व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दुःखी जनांना सांत्वन द्या

दुःखी जनांना सांत्वन द्या

दुःखी जनांना सांत्वन द्या

‘शोकग्रस्तांचे सांत्वन करावे म्हणून परमेश्‍वराने मला अभिषेक केला आहे.’ —यशया ६१:१, २.

१, २. आपण कोणाला सांत्वन द्यावे आणि का?

खरा सांत्वनदाता देव यहोवा आपल्याला इतरांच्या संकटात त्यांची काळजी वाहण्यास शिकवतो. तो आपल्याला ‘जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर देण्यास,’ शोकग्रस्त असलेल्या सर्वांना सांत्वन देण्यास शिकवतो. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) अशा मदतीची गरज असते तेव्हा आपण आपल्या सहउपासकांना ती पुरवतो. मंडळीच्या बाहेर असलेल्या लोकांनाही, इतकेच काय तर ज्यांना गतकाळात आपल्याबद्दल प्रेम असल्याचे कधीही दाखवले नाही अशांनाही आपण प्रेम दाखवतो.—मत्तय ५:४३-४८; गलतीकर ६:१०.

येशू ख्रिस्ताने पुढील भविष्यसूचक नेमणुकीविषयी वाचून ते शब्द स्वतःवर लागू केले: “प्रभु परमेश्‍वराचा आत्मा मजवर आला आहे; कारण दीनांस शुभवृत्त सांगण्यास परमेश्‍वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयी जनांस पट्टी बांधावी . . . सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे . . . म्हणून त्याने मला पाठविले आहे.” (यशया ६१:१-३; लूक ४:१६-१९) आधुनिक काळातील ख्रिस्ती लोकांनी बऱ्‍याच काळापासून ओळखले आहे की हे शब्द त्यांनाही लागू होतात आणि ‘दुसऱ्‍या मेंढरांतील’ सदस्यांनी आनंदाने या कार्यात त्यांना साथ दिली आहे.—योहान १०:१६.

३. “देव अशी संकटे का येऊ देतो,” असे कोणी विचारल्यास आपण त्यांना कशी मदत करू शकतो?

विपत्ती येतात आणि लोक दुःखित होतात तेव्हा सहसा ते विचार करतात, की ‘देव अशी संकटे का येऊ देतो?’ बायबल या प्रश्‍नाचे स्पष्टपणे उत्तर देते. पण ज्या व्यक्‍तीने बायबलचा अभ्यास केलेला नाही त्यांना या प्रश्‍नाचे उत्तर पूर्णपणे समजायला थोडा वेळ लागू शकतो. यहोवाच्या साक्षीदारांची प्रकाशने यासाठी साहाय्यक ठरू शकतील. * पण सुरवातीला केवळ यशया ६१:१, २ यांसारखी वचने बायबलमधून वाचून दाखवल्यामुळेही काहींना सांत्वन मिळाले आहे कारण या वचनांवरून देवाला मानवांना सांत्वन देण्याची इच्छा व्यक्‍त होते.

४. पोलंडमधील एका साक्षीदार बहिणीला एका दुःखी शाळकरी मुलीला कशाप्रकारे मदत करता आली आणि हा अनुभव तुम्हाला इतरांना मदत करण्याकरता कशाप्रकारे सहायक ठरू शकतो?

सर्व अबालवृद्धांना सांत्वनाची गरज आहे. पोलंड येथे एका दुःखी किशोरवयीन मुलीने आपल्या ओळखीच्या व्यक्‍तीला सल्ला मागितला. ही ओळखीची व्यक्‍ती यहोवाची साक्षीदार आहे आणि तिने या मुलीची प्रेमळपणे विचारपूस केली तेव्हा तिला कळले की ही मुलगी कितीतरी प्रश्‍नांनी आणि शंकांनी बेजार झालेली होती: “जगात इतके पाप का आहे? लोकांना दुःख का सहन करावे लागते? माझ्या पांगळ्या बहिणीच्या वाट्याला इतके दुःख का? मला हृदयाचा विकार का आहे? चर्च शिकवते की सर्व देवाची मर्जी आहे. पण हे खरे असेल तर मी त्याला मानू इच्छित नाही!” साक्षीदार बहिणीने मनोमन यहोवाला प्रार्थना केली आणि मग तिने म्हटले: “तू मला हे सारे प्रश्‍न विचारले हे फार बरे केले. मी तुला यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करते.” मग तिने त्या मुलीला सांगितले की लहानपणी तिला देखील मनात बऱ्‍याच शंकाकुशंका होत्या ज्या यहोवाच्या साक्षीदारांनी दूर केल्या. तिने खुलासा करून सांगितले: “मला कळले की देव लोकांना दुःख भोगायला लावत नाही. तो तर त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्याकरता सर्वात चांगले काय ठरेल याचाच नेहमी विचार करतो आणि लवकरच तो पृथ्वीवर मोठा बदल घडवून आणणार आहे. आजारपण, म्हातारपणाच्या समस्या, व मृत्यू कायमचा नाहीसा होईल आणि आज्ञाधारक लोक सदासर्वकाळ—याच पृथ्वीग्रहावर जगतील.” तिने या मुलीला प्रकटीकरण २१:३, ४; ईयोब ३३:२५; यशया ३५:५-७ आणि ६५:२१-२५ दाखवले. बराच वेळ चर्चा केल्यानंतर त्या मुलीने सुटकेचा निःश्‍वास सोडला, व ती म्हणाली: “आता मला कळले की मी का जगतेय. मी पुन्हा तुम्हाला भेटायला आले तर चालेल का?” तिच्यासोबत आठवड्यातून दोन वेळा बायबल अभ्यास घेण्यात येऊ लागला.

देवाकडील सांत्वनाने

५. सहानुभूती व्यक्‍त करताना कशामुळे खरे सांत्वन मिळेल?

आपण इतरांना सांत्वन देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सहानुभूतिपर शब्दांत त्यांच्याशी बोलणे निश्‍चितच योग्य आहे. आपल्या शब्दांतून आणि स्वरातून आपण दुःखी व्यक्‍तीला हे सांगण्याचा प्रयत्न करतो की तिच्या परिस्थितीविषयी आपल्याला हळहळ वाटते. पण केवळ वरवर दुःख व्यक्‍त केल्याने आपण हे साध्य करू शकत नाही. बायबल आपल्याला सांगते की “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी.” (तिरपे वळण आमचे.) (रोमकर १५:४) त्याअर्थी, उचित वेळी आपण त्या व्यक्‍तीला देवाच्या राज्याविषयी सांगू शकतो आणि आजच्या जगातील सर्व समस्या या राज्याद्वारे कशा दूर केल्या जातील हे बायबलमधून दाखवू शकतो. मग आपण तिला, ही आशा विश्‍वासार्ह का आहे हे पटवून सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. अशारितीने आपण तिला सांत्वन देऊ शकतो.

६. आपण लोकांना काय समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो जेणेकरून त्यांना शास्त्रवचनांतून खऱ्‍या अर्थाने सांत्वन मिळू शकेल?

दिलेल्या सांत्वनाचा खरोखर परिणाम होण्याकरता एका व्यक्‍तीला हे जाणून घेणे गरजेचे आहे की खरा देव कोण आहे, त्याचे व्यक्‍तिमत्त्व कसे आहे आणि त्याच्या प्रतिज्ञा विश्‍वसनीय आहेत किंवा नाहीत. सध्या यहोवाची उपासना करत नाही अशा व्यक्‍तीला मदत करताना पुढील मुद्दे स्पष्ट करणे योग्य ठरेल. (१) बायबलमधील सांत्वन खरा देव, यहोवा याच्याकडून मिळते. (२) यहोवा सर्वसमर्थ आहे, स्वर्ग व पृथ्वीचा निर्माणकर्ता आहे. तो प्रेमळ देव आहे आणि प्रेम-दया व सत्य या गुणांनी परिपूर्ण आहे. (३) देवाच्या वचनातील अचूक ज्ञान घेण्याद्वारे त्याच्या जवळ गेल्यास आपल्याला कठीण परिस्थितीला तोंड देण्याचे सामर्थ्य मिळू शकते. (४) बायबलमध्ये वेगवेगळ्या व्यक्‍तींनी तोंड दिलेल्या विशिष्ट परीक्षांशी संबंधित शास्त्रवचने आहेत.

७. (अ) देवाकडील सांत्वन ‘ख्रिस्ताच्या द्वारे पुष्कळ होते’ यावर जोर दिल्याने काय साध्य होऊ शकते? (ब) आपण चुका केल्या आहेत याची जाणीव असलेल्या व्यक्‍तीला तुम्ही कशाप्रकारे सांत्वन देऊ शकता?

ज्यांना बायबलविषयी ज्ञान आहे अशा व्यक्‍तींना २ करिंथकर १:३-७ हे वचन वाचून दाखवल्यामुळे काही जणांना आध्यात्मिक प्रोत्साहन देता आले आहे. हे वचन वाचताना त्यांनी खासकरून, “ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनहि पुष्कळ होते,” या शब्दांवर अधिक जोर दिला. (तिरपे वळण आमचे.) हे वचन एका व्यक्‍तीला हे समजून घेण्यास मदत करू शकते की बायबल सांत्वन देणारा ग्रंथ असून त्याकडे आपण अधिक लक्ष दिले पाहिजे. तसेच हे वचन पुढील चर्चेकरता, कदाचित दुसऱ्‍या भेटींत बोलण्याकरता एक आधार ठरू शकते. जर एखाद्या व्यक्‍तीला असे वाटते की आपल्यावर आलेली संकटे आपण केलेल्या वाईट गोष्टींमुळे आहेत तर मग, तिला दोषी न ठरवता, आपण १ योहान २:१, २ व स्तोत्र १०३:११-१४ या वचनातील माहिती किती सांत्वनदायक आहे हे तिला सांगू शकतो. या मार्गांनी, देवाने आपल्याला दिलेल्या सांत्वनाच्या योगे आपण इतरांनाही सांत्वन देऊ शकतो.

हिंसाचार किंवा आर्थिक संकटांचे सावट येते तेव्हा

८, ९. हिंसाचाराला बळी पडलेल्यांना योग्यप्रकारे सांत्वन कसे देता येते?

कोट्यवधी लोकांच्या जीवनावर हिंसाचाराचा दुष्परिणाम झाला आहे—हिंसक गुन्हेगारीमुळे अथवा युद्धातील हिंसाचारामुळे. आपण या लोकांना कशाप्रकारे सांत्वन देऊ शकतो?

खरे ख्रिस्ती आपल्या शब्दांतून अथवा कृतींद्वारे जगातील संघर्षांत कोणत्याही विशिष्ट गटाचा पक्ष न घेण्याची काळजी घेतात. (योहान १७:१६) तर बायबलचा योग्य वापर करून ते दाखवतात की सध्याची दुष्ट परिस्थिती सर्वकाळ राहणार नाही. हिंसाचाराची आवड धरणाऱ्‍यांविषयी यहोवाला कसे वाटते हे दाखवण्याकरता ते स्तोत्र ११:५ वाचू शकतात किंवा सूडभावनेने कार्य न करता देवावर भरवसा ठेवण्याकरता तो कशाप्रकारे आपल्याला प्रोत्साहन देतो हे स्तोत्र ३७:१-४ यातून दाखवू शकतात. स्तोत्र ७२:१२-१४ ही वचने दाखवतात की हिंसाचाराला बळी पडलेल्यांविषयी, सध्या स्वर्गीय राजा या नात्याने राज्य करत असलेला थोर शलमोन, येशू ख्रिस्त याच्या कशा भावना आहेत.

१०. तुम्ही अनेक वर्षांपासून युद्धाच्या परिस्थितीत दिवस कंठले असतील तर उल्लेखित शास्त्रवचनांचा तुम्हाला कशाप्रकारे फायदा होऊ शकतो?

१० एकमेकांवर वर्चस्व मिळवू पाहणाऱ्‍या पक्षांच्या संघर्षात काही लोकांनी वर्षानुवर्षे दिवस काढले आहेत. त्यांनी, युद्ध व त्याच्या दुष्परिणामांना जीवनाचा अविभाज्य अंग मानले आहे. त्यांच्याकरता या परिस्थितीतून सुटका मिळवण्याचा एकच मार्ग म्हणजे दुसऱ्‍या देशात पळून जाणे हा आहे. पण बहुतेक जण असे करण्यात यशस्वी होत नाहीत; ज्यांनी प्रयत्न केला त्यांपैकी काही जणांना आपला जीव गमवावा लागला. जे यशस्वी होतातही त्यांना नवीन ठिकाणी नवीन समस्यांना तोंड द्यावे लागते. स्तोत्र १४६:३-६ या वचनांच्या मदतीने या लोकांना हे समजण्यास मदत केली जाऊ शकते, की देशान्तर करण्यापेक्षा त्यांनी अधिक विश्‍वासार्ह गोष्टींची आशा करावी. मत्तय २४:३, ७, १४ किंवा २ तीमथ्य ३:१-५ येथील भविष्यवाण्यांच्या मदतीने त्यांना सद्य परिस्थितीविषयी, आपल्याला सहन कराव्या लागणाऱ्‍या समस्यांचे कारण आणि खासकरून आपण या जुन्या व्यवस्थीकरणाच्या अंतसमयात जगत आहोत ही वस्तुस्थिती नीट समजून घेण्यास मदत होऊ शकते. स्तोत्र ४६:१-३, ८, ९ आणि यशया २:२-४ ही वचने त्यांना जाणीव करून देतील की भविष्यात शांतीपूर्ण परिस्थिती येण्याची खरोखरच आशा आहे.

११. पश्‍चिम आफ्रिकेतील एका स्त्रीला कोणत्या शास्त्रवचनांमुळे सांत्वन मिळाले आणि का?

११ पश्‍चिम आफ्रिकेत अनेक वर्षांपासून चाललेल्या युद्धादरम्यान एका स्त्रीने चहूकडून बंदूकींच्या गोळ्यांची बरसात होत असताना आपल्या घरातून पळ काढला. तिच्या जीवनात केवळ भीती, दुःख आणि हृदयद्रावक निराशा होती. नंतर, ती आपल्या कुटुंबासोबत दुसऱ्‍या एका देशात राहत होती तेव्हा तिच्या पतीने त्यांच्या लग्नाचे सर्टिफिकेट जाळून टाकले आणि ती गरोदर असूनसुद्धा तिला त्यांच्या १० वर्षीय मुलासोबत घरातून काढून टाकले आणि स्वतः एक पाळक बनला. या स्त्रीला फिलिप्पैकर ४:६, ७ आणि स्तोत्र ५५:२२ आणि टेहळणी बुरूज सावध राहा! नियतकालिकातील शास्त्रवचनीय लेख वाचून दाखवण्यात आले तेव्हा तिला सांत्वन व जीवनात एक उद्देश मिळाला.

१२. (अ) आर्थिकरित्या कठीण परिस्थितीला तोंड देत असलेल्यांना शास्त्रवचनांतून काय सांत्वन मिळते? (ब) आशियातील एक साक्षीदार बहीण एका महिलेला कशाप्रकारे मदत करू शकली?

१२ आर्थिक नुकसानामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन अतिशय विस्कळीत झाले आहे. कधीकधी युद्ध व युद्धानंतरच्या परिस्थितीमुळे या समस्या निर्माण होतात. तर कधी नुकसानकारक सरकारी धोरणे आणि सत्ताधारी वर्गाच्या स्वार्थामुळे व बेईमानीमुळे कित्येक लोकांना आपल्या सर्व आयुष्याच्या बचतीला मुकावे लागले आहे आणि आपल्या मालमत्तेची आहुती द्यावी लागली आहे. इतरांना या जगाच्या सुखसोयींचा कधीच अनुभव घेता आलेला नाही. या सर्वांना हे जाणून सांत्वन मिळू शकते की जे देवावर विश्‍वास ठेवतात त्यांना तो एका नीतिमान नव्या जगाचे आश्‍वासन देतो ज्यात सर्वांना आपल्या हातच्या परिश्रमाचे फळ मिळेल. (स्तोत्र १४६:६, ७; यशया ६५:१७, २१-२३; २ पेत्र ३:१३) एका आशियाई देशात एका साक्षीदार बहिणीकडे तिच्या एका ग्राहक महिलेने तेथील आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्‍त केली तेव्हा बहिणीने तिला समजावून सांगितले की त्यांच्या देशात जे काही घडत आहे ते सबंध जगातील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचा भाग आहे. मत्तय २४:३-१४ व स्तोत्र ३७:९-११ या वचनांची चर्चा केल्यानंतर एक नियमित बायबल अभ्यास सुरू करण्यात आला.

१३. (अ) पोकळ आश्‍वासनांमुळे लोकांची निराशा होते तेव्हा आपण त्यांना मदत करण्यासाठी बायबलचा कशाप्रकारे उपयोग करू शकतो? (ब) वाईट परिस्थिती ही देव नसल्याचा पुरावा आहे असे लोकांना वाटत असल्यास तुम्ही त्यांच्यासोबत कशाप्रकारे युक्‍तिवाद करण्याचा प्रयत्न करू शकता?

१३ लोकांना अनेक वर्षांपर्यंत दुःख सहन करावे लागते किंवा अनेक पोकळ आश्‍वासनांमुळे त्यांची निराशा होते तेव्हा ते देखील ईजिप्तमध्ये राहणाऱ्‍या इस्राएल लोकांप्रमाणे होतात ज्यांनी “आपल्या मनाच्या संतापामुळे” मोशेचे ऐकले नाही. (निर्गम ६:९) अशा वेळी, बायबलच्या मदतीने त्यांना कशाप्रकारे आपल्या सध्याच्या समस्यांवर मात करता येईल आणि अनेक लोकांच्या जीवनात ज्यांमुळे समस्या निर्माण होतात अशा चुका कशा टाळता येतील यावर जोर देणे उपयुक्‍त ठरेल. (१ तीमथ्य ४:८ब) आपण ज्यांत जगत आहोत त्या वाईट परिस्थितीकडे पाहून काहीजण अशा निष्कर्षावर येतात की देव अस्तित्वातच नाही आणि असला तरी त्याला त्यांची पर्वा नाही. अशा लोकांशी योग्य वचनांच्या आधारावर युक्‍तिवाद करण्याद्वारे तुम्ही त्यांना हे समजण्यास मदत करू शकता की देवाने मदत पुरवली आहे पण बऱ्‍याच जणांनी ती स्वीकारण्याची तयारी दाखवलेली नाही.—यशया ४८:१७, १८.

वादळे व भूकंपांना तोंड देताना

१४, १५. एका विपत्तीमुळे अनेक जणांना धक्का बसला तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांनी कशाप्रकारे आपली काळजी व्यक्‍त केली?

१४ वादळ किंवा भूकंप येतो किंवा आगीची दुर्घटना अथवा बॉम्बस्फोट होतो तेव्हा अर्थातच मोठी विपत्ती येते. अनेक लोक शोकाकूल होतात. जिवंत बचावलेल्यांना कशाप्रकारे सांत्वन दिले जाऊ शकते?

१५ आपली कोणाला काळजी आहे हे लोकांना समजणे आवश्‍यक आहे. एका देशात अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा अनेकांना जबरदस्त धक्का बसला. बऱ्‍याच जणांच्या कौटुंबिक सदस्यांचा, घरच्या कर्त्या व्यक्‍तीचा, किंवा मित्रांचा मृत्यू झाला, अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन आणि जी काही सुरक्षिततेची जाणीव त्यांना होती ती कायमची गेली. यहोवाचे साक्षीदार आपापल्या परिसरातील लोकांना मदत करण्याकरता पुढे आले, त्यांनी लोकांकडे जाऊन त्यांची सहानुभूतीने विचारपूस केली आणि बायबलमधून त्यांना सांत्वनाची वचने दाखवली. या दाखवलेल्या काळजीबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्‍त केली.

१६. एल साल्वाडोर येथे विपत्ती आली तेव्हा स्थानिक साक्षीदारांनी केलेले साक्षकार्य अतिशय परिणामकारक का ठरले?

१६ एल साल्वाडोर येथे २००१ साली आलेल्या एका मोठ्या भूकंपानंतर एक प्रचंड दरड कोसळल्यामुळे अनेक जण दगावले. एका साक्षीदार स्त्रीच्या २५ वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या होणाऱ्‍या बायकोच्या दोन बहिणींचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. त्या तरुणाची आई आणि त्याची होणार असलेली बायको यांनी लगेच स्वतःला क्षेत्र सेवेत व्यस्त केले. अनेकांनी त्यांना म्हटले की देवानेच त्यांच्या प्रियजनांना नेले होते आणि ही त्याचीच मर्जी होती. पण या साक्षीदार बहिणींनी नीतिसूत्रे १०:२२ या वचनातील शब्दांद्वारे दाखवले की आपल्याला दुःख व्हावे ही देवाची इच्छा नाही. त्यांनी रोमकर ५:१२ वाचून स्पष्ट केले की मरण हे देवाच्या मर्जीने नव्हे तर मनुष्याच्या पापामुळेच अस्तित्वात आले. तसेच त्यांनी स्तोत्र ३४:१८, स्तोत्र ३७:२९, यशया २५:८ आणि प्रकटीकरण २१:३, ४ या वचनांतूनही सांत्वन देण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही स्त्रियांचे स्वतःचे कौटुंबिक सदस्य या दुर्घटनेत बळी पडले असल्यामुळे, लोकांनी त्यांचे उत्सुकतेने ऐकून घेतले आणि अनेक बायबल अभ्यास सुरू करण्यात आले.

१७. संकटाच्या काळात आपण कशाप्रकारची मदत देऊ शकतो?

१७ विपत्ती येते तेव्हा कदाचित तुम्हाला एखादी अशी व्यक्‍ती भेटू शकते जिला शारीरिक स्वरूपाच्या मदतीची गरज असू शकते. कदाचित डॉक्टरला बोलवायचे असेल किंवा त्या व्यक्‍तीला इस्पितळात न्यायला मदत करायची असेल किंवा अन्‍न व निवारा पुरवण्याकरता शक्य ती मदत करायची असेल. १९९८ साली इटलीत अशाप्रकारची एक विपत्ती आली होती, तेव्हा एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने निरीक्षण केले की यहोवाचे साक्षीदार “व्यावहारिक पद्धतीने कार्य करतात आणि पिडितांना ते कोणत्या धर्माचे आहेत याचा विचार न करता मदतीचा हात देतात.” काही भागांत शेवटल्या काळाविषयी भाकीत केलेल्या घटनांमुळे लोकांना दुःखद परिस्थितीला तोंड द्यावे लागते. या ठिकाणी यहोवाचे साक्षीदार बायबलच्या भविष्यवाण्यांकडे लक्ष आकर्षित करतात आणि देवाचे राज्य मानवजातीला खरी सुरक्षितता मिळवून देईल या बायबलमधील आश्‍वासनाच्या आधारावर लोकांना सांत्वन देतात.—नीतिसूत्रे १:३३; मीखा ४:४.

कौटुंबिक सदस्याचा मृत्यू होतो तेव्हा

१८-२०. कुटुंबात एखाद्या व्यक्‍तीचा मृत्यू झाला असल्यास सांत्वन देण्याकरता तुम्ही काय म्हणू शकता किंवा काय करू शकता?

१८ दररोज लाखो लोक आपल्या प्रियजनाच्या मृत्यूमुळे शोकाकूल होतात. कदाचित ख्रिस्ती सेवेत भाग घेताना किंवा दैनंदिन जीवनात तुमची अशा लोकांशी गाठ पडू शकते. त्यांना सांत्वन देण्याकरता तुम्ही काय म्हणू शकता किंवा काय करू शकता?

१९ ती व्यक्‍ती भावनिकरित्या अस्वस्थ आहे का? घरात अनेक शोकमग्न नातलग आहेत का? कदाचित तुम्हाला त्या व्यक्‍तीला बरेच काही सांगावेसे वाटत असेल, पण विचारपूर्वक बोलणे महत्त्वाचे आहे. (उपदेशक ३:१, ७) कदाचित सहानुभूती व्यक्‍त करून एखादे योग्य बायबल प्रकाशन (एक माहितीपत्रक, नियतकालिक, किंवा पत्रिका) त्यांना देणे आणि काही दिवसांनी पुन्हा भेट घेऊन आणखी मदत देता येईल का हे पाहणे बरे राहील. योग्य वेळी बायबलमधून काही प्रोत्साहन देणारे विचार तुम्ही सांगू शकता. यामुळे दुःखी व्यक्‍तीला मनःशांती मिळेल आणि तिचे दुःख हलके होईल. (नीतिसूत्रे १६:२४; २५:११) येशूने केले त्याप्रमाणे तुम्ही मृतांना पुन्हा जिवंत करू शकत नाही. पण बायबल मृतांच्या स्थितीविषयी काय सांगते याविषयी तुम्ही सांगू शकता; अर्थात, त्या व्यक्‍तीचे काही चुकीचे विचार असल्यास ते आताच दुरुस्त करणे कदाचित योग्य ठरणार नाही. (स्तोत्र १४६:४; उपदेशक ९:५, १०; यहेज्केल १८:४) तुम्ही पुनरुत्थानाविषयी बायबलमधील आश्‍वासने वाचू शकता. (योहान ५:२८, २९; प्रेषितांची कृत्ये २४:१५) यांचा काय अर्थ होतो यावर तुम्ही चर्चा करू शकता आणि बायबलमधील एखादा पुनरुत्थानाचा अहवाल देखील विचारात घेऊ शकता. (लूक ८:४९-५६; योहान ११:३९-४४) तसेच, ही आशा ज्याने दिली आहे त्या प्रेमळ देवाच्या गुणांकडेही त्या व्यक्‍तीचे लक्ष वेधा. (ईयोब १४:१४, १५; योहान ३:१६) या शिकवणुकींमुळे तुम्हाला कशाप्रकारे फायदा झाला आहे आणि तुम्हाला त्यांवर का विश्‍वास आहे हे समजावून सांगा.

२० दुःखी व्यक्‍तीला राज्य सभागृहात निमंत्रित केल्याने कदाचित तिला हे समजून घेण्यास मदत मिळेल की कोण लोक खरोखर आपल्या शेजाऱ्‍यांवर प्रीती करतात आणि एकमेकांना कसे प्रोत्साहन द्यावे हे जाणतात. स्वीडनमध्ये राहणाऱ्‍या एका स्त्रीने म्हटले की ती आयुष्यभर याच्याच शोधात होती.—योहान १३:३५; १ थेस्सलनीकाकर ५:११.

२१, २२. (अ) सांत्वन देण्याकरता आपल्याकडून काय अपेक्षित आहे? (ब) ज्या व्यक्‍तीला आधीच शास्त्रवचने माहीत आहेत तिला तुम्ही सांत्वन कसे देऊ शकता?

२१ मंडळीत किंवा बाहेरची एखादी व्यक्‍ती शोकाकूल आहे हे तुम्हाला कळते तेव्हा या व्यक्‍तीला नेमके काय म्हणावे किंवा तिच्याकरता काय करावे असा तुम्हाला कधीकधी प्रश्‍न पडतो का? बायबलमध्ये सहसा “सांत्वन” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा शब्दशः अर्थ “आपल्या बाजूला बोलावणे” असा होतो. खऱ्‍या अर्थाने सांत्वन देण्याकरता दुःखी व्यक्‍तीच्या साहाय्याकरता स्वतःला उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.—नीतिसूत्रे १७:१७.

२२ तुम्हाला जिला सांत्वन द्यायचे आहे त्या व्यक्‍तीला मृत्यू, खंडणी व पुनरुत्थान याविषयी बायबल काय सांगते हे आधीच माहीत असेल तर? अशा वेळी, समान विश्‍वास असलेला मित्र अथवा मैत्रिण आपल्या सोबत आहे ही भावनाच अतिशय सांत्वनदायक ठरू शकते. दुःखी व्यक्‍तीला मन मोकळे करण्याची इच्छा असल्यास शांतपणे तिचे ऐकून घ्या. तुम्ही तिला भाषण देण्याची गरज नाही. वचने वाचून दाखवल्यास, तिला व तुम्हालाही मनोबल देणारी ही देवाची वचने आहेत अशा अविर्भावात ती वाचा. या वचनातील आश्‍वासनावर तुम्हा दोघांनाही असलेला विश्‍वास शब्दांत व्यक्‍त करा. देवाची दया प्रदर्शित करण्याद्वारे व देवाच्या वचनातील मोलवान सत्ये विचारात घेण्याद्वारे तुम्ही दुःखी व्यक्‍तींना “सर्व सांत्वनदाता देव” यहोवा याच्यापासून समाधान व धैर्य मिळवण्यास मदत करू शकता.—२ करिंथकर १:३.

[तळटीप]

^ परि. 3 सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान, अध्याय ८; शास्त्रवचनांतून युक्‍तिवाद करणे (इंग्रजी), पृष्ठे ३९३-४००, ४२७-३१; तुमची काळजी वाहणारा निर्माणकर्ता अस्तित्वात आहे का? (इंग्रजी), अध्याय १०; आणि देव खरोखरी आपली काळजी वाहतो का? हे माहितीपत्रक पाहा.

तुमचे काय मत आहे?

• संकटांबद्दल लोक कोणाला दोष देतात आणि आपण त्यांना कशी मदत करू शकतो?

• इतरांना बायबलमधील सांत्वनाचा पुरेपूर फायदा करून घेण्यास मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो?

• तुमच्या क्षेत्रात बऱ्‍याच लोकांना कोणत्या कारणांमुळे दुःख सहन करावे लागत आहे आणि तुम्ही त्यांना कशाप्रकारे सांत्वन देऊ शकता?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्रे]

दुःखद प्रसंगी खऱ्‍या सांत्वनाचा संदेश देणे

[चित्राचे श्रेय]

निर्वासितांची छावणी: UN PHOTO १८६८११/J. Isaac

[२४ पानांवरील चित्र]

आपुलकी असलेल्या व्यक्‍तीची केवळ उपस्थिती देखील अत्यंत सांत्वनदायक असते