व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बदलत्या परिस्थितीचा फायदा करून घेणे

बदलत्या परिस्थितीचा फायदा करून घेणे

बदलत्या परिस्थितीचा फायदा करून घेणे

पम, यान, ड्रीस आणि ओटो हे नेदरलंड्‌समध्ये राहणारे चार ख्रिस्ती वडील आहेत. त्यांच्या परिस्थितीत बरेच साम्य आहे. चौघे विवाहित असून त्यांना मुलेबाळे आहेत. शिवाय, काही वर्षांआधी त्या सर्वांकडे पूर्णवेळेच्या नोकऱ्‍या, घरदार सर्वकाही व्यवस्थित होते. पण त्या सर्वांनी आपल्या नोकऱ्‍या सोडून दिल्या आणि आपला सर्व वेळ व शक्‍ती राज्याच्या कार्याला बढावा देण्याकरता समर्पित केली. हा बदल करणे त्यांना कशामुळे शक्य झाले? त्या सर्वांनी बदलत्या परिस्थितीचा फायदा करून घेतला.

आपल्या सर्वांच्या परिस्थितीत बदल होतच असतो. लग्न करणे, मुले होणे, वयस्क आईवडिलांची काळजी घ्यावी लागणे यांसारखे बदल होतात तेव्हा अधिक जबाबदाऱ्‍या येतात. पण काही बदल आपल्याला ख्रिस्ती सेवाकार्यात वाढ करण्याचे स्वातंत्र्य मिळवून देतात. (मत्तय ९:३७, ३८) उदाहरणार्थ, आपली मुले मोठी होऊन घर सोडून जातात किंवा आपण सेवानिवृत्त होतो.

आपली इच्छा नसतानाही कधीकधी आपली परिस्थिती बदलते हे खरे असले तरीही काही ख्रिश्‍चनांनी मुद्दामहून आपल्या परिस्थितीत अशाप्रकारचे बदल घडवून आणले आहेत की ज्यांमुळे त्यांना सेवाकार्यात आपला सहभाग वाढवता आला. पम, यान, ड्रीस व ओटो यांनी अगदी हेच केले. ते कसे?

मुले घर सोडतात तेव्हा

पम एका औषधांच्या कंपनीत लेखपाल म्हणून कामावर होते. आपली पत्नी ॲनी आणि आपल्या दोन मुलींसोबत ते बऱ्‍याचदा सहायक पायनिर सेवेत सहभागी व्हायचे. पम व ॲनी आपल्या मुलांकरता इतर पायनियर बांधवांसोबत करमणुकीचे बेत देखील आखायचे. ते सांगतात की “यामुळे इतर प्रकारच्या संगतीने निर्माण होऊ शकणाऱ्‍या समस्यांपासून त्यांचे संरक्षण झाले.” आपल्या आईवडिलांच्या उदाहरणाने प्रेरित होऊन दोन्ही मुलींनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सामान्य पायनियर सेवा सुरू केली.

मुले घर सोडून गेल्यानंतर पम व ॲनी यांना लक्षात आले की या बदललेल्या परिस्थितीमुळे त्यांच्याजवळ आता अधिक स्वातंत्र्य आणि पैसा होता; याचा उपयोग ते पर्यटन किंवा इतर प्रकारच्या विरंगुळ्याकरता सहज करू शकत होते. पण असे करण्याऐवजी या जोडप्याने आपल्या बदललेल्या परिस्थितीचा ख्रिस्ती सेवाकार्यात वाढ करण्याकरता उपयोग करण्याचे ठरवले. यासाठी पम यांनी आपल्या मालकाला दर आठवड्यात एक दिवस रजा घेण्याची परवानगी मागितली. नंतर पमने सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत काम करण्याची व्यवस्था केली. अर्थात कमी काम केल्यामुळे कमी पगारात खर्च चालवण्याची सवय त्यांना लावावी लागली. तरीसुद्धा त्यांनी हे यशस्वीरित्या केले आणि १९९१ साली पम आपल्या पत्नीसोबत सामान्य पायनियरिंग करू लागले.

नंतर, पमला यहोवाच्या साक्षीदारांच्या संमेलन सभागृहाचे सहायक देखरेखे होण्याची विनंती करण्यात आली. हे निमंत्रण स्वीकारल्यास या जोडप्याला, ३० वर्षांपासून ते जेथे राहात होते ते घर सोडून संमेलन सभागृहाच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या घरात राहायला जावे लागणार होते. त्यांनी निमंत्रण स्वीकारले. त्यांना कठीण गेले का? ॲनी सांगतात, की जेव्हा त्यांना आपल्या जुन्या घराची आठवण यायची तेव्हा त्या स्वतःला म्हणायच्या, ‘मी लोटाच्या पत्नीसारखी तर वागत नाहीय?’ त्यांनी ‘मागे पाहायचे’ नाही असे ठरवले.—उत्पत्ति १९:२६; लूक १७:३२.

पम आणि ॲनी म्हणतात की त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना अनेक आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. उदाहरणार्थ संमेलन सभागृहाची देखभाल करण्याची सेवा, प्रांतीय अधिवेशनांची तयारी करणे, आणि सभागृहात भाषणे देणाऱ्‍या विभागीय पर्यवेक्षकांसोबत (प्रवासी सेवक) भेटणे-बोलणे त्यांना आनंददायक वाटते. अधूनमधून, पम पर्यायी विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करतात तेव्हा त्यांना वेगवेगळ्या मंडळ्यांना भेटी देण्याचीही संधी मिळते.

आपली सेवा वाढवण्यास या जोडप्याला कशामुळे यश मिळाले आहे? पम सांगतात: “जीवनात काही लक्षणीय बदल होतो तेव्हा या नवीन परिस्थितीचा पुरेपूर फायदा उचलण्याचा निर्धार केला पाहिजे.”

जीवन साधे बनवणे

यान व त्यांच्या पत्नी वोत यांना तीन मुले आहेत. पम व त्यांच्या कुटुंबाप्रमाणेच याननेही बदललेल्या परिस्थितीचा चांगला फायदा करून घेतला. अनेक वर्षांपासून यानकडे बँकेत चांगल्या पगाराची नोकरी होती आणि त्यांनी आपल्या कुटुंबाला सर्व सुखसोयी पुरवल्या होत्या. पण त्यांना आपली सेवा वाढवावी असे मनापासून वाटत होते. ते सांगतात: “काळाच्या ओघात सत्याबद्दल माझी कृतज्ञता वाढत गेली होती आणि यहोवाबद्दलचे माझे प्रेम देखील वाढले होते.” त्यामुळे १९८६ साली याननी आपल्या परिस्थितीत फेरबदल केला. ते सांगतात: “आमच्या कार्यालयात काही फेरबदल करण्यात आले तेव्हा मी त्याचा फायदा उचलून कमी तास काम करण्यास सुरवात केली. माझा पगार ४० टक्क्यांनी कमी झाला. मी घर विकून टाकले आणि राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या भागांत सेवा करता यावी म्हणून एक हाऊसबोट विकत घेतली. नंतर, मी ऐच्छिक निवृत्ती घेतली ज्यामुळे माझी मिळकत आणखी २० टक्के कमी झाली, पण १९९३ साली मी सामान्य पायनियर म्हणून सेवा करू लागलो.”

आज, यान हॉस्पिटल लायझॉन कमिटीचे सदस्य आहेत आणि ते वेळोवेळी अधिवेशन पर्यवेक्षक म्हणून कार्य करतात. वोत यांची प्रकृती खालावलेली असली तरी, त्या वेळोवेळी सहायक पायनियर सेवेत सहभागी होतात. तिन्ही मुलांचे आता लग्न झाले असून ते आपापल्या सोबत्यांबरोबर राज्याचे आवेशी सेवक आहेत.

यान व वोत कमी पैशांत कशाप्रकारे उदरनिर्वाह चालवतात? यान उत्तर देतात, “आमच्याजवळ भरपूर पैसा होता तेव्हापासूनच आम्ही भौतिक वस्तूंना फार महत्त्व न देण्याची सवय लावली. आता जेव्हा एखादी वस्तू लगेच मिळत नाही, ती मिळवायला थांबावे लागते तेव्हा थोडी गैरसोय झाल्यासारखी वाटते, पण आम्हाला मिळालेले आध्यात्मिक आशीर्वाद आणि विशेषाधिकार या सर्व गोष्टींची उणीव भरून काढतात.”

यान व वोत यांच्याप्रमाणेच, ड्रीस व त्यांच्या पत्नी येनी यांनी देखील राज्याच्या कार्याला अधिक वेळ देण्याकरता आपले जीवन साधे ठेवण्याचा निर्णय घेतला. ड्रीस व येनी आधी पायनियर सेवेत होते. त्यांना मूल झाल्यानंतर, कुटुंबाची जबाबदारी पार पाडता यावी म्हणून ड्रीस एका मोठ्या कंपनीत प्रशासकीय पदावर रुजू झाले. त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कामावर खूश होते आणि त्यामुळे त्यांना बढतीची ऑफर देण्यात आली. पण बढती स्वीकारल्यास ख्रिस्ती कार्यांकरता फार कमी वेळ मिळेल हे ओळखून ड्रीस यांनी ती ऑफर नाकारली.

कुटुंबाची काळजी घेणे—तसेच येनी यांच्या आजारी असलेल्या आईची काळजी घेणे यातच त्या दोघांचा बहुतेक वेळ व शक्‍ती खर्च होत असे. पण तरीही, त्यांनी पायनियर कार्याकरता आपल्या मनातला आवेश मावळू दिला नाही. असे करण्यास त्यांना कशामुळे मदत मिळाली? येनी सांगतात: “आम्ही पायनियर्सना कधी घरी राहायला, तर कधी जेवायला बोलवायचो; तसेच विभागीय पर्यवेक्षकांच्या मुक्कामाची देखील आमच्याच घरात व्यवस्था करायचो.” ड्रीस सांगतात: “आम्ही आपले जीवन साधे ठेवले आणि कर्ज न घेण्याची काळजी घेतली. भविष्यात अतिरिक्‍त जबाबदाऱ्‍यांनी बांधले जाऊ नये म्हणून मोठ्या व्यापारात किंवा घर खरेदी करण्यात कधीही पैसा गुंतवायचा नाही असा निर्णय आम्ही घेतला.”

राज्याच्या कार्याकरता अधिक वेळ मिळेल अशाप्रकारची परिस्थिती निर्माण केल्यामुळे ड्रीस व येनी यांना अनेक आशीर्वाद मिळाले आहेत. त्यांची दोन्ही मुले आता वडील म्हणून सेवा करतात आणि त्यांपैकी एक आपल्या पत्नीसोबत पायनियर सेवेत आहे. ड्रीस आणि येनी यांनी खास पायनियर म्हणून काही काळ सेवा केली व त्यानंतर ड्रीस विभागीय कार्य करू लागले व येनी यांनी त्यांना यात साथ दिली. आज ते बेथेलमध्ये स्वयंसेवक म्हणून कार्य करतात आणि ड्रीस हे शाखा समितीचे सदस्य आहेत.

ऐच्छिक सेवानिवृत्ती

ड्रीस व येनीप्रमाणेच ओटो व त्यांच्या पत्नी जूडी देखील त्यांच्या दोन मुलींच्या जन्माआधी पायनियर सेवा करत होते. जूडी त्यांच्या पहिल्या मुलीच्या वेळी गरोदर होत्या तेव्हा ओटो शाळेत शिक्षकाची नोकरी करू लागले.

मुली मोठ्या होत होत्या तेव्हा ओटो व जूडी सहसा, आपल्या मुलींना पूर्ण वेळेच्या ख्रिस्ती सेवकांचा आनंद जवळून पाहायला मिळावा म्हणून पायनियरांना घरी बोलवायचे. कालांतराने त्यांची थोरली मुलगी पायनियर सेवा करू लागली. नंतर, ती गिलियड प्रशालेलाही उपस्थित राहिली आणि आता ती आपल्या पतीसोबत एका आफ्रिकन देशात मिशनरी सेवा करते. त्यांच्या धाकट्या मुलीने १९८७ साली पायनियरिंग सुरू केली आणि जूडी तिला साथ देऊ लागल्या.

बदलत्या परिस्थितीमुळे ओटोंना शाळेत कमी वेळ काम करणे शक्य झाले तेव्हा त्यांनी उरलेल्या वेळेचा पायनियर सेवा करण्याकरता उपयोग केला. शेवटी त्यांनी नोकरी सोडूनच दिली. आज, प्रवासी कार्यात ओटो एक शिक्षक या नात्याने आपल्या क्षमतेचा मंडळ्यांच्या आध्यात्मिक उन्‍नतीकरता उपयोग करत आहेत.

लवकर निवृत्ती घेणाऱ्‍यांना ओटो कोणता सल्ला देतात? “निवृत्ती घेतल्यावर एखाद दोन वर्षे आराम करू अशी वृत्ती ठेवू नका. माणसाला ‘आराम’ करण्याची सवय खूप सहज लागते. काही दिवसांतच तुम्ही पायनियरिंगविषयी पार विसरून जाल. त्याऐवजी निवृत्ती घेताच अधिक कार्य करण्यास सुरवात करा.”

जीवनात मिळवलेला अनुभव उपयोगी

पम, यान, ड्रीस व ओटो या बांधवांना आता तरुणपणासारखी शक्‍ती व जोम राहिलेला नाही हे खरे आहे. पण त्यांच्याजवळ निश्‍चितच अधिक प्रगल्भता, अनुभव आणि बुद्धी आहे. (नीतिसूत्रे २०:२९) कुटुंबात वडिलांची भूमिका काय असते हे त्यांना माहीत आहे, तसेच, आपल्या पत्नींसोबत कार्य केल्यामुळे आई होण्यात काय काय समाविष्ट आहे याची देखील त्यांना कल्पना आहे. आपल्या पत्नींसोबत त्यांनी कौटुंबिक समस्या सोडवल्या आहेत, आणि आपल्या मुलांसमोर ईश्‍वरशासित ध्येये ठेवली आहेत. ओटो म्हणतात: “मी विभागीय पर्यवेक्षक म्हणून बांधवांना कौटुंबिक प्रश्‍नांसंबंधी मार्गदर्शन करतो तेव्हा मला सोपे जाते कारण मी स्वतः कुटुंबाचे पालनपोषण केले आहे.” त्याचप्रकारे ड्रीस यांनाही एक पिता म्हणून असलेला अनुभव बेथेल कुटुंबात अतिशय फायदेकारक ठरत आहे कारण या ठिकाणी अनेक तरुण सदस्य आहेत.

होय, या बांधवांजवळ असलेले वैयक्‍तिक ज्ञान मंडळीतील नानाविध जबाबदाऱ्‍या पार पाडण्याकरता मदतदायी ठरते. त्यांच्या अनुभवामुळे त्यांची हत्यारे जणू अधिक पाणीदार झाली आहेत आणि यामुळे ते आपल्या शक्‍तीचा उपयोग उत्तम कार्यसिद्धीकरता करू शकतात. (उपदेशक १०:१०) किंबहुना, विशिष्ट वेळात ते अधिक शारीरिक शक्‍ती असलेल्या पण कमी अनुभव असलेल्यांपेक्षा अधिक कार्य साध्य करू शकतात.

हे बांधव आपापल्या पत्नींसोबत यहोवाच्या लोकांपैकी असलेल्या तरुणांकरता उत्तम आदर्श आहेत. तरुण लोकांना दिसून येईल की यांच्यासारख्या जोडप्यांनी, आपल्या ख्रिस्ती प्रकाशनांत उल्लेख करण्यात आलेली अनेक आव्हाने व आशीर्वाद वैयक्‍तिकरित्या अनुभवले आहेत. वयोवृद्ध असूनही एक आव्हानात्मक कार्यनियुक्‍ती स्वतःहून मागणाऱ्‍या कालेबसारखा आत्मा प्रदर्शित करणाऱ्‍या स्त्रीपुरुषांना पाहून खूप उत्तेजन मिळते.—यहोशवा १४:१०-१२.

त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा

या लेखात उल्लेख केलेल्या जोडप्यांच्या विश्‍वासाचे व कार्याचे तुम्ही अनुकरण करू शकता का? त्यांनी सत्याला आपल्या जीवनात प्राधान्य दिले हे आठवणीत असू द्या. त्यांनी आपल्या मुलांमध्ये पायनियर सेवा करण्याची इच्छा जागृत केली. यानच्या शब्दांत, त्यांनी “यहोवा व त्याची संघटना यांबद्दल प्रेम दाखवण्यात आदर्श ठेवण्याद्वारे, चांगली संगती मिळावी म्हणून व्यवस्था करण्याद्वारे आणि मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिकवण्याद्वारे” असे केले. यासोबतच ते सर्व कुटुंब मिळून काम करायचे आणि खेळायचेसुद्धा. पम सांगतात, “सुटीच्या दिवसांत आम्ही सकाळी पूर्ण कुटुंब मिळून प्रचार कार्याला जायचो आणि दुपारी एकत्र मिळून मौजमजा करायचो.”

याशिवाय, या बांधवांनी आगाऊ योजना केल्या जेणेकरून त्यांच्या परिस्थितीत बदल आल्यावर ते लगेच या नव्या परिवर्तनाचा फायदा घेऊ शकले. त्यांनी आपल्या डोळ्यापुढे ध्येये ठेवली आणि ती लवकरात लवकर साध्य करता यावीत म्हणून तत्परतेने निर्णय घेतले. नोकरीच्या ठिकाणी आपले काम कमी करता येईल का याचा त्यांनी विचार केला आणि कमी मिळकतीतही निभावून घेण्याची तयारी ठेवली. (फिलिप्पैकर १:१०) पत्नींनी आपल्या पतींना पुरेपूर पाठिंबा दिला. दोघांनाही ‘मोठ्या व कार्य साधण्याजोग्या द्वारातून’ प्रवेश करून, यहोवाकडील विपूल आशीर्वाद अनुभवण्याची मनस्वी इच्छा होती.—१ करिंथकर १६:९; नीतिसूत्रे १०:२२.

तुम्हाला देखील सेवेतील तुमचा सहभाग वाढवण्याची इच्छा आहे का? हे ध्येय साध्य करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे बदलणाऱ्‍या परिस्थितीचा चांगला उपयोग करणे.

[२० पानांवरील चित्र]

पम व ॲनी संमेलन गृहाची देखभाल करताना

[२० पानांवरील चित्र]

यान व वोत प्रचार कार्यात

[२१ पानांवरील चित्र]

ड्रीस व येनी बेथेलमध्ये सेवा करताना

[२१ पानांवरील चित्र]

ओटो व जूडी पुढच्या मंडळीला भेट देण्याच्या तयारीत