व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“सर्व माणसांबरोबर पूर्ण लीनतेने” वागा

“सर्व माणसांबरोबर पूर्ण लीनतेने” वागा

“सर्व माणसांबरोबर पूर्ण लीनतेने” वागा

“त्यांना असे सुचीव की . . . विनयी, सर्व माणसांशी पूर्ण लीनतेने वागणारे असे असावे.”—तीत ३:१, २, पं.र.भा.

१. लीनता दाखवणे नेहमीच सोपे का नसते?

प्रेषित पेत्राने लिहिले, “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीहि माझे अनुकरण करणारे व्हा.” (१ करिंथकर ११:१) आज देवाचे सर्व सेवक या सल्ल्याचे पालन करण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. अर्थात हे सोपे नाही, कारण आपल्या सर्वांमध्ये आपल्या पहिल्या मातापित्याकडून मिळालेल्या स्वार्थी इच्छा व गुण आहेत जे ख्रिस्ताच्या उदाहरणाला अनुसरून नाहीत. (रोमकर ३:२३; ७:२१-२५) पण लीनता दाखवण्याच्या बाबतीत, जर आपण प्रयत्न केला तर आपण सर्वजण अवश्‍य सफल होऊ शकतो. पण केवळ आपल्या दृढ संकल्पावर अवलंबून राहणे पुरेसे नाही. मग आणखी काय करण्याची गरज आहे.

२. आपण “सर्व माणसांशी पूर्ण लीनतेने” कशाप्रकारे वागू शकतो?

देवासारखी लीनता पवित्र आत्म्याच्या फळात समाविष्ट आहे. देवाच्या सक्रिय आत्म्याच्या मार्गदर्शनाला आपण जितका अधिक प्रतिसाद देऊ तितकेच त्याचे फळ आपल्या व्यक्‍तिमत्त्वात अधिकाधिक प्रकट होईल. आणि तेव्हाच आपण सर्वांसोबत “पूर्ण लीनतेने” वागू शकू. (तिरपे वळण आमचे.) (तीत ३:२) आपण येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करून आपल्या संपर्कात येणाऱ्‍यांकरता कशाप्रकारे “विसावा” ठरू शकतो याकडे लक्ष देऊ या.—मत्तय ११:२९; गलतीकर ५:२२, २३.

कुटुंबात

३. कौटुंबिक वर्तुळातील कोणती वस्तुस्थिती जगाच्या आत्म्याचे लक्षण आहे?

लीनतेची गरज आहे असे एक क्षेत्र म्हणजे कुटुंब. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजांनुसार, स्त्रियांच्या आरोग्याला रस्त्यावरील दुर्घटना व मलेरिया या दोन्ही कारणांमुळे होत नाही तितके नुकसान कौटुंबिक हिंसाचारामुळे होते. उदाहरणार्थ, इंग्लंडमधील लंडन शहरात पोलिसात तक्रार करण्यात आलेल्या एकूण अपराधांपैकी २५ टक्के घरातील हिंसाचाराचे असतात. पोलिसांना बऱ्‍याचदा अशा लोकांना तोंड द्यावे लागते की ज्यांना ‘ओरडण्याची व निंदा’ करण्याची सवय असते. काही जोडपी ‘कटुतेमुळे’ आपल्या नातेसंबंधात वितुष्ट येऊ देतात. हे सर्व ‘जगाच्या आत्म्याचे’ लक्षण असून ख्रिस्ती कुटुंबांमध्ये अशा वागणुकीला थारा नाही.—इफिसकर ४:३१, ईझी-टू-रीड व्हर्शन; १ करिंथकर २:१२.

४. लीनतेमुळे कुटुंबात काय परिणाम होतो?

जगिक प्रवृत्तींवर मात करण्याकरता आपल्याला देवाच्या आत्म्याची गरज आहे. “जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे.” (२ करिंथकर ३:१७) प्रीती, दयाळूपणा, आत्मसंयम, आणि सहनशीलता यांमुळे अपरिपूर्ण पती पत्नींमधील एकता अधिक बळकट होते. (इफिसकर ५:३३) लीनतेमुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होते आणि अनेक कुटुंबांचा आनंद हिरावून घेणारे भांडणतंटे आणि वितुष्टे नाहीशी होतात. एक व्यक्‍ती काय बोलते हे तर महत्त्वाचे असतेच पण ती व्यक्‍ती ज्याप्रकारे आपले विचार व्यक्‍त करते त्यावरून त्यामागील खरी मनोवृत्ती प्रकट होते. चिंता व विवंचना सौम्यतेने व्यक्‍त केल्या जातात तेव्हा तणाव आपोआप कमी होतो. सुज्ञ राजा शलमोन याने म्हटले: “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.”—नीतिसूत्रे १५:१.

५. धार्मिकरित्या विभाजित कुटुंबात लीनता कशाप्रकारे एक आशीर्वाद ठरू शकते?

धार्मिकरित्या विभाजित कुटुंबात खासकरून लीनता अत्यंत महत्त्वाची आहे. लीनतेने वागण्यासोबतच जेव्हा दयाळू कृत्ये केली जातात, तेव्हा विरोध करणारे देखील यहोवाकडे आकर्षित होऊ शकतात. पेत्राने ख्रिस्ती पत्नींना पुढील सल्ला दिला: “तुम्हीहि आपआपल्या पतीच्या अधीन असा; ह्‍यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे. तुमची शोभा केसाचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे, किंवा उंची पोषाक करणे ह्‍यात बाहेरून दिसणारी नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंतःकरणांतील गुप्त मनुष्यपणाची, अविनाशी शोभा असावी.”—१ पेत्र ३:१-४.

६. लीनता दाखवल्याने आईवडील व मुलांचे नातेसंबंध कशाप्रकारे बळकट होतात?

यहोवावर प्रेम नसल्यास, आईवडिलांच्या व मुलांच्या नातेसंबंधात हमखास तणाव उत्पन्‍न होतात. पण सर्व ख्रिस्ती घराण्यांत लीनता प्रकट करण्याची गरज आहे. पौलाने पित्यांना असा सल्ला दिला: “तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिसकर ६:४) कुटुंबात लीनता दाखवली जाते तेव्हा आईवडील व मुलांचे नातेसंबंध अधिक बळकट होतात. पाच भावंडांच्या कुटुंबात वाढलेला डीन आपल्या वडिलांच्या आठवणी सांगतो: “बाबा सौम्य स्वभावाचे होते. मी किशोरावस्थेत असतानासुद्धा कधी त्यांच्यासोबत माझा वाद झाल्याचे मला आठवत नाही. राग आला तरीसुद्धा ते खूप शांत राहायचे. कधीकधी शिक्षा म्हणून ते मला माझ्या खोलीत पाठवायचे, तर कधी मला आवडणाऱ्‍या काही गोष्टी करायला मला परवानगी देत नसत, पण आमच्यात वादविवाद कधीच झाला नाही. ते फक्‍त वडीलच नव्हते, तर ते एका मित्रासारखे होते. आणि आम्हाला कधीही त्यांना निराश करायचे नव्हते.” लीनता खरोखरच आईवडील व मुलांमधील नातेसंबंध बळकट करते.

सेवेत

७, ८. क्षेत्र सेवेत लीनता दाखवणे का महत्त्वाचे आहे?

लीनता दाखवणे जेथे महत्त्वाचे आहे असे आणखी एक क्षेत्र म्हणजे क्षेत्र सेवा. राज्याची सुवार्ता इतरांना सांगताना आपल्याला निरनिराळ्या स्वभावाचे लोक भेटतात. काहीजण आपला आशादायी संदेश आनंदाने ऐकून घेतात. तर वेगवेगळ्या कारणांमुळे काहीजण आपला विरोध करतात. पण नेमक्या याच परिस्थितीत लीनता आपल्याला पृथ्वीच्या शेवटापर्यंत साक्ष देण्याचे आपल्यावर सोपवलेले कार्य पूर्ण करण्यास आपली मदत करते.—प्रेषितांची कृत्ये १:८; २ तीमथ्य ४:५.

प्रेषित पेत्राने लिहिले: “ख्रिस्ताला प्रभु म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना; आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या.” (१ पेत्र ३:१५) आपण ख्रिस्ताला अंतःकरणापासून आपला आदर्श मानत असल्यामुळे, आपल्यासोबत कठोरतेने बोलणाऱ्‍यांनाही साक्ष देताना लीनता आणि आदर दाखवण्याची आपण काळजी घेतो. अशाप्रकारे वागल्यामुळे सहसा उल्लेखनीय परिणाम दिसून येतात.

९, १०. क्षेत्र सेवाकार्यात लीनतेचे महत्त्व दाखवणारा एखादा अनुभव सांगा.

कीथ नावाच्या एका माणसाच्या घराचे दार कोणीतरी वाजवले तेव्हा त्याच्या पत्नीने दार उघडले; कीथ मागेच थांबला. घरी आलेले लोक यहोवाचे साक्षीदार आहेत हे कळल्यावर कीथच्या पत्नीने, मुलांना क्रूर वागणूक देण्याचा आरोप त्यांच्यावर लावला. बांधव शांत राहिले. त्यांनी अतिशय सौम्यतेने उत्तर दिले: “तुमचे असे मत बनले आहे याविषयी मला वाईट वाटते. यहोवाच्या साक्षीदारांचे काय विश्‍वास आहेत ते मी तुम्हाला दाखवल्यास चालेल का?” कीथ हे संभाषण ऐकत होता पण आता मात्र तो बाहेर आला आणि त्याने बांधवाला जाण्यास सांगितले.

१० घरी आलेल्या व्यक्‍तीशी आपण किती कठोरतेने वागलो याचा नंतर या जोडप्याला पस्तावा होऊ लागला. त्याच्या सौम्यतेने त्यांच्या अंतःकरणाला चटका लावला होता. आश्‍चर्य म्हणजे, पुढच्या आठवडी तो बांधव पुन्हा आला आणि या वेळी कीथ व त्याच्या पत्नीने त्याला त्याचे विश्‍वास शास्त्रवचनांच्या साहाय्याने समजावून सांगण्यास परवानगी दिली. त्यांनी नंतर सांगितले, “पुढच्या दोन वर्षांत आम्ही बऱ्‍याच इतर साक्षीदारांचेही म्हणणे ऐकून घेतले.” त्यांनी बायबल अभ्यास स्वीकारला आणि कालांतराने यहोवाला केलेले समर्पण जाहीर करण्याकरता त्या दोघांचाही बाप्तिस्मा झाला. कीथ व त्याच्या पत्नीला पहिल्यांदा भेट दिलेल्या त्या बांधवाला किती उत्तम प्रतिफळ मिळाले! बांधव या जोडप्याला अनेक वर्षांनंतर भेटले तेव्हा त्यांना कळले की आता ते आपले आध्यात्मिक बंधू व भगिनी बनले आहेत. सौम्यतेचा नेहमी विजय होतो.

११. लीनतेमुळे एखाद्या व्यक्‍तीला ख्रिस्ती सत्य स्वीकारण्याचा मार्ग कशाप्रकारे मोकळा होऊ शकतो?

११ सैनिकी पेशात आलेल्या अनुभवांमुळे हॅरल्ड नावाचा एक तरुण अतिशय कटू बनला आणि देवाच्या अस्तित्वावर शंका घेऊ लागला. या समस्यांमध्ये भर पडली ती एका दुर्घटनेमुळे. पिऊन गाडी चालवणाऱ्‍या एका चालकामुळे झालेल्या या दुर्घटनेने हॅरल्डला कायमचे अधू बनवले. यहोवाचे साक्षीदार हॅरल्डच्या घरी आले तेव्हा त्याने त्यांना येण्यास मनाई केली. पण एकदा बिल नावाचा एक साक्षीदार हॅरल्डच्या घरापासून अगदी जवळच राहणाऱ्‍या एका आस्थेवाईक व्यक्‍तीकडे आला. चुकून बिलने हॅरल्डच्या घराचे दार वाजवले. दोन काठ्यांच्या साहाय्याने चालून हॅरल्ड दारापर्यंत आला व त्याने दार उघडले, तेव्हा बिलने लगेच क्षमा मागितली आणि आपण खरे तर जवळच्या एका घरी आलो होतो असे स्पष्टीकरण दिले. हॅरल्डची प्रतिक्रिया काय होती? बिलला कल्पना नव्हती, पण हॅरल्डने अलीकडेच टीव्हीवर यहोवाच्या साक्षीदारांनी कशाप्रकारे अगदी कमी वेळात एक नवे राज्य सभागृह बांधले याविषयी एक कार्यक्रम पाहिला होता. इतके लोक एकतेने काम करतात हे पाहून हॅरल्डच्या मनावर छाप पडली होती आणि साक्षीदारांच्या प्रती त्याची मनोवृत्ती बदलली होती. बिलचे विनम्रपणे माफी मागणे, त्याचे सौम्य वर्तन या सर्वामुळे हॅरल्डच्या मनात बदल घडून आला आणि त्याने साक्षीदारांना आपल्याकडे येण्याची परवानगी दिली. त्याने बायबलचा अभ्यास केला, प्रगती केली आणि बाप्तिस्मा घेऊन यहोवाचा एक सेवक बनला.

मंडळीत

१२. ख्रिस्ती मंडळीच्या सदस्यांनी कोणत्या जगीक प्रवृत्ती टाळल्या पाहिजेत?

१२ लीनता जेथे अत्यावश्‍यक आहे असे आणखी एक क्षेत्र म्हणजे ख्रिस्ती मंडळी. आजकालच्या समाजात मतभेद अगदी सर्रास होतात. जीवनाकडे जगीक दृष्टिकोनातून पाहणाऱ्‍यांकरता वादविवाद, बाचाबाची, भांडणतंटे यात काही गैर वाटत नाही. कधीकधी अशाप्रकारच्या जगीक प्रवृत्ती ख्रिस्ती मंडळीतही दिसून येतात आणि यामुळे भांडणे व शाब्दिक युद्ध होतात. अशाप्रकारच्या समस्या मिटवताना जबाबदार पदावर असलेल्या बांधवांना खरे तर खूप वाईट वाटते. पण यहोवा व आपले बांधव यांच्याविषयी प्रेम असल्यामुळे ते चुकलेल्या व्यक्‍तींना परत मिळवण्याचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त होतात.—गलतीकर ५:२५, २६.

१३, १४. ‘विरोध करणाऱ्‍यांना सौम्यतेने शिक्षण दिल्याने’ कोणता परिणाम घडून येण्याची शक्यता आहे?

१३ पहिल्या शतकात, पौल व त्याचा साथीदार तीमथ्य यांचा मंडळीत काहीजणांसोबत मतभेद होता. पौलाने तीमथ्याला अशा बांधवांपासून सांभाळून राहण्यास सांगितले की जे “हलक्या कार्यासाठी” असलेल्या पात्रांसारखे होते. पौलाने समजावून सांगितले, “प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यात निपुण, सहनशील, विरोध करणाऱ्‍यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे.” रागातही जेव्हा आपण सौम्यपणे वागतो तेव्हा विरोध करणाऱ्‍यांना आपोआपच आपल्या टीकेविषयी पुनर्विचार करण्याची संधी मिळते. यामुळे कदाचित, पौलाने पुढे म्हटल्याप्रमाणे यहोवा “त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्‍चात्तापबुद्धि देईल.” (२ तीमथ्य २:२०, २१, २४, २५) सौम्यता व आत्मसंयमाचा लीनतेशी संबंध असल्याचे पौल दाखवतो.

१४ पौल आपल्या शिकवणुकीप्रमाणे वागत देखील होता. करिंथच्या मंडळीतील ‘अतिश्रेष्ठ प्रेषितांसोबत’ व्यवहार करताना त्याने बांधवांना असे प्रोत्साहन दिले: “मी पौल तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, परंतु दूर असताना तुमच्याशी कडकपणे वागतो; तो मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हाला विनंती करितो.” (२ करिंथकर १०:१; ११:५) पौलाने खरोखरच ख्रिस्ताचे अनुकरण केले. त्याने ख्रिस्ताच्या “सौम्यतेने” या बांधवांना विनंती केली. अशारितीने त्याने वर्चस्व गाजवण्याची व अहंकारी प्रवृत्ती टाळली. मंडळीतील संवेदनाक्षम हृदयाच्या लोकांना निश्‍चितच त्याची ही विनंती अपीलकारक वाटली असेल. त्याने तणावपूर्ण संबंध सुरळीत करण्याद्वारे मंडळीत शांती व एकता कायम केली. या त्याच्या कार्याचे आपण सर्वजण अनुकरण करू शकत नाही का? वडिलांनी खासकरून आपल्या वागणुकीत ख्रिस्त व पौल यांच्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे.

१५. मार्गदर्शन देताना लीनता दाखवणे का महत्त्वाचे आहे?

१५ इतरांना मदत करण्याची जबाबदारी ही केवळ मंडळीतील शांती व एकता धोक्यात येते तेव्हापुरतीच नाही. नातेसंबंधांत तणाव निर्माण होण्याआधीच बांधवांना प्रेमळ मार्गदर्शन देण्याची आवश्‍यकता आहे. पौलाने म्हटले: “बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहा ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा.” पण कसे? “सौम्य वृत्तीने” तसेच ‘आपण परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष’ दिले पाहिजे. (गलतीकर ६:१) ‘सौम्य वृत्ती’ राखणे नेहमीच सोपे नसते, कारण नियुक्‍त पुरुषांसहित सर्व ख्रिस्ती पापपूर्ण प्रवृत्तींशी झगडत आहेत. पण लीनतेमुळेच, चूक करणाऱ्‍या व्यक्‍तीला ताळ्यावर येण्यास मदत मिळेल.

१६, १७. सल्ल्याचे पालन करण्यास एखादी व्यक्‍ती प्रतिकार करत असल्यास कोणती गोष्ट सहायक ठरेल?

१६ मूळ ग्रीक भाषेत ‘ताळ्यावर आणणे’ असे भाषांतर केलेला शब्द मोडलेली हाडे सांधण्याच्या वेदनामय प्रक्रियेशी संबंधित होता. समंजस डॉक्टर मोडलेले हाड सांधणे किती फायदेकारक आहे हे सांगून रुग्णाला दिलासा देतो. त्याचा शांत स्वभाव रुग्णाकरता सांत्वनदायक असतो. सुरवातीलाच दोन शब्द बोलल्याने अतिशय वेदनामय प्रक्रियाही थोडी सुसह्‍य होते. त्याचप्रकारे आध्यात्मिकरित्या ताळ्यावर आणणे देखील वेदनामय असू शकते. पण लीनतेने वागल्यास ती सुधारणूक स्वीकारणे सोपे जाते आणि अशारितीने चांगले संबंध पुनःस्थापित होऊन चुकीच्या मार्गाने गेलेल्या व्यक्‍तीला स्वतःत बदल करण्यासाठी मार्ग मोकळा होतो. सुरवातीला एखादी व्यक्‍ती मार्गदर्शन स्वीकारण्यास थोडा प्रतिकार करत असली तरीसुद्धा मदत देणाऱ्‍याने लीनता दाखवल्यामुळे बायबलमधील उपयुक्‍त सल्ला अनुसरण्यास ती तयार होते.—नीतिसूत्रे २५:१५.

१७ एखाद्या व्यक्‍तीला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करत असताना, तुमच्या मार्गदर्शनाला टीका समजले जाण्याची भीती असते. एका लेखकाने अशाप्रकारे म्हटले: “अनावश्‍यकपणे स्वतःची मते पुढे करण्याचा सर्वाधिक धोका आणि त्यामुळे लीनतेची सर्वात अधिक गरज आपल्याला केव्हा असते, तर इतरांना त्यांच्या चुका दाखवताना.” नम्रतेतून निर्माण होणारी लीनता आत्मसात केल्यामुळे सल्ला देणाऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तीला हा धोका टाळण्यास मदत मिळेल.

“सर्व माणसांबरोबर”

१८, १९. (अ) प्रापंचिक अधिकाऱ्‍यांशी व्यवहार करताना लीनता दाखवणे ख्रिश्‍चनांना कठीण का वाटू शकते? (ब) अधिकारपदी असलेल्यांशी लीनतेने वागण्यास कोणती गोष्ट ख्रिश्‍चनांना मदत करेल आणि याचा काय परिणाम होऊ शकतो?

१८ लीनता दाखवणे बऱ्‍याच जणांना कठीण जाते असे एक क्षेत्र म्हणजे प्रापंचिक अधिकाऱ्‍यांशी व्यवहार करताना. अर्थात, अधिकारपदी असलेल्या काहींची वागणूक कठोर आणि अविचारी असते यात शंका नाही. (उपदेशक ४:१; ८:९) पण यहोवाबद्दल असलेले प्रेम आपल्याला त्याचा सर्वथोर अधिकार स्वीकारून सरकारी अधिकाऱ्‍यांना त्यांच्या हक्काची सापेक्ष अधीनता दाखवण्यास मदत करेल. (रोमकर १३:१, ४; १ तीमथ्य २:१, २) वरिष्ठ पदांवर असलेले अधिकारी यहोवाच्या जाहीर उपासनेवर बंधने लावण्याचा प्रयत्न करतात तेव्हासुद्धा आपण स्तुतीचा यज्ञ अर्पण करण्याचे मार्ग आनंदाने शोधत राहतो.—इब्री लोकांस १३:१५.

१९ कोणत्याही परिस्थितीत आपण भांडखोर प्रवृत्ती दाखवत नाही. तर नीतिमान तत्त्वांशी हातमिळवणी न करता आपण माफक दृष्टिकोन राखण्याचा प्रयत्न करतो. अशारितीने आपले बंधूभगिनी जगभरातील २३४ देशांत प्रचार कार्य अविरत करण्यात यशस्वी झाले आहेत. आपण पौलाच्या पुढील सल्ल्याचे पालन करतो, “सत्ता व अधिकारी यांच्या अधीन राहावे. अधिकाऱ्‍यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला तयार असावे, कोणाची निंदा करू नये, न भांडणारे, विनयी, सर्व माणसांशी पूर्ण लीनतेने वागणारे असे असावे.”—तीत ३:१, २.

२०. लीनता दाखवणाऱ्‍यांना कोणती प्रतिफळे मिळतील?

२० लीनता दाखवणाऱ्‍यांकरता विपुल आशीर्वाद राखून ठेवले आहेत. येशूने म्हटले: “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” (मत्तय ५:५) ख्रिस्ताच्या आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या बांधवांकरता, आनंदी राहण्यासाठी व देवाच्या राज्याच्या पार्थिव क्षेत्रावर शासन करण्याचा विशेषाधिकार मिळवण्यासाठी लीनता प्रदर्शित करणे अत्यावश्‍यक आहे. ‘दुसऱ्‍या मेंढरांचा’ ‘मोठा लोकसमुदाय’ देखील सदोदित लीनता दाखवतो आणि पृथ्वीवरील परादीसात राहण्याची आशा बाळगतो. (प्रकटीकरण ७:९; योहान १०:१६; स्तोत्र ३७:११) किती अद्‌भुत आशीर्वाद राखून ठेवले आहेत! तर मग आपण पौलाने इफिस येथील ख्रिश्‍चनांना दिलेला सल्ला कधीही विसरू नये: ‘जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हास विनंती करतो की, ज्या बोलावण्याने तुम्हास बोलावले होते त्याला योग्य असे तुम्ही सर्व नम्रतेने व लीनतेने चालावे.’—इफिसकर ४:१, २, पं.र.भा.

उजळणी

• खालील क्षेत्रांत लीनता दाखवल्यामुळे कोणते आशीर्वाद प्राप्त होतात

• कुटुंबात?

• क्षेत्र सेवेत?

• मंडळीत?

• लीन प्रवृत्ती राखल्यास कोणते आशीर्वाद मिळण्याची हमी आपल्याला देण्यात आली आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्र]

धार्मिक ऐक्य नसलेल्या घरांत लीनता खासकरून महत्त्वाची आहे

[२१ पानांवरील चित्र]

लीनतेने कौटुंबिक नातेसंबंध दृढ होतात

[२३ पानांवरील चित्र]

लीनतेने व भीडस्तपणाने उत्तर द्या

[२४ पानांवरील चित्र]

सल्ला देणाऱ्‍या व्यक्‍तीच्या लीनतेमुळे चुकीच्या मार्गाने चालणाऱ्‍यांना मदत होऊ शकते