व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लीनता—एक अत्यावश्‍यक ख्रिस्ती गुण

लीनता—एक अत्यावश्‍यक ख्रिस्ती गुण

लीनता—एक अत्यावश्‍यक ख्रिस्ती गुण

“लीनता . . . धारण करा.”—कलस्सैकर ३:१२.

१. लीनता एक अद्वितीय गुण का आहे?

लीन अथवा सौम्य व्यक्‍तीचा सहवास कोणालाही हवाहवासा वाटतो. दुसरीकडे पाहता बुद्धिमान राजा शलमोन याने म्हटले: “नरम जीभ हाड फोडिते.” (नीतिसूत्रे २५:१५) लीनता किंवा नरमपणा हा असा एक अद्वितीय गुण आहे, जो सुखावह असण्यासोबतच शक्‍तिशाली देखील आहे.

२, ३. लीनता आणि पवित्र आत्मा यांत काय संबंध आहे आणि या लेखात आपण काय पाहणार आहोत?

प्रेषित पेत्राने गलतीकर ५:२२, २३ येथे ‘आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणाऱ्‍या फळामध्ये’ सौम्यतेचा समावेश केला. २३ व्या वचनात “सौम्यता” असे भाषांतर केलेल्या शब्दाचे इतर अनुवादांत “लीनता” किंवा “मृदुता” असे भाषांतर करण्यात आले आहे. खरे पाहता, बहुतेक भाषांत या ग्रीक शब्दाचा अचूक पर्याय शोधणे कठीण आहे कारण मूळ ग्रीक शब्द हा बाह्‍य सौम्यता अथवा लीनतेला नव्हे तर आंतरिक मृदुता आणि कोमलता यांस सूचित करतो; एका व्यक्‍तीच्या वागणुकीला नव्हे तर त्याच्या मनाच्या व हृदयाच्या स्थितीला तो सूचित करतो.

लीनतेचा अर्थ आणि मोल समजून घेण्याकरता आपण बायबलमधील चार उदाहरणे विचारात घेऊ. (रोमकर १५:४) असे केल्यामुळे आपल्याला केवळ या गुणाविषयीच नव्हे तर तो आपण कशाप्रकारे आत्मसात करू शकतो आणि इतरांशी आपल्या व्यवहारांत तो कशाप्रकारे प्रदर्शित करू शकतो हे देखील शिकायला मिळेल.

“देवाच्या दृष्टीने बहुमूल्य”

४. लीनता यहोवाच्या नजरेत बहुमूल्य आहे हे आपल्याला कसे कळते?

लीनता देवाच्या आत्म्याच्या फळात सामील असल्याकारणाने हा गुण देवाच्या अद्‌भुत व्यक्‍तिमत्त्वाशी निगडीत असणे साहजिक आहे. प्रेषित पेत्राने लिहिले की “सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे.” (१ पेत्र ३:४) खरोखर लीनता हा देवाचा गुण आहे; यहोवाच्या नजरेत तो अतिशय मोलाचा आहे. निश्‍चितच हे एकच कारण देवाच्या सर्व सेवकांना लीन होण्यास प्रवृत्त करण्याकरता पुरेसे आहे. पण या विश्‍वातील सर्वश्रेष्ठ, सर्वसमर्थ देव कशाप्रकारे लीनता दाखवतो?

५. यहोवाच्या लीनतेमुळे आपल्याला कोणती आशा मिळाली आहे?

पहिले मानवी जोडपे, आदाम व हवा यांनी बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ न खाण्याची देवाची सुस्पष्ट आज्ञा मोडली तेव्हा त्यांनी हे जाणूनबुजून केले होते. (उत्पत्ति २:१६, १७) त्या हेतुपुरस्सर अवज्ञेमुळे त्यांनी पाप केले, त्यांच्यावर मृत्यू ओढवला आणि केवळ तेच नव्हे तर त्यांची भावी संतती देखील देवापासून दुरावली गेली. (रोमकर ५:१२) यहोवाने मानवजातीला वाऱ्‍यावर सोडले नाही; यांना सुधारणे किंवा पापापासून मुक्‍त करणे शक्यच नाही असे समजून त्याने त्यांना सोडून दिले नाही. खरे पाहता असे करण्याचे यहोवाजवळ ठोस कारण होते. (स्तोत्र १३०:३) पण त्याने असे केले नाही, उलट, त्याने कोमलता आणि अवाजवी अपेक्षा न करण्याची तयारी दाखवण्याद्वारे लीनता व्यक्‍त केली आणि अशाप्रकारे मानवांकरता त्याच्याकडे येण्याचा व त्याची संमती मिळवण्याचा मार्ग पुरवला. होय, आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्या खंडणी बलिदानाच्या माध्यमाने यहोवाने आपल्याकरता त्याच्या गौरवशाली सिंहासनापुढे कोणत्याही भीतीशिवाय येण्याचा मार्ग मोकळा केला.—रोमकर ६:२३; इब्री लोकांस ४:१४-१६; १ योहान ४:९, १०, १८.

६. देवाने काइनासोबत ज्याप्रकारे व्यवहार केला त्यावरून त्याची लीनता कशाप्रकारे दिसून आली?

येशू पृथ्वीवर येण्याच्या बऱ्‍याच काळाआधी, आदामाचे पुत्र काइन व हाबेल यांनी यहोवाला बलिदाने अर्पण केली तेव्हा यहोवाची लीनता दिसून आली. त्यांच्या अंतःकरणांचे परीक्षण करून यहोवाने काइनाचे बलिदान नाकारले पण हाबेलाचा व त्याच्या अर्पणाचा “आदर केला.” विश्‍वासू हाबेल आणि त्याच्या बलिदानावर यहोवाची कृपादृष्टी झाल्यामुळे काइनाने प्रतिकूल प्रतिक्रिया दाखवली. बायबलमधील अहवाल सांगतो, की “काइन संतापला व त्याचे तोंड उतरले.” यावर यहोवाची काय प्रतिक्रिया होती? काइनाच्या वाईट मनोवृत्तीमुळे यहोवाला अपमानित वाटले का? नाही. तर त्याने अतिशय सौम्यतेने काइनाला तो का संतापला आहे असे विचारले. शिवाय, त्याची “मुद्रा प्रसन्‍न” व्हावी म्हणून त्याला काय करता येईल हे देखील यहोवाने त्याला समजावून सांगितले. (उत्पत्ति ४:३-७) खरोखर, यहोवा लीनतेचे रूप आहे.—निर्गम ३४:६.

लीनता आकर्षित व उल्लसित करते

७, ८. (अ) यहोवाच्या लीनतेची आपल्याला कशाप्रकारे ओळख घडू शकते? (ब) मत्तय ११:२७-२९ येथे नमूद केलेल्या शब्दांतून यहोवा व येशूबद्दल काय दिसून येते?

यहोवाच्या अनुपम गुणांची ओळख घडण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जीवनाचे व सेवाकार्याचे परीक्षण करणे. (योहान १:१८; १४:६-९) गालीलातील प्रचाराच्या दुसऱ्‍या वर्षी येशूने खोराजिन, बेथसैदा, कफर्णहूम व जवळपासच्या प्रदेशात अनेक महत्कृत्ये केली. तरीसुद्धा, बहुतेक लोकांची गर्विष्ठ व बेपर्वा मनोवृत्ती होती आणि त्यांनी येशूचे ऐकून घेण्यास नकार दिला. यावर येशूने कशी प्रतिक्रिया दाखवली? त्यांच्या विश्‍वासहीनतेच्या परिणामांविषयी त्याने त्यांना स्पष्टपणे आठवण करून दिली, पण दुसरीकडे, त्यांच्यातील गरीब, सर्वसामान्य आम्हारेट लोकांची दयनीय आध्यात्मिक स्थिती पाहून त्याला त्यांचा कळवळा आला.—मत्तय ९:३५, ३६; ११:२०-२४.

यानंतर येशूने जे केले त्यावरूनही त्याने दाखवले की तो आपल्या ‘पित्याला ओळखीत होता’ व त्याचे अनुकरण करत होता. सर्वसामान्य लोकांना येशूने हे प्रेमळ निमंत्रण दिले: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल.” येशूच्या या शब्दांनी त्या काळातील गलितगात्रांना केवढे सांत्वन मिळाले! आज आपल्यालाही हे शब्द सांत्वन देतात. आपण खऱ्‍या अर्थाने लीनता आत्मसात केल्यास, “ज्या कोणास [पित्याला] प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल” त्यांच्यापैकी आपणही असू शकतो.—मत्तय ११:२७-२९.

९. लीनतेशी कोणता गुण संबंधित आहे आणि येशू या संदर्भात एक उत्तम उदाहरण आहे असे का म्हणता येईल?

लीनतेशी नम्रतेचा, ‘मनाने लीन असण्याशी’ जवळचा संबंध आहे. दुसरीकडे पाहता, गर्विष्ठपणामुळे एक व्यक्‍ती स्वतःला इतरांपेक्षा वरचढ समजू लागते आणि यामुळे कधीकधी ती दुसऱ्‍यांशी कठोरपणे व त्यांच्या भावनांची पर्वा न करता वागते. (नीतिसूत्रे १६:१८, १९) येशूने आपल्या पृथ्वीवरील सेवाकार्याच्या सबंध काळात नम्रता दाखवली. आपल्या मृत्यूच्या सहा दिवसांआधी जेव्हा तो जेरूसलेममध्ये आला, आणि लोकांनी यहूद्यांचा राजा म्हणून त्याचा जयजयकार केला तेव्हा देखील येशूने जगातील शासकांपेक्षा अगदी वेगळी मनोवृत्ती दाखवली. त्याने मशीहाविषयी जखऱ्‍याची ही भविष्यवाणी पूर्ण केली: “पाहा, तुझा राजा तुजकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.” (मत्तय २१:५, NW; जखऱ्‍या ९:९) विश्‍वासू संदेष्टा दानीएल याला एक दृष्टान्त झाला होता व त्यात यहोवाने आपल्या पुत्राला राज्याधिकार दिल्याचे त्याला दिसले. तरीसुद्धा पूर्वीच्या एका भविष्यवाणीत त्याने येशूचे वर्णन “अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यांपैकी” असे केले. लीनता व नम्रता खरोखरच एकमेकांशी निगडीत आहेत.—दानीएल ४:१७; ७:१३, १४.

१०. ख्रिस्ती लीनता दुर्बलतेचे चिन्ह का नाही?

१० इतरांकरता आनंददायक ठरणारी यहोवाची व येशूची लीनता आपल्याला त्यांच्या जवळ येण्यास मदत करते. (याकोब ४:८) अर्थात, लीन असणे हे दुर्बल व्यक्‍तिमत्त्वाचे चिन्ह कदापि नाही! यहोवा सर्वशक्‍तिमान देव, महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे. अन्यायाविरुद्ध त्याचा क्रोध भडकतो. (यशया ३०:२७; ४०:२६) त्याचप्रकारे येशूनेही दियाबल सैतानाच्या हल्ल्याला तोंड देताना, कोणत्याही परिस्थितीत हातमिळवणी न करण्याचा त्याचा दृढ निर्धार असल्याचे दाखवले. त्याच्या काळातील धर्मपुढाऱ्‍यांच्या बेकायदेशीर व्यापाराचा त्याने कडाडून विरोध केला. (मत्तय ४:१-११; २१:१२, १३; योहान २:१३-१७) पण तरीसुद्धा, आपल्या शिष्यांच्या चुका सुधारताना त्याने नेहमी लीनता दाखवली आणि सोशीक वृत्तीने त्यांच्या दुर्बलता सहन केल्या. (मत्तय २०:२०-२८) एका बायबल विद्वानाने लीनतेची अगदी अचूक शब्दांत व्याख्या केली: “सौम्यतेच्या मागे पोलादी शक्‍ती दडलेली असते.” लीनतेचा हा ख्रिस्ती गुण प्रदर्शित करण्याचा आपण सदोदित प्रयत्न केला पाहिजे.

सर्वात लीन मनुष्य

११, १२. मोशेचे बालपण ज्याप्रकारे गेले होते त्याचा विचार केल्यास त्याची लीनता अधिकच उल्लेखनीय का ठरते?

११ आता आपण लीनतेचे तिसरे उदाहरण विचारात घेऊ या. हे मोशेचे उदाहरण आहे. बायबल मोशेचे वर्णन “भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र [“लीन”]” या शब्दांत करते. (गणना १२:३) हे वर्णन देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आले होते. मोशेच्या उल्लेखनीय लीनतेमुळे तो यहोवाकडून मार्गदर्शन मिळवण्यास उत्सुक होता.

१२ मोशेचे बालपण सर्वसामान्यांपेक्षा वेगळे होते. विश्‍वासघात व मनुष्यहत्या सर्रास चालत असलेल्या काळात यहोवाने विश्‍वासू इब्री पालकांच्या या पुत्राला सुरक्षित ठेवले. मोशेने आपल्या जीवनाची पहिली काही वर्षे आपल्या आईच्या छत्रछायेत घालवली; त्याच्या आईने त्याला खरा देव, यहोवा याच्याविषयी काळजीपूर्वक शिकवले. नंतर मोशेला त्याच्या घरापासून दूर अतिशय वेगळ्या वातावरणात राहण्याकरता नेण्यात आले. ख्रिस्ती धर्माच्या सुरवातीला हुतात्मिक मरण आलेल्या स्तेफनाने म्हटले की “मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता.” (प्रेषितांची कृत्ये ७:२२) फारोच्या गुलामांवर नेमलेल्या सैनिकांना आपल्या बांधवांवर जुलूम करताना पाहिल्यावर मोशेचा विश्‍वास प्रकट झाला. एक ईजिप्शियन माणूस एका इब्री माणसाला मारत आहे हे पाहिल्यावर मोशेने त्या ईजिप्शियन माणसाला जिवे मारले आणि यामुळे त्याला ईजिप्तमधून पलायन करून मिद्यानात जावे लागले.—निर्गम १:१५, १६; २:१-१५; इब्री लोकांस ११:२४, २५.

१३. मिद्यानात मोशेच्या ४० वर्षांच्या वास्तव्यामुळे त्याच्यावर कोणता परिणाम झाला?

१३ चाळीस वर्षांच्या वयात मोशेवर अरण्यात जगण्याची पाळी आली. मिद्यानात त्याची रगुवेलच्या सात मुलींशी भेट झाली आणि त्याने त्यांना त्यांच्या पित्याच्या मोठ्या कळपाकरता पाणी भरण्यास मदत केली. घरी परतल्यावर त्या मुलींनी रगुवेलला मोठ्या आनंदाने सांगितले की “एका मिसरी मनुष्याने” त्यांना त्रास देणाऱ्‍या धनगरांच्या हातून सोडवले. रगुवेलचे निमंत्रण स्वीकारून मोशेने त्याच्या कुटुंबासोबत मुक्काम केला. त्याला सोसाव्या लागलेल्या संकटांमुळे त्याच्या मनात कटू भावना निर्माण झाल्या नाहीत; किंवा नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याकरता तेथील जीवनशैली आत्मसात करण्यास त्याने नकार दिला नाही. यहोवाची इच्छा पूर्ण करण्याची त्याची इच्छा कधीही कमी झाली नाही. त्या सबंध ४० वर्षांदरम्यान त्याने रगुवेलच्या मेंढरांचे पालन केले, सिप्पोराशी लग्न केले आणि आपल्या पुत्रांचे संगोपन केले आणि हे सर्व काही घडत असताना मोशेच्या व्यक्‍तिमत्त्वात एका अशा गुणाचा विकास होत गेला जो त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचे वैशिष्ट्य ठरणार होता. होय, संकटांतून मोशेने लीनता आत्मसात केली.—निर्गम २:१६-२२; प्रेषितांची कृत्ये ७:२९, ३०.

१४. मोशे इस्राएलचे नेतृत्व करत असताना त्याच्या लीनतेचे दर्शन घडवणाऱ्‍या एका प्रसंगाचे वर्णन करा.

१४ यहोवाने मोशेला इस्राएल राष्ट्राचे नेतृत्व करण्याकरता नेमल्यावरही मोशेने लीनता दाखवली. एका तरुणाने एकदा मोशेला येऊन सांगितले की एलदाद व मेदाद हे छावणीत संदेष्ट्यांप्रमाणे वागत आहेत; मोशेला साहाय्य करण्याकरता यहोवाने ७० वडीलजनांवर आपला आत्मा ओतला होता तेव्हा एलदाद व मेदाद त्यांच्यात नव्हते. त्यामुळे यहोशवाने मोशेला विनंती केली: “मोशे, माझ्या स्वामी, त्यांना मना कर!” पण मोशेने लीनतेने उत्तर दिले: “माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करितोस काय? परमेश्‍वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्‍वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेविला असता तर किती बरे झाले असते!” (गणना ११:२६-२९) मोशेच्या लीनतेमुळे तो तणावपूर्ण प्रसंग विकोपाला गेला नाही.

१५. मोशे अपरिपूर्ण असला तरीसुद्धा त्याचे उदाहरण अनुकरणीय आहे असे का म्हणता येते?

१५ एकदा मात्र मोशे लीनतेने वागण्यास चुकला. कादेशजवळील मरीबा या ठिकाणी त्याने चमत्कार करणाऱ्‍या यहोवा देवाला पूर्ण श्रेय व गौरव दिले नाही. (गणना २०:१, ९-१३) मोशे अपरिपूर्ण असला तरीसुद्धा, त्याच्या अचल विश्‍वासाने त्याला जीवनभर सांभाळले आणि त्याची उल्लेखनीय लीनता आजही आपल्याला प्रशंसनीय वाटते.—इब्री लोकांस ११:२३-२८.

कठोरता विरुद्ध लीनता

१६, १७. नाबाल व अबीगईल यांच्या अहवालावरून आपल्याला सावध करणारा कोणता धडा मिळतो?

१६ दाविदाच्या काळातील एक उदाहरण आपल्याला सावध करणारे आहे. देवाचा संदेष्टा शमुवेल याच्या मृत्यूच्या थोड्याच काळानंतर हे घडले. ही घटना एक विवाहित जोडपे, नाबाल व त्याची पत्नी अबीगईल यांच्यासंदर्भात आहे. या दोघांत जमीनअस्मानाचा फरक होता! अबीगईल ही “बुद्धिमती” होती, तर तिचा पती “कठोर व वाईट चालीचा होता.” दाविदाच्या माणसांनी नाबालच्या कळपांचे चोरांपासून रक्षण करण्यास मदत केली होती. तरीपण जेव्हा त्यांनी नाबालाकडे काही खाद्यपदार्थ देण्याची विनंती केली तेव्हा त्याने त्याला कठोरपणे नकार दिला. दाविदाचा नीतिमान क्रोध भडकला आणि लगेच दावीद व त्याची काही माणसे नाबालचा सामना करण्याकरता आपल्या तरवारी घेऊन निघाले.—१ शमुवेल २५:२-१३.

१७ अबीगईलला सर्व हकीगत कळली तेव्हा तिने लगेच भाकरी, द्राक्षारस, मांस, खिसमिस व अंजिरे घेतली व ती दाविदाला भेटायला गेली. ती त्याच्याकडे गयावया करू लागली, व म्हणाली, “अहो माझे स्वामी, हा अपराध माझ्याच शिरी असू द्या. आपल्या दासीला आपल्या कानात काही सांगू द्या. आपल्या दासीचे बोलणे ऐका.” अबीगईलच्या लीनतापूर्वक याचनेने दाविदाच्या हृदयाला पाझर फुटला. तिचे स्पष्टीकरण ऐकल्यावर दाविदाने म्हटले: “ज्याने तुला आज माझ्या भेटीस पाठविले तो इस्राएलाचा देव परमेश्‍वर धन्य! धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची! तू स्वतः धन्य! तू आज मला आपल्या हाताने रक्‍तपात करण्यापासून व सूड उगविण्यापासून आवरिले आहे.” (१ शमुवेल २५:१८, २४, ३२, ३३) नाबालाच्या कठोरपणामुळे शेवटी त्याला मृत्यू आला. पण अबीगईलच्या उत्तम गुणांमुळे कालांतराने तिला दाविदाची पत्नी होण्याचा सन्मान मिळाला. तिची लीनता आज यहोवाची सेवा करणाऱ्‍या सर्वांनी अनुसरण्यासारखी आहे.—१ शमुवेल २५:३६-४२.

लीनता आत्मसात करण्याचा प्रयत्न करा

१८, १९. (अ) आपण लीनता धारण करतो तसतसे कोणत्याप्रकारचे बदल आपल्या व्यक्‍तिमत्त्वात दिसू लागतात? (ब) परिणामकारक आत्मपरीक्षण करण्यात आपल्याला कशाचे साहाय्य मिळू शकते?

१८ अशारितीने, लीनता ही अत्यावश्‍यक आहे. केवळ सौम्यपणे वागणे म्हणजे लीनता नव्हे; तर हा एक आकर्षक गुण आहे जो इतरांना उल्लसित करतो. गतकाळात कदाचित आपल्याला कठोरपणे बोलण्याची किंवा अविचारीपणे वागण्याची सवय असेल. पण बायबलमधील सत्य शिकून घेतल्यानंतर आपण बदललो आणि अधिक समंजसपणे वागायला शिकलो. पौलाने सहख्रिस्ती बांधवांना पुढील प्रोत्साहन देताना या परिवर्तनाविषयी सांगितले: “तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून करुणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा.” (कलस्सैकर ३:१२) बायबलमध्ये या परिवर्तनाची तुलना, लांडगा, चित्ता, सिंह, अस्वल व नाग यांसारखे भयानक जंगली श्‍वापद, कोकरू, करडू, वासरू व बैल यांसारख्या निरुपद्रवी पाळीव प्राण्यांत बदलण्याशी करण्यात आली आहे. (यशया ११:६-९; ६५:२५) एखाद्या व्यक्‍तीच्या व्यक्‍तिमत्त्वातील हे बदल इतके उल्लेखनीय असतात की पाहणारे अक्षरशः थक्क होतात. पण आपण या परिवर्तनाचे श्रेय अर्थातच देवाच्या आत्म्याला देतो कारण लीनता हा मुळात आत्म्याच्या फळापैकी एक उल्लेखनीय गुण आहे.

१९ याचा अर्थ, एकदा हे बदल करून यहोवाला आपले जीवन समर्पित केल्यानंतर आपल्याला लीनतेने वागण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही का? निश्‍चितच याचा असा अर्थ होत नाही. उदाहरणार्थ, नवीन कपडे स्वच्छ व नीटनेटके दिसावेत म्हणून त्यांची सतत काळजी घेणे आवश्‍यक आहे. त्याचप्रकारे देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास करून त्यातील उदाहरणांवर मनन केल्यामुळे आपल्याला स्वतःकडे एका नव्या व वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहण्यास मदत होते. देवाच्या प्रेरित वचनाचा आरसा तुमच्याविषयी काय सांगतो?—याकोब १:२३-२५.

२०. लीनता दाखवण्यात आपण कशाप्रकारे यशस्वी होऊ शकतो?

२० स्वाभाविकपणे प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. देवाच्या काही सेवकांना लीनतेने वागणे इतरांच्या तुलनेत सोपे जाते. पण तरीसुद्धा सर्व ख्रिश्‍चनांनी लीनतेसहित आत्म्याच्या फळातील सर्व गुण आत्मसात करणे अगत्याचे आहे. पौलाने तीमथ्याला हा प्रेमळ सल्ला दिला: “नीतिमत्त्व, सुभक्‍ति, विश्‍वास, प्रीति, धीर व सौम्यता ह्‍यांच्या पाठीस लाग.” (१ तीमथ्य ६:११) “पाठीस लाग” या शब्दांवरून मेहनतीची आवश्‍यकता असल्याचे सूचित होते. एका बायबल भाषांतरात याचे भाषांतर ‘याकडे आपले मन लाव’ अशाप्रकारे करण्यात आले आहे. (जे. बी. फिलिप्स यांचे आधुनिक इंग्रजीत नवा करार) देवाच्या वचनातील उत्तम उदाहरणांवर मनन करण्याकरता मेहनत घेण्याची तुम्ही सवय लावल्यास, ते शरीरात एखाद्या अवयवाचे रोपण करण्याप्रमाणे तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा भाग बनतील. ते तुमच्या जीवनाला आकार व दिशा देतील.—याकोब १:२१.

२१. (अ) आपण लीनता आत्मसात करण्याचा कसोशीने प्रयत्न का केला पाहिजे? (ब) पुढील लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?

२१ याबाबतीत आपण कितपत यशस्वी ठरत आहोत हे इतरांशी आपण कशाप्रकारे वागतो यावरून दिसून येते. शिष्य याकोब म्हणतो: “तुम्हामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावी.” (याकोब ३:१३) हा ख्रिस्ती गुण आपण घरात, ख्रिस्ती सेवाकार्यात आणि मंडळीत कशाप्रकारे दाखवू शकतो? पुढील लेख यासंदर्भात उपयुक्‍त मार्गदर्शन देईल.

उजळणी

• लीनतेच्या गुणाविषयी तुम्हाला खालील प्रत्येक उदाहरणावरून काय शिकायला मिळाले

• यहोवा?

• येशू?

• मोशे?

• अबीगईल?

• लीनतेचा गुण विकसित करण्याचा प्रयत्न करणे का अगत्याचे आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चित्र]

यहोवाने हाबेलच्या अर्पणावर कृपादृष्टी का केली?

[१७ पानांवरील चित्र]

येशूने दाखवले की लीनता व नम्रता एकमेकांशी निगडीत आहेत

[१८ पानांवरील चित्र]

मोशेने आपल्याकरता लीनतेचे उत्तम उदाहरण पुरवले