व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सुरवातीचे ख्रिस्ती आणि मोशेचे नियमशास्त्र

सुरवातीचे ख्रिस्ती आणि मोशेचे नियमशास्त्र

सुरवातीचे ख्रिस्ती आणि मोशेचे नियमशास्त्र

“नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहंचविणारे बालरक्षक होते.”—गलतीकर ३:२४.

१, २. मोशेच्या नियमशास्त्राचे विचारपूर्वक पालन करणाऱ्‍या इस्राएल लोकांना कोणते काही फायदे अनुभवायला मिळाले?

सा.यु.पू. १५१३ साली यहोवाने इस्राएल लोकांना एक कायदेसंहिता दिली. त्याने लोकांना सांगितले की त्यांनी त्याच्या वचनाचे पालन केल्यास तो त्यांना आशीर्वादित करेल आणि ते आनंदी व समाधानी जीवन उपभोगू शकतील.—निर्गम १९:५, ६.

ती कायदेसंहिता, जिला मोशेचे नियमशास्त्र अथवा केवळ “नियमशास्त्र” म्हणतात ती “पवित्र, यथान्याय व उत्तम” होती. (रोमकर ७:१२) तिने दयाळुपणा, प्रामाणिकता, नैतिकता आणि शेजारधर्म यांसारख्या सद्‌गुणांना उत्तेजन दिले. (निर्गम २३:४, ५; लेवीय १९:१४; अनुवाद १५:१३-१५; २२:१०, २२) नियमशास्त्राने यहुद्यांना एकमेकांवर प्रीती करण्यासही प्रवृत्त केले. (लेवीय १९:१८) शिवाय त्यांना नियमशास्त्र न मानणाऱ्‍या गैरयहुद्यांसोबत उठण्या-बसण्याची किंवा त्यांच्यातील स्त्रियांशी विवाह करण्याची परवानगी नव्हती. (अनुवाद ७:३, ४) यहुदी व विदेशी यांच्यात जणू “आडभिंत” असल्याप्रमाणे मोशेच्या नियमशास्त्राने देवाच्या लोकांना विदेशी विचारसरणी व प्रथा यांमुळे दूषित होण्यापासून राखले.—इफिसकर २:१४, १५; योहान १८:२८.

३. कोणीही नियमशास्त्राचे तंतोतंत पालन करण्यास समर्थ नसल्यामुळे काय परिणाम झाला?

पण सर्वात कर्तव्यदक्ष यहुदी देखील देवाच्या नियमशास्त्राचे तंतोतंत पालन करण्यास असमर्थ होता. यहोवा त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा करत होता का? नाही. इस्राएलांना नियमशास्त्र देण्याचे एक कारण हे होते की “मनुष्य किती दोषी ठरतो, हे मनुष्याला दाखवून द्यावे.” (गलतीकर ३:१९, सुबोध भाषांतर) नियमशास्त्राने प्रामाणिक यहुद्यांना याची जाणीव करून दिली की त्यांना सोडवणाऱ्‍याची गरज आहे. तो आला तेव्हा विश्‍वासू यहुद्यांनी आनंद व्यक्‍त केला. पाप व मृत्यूपासून त्यांची सुटका जवळ आली होती!—योहान १:२९.

४. नियमशास्त्र कोणत्या अर्थाने ‘ख्रिस्ताकडे पोहंचविणारे बालरक्षक’ ठरले?

मोशेचे नियमशास्त्र एक तात्पुरती व्यवस्था होती. सह ख्रिस्ती बांधवांना लिहिताना प्रेषित पौलाने नियमशास्त्राचे वर्णन “ख्रिस्ताकडे पोहंचविणारे बालरक्षक” असे केले. (गलतीकर ३:२४) प्राचीन काळात, बालरक्षक मुलांना शाळेत नेण्याचे व शाळेतून परत आणण्याचे काम करत असे. हा सहसा शिक्षक नसे; तर त्याचे काम केवळ मुलांना शिक्षकापर्यंत पोचवण्याचे होते. त्याचप्रकारे मोशेच्या नियमशास्त्राची रचना देवभीरू यहुद्यांना ख्रिस्तापर्यंत पोचवण्याची होती. येशूने अभिवचन दिले की तो “युगाच्या समाप्तीपर्यंत . . . सर्व दिवस” आपल्या अनुयायांसोबत राहील. (मत्तय २८:२०) एकदा ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाल्यानंतर ‘बालरक्षकाचा,’ अर्थात नियमशास्त्राचा काही उद्देश राहिला नाही. (रोमकर १०:४; गलतीकर ३:२५) पण काही यहुदी ख्रिश्‍चनांना हे महत्त्वाचे सत्य समजून घेणे कठीण जात होते. त्यामुळे येशूच्या पुनरुत्थानानंतरही ते नियमशास्त्राचे काही पैलू अनुसरत राहिले. इतरांनी मात्र, आपल्या विचारसरणीत फेरबदल केला. असे करण्याद्वारे, त्यांनी आज आपल्याकरता एक उत्तम आदर्श मांडला. कसा तो आता पाहूया.

ख्रिस्ती सिद्धान्तात चित्तवेधक प्रगती

५. पेत्राला एका दृष्टान्ताकरवी कोणती सूचना देण्यात आली आणि त्याला धक्का का बसला?

सा.यु. ३६ साली ख्रिस्ती प्रेषित पेत्र याला एक अतिशय विलक्षण दृष्टान्त झाला. त्या वेळी स्वर्गातील एका वाणीने त्याला नियमशास्त्रानुसार अशुद्ध समजले जाणारे पशूपक्षी मारून खाण्याची आज्ञा दिली. पेत्राला धक्का बसला! त्याने “निषिद्ध आणि अशुद्ध असे काही . . . कधीही खाल्ले” नव्हते. पण या वाणीने त्याला सांगितले: “देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको.” (प्रेषितांची कृत्ये १०:९-१५) ताठरपणे नियमशास्त्राला जडून राहण्याऐवजी पेत्राने आपला दृष्टिकोन बदलला. यामुळे त्याला देवाच्या उद्देशांविषयी एक विस्मयकारक नवीन गोष्ट समजली.

६, ७. आता विदेश्‍यांना प्रचार करणे योग्य आहे या निष्कर्षावर येण्यास पेत्राला कशामुळे मदत मिळाली, आणि त्याने कदाचित आणखी कोणते निष्कर्ष काढले असावेत?

घडले असे की कर्नेल्य नावाच्या एका सुंता न झालेल्या देवभीरू विदेशी पुरुषाकडे आपल्याबरोबर यावे असे सांगण्यास तीन पुरुष पेत्र ज्या घरात राहात होता तेथे आले. पेत्राने या पुरुषांना घरात निमंत्रित केले आणि त्यांचा पाहुणचार केला. आपल्याला झालेल्या दृष्टान्ताची अर्थसूचकता कळल्यानंतर दुसऱ्‍या दिवशी पेत्र कर्नेल्याच्या घरी गेला. तेथे पेत्राने येशू ख्रिस्ताविषयी सविस्तर साक्ष दिली. त्याप्रसंगी पेत्राने असे विधान केले: “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” केवळ कर्नेल्याने नव्हे तर त्याच्या नातलगांनी व जवळच्या मित्रांनीही येशूवर विश्‍वास ठेवला आणि “वचन ऐकणाऱ्‍या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला.” या घटनेमागे यहोवाचाच हात आहे हे ओळखून पेत्राने त्यांना ‘येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा व्हावा अशी आज्ञा केली.’—प्रेषितांची कृत्ये १०:१७-४८.

मोशेच्या नियमशास्त्राला अधीन न झालेले विदेशी आता येशू ख्रिस्ताचे अनुयायी बनू शकत होते या निष्कर्षावर पेत्र कसा येऊ शकला? आध्यात्मिक तारतम्यामुळे. देवाने सुंता न झालेल्या विदेश्‍यांवर आपला आत्मा ओतून त्यांच्याविषयी संमती दर्शवल्यामुळे पेत्राने ओळखले की त्यांना बाप्तिस्म्याकरता स्वीकारले जाऊ शकत होते. त्याच वेळी, पेत्राने हे देखील जाणले की बाप्तिस्मा घेण्याकरता एक अट म्हणून मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करण्याची अपेक्षा देव विदेशी ख्रिश्‍चनांकडून करत नाही. तुम्ही त्या काळात हयात असता तर तुम्ही पेत्राप्रमाणे आपल्या विचारसरणीत फेरबदल करण्यास तयार झाला असता का?

काहीजण ‘बालरक्षकाचे’ अनुसरण करीत राहिले

८. सुंतेविषयी पेत्राच्या दृष्टिकोनापेक्षा कोणत्या वेगळ्या दृष्टिकोनाला जेरूसलेममधील काही ख्रिश्‍चनांनी बढावा दिला आणि का?

कर्नेल्याचे घर सोडल्यानंतर पेत्र जेरूसलेमला गेला. सुंता न झालेल्या विदेश्‍यांनी “देवाचे वचन ग्रहण केले” ही बातमी तेथील मंडळीला कळली होती आणि बऱ्‍याच यहुदी शिष्यांना ही गोष्ट पटली नाही. (प्रेषितांची कृत्ये ११:१-३) विदेशी देखील येशूचे शिष्य बनू शकत होते हे कबूल केले तरीसुद्धा “सुंता झालेले लोक” अट्टाहास करू लागले की गैर यहुदी राष्ट्रांच्या लोकांनी तारण होण्याकरता नियमशास्त्राचे पालन केलेच पाहिजे. दुसरीकडे पाहता बहुतेक विदेशी लोक असलेल्या भागांत, जेथे फार कमी यहुदी होते, तेथे सुंतेचा प्रश्‍न फार मोठा वादविषय नव्हता. ही दोन वेगवेगळी मते जवळजवळ १३ वर्षे चालत राहिली. (१ करिंथकर १:१०) त्या सुरवातीच्या ख्रिश्‍चनांकरता, खासकरून यहुदी भागांत राहणाऱ्‍या विदेश्‍यांकरता ही केवढी मोठी परीक्षा ठरली असेल!

९. सुंतेचा प्रश्‍न कायमचा सोडवण्याची गरज का होती?

शेवटी, सा.यु. ४९ साली, जेथे पौल प्रचार करत होता, त्या सूरियातील अंत्युखिया येथे जेरूसलेममधील काही ख्रिस्ती आले तेव्हा हा वादविषय शिगेला पोचला. या लोकांनी असे शिकवण्यास सुरवात केली की मतपरिवर्तन केलेल्या विदेश्‍यांना नियमशास्त्रानुसार सुंता करून घ्यावी लागेल. यावरून त्यांच्यामध्ये आणि पौल व बर्णबा यांच्यात बराच वादविवाद झाला! हा प्रश्‍न अनुत्तरित राहिल्यास, एकतर यहुदी किंवा विदेशी पार्श्‍वभूमीच्या काही ख्रिश्‍चनांना हे निश्‍चितच अडखळण्याचे कारण बनले असते. त्यामुळे पौल व त्याच्यासोबत इतर काहीजणांनी ख्रिस्ती नियमन मंडळाला हा प्रश्‍न कायमचा सोडवण्याची विनंती करण्याकरता जेरूसलेमला जाण्याची व्यवस्था करण्यात आली.—प्रेषितांची कृत्ये १५:१, २, २४.

प्रामाणिक मतभेदानंतर एकता

१०. विदेश्‍यांबद्दल निर्णय घेण्याआधी नियमन मंडळाने कोणत्या काही मुद्द्‌यांवर विचार केला?

१० एका ऐतिहासिक सभेत काहींनी सुंता करण्याच्या पक्षात तर इतरांनी त्याच्या विरोधात मत व्यक्‍त केले. पण हा वादविवाद केवळ तीव्र भावनिक वाद नव्हता. बराच वादविवाद झाल्यानंतर, प्रेषित पेत्र व पौल यांनी सुंता न झालेल्या लोकांमध्येही यहोवाने घडवून आणलेल्या आश्‍चर्यकारक चिन्हांचे वर्णन केले. देवाने सुंता न झालेल्या विदेश्‍यांवरही पवित्र आत्मा ओतला असल्याचा खुलासा केला. एका अर्थाने त्यांनी असे विचारले: ‘ज्यांना देवाने कवटाळले आहे त्यांना ख्रिस्ती मंडळीने धिक्कारणे योग्य ठरेल का?’ मग शिष्य याकोबाने शास्त्रवचनातील एक असा उतारा वाचून दाखवला, ज्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना सदर विषयावर यहोवाची इच्छा समजून घेण्यास मदत झाली.—प्रेषितांची कृत्ये १५:४-१७.

११. सुंतेविषयी निर्णय घेताना कोणता मुद्दा समाविष्ट नव्हता आणि या निर्णयावर यहोवाचा आशीर्वाद होता हे कशावरून दिसून येते?

११ आता सर्वांच्या नजरा नियमन मंडळावर रोखलेल्या होत्या. त्यांच्या यहुदी पार्श्‍वभूमीमुळे ते सुंता करण्याच्या पक्षात निर्णय घेतील का? नाही. या विश्‍वासू पुरुषांचा शास्त्रवचनांचे व देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याचा निर्धार होता. समर्पक ग्वाही ऐकून घेतल्यानंतर नियमन मंडळाने एकजूटीने असा निर्णय घेतला की विदेशी ख्रिश्‍चनांना सुंता करण्याची किंवा मोशेच्या नियमशास्त्राला अधीन होण्याची गरज नव्हती. बांधवांना हा निर्णय कळला तेव्हा ते आनंदित झाले आणि मंडळ्यांची ‘संख्या दिवसेंदिवस वाढत गेली.’ ज्या ख्रिश्‍चनांनी सुस्पष्ट ईश्‍वरशासित निर्देशनाचे पालन केले त्यांना एका ठोस शास्त्रवचनीय उत्तराच्या रूपात आशीर्वाद मिळाला! (प्रेषितांची कृत्ये १५:१९-२३, २८, २९; १६:१-५) तरीपण आणखी एक महत्त्वाचा प्रश्‍न अद्याप अनुत्तरीत होता.

यहुदी ख्रिश्‍चनांविषयी काय?

१२. कोणता प्रश्‍न अद्याप अनुत्तरीत होता?

१२ नियमन मंडळाने स्पष्टपणे सूचित केले होते की विदेशी ख्रिश्‍चनांना सुंता करण्याची गरज नव्हती. पण यहुदी ख्रिश्‍चनांविषयी काय? नियमन मंडळाच्या निर्णयात या प्रश्‍नाच्या या विशिष्ट पैलूवर फारसा प्रकाश टाकण्यात आला नव्हता.

१३. तारणाकरता मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करणे अनिवार्य होते असा अट्टहास करणे का चुकीचे होते?

१३ काही यहुदी ख्रिस्ती, जे “नियमशास्त्राभिमानी” होते, त्यांनी आपल्या मुलांची सुंता करण्याचे आणि नियमशास्त्रातील काही गोष्टींचे पालन करण्याचे चालूच ठेवले. (प्रेषितांची कृत्ये २१:२०) इतरांनी एक पाऊल पुढे जाऊन असा अट्टहास धरला की तारणाकरता यहुदी ख्रिश्‍चनांना नियमशास्त्राचे पालन करणे अनिवार्य होते. पण ही त्यांची घोडचूक होती. उदाहरणार्थ, एक ख्रिस्ती पापांच्या क्षमेसाठी पशू बली कसा देऊ शकत होता? ख्रिस्ताच्या बलिदानाने अशा अर्पणांना आधीच अनावश्‍यक ठरवले होते. शिवाय, विदेश्‍यांसोबत यहूद्यांनी जवळीक करू नये या नियमशास्त्रातील आज्ञेविषयी काय? आवेशी ख्रिस्ती सुवार्तिकांना या बंधनांचे पालन करण्यासोबतच येशूने शिकवलेल्या सर्व गोष्टी विदेश्‍यांना शिकवण्याच्या येशूच्या आज्ञेचे पालन करणे फार कठीण गेले असेल. (मत्तय २८:१९, २०; प्रेषितांची कृत्ये १:८; १०:२८) * नियमन मंडळाच्या सभेत हा मुद्दा स्पष्ट करण्यात आल्याचा कोणताही पुरावा नाही. पण याचा अर्थ मंडळीला कोणतेच मार्गदर्शन पुरवण्यात आले नाही असा नाही.

१४. पौलाच्या प्रेरित पत्रांतून नियमशास्त्रासंबंधाने कोणते मार्गदर्शन देण्यात आले?

१४ मंडळीला मार्गदर्शन मिळाले, पण ते नियमन मंडळाच्या पत्राद्वारे नव्हे तर प्रेषितांनी लिहिलेल्या प्रेरित पत्रांच्या माध्यमातून देण्यात आले. उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने रोममध्ये राहणाऱ्‍या यहुदी व विदेश्‍यांना एक जोरदार संदेश पाठवला. त्यांना लिहिलेल्या पत्रात त्याने स्पष्ट केले की “जो अंतरी यहुदी तो [खरा] यहुदी होय आणि . . . आध्यात्मिकदृष्ट्या जी अंतःकरणाची व्हावयाची ती सुंता होय.” (रोमकर २:२८, २९) त्याच पत्रात, पौलाने एका दुष्टान्ताच्या आधाराने दाखवले की ख्रिस्ती आता नियमशास्त्राच्या अधीन नव्हते. त्याने असा तर्कवाद केला की एक स्त्री एकाच वेळी दोन पुरुषांशी विवाहबद्ध असू शकत नव्हती. पण तिच्या पतीचा मृत्यू झाल्यास ती पुनर्विवाह करण्यास मोकळी होती. मग या दृष्टान्ताचे व्यावहारिक महत्त्व दाखवून पौलाने सांगितले की अभिषिक्‍त ख्रिस्ती स्वतःला मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन ठेवून त्याच वेळी ख्रिस्ताचे होऊ शकत नव्हते. ख्रिस्तासोबत एक होण्याकरता त्यांनी “नियमशास्त्रासंबंधाने मृत” होणे आवश्‍यक होते.—रोमकर ७:१-५.

मुद्दा समजून घेण्यात धीमे

१५, १६. नियमशास्त्राविषयीचा मुद्दा काही यहुदी ख्रिश्‍चनांना का समजला नाही आणि आध्यात्मिकरित्या जागरूक राहण्याच्या गरजेसंबंधी यावरून काय दिसून येते?

१५ नियमशास्त्रासंबंधी पौलाचा तर्क निर्विवाद होता. तरीसुद्धा, काही यहुदी ख्रिश्‍चनांना हा मुद्दा का कळला नाही? एकतर त्यांच्याकडे आध्यात्मिक तारतम्य नव्हते. उदाहरणार्थ, ते ठोस आत्मिक अन्‍न ग्रहण करण्याकडे दुर्लक्ष करत होते. (इब्री लोकांस ५:११-१४) तसेच ते ख्रिस्ती सभांतही अनियमित होते. (इब्री लोकांस १०:२३-२५) काहींना हा मुद्दा न समजण्याचे आणखी एक कारण नियमशास्त्राच्या स्वरूपाशी संबंधित होते. नियमशास्त्र हे दिसणाऱ्‍या आणि स्पर्श करता येणाऱ्‍या वस्तूंवर केंद्रित होते, उदाहरणार्थ मंदिर व याजकगण. आध्यात्मिक प्रवृत्ती नसलेल्या व्यक्‍तीला, अदृश्‍य गोष्टींवर केंद्रित असलेल्या खिस्ती धर्मातील सखोल तत्त्वांचा अंगीकार करण्याऐवजी नियमशास्त्र स्वीकारणे अधिक सोपे होते.—२ करिंथकर ४:१८.

१६ काही तथाकथित ख्रिस्ती नियमशास्त्राचे पालन करण्यास इतके उत्सुक का होते याचे आणखी एक कारण पौलाने गलतीकरांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले. त्याने स्पष्ट केले की या माणसांना लोकांकडून आदराची अपेक्षा होती, एका प्रमुख धर्माचे अनुयायी म्हणून लोकांनी आपल्याकडे पाहावे अशी त्यांची इच्छा होती. चारचौघांत वेगळे दिसण्यापेक्षा सर्वांसारखेच आपण आहोत हे दाखवण्याकरता ते कोणत्याही थराला जाऊन हातमिळवणी करण्यास तयार होते. देवाची संमती मिळवण्यापेक्षा माणसांची संमती मिळवण्यास ते अधिक उत्सुक होते.—गलतीकर ६:१२.

१७. नियमशास्त्राचे पालन करण्यासंबंधीचा योग्य दृष्टिकोन केव्हा अगदी स्पष्ट झाला?

१७ आध्यात्मिक तारतम्य असलेल्या ख्रिश्‍चनांनी पौलाच्या व इतरांच्या देवप्रेरित लिखाणांचा काळजीपूर्वक अभ्यास केला होता आणि या आधारावर त्यांनी नियमशास्त्रासंबंधी अचूक निष्कर्ष काढले. पण मोशेच्या नियमशास्त्राविषयीचा योग्य दृष्टिकोन सर्व यहुदी ख्रिश्‍चनांना सा.यु. ७० सालापर्यंत स्पष्ट झाला नव्हता. त्या वर्षी देवाने जेरूसलेम, तेथील मंदिर आणि याजकगणासंबंधीचे अहवाल नाश होऊ दिले तेव्हा ही गोष्ट स्पष्ट झाली. यानंतर नियमशास्त्राच्या सर्व पैलूंचे पालन करणे आपोआपच अशक्य बनले.

आजच्या काळात या धड्याचे पालन करणे

१८, १९. (अ) आध्यात्मिकरित्या सुदृढ राहण्याकरता आपण कशाप्रकारची मनोवृत्ती अवलंबली पाहिजे आणि कशाप्रकारची मनोवृत्ती टाळली पाहिजे? (ब) जबाबदार बांधवांकडून मिळणाऱ्‍या निर्देशनाचे पालन करण्यासंबंधी पौलाचे उदाहरण आपल्याला काय शिकवते? (पृष्ठ २४ वरील पेटी पाहा.)

१८ बऱ्‍याच काळाआधी घडलेल्या या घटनांवर विचार केल्यानंतर कदाचित तुम्ही असा विचार करत असाल: ‘मी त्याकाळात जिवंत असतो तर देवाच्या इच्छेच्या प्रगतीशील प्रकटीकरणाला मी कसा प्रतिसाद दिला असता? मी ताठर वृत्तीने पारंपरिक विचारांना जडून राहिलो असतो का? की योग्य समज स्पष्ट होईपर्यंत मी धीर धरला असता? आणि ती स्पष्ट झाल्यावर मी मनापासून पाठिंबा दिला असता का?’

१९ अर्थात आपण त्या काळात असतो तर काय केले असते हे आता आपण खात्रीने सांगू शकत नाही. पण आपण स्वतःला विचारू शकतो: ‘बायबलच्या अर्थबोधासंबंधी स्पष्टीकरण दिले जाते तेव्हा मी कसा प्रतिसाद देतो? (मत्तय २४:४५) शास्त्रवचनांच्या आधारावर मार्गदर्शन दिले जाते तेव्हा मी त्याचे पालन करतो का, आणि केवळ लिखित नियमाचे काटेकोर पालन करण्याऐवजी त्या नियमांमागील भावना समजून घेऊन त्याचे पालन करतो का? (१ करिंथकर १४:२०) बऱ्‍याच काळापासून अनुत्तरीत असलेल्या एखाद्या प्रश्‍नाचे यहोवाकडून लवकर उत्तर मिळत नाही तेव्हा मी धीराने वाट पाहतो का?’ आपण कधीही ‘वाहवत जाऊ नये’ म्हणून आज उपलब्ध असलेल्या आत्मिक अन्‍नाचा चांगला उपयोग करून घेणे महत्त्वाचे आहे. (इब्री लोकांस २:१) यहोवा आपल्या वचनाच्या, आत्म्याच्या व पृथ्वीवरील आपल्या संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन पुरवतो तेव्हा आपण ते लक्षपूर्वक ऐकू या. असे केल्यास यहोवा आपल्याला आनंदी व समाधानी असे कधीही न संपणारे जीवन देऊन आशीर्वादित करेल.

[तळटीप]

^ परि. 13 पेत्राने सूरियातील अंत्युखियाला भेट दिली तेव्हा त्याने विदेशी ख्रिस्ती बांधवांच्या प्रेमळ सहवासाचा आनंद लुटला. पण जेव्हा जेरूसलेमवरून यहुदी ख्रिस्ती आले तेव्हा पेत्र “सुंता झालेल्या लोकांना भिऊन माघार घेऊन वेगळा राहू लागला.” आपल्या मनात ज्याच्याविषयी इतका आदर आहे तो प्रेषित आपल्या पंक्‍तीला बसण्यास नकार देतो हे पाहून त्या मतपरिवर्तन झालेल्या विदेश्‍यांना किती वाईट वाटले असेल याची आपण कल्पना करू शकतो.—गलतीकर २:११-१३.

तुम्ही कसा प्रतिसाद द्याल?

• मोशेचे नियमशास्त्र कोणत्या अर्थाने “ख्रिस्ताकडे पोहंचविणारे बालरक्षक” होते?

• सत्याविषयीच्या अर्थबोधात फेरबदल झाले तेव्हा पेत्राने व ‘सुंता झालेल्यांनी’ ज्याप्रकारे प्रतिसाद दिला त्याविषयी तुम्ही काय म्हणाल?

• यहोवा आज सत्य कशाप्रकारे प्रकट करतो याविषयी तुम्हाला काय शिकायला मिळाले आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२४ पानांवरील चौकट/चित्र]

पौल नम्रपणे एका परीक्षेला तोंड देतो

एका यशस्वी मिशनरी दौऱ्‍यानंतर सा.यु. ५६ साली पौल जेरूसलेममध्ये आला. तेथे त्याच्यावर एक परीक्षा येणार होती. नियमशास्त्र समाप्त झाल्याविषयी तो शिकवत असल्याची बातमी जेरूसलेमच्या मंडळीपर्यंत पोचली होती. वडीलजनांना भीती होती की नव्याने मतपरिवर्तन झालेले यहुदी ख्रिस्ती, नियमशास्त्राच्या विषयावर पौलाचा स्पष्टवक्‍तेपणा पाहून अडखळतील आणि ख्रिश्‍चनांना यहोवाच्या तरतुदींबद्दल आदर नसल्याचा निष्कर्ष काढतील. त्या मंडळीत चार यहुदी ख्रिस्ती होते ज्यांनी शपथ घेतली होती; ही कदाचित नासोरी शपथ असावी. ही शपथ पूर्ण करण्याकरता त्यांना मंदिरात जाणे भाग होते.

वडील जनांनी पौलाला या चार जणांसोबत मंदिरात जाण्यास आणि त्यांच्या खर्चाविषयी पाहण्यास सांगितले. पौलाने निदान दोन प्रेरित पत्रांत असा तर्कवाद केला होता की तारणाकरता नियमशास्त्राचे पालन करण्याची गरज नाही. पण त्याने इतरांच्या विवेकांची कदर केली. पूर्वी त्याने असे लिहिले होते: “नियमशास्त्राधीन लोक मिळविण्यासाठी मी . . . त्यांना नियमशास्त्राधीनासारखा झालो.” (१ करिंथकर ९:२०-२३) महत्त्वाच्या शास्त्रवचनीय सिद्धान्तांचा समावेश असल्यास कोणत्याही परिस्थितीत हातमिळवणी न करताही वडील जनांच्या सूचनेचे आपण पालन करू शकतो असे पौलाने ठरवले. (प्रेषितांची कृत्ये २१:१५-२६) त्याच्याकरता असे करणे चुकीचे नव्हते. शपथ वाहण्याच्या तरतुदीत शास्त्रवचनांनुसार चूक असे काही नव्हते आणि मंदिर हे मूर्तिपूजेकरता नव्हे तर खऱ्‍या उपासनेकरता वापरले गेले होते. त्यामुळे कोणालाही अडखळण्याचे कारण होऊ नये म्हणून पौल त्याला विनंती केल्यानुसार वागला. (१ करिंथकर ८:१३) याकरता त्याला बरीच नम्रता दाखवावी लागली असेल यात शंका नाही, आणि ही गोष्ट त्याच्याबद्दल आपला आदर अधिकच वाढवते.

[२२, २३ पानांवरील चित्र]

काही वर्षांपर्यंत ख्रिश्‍चनांमध्ये मोशेच्या नियमशास्त्राविषयी वेगवेगळी मते होती