व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इतरांकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा

इतरांकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा

इतरांकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा

“मानवासारखे परमेश्‍वराचे पाहणे नसते.”१ शमुवेल १६:७.

१, २. अलियाबाविषयी यहोवाचा दृष्टिकोन शमुवेलाच्या दृष्टिकोनापेक्षा कशाप्रकारे वेगळा होता आणि यावरून आपण काय शिकू शकतो?

सा.यु.पू. ११ व्या शतकात यहोवाने संदेष्टा शमुवेल यास एका गुप्त कार्याकरता पाठवले. त्याने शमुवेलला इशाय नावाच्या एका माणसाच्या घरी जाऊन त्याच्या पुत्रांपैकी एकाला इस्राएलचा भावी राजा म्हणून अभिषिक्‍त करण्यास सांगितले. शमुवेलने इशायच्या ज्येष्ठ पुत्राला, अलियाबाला पाहिले तेव्हा यालाच देवाने निवडले असल्याची त्याला खात्री वाटली. पण यहोवाने म्हटले: “त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्‍वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्‍वर हृदय पाहतो.” (१ शमुवेल १६:६, ७) यहोवाने अलियाबाकडे ज्या दृष्टीने पाहिले त्या दृष्टीने शमुवेल त्याच्याकडे पाहू शकला नाही. *

इतरांच्या व्यक्‍तिमत्त्वाचे मूल्यमापन करताना मानव किती सहज चुकू शकतात! एकीकडे, जे लोक वरवर चांगले दिसतात पण मुळात नीतिप्रिय नाहीत अशा लोकांना पाहून आपण फसतो. तर दुसरीकडे, काही लोक मुळात प्रांजळ असूनही केवळ त्यांचे काही गुणविशेष आपल्याला आवडत नसल्यामुळे आपण त्यांच्याकडे कठोर आणि दुराग्रही दृष्टिकोनातून पाहतो.

३, ४. (अ) दोन ख्रिश्‍चनांमध्ये समस्या उद्‌भवल्यास प्रत्येकाने काय करण्याचा निर्धार करावा? (ब) एखाद्या सहविश्‍वासू बांधवाशी गंभीर मतभेद झाल्यास आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

इतरांविषयी, मग आपण त्यांना कित्येक वर्षांपासून ओळखत असलो तरीसुद्धा, जेव्हा आपण त्यांच्याविषयी लगेच काहीतरी मत बनवतो तेव्हा वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता असते. एकेकाळी तुमचा जवळचा मित्र असलेल्या एखाद्या ख्रिस्ती बांधवाशी कदाचित तुमचा गंभीर मतभेद झाला असेल. तुम्हाला त्याच्यासोबत समेट करायला आवडेल का? हे साध्य करण्यात कोणती गोष्ट तुमची मदत करेल?

या ख्रिस्ती बांधवाकडे किंवा बहिणीकडे शांतचित्ताने व सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याचा प्रयत्न करा. आणि असे करताना येशूचे पुढील शब्द आठवणीत ठेवा: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही.” (योहान ६:४४) मग स्वतःला विचारा: ‘यहोवाने या व्यक्‍तीला आपल्या पुत्राकडे का आकर्षिले? या व्यक्‍तीमध्ये कोणते चांगले गुण आहेत? मी या उत्तम गुणांकडे दुर्लक्ष करतो का किंवा मुद्दामहून त्यांना कमी लेखतो का? आम्ही सुरवातीला मित्र कसे काय बनलो? कोणत्या गोष्टीने मला या व्यक्‍तीकडे आकर्षित केले?’ सुरवातीला, कदाचित तुम्हाला कोणतेही चांगले गुण दिसणार नाहीत, खासकरून काही काळापासून तुमच्या मनात अशा कटू भावना असतील तर. पण, आपसांतील चांगले संबंध कायम करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे कसे करता येईल याचे उदाहरण म्हणून आपण अशा दोन व्यक्‍तींच्या सकारात्मक गुणांवर विचार करण्याचा प्रयत्न करू ज्यांच्याविषयी कधीकधी नकारात्मक भाष्य केले जाते. या दोन व्यक्‍ती म्हणजे संदेष्टा योना आणि प्रेषित पेत्र.

योनाचे प्रामाणिक निरीक्षण

५. योनावर कोणते काम सोपवण्यात आले होते आणि त्याने काय केले?

योवाशचा पुत्र, दुसरा राजा यराबाम याच्या कारकीर्दीदरम्यान इस्राएलच्या उत्तर राज्यात योना संदेष्ट्याचे काम करत होता. (२ राजे १४:२३-२५) एकदा यहोवाने योनाला इस्राएल सोडून शक्‍तिशाली अश्‍शूरी साम्राज्याची राजधानी निनवे येथे जाण्यास सांगितले. कशासाठी? या महान शहराचा नाश होणार असल्याची ताकीद तेथील रहिवाशांना देण्यासाठी. (योना १:१, २) पण देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याऐवजी योना पळून गेला! तो निनवेपासून दूर असलेल्या तार्शिशला जाणाऱ्‍या जहाजात बसला.—योना १:३.

६. निनवेला जाण्याकरता यहोवाने योनाला का निवडले?

योनाचे नाव घेताच तुमच्या मनात कोणते विचार येतात? आज्ञा न मानणारा संदेष्टा म्हणून तुम्ही त्याच्याविषयी विचार करता का? वरवर पाहिल्यास एखादी व्यक्‍ती अशा निष्कर्षावर येण्याची शक्यता आहे. पण योना आज्ञा न मानणारा असल्यामुळे देवाने त्याला संदेष्टा नियुक्‍त केले असावे का? निश्‍चितच नाही! योनाच्या व्यक्‍तिमत्त्वात साहजिकच काही चांगले गुण असतील. संदेष्टा या नात्याने त्याने काय काम केले यावर विचार करा.

७. इस्राएलमध्ये योना कशा प्रकारच्या परिस्थितीत यहोवाची सेवा करत होता आणि या माहितीने त्याच्याविषयीच्या तुमच्या दृष्टिकोनावर काय परिणाम झाला आहे?

योनाने इस्राएलमध्ये आपली नियुक्‍ती विश्‍वासूपणे व परिश्रमपूर्वक पार पाडली; खरे पाहता, इस्राएलचे लोक अतिशय कठोर मनोवृत्तीचे होते. योनाच्याच काळात राहणारा संदेष्टा आमोस याने त्या काळातील इस्राएल लोकांचे वर्णन भौतिकवादी आणि सुखविलासी याप्रकारे केले. * त्याकाळी, इस्राएलांच्या देशात बरेच गैरप्रकार चालले होते पण इस्राएल लोकांनी त्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. (आमोस ३:१३-१५; ४:४; ६:४-६) तरीपण, योनाने अशा या लोकांना प्रचार करण्याचे त्याच्यावर सोपवलेले कार्य सातत्याने व विश्‍वासूपणे पार पाडले. तुम्ही सुवार्तेचे उद्‌घोषक असाल, तर आत्मसंतुष्ट आणि बेपर्वा मनोवृत्तीच्या लोकांशी बोलणे किती कठीण असते याची तुम्हाला जाणीव असेल. तेव्हा, योनाच्या कमतरता कबूल करण्यासोबतच, अविश्‍वासू इस्राएल लोकांना प्रचार करण्यात त्याचा विश्‍वासूपणा व धीर यांकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये.

८. निनवे शहरात एका इस्राएली संदेष्ट्याला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता होती?

निनवेला जाण्याच्या कार्यनियुक्‍तीत एक आणखी कठीण आव्हान समाविष्ट होते. या शहरापर्यंत पोचायला योनाला ८०० किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागला होता, आणि या खडतर प्रवासाला तब्बल एक महिना लागण्याची शक्यता होती. तेथे पोचल्यावर योनाला अश्‍शूरी लोकांमध्ये प्रचार करावा लागणार होता; हे लोक अतिशय क्रूर म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या युद्धकलेत अमानुष यातना देण्याची प्रथा होती. या पाशवी प्रकारांबद्दल ते चक्क बढाई मारायचे. म्हणूनच निनवे शहराला ‘रक्‍तपाती नगरी’ म्हणण्यात आले!—नहूम ३:१, ७.

९. भयंकर वादळामुळे खलांशांचा जीव धोक्यात आला तेव्हा योनाने कोणते गुण प्रदर्शित केले?

यहोवाच्या आज्ञेचे पालन करण्याची इच्छा नसल्यामुळे योना अशा एका जहाजात चढला जे त्याला त्याच्या कार्यनियुक्‍तीपासून खूप दूर नेईल. पण यहोवाने आपल्या संदेष्ट्याविषयी आशा सोडली नाही किंवा त्याच्या ठिकाणी इतर कोणाला नेमले नाही. त्याऐवजी यहोवाने योनाला त्याच्या चुकीची जाणीव करून देण्याकरता पावले उचलली. देवाने समुद्रात एक भयंकर वादळ आणले. योनाला वाहून नेणारे जहाज लाटांमुळे हेलकावे खाऊ लागले. केवळ योनामुळे निर्दोष लोकांचे जीव धोक्यात आले! (योना १:४) यावर योनाची काय प्रतिक्रिया होती? आपल्यामुळे जहाजातील खलाशांचा जीव जाऊ नये म्हणून योनाने त्यांना सांगितले: “मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल.” (योना १:१२) खलाशांनी खरोखर आपल्याला धरून समुद्रात फेकून दिले तर यहोवा आपल्याला वाचवेल अशी अपेक्षा करण्याकरता योनाजवळ काही आधार नव्हता. (योना १:१५) पण खलाशांचा जीव नाहक जाऊ नये म्हणून योना मरण पत्करायला तयार झाला. या त्याच्या वागण्यावरून धैर्य, नम्रता आणि प्रेम हे गुण दिसून येत नाहीत का?

१०. यहोवाने योनाला पुन्हा एकदा नियुक्‍त केल्यानंतर काय झाले?

१० शेवटी, यहोवाने योनाला वाचवले. योनाच्या हातून अलीकडेच घडलेल्या चुकांमुळे, देवाचा प्रतिनिधी या नात्याने सेवा करण्याकरता तो कायमचा अयोग्य ठरला का? नाही, यहोवाने दयाळूपणे आणि प्रेमळपणे योनाला पुन्हा एकदा निनवेला जाऊन प्रचार करण्याकरता नियुक्‍त केले. योना निनवेला आला तेव्हा त्याने या शहराच्या रहिवाशांना धैर्यपूर्वक सांगितले की त्यांच्या मोठ्या अधर्माकडे देवाचे लक्ष गेले असून ४० दिवसांत त्यांच्या शहराचा नाश होणार आहे. (योना १:२; ३:४) योनाचा हा सुस्पष्ट संदेश ऐकल्यावर निनवेच्या रहिवाशांनी पश्‍चात्ताप केला आणि त्यांचे शहर नाश होण्यापासून वाचले.

११. योना एक उपयोगी धडा शिकला हे कशावरून दिसून येते?

११ अजूनही योनाचा दृष्टिकोन योग्य नव्हता. पण यहोवाने एका व्यावहारिक उदाहरणाच्या माध्यमाने अतिशय सहनशीलतेने योनाला हे समजून घेण्यास मदत केली की तो केवळ बाहेरचे स्वरूप पाहात नाही. तो अंतःकरणाचे परीक्षण करतो. (योना ४:५-११) या उदाहरणावरून योना एक उपयोगी धडा शिकला आणि हे आपल्याला त्यानेच लिहून ठेवलेल्या प्रांजळ अहवालावरून दिसून येते. आपल्याच लाजिरवाण्या चुकांविषयी योनाने सविस्तर लिहिले हा त्याच्या नम्रतेचा आणखी एक पुरावा आहे. चूक कबूल करायला निश्‍चितच धैर्य लागते!

१२. (अ) येशूचाही लोकांविषयी यहोवासारखाच दृष्टिकोन आहे हे आपल्याला कसे कळून येते? (ब) आपण ज्यांना सुवार्ता सांगतो त्या लोकांविषयी कशाप्रकारचा दृष्टिकोन ठेवण्याचे प्रोत्साहन आपल्याला दिले जाते? (पृष्ठ १८ वरील पेटी पाहा.)

१२ कित्येक शतकांनंतर येशू ख्रिस्ताने योनाच्या जीवनातील एका घटनेविषयी एक सकारात्मक विधान केले. त्याने म्हटले: “जसा योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.” (मत्तय १२:४०) योनाचे पुनरुत्थान झाल्यावर त्याला समजेल की त्याच्या जीवनातील अंधाऱ्‍या काळाची तुलना येशूने आपण कबरेत घालवलेल्या काळाशी केली होती. आपल्या सेवकांच्या हातून चुका झाल्या तरी त्यांच्याविषयी आशा न सोडणाऱ्‍या देवाची उपासना करण्यास आपल्याला खरोखर आनंद वाटत नाही का? स्तोत्रकर्त्याने लिहिले: “जसा बाप आपल्या मुलांवर ममता करितो, तसा परमेश्‍वर आपले भय धरणाऱ्‍यांवर ममता करितो. कारण तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.” (स्तोत्र १०३:१३, १४) पण हीच “माती”—ज्यात आज अपरिपूर्ण मानवांचा समावेश आहे ती देवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने बरेच काही साध्य करू शकते!

पेत्राविषयी संतुलित दृष्टिकोन

१३. पेत्राचे कोणते गुण कदाचित लगेच मनात येतील पण येशूने त्याला आपला प्रेषित म्हणून का निवडले?

१३ आता आपण थोडक्यात एक दुसरे उदाहरण विचारात घेऊ या. प्रेषित पेत्राचे. तुम्हाला पेत्राच्या व्यक्‍तिमत्त्वाचे वर्णन करण्यास सांगितले तर तुमच्या मनात लगेच उतावीळ किंवा गर्विष्ठ यांसारखी विशेषणे येतील का? काही वेळा पेत्राच्या वागण्यातून हे गुण दिसून आले हे कबूल आहे. पण पेत्र उतावीळ किंवा गर्विष्ठ असता तर येशूने त्याला १२ प्रेषितांपैकी एक म्हणून निवडले असते का? (लूक ६:१२-१४) निश्‍चितच नाही! येशूने या दुर्गुणांच्या पलीकडे जाऊन पेत्राचे चांगले गुण ताडले यात काहीच शंका नाही.

१४. (अ) पेत्राच्या स्पष्टवक्‍तेपणामागे काय कारण असावे? (ब) पेत्राला वारंवार प्रश्‍न विचारण्याची सवय होती याबद्दल आपण कृतज्ञ का असू शकतो?

१४ काही वेळा पेत्र स्वतःहूनच इतर प्रेषितांच्या वतीने बोलत असे. काहींना कदाचित हे गर्विष्ठपणाचे चिन्ह वाटू शकेल. पण खरोखरच असे आहे का? काहीजणांचे म्हणणे आहे की पेत्र कदाचित इतर प्रेषितांच्या तुलनेत वयाने मोठा असावा, कदाचित येशूपेक्षाही तो वयाने मोठा असावा. हे खरे असल्यास तो इतरांच्या आधी का बोलायचा याचे कारण समजण्यास मदत होऊ शकते. (मत्तय १६:२२) पण आणखी एक विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे. पेत्र आध्यात्मिक प्रवृत्तीचा होता. ज्ञान मिळवण्याच्या उत्सुकतेमुळे तो प्रश्‍न विचारण्यास प्रवृत्त होत असे. हे आपल्याकरता फायदेकारक ठरले आहे. पेत्राच्या प्रश्‍नांचे उत्तर देताना येशूने अनेक बहुमोल विधाने केली आहेत आणि ही विधाने बायबलमध्ये जतन करण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, पेत्राने केलेल्या एका विधानाला प्रतिसाद देताना येशूने ‘विश्‍वासू कारभाऱ्‍याविषयी’ सांगितले. (लूक १२:४१-४४) तसेच पेत्राचा हा प्रश्‍नही विचारात घ्या: “आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहो, तर आम्हाला काय मिळणार?” यावर येशूने एक प्रोत्साहनदायक अभिवचन दिले: “ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडिली आहेत त्याला अनेकपटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल.”—मत्तय १५:१५; १८:२१, २२; १९:२७-२९.

१५. पेत्र खरोखर एकनिष्ठ होता असे का म्हणता येईल?

१५ पेत्राचा आणखी एक उत्तम गुण म्हणजे तो एकनिष्ठ होता. येशूच्या बऱ्‍याच शिष्यांनी, त्याच्या शिकवणुकींपैकी एक न समजल्यामुळे त्याला अनुसरण्याचे सोडून दिले तेव्हा १२ प्रेषितांच्या भावना व्यक्‍त करण्याकरता पेत्राने पुढाकार घेतला व म्हटले: “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.” (योहान ६:६६-६८) हे शब्द ऐकून येशूला केवढा आनंद वाटला असेल! नंतर येशूला धरण्यास मोठा जमाव आला तेव्हा बहुतेक प्रेषितांनी तेथून पळ काढला. पण पेत्र काही अंतरावरून जमावाच्या मागे मागे चालत गेला आणि सरळ प्रमुख याजकाच्या वाड्यातील अंगणात त्याने प्रवेश केला. भित्रट नव्हे, तर धैर्यवान असल्यामुळेच तो तेथे गेला. येशूची उलटतपासणी चालली असताना पेत्र शेकोटीच्या प्रकाशात ऊब घेत बसलेल्या काही यहुद्यांजवळ गेला. प्रमुख याजकाच्या एका दासाने त्याला ओळखले आणि येशूसोबत असल्याचा आरोप त्याच्यावर लावला. होय, पेत्राने आपल्या स्वामीला नाकारले पण येशूप्रती एकनिष्ठता आणि काळजी असल्यामुळेच पेत्र त्या धोकेदायक परिस्थितीत आला होता हे आपण विसरता कामा नये; बहुतेक प्रेषितांनी त्याच्यासारखे धैर्य दाखवले नाही.—योहान १८:१५-२७.

१६. कोणत्या व्यावहारिक कारणामुळे आपण योना व पेत्र यांच्या चांगल्या गुणांविषयी विचार केला?

१६ पेत्राचे चांगले गुण त्याच्या दुर्गुणांपेक्षा बरेच वरचढ आहेत. हेच योनाच्या बाबतीतही आपण पाहिले. ज्याप्रकारे आपण योना व पेत्र यांच्याबद्दल नेहमीपेक्षा वेगळ्या व सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले त्याचप्रकारे आपल्या आजच्या आध्यात्मिक बंधू व भगिनींबद्दलही अधिक सकारात्मक दृष्टीने विचार करण्याची आपण स्वतःला सवय लावली पाहिजे. असे केल्यामुळे आपले त्यांच्यासोबतचे संबंध सुधारतील. हे अत्यंत आवश्‍यक का आहे?

आज हा धडा आचरणात आणणे

१७, १८. (अ) ख्रिस्ती बांधवांत मतभेद निर्माण होण्याची शक्यता का आहे? (ब) बायबलमधील कोणता सल्ला आपल्याला सह विश्‍वासू बांधवांसोबत झालेल्या समस्या सोडवण्यास मदत करू शकतो?

१७ आज सर्व प्रकारच्या आर्थिक, शैक्षणिक व वांशिक पार्श्‍वभूमीतून आलेले स्त्रीपुरुष व मुले एकजूटपणे यहोवाची सेवा करत आहेत. (प्रकटीकरण ७:९, १०) ख्रिस्ती मंडळीत आपण किती वेगवेगळ्या प्रकारची व्यक्‍तिमत्त्वे पाहतो! आणि आपण सर्वजण निकट सहवासात राहून देवाची सेवा करत असल्यामुळे साहजिकच वेळोवेळी आपल्यात खटके उडतील.—रोमकर १२:१०; फिलिप्पैकर २:३.

१८ आपल्या बांधवांच्या चुका आपल्याला दिसतील यात शंका नाही, पण आपण या चुकांवर आपले लक्ष केंद्रित करत नाही. तर, आपण यहोवाचे अनुकरण करण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. स्तोत्रकर्त्याने यहोवाबद्दल एका भजनात म्हटले: “हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?” (स्तोत्र १३०:३) आपल्याला एकमेकांपासून तोडू शकतील अशा गुणांविषयी सतत विचार करत बसण्याऐवजी “शांतीला व परस्परांच्या बुद्धीला पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या मागे आपण लागावे.” (रोमकर १४:१९) आपण इतरांकडे यहोवा जसे पाहतो तसे पाहण्याचा प्रयत्न करतो; अर्थात, आपण त्यांच्या दुर्गुणांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करतो. असे केल्यामुळे आपल्याला ‘एकमेकांचे सहन करण्यास’ मदत मिळते.—कलस्सैकर ३:१३.

१९. गंभीर मतभेद सोडवण्याकरता एक ख्रिस्ती व्यक्‍ती कोणती व्यावहारिक पावले उचलू शकते?

१९ पण काही गैरसमज कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्या मनाला अस्वस्थ करत असतील तर आपण काय करावे? (स्तोत्र ४:४) एखाद्या बांधवात व तुमच्यात अशाप्रकारचा गैरसमज निर्माण झाला आहे का? मग तुम्ही ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न का करत नाही? (उत्पत्ति ३२:१३-१५) सर्वप्रथम, यहोवाला प्रार्थना करा व त्याच्या मार्गदर्शनाकरता विनंती करा. मग, त्या व्यक्‍तीचे चांगले गुण मनात बाळगून, “ज्ञानजन्य लीनतेने” त्याच्याकडे जा. (याकोब ३:१३) तुम्हाला समेट करण्याची इच्छा असल्याचे त्या व्यक्‍तीला सांगा. बायबलमधील पुढील प्रेरित सल्ला नेहमी आठवणीत ठेवा: “प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा.” (याकोब १:१९) “रागास मंद” असण्याचा सल्ला असे सूचित करतो की एखादी व्यक्‍ती तुम्हाला राग येईल असे काहीतरी करण्याची किंवा बोलण्याची शक्यता आहे. असे घडल्यास, स्वतःवर नियंत्रण ठेवण्याकरता यहोवाची मदत मागा. (गलतीकर ५:२२, २३) आपल्या बांधवाला त्याचे म्हणणे काय आहे ते व्यक्‍त करू द्या आणि त्याचे लक्षपूर्वक ऐकून घ्या. त्याने बोललेल्या प्रत्येक गोष्टीशी तुम्ही सहमत नसला तरीसुद्धा, तो बोलत असताना मध्ये त्याला थांबवू नका. त्याचा दृष्टिकोन कदाचित चुकीचाही असू शकतो पण तरीसुद्धा सध्या तो त्याचा दृष्टिकोन आहे. तेव्हा त्याच्या दृष्टिकोनातून समस्येकडे पाहण्याचा प्रयत्न करा. यासाठी कदाचित तुम्हाला स्वतःकडे तुमच्या बांधवाच्या नजरेतूनही पाहावे लागू शकते.—नीतिसूत्रे १८:१७.

२०. मतभेद सोडवताना, आणखी कोणती पावले उचलल्यामुळे समेट घडून येण्याची शक्यता आहे?

२० तुमची बोलण्याची वेळ येते तेव्हा समंजसपणे बोला. (कलस्सैकर ४:६) या बांधवाचे कोणते गुण तुम्हाला आवडतात, हे त्याला सांगा. तुमच्यात झालेल्या मतभेदाला काही प्रमाणात तुम्ही जबाबदार असल्यास त्याबद्दल क्षमा मागा. तुमच्या या विनम्र प्रयत्नांमुळे समेट घडून आल्यास यहोवाचे आभार माना. पण असे न झाल्यास, यहोवाला मार्गदर्शनाकरता विनंती करत राहा आणि समेट करण्याकरता संधी शोधत राहा.—रोमकर १२:१८.

२१. यहोवा ज्याप्रकारे पाहतो त्याप्रकारे इतरांकडे पाहण्यास या चर्चेने तुमची कशाप्रकारे मदत केली आहे?

२१ यहोवाचे त्याच्या सर्व सेवकांवर प्रेम आहे. आपण अपरिपूर्ण असूनही तो त्याच्या सेवेकरता आपल्या सर्वांचा उपयोग करून घेऊ इच्छितो. इतरांविषयी त्याचा दृष्टिकोन आपण जितका अधिक चांगल्याप्रकारे समजून घेतो तितकेच आपल्या बांधवांप्रती आपले प्रेम वाढत जाईल. एखाद्या सह ख्रिस्ती बांधवाबद्दल आपल्या मनातले प्रेम काही कारणास्तव कमी झाले असले तरीसुद्धा ते पुन्हा जागृत करता येणे शक्य आहे. इतरांविषयी सकारात्मक दृष्टिकोन, अर्थात यहोवाचा दृष्टिकोन बाळगण्याचा आपण पूर्ण निर्धाराने प्रयत्न केल्यास आपल्याला कित्येक आशीर्वाद मिळतील!

[तळटीपा]

^ परि. 1 देखण्या अलियाबाजवळ इस्राएलचा सुयोग्य राजा होण्याकरता आवश्‍यक असलेले गुण नव्हते हे नंतर दिसून आले. पलिष्टी योद्धा गल्याथ याने इस्राएली लोकांना लढाईकरता ललकारले तेव्हा इस्राएलच्या इतर पुरुषांसोबत अलियाब देखील भयभीत झाला.—१ शमुवेल १७:११, २८-३०.

^ परि. 7 काही महत्त्वाच्या विजयांमुळे आणि भूतपूर्व क्षेत्र शत्रूंच्या हातून परत मिळवल्यामुळे अमाप निधी गोळा करण्यात आला आणि यामुळे यराबाम दुसरा याने उत्तर राज्याची संपत्ती द्विगुणित करण्यात बराच हातभार लावला.—२ शमुवेल ८:६; २ राजे १४:२३-२८; २ इतिहास ८:३, ४; आमोस ६:२.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• आपल्या विश्‍वासू सेवकांच्या चुकांबद्दल यहोवाचा कसा दृष्टिकोन आहे?

• योना व पेत्र यांच्या कोणत्या चांगल्या गुणांचे तुम्ही वर्णन करू शकता?

• आपल्या ख्रिस्ती बांधवांविषयी कशाप्रकारचा दृष्टिकोन बाळगण्याचा तुमचा निर्धार आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चौकट]

इतरांविषयी देवाचा कसा दृष्टिकोन असावा यावर विचार करा

योनाविषयीच्या बायबलमधील अहवालावर मनन करताना, तुम्ही ज्यांना सुवार्तेचा प्रचार करता अशा लोकांविषयी नव्याने विचार करण्याची गरज तुम्हाला जाणवली का? इस्राएल लोकांप्रमाणे ते आत्मसंतुष्ट अथवा बेपर्वा मनोवृत्तीचे असल्याचे कदाचित भासत असेल किंवा ते देवाच्या संदेशाच्या विरोधात असतील. तरीपण यहोवा देवाचा त्यांच्याविषयी कसा दृष्टिकोन आहे? योनाच्या प्रचारामुळे निनवेच्या राजाने ज्याप्रकारे पश्‍चात्ताप केला त्याचप्रमाणे या व्यवस्थीकरणातील काही उच्चपदस्थ लोक देखील भविष्यात कदाचित यहोवाकडे वळतील.—योना ३:६, ७.

[१५ पानांवरील चित्र]

यहोवा जसा पाहतो तसेच तुम्ही इतरांकडे पाहता का?

[१६, १७ पानांवरील चित्र]

योनाच्या अनुभवाविषयी येशूने सकारात्मक विवेचन केले