‘चांगला विवेकभाव’ ठेवा
‘चांगला विवेकभाव’ ठेवा
“ऐ कावे जनाचे, करावे मनाचे” हा एक सर्वसामान्य सल्ला आहे. परंतु आपल्या मनाने किंवा विवेकाने विश्वसनीय मार्गदर्शक होण्यासाठी त्याला बरोबर आणि चूक यांसंबंधाने उचित प्रशिक्षण मिळाले पाहिजे आणि ते आपल्याला कोठे नेत आहे याची आपल्याला जाणीव असली पाहिजे.
बायबलमधील जक्कय नामक एका मनुष्याच्या अनुभवाचा विचार करा. यरीहोत राहणारा जक्कय मुख्य जकातदार होता आणि तो श्रीमंतही होता. त्याने स्वतःच म्हटल्याप्रमाणे, त्याने लोकांकडून पैसा उकळून अमाप संपत्ती मिळवली होती. अर्थातच, यामुळे अनेक लोकांचे नुकसान झाले असावे. पण आपल्या या वाईट कृत्यांमुळे जक्कयचा विवेक त्याला बोचत होता का? बोचत असला तरी त्याने त्याकडे दुर्लक्ष केले असावे.—लूक १९:१-७.
परंतु जक्कयच्या जीवनात अशी एक परिस्थिती उद्भवली जिच्यामुळे त्याने आपली जीवनशैली बदलली. येशू यरीहोस आला होता. जक्कयला येशूला पाहायचे होते पण तो ठेंगणा होता आणि गर्दीमुळे तो येशूला पाहू शकत नव्हता. त्यामुळे तो पुढे पळत गेला आणि येशूला पाहता येईल अशा उंच ठिकाणी म्हणजे एका झाडावर चढला. जक्कयची ही उत्सुकता पाहून येशू प्रभावीत झाला आणि त्याने त्याला, आपण तुझ्या घरी येऊ असे सांगितले. जक्कयने या नामांकित पाहुण्याचे स्वागत केले.
येशूच्या सहवासात जक्कयने जे काही पाहिले व ऐकले त्यामुळे तो खूप प्रभावीत झाला आणि आपले मार्गाक्रमण बदलण्यास प्रवृत्त झाला. तो म्हणाला: “प्रभुजी, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करितो.”—लूक १९:८.
जक्कयचा विवेक जागा झाला होता, त्याने आपल्या विवेकाची हाक ऐकली आणि त्याला प्रतिसाद दिला. यामुळे झालेले चांगले परिणाम दूरगामी ठरले. “आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे,” असे जेव्हा येशूने जक्कयला म्हटले तेव्हा त्याला कसे वाटले असेल याची कल्पना करा!—लूक १९:९.
किती प्रोत्साहनदायक उदाहरण! आपण कोणतेही मार्गाक्रमण करत असलो तरी बदलू शकतो, हे या उदाहरणावरून दिसून येते. जक्कयप्रमाणे आपण देखील बायबलमध्ये लिहून ठेवलेल्या येशूच्या शब्दांकडे लक्ष देऊन बरोबर आणि चूक यासंबंधाने आपला विवेक प्रशिक्षित करू शकतो. मग आपणही प्रेषित पेत्राने आर्जवल्याप्रमाणे ‘चांगला विवेकभाव’ ठेवू शकू. आणि आपल्या प्रशिक्षित विवेकाचे ऐकून जे बरोबर आहे ते करू शकू.—१ पेत्र ३:१६, पं.र.भा.