व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“अराराट देशी” खऱ्‍या उपासनेला सर्वोच्च न्यायालयाची संमती

“अराराट देशी” खऱ्‍या उपासनेला सर्वोच्च न्यायालयाची संमती

“अराराट देशी” खऱ्‍या उपासनेला सर्वोच्च न्यायालयाची संमती

पिकलेले केस आणि तीन मुले असलेला एक अर्मेनियन पिता आपल्या राष्ट्राच्या सर्वोच्च न्यायालयासमोर उभा आहे. त्याचे आणि त्याच्या सह-उपासकांचे स्वातंत्र्य धोक्यात आहे. कोर्टात तो आपल्या विश्‍वासांची बायबलमधून ग्वाही देत आहे. त्या देशात, या सुनावणीमुळे खऱ्‍या उपासनेला महान विजय कसा प्राप्त झाला ते समजण्यासाठी आपण त्याआधीच्या घटना पाहू या.

अर्मेनिया हे तुर्कस्तानाच्या पूर्वेकडे आणि भव्य कॉकेशस पर्वतांच्या अगदी दक्षिणेला वसलेले आहे. येथील लोकसंख्या ३० लाखांहून अधिक आहे. या राष्ट्राची राजधानी, येरेवान, येथून अराराट पर्वताच्या दोन शिखरांचे श्‍वास रोखणारे दर्शन घडते. लोककथेनुसार, जागतिक जलप्रलयानंतर नोहाचे तारू या पर्वतावर येऊन टेकले होते.—उत्पत्ति ८:४. *

यहोवाचे साक्षीदार १९७५ सालापासून अर्मेनियात आपले ख्रिस्ती कार्य करत आहेत. १९९१ मध्ये, भूतपूर्व सोव्हिएत युनियनपासून अर्मेनियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, धार्मिक संघटनांची नोंद करण्यासाठी धार्मिक व्यवहारांचे राष्ट्रीय मंडळ स्थापण्यात आले. परंतु, या मंडळाने यहोवाच्या साक्षीदारांची नोंद करण्यासाठी वारंवार नकार दिला आहे. खासकरून ख्रिस्ती तटस्थतेच्या वादामुळे त्यांना नकार दिला गेला आहे. यामुळे, १९९१ पासून, अर्मेनियातील १०० हून अधिक तरुण साक्षीदारांना आरोपी ठरवून बहुतेक प्रसंगी त्यांना लष्करी सेवेसंबंधी त्यांच्या बायबल-आधारित भूमिकेमुळे तुरुंगात टाकण्यात आला आहे.

सदर मंडळाने सरकारी वकीलाला, ख्रिस्ती वडील आणि स्थानीय आण्विक शक्‍ती केंद्रामध्ये वकील म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्‍या ल्योव्हा मारकारीयान यांच्या धार्मिक कार्यांची तपासणी करण्याचीही विनंती केली. शेवटी, बंधू मारकारीयान यांना कलम २४४ खाली आरोपी ठरवण्यात आले; हा क्रूशचेव यांच्या काळात संमत करण्यात आलेल्या एका सोव्हिएत कायद्याचा अवशेष होता जो यहोवाच्या साक्षीदारांवर आणि इतर धार्मिक गटांवर बंदी घालून कालांतराने त्यांचा नायनाट करण्याच्या उद्देशाने बनवण्यात आला होता.

त्या कायद्यानुसार, जो गट धार्मिक विश्‍वासांचा प्रचार करण्याच्या नावाखाली ‘तरुणांना कायदेशीर नोंद नसलेल्या धर्माच्या धार्मिक सभांना जाण्यासाठी आकर्षित करतो’ आणि ‘आपल्या सदस्यांना सामाजिक कर्तव्ये पार पाडण्यापासून परावृत्त करतो’ तो धार्मिक गट बनवणे किंवा त्याचे नेतृत्व करणे हा गुन्हा होता. हा दावा सिद्ध करण्यासाठी, सरकारी वकीलाने, मेटसामोर शहरात बंधू मारकारीयान चालवत असलेल्या सभांना लहान मुले देखील जातात यावर अधिक भर दिला. सरकारी वकीलाने असाही आरोप केला की, बंधू मारकारीयान यांनी त्यांच्या मंडळीतल्या तरुणांना लष्करी सेवा नाकारायला बळजबरी केली होती.

चौकशी सुरू

शुक्रवारी, जुलै २०, २००१ रोजी आमाव्हीरच्या जिल्हा कोर्टात न्यायमूर्ती मॅन्वेल सिमोनयान यांच्या पाहणीखाली ही चौकशी सुरू झाली. ती ऑगस्ट महिन्यापर्यंत चालू राहिली. सरकारी साक्षीदारांनी आपल्या साक्षीत नंतर हे कबूल केले की, राष्ट्रीय सुरक्षा मंत्रालयाच्या सदस्यांनी (भूतपूर्व केजीबी) बंधू मारकारीयान यांच्या विरोधात काय लिहायचे ते त्यांना सांगून त्यावर सही करायला जबरदस्ती केली होती. एका स्त्रीने कबूल केले की, एका विशिष्ट सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकाऱ्‍याने तिला “यहोवाचे साक्षीदार आपल्या सरकाराच्या आणि आपल्या धर्माच्या विरोधात आहेत” असे आरोप करायला सांगितले होते. त्या स्त्रीने नंतर कबूल केले की, यहोवाचा साक्षीदार असलेल्या कोणाही व्यक्‍तीला ती स्वतःहून ओळखत नव्हती तर तिने केवळ त्यांच्याविरुद्ध राष्ट्रीय टीव्हीवर आरोप केलेले ऐकले होते.

बंधू मारकारीयान यांना बोलायला मिळाले तेव्हा त्यांनी सांगितले की, यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांमध्ये येणारी लहान मुले आपल्या आईवडिलांच्या परवानगीने तेथे येतात. त्यांनी हे देखील सांगितले की, लष्करी सेवा हा प्रत्येकाचा व्यक्‍तिगत निर्णय आहे. सरकारी वकीलांची उलट तपासणी अनेक दिवस चालली. बंधू मारकारीयान यांनी शांतपणे आपल्या विश्‍वासांबद्दलच्या प्रश्‍नांची उत्तरे बायबलमधून दिली आणि सरकारी वकील ती शास्त्रवचने आपल्या स्वतःच्या बायबलमधून पडताळून पाहत होते.

सप्टेंबर १८, २००१ रोजी, न्यायाधीशांनी मारकारीयान यांना “निर्दोष” जाहीर केले आणि म्हटले की, त्यांच्या कार्यात “गुन्ह्याचा कसलाही अंश नव्हता.” असोसिएटेड प्रेस यात या प्रकरणाचा खुलासा देणारे वृत्त छापण्यात आले. त्यात असे लिहिले होते: “अर्मेनियात यहोवाच्या साक्षीदारांच्या एका पुढाऱ्‍याला धर्मांतर केल्याच्या आणि तरुणांना लष्करी सेवा चुकवण्यासाठी बळजबरी केल्याच्या आरोपातून मुक्‍त करण्यात आले. दोन महिन्यांच्या चौकशीनंतर, कोर्टात जाहीर केले की, पुढारी ल्योव्हा मारकारीयान यांच्या विरोधात पुरेसा पुरावा नव्हता. त्यांना पाच वर्षांचा तुरुंगवास झाला असता. . . . अर्मेनियाच्या संविधानात धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले असले तरी नवीन गटांना नोंदणी करणे कठीण आहे आणि संविधानाचे कायदे सहसा अर्मेनियन अपॉस्टोलिक चर्चची बाजू घेतात.” सप्टेंबर १८, २००१ तारखेच्या प्रसारमाध्यमांकरता तयार केलेल्या आपल्या पत्रकात युरोपमध्ये सुरक्षा आणि सहकार्य संघटनेने (ओएससीई) म्हटले: “निकालाबद्दल आनंद वाटत असला तरी खटला सुरू करण्यात आला याचा ओएससीईच्या कार्यालयाला अधिक पस्तावा वाटतो.”

खटला चालू

परंतु, सरकारी वकीलांनी अपील केले आणि अपील चौकशीला आणखी चार महिने लागले. चौकशीच्या सुरवातीला, बंधू मारकारीयान यांची साक्ष देण्याची वेळ आली तेव्हा न्यायपीठातील आणखी एका न्यायधीशांनी त्यांना पहिला प्रश्‍न विचारला. बंधू मारकारीयान यांनी उत्तर द्यायला सुरवात केली तेव्हा अध्यक्षांनी त्यांना मध्येच थांबवून त्यांना प्रश्‍न विचारला. त्यानंतर, मात्र त्यांनी बंधू मारकारीयान यांना एकाही प्रश्‍नाचे उत्तर पूर्णपणे देऊ दिले नाही. शिवाय, बचाव पक्षाने त्यांना विचारलेले बहुतेक प्रश्‍न देखील त्यांनी कोणतीही कारणे न देता वगळले. चौकशीदरम्यान, कोर्टात जमलेले साक्षीदार विरोधी धर्मवेडे लोक, बंधू मारकारीयान यांना शिवीगाळ करत होते. हे सत्र संपल्यावर चौकशीसंबंधी अनेक खोटे आणि विपर्यस्त अहवाल टीव्हीवर प्रक्षेपित करण्यात आले; जसे की, बंधू मारकारीयान यांनी आपला दोष कबूल केला असे सांगण्यात आले.

निम्मी चौकशी झाल्यावर, तीन न्यायाधीशांच्या न्यायपीठाच्या अध्यक्षांनी धार्मिक व्यवहारांच्या राष्ट्रीय मंडळातर्फे एक पत्र सादर केले ज्यात बंधू मारकारीयान यांच्या विरुद्ध सरकारी वकीलांच्या कार्यालयाने काही पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली होती; यामुळे प्रेक्षकांना आश्‍चर्य वाटले. चौकशीसाठी आलेल्या आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना याचा धक्का बसला कारण युरोपच्या मंडळाला सदस्यत्वासाठी केलेल्या अर्जात अर्मेनियाने असे कबूल केले होते की, “सर्व चर्चेसना किंवा धार्मिक समाजांना, खासकरून ‘अपारंपरिक’ म्हटल्या जाणाऱ्‍या समाजांना दुजाभाव न दाखवता आपला धर्म पाळायला दिला जाईल याची खात्री” करण्याची आपली जबाबदारी आहे.

पुढील काही आठवड्यांमध्ये चौकशी चालू असताना, वातावरण अधिक तंग झाले. विरोधक साक्षीदारांना त्रास देऊ लागले आणि कोर्टात किंवा कोर्टाबाहेर त्यांच्यावर हल्ला करू लागले. साक्षीदार स्त्रियांना पायांच्या नडगीवर लाथा मारल्या जात होत्या. एका साक्षीदारावर हल्ला करण्यात आला आणि त्याने विरोधात काहीच केले नाही तेव्हा मागून त्याच्या पाठीच्या कण्यावर प्रहार करण्यात आला ज्यामुळे त्याला दवाखान्यात न्यावे लागले.

दरम्यान, या प्रकरणासाठी अध्यक्षपदावर एका नवीन न्यायाधीशांना नेमण्यात आले. श्रोत्यांमधील काहींनी बचाव पक्षाच्या वकीलाला धमकावण्याचा प्रयत्न केला तरी या नवीन अध्यक्षांनी स्थिती नियंत्रणात ठेवली; इतकेच नव्हे तर, कोर्टात एक स्त्री बचाव पक्षाच्या वकीलाला ओरडून धमक्या देऊ लागली तेव्हा त्यांनी पोलिसांना तिला कोर्टाबाहेर नेण्याचा आदेश दिला.

अर्मेनियाच्या सर्वोच्च न्यायालयात

शेवटी, मार्च ७, २००२ रोजी अपील कोर्टाने चौकशी कोर्टाचा निकाल योग्य ठरवला. निकाल सुनावण्याच्या आदल्या दिवशी एक विलक्षण गोष्ट घडली आणि ती म्हणजे, धार्मिक व्यवहारांचे राष्ट्रीय मंडळ बरखास्त करण्यात आले. पुन्हा एकदा, सरकारी वकीलांच्या कार्यालयाने अपील केले; या वेळी अर्मेनियाच्या सर्वोच्च न्यायालयात—कॅसेशन कोर्टात—हे अपील करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने “दोषी असल्याचा निकाल देण्यासाठी” पुन्हा चौकशीसाठी खटला परत करावा अशी मागणी सरकारी वकीलांनी केली.

एप्रिल १९, २००२ रोजी, न्यायमूर्ती महेर खाचाट्रायान यांच्या अध्यक्षपदाखाली सकाळी ११ वाजता सहा न्यायाधीशांच्या न्यायपीठाने प्रकरणास सुरवात केली. आपल्या सुरवातीच्या विधानात, एका सरकारी वकीलाने, बंधू मारकारीयान यांना दोषी ठरवण्यात आधीचे दोन कोर्ट अपयशी ठरले याबद्दल आपण संतप्त आहोत असे म्हटले. या वेळी मात्र, सरकारी वकीलाला मध्ये थांबवण्यात आले आणि चार न्यायमूर्तींनी त्यांना एकमागोमाग एक प्रश्‍न केले. एका न्यायमूर्तीने, बंधू मारकारीयान यांच्या विरुद्ध प्रचार कार्य आणि यहोवाच्या साक्षीदारांची नोंदणी नसणे—कलम २४४ नुसार यांपैकी कोणताही गुन्हा नव्हता—या गोष्टी सादर करून कोर्टात पूर्वग्रह निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सरकारी वकीलाला खडसावले. नंतर न्यायाधीशांनी म्हटले की, सरकारी वकीलांनी, “गुन्ह्याचा आरोप लावून छळ” केला आहे. आणखी एका न्यायमूर्तींनी युरोपातील विविध प्रकरणांचा उल्लेख करत म्हटले की, त्यांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांना “ज्ञात धर्म” म्हणून मान्य करण्यात आले होते व मानवी हक्कांच्या युरोपियन ठरावानुसार संरक्षण मिळण्यास पात्र ठरवण्यात आले होते. या वेळी, कोर्टात एक पाळक जोरात ओरडून म्हणाले की, यहोवाचे साक्षीदार राष्ट्रामध्ये फूट पाडत होते. कोर्टाने त्यांना शांत राहण्याचा आदेश दिला.

मग न्यायमूर्तींनी प्रेक्षकांमधून ल्योव्हा मारकारीयान यांना समोर बोलावले—या सर्वोच्च न्यायालयात असे पहिल्यांदा घडले. बंधू मारकारीयान यांनी विविध विषयांवर यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिस्ती भूमिकेविषयी उत्तम साक्ष दिली. (मार्क १३:९) संक्षिप्त चर्चेनंतर, कोर्ट परतले आणि त्यांनी सर्वसंमतीने “निर्दोष” हा निकाल योग्य ठरवला. बंधू मारकारीयान यांनी सुटेकचा निःश्‍वास सोडला. आपल्या लिखित निर्णयात, कोर्टाने म्हटले: “[ल्योव्हा मारकारीयान] यांचे कार्य सध्याच्या कायद्यानुसार गुन्हा मानला जात नाही, आणि अशाप्रकारचा आरोप अर्मेनियन संविधानाच्या कलम २३ आणि युरोपियन ठरावाच्या कलम ९ च्या विरोधात ठरतो.”

निर्णयाचे परिणाम

सरकारी वकील विजयी ठरले असते, तर सबंध अर्मेनियातील मंडळ्यांमधील इतर साक्षीदार वडिलांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी मार्ग मोकळा झाला असता. पण कोर्टाकडून मिळालेल्या स्पष्ट निर्णयामुळे असा छळ होणार नाही अशी आशा आहे. अनुकूल निकाल मिळाला नसता तर यहोवाच्या साक्षीदारांच्या नोंदणीला वारंवार नकार देण्यास निमित्त मिळाले असते. पण, कोर्टाने हे खोटे कारण काढून टाकले ते बरे झाले.

या देशातील ७,००० हून अधिक यहोवाच्या साक्षीदारांची कायदेशीर नोंदणी संमत केली जाईल की नाही हे वेळच दाखवेल. दरम्यान, “अराराट देशी” खरी उपासना अद्याप जिवंत आहे आणि तिची भरभराट होत आहे.

[तळटीप]

^ परि. 3 या एका कारणासाठी अर्मेनियन लोक आपल्या देशाचा संबंध अराराट पर्वताशी जोडतात. प्राचीन काळी, अर्मेनियाचे राज्य फार मोठे होते आणि त्यात या पर्वतांचा समावेश होत असे. यास्तव, बायबलच्या ग्रीक सेप्ट्यूजिंट अनुवादात यशया ३७:३८ येथे “अराराट देशी” या संज्ञेकरता “अर्मेनिया” असे म्हटले आहे. सध्या अराराट पर्वत, तुर्कस्तानात त्याच्या पूर्व सीमेवर आहे.

[१२ पानांवरील चित्र]

चौकशीच्या वेळी ल्योव्हा मारकारीयान

[१३ पानांवरील चित्र]

बंधू मारकारीयान आणि त्यांचे कुटुंब