व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रभूच्या भोजनाचे तुमच्याकरता फार महत्त्व आहे

प्रभूच्या भोजनाचे तुमच्याकरता फार महत्त्व आहे

प्रभूच्या भोजनाचे तुमच्याकरता फार महत्त्व आहे

प्रभूच्या भोजनाचे तुमच्याकरता महत्त्व आणि भविष्याकरता काही अर्थ आहे का? हे पाहण्यासाठी सर्वप्रथम येशू ख्रिस्ताने स्वतः या खास प्रसंगाला किती महत्त्व दिले ते आपण पाहू या.

सा.यु. ३३ साली निसान १४ च्या सायंकाळी येशू आपल्या १२ प्रेषितांसोबत वार्षिक वल्हांडणाचा सण साजरा करण्यासाठी जेरूसलेममध्ये एका माडीवरील खोलीत होता. वल्हांडणाचे भोजन संपल्यावर गद्दार यहूदा, येशूला धरून देण्याकरता खोलीतून बाहेर गेला. (योहान १३:२१, २६-३०) मग, राहिलेल्या ११ प्रेषितांसोबत येशूने ‘प्रभुभोजनाची’ सुरवात केली. (१ करिंथकर ११:२०) याला स्मारक असेही म्हटले जाते कारण येशूने आपल्या अनुयायांना आज्ञा दिली: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” या एकमेव घटनेचे स्मरण करण्यासाठी ख्रिश्‍चनांना आज्ञा देण्यात आली आहे.—१ करिंथकर ११:२४.

एका शब्दकोशानुसार, स्मारक याचा अर्थ, “आठवण करून देणारे” किंवा “स्मृती कायम राहावी म्हणून केलेले कार्य” असा आहे. अनेक ठिकाणी, एखाद्या व्यक्‍तीची किंवा महत्त्वपूर्ण प्रसंगाची आठवण करण्यासाठी किंवा स्मरण करण्यासाठी पुतळ्याच्या किंवा इमारतीच्या स्वरूपात स्मारक बांधले जाते अथवा एक खास दिवस त्यासाठी राखला जातो. या प्रसंगी, येशूने एक स्मरण भोजन सुरू केले; या भोजनाद्वारे त्या अविस्मरणीय दिवसाच्या अति महत्त्वपूर्ण घटनांची स्मृती कायम राहण्यासाठी त्याच्या शिष्यांना मदत होणार होती. भावी पिढ्यांमध्ये, या स्मारक भोजनाद्वारे येशूने त्या रात्री काय केले त्याचा आणि विशेषकरून त्याने वापरलेल्या बोधचिन्हांच्या गहन अर्थाची लोकांना आठवण करून दिली जाणार होती. येशूने कोणती बोधचिन्हे वापरली आणि त्यांचा काय अर्थ होतो? सा.यु. ३३ सालाच्या त्या रात्री घडलेल्या प्रसंगाचा बायबलमधील अहवाल आपण पडताळून पाहू या.

पवित्र बोधचिन्हे

“मग त्याने भाकरी घेऊन व उपकारस्तुति करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे; ते तुम्हांसाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.”—लूक २२:१९.

येशूने भाकर घेऊन “हे माझे शरीर आहे” असे म्हटले तेव्हा ती बेखमीर भाकरी, त्याने “जगाच्या जीवनासाठी” दिलेल्या स्वतःच्या पापरहित शारीरिक देहाचे सूचक किंवा बोधचिन्ह असल्याचे तो सुचवत होता. (योहान ६:५१) मराठी बायबलमध्ये, “हे माझे शरीर आहे [ग्रीक, एस्टीन]” असे म्हटले असले तरी थेयर यांच्या ग्रीक-लेक्सिकन ऑफ द न्यू टेस्टमेंटनुसार या क्रियापदाचा अर्थ सहसा “लक्षण असणे, चिन्ह असणे, सूचित करणे” असा होतो. त्यातून, प्रतिनिधीत्व करण्याचा किंवा संकेत असण्याचा अर्थ ध्वनित होतो.—मत्तय २६:२६.

हेच द्राक्षारसाच्या प्याल्याविषयी देखील खरे होते. येशूने म्हटले: “हा प्याला माझ्या रक्‍तांत नवा करार आहे ते रक्‍त तुम्हांसाठी ओतिले जात आहे.”—लूक २२:२०.

मत्तयाच्या अहवालात येशूने प्याल्याविषयी म्हटले: “हे माझे [नव्या] कराराचे रक्‍त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे.” (मत्तय २६:२८) येशू प्याल्यातील द्राक्षारसाचा उपयोग स्वतःच्या रक्‍ताचे प्रतिनिधीत्व किंवा खूण म्हणून करत होता. त्याचे सांडलेले रक्‍त, आत्म्याने अभिषिक्‍त झालेल्या शिष्यांकरता—जे त्याच्यासोबत स्वर्गामध्ये राजे आणि याजक म्हणून राज्य करणार होते—‘नव्या कराराचा’ आधार असणार होते.—यिर्मया ३१:३१-३३; योहान १४:२, ३; २ करिंथकर ५:५; प्रकटीकरण १:५, ६; ५:९, १०; २०:४, ६.

प्याल्यातील द्राक्षारस याचीही आठवण करून देतो की, येशूच्या सांडलेल्या रक्‍ताच्या आधारे “पापांची क्षमा” होते आणि अशाप्रकारे त्यात सहभाग घेणाऱ्‍यांना ख्रिस्तासोबत सहवारस या नात्याने स्वर्गीय जीवनाचे पाचारण मिळण्याकरता मार्ग मोकळा होतो. त्यामुळे, स्वर्गीय पाचारण मिळालेले लोकच केवळ (मर्यादित संख्या असलेले) स्मारक विधीत भाकरी आणि द्राक्षारसाचे सेवन करतात हे समजण्याजोगे आहे.—लूक १२:३२; इफिसकर १:१३, १४; इब्री लोकांस ९:२२; १ पेत्र १:३, ४.

परंतु, येशूचे सर्व अनुयायी जे नव्या करारात नाहीत त्यांच्याविषयी काय? ही प्रभूची “दुसरी मेंढरे” आहेत, आणि ते ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्याची आशा बाळगत नाहीत तर परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवन उपभोगण्याची आशा बाळगतात. (योहान १०:१६; लूक २३:४३; प्रकटीकरण २१:३, ४) ‘अहोरात्र देवाची सेवा करणाऱ्‍या’ विश्‍वासू ख्रिश्‍चनांचा “मोठा लोकसमुदाय” या नात्याने ते प्रभूच्या भोजनात कृतज्ञतापूर्वक प्रेक्षक असण्यात आनंद मानतात. आपल्या शब्दांतून आणि कृतींतून ते जणू असे म्हणत असतात: “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्‍याकडून, तारण आहे.”—प्रकटीकरण ७:९, १०, १४, १५.

किती वेळा?

“माझ्या स्मरणार्थ हे करा.”—लूक २२:१९.

ख्रिस्ताच्या मृत्यूची आठवण कायम ठेवण्यासाठी स्मारक विधी किती वेळा पाळला पाहिजे? येशूने याचे नेमके उत्तर दिले नाही. तथापि, त्याने निसान १४ रोजी, वल्हांडणाच्या संध्याकाळी—जो सण इस्राएली लोक वर्षातून एकदा पाळत होते—प्रभूच्या सांजभोजनाची सुरवात केल्यामुळे स्मारक विधी देखील याच पद्धतीने साजरा केला जावा अशी येशूची इच्छा होती हे स्पष्ट होते. इस्राएली लोक ईजिप्तमधून सुटका मिळाल्याचा प्रसंग वर्षातून एकदा साजरा करत होते त्याचप्रमाणे ख्रिश्‍चन लोक पाप आणि मृत्यूच्या दास्यातून सुटका मिळाल्याचा प्रसंग वर्षातून एकदा साजरा करतात.—निर्गम १२:११, १७; रोमकर ५:२०, २१.

एखादा महत्त्वपूर्ण प्रसंग वर्षातून एकदा साजरा करण्याची कल्पना काही नवीन नाही. एखादे जोडपे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस पाळतात किंवा एखादे राष्ट्र आपल्या इतिहासातील महत्त्वाचा प्रसंग साजरा करते याचे उदाहरण घ्या. सहसा एखादा महत्त्वाचा प्रसंग वर्षातून एकदा त्याच्या वाढदिवशी साजरा केला जातो. ख्रिस्त येऊन गेल्यावर अनेक शतकांपर्यंत तथाकथित ख्रिश्‍चनांना क्वॉर्टोडेसिमन्स अर्थात “चौदावा दिवस पाळणारे” या नावाने ओळखले जात होते कारण ते वर्षातून एकदा, निसान १४ रोजी येशूच्या मृत्यूचा दिवस साजरा करत होते.

साधा परंतु अत्यंत महत्त्वाचा

प्रेषित पौलाने म्हटले की, प्रभूचे भोजन साजरे केल्याने येशूच्या शिष्यांना ‘प्रभूच्या मरणाची घोषणा करत’ राहण्यास मदत मिळेल. (१ करिंथकर ११:२६) यास्तव, हा सण, येशूने प्राण देऊन देवाच्या उद्देशात बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर जोर देतो.

मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहून येशू ख्रिस्ताने यहोवा देवाचे प्रेमळ निर्माणकर्ता आणि नीतिमान सार्वभौम म्हणून समर्थन केले. सैतानाच्या दाव्यांच्या विरोधात, व आदामासारखे न बनता येशूने हे सिद्ध केले की, मानव तीव्र दबावांखालीही देवाला विश्‍वासू राहू शकतो.—ईयोब २:४, ५.

प्रभूच्या भोजनाद्वारे येशूच्या आत्म-त्यागी प्रेमाचीही कृतज्ञपूर्वक आठवण कायम ठेवली जाते. अवघड परीक्षेतही येशूने आपल्या पित्याला परिपूर्ण अधीनता दाखवली. अशाप्रकारे, स्वतःचे परिपूर्ण मानवी जीवन देऊन तो आदामाच्या पापाची मोठी किंमत चुकवू शकला. येशूने स्वतः स्पष्ट केल्याप्रमाणे, तो “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला.” (मत्तय २०:२८) परिणामतः, येशूवर विश्‍वास प्रदर्शित करणारे सर्वजण पापांची क्षमा प्राप्त करू शकतात आणि मानवजातीकरता असलेल्या यहोवाच्या मूळ उद्देशानुरूप सार्वकालिक जीवन मिळवू शकतात.—रोमकर ५:६, ८, १२, १८, १९; ६:२३; १ तीमथ्य २:५, ६. *

या सर्वातून, यहोवाने मानवजातीच्या तारणाकरता तरतूद करून विपुल चांगुलपणा आणि अपात्र कृपा दर्शवल्याचे दिसून येते. बायबल म्हणते: “देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले आहे, ह्‍यासाठी की, त्याच्या द्वारे आपणांस जीवन प्राप्त व्हावे, ह्‍यावरून देवाची आपल्यावरील प्रीति प्रगट झाली. प्रीति म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीति केली असे नाही, तर त्याने तुम्हांआम्हांवर प्रीति केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्‍चित व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले.”—१ योहान ४:९, १०.

होय, स्मारक विधीचा हा सण किती विलक्षण आहे! तो विविध परिस्थितींमध्ये साजरा करण्यासारखा साधा आणि व्यावहारिक सण असला तरी लाक्षणिक अर्थामुळे तो दीर्घकाळापर्यंत अर्थपूर्ण राहिलेला स्मारक आहे.

तुमच्याकरता त्याचा अर्थ

आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानरूपी मृत्यूची त्याला आणि त्याचा पिता, यहोवा या दोघांना मोठी किंमत द्यावी लागली. परिपूर्ण मनुष्य या नात्याने येशूला आपल्यासारखा वारशाने मिळालेल्या मृत्यूचा अनुभव येणार नव्हता. (रोमकर ५:१२; इब्री लोकांस ७:२६) तो सर्वकाळ जगू शकला असता. त्याच्या अनुमतीविना त्याचा जीव जबरदस्तीने देखील कोणी घेऊ शकला नसता. तो म्हणाला: “कोणी [माझा जीव] माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो.”—योहान १०:१८.

परंतु, येशूने आपले परिपूर्ण मानवी जीवन बलिदानाच्या रूपात स्वेच्छेने सादर केले जेणेकरून “मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान, ह्‍याला मरणाने शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्‍त करावे.” (इब्री लोकांस २:१४, १५) ख्रिस्ताची आत्म-त्यागी प्रीती त्याने स्वतःवर येऊ दिलेल्या मृत्यूच्या पद्धतीतून स्पष्ट होते. आपण कशाप्रकारे त्रास सहन करून मरणार याची त्याला चांगली जाणीव होती.—मत्तय १७:२२; २०:१७-१९.

शिवाय, स्मारक विधी आपल्याला प्रीतीच्या सर्वात मोठ्या प्रदर्शनाची आठवणही करून देतो जे आपल्या स्वर्गीय पिता, यहोवा याने केले. येशूने गेथशेमाने बागेत ‘मोठा आक्रोश केला व अश्रू गाळले,’ अमानुष कोडे खाल्ले, सुळावर चढवण्याची क्रूरता आणि मंद गतीचा वेदनादायक मृत्यू सहन केला तेव्हा त्याचे हाल पाहून आणि ऐकून या “कनवाळू व दयाळू” देवाला किती दुःख झाले असेल. (याकोब ५:११; इब्री लोकांस ५:७; योहान ३:१६; १ योहान ४:७, ८) आज इतक्या शतकांनंतर हा विचारही पुष्कळांना सहन होत नाही.

यहोवा देवाने आणि येशू ख्रिस्ताने आपल्यासारख्या पापी लोकांकरता किती मोठी किंमत दिली याचा विचार करा! (रोमकर ३:२३) दररोज आपल्याला आपल्या पापी स्वभावाचा आणि आपल्या अपरिपूर्णतांचा दुःखदायक प्रत्यय येत असतो. परंतु, येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवून आपण देवाकडे क्षमायाचना करू शकतो. (१ योहान २:१, २) यामुळे देवाजवळ जाण्याची मोकळीक मिळते आणि आपल्याला शुद्ध विवेक राखता येतो. (इब्री लोकांस ४:१४-१६; ९:१३, १४) एवढेच नव्हे तर परादीस पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा आपण बाळगू शकतो. (योहान १७:३; प्रकटीकरण २१:३, ४) हे आणि इतर अनेक आशीर्वाद येशूच्या श्रेष्ठ आत्म-त्यागाचा परिणाम आहेत.

प्रभूच्या भोजनाबद्दल कृतज्ञता दाखवणे

प्रभूचे भोजन ‘देवाच्या अपार अपात्र कृपेचे’ अद्‌भुत प्रदर्शन आहे यात शंका नाही. शिवाय, यहोवा देवाची खंडणी बलिदानाची तरतूद—जी येशूच्या आत्म-त्यागी प्रीतीने शक्य झाली ती—खरोखर त्याचे ‘अवर्णनीय दान’ आहे. (२ करिंथकर ९:१४, १५) देवाने येशू ख्रिस्ताद्वारे दाखवलेला हा चांगुलपणा पाहून तुमचे अंतःकरण गहिऱ्‍या व कायम राहणाऱ्‍या कृतज्ञ भावनेने भरून येत नाही का?

असे निश्‍चित होत असेल याची आम्हाला खात्री आहे. त्यासाठी, येशूच्या मृत्यूचा स्मारक विधी पाळण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांसोबत एकत्र जमण्यास तुम्हाला हार्दिक आमंत्रण आहे. या वर्षी, स्मारक विधी बुधवारी, एप्रिल १६ तारखेला सूर्यास्तानंतर पाळला जाईल. या अति महत्त्वपूर्ण प्रसंगाच्या नेमक्या वेळेविषयी आणि ठिकाणाविषयी तुमच्या परिसरातील यहोवाचे साक्षीदार तुम्हाला अधिक माहिती देतील.

[तळटीप]

^ परि. 19 खंडणीवरील तपशीलवार चर्चेसाठी, कृपया, सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित पुस्तक पाहा.

[६ पानांवरील चौकट/चित्रे]

“हे माझे शरीर आहे

“मी मेंढराचे दार आहे” आणि “मीच खरा द्राक्षवेल आहे” असे येशूने म्हटले तेव्हा तो खरोखरचे दार आहे किंवा खरोखरचा द्राक्षवेल आहे असा विचार कोणीही केला नाही. (तिरपे वळण आमचे.) (योहान १०:७; १५:१) त्याचप्रमाणे बायबलमध्ये, “हा प्याला . . . नवा करार आहे” असे येशू म्हणतो तेव्हा तो प्याला म्हणजे नवा करार होता असा निष्कर्ष आपण काढत नाही. त्याचप्रमाणे, भाकरी माझा देह “आहे” असे त्याने म्हटले तेव्हा यात काही शंका नाही की, ती भाकरी त्याच्या शरीराचे सूचक किंवा चिन्ह होती.—लूक २२:१९, २०.

[५ पानांवरील चित्र]

बेखमीर भाकरी आणि द्राक्षारस येशूच्या पापरहित शरीराचे आणि त्याने सांडलेल्या रक्‍ताचे उचित सूचक आहेत

[७ पानांवरील चित्र]

स्मारक विधी, यहोवा देव आणि येशू ख्रिस्ताने दाखवलेल्या महान प्रीतीची आठवण करून देतो