व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला हार्दिक आमंत्रण

तुम्हाला हार्दिक आमंत्रण

तुम्हाला हार्दिक आमंत्रण

प्रभू येशूने सुमारे २,००० वर्षांपूर्वी स्थापित केलेले शेवटले भोजन, केवळ एक ऐतिहासिक घटना नाही. या घटनेचा प्रारंभ झाल्यापासूनच लोकांवर तिचा जबरदस्त प्रभाव पडला आहे. शेवटल्या भोजनाच्या रात्री काय घडले त्याचा शुभवर्तमान अहवालांतला वृत्तान्त वाचून प्रभावित झाल्यामुळे अनेक लोकांनी प्रभूचे भोजन विविध मार्गांनी साजरे करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रभू भोजनाबद्दल लोकांना असलेली आवड समजण्याजोगी आहे, कारण स्वतः येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना हा प्रसंग साजरा करण्याची आणि तो नियमाने साजरा करण्याची आज्ञा दिली. त्याने त्यांना असे स्पष्टपणे सांगितले: “माझ्या स्मरणार्थ हे करीत राहा.”—लूक २२:१९, NW; १ करिंथकर ११:२३-२५.

अर्थातच, या प्रसंगाचा खरोखर फायदा व्हायचा असेल, तर आधी देवाचे वचन बायबल यांत सांगितल्याप्रमाणे या घटनेच्या अर्थाची अचूक समज प्राप्त केली पाहिजे. शिवाय, हा प्रसंग केव्हा आणि कसा साजरा केला पाहिजे त्याविषयी बायबल काय म्हणते हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन करून संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार एप्रिल १६, २००३, रोजी, बुधवारी सायंकाळी येशूच्या मृत्यूचा स्मारक विधी साजरा करण्यासाठी एकत्र जमतील. याप्रसंगी ते शास्त्रवचनांचे परीक्षण करतील; तसेच “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे,” असे ज्याने म्हटले त्या प्रभू येशूवरील त्यांचा विश्‍वास व त्याच्यावरचे त्यांचे प्रेम अधिक गहिरे बनवण्याचा ते प्रयत्न करतील. (योहान ३:१६) त्या सायंकाळी तुम्हीही त्यांच्याबरोबर उपस्थित राहावे म्हणून तुम्हाला हार्दिक आमंत्रण दिले जात आहे जेणेकरून तुम्हाला देखील येशू ख्रिस्त आणि स्वर्गीय पिता, यहोवा देव, यांच्यावरील तुमचा विश्‍वास आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला असलेले प्रेम अधिक वाढवता येईल.