व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा जाणण्यायोग्य देव

यहोवा जाणण्यायोग्य देव

यहोवा जाणण्यायोग्य देव

तुमच्या जीवनात काहीतरी महत्त्वाचे चुकत असावे का? देवाविषयी तुम्हाला फारशी माहिती नसेल तर निश्‍चितच तुमच्या जीवनात कशाची तरी उणीव आहे. का? कारण, लाखो लोकांना कळाल्याप्रमाणे, बायबलमधील देवाविषयी जाणून घेतल्याने जीवनात मोठे फायदे प्राप्त होतात. हे फायदे लगेच मिळू लागतात आणि ते भविष्यातही मिळत राहतात.

बायबलचा लेखक, यहोवा देव याची अशी इच्छा आहे की, आपण त्याला जाणून घ्यावे. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे.” यहोवाला जाणल्याने आपलाच फायदा होईल हे त्याला माहीत आहे. “जो तुला तुझे हित साधायला शिकवतो . . . तो मीच यहोवा तुझा देव आहे.” परात्पर असलेल्या यहोवा देवाला जाणून आपल्याला काय फायदा आहे?—स्तोत्र ८३:१८; यशया ४८:१७, पं.र.भा.

एक खरोखरचा फायदा म्हणजे आपल्याला, दररोजच्या समस्यांवर मार्गदर्शन, भविष्याकरता पक्की आशा आणि मनःशांती मिळते. शिवाय, यहोवाशी परिचय झाल्याने आज सबंध जगभर लोकांना सामना कराव्या लागणाऱ्‍या सर्वात महत्त्वाच्या प्रश्‍नांवर वेगळा दृष्टिकोन ठेवण्यास आपल्याला प्रेरणा मिळते. कोणते प्रश्‍न?

तुमच्या जीवनाला उद्देश आहे का?

मानवाने उल्लेखनीय तांत्रिक प्रगती केल्यावरही लोकांना आज तेच मूलभूत प्रश्‍न भेडसावत असतात: ‘मी का जगत आहे? माझे पुढे काय होणार? जीवनाचा उद्देश काय आहे?’ एका व्यक्‍तीला या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास, तिच्या जीवनाला अर्थ राहणार नाही. पुष्कळांना अशी उणीव भासते का? १९९० च्या दशकाच्या शेवटी जर्मनीत घेतलेल्या एका अभ्यासातून असे प्रकट झाले की, बहुतेक किंवा काही वेळा निम्म्या लोकांना वाटते की जीवनाला काही उद्देश नाही. कदाचित तुम्ही राहता त्या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती असेल.

एखाद्याच्या जीवनात उद्देश नसला की, त्या व्यक्‍तीला स्वतःची ध्येये ठेवण्यासाठी काहीच आधार उरत नाही. पुष्कळजण जीवनात यशस्वी कारकीर्द करून किंवा धनसंपत्ती साठवून हा कमीपणा भरून काढायचा प्रयत्न करतात. तरीपण, ती पोकळी लोकांना खात असते. जीवनात काहीच उद्देश नसल्यामुळे काहीजण इतके निराश होतात की, त्यांना जगण्याची इच्छाच राहत नाही. एका सुंदर तरुण स्त्रीचा असाच अनुभव होता; इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्यूननुसार ती एका “गर्भश्रीमंत घरात वाढली जेथे तिला कशाचीही कमी नव्हती.” इतक्या ऐषारामात जगूनही तिला एकटेपणा वाटायचा आणि जीवनाला काही अर्थ नाही असे वाटायचे. तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि स्वतःच्या जीवनाचा अंत केला. तुम्हाला असेच काही लोक ठाऊक असतील ज्यांनी एकान्तपणामुळे अशा दुःखदरितीने स्वतःचा जीव घेतला असेल.

विज्ञानाकडे जीवनाच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे आहेत असे काहींना म्हणताना तुम्ही ऐकले आहे का? दी व्होक हे जर्मन साप्ताहिक म्हणते: “विज्ञान जरी सत्य असले तरी धार्मिक बाबतीत ते उणे पडते. उत्क्रांतीवादाचा सिद्धान्त अविकसित वाटतो आणि पुंजवादाचे सतत बदलणारे गणित देखील सांत्वन आणि सुरक्षा देत नाहीत.” वैज्ञानिक शोधांनी जीवनाच्या विविध रूपांचे वर्णन करण्याचा त्याचप्रमाणे जीवनासाठी आवश्‍यक असलेले नैसर्गिक चक्र आणि कार्ये समजावण्याचा बराच प्रयत्न केला आहे. तरीही, आपण येथे का आहोत आणि आपले पुढे काय होणार आहे याचे उत्तर विज्ञानाजवळ नाही. आपण केवळ विज्ञानावर अवलंबून राहिलो तर जीवनाच्या उद्देशाविषयीचे प्रश्‍न अनुत्तरित राहतील. परिणामस्वरूप, सुएटडॉईश त्सीतुंग या बातमीपत्रात म्हटल्याप्रमाणे “सर्वांना मार्गदर्शनाची गरज वाटते.”

हे मार्गदर्शन निर्माणकर्त्याशिवाय आणखी कोण देऊ शकेल? त्यानेच मानवांना पृथ्वीवर ठेवल्यामुळे ते येथे का आहेत याचे उत्तर त्यालाच ठाऊक असले पाहिजे. बायबल सांगते की, यहोवाने मानवांची निर्मिती केली जेणेकरून ते पृथ्वीला भरून टाकतील, तिची काळजी घेतील व तिचे सांभाळकर्ते होतील. मानवांना आपल्या सर्व कार्यांतून न्याय, बुद्धी, प्रीती यांसारखे देवाचे गुण प्रदर्शित करायचे होते. यहोवाने आपल्याला का निर्माण केले याचे कारण आपल्याला एकदा समजल्यावर, आपण येथे का आहोत हे आपल्याला कळेल.—उत्पत्ति १:२६-२८.

तुम्ही काय करू शकता?

‘मी का जगत आहे? माझे पुढे काय होणार? जीवनाचा काय उद्देश आहे?’ या प्रश्‍नांची गतकाळात तुम्हाला समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्यास काय? यहोवाला जवळून ओळखा, असा सल्ला बायबल तुम्हाला देते. किंबहुना, येशू म्हणाला: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” तुम्ही ईश्‍वरी गुण, विशेषतः प्रीती, विकसित करावी आणि देवाच्या येणाऱ्‍या मशीही राज्यात जगण्याचे व्यक्‍तिगत ध्येय ठेवावे असेही तुम्हाला उत्तेजन दिले जात आहे. मग तुमच्या जीवनात उद्देश असेल आणि एक अद्‌भुत, सुरक्षित भवितव्य असेल. आणि आतापर्यंत बुचकळ्यात पाडणाऱ्‍या मूलभूत प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.—योहान १७:३; उपदेशक १२:१३.

याचा तुमच्यावर किती फरक पडेल? हान्सला याचा अनुभव आहे. * काही वर्षांआधी त्याला देवावर नावापुरता विश्‍वास होता, पण या विश्‍वासाचा हान्सच्या जीवनावर काही फरक पडत नव्हता. हान्सला अंमली पदार्थ, वाईट चालीच्या बायका, लहानमोठे गुन्हे आणि मोटारसायकली पसंत होत्या. “पण जीवनात एक पोकळी होती, मला समाधान मिळत नव्हतं,” असे तो म्हणतो. हान्स सुमारे २५ वर्षांचा असताना त्याने बायबलचे काळजीपूर्वक वाचन करून देवाला व्यक्‍तिगतपणे जाणून घेण्याचा निर्णय घेतला. यहोवाला एकदा जाणून घेतल्यावर जीवनाचा नेमका काय उद्देश आहे हे हान्सला समजले तेव्हा त्याने आपले जीवन बदलले आणि यहोवाचा साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेतला. गेल्या दहा वर्षांपासून तो पूर्ण-वेळेच्या सेवेत आहे. तो मनमोकळेपणाने म्हणतो: “यहोवाची सेवा करणे हेच सर्वात उत्तम जीवन आहे. याच्या बरोबरीचे दुसरे काहीच नाही. यहोवाला जाणल्यामुळे माझ्या जीवनाला एक उद्देश मिळाला आहे.”

अर्थात, जीवनाचा उद्देश हाच केवळ एक प्रश्‍न लोकांसमोर नाही. जगातील परिस्थिती खालावत असताना अनेक लोकांना आणखी एका गोष्टीची चिंता वाटते.

हे का घडले?

कोणावर संकट येते तेव्हा त्याच्या मनात एकच प्रश्‍न घोळत असतो: हे का घडले? संकटाला भावनिकरित्या तोंड द्यायला आपण किती सक्षम आहोत यावर या प्रश्‍नाचे उत्तर बहुतांशी अवलंबून आहे. जर एखादे समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर ते दुःख असेच राहते आणि सहन करणाऱ्‍या व्यक्‍तीचे मन कटू होते. आता ब्रुनीचेच उदाहरण पाहा.

मध्यमवयीन ब्रुनी सांगते, “काही वर्षांआधी माझं बाळ वारलं. माझा देवावर विश्‍वास होता म्हणून मी सांत्वन मिळण्यासाठी आमच्या पाळकांकडे गेले. त्यांनी मला सांगितलं की, देवाने सुझॅनला स्वर्गात नेलंय आणि आता ती एक देवदूत आहे. तिच्या मृत्यूमुळे माझं विश्‍व तर उद्‌ध्वस्त झालंच होतं पण देवाने तिला माझ्यापासून दूर केल्यामुळे मला त्याचाही द्वेष वाटू लागला.” ब्रुनीला कित्येक वर्षांपर्यंत ही गोष्ट बोचत होती. “मग एकदा यहोवाच्या साक्षीदारांनी मला बायबलमधून दाखवले की, मला देवाचा द्वेष करण्याचं काहीच कारण नाही. यहोवाने सुझॅनला स्वर्गात नेलं नाही आणि ती एक देवदूतही नाही. तिला मानवी अपरिपूर्णतेमुळे आजार झाला होता. सुझॅन सध्या मृतावस्थेत झोपलेली आहे आणि यहोवा तिला पुनरुत्थित करेल. मला हे देखील शिकायला मिळालं की, त्याने मानवांना परादीस पृथ्वीवर सर्वकाळ जगण्यासाठी निर्माण केले आणि फार लवकर हे वास्तवात उतरणार आहे. यहोवा खरोखर कशी व्यक्‍ती आहे हे मला कळू लागल्यावर त्याच्यासोबत माझं नातं घनिष्ठ होऊ लागलं आणि माझं दुःख कमी होऊ लागलं.”—स्तोत्र ३७:२९; प्रेषितांची कृत्ये २४:१५; रोमकर ५:१२.

कोट्यवधी लोकांना, त्यांच्यावर आलेले एखादे संकट, युद्ध, दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्ती अशा एका किंवा दुसऱ्‍या मार्गाने येणाऱ्‍या संकटाचा सामना करावा लागतो. पण देव संकटाला जबाबदार नाही, मानवांनी दुःख सोसावे अशी त्याची कधीही इच्छा नव्हती आणि लवकरच तो दुष्टाईचा अंत करील हे ब्रुनीला एकदा बायबलमधून कळाल्यावर तिला दिलासा मिळाला. दुष्टाई आज वाढत आहे हेच दाखवून देते की आज आपण या व्यवस्थीकरणाच्या ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत. आपल्या सर्वांना हवा असलेला नाट्यमय बदल लवकरच होणार आहे.—२ तीमथ्य ३:१-५; मत्तय २४:७, ८.

देवाला जाणून घेणे

हान्स आणि ब्रुनी यांना देवाविषयी फारशी माहिती नव्हती. त्याच्याविषयी जास्त काही माहीत नसतानाही त्यांचा त्याच्यावर विश्‍वास होता. त्यांनी यहोवाला योग्यरितीने जाणून घेण्यासाठी वेळ काढल्यावर त्यांना याचा फायदा झाला. आपल्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे त्यांना मिळाली. यामुळे त्यांना मनाची शांती आणि भविष्याकरता सुरक्षित आशा मिळाली. यहोवाच्या लाखो सेवकांना हाच अनुभव आला आहे.

यहोवाला जाणून घेण्यासाठी प्रथम बायबलचे काळजीपूर्वक परीक्षण केले पाहिजे; त्यामध्ये त्याच्याविषयी आणि तो आपल्याकडून काय अपेक्षितो याविषयी माहिती दिली आहे. पहिल्या शतकातील काहींनी हेच केले. इतिहासकार आणि वैद्य असलेल्या लूकने असा अहवाल दिला की ग्रीसमधील बिरुयाच्या यहूदी मंडळीतील सदस्यांनी, “मोठ्या उत्सुकतेने [पौल आणि सीला यांच्याकडून] वचनाचा स्वीकार केला, आणि ह्‍या गोष्टी अशाच आहेत की काय ह्‍याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.”—प्रेषितांची कृत्ये १७:१०, ११.

पहिल्या शतकातले ख्रिस्ती देखील मंडळ्यांमध्ये एकत्र जमत होते. (प्रेषितांची कृत्ये २:४१, ४२, ४६; १ करिंथकर १:१, २; गलतीकर १:१, २; २ थेस्सलनीकाकर १:१) आजही हेच खरे आहे. यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्या, लोकांना यहोवाजवळ येण्यासाठी आणि त्याच्या सेवेत आनंद प्राप्त करण्यासाठी खास तयार केलेल्या सभांकरता एकत्र जमतात. स्थानीय साक्षीदारांसोबत सहवास ठेवण्याचा आणखी एक फायदा आहे. देवाची उपासना करता करता मानव त्या देवाचे अनुकरण करू लागतात, त्यामुळे यहोवाचे साक्षीदार—काही प्रमाणातच का होईना—पण यहोवासारखेच गुण प्रदर्शित करतात. म्हणूनच, साक्षीदारांसोबत एकत्र जमल्याने यहोवाला अधिक चांगले जाणून घ्यायला मिळते.—इब्री लोकांस १०:२४, २५.

केवळ एका व्यक्‍तीला जाणून घेण्यासाठी एवढा प्रयत्न करायचा, असे तुम्हाला वाटते का? प्रयत्नांची तर गरज आहेच. पण तुम्ही जीवनात साध्य करू इच्छिता अशा बहुतेक गोष्टींच्या बाबतीत हेच खरे नाही का? प्रशिक्षण घेण्यासाठी एक नामवंत खेळाडू किती प्रयत्न करतो याचा विचार करा. उदाहरणार्थ, फ्रान्समधील ऑलिंपिक खेळात स्कींइंगसाठी सुवर्ण पदक मिळवलेल्या झॉ-क्लोड किली याने यशस्वी आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धक होण्यासाठी म्हटले: “यासाठी १० वर्षांआधीपासूनच तयारी करावी लागते आणि कित्येक वर्षांआधीच त्याची योजना करावी लागते व दररोज त्याचा विचार करावा लागतो . . . ती, वर्षाच्या-३६५-दिवसांची मानसिक आणि शारीरिक तपस्या असते.” कशासाठी तर केवळ दहा मिनिटांच्या एका शर्यतीसाठी! तर मग, यहोवाला जाणल्याने याहून कितीतरी मोठे—आणि तेही जास्त काळ टिकणारे—प्रतिफळ मिळेल.

दिवसागणिक वाढणारा नातेसंबंध

जीवनात महत्त्वाची गोष्ट कोणाला चुकवावीशी वाटेल? कोणालाही नाही. म्हणूनच, तुमच्या जीवनात खरा उद्देश नाही असे तुम्हाला वाटते, किंवा संकटे कशामुळे येतात याचे उत्तर तुम्हाला हवे आहे तर बायबलचा देव यहोवा याला जाणण्याचा पक्का निश्‍चय करा. त्याच्याविषयी शिकल्याने तुमच्या जीवनात चांगला बदल घडेल आणि तोही कायमचा.

यहोवाविषयी ज्ञान घेण्याचे आपण कधी थांबवू का? कित्येक दशकांपासून त्याची सेवा केलेल्यांना त्याच्याबद्दल जे शिकायला मिळाले आणि ज्या नवनवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत त्याविषयी त्यांना अजूनही आश्‍चर्य वाटते. अशा गोष्टी शिकल्याने आपल्याला आनंद होतो आणि आपण त्याच्या अधिक जवळ येतो. आपण प्रेषित पौलाच्या विचाराच्या एकवाक्यतेत असू या, ज्याने लिहिले: “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत! प्रभुचे मन कोणी ओळखिले आणि त्याचा मंत्री कोण होता?”—रोमकर ११:३३, ३४.

[तळटीप]

^ परि. 12 नावे बदलण्यात आली आहेत.

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

लोकांना आज तेच मूलभूत प्रश्‍न भेडसावत असतात: ‘मी येथे का आहे? माझे पुढे काय होणार? जीवनाचा उद्देश काय आहे?’

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

“यहोवा खरोखर कशी व्यक्‍ती आहे हे मला कळू लागल्यावर त्याच्यासोबत माझं नातं घनिष्ठ होऊ लागलं”

[७ पानांवरील संक्षिप्त आशय]

“यहोवाची सेवा करणे हेच सर्वात उत्तम जीवन आहे. याच्या बरोबरीचे दुसरे काहीच नाही. यहोवाला जाणल्यामुळे माझ्या जीवनाला एक उद्देश मिळाला आहे”