व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘विपुल फळ देत राहा’

‘विपुल फळ देत राहा’

‘विपुल फळ देत राहा’

“विपुल फळ दिल्याने . . . तुम्ही माझे शिष्य व्हाल.”—योहान १५:८.

१. (अ) येशूने आपले शिष्य होण्याकरता कोणती अट असल्याचे प्रेषितांना सांगितले? (ब) आपण स्वतःला कोणता प्रश्‍न विचारला पाहिजे?

येशूच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी, संध्याकाळची वेळ होती. येशूने आपल्या शिष्यांशी अगदी मोकळेपणाने बराच वेळ हितगुज केले होते. आता मध्यरात्र उलटून गेली होती, पण येशूचे आपल्या या जिवलग मित्रांवर इतके प्रेम होते की तो अजूनही त्यांच्याशी बोलतच होता. मग बोलता बोलता त्याने आपले शिष्य राहू इच्छिणाऱ्‍यांकरता आणखी एका अटीची त्यांना आठवण करून दिली. त्याने म्हटले: “तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.” (योहान १५:८) शिष्य होण्याकरता असलेली ही अट आज आपण पूर्ण करत आहोत का? ‘विपुल फळ देण्याचा’ काय अर्थ होतो? हे जाणून घेण्याकरता आपण त्या संध्याकाळी येशू व त्याच्या शिष्यांत झालेल्या संभाषणावर विचार करू या.

२. आपल्या मृत्यूच्या आदल्या संध्याकाळी येशूने फळाविषयी कोणता दृष्टान्त सांगितला?

फळ देण्याविषयीचा सल्ला येशूने आपल्या प्रेषितांना एका दृष्टान्ताच्या संदर्भात दिला होता. त्याने म्हटले: “मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो; आणि फळ देणाऱ्‍या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करितो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहा. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाहि देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहा; . . . तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीति केली तशी मीहि तुम्हावर प्रीति केली आहे; तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.”—योहान १५:१-१०.

३. फळ देण्याकरता येशूच्या अनुयायांनी काय केले पाहिजे?

या दृष्टान्तात यहोवा माळी आहे, येशू द्राक्षवेल आहे आणि येशू ज्यांना संबोधून बोलत होता ते प्रेषित फांद्या आहेत. प्रेषित जोपर्यंत ‘येशूमध्ये राहण्याचा’ प्रयत्न करतील तोपर्यंत ते फळ देतील. पण येशूमध्ये राहण्यासाठी प्रेषितांना काय करावे लागेल याविषयी येशूने स्पष्टीकरण दिले: “तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.” कालांतराने, प्रेषित योहानानेही सहख्रिस्ती बांधवांना हेच लिहिले: “[ख्रिस्ताच्या] आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठायी राहतो.” * (१ योहान २:२४; ३:२४) अशारितीने, ख्रिस्ताच्या आज्ञा पाळण्याद्वारे त्याचे अनुयायी त्याच्या ठायी राहतात आणि यामुळे त्यांना फळ देणे शक्य होते. पण हे फळ जे आपल्याला उत्पन्‍न करायचे आहे ते कोणत्या स्वरूपाचे आहे?

वाढ होण्याकरता संधी

४. फळ न देणारी प्रत्येक फांदी यहोवा “काढून टाकतो” यावरून आपल्याला काय शिकायला मिळते?

द्राक्षवेलीच्या दृष्टान्तात, जी फांदी फळ देत नाही तिला यहोवा “काढून टाकतो,” किंवा छाटून टाकतो. यावरून आपल्याला काय समजते? एकतर आपल्याला हे समजते, की फळ देण्याची अपेक्षा सर्व शिष्यांकडून केली जाते. इतकेच नव्हे, तर आपल्याला हेही समजते की फळ देणे सर्वांना शक्य आहे मग त्यांची परिस्थिती कशीही असो किंवा त्यांना कोणत्याही मर्यादा असोत. कारण यहोवा मुळात प्रेमळ आहे; जे साध्य करण्याची एखाद्या व्यक्‍तीची कुवतच नाही तिला ते साध्य न केल्याबद्दल ‘काढून टाकण्याइतका’ किंवा अयोग्य ठरवण्याइतका तो निष्ठुर नाही.—स्तोत्र १०३:१४; कलस्सैकर ३:२३; १ योहान ५:३.

५. (अ) फलदायी होण्यात आपण प्रगती करू शकतो हे येशूच्या दृष्टान्तावरून आपल्याला कसे कळते? (ब) आपण कोणत्या दोन प्रकारच्या फळांविषयी विचार करणार आहोत?

द्राक्षवेलीच्या दृष्टान्तावरून आपल्याला आणखी एक गोष्ट समजते ती अशी, की एक शिष्य म्हणून आपल्या कार्यांत वाढ करण्याचा आपण आपल्या वैयक्‍तिक परिस्थितीनुसार प्रयत्न केला पाहिजे. येशू ही गोष्ट कशी सांगतो ते पाहा: “माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो; आणि फळ देणाऱ्‍या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करितो.” (तिरपे वळण आमचे.) (योहान १५:२) दृष्टान्ताच्या शेवटी येशूने आपल्या अनुयायांना “विपुल फळ” देण्याचे प्रोत्साहन दिले. (तिरपे वळण आमचे.) (८ वे वचन) याचा काय अर्थ होतो? शिष्य या नात्याने आपण कधीही आत्मसंतुष्ट होऊ नये. (प्रकटीकरण ३:१४, १५, १९) उलट, अधिकाधिक फळ देण्यात प्रगती करण्याचे मार्ग आपण शोधून काढले पाहिजेत. कोणत्या प्रकारची फळे अधिकाधिक उत्पन्‍न करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे? दोन प्रकारची (१) “आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ” आणि (२) राज्याचे फळ.—गलतीकर ५:२२, २३; मत्तय २४:१४.

ख्रिस्ती गुणांचे फळ

६. आत्म्याच्या फळांतील पहिले फळ उत्पन्‍न करण्याच्या महत्त्वावर येशू ख्रिस्ताने कशाप्रकारे जोर दिला?

‘आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणाऱ्‍या फळात’ सर्वप्रथम प्रीतीचा उल्लेख आहे. देवाचा पवित्र आत्मा ख्रिश्‍चनांनामध्ये ही प्रीती उत्पन्‍न करतो कारण येशूने या फलदायी द्राक्षवेलीचा दृष्टान्त दिला त्याच्या काही काळाआधीच जी आज्ञा दिली होती त्याचे ते पालन करतात. त्याने प्रेषितांना सांगितले: “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांबरोबर प्रीति करावी.” (योहान १३:३४) किंबहुना, पृथ्वीवरील आपल्या जीवनाच्या त्या शेवटल्या रात्री येशूने वारंवार प्रेषितांना प्रीतीचा गुण प्रदर्शित करण्याची आठवण करून दिली.—योहान १४:१५, २१, २३, २४; १५:१२, १३, १७.

७. फळ देण्याचा संबंध ख्रिस्ती गुण प्रकट करण्याशी आहे हे प्रेषित पेत्राने कशाप्रकारे दाखवले?

पेत्र, जो त्या रात्री उपस्थित होता त्याला याची जाणीव झाली की ख्रिस्ताच्या खऱ्‍या शिष्यांत प्रीती आणि त्याच्याशी संबंधित गुण प्रदर्शित करणे आवश्‍यक आहे. बऱ्‍याच वर्षांनंतर पेत्राने ख्रिश्‍चनांना इंद्रियदमन, बंधुप्रेम आणि प्रीती यांसारखे गुण उत्पन्‍न करण्याचे प्रोत्साहन दिले. पुढे त्याने म्हटले, की असे केल्यास आपण “निष्क्रिय व निष्फळ” ठरणार नाही. (२ पेत्र १:५-८) आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरीही, आत्म्याचे फळ प्रदर्शित करणे आपल्याला शक्य आहे. म्हणूनच प्रीती, दयाळूपणा, सौम्यता आणि इतर ख्रिस्ती गुण अधिकाधिक प्रमाणात दाखवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण “अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही,” अर्थात हे गुण प्रकट करण्याकरता कोणत्याच मर्यादा नाहीत. (गलतीकर ५:२३) तेव्हा, आपण “विपुल फळ” उत्पन्‍न करू या.

राज्याचे फळ उत्पन्‍न करणे

८. (अ) आत्म्याचे फळ आणि राज्याचे फळ यात काय संबंध आहे? (ब) कोणता प्रश्‍न विचार करण्याजोगा आहे?

रंगीबेरंगी आणि रसाळ फळे झाडाची शोभा वाढवतात. पण या फळांचा उपयोग फक्‍त झाडाला सुशोभित करण्यापुरताच नसतो. याच फळांच्या बियांमुळे नवी झाडे उत्पन्‍न होतात. त्याचप्रकारे आत्म्याचे फळ केवळ आपल्या ख्रिस्ती व्यक्‍तिमत्त्वाला आकर्षक बनवत नाही. प्रीती व विश्‍वास यांसारखे गुण आपल्याला देवाच्या वचनात सापडणाऱ्‍या राज्याच्या संदेशाचे बीज पसरवण्याची प्रेरणाही देतात. प्रेषित पौलाने या महत्त्वाच्या संबंधावर कशाप्रकारे जोर दिला याकडे लक्ष द्या. त्याने म्हटले: “आम्ही विश्‍वास [जो आत्म्याच्या फळात सामील आहे] धरतो आणि त्यामुळे बोलतोहि.” (२ करिंथकर ४:१३) पौल पुढे स्पष्ट करतो की याच मार्गाने आपण ‘ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ देवाला अर्पण’ करतो; हे दुसऱ्‍या प्रकारचे फळ आहे जे आपण प्रदर्शित केले पाहिजे. (इब्री लोकांस १३:१५) देवाच्या राज्याचे उद्‌घोषक या नात्याने अधिक फलदायी होण्याकरता, किंवा “विपुल फळ” उत्पन्‍न करण्याकरता आपल्या जीवनात वाव आहे का?

९. फळ देणे म्हणजे शिष्य बनवणे असा अर्थ होतो का? स्पष्ट करा.

या प्रश्‍नाचे उत्तर देण्याकरता सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की राज्याच्या फळात काय समाविष्ट आहे? फळ उत्पन्‍न करणे म्हणजे शिष्य बनवणे असा निष्कर्ष काढणे योग्य ठरेल का? (मत्तय २८:१९) आपण उत्पन्‍न केलेले फळ मुख्यतः अशा व्यक्‍तींना सूचित करते का, की ज्यांना आपण यहोवाचे बाप्तिस्मा घेतलेले उपासक बनण्यास मदत केली आहे? नाही. कारण असे असते, तर फारसा प्रतिसाद मिळत नसलेल्या क्षेत्रांत वर्षानुवर्षे विश्‍वासूपणे राज्याचा संदेश सांगणाऱ्‍या साक्षीदारांची घोर निराशा होईल. जर आपण उत्पन्‍न केलेले फळ केवळ नव्या शिष्यांच्या रूपातच मोजायचे असते तर हे कष्टाळु साक्षीदार येशूच्या दृष्टान्तातल्या नापीक फांद्यासारखे ठरतील! अर्थात, हे खरे नाही. मग आपल्या सेवेत राज्याचे फळ मुळात काय आहे?

राज्याचे बीज पसरवण्याद्वारे फलदायी

१०. बी पेरणारा व वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींच्या येशूने दिलेल्या दृष्टान्तातून राज्याचे फळ काय आहे आणि ते कशास सूचित करत नाही हे कसे दिसून येते?

१० बी पेरणारा आणि वेगवेगळ्या प्रकारची जमीन याविषयी येशूने दिलेल्या दृष्टान्तातच याचे उत्तर आहे—कमी फलप्राप्ती होणाऱ्‍या क्षेत्रात साक्षकार्य करणाऱ्‍या साक्षीदारांना हे उत्तर दिलासा देणारे आहे. येशूने म्हटले की बीज म्हणजे देवाच्या वचनात सापडणारा राज्याचा संदेश आहे आणि जमीन मनुष्याच्या लाक्षणिक हृदयाला सूचित करते. काही बी ‘चांगल्या जमिनीत पडले; ते उगवून पीक आले.’ (लूक ८:८) हे पीक काय आहे? गव्हाच्या कांडीला अंकुर फुटून तो पक्व होतो तेव्हा तो गव्हाच्या नवीन छोट्या छोट्या कांड्यांच्या रूपात नव्हे तर नव्या दाण्यांच्या अर्थात बियांच्या रूपात फळ उत्पन्‍न करतो. त्याचप्रकारे एक ख्रिस्ती व्यक्‍ती देखील नेहमीच नव्या शिष्यांच्या रूपात नव्हे तर राज्याच्या नव्या बियांच्या रूपात फळ उत्पन्‍न करते.

११. राज्याच्या फळाची व्याख्या कशी करता येईल?

११ त्याअर्थी राज्याचे फळ नवे शिष्य किंवा उत्तम ख्रिस्ती गुण यांस सूचित करत नाही. पेरलेले बी राज्याचा संदेश असल्यामुळे, पीक हे त्याच बियांची अनेकपट वाढ होण्यास सूचित करते. या संदर्भात फळ देणे याचा अर्थ राज्याविषयी उद्‌गार काढणे. (मत्तय २४:१४) या अर्थाने राज्याचे फळ देणे—म्हणजेच राज्याची सुवार्ता घोषित करणे हे आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरीसुद्धा आपल्याकरता शक्य नाही का? निश्‍चितच आहे! आणि असे का म्हणता येईल हे देखील त्याच दृष्टान्तात येशूने स्पष्ट केले.

देवाच्या गौरवाकरता उत्तम ते देणे

१२. राज्याचे फळ देणे सर्व ख्रिश्‍चनांकरता शक्य आहे का? स्पष्ट करा.

१२ येशूने म्हटले: ‘चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो फळ देतोच देतो, कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो.’ (मत्तय १३:२३) शेतात पेरलेल्या धान्याचे, परिस्थितीनुसार वेगवेगळ्या मात्रेत पीक येते. त्याचप्रकारे, सुवार्तेची घोषणा करण्याकरता आपण जे योगदान देतो ते आपल्या परिस्थितीनुसार वेगवेगळे असू शकते आणि येशूने याची जाणीव असल्याचे दाखवले. काहींना बऱ्‍याच संधी मिळत असतील, इतरांचे आरोग्य अधिक चांगले असेल किंवा त्यांच्याकडे अधिक शक्‍ती असेल. यामुळे आपल्याला जे शक्य आहे ते इतरजण जे करतात त्याच्या तुलनेत कमी किंवा जास्त असू शकते, पण जर आपण आपल्यापरीने होईल तितके करत आहोत तर यामध्ये यहोवा संतुष्ट आहे. (गलतीकर ६:४) वाढते वय किंवा गंभीर आजारपण यामुळे आपण प्रचार कार्यात मर्यादित सहभाग घेऊ शकत असू तरीसुद्धा आपला दयाळू पिता यहोवा आपल्याकडे ‘विपुल फळ देणारा’ याच दृष्टीने पाहतो. का? कारण आपण “आपले होते नव्हते ते” अर्थात आपली सर्वस्वी सेवा त्याला अर्पण करत असतो. *मार्क १२:४३, ४४; लूक १०:२७.

१३. (अ) राज्याचे फळ ‘देत राहण्याकरता’ सर्वात महत्त्वाचे कारण कोणते आहे? (ब) कमी प्रतिसाद मिळणाऱ्‍या क्षेत्रातही फळ देत राहण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?—(पृष्ठ २१ वरील पेटी पाहा.)

१३ राज्याचे फळ आपण कितीही प्रमाणात उत्पन्‍न करू शकत असलो तरीही, आपण हे का करत आहोत हे नेहमी आठवणीत ठेवल्यास आपल्याला ‘फळ देत राहण्याची’ प्रेरणा मिळेल. (योहान १५:१६, NW) येशूने याचे सर्वात महत्त्वाचे कारण सांगितले: “तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते.” (योहान १५:८) होय, आपले प्रचार कार्य सर्व मानवजातीसमोर यहोवाचे नाव पवित्र करते. (स्तोत्र १०९:३०) ऑनर नावाची, जवळजवळ ७५ वर्षांची एक विश्‍वासू साक्षीदार भगिनी म्हणते: “कमी प्रतिसाद मिळणाऱ्‍या क्षेत्रातही परात्पर देवाचे प्रतिनिधी म्हणून कार्य करणे एक बहुमानाचे काम आहे.” १९७४ सालापासून अत्यंत आवेशी साक्षीदार राहिलेले क्लॉडिओ यांना जेव्हा विचारण्यात आले की त्यांच्या क्षेत्रात फार कमी लोक प्रतिसाद देतात तरीसुद्धा ते प्रचार का करतात तेव्हा त्यांनी योहान ४:३४ हे वचन उद्धृत केले, जेथे आपण येशूचे पुढील शब्द वाचतो: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्‍न आहे.” क्लॉडिओ पुढे म्हणतात: “येशूप्रमाणे मला राज्य प्रचारक या नात्याने आपले काम केवळ सुरू करायचे नाही तर ते पूर्ण देखील करायचे आहे.” (योहान १७:४) सबंध जगातील यहोवाचे साक्षीदार या गोष्टीशी सहमत आहेत.—पृष्ठ २१ वर, ‘धीराने फळ देत राहणे’ या शीर्षकाची पेटी पाहा.

प्रचार करणे व शिकवणे

१४. (अ) बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाचे आणि स्वतः येशूचे काम कशाप्रकारे दुहेरी स्वरूपाचे होते? (ब) आजच्या काळातील ख्रिस्ती कार्याचे तुम्ही कसे वर्णन कराल?

१४ शुभवर्तमानांत उल्लेख केलेला पहिला राज्य उद्‌घोषक होता बाप्तिस्मा देणारा योहान. (मत्तय ३:१, २; लूक ३:१८) त्याचा मूळ उद्देश ‘साक्ष देण्याचा’ होता आणि त्याने हे कार्य पूर्ण विश्‍वासाने आणि “सर्वांनी विश्‍वास ठेवावा” या आशेने केले. (योहान १:६, ७) किंबहुना, योहानाने ज्यांना प्रचार केला त्यांच्यापैकी काही ख्रिस्ताचे शिष्य बनले. (योहान १:३५-३७) त्याअर्थी, योहान हा एक प्रचारक आणि शिष्य बनवणारा देखील होता. येशू देखील एक प्रचारक आणि शिक्षक होता. (मत्तय ४:२३; ११:१) तेव्हा यात काहीच आश्‍चर्य नाही, की येशूने आपल्या अनुयायांना केवळ राज्याच्या संदेशाचा प्रचार करण्याचीच नव्हे तर जे लोक हा संदेश स्वीकारतील त्यांना येशूचे शिष्य बनण्यास मदत करण्याचीही आज्ञा दिली. (मत्तय २८:१९, २०) त्यामुळे आज आपले काम प्रचार करण्याचे आणि शिकवण्याचेही आहे.

१५. सा.यु. पहिल्या शतकात केल्या जाणाऱ्‍या आणि आजच्या काळात केल्या जाणाऱ्‍या प्रचार कार्याला जो प्रतिसाद मिळतो त्यात काय साम्य आहे?

१५ सा.यु. पहिल्या शतकातील ज्या लोकांनी पौलाचा प्रचार व शिकवणी ऐकल्या त्यांपैकी “कित्येकांची खातरी झाली, तर कित्येक विश्‍वास ठेविनात.” (प्रेषितांची कृत्ये २८:२४) आजही लोकांचा प्रतिसाद काहीसा तसाच आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे बरेच राज्याचे बी चांगल्या जमिनीवर पडत नाहीत. पण येशूने भाकीत केल्याप्रमाणे काही बी चांगल्या जमिनीवर पडतात, मुळे धरतात आणि त्यांना अंकुरही फुटतो. किंबहुना, सबंध जगात वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात, सरासरी ५,००० पेक्षा अधिक लोक ख्रिस्ताचे खरे शिष्य बनतात! इतर बरेचजण विश्‍वास ठेवत नसले तरीसुद्धा, या नवीन शिष्यांची मात्र ‘जे सांगितले त्यावरून खात्री होते.’ राज्य संदेशाप्रती अशी ग्रहणशील मनोवृत्ती बाळगण्यास त्यांना कशामुळे मदत मिळते? सहसा साक्षीदार त्यांच्याबद्दल वैयक्‍तिक आस्था दाखवतात—जणू नव्यानेच पेरलेल्या बियांना पाणी घालतात आणि यामुळे बराच फरक पडतो. (१ करिंथकर ३:६) बऱ्‍याच उदाहरणांपैकी दोन उदाहरणांवर विचार करू या.

वैयक्‍तिक आस्था दाखवल्याने बराच फरक पडतो

१६, १७. सेवाकार्यात भेटणाऱ्‍यांना वैयक्‍तिक आस्था दाखवणे का महत्त्वाचे आहे?

१६ बेल्जियम येथे राहणारी कॅरोलीन ही एका वयस्क स्त्रीकडे गेली जिने राज्याच्या संदेशात काहीच आस्था दाखवली नाही. या स्त्रीच्या हाताला बॅन्डेज असल्यामुळे कॅरोलीन व तिच्यासोबत असलेल्या बहिणीने तिला मदत करण्याचा प्रयत्न केला पण या स्त्रीने नकार दिला. दोन दिवसांनी या दोन बहिणी पुन्हा त्या स्त्रीच्या घरी गेल्या व त्यांनी तिच्या तब्येतीविषयी विचारपूस केली. कॅरोलीन म्हणते, “यामुळे एकदम फरक पडला. आम्हाला खरोखरच तिच्याबद्दल कळकळ वाटत होती हे पाहून तिला खूप आश्‍चर्य वाटले. तिने आम्हाला तिच्या घरात आमंत्रित केले आणि एक बायबल अभ्यास सुरू झाला.”

१७ संयुक्‍त संस्थानात राहणारी साक्षीदार बहीण सॅन्डी ही देखील ज्यांना प्रचार करते त्यांच्याविषयी वैयक्‍तिक आस्था दाखवते. स्थानिक वृत्तपत्रांत नव्या शिशुंच्या जन्माची घोषणा करणाऱ्‍या जाहिराती पाहून ती या नव्या पालकांना भेटायला जाते आणि सोबत बायबल कथांचं माझं पुस्तक नेते. * आई साहजिकच घरी भेटते आणि येणाऱ्‍यांना मोठ्या कौतुकाने आपले बाळ दाखवते त्यामुळे या बहिणीला संभाषण सुरू करणे सहसा सोपे जाते. सॅन्डी सांगते, “नवजात बालकाला वाचून दाखवल्याने त्याच्यासोबत नाते जोडण्यात कशी मदत मिळते याविषयी मी या नव्या आईवडिलांशी बोलते. यानंतर आजच्या समाजात मुलांचे संगोपन करणे किती आव्हानात्मक आहे याबद्दल मी चर्चा करते.” अशा एका भेटीमुळे अलीकडेच एक आई व तिची सहा मुले यहोवाची सेवा करू लागली आहेत. पुढाकार घेऊन लोकांमध्ये वैयक्‍तिक आस्था दाखवल्याने आपल्या सेवाकार्यातही अशाच प्रकारचे आनंदी परिणाम मिळू शकतात.

१८. (अ) ‘विपुल फळ देण्याची’ अट पूर्ण करणे आपल्या सर्वांना शक्य आहे असे का म्हणता येईल? (ब) शिष्य होण्याकरता योहानाच्या शुभवर्तमानात उल्लेख केलेल्या कोणत्या अटी पूर्ण करण्याचा तुमचा निर्धार आहे?

१८ ‘विपुल फळ देत राहण्याची’ अट पूर्ण करणे आपल्या सर्वांना शक्य आहे हा विचार किती प्रोत्साहन देणारा आहे! आपण तरुण असोत वा वृद्ध, आपले आरोग्य चांगले असो वा नसो, आपल्या प्रचाराच्या क्षेत्रात लोक प्रतिसाद देत असोत वा नसोत, आपण सर्वजण विपुल फळ देऊ शकतो. कसे? आत्म्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ अधिकाधिक प्रदर्शित करण्याद्वारे आणि देवाच्या राज्याचा संदेश आपल्या सर्व शक्‍तीसामर्थ्याने पसरवण्याद्वारे. त्याच वेळी, आपण ‘येशूच्या वचनात राहण्याचा’ आणि ‘एकमेकांवर प्रीति करण्याचाही’ प्रयत्न करत राहू. होय, योहानाच्या शुभवर्तमानात उल्लेख केलेल्या या तीन मुख्य अटी पूर्ण केल्यास आपण दाखवून देतो की आपण ‘खरोखर ख्रिस्ताचे शिष्य आहोत.’—योहान ८:३१; १३:३५.

[तळटीपा]

^ परि. 3 दृष्टान्तात द्राक्षवेलीच्या फांद्या येशूच्या प्रेषितांना आणि देवाच्या स्वर्गीय राज्यात स्थान असलेल्या इतर ख्रिश्‍चनांना सूचित करत असल्या तरीसुद्धा या दृष्टान्तात अशी अनेक सत्ये आहेत जी आजच्या काळातील सर्व ख्रिश्‍चनांच्या उपयोगाची आहेत.—योहान ३:१६; १०:१६.

^ परि. 12 वार्धक्य अथवा आजारपणामुळे घराबाहेर न पडू शकणारे पत्रांद्वारे किंवा शक्य असल्यास टेलिफोनद्वारे साक्षकार्य करू शकतात; तसेच त्यांना भेटायला येणाऱ्‍यांनाही ते सुवार्तेविषयी सांगू शकतात.

^ परि. 17 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

उजळणीकरता प्रश्‍न

• आपण कोणते फळ अधिक विपुलतेने देणे आवश्‍यक आहे?

• ‘विपुल फळ देण्याचे’ ध्येय गाठणे आपल्याला शक्य आहे असे का म्हणता येईल?

• योहानाच्या शुभवर्तमानात उल्लेख केल्याप्रमाणे शिष्य बनवण्याकरता असलेल्या तीन मुख्य अटी कोणत्या आहेत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चौकट/चित्र]

‘धीराने फळ देत राहणे’

कमी प्रतिसाद मिळणाऱ्‍या क्षेत्रांतही विश्‍वासूपणे राज्याच्या संदेशाचा प्रचार करण्यास तुम्हाला कशामुळे मदत मिळते? या प्रश्‍नाची काही सहायक उत्तरे खाली दिलेली आहेत.

“आपल्याला येशूचा पूर्ण पाठिंबा आहे हे जाणल्यामुळे, क्षेत्रात कसाही प्रतिसाद मिळाला तरीसुद्धा आशावादी दृष्टिकोन बाळगून आपल्या कार्यात टिकून राहण्याची प्रेरणा मिळते.”—हॅरी, वय ७२; १९४६ साली बाप्तिस्मा झाला.

“एका वचनामुळे मला नेहमी प्रोत्साहन मिळते, २ करिंथकर २:१७. त्यात म्हटले आहे की आपण ‘देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी’ आपले सेवाकार्य करत असतो. त्याअर्थी सेवाकार्य करताना मी माझ्या सर्वात चांगल्या मित्रांच्या सहवासात असतो.”—क्लॉडियो, वय ४३; १९७४ साली बाप्तिस्मा झाला.

“खरे सांगायचे तर प्रचार कार्य माझ्याकरता एक आव्हान आहे. तरीसुद्धा, स्तोत्र १८:२९ येथील शब्दांचे सत्य मी अनुभवतो: ‘माझ्या देवाच्या साहाय्याने मी तट उडून जातो.’”—जेरर्ड, वय ७९; १९५५ साली बाप्तिस्मा झाला.

“सेवेत मला केवळ एक वचन जरी कोणाला वाचून दाखवायला मिळाले तर मला याचे समाधान मिळते की निदान एका व्यक्‍तीने तरी बायबलच्या साहाय्याने आपल्या हृदयाचे परीक्षण करून घेतले.”—एलनर, वय २६; १९८९ साली बाप्तिस्मा झाला.

“मी वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करून पाहतो. आणि तसं पाहायला गेल्यास इतक्या नवनवीन प्रस्तावना आहेत की जीवनाच्या उरलेल्या वर्षांत मला त्या सर्वांचा उपयोग करता येणार नाही.”—पॉल, वय ७९; १९४० साली बाप्तिस्मा झाला.

“नकारात्मक उत्तरांचं मी फार मनावर घेत नाही. मी अगदी सहजवृत्तीने लोकांशी बोलतो आणि त्यांची मते ऐकून घेतो.”—डॅन्यल, वय ७५; १९४६ साली बाप्तिस्मा झाला.

“मी अशा काही नव्याने बाप्तिस्मा घेतलेल्यांना भेटले ज्यांनी मला सांगितले की माझ्या प्रचार कार्यामुळे त्यांना साक्षीदार बनण्यास साहाय्य मिळाले. माझ्या नकळत, दुसऱ्‍या कोणीतरी नंतर त्यांच्यासोबत अभ्यास केला आणि त्यांना प्रगती करण्यास मदत केली. आपल्या सेवाकार्यात आपण सर्वजण योगदान देतो ही जाणीव अत्यंत आनंददायक आहे.”—जोन, वय ६६; १९५४ साली बाप्तिस्मा झाला.

‘धीराने फळ देत राहण्यास’ तुम्हाला कशामुळे मदत मिळते?—लूक ८:१५.

[२० पानांवरील चित्रे]

आत्म्याचे फळ प्रकट करण्याद्वारे आणि राज्याचा संदेश घोषित करण्याद्वारे आपण विपुल फळ देतो

[२३ पानांवरील चित्र]

‘विपुल फळ देत राहा’ असे येशूने प्रेषितांना म्हटले तेव्हा त्याचा काय अर्थ होता?