व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रभूच्या सांज भोजनाचा तुमच्याकरता काय अर्थ होतो?

प्रभूच्या सांज भोजनाचा तुमच्याकरता काय अर्थ होतो?

प्रभूच्या सांज भोजनाचा तुमच्याकरता काय अर्थ होतो?

“जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्‍त ह्‍यासंबंधाने दोषी ठरेल.”—१ करिंथकर ११:२७.

१. सन २००३ सालाकरता आयोजित करण्यात आलेली सर्वात महत्त्वाची घटना कोणती आणि तिची सुरवात कशी झाली?

सन २००३ मधील सर्वात महत्त्वाची घटना एप्रिल १६ रोजी सूर्यास्तानंतर पार पाडली जाईल. त्या दिवशी यहोवाचे साक्षीदार येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक पाळण्याकरता एकत्रित होतील. याआधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे, येशूने प्रभूचे सांज भोजन म्हटलेला हा विधी सा.यु. ३३ साली निसान १४ तारखेला आपल्या प्रेषितांसोबत वल्हांडणाचा सण साजरा केल्यानंतर स्थापित केला होता. बेखमीर भाकर आणि तांबडा द्राक्षारस ही स्मारकविधीची प्रतिकात्मक चिन्हे येशूच्या पापरहित शरीरास व त्याच्या सांडलेल्या रक्‍तास सूचित करतात—हे एकच बलिदान आहे जे मनुष्यजातीला उपजत पापापासून व मृत्यूपासून मुक्‍त करू शकते.—रोमकर ५:१२; ६:२३.

२. पहिले करिंथकर ११:२७ यात कोणती ताकीद देण्यात आली आहे?

स्मारकविधीच्या प्रतिकात्मक चिन्हांत सहभाग घेणाऱ्‍यांनी हे आदरपूर्वक केले पाहिजे. प्रेषित पौलाने प्राचीन करिंथ शहरातील ख्रिश्‍चनांना लिहिताना ही गोष्ट अगदी स्पष्ट केली कारण करिंथ मंडळीत प्रभूच्या सांज भोजनाचा विधी योग्यप्रकारे पाळला जात नव्हता. (१ करिंथकर ११:२०-२२) पौलाने लिहिले: “जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्‍त ह्‍यासंबंधाने दोषी ठरेल.” (१ करिंथकर ११:२७) या शब्दांचा काय अर्थ आहे?

काहींनी अयोग्यप्रकारे पाळला

३. अनेक करिंथकर ख्रिस्ती प्रभूच्या सांज भोजनाच्या वेळी कशाप्रकारे वागत होते?

कित्येक करिंथकर ख्रिश्‍चनांनी स्मारकविधीत अयोग्यप्रकारे सहभाग घेतला. त्यांच्यामध्ये मतभेद होते आणि काही काळापर्यंत, काहीजण घरून जेवण आणून सभेच्या आधी किंवा सभा सुरू असताना जेवायचे आणि कधीकधी तर ते खाऊन पिऊन मस्त होत असत. ते मानसिक किंवा आध्यात्मिकदृष्ट्या सतर्क नव्हते. यामुळे ते “प्रभूचे शरीर व रक्‍त ह्‍यांसंबंधाने दोषी ठरले.” ज्यांच्याकडे खाण्यास काही नव्हते ते भुकेले राहात आणि त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होत असे. बऱ्‍याच जणांनी योग्य आदर दाखवला नाही आणि या घटनेचे गांभीर्य नीट लक्षात न घेता या विधीत सहभाग घेतला. म्हणूनच त्यांना दोषी ठरवण्यात आले!—१ करिंथकर ११:२७-३४.

४, ५. स्मारक चिन्हांत सहसा सहभाग घेणाऱ्‍यांनी आत्म परीक्षण करणे का आवश्‍यक आहे?

दर वर्षी स्मारकविधी जवळ येतो तेव्हा जे सहसा प्रतिकात्मक चिन्हे ग्रहण करण्यात सहभाग घेतात त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. या शांतीभोजनात योग्यप्रकारे भाग घेण्याकरता त्यांची आध्यात्मिक स्थिती सुदृढ असली पाहिजे. प्राचीन इस्राएलात, अशुद्ध स्थितीत शांत्यार्पणाच्या भोजनात सहभागी होणाऱ्‍या इस्राएली व्यक्‍तीप्रमाणे, आज जो कोणी येशूच्या बलिदानाबद्दल अनादर किंवा तिरस्कार दाखवतो त्याचा “स्वजनातून उच्छेद” केला जाऊ शकतो.—लेवीय ७:२०; इब्री लोकांस १०:२८-३१.

पौलाने स्मारकाची तुलना प्राचीन इस्राएलातील शांतीभोजनाशी केली. ख्रिस्तासोबत सहभागिता करणाऱ्‍यांबद्दल सांगितल्यावर त्याने म्हटले: “तुमच्याने प्रभूचा प्याला व भुतांचाहि प्याला पिववत नाही; ‘प्रभूच्या मेजावरचे’ व भुतांच्याहि मेजावरचे तुमच्याने खाववत नाही.” (१ करिंथकर १०:१६-२१) स्मारक चिन्हांत सहसा भाग घेणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीने गंभीर पाप केल्यास त्याने हे पाप यहोवाजवळ कबूल करावे आणि त्यासोबत मंडळीतल्या वडीलजनांचीही आध्यात्मिक मदत घ्यावी. (नीतिसूत्रे २८:१३; याकोब ५:१३-१६) त्याने खरोखर पश्‍चात्ताप केला व त्यानुसार गुण उत्पन्‍न केले तर त्याने अयोग्यप्रकारे सहभाग घेतलेला नसेल.—लूक ३:८.

आदरपूर्वक प्रेक्षक म्हणून उपस्थित राहणे

६. प्रभूच्या सांज भोजनात सहभागी होण्याचा विशेषाधिकार देवाने कोणाकरता राखून ठेवला आहे?

ख्रिस्ताच्या १,४४,००० बांधवांतील शेषजनांसोबत चांगला व्यवहार करणाऱ्‍यांनी प्रभूच्या सांज भोजनात भागीदार व्हावे का? (मत्तय २५:३१-४०; प्रकटीकरण १४:१) नाही. देवाने हा विशेषाधिकार केवळ अशा व्यक्‍तींसाठी राखून ठेवला आहे, ज्यांना त्याने “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस” होण्याकरता पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त केले आहे. (रोमकर ८:१४-१८; १ योहान २:२०) मग राज्यशासनाखाली जागतिक परादीसात सर्वकाळ जगण्याची आशा असलेल्यांची काय स्थिती आहे? (लूक २३:४३; प्रकटीकरण २१:३, ४) हे स्वर्गीय आशा असलेले येशूचे सोबतीचे वारस नसल्यामुळे ते केवळ आदरपूर्वक प्रेक्षक या नात्याने स्मारक विधीला उपस्थित राहतात.—रोमकर ६:३-५.

७. आपण स्मारक चिन्हांत सहभाग घ्यावा हे पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना कशाप्रकारे कळले?

पहिल्या शतकातील खऱ्‍या ख्रिश्‍चनांना पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त करण्यात आले होते. यांपैकी बऱ्‍याच जणांना पवित्र आत्म्याच्या एक किंवा त्याहून अधिक चमत्कारिक देणग्या प्राप्त होत्या, उदाहरणार्थ, अन्य भाषांत बोलण्याची देणगी. त्यामुळे, आपण आत्म्याद्वारे अभिषिक्‍त आहोत आणि त्याअर्थी आपण स्मारकाच्या चिन्हांत भागीदार व्हावे हे समजणे त्यांना कठीण गेले नसेल. पण आपल्या काळात हे पुढील प्रेरित शब्दांच्या आधारावर ठरवता येते: “जितक्यांना देवाचा आत्मा चालवीत आहे तितके देवाचे पुत्र आहेत; कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण ‘अब्बा, बापा,’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे.” (तिरपे वळण आमचे.)—रोमकर ८:१४, १५.

८. मत्तयाच्या १३ व्या अध्यायात उल्लेख केलेले ‘गहू’ व “निदण” कोणास सूचित करतात?

आजवरच्या अनेक शतकांत, खरे अभिषिक्‍त जन “निदण” असलेल्या शेतात, अर्थात खोट्या ख्रिश्‍चनांमध्ये ‘गव्हाप्रमाणे’ वाढले आहेत. (मत्तय १३:२४-३०, ३६-४३) १८७० सालापासून ‘गहू’ अगदी स्पष्ट दिसू लागले आणि काही वर्षांनंतर अभिषिक्‍त ख्रिस्ती पर्यवेक्षकांना असे सांगण्यात आले: “वडिलांनी [स्मारकाकरता] एकत्रित होणाऱ्‍यांपुढे पुढील अटी मांडाव्यात,—(१) [ख्रिस्ताच्या] रक्‍तावर विश्‍वास; आणि (२) प्रभू व त्याच्या सेवेला आजीवन समर्पण. यानंतर त्यांनी या मनोवृत्तीच्या व अशाप्रकारे समर्पण केलेल्या सर्वांना प्रभूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्याकरता निमंत्रित करावे.”—शास्त्रवचनांचा अभ्यास, (इंग्रजी) खंड ६, नवीन सृष्टी, पृष्ठ ४७३. *

‘दुसऱ्‍या मेंढरांचा’ शोध घेणे

९. ‘मोठ्या लोकसमुदायाची’ १९३५ साली कशाप्रकारे स्पष्टपणे ओळख करून देण्यात आली आणि यामुळे स्मारक चिन्हांत सहभाग घेणाऱ्‍या काही व्यक्‍तींवर काय परिणाम झाला?

कालांतराने, यहोवाची संघटना ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त अनुयायांसोबत इतरांवरही लक्ष केंद्रित करू लागली. या संदर्भात १९३० सालाच्या मध्यात एक महत्त्वाची घटना घडली. त्या अगोदर, प्रकटीकरण ७:९ यातील “मोठा लोकसमुदाय” एक दुय्यम आत्मिक गट असून तो ख्रिस्ताच्या वधूच्या सोबतिणींप्रमाणे अर्थात करवल्यांप्रमाणे १,४४,००० पुनरुत्थित अभिषिक्‍त जनांसोबत स्वर्गात असेल असा देवाच्या लोकांचा समज होता. (स्तोत्र ४५:१४, १५; प्रकटीकरण ७:४; २१:२,) पण ३१ मे, १९३५ रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथे यहोवाच्या साक्षीदारांच्या एका अधिवेशनात देण्यात आलेल्या एका भाषणात शास्त्रवचनांच्या आधारावर हे समजावून सांगण्यात आले की ‘मोठा लोकसमुदाय’ हा अंतकाळात जगणाऱ्‍या ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ सूचित करतो. (योहान १०:१६) त्या अधिवेशनानंतर, ज्यांनी स्मारक चिन्हांत आधी सहभाग घेतला होता त्यांपैकी काहींनी तो घेण्याचे थांबवले कारण आपली आशा स्वर्गीय नसून पृथ्वीवरील जीवनाची आहे हे त्यांना समजले.

१०. सध्याच्या काळातील ‘दुसऱ्‍या मेंढरांच्या’ आशेचे व त्यांच्या जबाबदाऱ्‍यांचे तुम्ही कसे वर्णन कराल?

१० खासकरून १९३५ सालापासून, ‘दुसरी मेंढरे’ होणाऱ्‍यांचा शोध घेण्यात आला आहे; हे असे लोक आहेत जे खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवतात, देवाला आपले जीवन समर्पित करतात आणि राज्य प्रचाराच्या कार्यात ‘लहान कळपाला’ पाठिंबा देतात. (लूक १२:३२) या दुसऱ्‍या मेंढरांना पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा आहे, पण इतर सर्व बाबतीत ते आजच्या काळातील राज्याच्या वारसांच्या शेषजनांसारखेच आहेत. प्राचीन इस्राएलातील यहोवाची उपासना करणाऱ्‍या आणि नियमशास्त्राला अधीन होणाऱ्‍या परदेशी लोकांप्रमाणे आज दुसरी मेंढरे देखील ख्रिस्ती जबाबदाऱ्‍या स्वीकारतात, ज्यांपैकी एक आहे आध्यात्मिक इस्राएलाच्या सदस्यांसोबत सुवार्तेचा प्रचार करणे. (गलतीकर ६:१६) ज्याप्रमाणे कोणीही परदेशी इस्राएलचा राजा अथवा याजक होऊ शकत नव्हता त्याचप्रमाणे या दुसऱ्‍या मेंढरांपैकी कोणीही स्वर्गीय राज्यात राज्य करू शकत नाही अथवा याजकाच्या रूपात सेवा करू शकत नाहीत.—अनुवाद १७:१५.

११. एखाद्या व्यक्‍तीच्या बाप्तिस्म्याच्या तारखेचा या आशेशी संबंध का असू शकतो?

११ तर १९३० सालापर्यंत, स्वर्गीय वर्गाची निवड संपुष्टात आली आहे हे स्पष्ट होऊ लागले होते. आता कित्येक दशकांपासून पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्या दुसऱ्‍या मेंढरांचा शोध सुरू आहे. एखादी अभिषिक्‍त व्यक्‍ती अविश्‍वासू ठरल्यास कदाचित दुसऱ्‍या मेंढरांपैकी ज्या व्यक्‍तीने अनेक वर्षांपासून देवाची विश्‍वासूपणे सेवा केली आहे त्यांपैकी कोणालाही १,४४,००० जनांतील ही कमी भरून काढण्याकरता निवडण्यात येऊ शकते.

काहींना गैरसमज का होतो

१२. कोणत्या परिस्थितीत एका व्यक्‍तीने स्मारक चिन्हे ग्रहण करण्याचे थांबवावे आणि का?

१२ अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना त्यांच्या स्वर्गीय पाचारणाची पूर्ण खात्री असते. पण हे पाचारण नसलेल्या काही व्यक्‍तींनी काही काळापासून स्मारक चिन्हांत सहभाग घेतला असेल तर? आपल्याला स्वर्गीय जीवनाची आशा नाही याची जाणीव झाल्यानंतर नक्कीच त्यांचा विवेक त्यांना यापुढे सहभाग घेण्यास परवानगी देणार नाही. आपल्याला स्वर्गीय राजा किंवा याजक होण्याचे पाचारण नाही हे मुळात माहीत असताना एखादी व्यक्‍ती स्वतःला असे भासवत असेल तर देव निश्‍चितच अशा व्यक्‍तीवर कृपादृष्टी करणार नाही. (रोमकर ९:१६; प्रकटीकरण २०:६) लेवी असलेल्या कोरहने अहरोनाच्या घराण्यापुरते मर्यादित असलेले याजकपद मिळवण्याचा गर्विष्ठपणे प्रयत्न केला तेव्हा यहोवाने त्याला मरणदंड दिला. (निर्गम २८:१; गणना १६:४-११, ३१-३५) कोणत्याही ख्रिस्ती व्यक्‍तीला आपण स्मारक चिन्हांत चुकून सहभाग घेतल्याची जाणीव झाल्यास त्याने किंवा तिने असे करण्याचे थांबवावे आणि नम्रपणे यहोवाला क्षमा मागावी.—स्तोत्र १९:१३.

१३, १४. आपल्याला स्वर्गीय पाचारण असल्याचा काहीजणांना गैरसमज का होऊ शकतो?

१३ आपल्याला स्वर्गीय पाचारण असल्याचा काहीजणांना गैरसमज का होतो? विवाह सोबत्याचा मृत्यू किंवा इतर दुःखद घटनेमुळे पृथ्वीवरील जीवनात कदाचित त्यांना रस उरला नसेल. किंवा अभिषिक्‍त ख्रिस्ती असल्याचा दावा करत असलेल्या एखाद्या जवळच्या मित्राप्रमाणेच आपल्यालाही स्वर्गीय आशा मिळावी अशी कदाचित त्यांची इच्छा असू शकते. अर्थात, देवाने कोणालाही इतरांना हा विशेषाधिकार देऊ करण्याकरता नियुक्‍त केलेले नाही. आणि तो कोणालाही चमत्कारिक वाणीतून संदेश देऊन त्यांना राज्याचे वारीस होण्याकरता अभिषिक्‍त केल्याचे कळवत नाही.

१४ सर्व चांगले लोक स्वर्गात जातात या खोट्या धार्मिक कल्पनेमुळेही काहीजण आपल्याला स्वर्गीय पाचारण झाले आहे असा विचार करू लागतील. म्हणूनच आपण गतकाळात विश्‍वास केलेल्या चुकीच्या विचारांमुळे किंवा इतर गोष्टींमुळे विचलित न होण्याची खबरदारी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ काहीजण स्वतःला असा प्रश्‍न विचारू शकतात की: ‘मी घेत असलेल्या औषधांमुळे माझ्या भावनांवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे का? मी अतिशय भावनाप्रधान असल्यामुळे माझा गैरसमज होण्याची शक्यता आहे का?’

१५, १६. आपण अभिषिक्‍तांपैकी असल्याचा काहीजण चुकीचा निष्कर्ष काढण्याची शक्यता का आहे?

१५ काहीजण स्वतःला कदाचित असे विचारतील: ‘मला मोठेपणाची हौस आहे का? आता किंवा भविष्यात ख्रिस्ताच्या सोबतीचा वारीस होऊन अधिकार मिळवण्याची महत्त्वाकांक्षा माझ्या मनात आहे का?’ पहिल्या शतकात राज्याच्या वारसांचे पाचारण करण्यात आले तेव्हा सर्वांनाच मंडळीत जबाबदारीची पदे नव्हती. आणि स्वर्गीय पाचारण झालेल्या व्यक्‍ती कधी मोठेपणाची अपेक्षा करत नाहीत किंवा अभिषिक्‍त असल्यामुळे प्रौढी मिरवत नाहीत. “ख्रिस्ताचे मन” असलेल्यांकडून अपेक्षा केली जाणारी नम्रता त्यांच्या वागण्यातून दिसून येते.—१ करिंथकर २:१६.

१६ काहीजणांना बायबलचे सखोल ज्ञान असल्यामुळे ते अशा निष्कर्षावर आले आहेत की आपले स्वर्गीय पाचारण झाले आहे. पण आत्म्याने अभिषिक्‍त झाल्यामुळे एका व्यक्‍तीला बायबलचे असाधारण ज्ञान मिळत नाही; पौलाला काही अभिषिक्‍त जनांना सूचना व मार्गदर्शन देण्याची गरज भासली. (१ करिंथकर ३:१-३; इब्री लोकांस ५:११-१४) देवाने आपल्या सर्व लोकांकरता आध्यात्मिक ज्ञान पुरवण्याची तरतूद केली आहे. (मत्तय २४:४५-४७) त्यामुळे कोणीही असा विचार करू नये की अभिषिक्‍त ख्रिस्ती असल्यामुळे आपल्याला पृथ्वीवरील आशा असलेल्यांच्या तुलनेत अधिक ज्ञान आहे. बायबलवरील प्रश्‍नांची उत्तरे देण्यात, साक्षकार्य करण्यात किंवा बायबल विषयांवर भाषणे देण्यात निपुण असणे हे आत्म्याद्वारे अभिषिक्‍त असल्याचा पुरावा नाही. पृथ्वीवरील आशा असलेले ख्रिस्ती देखील या सर्व बाबतीत निपुण आहेत.

१७. आत्म्याने अभिषिक्‍त होणे कशावर आणि कोणावर अवलंबून आहे?

१७ एखाद्या सह विश्‍वासू बांधवाने स्वर्गीय पाचारणासंबंधी विचारल्यास, वडील किंवा इतर प्रौढ ख्रिस्ती त्याच्यासोबत या संदर्भात चर्चा करू शकतात. पण एक व्यक्‍ती दुसऱ्‍या कोणासाठी याबाबतीत निर्णय घेऊ शकत नाही. ज्याला खरोखर स्वर्गीय पाचारण झाले आहे त्याला इतरांना विचारून खात्री करावी लागत नाही. अभिषिक्‍त जन ‘नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्‍या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहेत.’ (१ पेत्र १:२३) आपल्या आत्म्याच्या व वचनाच्या द्वारे देव एक ‘बीज’ पेरतो ज्यामुळे एक व्यक्‍ती स्वर्गीय आशा असलेली “नवी उत्पत्ति” बनते. (२ करिंथकर ५:१७) निवड यहोवा करतो. अभिषिक्‍त करणे हे “इच्छा बाळगणाऱ्‍यावर नव्हे किंवा धावपळ करणाऱ्‍यावर नव्हे, तर दया करणाऱ्‍या देवावर अवलंबून आहे.” (रोमकर ९:१६) मग एक व्यक्‍ती आपल्याला स्वर्गीय पाचारण आहे याची खात्री कशी बाळगू शकते?

त्यांना खात्री का वाटते?

१८. देवाचा आत्मा अभिषिक्‍त जनांच्या आत्म्याबरोबर कशाप्रकारे साक्ष देतो?

१८ देवाच्या आत्म्याची साक्ष अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना स्वर्गीय आशा असल्याची खात्री पटवून देते. पौलाने लिहिले: “ज्याच्या योगे आपण ‘अब्बा, बापा,’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहो; आणि जर मुले तर वारीसहि आहो; म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहो; आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगित असलो तरच.” (तिरपे वळण आमचे.) (रोमकर ८:१५-१७) पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली, अभिषिक्‍त जनांचा आत्मा अर्थात त्यांची मनोवृत्ती त्यांना शास्त्रवचनांत यहोवाच्या आत्मिक मुलांसंबंधी जे सांगितले आहे ते स्वतःवर लागू करण्यास प्रवृत्त करते. (१ योहान ३:२) देवाचा आत्मा त्यांना आपण देवाचे पुत्र असल्याची जाणीव करून देतो आणि त्यांच्या मनात एक निरुपम आशा उत्पन्‍न करतो. (गलतीकर ४:६, ७) होय, कौटुंबिक सदस्यांसोबत व मित्रांसोबत परिपूर्ण मानव या नात्याने पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन अनुभवणे अत्यंत आनंददायक असेल पण देवाने त्यांना ही आशा दिलेली नाही. त्याच्या आत्म्याच्या माध्यमाने त्याने त्यांच्यात स्वर्गीय आशा उत्पन्‍न केली आहे, जी इतकी बळकट आहे की ते पृथ्वीवरील सर्व बंधने व आशा त्यागण्यास तयार होतात.—२ करिंथकर ५:१-५, ८; २ पेत्र १:१३, १४.

१९. अभिषिक्‍त ख्रिस्ती व्यक्‍तीच्या जीवनात नव्या कराराची काय भूमिका आहे?

१९ अभिषिक्‍त ख्रिस्ती त्यांच्या स्वर्गीय आशेसंबंधी व नव्या करारात त्यांना सामील करण्यात आल्याविषयी आश्‍वस्त आहेत. स्मारकविधीची स्थापना करताना येशूने याचा उल्लेख केला व म्हटले: “हा प्याला माझ्या रक्‍तात नवा करार आहे; ते रक्‍त तुम्हांसाठी ओतिले जात आहे.” (लूक २२:२०) देव व अभिषिक्‍त जन नव्या करारातील भागीदार आहेत. (यिर्मया ३१:३१-३४; इब्री लोकांस १२:२२-२४) येशू या कराराचा मध्यस्थ आहे. हा नवा करार ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्‍तामुळे कार्यरत झाला असून या कराराधीन यहोवाच्या नावाकरता केवळ यहुद्यांमधून नव्हे तर सर्व राष्ट्रांतून यहोवाच्या नामाकरता लोकांना एकत्रित करून त्यांना अब्राहामाच्या ‘संतानात’ सामील करण्यात आले. (गलतीकर ३:२६-२९; प्रेषितांची कृत्ये १५:१४) या ‘सर्वकाळच्या करारात’ सर्व आत्मिक इस्राएलांना स्वर्गातील अमर जीवनाकरता पुनरुत्थित केले जाण्याची तरतूद आहे.—इब्री लोकांस १३:२०.

२०. अभिषिक्‍तांना येशूसोबत कोणत्या करारात सामील केले जाते?

२० अभिषिक्‍त जन त्यांच्या आशेविषयी आश्‍वस्त आहेत. त्यांना एका अतिरिक्‍त करारात, अर्थात राज्याच्या करारात घेण्यात आले आहे. ख्रिस्तासोबत त्यांच्या सहभागितेबद्दल येशूने म्हटले: “माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहा. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीहि तुम्हास नेमून देतो.” (लूक २२:२८-३०) ख्रिस्त व त्याच्या सहशासकांमध्ये असणारा हा करार सर्वकाळ राहील.—प्रकटीकरण २२:५.

स्मारकाचा काळ—आनंददायी काळ

२१. स्मारकाच्या काळाचा आपण पुरेपूर फायदा कशाप्रकारे करून घेऊ शकतो?

२१ स्मारकाचा काळ अनेक आशीर्वादांचा काळ आहे. या काळाकरता नेमून देण्यात आलेल्या बायबल वाचनाचा आपण लाभ घेऊ शकतो. तसेच हा खासकरून प्रार्थना, आणि येशूच्या पृथ्वीवरील जीवन व मृत्यूसंबंधी विषयांवर मनन करण्याकरता, तसेच, राज्य प्रचाराच्या कार्यात सहभाग घेण्याकरता चांगला काळ आहे. (स्तोत्र ७७:१२; फिलिप्पैकर ४:६, ७) प्रत्यक्ष स्मारकाचा विधी आपल्याला देवाने व ख्रिस्ताने येशूच्या खंडणी बलिदानासंबंधाने दाखवलेल्या प्रीतीची आठवण करून देतो. (मत्तय २०:२८; योहान ३:१६) ही तरतूद आपल्याला आशा व सांत्वन देते आणि ख्रिस्ताप्रमाणे विश्‍वासू मार्गाक्रमण करण्यास तिने आपला निर्धार अधिक पक्का केला पाहिजे. (निर्गम ३४:६; इब्री लोकांस १२:३) तसेच, देवाच्या सेवेकरता आपले समर्पण पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्या प्रिय पुत्राचे निष्ठावान अनुयायी होण्यासाठी स्मारक विधीने आपल्याला नवे बळ दिले पाहिजे.

२२. देवाने मानवजातीला दिलेली सर्वात मोठी देणगी कोणती आहे आणि या देणगीकरता आपली कृतज्ञता दाखवण्याचा एक मार्ग कोणता?

२२ यहोवाने आपल्याला किती उत्तम देणग्या दिल्या आहेत! (याकोब १:१७) आपल्याला त्याच्या वचनाचे मार्गदर्शन, त्याच्या आत्म्याची मदत आणि सार्वकालिक जीवनाची आशा लाभली आहे. देवाची सर्वात महान देणगी म्हणजे अभिषिक्‍त जनांच्याच नव्हे तर विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांच्या पापांसाठी येशूचे बलिदान. (१ योहान २:१, २) तर मग येशूचा मृत्यू तुमच्याकरता कितपत अर्थपूर्ण आहे? एप्रिल १६, २००३ रोजी सूर्यास्तानंतर प्रभूच्या सांज भोजनाकरता एकत्रित होण्याद्वारे त्याबद्दल कृतज्ञता दाखवणाऱ्‍यांपैकी तुम्ही असाल का?

[तळटीप]

^ परि. 8 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले पण सध्या छापले जात नाही.

तुमची उत्तरे काय आहेत?

• स्मारक चिन्हांत कोणी सहभाग घ्यावा?

• “दुसरी मेंढरे” प्रभूच्या सांज भोजनात केवळ आदरपूर्वक प्रेक्षक म्हणून का उपस्थित राहतात?

• ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीत भाकर व द्राक्षारस ग्रहण करावा हे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना कसे कळते?

• स्मारकाचा काळ कशासाठी उत्तम काळ आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील आलेख/चित्रे]

स्मारकविधीची उपस्थिती

लाखांत

१५,५९७,७४६

१५

१४

१३,१४७,२०१

१३

१२

११

१०

४,९२५,६४३

८७८,३०३

६३,१४६

१९३५ १९५५ १९७५ १९९५ २००२

[१८ पानांवरील चित्र]

या वर्षी प्रभूच्या सांज भोजनाकरता तुम्ही उपस्थित राहाल का?

[२१ पानांवरील चित्र]

स्मारकाचा काळ अधिक बायबल वाचन आणि राज्य प्रचाराच्या कार्यात अधिक सहभाग घेण्याकरता एक उत्तम संधी देतो