व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांनी छळावर विजय मिळवला

त्यांनी छळावर विजय मिळवला

त्यांनी छळावर विजय मिळवला

फ्रीडा येस हिचा जन्म १९११ साली डेन्मार्क येथे झाला; तेथून ती आपल्या पालकांसोबत उत्तर जर्मनीत हुझुम येथे राहायला गेली. पुष्कळ वर्षे लोटल्यावर तिला मॅग्डेबर्ग येथे नोकरी लागली आणि १९३० साली तिने बायबल विद्यार्थी (तेव्हाचे यहोवाचे साक्षीदार) या नात्याने बाप्तिस्मा घेतला. १९३३ साली हिटलर सत्तेत आला आणि या घटनेमुळे फ्रीडाला एक नव्हे तर दोन अधिकेंद्रित सरकारांकडून २३ वर्षे क्रूर वागणूक सहन करावी लागली.

मार्च १९३३ साली, जर्मन सरकाराने एक सामान्य निवडणूक घेतली. हॅम्बर्गजवळील नॉईनगॅम बंधनागृह संग्रहालयाचे प्रमुख डॉ. डेटलेफ गार्ब म्हणतात: “राष्ट्रीय समाजवादी, अडॉल्फ हिटलरला चान्सलर आणि नेता म्हणून निवडून आणण्यासाठी जबरदस्तीने बहुमत गोळा करत होते.” यहोवाच्या साक्षीदारांनी राजकीय मामल्यांत तटस्थ राहण्याविषयी आणि ‘जगाचे भाग नसण्याविषयी’ येशूच्या सूचनेचे पालन केले व त्यांनी मत दिले नाही. परिणाम? साक्षीदारांवर बंदी घालण्यात आली.—योहान १७:१६.

फ्रीडा गुप्तपणे आपल्या ख्रिस्ती कार्यहालचाली करत राहिली; ती टेहळणी बुरूज छापण्यासाठीही मदत करत होती. ती म्हणते, “काही मासिके चोरून बंधनागृहांमध्ये सहउपासकांकरता आणली जात होती.” १९४० साली तिला अटक करण्यात आली आणि गेस्टापोंनी तिची चौकशी केली व त्यानंतर कित्येक महिने तिला एकान्तवासात ठेवण्यात आले. ती कशी तग धरून राहू शकली? ती म्हणते: “प्रार्थना हा माझा आसरा होता. मी पहाटेच प्रार्थना करायला सुरवात करायचे आणि दिवसातून अनेकदा प्रार्थना करायचे. प्रार्थनेमुळे मला बळ मिळालं आणि अनावश्‍यक चिंता न करायला मदत मिळाली.”—फिलिप्पैकर ४:६, ७.

फ्रीडाची सुटका करण्यात आली, पण १९४४ मध्ये गेस्टापोंनी तिला पुन्हा अटक केली. या वेळी तिला वॉल्टहाईम तुरुंगात सात वर्षांचा कारावास सुनावण्यात आला. फ्रीडा पुढे म्हणते: “तुरुंगाच्या गाड्‌र्सनी मला न्हाणीघरे व शौचालये धुण्यासाठी इतर स्त्रियांबरोबर पाठवले. सहसा मी झेकोस्लोव्हाकियातून आलेल्या एका स्त्रीबरोबर असायचे आणि मी तिला यहोवाविषयी आणि माझ्या विश्‍वासाविषयी नेहमी सांगायचे. अशाप्रकारे विश्‍वासाविषयी सारखे बोलत राहिल्याने मी स्थिर राहू शकले.”

तात्पुरती सुटका

मे १९४५ साली सोव्हिएत सैनिकांनी वॉल्टहाईम तुरुंगातील कैद्यांना सोडून दिले आणि फ्रीडा, मॅग्डेबर्गला जाऊन पुन्हा जाहीर सेवा करायला मोकळी झाली पण हे फार काळासाठी नव्हते. साक्षीदारांना पुन्हा भेदभाव दाखवण्यात येऊ लागला आणि या वेळी सोव्हिएत ऑक्यूपेशनल झोनच्या अधिकाऱ्‍यांकडून त्यांना त्रास होऊ लागला. अधिकेंद्रित शासन संशोधनाच्या हॅन्‍ना-अरेन्ड-संस्थेचे जेरल्ट हॉक लिहितात: “यहोवाच्या साक्षीदारांचा गट हा जर्मनीत दोन्ही हुकूमशाही शासनांकडून जवळजवळ लगातार छळलेल्या मोजक्या सामाजिक गटांपैकी एक होता.”

हा दुजाभाव पुन्हा कशाला? पुन्हा एकदा, ख्रिस्ती तटस्थता हेच याला कारण होते. १९४८ साली पूर्व जर्मनीत सार्वमत अर्थात थेट लोकांकडून मतदान घेण्यात आले आणि हॉक यांच्या वर्णनानुसार, “[यहोवाच्या साक्षीदारांच्या छळाला] मूलभूत कारण म्हणजे त्यांनी या सार्वमतात भाग घेतला नाही.” ऑगस्ट १९५० साली, यहोवाच्या साक्षीदारांवर पूर्व जर्मनीत बंदी घालण्यात आली. शेकडो लोकांना अटक करण्यात आली; यात फ्रीडाचाही समावेश होता.

फ्रीडाला पुन्हा कोर्टात जावे लागले आणि तिला सहा वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. “या वेळी मात्र मी सहउपासकांच्यासोबत होते आणि त्यांच्या सहवासाची मला खूप मदत झाली.” १९५६ साली तिची सुटका झाली तेव्हा तिने पश्‍चिम जर्मनीला स्थलांतर केले. आज फ्रीडा ९० वर्षांची आहे, ती हुझुममध्ये राहते आणि अजूनही खरा देव, यहोवा याची उपासना करते.

फ्रीडाला दोन हुकूमशाही शासनांखाली २३ वर्षे छळ सहन करावा लागला. “नात्सींनी माझ्या शरीराचा घात करायचा प्रयत्न केला तर कम्युनिस्ट लोकांनी माझे मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न केला. या सर्व काळात तग धरून राहण्यासाठी मला शक्‍ती कशी मिळाली? तुरुंगवास नसताना बायबल अभ्यासाच्या सवयीमुळे, एकान्तवासात निरंतर प्रार्थना करण्यामुळे, शक्य तेव्हा सहउपासकांशी सहवास ठेवल्यामुळे आणि संधी मिळेल तेव्हा इतरांना माझ्या विश्‍वासांबद्दल सांगितल्यामुळे.”

हंगेरीत फॅसिझम

यहोवाच्या साक्षीदारांना कित्येक वर्षे भेदभाव सहन करावा लागला असा आणखी एक देश म्हणजे हंगेरी. काहींना तर, दोनऐवजी तीन हुकूमशाही शासनांखाली छळ सहन करावा लागला. त्यांपैकी एक आहेत, ॲडम सिंगर. ॲडम यांचा जन्म, पाक्श, हंगेरी येथे १९२२ साली झाला होता आणि ते प्रोटेस्टंट पंथीय होते. १९३७ साली काही बायबल विद्यार्थी ॲडम यांच्या घरी गेले आणि त्यांना त्यांचा संदेश लगेच आवडला. बायबलमधून काही गोष्टी शिकल्यावर आपल्या चर्चच्या शिकवणुकी बायबलनुसार नाहीत याची खात्री त्यांना पटली. त्यामुळे त्यांनी प्रोटेस्टंट चर्च सोडून दिले आणि जाहीर सेवा करण्यात ते बायबल विद्यार्थ्यांसोबत जाऊ लागले.

त्या वेळी, हंगेरीत पुराणमतवादी व्यवस्थेचा प्रभाव वाढत होता. अनेक वेळा, पोलिसांनी ॲडम यांना घरोघरी जाऊन प्रचार करत असल्याचे पाहिले होते व त्यांनी कित्येकदा त्यांना चौकशीसाठी नेले होते. साक्षीदारांवरील विरोध वाढत होता आणि १९३९ साली त्यांच्या कार्यहालचालींवर बंदी आणण्यात आली. १९४२ साली, ॲडम यांना अटक करून तुरुंगात नेण्यात आले आणि बेदम मारण्यात आले. १९ वर्षांच्या वयात हा सगळा छळ तसेच पुष्कळ महिन्यांचा तुरुंगवास सहन करायला त्यांना कोठून ताकद मिळाली? “घरी असताना मी काळजीपूर्वक बायबलचा अभ्यास करायचो आणि यहोवाच्या उद्देशांना समजून घेण्याचा प्रयत्न करायचो.” तुरुंगातून सुटल्यावरच, ॲडम यांनी यहोवाचा साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेतला. तेही, रात्रीच्या वेळी ऑगस्ट १९४२ मध्ये आपल्या घराजवळच्या एका नदीत त्यांनी बाप्तिस्मा घेतला.

हंगेरीत तुरुंगवास, सर्बियात श्रम छावणीत

दरम्यान, दुसरे महायुद्ध चालू असताना हंगेरीने सोव्हिएत युनियनविरुद्ध जर्मनीला साथ दिली आणि १९४२ च्या हिवाळ्यात ॲडम यांना लष्करी सेवेत भरती होण्यासाठी बोलावण्यात आले. ते म्हणतात: “मी त्यांना सांगितलं की, बायबलमधून शिकलेल्या गोष्टींमुळे मी लष्करात काम करू शकत नाही. मी माझी तटस्थ भूमिका त्यांना समजावून सांगितली.” त्यांना ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. पण ॲडम यांना फार काळ हंगेरीत राहावे लागले नाही.

सुमारे १६० यहोवाच्या साक्षीदारांना १९४३ साली गोळा करून डॅन्यूब नदीमार्गे बोटींवरून सर्बियाला पाठवण्यात आले. ॲडमही त्यांच्यापैकी एक होते. सर्बियात हे कैदी हिटलरच्या तिसऱ्‍या राइखखाली होते. त्यांना बोर येथील श्रम छावणीत ठेवण्यात आले आणि तांब्याच्या खाणीत त्यांच्याकडून जबरदस्तीने कष्ट करवून घेतले जात होते. एका वर्षानंतर, त्यांना पुन्हा हंगेरीत नेण्यात आले आणि तेथे गेल्यावर १९४५ सालच्या वसंतऋतूत सोव्हिएत सैनिकांनी ॲडम यांची सुटका केली.

हंगेरी कम्यूनिस्टवाद्यांच्या हातात

पण हे स्वातंत्र्य फार काळ टिकले नाही. १९४० च्या दशकाच्या शेवटाला, कम्यूनिस्ट अधिकाऱ्‍यांनी युद्धाआधी पुराणमतवाद्यांनी केले होते त्याचप्रमाणे हंगेरीतील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यांवर बंदी घातली. १९५२ साली, ॲडम २९ वर्षांचे होते; त्यांचा विवाह झाला होता आणि त्यांना दोन मुले होती. त्या वेळी, लष्कर सेवेसाठी पुन्हा नकार दिल्यामुळे त्यांना अटक करून त्यांच्यावर आरोप लावण्यात आला. ॲडम यांनी कोर्टात म्हटले: “मी काही पहिल्यांदा लष्करी सेवा नाकारलेली नाही. युद्धादरम्यान मी याच कारणासाठी तुरुंगवास भोगला आणि मला सर्बियालाही पाठवण्यात आले होते. माझ्या विवेकामुळे मी लष्करी सेवा नाकारली आहे. मी एक यहोवाचा साक्षीदार आहे आणि मी राजकीय मामल्यांत तटस्थ राहीन.” ॲडम यांना आठ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली पण नंतर ती चार वर्षे करण्यात आली.

या दुजाभावामुळे ॲडम यांना १९७० चे निम्मे दशक पूर्ण होईपर्यंत अर्थात बायबल विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांच्या घरी पहिल्यांदा भेट दिली होती तेव्हापासून ३५ हून अधिक वर्षांपर्यंत त्रास सहन करावा लागला. या काळादरम्यान त्यांना सहा कोर्टांनी, कमीत कमी दहा तुरुंगे आणि छावण्यांमध्ये २३ वर्षांची शिक्षा दिली होती. युद्धपूर्व हंगेरीतील पुराणमतवादी, सर्बियातील जर्मन नॅशनल सोशलिस्ट आणि हंगेरीत शीतयुद्धादरम्यान कम्यूनिस्टवादी या तीन शासनांखाली त्यांनी लगातार छळ सहन केला.

ॲडम अजूनही पाक्श या आपल्या गावात राहून देवाची निष्ठेने सेवा करत आहेत. या सर्व अडचणींचा त्यांनी काही असाधारण क्षमतांमुळे यशस्वीरित्या सामना केला का? नाही. ते म्हणतात:

“बायबल अभ्यास, प्रार्थना आणि सहउपासकांसोबतचा सहवास या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. पण मला आणखी दोन गोष्टींविषयी सांगायला आवडेल. पहिली गोष्ट, यहोवा हा शक्‍तीचा स्रोत आहे. त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध असल्यामुळे मी निभावू शकलो. दुसरी गोष्ट, मी रोमकर १२ वा अध्याय लक्षात ठेवला, त्यात म्हटले आहे: ‘सूड उगवू नका.’ त्यामुळे, मी मनात कधीच राग बाळगला नाही. कित्येकदा मला माझा छळ केलेल्यांचा बदला घेण्याची संधी मिळाली होती पण मी तसं कधीच केलं नाही. यहोवा आपल्याला देत असलेल्या शक्‍तीचा आपण वाईटाची परतफेड वाईटाने करण्यासाठी कधीही वापरू नये.”

छळाचा अंत

फ्रीडा आणि ॲडम आता मुक्‍तपणे यहोवाची उपासना करू शकतात. पण त्यांचे अनुभव आपल्याला धार्मिक छळाविषयी काय दाखवतात? हेच की, या छळाचा काही फायदा होत नाही—निदान खऱ्‍या ख्रिश्‍चनांवर तरी. यहोवाच्या साक्षीदारांचा छळ करण्यात अनावश्‍यक साधनसंपत्ती खर्च झाली आणि पीडाही झाली पण यामुळे त्यांचा उद्देश साध्य झाला नाही. आज, ज्या युरोपमध्ये एकेकाळी दोन मोठ्या हुकूमशाही शासनांचा दरारा होता तेथे यहोवाच्या साक्षीदारांची भरभराट होत आहे.

साक्षीदारांनी छळाबद्दल कशी प्रतिक्रिया दाखवली? फ्रीडा आणि ॲडम यांच्या अहवालांतून दिसून येते त्याप्रमाणे, त्यांनी बायबलचा पुढील सल्ला लागू केला: “वाइटाने जिंकला जाऊ नका, तर बऱ्‍याने वाइटाला जिंक.” (रोमकर १२:२१) बऱ्‍याने वाइटाला खरोखर जिंकता येते का? देवावरील भक्कम विश्‍वासातून ते निर्माण होत असल्यास निश्‍चितच. युरोपमधील यहोवाच्या साक्षीदारांचा छळावरील विजय हा देवाच्या आत्म्याचा विजय ठरला; पवित्र आत्म्याद्वारे नम्र ख्रिश्‍चनांमध्ये निर्माण होणाऱ्‍या विश्‍वासातून बरे करण्याच्या ताकदीचे ते प्रदर्शन होते. (गलतीकर ५:२२, २३) आजच्या हिंसक जगात, हा दखल घेण्याजोगा गंभीर धडा आहे.

[५ पानांवरील चित्रे]

फ्रीडा येस (आता थिले) अटक झाली तेव्हा आणि आता

[७ पानांवरील चित्रे]

ॲडम सिंगर, तुरुंगात असताना आणि आता