व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा “भरपूर क्षमा” करतो

यहोवा “भरपूर क्षमा” करतो

यहोवा “भरपूर क्षमा” करतो

क्षमा करण्याचा अर्थ, अपराध्यास माफ करण्याची क्रिया; त्याने केलेल्या अपराधाबद्दल मनात कसलाही राग बाळगण्यास नकार देणे व भरपाईची अपेक्षा सोडून देणे असा होतो.

इस्राएल राष्ट्राला देवाने दिलेल्या नियमशास्त्रानुसार, देवाविरुद्ध किंवा सहमानवाविरुद्ध पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीला आपल्या पापांची क्षमा मिळण्यासाठी नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आधी आपली चूक सुधारावी लागे आणि मग बहुतेक प्रसंगी यहोवाला एक रक्‍तार्पण चढवावे लागे. (लेवीय ५:५-६:७) म्हणूनच पौलाने हे तत्त्व मांडले: “नियमशास्त्राप्रमाणे रक्‍ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते, आणि रक्‍त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही.” (इब्री लोकांस ९:२२) परंतु खरे पाहता, पशू बलिदानांच्या रक्‍तामुळे एखाद्याची पापे कायमची धुतली जाऊन त्याला अगदी एक शुद्ध विवेक मिळणे शक्य नव्हते. (इब्री लोकांस १०:१-४; ९:९, १३, १४) तर, भाकीत केलेल्या नवीन कराराने, येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर एखाद्याला खरी क्षमा मिळवणे शक्य केले. (यिर्मया ३१:३३, ३४; मत्तय २६:२८; १ करिंथकर ११:२५; इफिसकर १:७) पृथ्वीवर असताना देखील येशूने एका पक्षघाती मनुष्याला बरे करून दाखवून दिले की त्याला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.—मत्तय ९:२-७.

येशूने दोन दृष्टान्त दिले ज्यातून सूचित होते, की यहोवा “भरपूर क्षमा” करतो; एक दृष्टान्त उधळ्या पुत्राचा होता आणि दुसरा दृष्टान्त, एका राजाचा ज्याने १०,००० तालांतांचे (६०,०००,००० दिनार किंवा सुमारे ४०,०००,००० डॉलर) कर्ज असलेल्या आपल्या एका दासाचे कर्ज माफ केले परंतु तोच दास त्याच्या एका सहदासाचे केवळ १०० दिनारांचे (सुमारे ७० डॉलर) कर्ज माफ करण्यास तयार नव्हता. (यशया ५५:७; लूक १५:११-३२; मत्तय १८:२३-३५, पं.र.भा.) परंतु, यहोवा भावनिक होऊन क्षमा करत नाही कारण, वाईट कार्ये करणाऱ्‍यांस तो शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. (स्तोत्र ९९:८) यहोशवाने इस्राएल लोकांना ताकीद दिली होती, की त्यांनी जर धर्मत्याग केला तर यहोवा त्यांना क्षमा करणार नाही.—यहोशवा २४:१९, २०; पडताळा यशया २:६-९.

यहोवाने एक मार्ग तयार केला आहे ज्याद्वारे आपण आपल्या पापांची क्षमा मागून ती प्राप्त करू शकतो. पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीने आपला अपराध कबूल केला पाहिजे, त्याने देवाविरुद्ध अपराध केला आहे हे जाणले पाहिजे, पूर्णपणे तो कबूल केला पाहिजे, केलेल्या अपराधाबद्दल मनापासून पश्‍चात्ताप केला पाहिजे आणि पुन्हा अशाप्रकारचा अपराध करणार नाही असा ठाम निश्‍चय केला पाहिजे. (स्तोत्र ३२:५; ५१:४; १ योहान १:८, ९; २ करिंथकर ७:८-११) आपली चूक सुधारण्यासाठी किंवा झालेली हानी भरून काढण्यासाठी अपराधी व्यक्‍तीने सर्व प्रयत्न केले पाहिजेत. (मत्तय ५:२३, २४) मग, तिने देवाला प्रार्थना करून येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर यहोवाकडे क्षमायाचना केली पाहिजे.—इफिसकर १:७.

शिवाय, इतरांनी आपल्याविरुद्ध अनेकदा अपराध केले असले तरी त्यांना क्षमा करीत राहणे हे ख्रिश्‍चनांकडून अपेक्षिले जाते. (लूक १७:३, ४; इफिसकर ४:३२; कलस्सैकर ३:१३) जे इतरांना क्षमा करू इच्छित नाहीत अशा लोकांना देवही क्षमा करू इच्छित नाही. (मत्तय ६:१४, १५) एखाद्या “दुष्टाला” ख्रिस्ती मंडळीमधून गंभीर पाप केल्यामुळे बहिष्कृत केल्यावरही कालांतराने पश्‍चात्तापी असल्याचे त्याने सिद्ध केले तर त्याला क्षमा केली जाऊ शकते. अशा वेळी मंडळीतील सर्वांनी, त्याला आपल्या प्रेमाची खात्री द्यावी. (१ करिंथकर ५:१३; २ करिंथकर २:६-११) परंतु, पश्‍चात्ताप न दाखवता द्वेषभावनेने व जाणूनबुजून पाप करणाऱ्‍यांना ख्रिश्‍चनांनी क्षमा करण्याची गरज नाही. हे अपराधी देवाचे शत्रू बनतात.—इब्री लोकांस १०:२६-३१; स्तोत्र १३९:२१, २२.

इतरांसाठी, संपूर्ण मंडळीसाठीसुद्धा देवाजवळ क्षमायाचना करणे उचित आहे. इस्राएल राष्ट्राच्या वतीने मोशेने असेच केले, त्याने संपूर्ण राष्ट्राच्या पापांची कबूली देऊन क्षमायाचना केली आणि यहोवाने त्याची प्रार्थना ऐकली. (गणना १४:१९, २०) तसेच, मंदिराच्या समर्पणाच्या वेळी शलमोनाने यहोवाला अशी प्रार्थना केली, की त्याच्या लोकांनी अपराध केल्यावर त्यांना पश्‍चात्ताप होतो व ते मागे वळतात तेव्हा यहोवाने त्यांना क्षमा करावी. (१ राजे ८:३०, ३३-४०, ४६-५२) स्वदेशी पाठवलेल्या यहुद्यांच्या पातकांची एज्राने कबूली दिली. त्याच्या कळकळीच्या प्रार्थनेमुळे व आर्जवामुळे लोकांनी यहोवाची क्षमा मिळवण्यासाठी पावले उचलली. (एज्रा ९:१३–१०:४, १०-१९, ४४) याकोबाने उत्तेजन दिले की, आध्यात्मिकरीत्या आजारी असलेल्याने आपल्याकरता प्रार्थना करण्यासाठी मंडळीतील वडिलांना बोलवावे आणि मग, “त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल.” (याकोब ५:१४-१६) परंतु, “ज्याचा परिणाम मरण आहे असेहि पाप आहे;” हे, पवित्र आत्म्याविरुद्धचे पाप आहे जे जाणूनबुजून केले जाते व याला क्षमा नाही. अशाप्रकारे पाप करणाऱ्‍यांसाठी ख्रिश्‍चनांनी प्रार्थना करू नये.—१ योहान ५:१६; मत्तय १२:३१; इब्री लोकांस १०:२६, २७.