विश्वव्यापी ईश्वरी शिक्षणाच्या विकासातील माझा सहभाग
जीवन कथा
विश्वव्यापी ईश्वरी शिक्षणाच्या विकासातील माझा सहभाग
रॉबर्ट निझबट यांच्याद्वारे कथित
स्वाझीलँडचे महाराज सोभुझा दुसरे यांनी आपल्या राजमहालात माझा भाऊ, जॉर्ज आणि माझे स्वागत केले. ही १९३६ सालची गोष्ट आहे तरीपण आमच्यात झालेलं संभाषण मला अजूनही चांगलं आठवतं. बायबलच्या एका महान शैक्षणिक कार्याशी माझा खूप वर्षांपासूनचा संबंध असल्यामुळेच मी एका राजाबरोबर खूप वेळपर्यंत संभाषण करू शकलो होतो. मी आता जीवनाच्या ९५ व्या वर्षात पदार्पण केलं आहे; या कार्यातील माझ्या सहभागाचे मी अवलोकन करतो तेव्हा मला अत्यंत आनंद होतो; या कार्यामुळे मला पाच वेगवेगळ्या खंडांमध्ये जाता आले.
डॉबसन नावाचे एक चहाचे विक्रेते, १९२५ साली स्कॉटलँड, एडिनबर्ग येथील आमच्या घरी येऊ लागले तेव्हापासून या सर्वाची सुरवात झाली. मी तेव्हा किशोरवयीन होतो आणि शिकाऊ औषधविक्रेता म्हणून काम करत होतो. तसं पाहिल्यास मी अजूनही लहान होतो तरीपण, १९१४-१८ सालादरम्यानच्या महायुद्धांमुळे अनेक कुटुंबांमध्ये व लोकांच्या धार्मिक विश्वासांमध्ये झालेले आमूलाग्र बदल पाहून मला काळजी वाटत होती. एकदा, मि. डॉबसन आम्हाला द डिव्हाईन प्लॅन ऑफ दि एजेस नावाचं पुस्तक देऊन गेले. या पुस्तकात निश्चित “योजना” राखून असलेल्या एका बुद्धिमान निर्माणकर्त्याविषयी दिलेली माहिती मला अगदी तर्कशुद्ध आणि सुसंगत वाटली कारण मला अशाच देवाची उपासना करण्याची इच्छा होती.
आई आणि मी लगेच बायबल विद्यार्थ्यांच्या (यहोवाच्या साक्षीदारांना पूर्वी या नावाने ओळखले जाई) सभांना जाऊ लागलो. १९२६ सालच्या सप्टेंबर महिन्यात आईने व मी ग्लासगो येथे झालेल्या एका अधिवेशनात यहोवाला आमचं जीवन समर्पित करून पाण्यानं बाप्तिस्मा घेतला. बाप्तिस्मा
घेणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला, नेहमीच्या अंघोळीच्या कपड्यांवर घालण्यासाठी एक पायघोळ झगा देण्यात आला; या झग्याच्या शेवटी, नाड्या होत्या ज्या बाप्तिस्म्यासाठी पाण्यात उतरण्याआधी पायाच्या घोट्याभोवती बांधल्या जायच्या. बाप्तिस्म्यासारख्या गंभीर प्रसंगी हा उचित पेहराव होता असे तेव्हा समजले जाई.पूर्वीच्या त्या दिवसांमध्ये पुष्कळ बाबतीत आम्हाला आमच्या समजुतीत सुधारणा करावी लागत होती. मंडळीतील सगळे नाही तर बहुतेक जण नाताळ साजरा करीत होते. खूप कमी जण क्षेत्र सेवेत जात. काही वडिलांनी तर रविवारच्या दिवशी साहित्यांचे वाटप करण्यावर आक्षेप घेतला; त्यांना वाटत होते, की असे केल्याने ते शब्बाथाचे उल्लंघन करीत होते. पण, १९२५ सालच्या टेहळणी बुरूज लेखांत, मार्क १३:१० यासारखी वचने वारंवार येऊ लागली; या वचनात म्हटले आहे: “प्रथम सर्व राष्ट्रांत सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे.”
पण हे जगव्याप्त कार्य कशाप्रकारे पूर्ण केले जाणार होते? घरोघरच्या प्रचार कार्यात मी पहिल्यांदा प्रयत्न केला तेव्हा मी घरमालकाला एवढेच म्हणालो, की मी सुरेख धार्मिक पुस्तकं विकत आहे आणि मग त्यांना द हार्प ऑफ गॉड हे पुस्तक सादर केले; या पुस्तकात, वीणेच्या दहा तारांची तुलना बायबलच्या दहा महत्त्वपूर्ण शिकवणुकींशी करून त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. नंतर आम्हाला एक साक्ष कार्ड देण्यात आलं; यात घरमालकासाठी संक्षिप्त रूपात एक संदेश होता. आम्ही, पोर्टेबल फोनोग्राफवर वाजवता येतील अशी साडेचार मिनिटांची भाषणेही रेकॉर्ड केली. हे जुन्या मॉडेलचे फोनोग्राफ बरेच वजनदार असायचे. नंतर, हलक्या वजनाचे फोनोग्राफ आले आणि काहींना तर उभ्या स्थितीत ठेवूनही चालवता येत होतं.
१९२५ पासून १९३० च्या दशकापर्यंत, आम्हाला माहीत असलेल्या सर्व उत्तम मार्गांनी आम्ही साक्षकार्य चालू ठेवले. मग, १९४० च्या दशकाच्या सुरवातीला, सर्व मंडळ्यांमध्ये ईश्वरशासित सेवा प्रशालेची स्थापना करण्यात आली. ऐकणाऱ्या घरमालकांशी थेट बोलण्याद्वारे राज्य संदेश सादर करायला आम्हाला शिकवण्यात आलं. आवड दाखवणाऱ्या लोकांबरोबर बायबलचा अभ्यास करण्याचं महत्त्व देखील आम्ही शिकलो. थोडक्यात सांगायचं म्हणजे, आज जगभरात होणाऱ्या बायबलच्या शैक्षणिक कार्याची ही सुरवात होती.
बंधू रदरफोर्ड यांच्याकडून उत्तेजन
या शैक्षणिक कार्यात अधिक सहभाग घेण्याच्या माझ्या इच्छेने मला १९३१ साली पूर्ण वेळेच्या पायनियर सेवेत उतरण्यासाठी प्रेरित केलं. लंडनमधील एका अधिवेशनानंतर मला लगेच या सेवेस सुरवात करायची होती. पण त्या काळी या कार्यावर देखरेख करणारे बंधू रदरफोर्ड, दुपारच्या जेवणाच्या सुटीत माझ्याशी बोलायला आले. आफ्रिकेला एका पायनियरला पाठवण्याचा त्यांचा विचार होता. “तुला जायला आवडेल का?” असं त्यांनी मला विचारलं. मला थोडसं आश्चर्य वाटलं, पण मी लगेच “हो, जाईन,” असं त्यांना उत्तर दिलं.
त्या दिवसांत, शक्य तितक्या बायबल साहित्यांचा वाटप करण्याचा आमचा मुख्य हेतू होता; यासाठी आम्हाला सतत प्रवास करावा लागायचा. त्या दिवसांत, जबाबदार पदी असलेल्या बहुतेक बांधवांप्रमाणे मलाही अविवाहित राहण्याचं उत्तेजन देण्यात आलं. आफ्रिकेच्या दक्षिण टोकापासून म्हणजे केप टाऊनपासून त्या खंडाचा पूर्वेकडील भाग आणि हिंदी महासागराच्या किनाऱ्यावरील द्वीपांपर्यंतचे सर्व क्षेत्र मला नेमण्यात आले. पश्चिमेकडील सीमेपर्यंत जाताना मला कलहारी वाळवंटाच्या तळपत्या वाळूतून व्हिक्टोरिया सरोवराच्या नाईल नदीच्या मुखापर्यंत प्रवास करावा लागायचा. या प्रचंड विस्तृत क्षेत्रांतील एकापेक्षा अधिक आफ्रिकन देशांत दर वर्षी मला आणि माझ्याबरोबर असलेल्या एका बांधवाला सहा महिने घालवावे लागत होते.
आध्यात्मिक धन असलेली दोनशे खोकी
केप टाऊनमध्ये आल्यावर मला, पूर्व आफ्रिकेस नेण्याकरता साहित्यांची दोनशे खोकी दाखवण्यात आली. हे साहित्य चार युरोपीय भाषांत आणि चार आशियाई भाषांत होते; त्यांत एकही साहित्य आफ्रिकी भाषेत नव्हते. मी यायच्या आधीच हे साहित्य येथे का पाठवण्यात आले होते अशी विचारपूस केल्यावर मला सांगण्यात आले, की खरं तर ही खोकी फ्रॅन्क आणि ग्रे स्मीथ या दोन पायनियरांसाठी पाठवण्यात आली होती, जे नुकतेच केनियाला प्रचारासाठी गेले होते. परंतु दुःखाची गोष्ट अशी झाली होती, की केनियाला गेल्याबरोबर दोघांनाही मलेरिया झाला होता आणि त्यात फ्रॅन्क मरण पावला.
ही बातमी ऐकून मीही जरा गंभीरपणे विचार करू लागलो खरा, पण मी मागे सरलो नाही. माझ्याबरोबरचा बांधव,
डेव्हिड नॉरमन आणि मी असे आम्ही दोघं, केप टाऊनपासून सुमारे ५,००० किलोमीटर दूर असलेल्या टान्झानिया या आमच्या पहिल्या नेमणुकीच्या क्षेत्रात जाण्यासाठी जहाजानं निघालो. केनियातील मोम्बासा येथील एका ट्रॅव्हल एजंटकडे आम्ही सगळं साहित्य ठेवलं आणि आम्ही विनंती करू त्या ठिकाणी तो ते पाठवत असे. सुरवातीला आम्ही व्यापारी क्षेत्रांत—प्रत्येक शहरांतील दुकानांमध्ये व कार्यालयांमध्ये साक्षकार्य केले. आमच्याकडच्या साहित्यांत काही संच होते; एका संचात ९ पुस्तके आणि ११ पुस्तिका होत्या; ही पुस्तकं वेगवेगळ्या रंगांची असल्यामुळे त्यांस सप्तरंगी संच असे नाव पडले.आम्ही त्यानंतर, पूर्वेकडील किनाऱ्यापासून सुमारे ३० किलोमीटर दूर असलेल्या झान्झीबार द्वीपाला भेट द्यायचं ठरवलं. अनेक शतकांपर्यंत झान्झीबार हे गुलामांच्या व्यापाराचं केंद्र होतं शिवाय लवंगांसाठी देखील ते प्रसिद्ध होतं; जिकडे जाऊ तिकडे लवंगांचाच वास दरवळत असे. तिथं फिरणं जरा मुश्कीलीचं होतं कारण शहरातलं बांधकाम ओळीनं नव्हतं. रस्ते देखील आडवेतिडवे, कुठेही वळत असल्यामुळे, पुष्कळदा आमची वाट चुकायची. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहायचो ते बऱ्यापैकी होतं; पण त्याचे दरवाजे भरदार आणि धातुंनी जडवलेले असल्यामुळे व भिंती फार रुंद असल्यामुळे ते हॉटेलपेक्षा तुरुंगच वाटायचे. पण, झान्झीबारमध्ये आम्हाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला; अरबी, भारतीय आणि इतर लोक आनंदानं आमचं साहित्य स्वीकारत आहेत हे पाहून आम्हाला आनंद वाटला.
रेल्वे, बोट, मोटारगाड्या
त्या दिवसांत, पूर्व आफ्रिकेत प्रवास करणं सोपं नव्हतं. जसे की, मोम्बासाहून केनियाच्या पहाडी मुलूखात जाताना नाकतोड्यांच्या एका धाडीमुळे आमची रेल्वे थांबली. लाखो नाकतोड्यांमुळे जमीन आणि रेल्वेचे रूळ झाकून गेले होते; त्यामुळे रेल्वेची चाकं रूळावरून घसरण्याची भीती होती. यावर एकच उपाय होता; पुढचे सर्व रुळ इंजिनमधील उकळत्या पाण्यानं धुऊन काढणे. अशाप्रकारे आम्ही हळूहळू पुढे जात राहिलो आणि शेवटी या नाकतोड्यांमधून आम्ही पार झालो. मग रेल्वे जसजशी डोंगर चढू लागली तसतसे डोंगरांवरील गारव्यामुळे आम्हाला प्रसन्न वाटू लागलं!
किनाऱ्यावरील शहरांत रेल्वेनं, बोटीनं सहज प्रवास करता येऊ शकत होता पण ग्रामीण भागांत जाण्यासाठी कारच बरी पडायची. माझा धाकटा भाऊ, जॉर्ज हा देखील माझ्याबरोबर येऊन राहिला तेव्हा मला खूप आनंद झाला; आम्ही एक बऱ्यापैकी मोठा बंद ट्रक विकत घेतला आणि त्यातच मग आमच्या खाटा, स्वयंपाकघर, सामानसुमान ठेवण्याची जागा तयार केली आणि डास येऊ नयेत म्हणून खिडक्यांना जाळ्याही बसवल्या. शिवाय ट्रकच्या छतावर आम्ही लाऊडस्पीकर बसवले. अशाप्रकारे आम्ही दिवसा घरोघरचे साक्षकार्य करायचो आणि संध्याकाळच्या वेळी बाजाराच्या चौकात लोकांना आमच्या भाषणांसाठी बोलवायचो. “नरक तप्त आहे का?” हे एक रेकॉर्ड आम्ही नेहमी लावायचो. एकदा आम्ही आमच्या या “चालत्या-फिरत्या घरातून” दक्षिण आफ्रिकाहून केनियापर्यंतचा ३,००० किलोमीटरचा प्रवास केला; या वेळी आमच्याकडे अनेक आफ्रिकन भाषांत विविध पुस्तिका होत्या व लोकांनी आनंदाने आमच्याकडून त्या वाचण्यासाठी घेतल्या.
प्रवास करतानाचा एक सुखद अनुभव आम्हाला आला तो म्हणजे, आफ्रिकेतील पुष्कळ जंगली प्राणी आम्ही पाहू शकलो. सुरक्षित राहण्याकरता आम्ही अंधार पडल्यावर
आमच्या ट्रकमध्येच राहायचो; पण यहोवाने निर्माण केलेल्या नाना प्रकारच्या या जंगली प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत पाहणे खरोखर विश्वास मजबूत करणारे होते.विरोधाला सुरवात होते
जंगली प्राण्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आम्ही सावधगिरी बाळगत होतो; पण आमच्या राज्य प्रचार कार्याचा उघडउघड विरोध करणाऱ्या वेगवेगळ्या सरकारी अधिकाऱ्यांचा व क्रोधित धार्मिक नेत्यांचा सामना करणे हे अधिक कठीण होते. एका धर्मवेड्या मनुष्याचा आम्हाला सर्वात जास्त त्रास झाला; तो स्वतःला म्वाना लिसा म्हणजे “देवाचा पुत्र” असे म्हणायचा; आणि त्याच्या गटाला किटावाला असे म्हटले जायचे. दुःखाची गोष्ट म्हणजे, किटावालाचा अर्थ होतो, “वॉचटावर.” आम्ही यायच्या काही दिवसांआधी, या मनुष्याने अनेक आफ्रिकन लोकांना बाप्तिस्मा देतो म्हणून बुडवून मारले होते. नंतर त्याला अटक करून फाशी देण्यात आली. काही दिवसांनंतर, या मनुष्याला फाशी देणाऱ्या मनुष्याशी बोलायची मला संधी मिळाली तेव्हा मी त्याला समजावून सांगितले, की म्वानाचा आमच्या वॉच टावर संस्थेशी काहीही संबंध नव्हता.
अनेक युरोपियन लोकांकडूनही आम्हाला त्रास झाला कारण, बहुतेककरून आर्थिक कारणांसाठी त्यांना आमचे शैक्षणिक काम आवडत नव्हते. एका गोदामाच्या मालकाने अशी तक्रार केली: “आपला गैरफायदा घेतला जात आहे हे जोपर्यंत आफ्रिकन मनुष्याला कळत नाही तोपर्यंतच गोऱ्या लोकांना या देशात टिकून राहता येईल.” म्हणूनच, सोन्याच्या खाणीच्या एका कंपनीच्या मालकानं मला सडेतोडपणे त्याच्या कार्यालयातून बाहेर जायला सांगितले. आणि रागारागाने त्यानं मला रस्त्यावर आणून सोडलं.
अशा धार्मिक व व्यापारी विरोधकांच्या जबरदस्त प्रभावामुळे ऱ्होडेशिया (आता झिम्बाब्वे) सरकारनं आम्हाला देश सोडून जाण्याचा हुकूम दिला. आम्ही या निर्णयाबद्दल अपील केले आणि आमचे अपील मान्य केल्यामुळे आम्हाला राहण्याची परवानगी मिळाली, पण एक अट होती, की आम्ही आफ्रिकन लोकांना प्रचार करायचा नाही. एका अधिकाऱ्यानं कारण सांगितलं, की आमचं साहित्य “आफ्रिकन विचारसरणीसाठी योग्य नव्हतं.” परंतु आफ्रिकेच्या इतर देशांत मात्र काहीच समस्या आली नाही; एवढेच नव्हे तर, आफ्रिकन लोकांनी आमच्या शैक्षणिक कार्याला चांगला प्रतिसादही दिला. त्यांपैकी एक देश होता, स्वाझीलँड.
स्वाझीलँडमध्ये राजसी स्वागत
स्वाझीलँड, दक्षिण आफ्रिकेतील १७,३६४ चौरस किलोमीटरचा लहानसा स्वतंत्र देश आहे. या लेखाच्या सुरवातीला उल्लेख केल्याप्रमाणे येथेच आम्ही, वाक्चतुर असलेले महाराज सोभुझा दुसरे यांना भेटलो होतो. एका ब्रिटिश विद्यापीठात शिक्षण झाल्यामुळे ते अगदी अस्खलितपणे इंग्रजी भाषा बोलत होते. साध्याशा वेषात असलेल्या राजाने आमचे मनापासून स्वागत केले.
देवाने, नेमलेल्या लोकांसाठी पृथ्वीवरील परादीसचा उद्देश ठेवला आहे यावरच आमचे संभाषण केंद्रित होते. या विषयात त्यांना इतका काही रस नव्हता, पण काहीशा अशाच एका विषयाची आपल्याला चिंता वाटते असे त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितले. त्यांनी स्वतःला, गरीब व अशिक्षित लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी वाहून घेतले होते. लोकांना शिक्षण देण्यापेक्षा चर्चमधील सभासदत्व वाढवण्यात गढलेल्या अनेक ख्रिस्ती धर्मजगतातील मिशनऱ्यांची कार्ये त्यांना आवडत नव्हती. परंतु, आपल्या अनेक पायनियरांच्या कार्यांबद्दल त्यांना माहिती होती व आपल्या बायबलच्या शैक्षिणक कार्याची त्यांनी प्रशंसा केली कारण या
कार्यासाठी आपण पैसे घेत नव्हतो किंवा कसलाही मोबदला घेत नव्हतो.बायबलच्या शिक्षणाचा जलद प्रसार
सन १९४३ मध्ये मिशनऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिलियडची स्थापना झाली. केवळ बायबल साहित्य देण्यावरच लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आवड दाखवणारे लोक भेटतात तेव्हा त्यांच्याकडे पुन्हा जाण्यावर भर देण्यात येऊ लागला. १९५० साली जॉर्ज आणि मला गिलियडच्या १६ व्या वर्गासाठी निमंत्रण मिळाले. येथे मी, जीन हाईड नावाच्या एका भगिनीला भेटलो; आम्ही दोघं पदवीधर झाल्यानंतर तिला जपानला मिशनरी कार्यासाठी नेमण्यात आलं. त्या दिवसांत, अविवाहित राहण्याची बहुतेकांची रीत असल्यामुळे आमच्या दोघांतील मैत्री पुढे वाढली नाही.
गिलियड प्रशिक्षणानंतर, जॉर्ज व मला हिंदी महासागरातील मॉरिशस नावाच्या द्वीपावर मिशनरी नेमणूक मिळाली. आम्ही तिथल्या लोकांबरोबर मैत्री केली, त्यांची भाषा शिकलो, त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास केला. नंतर, माझा धाकटा भाऊ विल्यम आणि त्याची पत्नी म्युरीअल हे दोघंही गिलियडमधून पदवीधर झाले. त्यांना, माझ्या पूर्वीच्या प्रचार क्षेत्रात म्हणजे केनियाला पाठवण्यात आलं.
आठ वर्षे कशी भराभर निघून गेली ते कळलेच नाही; आणि १९५८ साली न्यूयॉर्क शहरात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय अधिवेशनात माझी भेट पुन्हा एकदा जीन हाईडबरोबर झाली. तेव्हा आम्ही आमची मैत्री पुन्हा सुरू केली आणि मग आमची मागणी झाली. माझी मिशनरी नेमणूक बदलली, मी मॉरिशसहून जपानला गेलो आणि तिथं १९५९ साली जीनचा व माझा विवाह झाला. हिरोशिमात आमच्या आनंदी मिशनरी कार्याची सुरवात झाली; त्या वेळेला हिरोशिमात फक्त एकच लहानशी मंडळी होती. आज त्या शहरात ३६ मंडळ्या आहेत.
सायोनारा जपान
वर्षे जसजशी सरत गेली तसतशी आमच्या दोघांची तब्यत खालावू लागली आणि यामुळे आम्हाला मिशनरी सेवा कठीण होऊ लागली; कालांतराने आम्हाला जपान सोडून जीनच्या मायदेशी, ऑस्ट्रेलियात यावे लागले. आम्ही हिरोशिमा सोडले तो दिवस दुःखाचा दिवस होता. रेल्वे स्टेशनवर आम्ही आमच्या सर्व प्रिय मित्रांना सायोनारा म्हणालो, अर्थात त्यांचा निरोप घेतला.
सध्या आम्ही ऑस्ट्रेलियात आहोत आणि आमच्या मर्यादित क्षमतांचा होता होईल तितका उपयोग करून आम्ही न्यू साऊथ वेल्सच्या प्रांतातील आर्मिडेल मंडळीत यहोवाची सेवा करत आहोत. जवळजवळ आठ दशकांपर्यंत अनेक लोकांना ख्रिस्ती सत्याच्या धनाचे वाटप करण्यात आम्हाला किती आनंद मिळाला! बायबलच्या शैक्षणिक कार्यक्रमाचा होत असलेला अद्भुत विकास शिवाय अनेक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक घटना मला पाहायला मिळाल्या आहेत. या सर्व साध्यतांचे श्रेय कोणीही मनुष्य किंवा लोक स्वतःकडे घेऊ शकत नाहीत. खरंच, मीही स्त्रोत्रकर्त्याप्रमाणे म्हणू इच्छितो: “ही परमेश्वराची करणी आहे; ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे.”—स्तोत्र ११८:२३.
[२८ पानांवरील चित्र]
आमचं चालतं-फिरतं घर आणि माझा भाऊ जॉर्ज
[२८ पानांवरील चित्र]
व्हिक्टोरिया सरोवराजवळ मी
[२९ पानांवरील चित्र]
१९३८ साली स्वाझीलँडमध्ये एका जाहीर भाषणाला आलेले उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी
[३० पानांवरील चित्रे]
जीनबरोबर, १९५९ साली आमच्या लग्नाच्या दिवशी आणि आज