आपण एक गोष्ट समजावी, की या संक्षिप्त अहवालात सर्व शक्य परिस्थितींचा समावेश करण्यात आलेला नाही. जसे की, मुक्या, बेशुद्ध किंवा घाबरून लुळ्या पडलेल्या अथवा तोंडावर हात ठेवल्यामुळे वा चिकटपट्टी लावल्यामुळे ओरडू शकत नसलेल्या स्त्रीवर हल्ला होतो त्या परिस्थितीविषयी त्यात काहीच सांगितलेले नाही. पण, यहोवा सर्व काही (हेतू देखील) तोलून पाहत असल्यामुळे अशा परिस्थितींच्या बाबतीत तो समजंसपणा व न्याय दाखवतो कारण “त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत.” (अनुवाद ३२:४) घटनास्थळी नेमके काय घडले आणि बळी पडलेल्या स्त्रीने तिच्यावर बलात्कार करणाऱ्‍या मनुष्याचा प्रतिकार करायचा प्रयत्न केला होता हे त्याला माहीत आहे. त्यामुळे, एखाद्या स्त्रीवर अतिप्रसंग होत असताना ती ओरडू शकली नाही परंतु तिने तिच्या परीने प्रतिकार करायचे सर्व प्रयत्न केले असल्यास, ती सर्वकाही यहोवावर सोपवून देऊ शकते.—स्तोत्र ५५:२२; १ पेत्र ५:७.

तरीपण, ज्या ख्रिस्ती स्त्रियांवर अशाप्रकारचा हल्ला होऊन अतिप्रसंग झाला आहे त्यांना दोषीपणाच्या भावनांमुळे खूप यातना होतात. घडलेल्या घटनेचा त्या विचार करतात तेव्हा त्यांना वाटते, की ती घटना टाळण्याकरता त्यांना आणखी पुष्कळ काही करता आले असते. परंतु, स्वतःला असा दोष देत बसण्यापेक्षा त्या यहोवाला प्रार्थना करू शकतात, त्याचे साहाय्य मागू शकतात आणि त्याच्या विपुल प्रेमळ दयेची खात्री बाळगू शकतात.—निर्गम ३४:६; स्तोत्र ८६:५.

तेव्हा, बलात्कार झालेल्या ख्रिस्ती स्त्रिया ज्यांना आता त्यांच्या भावनिक जखमा लसत आहेत त्यांनी ही खात्री बाळगावी की त्यांना होत असलेल्या भावनिक वेदनांची यहोवाला चांगल्याप्रकारे जाणीव आहे. देवाचे वचन त्यांना असे आश्‍वासन देते: “परमेश्‍वर भग्नहृदयी लोकांच्या सन्‍निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.” (स्तोत्र ३४:१८) आणि, ख्रिस्ती मंडळीतील सहविश्‍वासू दाखवत असलेला प्रामाणिक समंजसपणा आणि दयाळुपणे देत असलेल्या आधाराचा स्वीकार करूनही, या स्त्रिया आपल्या मानसिक धक्क्यातून सावरू शकतात. (ईयोब २९:१२; १ थेस्सलनीकाकर ५:१४) शिवाय, बळी पडलेल्या या स्त्रियांनी स्वतः जर उभारणीकारक विचारांवर मन एकाग्र केले तर त्यांना “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति” अनुभवता येईल.—फिलिप्पैकर ४:६-९.

[तळटीप]

^ परि. 3 या लेखात बळी पडलेल्या स्त्रियांविषयी सांगण्यात आलेले असले तरी, येथे चर्चा करण्यात आलेली तत्त्वे पुरूषांनाही लागू होतात ज्यांच्यावर अतिप्रसंग होतो.