व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रभूच्या सांज भोजनाचा विधी का पाळावा?

प्रभूच्या सांज भोजनाचा विधी का पाळावा?

प्रभूच्या सांज भोजनाचा विधी का पाळावा?

“जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले.”—१ करिंथकर ११:२३.

१, २. सा.यु. ३३ च्या वल्हांडणाच्या रात्री येशूने काय केले?

यहोवाचा एकुलता एक पुत्र उपस्थित होता. त्याच्यासोबत त्याच्या ‘परीक्षांमध्ये टिकून राहिलेले’ त्याचे ११ सोबती देखील होते. (लूक २२:२८) सा.यु. ३३ सालातली दिनांक ३१ मार्चची संध्याकाळ होती; जेरूसलेम शहरावर पौर्णिमेचा चंद्र उगवला असावा. येशू ख्रिस्त व त्याच्या प्रेषितांनी नुकताच वल्हांडण सण साजरा केला होता. विश्‍वासघाती यहुदा इस्कार्योतला येशूने पाठवून दिले होते, पण इतरजण अजून थांबले होते. का? कारण लवकरच येशू अत्यंत महत्त्वाचे असे काहीतरी करणार होता. तो काय करणार होता?

शुभवर्तमानाचा लेखक मत्तय तेथे होता, त्यामुळे आपण त्याच्याच शब्दांत ऐकू. त्याने लिहिले: “येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांस देऊन म्हटले, ‘घ्या, खा, हे माझे शरीर आहे.’ आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुति करून तो त्यांस दिला व म्हटले, ‘तुम्ही सर्व ह्‍यातून प्या. हे माझे [नव्या] कराराचे रक्‍त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे.’” (मत्तय २६:२६-२८) ही घटना केवळ त्या दिवसापुरतीच होती का? या घटनेची काय अर्थसूचकता होती? आणि आज तिचा आपल्याकरता काही अर्थ आहे का?

“हे करत राहा”

३. येशूने सा.यु. ३३ साली निसान १४ च्या रात्री जे केले ते अर्थसूचक का होते?

सा.यु. ३३ च्या निसान १४ रोजी घडलेली घटना येशू ख्रिस्ताच्या जीवनातली केवळ एक क्षुल्लक घटना नव्हती. प्रेषित पौलाने करिंथ येथील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लिहिताना याविषयी चर्चा केली; वीस वर्षांनंतरही करिंथमध्ये अजूनही येशूने सुरू केलेला विधी पाळला जात होता. सा.यु. ३३ मध्ये येशू व ११ प्रेषितांसोबत पौल नव्हता, पण तरीसुद्धा त्याप्रसंगी काय घडले याविषयी त्याला इतर प्रेषितांकडून निश्‍चितच कळले असेल. शिवाय, असे दिसते की, त्या घटनेसंबंधी काही गोष्टींबद्दल पौलाला देवाच्या प्रेरणेने प्रकटीकरण देखील झाले होते. पौलाने म्हटले: “जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की, ज्या रात्री प्रभु येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली; आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, ‘हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.’ मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, ‘हा प्याला माझ्या रक्‍ताने झालेला नवा करार आहे; जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा [“करत राहा,” NW].’”—१ करिंथकर ११:२३-२५.

४. ख्रिश्‍चनांनी प्रभूच्या सांज भोजनाचा विधी का पाळला पाहिजे?

शुभवर्तमान लेखक लूक यानेही येशूने दिलेल्या आज्ञेला पुष्टी दिली: “माझ्या स्मरणार्थ हे करत राहा.” (लूक २२:१९, NW) हेच शब्द अशाप्रकारेही भाषांतरित करण्यात आले आहेत: “माझ्या आठवणीसाठी तुम्ही हे करा” (पंडिता रमाबाई भाषांतर) आणि “माझे स्मारक म्हणून हे करा.” (द जेरूसलेम बायबल) बऱ्‍याचदा या विधीला ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक देखील म्हणतात. पौलाने त्यास प्रभूचे सांज भोजन असेही म्हटले आणि हे नाव योग्य आहे कारण या विधीची स्थापना रात्रीच्या वेळीच झाली होती. (१ करिंथकर ११:२०) ख्रिस्ती लोकांना प्रभूचे सांज भोजन पाळण्याची आज्ञा देण्यात आली आहे. पण हा विधी का स्थापन करण्यात आला?

तो का स्थापण्यात आला

५, ६. (अ) येशूने स्मारकविधी स्थापन करण्यामागचे एक कारण कोणते होते? (ब) प्रभूच्या सांज भोजनाचा विधी स्थापण्याचे आणखी एक कारण कोणते?

स्मारकविधी स्थापण्यात आल्याचे एक कारण येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे साध्य झालेल्या एका उद्देशाशी संबंधित आहे. तो आपल्या स्वर्गीय पित्याच्या सार्वभौमत्वाचा समर्थक म्हणून मरण पावला. अशारितीने ख्रिस्ताने दियाबल सैतानाला खोटे ठरवले ज्याचा असा दोषारोप होता की मानव देवाची सेवा केवळ स्वार्थी उद्देशांनीच करतात. (ईयोब २:१-५) विश्‍वासूपणे मृत्यूला कवटाळून येशूने त्याचा हा आरोप निराधार असल्याचे सिद्ध केले आणि यहोवाचे हृदय आनंदित केले.—नीतिसूत्रे २७:११.

प्रभूचे सांज भोजन स्थापण्याचे आणखी एक कारण असे होते की, एक परिपूर्ण, पापरहित मनुष्याच्या रूपात येशूच्या मृत्यूमुळे त्याने ‘पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण केला’ याची आठवण हा विधी आपल्याला करून देणार होता. (मत्तय २०:२८) पहिल्या मनुष्याने देवाविरुद्ध पाप केले तेव्हा त्याने परिपूर्ण मानवी जीवन आणि त्यासोबतचे सर्व आशीर्वाद गमावले. पण येशूने म्हटले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) खरोखर, “पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.” (रोमकर ६:२३) प्रभूच्या सांज भोजनाचा विधी येशूच्या बलिदानाद्वारे यहोवा व त्याचा पुत्र या दोघांनीही आपल्याबद्दल दाखवलेल्या महान प्रीतीची आठवण करून देतो. या प्रीतीबद्दल आपण मनापासून कृतज्ञता बाळगली पाहिजे!

केव्हा पाळायचा होता?

७. अभिषिक्‍त ख्रिस्ती अनेकदा स्मारक चिन्हे ग्रहण करतात असे का म्हणण्यात आले आहे?

प्रभूच्या सांज भोजनासंबंधी पौलाने म्हटले: “जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता.” (१ करिंथकर ११:२६) व्यक्‍तिशः, अभिषिक्‍त ख्रिस्ती आपल्या मृत्यूपर्यंत स्मारक चिन्हे ग्रहण करण्यात सहभागी होतात. याकरवी ते यहोवा देवासमोर व जगासमोर येशूच्या खंडणी बलिदानाच्या देवाच्या तरतुदीवर आपला विश्‍वास वारंवार घोषित करतात.

८. समूह या नात्याने अभिषिक्‍त जनांना केव्हापर्यंत प्रभूच्या सांज भोजनाचा विधी पाळायचा होता?

एक समूह या नात्याने अभिषिक्‍त ख्रिस्ती ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक केव्हापर्यंत पाळतील? पौलाने म्हटले, “तो येईपर्यंत,” अर्थात, येशूच्या ‘उपस्थितीदरम्यान’ तो पुनरुत्थित होऊन आपल्या अभिषिक्‍त अनुयायांना स्वर्गात नेण्याकरता येईल तोपर्यंत हा विधी पाळला जाईल. (१ थेस्सलनीकाकर ४:१४-१७, NW) हे येशूने आपल्या ११ प्रेषितांना जे म्हटले त्याच्या सामंजस्यात आहे: “मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन; ह्‍यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीहि असावे.”—योहान १४:३.

९. मार्क १४:२५ येथे नमूद असलेल्या येशूच्या शब्दांचा काय अर्थ आहे?

येशूने स्मारकविधीची स्थापना केली तेव्हा त्याने द्राक्षारसाच्या प्याल्याच्या संदर्भात त्याच्या विश्‍वासू प्रेषितांना असे सांगितले: “मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षवेलाचा उपज पिणारच नाही.” (मार्क १४:२५) येशू स्वर्गात काही शब्दशः अर्थाने द्राक्षारस पिणार नव्हता, त्याअर्थी, साहजिकच त्याच्या मनात द्राक्षारसाद्वारे सूचित होणारा आनंद असावा. (स्तोत्र १०४:१५; उपदेशक १०:१९) राज्यात एकत्र असणे हा त्यांच्याकरता असा एक आनंददायक अनुभव असेल ज्याची त्याने व त्याचे अनुकरण करणाऱ्‍या अनुयायांनी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहिली होती.—रोमकर ८:२३; २ करिंथकर ५:२.

१०. स्मारकविधी कितीदा पाळणे योग्य आहे?

१० येशूच्या मृत्यूचा स्मारक दर महिन्याला, दर आठवड्याला किंवा दररोज पाळणे योग्य ठरेल का? नाही. येशूने वल्हांडणाच्या दिवशी स्मारकविधीची स्थापना केली आणि त्याच दिवशी त्याचा वध देखील झाला आणि हा वल्हांडणाचा सण सा.यु.पू. १५१३ मध्ये ईजिप्तच्या गुलामीतून इस्राएलच्या मुक्‍तीच्या “स्मारकादाखल” साजरा केला जात असे. (निर्गम १२:१४) वल्हांडणाचा सण वर्षातून केवळ एकदाच, म्हणजे यहुदी कालगणनेनुसार निसान महिन्यातील १४ रोजी साजरा केला जात असे. (निर्गम १२:१-६; लेवीय २३:५) यावरून हे सूचित होते की येशूचा मृत्यू देखील वल्हांडणाप्रमाणेच—दर वर्षी साजरा केला पाहिजे—दर महिन्याला, दर आठवड्याला अथवा दररोज नव्हे.

११, १२. स्मारकविधीच्या आरंभीच्या स्मारकांविषयी इतिहास काय दाखवून देतो?

११ तेव्हा, दर वर्षी निसान १४ तारखेला स्मारकविधी पाळणे योग्य आहे. एका संदर्भ ग्रंथानुसार: “निसान १४ तारखेलाच वल्हांडण [प्रभूचे सांज भोजन] पाळण्याच्या रिवाजामुळे आशिया मायनर येथील ख्रिश्‍चनांना क्वॉर्टोडेसिमन्स [चौदा तारीख पाळणारे] म्हटले जायचे . . . ही तारीख कधी शुक्रवारी तर कधी आठवड्यातील इतर दिवशी यायची.”—द न्यू शॅफ-हर्टसोक एन्सायक्लोपिडिया ऑफ रिलिजियस नॉलेज, खंड ४, पृष्ठ ४४.

१२ सा.यु. दुसऱ्‍या शतकातील रितीविषयी भाष्य करताना, इतिहासकार जे. एल. वॉन मोशीम म्हणतात की क्वॉर्टोडेसिमन्स निसान १४ तारखेला स्मारक पाळायचे कारण “ख्रिस्ताने घालून दिलेला आदर्श हा त्यांच्याकरता कायद्याप्रमाणे होता.” दुसऱ्‍या एका इतिहासकाराने असे म्हटले की: “आशियातील क्वॉर्टोडेसिमन चर्चेसचे जेरूसलेम चर्चशी साम्य होते. दुसऱ्‍या शतकात या चर्चेसमध्ये निसान १४ रोजी वल्हांडणाच्या सणात ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे प्राप्त होणाऱ्‍या मुक्‍ततेचे स्मरण केले जायचे.”—स्टुडिया पाट्रीस्टीका, खंड ५, १९६२, पृष्ठ ८.

भाकरीची अर्थसूचकता

१३. प्रभूच्या सांज भोजनाचा विधी स्थापन करताना येशूने कोणत्या प्रकारची भाकरी वापरली?

१३ येशूने स्मारकाची स्थापना केली तेव्हा ‘त्याने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि प्रेषितांस दिली.’ (मार्क १४:२२) त्याप्रसंगी उपयोगात आणलेली भाकर नुकतीच वल्हांडणात वापरण्यात आलेल्या भाकरी सारखीच होती. (निर्गम १३:६-१०) या भाकरीत खमीर नसल्यामुळे ती चपटी आणि कडक असायची आणि वाटून देण्याकरता तिला तोडावे लागायचे. येशूने हजारो लोकांकरता भाकरी पुरवली तेव्हा ती देखील पापडासारखी होती कारण त्याने ती मोडून दिली असे सांगण्यात आले आहे. (मत्तय १४:१९; १५:३६) त्याअर्थी, स्मारकविधीची भाकरी तोडण्यामागे काही लाक्षणिक अर्थ नाही.

१४. (अ) स्मारकविधीची भाकरी बेखमीर असणे का योग्य आहे? (ब) प्रभूच्या सांज भोजनाकरता कशाप्रकारची भाकरी विकत आणता किंवा तयार करता येते?

१४ स्मारकविधी स्थापन करताना वापरलेल्या भाकरीबद्दल येशूने म्हटले: “हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे.” (१ करिंथकर ११:२४; मार्क १४:२२) ही भाकरी बेखमीर होती हे देखील योग्यच आहे. का? कारण खमीर हे काही वेळा वाईट गोष्टी, दुष्टपणा किंवा पाप यास सूचित करते. (१ करिंथकर ५:६-८) भाकरी ही खंडणी बलिदानाच्या रूपात अर्पण करण्यात आलेल्या येशूच्या परिपूर्ण, पापरहित मानवी शरीराचे प्रतीक होती. (इब्री लोकांस ७:२६; १०:५-१०) यहोवाचे साक्षीदार हे आठवणीत ठेवून येशूने घालून दिलेल्या आदर्शानुसारच स्मारक विधीकरता बेखमीर भाकरीचाच उपयोग करतात. काही ठिकाणी, साक्षीदार यहुदी लोकांच्या साध्या मॅट्‌झो भाकरी वापरतात, ज्यांत चवीकरता कांदे, अंडी किंवा इतर कोणतेही पदार्थ घातलेले नसतात. नाहीतर, धान्याच्या पिठात (शक्यतो गव्हाच्या) थोडे पाणी घालून बेखमीर भाकरी तयार करता येते. पीठ मळून त्याच्या पातळ भाकरी लाटून जरासे तेल लावलेल्या तव्यावर ही भाकरी कोरडी व कडक होईपर्यंत भाजली जावी.

द्राक्षारसाची अर्थसूचकता

१५. ख्रिस्ताने आपल्या मृत्यूच्या स्मारकविधीची स्थापना केली त्या प्रसंगी वापरलेल्या प्याल्यात काय होते?

१५ बेखमीर भाकरी शिष्यांना दिल्यानंतर येशूने प्याला घेतला आणि “उपकारस्तुति करून [प्रेषितांना] तो दिला; आणि ते सर्व जण त्यातून प्याले.” येशूने खुलासा करीत म्हटले: “हे [नवीन] करार प्रस्थापित करणारे माझे रक्‍त आहे, हे पुष्कळांकरिता ओतिले जात आहे.” (मार्क १४:२३, २४) प्याल्यात काय होते? साधा, न आंबलेला द्राक्षांचा रस नव्हे तर आंबवलेला द्राक्षारस त्यात होता. शास्त्रवचनांत द्राक्षारसाचा उल्लेख येतो तेव्हा सहसा न आंबलेल्या द्राक्षांच्या रसाविषयी उल्लेख नसतो. उदाहरणार्थ, केवळ द्राक्षांच्या रसामुळे नव्हे तर आंबलेल्या द्राक्षारसामुळे ‘जुनी बुधले’ फुटतात असे येशूने सांगितले. तसेच, ख्रिस्ताच्या शत्रूंनी त्याच्यावर “द्राक्षारसाच्या आहारी गेलेला” म्हणून आरोप लावला. पण जर हा द्राक्षारस केवळ फळांचा रस असता तर या आरोपाला काही अर्थ राहिला नसता. (मत्तय ९:१७; ११:१९, NW) वल्हांडणाच्या सणात द्राक्षारस पिण्याची प्रथा होती आणि ख्रिस्ताने आपल्या मृत्यूचा स्मारकविधी स्थापन करतेवेळी त्याचा उपयोग केला.

१६, १७. स्मारकविधीकरता कोणत्याप्रकारची वाईन योग्य आहे आणि का?

१६ त्या प्याल्यातील द्रव येशूच्या सांडलेल्या रक्‍ताचे सूचक होते आणि केवळ तांबडा द्राक्षारस येशूच्या रक्‍ताचे उचित प्रतीक आहे. स्वतः येशूने म्हटले की “हे [नवीन] करार प्रस्थापित करणारे माझे रक्‍त आहे, हे पुष्कळांकरिता ओतिले जात आहे.” आणि प्रेषित पेत्राने असे लिहिले: “वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या [अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या] निरर्थक वागणुकीपासून, सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोंकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्‍ताने तुम्ही मुक्‍त झाला आहा.”—१ पेत्र १:१८, १९.

१७ निश्‍चितच येशूने स्मारकविधीची स्थापना करताना तांबड्या द्राक्षांपासून बनवलेल्या द्राक्षारसाचा उपयोग केला होता. आज उपलब्ध असलेल्या काही प्रकारच्या वाईन्स योग्य नाहीत कारण त्यांत विशिष्ट रसायने किंवा ब्रॅन्डी घालून अधिक मादक बनवले जाते किंवा तयार करतेवेळी त्यात विशिष्ट वनस्पती किंवा मसाले घातले जातात. येशूचे रक्‍त स्वयंपूर्ण होते त्यात आणखी काही घालण्याची गरज नव्हती. त्यामुळे पोर्ट, शेरी, वरमुथ इत्यादी वाईन्स उपयोग करण्यास योग्य नाहीत. स्मारकविधीच्या प्याल्यात कृत्रिम गोडवा नसलेला कोरा द्राक्षारस असावा. घरी तयार करण्यात आलेला, व गोडवा आणण्यासाठी वरून काहीही न घातलेली द्राक्षांची तांबडी वाईन, किंवा रेड बर्गण्डी आणि क्लेरट या वाईन्स वापरण्यास हरकत नाही.

१८. स्मारकविधीच्या भाकरी व द्राक्षारसाच्या संदर्भात येशूने चमत्कार का केला नाही?

१८ या भोजन विधीची स्थापना करताना येशूने चमत्कार करून त्या प्रतिकात्मक वस्तूंना खरोखरच आपल्या मांसात व रक्‍तात बदलले नाही. शब्दशः अर्थाने मानवी मांस खाणे आणि रक्‍त पिणे हे नरभक्षण ठरले असते आणि त्यामुळे देवाच्या नियमशास्त्राचे उल्लंघन झाले असते. (उत्पत्ति ९:३, ४; लेवीय १७:१०) येशूचे सबंध शरीर आणि त्याचे सगळे रक्‍त अजूनही शाबूत होते. त्याचे शरीर एक परिपूर्ण बलिदानाच्या रूपात पुढच्या दुपारी निसान १४ चा तोच यहुदी दिवस अद्याप सुरू असताना अर्पण केले गेले. त्यामुळे स्मारकविधीची भाकरी व द्राक्षारस लाक्षणिक असून ते ख्रिस्ताचे मांस व रक्‍त यांस सूचित करतात. *

स्मारकविधी—एक शांतीभोज

१९. प्रभूच्या सांज भोजनाचा विधी पाळताना एकापेक्षा जास्त प्लेट व प्याला वापरणे का योग्य आहे?

१९ स्मारकाची स्थापना करताना येशूने आपल्या विश्‍वासू प्रेषितांना एकाच प्याल्यातून पिण्यास दिले. मत्तयाच्या शुभवर्तमानात असे म्हटले आहे: “[येशूने] प्याला घेतला व उपकारस्तुति करून तो त्यास दिला व म्हटले, ‘तुम्ही सर्व ह्‍यातून प्या.’” (मत्तय २६:२७) अनेक नव्हे तर एकच “प्याला” वापरण्यात काही अडचण नव्हती कारण एकाच मेजावर हे ११ जण बसले होते आणि ते सहज तो प्याला एकमेकांना देऊ शकत होते. या वर्षी सबंध जगातील यहोवाच्या साक्षीदारांच्या ९४,००० पेक्षा जास्त मंडळ्यांत लाखो लोक प्रभूच्या सांज भोजनाकरता एकत्र येतील. एकाच रात्री लाखो लोक हाच विधी पाळण्याकरता एकत्र येणार असल्यामुळे सर्वांकरता एकच प्याला वापरणे शक्य नाही. पण यामागच्या तत्त्वाला महत्त्व देऊन मोठ्या मंडळ्यांमध्ये अनेक प्याले वापरले जातात जेणेकरून तो माफक वेळात सर्व उपस्थितांमध्ये फिरवता यावा. त्याचप्रकारे, भाकरीकरता एका पेक्षा जास्त प्लेट वापरण्यात काही गैर नाही. शास्त्रवचनांत असे कोठेही सूचित करण्यात आलेले नाही की प्याला किंवा ग्लास विशिष्ट आकाराचाच असावा. अर्थात, प्याला व प्लेट दोन्ही या गंभीर प्रसंगाला साजेसे असावेत. फिरवताना द्राक्षारस सांडू नये म्हणून प्याला पूर्ण भरण्याचे टाळावे.

२०, २१. स्मारक भोज एक शांती भोज आहे असे का म्हणता येईल?

२० भाकरी व द्राक्षारस यांकरता एकापेक्षा जास्त प्लेट व प्याला वापरणे योग्य असले तरी स्मारक भोज हा खरे तर एक शांती भोज आहे. प्राचीन इस्राएलात एक पुरुष एखादा पशु देवाच्या मंदिरात आणून शांती भोजनाची व्यवस्था करू शकत होता; मंदिरात पशू आणल्यानंतर त्यास कापले जायचे. अर्पित पशुचा काही भाग वेदीवर जाळला जाई, काही भाग अर्पण करणाऱ्‍या याजकाला आणि काही अहरोनाच्या याजक असलेल्या पुत्रांना दिला जाई; भोजनात अर्पण करणारा आपल्या घराण्यासोबत सहभागी होत असे. (लेवीय ३:१-१६; ७:२८-३६) * स्मारक भोज देखील एक शांती भोज आहे कारण त्यात सहभागिता केली जाते.

२१ या शांतीभोजात यहोवा सहभागी होतो कारण तोच या व्यवस्थेचा कर्ता आहे. येशू हा अर्पण केला जाणारा आणि अभिषिक्‍त ख्रिस्ती या अर्पणात सहभागी होणारे या नात्याने प्रतिकात्मक चिन्हे ग्रहण करण्यात सहभाग घेतात. यहोवाच्या मेजावर खाण्याचा अर्थ असा होतो की सहभाग घेणाऱ्‍यांचे त्याच्यासोबत शांतीसंबंध आहेत. म्हणूनच पौलाने असे लिहिले: “जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करितो तो ख्रिस्ताच्या रक्‍ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? आपण पुष्कळ जण असून एक भाकर, एक शरीर, असे आहो, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहो.”—१ करिंथकर १०:१६, १७.

२२. स्मारकासंबंधी कोणते विचार करण्याजोगे प्रश्‍न उरले आहेत?

२२ प्रभूचे सांज भोजन यहोवाच्या साक्षीदारांद्वारे पाळला जाणारा एकच वार्षिक धार्मिक सण आहे. हे योग्य आहे कारण येशूने आपल्या अनुयायांना म्हटले होते की “माझ्या स्मरणार्थ हे करत राहा.” स्मारकविधीच्या प्रसंगी आपण येशूच्या मृत्यूचे स्मरण करतो; या मृत्यूने यहोवाच्या सार्वभौमत्वाला उंचावले. आपण आधी पाहिल्याप्रमाणे या शांती भोजात भाकरी ख्रिस्ताच्या अर्पण केलेल्या मानवी शरीरास सूचित करते, तर द्राक्षारस त्याच्या सांडलेल्या रक्‍तास सूचित करतो. पण प्रतिकात्मक भाकरी व द्राक्षारसात फार कमी लोक सहभाग घेतात. असे का आहे? सहभाग न घेणाऱ्‍या लाखो लोकांकरता स्मारकविधीचा खरोखर काही अर्थ आहे का? प्रभुच्या सांज भोजनाचा तुमच्याकरता काय अर्थ असला पाहिजे?

[तळटीपा]

^ परि. 18 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) या प्रकाशनातील खंड २, पृष्ठ २७१ पाहा.

^ परि. 20 मराठी बायबलमध्ये ‘शांत्यार्पण’ असे भाषांतर केलेला शब्द मूळ इब्री भाषेत “सहभागितेचे बलिदान” असा होता.

तुमची उत्तरे काय आहेत?

• येशूने प्रभूच्या सांज भोजनाचा विधी का स्थापित केला?

• स्मारकविधी कितीदा पाळला जावा?

• स्मारकाच्या बेखमीर भाकरीचा काय अर्थ आहे?

• स्मारकाचा द्राक्षारस कशाचे प्रतीक आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

येशूने प्रभूच्या सांज भोजनाच्या विधीची स्थापना केली