व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“यहोवा कोठे आहे,” असे तुम्ही विचारता का?

“यहोवा कोठे आहे,” असे तुम्ही विचारता का?

“यहोवा कोठे आहे,” असे तुम्ही विचारता का?

“ते माझ्यापासून दूर गेले आहेत . . . आणि ते असेही म्हणाले नाहीत की . . . यहोवा कोठे आहे?”—यिर्मया २:५, ६, पं.र.भा.

१. “देव कोठे आहे?,” हा प्रश्‍न लोक का विचारतात?

“देव कोठे आहे?” हा प्रश्‍न आज कित्येक लोक विचारतात. काहीजण निर्माणकर्त्याविषयी ही मूलभूत गोष्ट समजून घेऊ इच्छितात की शेवटी तो आहे तरी कोठे? तर काहीजण एखादी मोठी विपत्ती आल्यावर किंवा वैयक्‍तिक जीवनात एखाद्या संकटाला तोंड द्यावे लागते तेव्हा बुचकळ्यात पडतात आणि देव आपल्या मदतीला का धावून आला नाही असा विचार करतात. पण असेही काहीजण आहेत जे देवाविषयी काहीच जाणून घेऊ इच्छित नाहीत कारण देव अस्तित्वातच नाही असे ते मानतात.—स्तोत्र १०:४.

२. कशाप्रकारच्या लोकांना देवाचा शोध घेण्यात यश येते?

अर्थात, देवाच्या अस्तित्वाची ग्वाही देणारा भरपूर पुरावा स्वीकारणारेही बरेच लोक आहेत. (स्तोत्र १९:१; १०४:२४) यांपैकी काही, कोणत्या न कोणत्या प्रकारचा धर्म पाळतात आणि त्यातच समाधान मानतात. पण काही असे आहेत की ज्यांना सत्याची मनापासून आवड आहे आणि अशा सर्व देशांतील लाखो जणांनी सत्याच्या प्रेमापोटी खऱ्‍या देवाचा शोध घेतला आहे. त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेलेले नाहीत कारण देव “आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.”—प्रेषितांची कृत्ये १७:२६-२८.

३. (अ) देव कोठे राहतो? (ब) “यहोवा कोठे आहे” या शास्त्रवचनीय प्रश्‍नावरून काय सूचित होते?

एखाद्या व्यक्‍तीला यहोवा सापडतो तेव्हा त्याला जाणीव होते की “देव आत्मा आहे,” मानवी डोळ्यांना तो अदृश्‍य आहे. (योहान ४:२४) येशूने खऱ्‍या देवाविषयी सांगताना त्याला ‘माझा स्वर्गातील पिता’ असे म्हटले. याचा काय अर्थ होतो? ज्याप्रकारे आकाश पृथ्वीपासून बऱ्‍याच उंचावर आहे त्याचप्रकारे आपला स्वर्गीय पिता जेथे राहतो ते स्थान, आध्यात्मिक अर्थाने, अतिशय उदात्त किंवा अतिशय उच्च स्थानी आहे. (मत्तय १२:५०; यशया ६३:१५) आपण देवाला आपल्या शारिरिक डोळ्यांनी पाहू शकत नसलो तरीसुद्धा तो आपल्याला त्याच्याविषयी व त्याच्या उद्देशांविषयी बरेच काही जाणून घेण्यास मदत करतो. (निर्गम ३३:२०; ३४:६, ७) जीवनाचा अर्थ जाणून घेऊ इच्छिणाऱ्‍या प्रांजळ मनाच्या लोकांच्या प्रश्‍नांची तो उत्तरे देतो. आपल्या जीवनाशी संबंधित असलेल्या बाबींविषयी त्याची स्थिती काय आहे, अर्थात तो त्या बाबींकडे कशा दृष्टिकोनातून पाहतो हे ठरवण्याकरता आणि आपल्या इच्छा त्याच्या उद्देशांच्या एकवाक्यतेत आहेत किंवा नाहीत हे ठरवण्याकरता तो आपल्याकरता एक भक्कम आधार पुरवतो. अशा या विषयांसंबंधी आपण विचारपूस करावी आणि या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्याकरता प्रामाणिक प्रयत्न करावा अशी त्याची इच्छा आहे. पण प्राचीन इस्राएलच्या लोकांनी असे न केल्यामुळे संदेष्टा यिर्मया याच्या द्वारे यहोवाने त्यांचे ताडन केले. त्यांना देवाचे नाव माहीत होते पण “यहोवा कोठे आहे” याविषयी त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. (यिर्मया २:६, पं.र.भा.) त्यांच्याकरता यहोवाचा उद्देश सर्वात महत्त्वाचा नव्हता. त्याचे मार्गदर्शन मिळवण्यास ते उत्सुक नव्हते. लहानमोठे निर्णय घेताना तुम्ही “यहोवा कोठे आहे?,” हा प्रश्‍न विचारता का?

ज्यांनी देवाविषयी विचारपूस केली

४. यहोवाकडे विचारपूस करण्याविषयी दाविदाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

अद्याप वयाने लहान असताना, इशायाचा पुत्र दावीद याने यहोवावर पक्का विश्‍वास विकसित केला. तो यहोवाला ‘जिवंत देव’ म्हणून ओळखत होता. दाविदाने स्वतः यहोवाचे संरक्षण अनुभवले होते. ‘देवाच्या नावावर’ विश्‍वास ठेवून आणि या नावाविषयीच्या प्रेमाने प्रेरित होऊन दाविदाने शस्त्रधारी पलिष्टी महायोद्धा गल्याथ याचा वध केला. (१ शमुवेल १७:२६, ३४-५१) पण हे यश संपादन केल्यामुळे दावीद अहंकारी बनला नाही. आता आपण जे काही करू त्यावर यहोवा आशीर्वाद देईल असा त्याने तर्क केला नाही. उलट, पुढील वर्षांत दाविदाने वेगवेगळे निर्णय घेताना वारंवार यहोवाकडे विचारपूस केली. (१ शमुवेल २३:२; ३०:८; २ शमुवेल २:१; ५:१९) तो अशीच प्रार्थना करत राहिला, की “हे परमेश्‍वरा, तुझे मार्ग मला दाखीव; तुझ्या वाटा मला प्रगट कर. तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस; मी तुझी नित्य प्रतीक्षा करितो.” (स्तोत्र २५:४, ५) आपल्याकरता किती चांगले उदाहरण!

५, ६. यहोशाफाटाने जीवनात वेगवेगळ्या प्रसंगी कशाप्रकारे यहोवाचा शोध घेतला?

दाविदापासून आलेल्या राजसी वंशातील पाचवा राजा, यहोशाफाट याच्या काळात तीन देशांच्या सैन्यांनी मिळून यहूदावर हल्ला केला. हे राष्ट्रीय संकट उद्‌भवले तेव्हा “यहोवाला शोधायला [यहोशाफाटाने] आपले चित्त लावले.” (२ इतिहास २०:१-३, पं.र.भा.) परमेश्‍वराचा शोध घेण्याची ही यहोशाफाटाची पहिलीच वेळ नव्हती. इस्राएलच्या धर्मत्यागी उत्तर राज्यातील बआल उपासनेचा धिक्कार करून यहोशाफाटाने यहोवाच्या मार्गांत चालण्याचे निवडले होते. (२ इतिहास १७:३, ४) मग आता संकटकाळी त्याने कोणत्या अर्थाने ‘यहोवाला शोधले?’

या पेचप्रसंगाला तोंड देत असताना जेरूसलेम येथे केलेल्या सार्वजनिक प्रार्थनेत यहोशाफाटाने यहोवा सर्वसमर्थ असल्याचे सूचित केले. यहोवाने इतर राष्ट्रांना पराजित करून एक विशिष्ट देश इस्राएल राष्ट्राला वतन म्हणून कसा मिळवून दिला व याद्वारे आपला उद्देश कशाप्रकारे प्रकट केला याविषयी यहोशाफाटाने मनन केले होते. आपल्याला यहोवाच्या मदतीची गरज असल्याचे त्याने कबूल केले. (२ इतिहास २०:६-१२) मग त्याप्रसंगी यहोवा त्याला सापडला का? होय, निश्‍चितच. यहजीएल नावाच्या लेव्याद्वारे यहोवाने यहोशाफाटाला सुस्पष्ट मार्गदर्शन पुरवले आणि दुसऱ्‍या दिवशी त्याने आपल्या लोकांना विजय मिळवून दिला. (२ इतिहास २०:१४-२८) तुम्ही यहोवाकडे मार्गदर्शन मागता तेव्हा तो तुम्हाला सापडेल याची खात्री तुम्ही कशी बाळगू शकता?

७. देव कोणाच्या प्रार्थना ऐकतो?

यहोवा पक्षपाती नाही. तो सर्व राष्ट्रांच्या लोकांना प्रार्थनेद्वारे आपला शोध घेण्याचे निमंत्रण देतो. (स्तोत्र ६५:२; प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) त्याच्याकडे याचना करणाऱ्‍यांच्या मनात काय आहे हे तो पाहतो. आणि नीतिमानांच्या प्रार्थना ऐकण्याचे तो आपल्याला आश्‍वासन देतो. (नीतिसूत्रे १५:२९) आधी ज्यांनी त्याच्याविषयी काहीच आस्था दाखवली नाही पण आता नम्रपणे त्याचा शोध घेत आहेत अशांना तो प्राप्त होतो. (यशया ६५:१) ज्यांनी त्याच्या नियमांचे उल्लंघन केले पण आता नम्रपणे पश्‍चात्ताप करतात अशाही लोकांच्या प्रार्थना तो ऐकतो. (स्तोत्र ३२:५, ६; प्रेषितांची कृत्ये ३:१९) पण एखाद्या व्यक्‍तीचे हृदय देवाच्या अधीन नसेल तर त्या व्यक्‍तीच्या प्रार्थना व्यर्थ ठरतात. (मार्क ७:६, ७) काही उदाहरणे लक्षात घ्या.

त्यांनी मागितले पण मिळाले नाही

८. शौल राजाच्या प्रार्थना यहोवाने का स्वीकारल्या नाहीत?

शौल राजाच्या अवज्ञेमुळे देवाने त्याला धिक्कारले असल्याचे संदेष्टा शमुवेलाने त्याला सांगितले तेव्हा शौलाने यहोवाला प्रार्थना केली. (१ शमुवेल १५:३०, ३१) पण हा केवळ दिखावा होता. शौलाला देवाच्या आज्ञेत राहण्याची नव्हे तर लोकांचा सन्मान मिळवण्याची लालसा होती. नंतर, जेव्हा पलिष्टी, इस्राएलांच्या विरोधात लढाई करण्यास आले तेव्हा शौल केवळ औपचारिकपणे यहोवाकडे मार्गदर्शनाकरता गेला. पण त्याला उत्तर मिळाले नाही तेव्हा यहोवाला भूतविद्येचा वीट येतो हे माहीत असूनही त्याने एका भूतविद्याप्रवीण स्त्रीचा सल्ला घेतला. (अनुवाद १८:१०-१२; १ शमुवेल २८:६, ७) १ इतिहास १०:१४ (पं.र.भा.) यात शौलाविषयी असे म्हणण्यात आले: “त्याने यहोवाजवळ विचारले नाही.” असे का म्हटले आहे? कारण शौलाच्या प्रार्थना विश्‍वासावर आधारित नव्हत्या. त्यामुळे त्याची प्रार्थना करणे न करण्यासारखीच होती.

९. सिद्‌कीयाने यहोवाला केलेल्या प्रार्थनेत काय खोट होती?

त्याचप्रकारे, यहूदाच्या राज्याचा अंत जवळ येऊ लागला तसतसे लोक यहोवाला अधिक प्रार्थना करू लागले आणि त्याच्या संदेष्ट्यांकडे मार्गदर्शनाकरता येऊ लागले. पण यहोवाची उपासना करण्याचा दिखावा करण्यासोबत दुसरीकडे ते मूर्तिपूजा देखील करत होते. (सफन्या १:४-६) औपचारिकतेखातर देवाकडे विचारण्यासोबत त्यांनी त्याची इच्छा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला नाही. सिद्‌कीया राजाने यिर्मयाला यहोवाकडे आपल्या वतीने विचारण्याची विनंती केली. यहोवाने राजाला आधीच सांगितले होते की त्याने काय करावे. पण विश्‍वासाअभावी आणि मनुष्याच्या भीतीमुळे राजाने यहोवाचा शब्द पाळला नाही आणि यहोवानेही त्याला अपेक्षा असलेले उत्तर दिले नाही.—यिर्मया २१:१-१२; ३८:१४-१९.

१०. योहानानने ज्याप्रकारे यहोवाचे मार्गदर्शन मागितले त्यात काय चुकले आणि यावरून आपण कोणता धडा शिकतो?

१० जेरूसलेमचा नाश झाला आणि बॅबिलोनी सैन्याने यहूदी बंदिवानांना धरून नेल्यानंतर योहानानने यहूदा येथे राहिलेल्या यहूद्यांच्या लहान समूहाला ईजिप्तला नेण्याची तयारी केली. त्यांनी सर्व योजना आखल्या होत्या, पण निघण्याआधी त्यांनी यिर्मयाला आपल्या वतीने यहोवाला प्रार्थना करून त्याचे मार्गदर्शन मागितले. पण त्यांना हवे असलेले उत्तर त्यांना मिळाले नाही तेव्हा त्यांनी आपल्या योजनांनुसार केले. (यिर्मया ४१:१६–४३:७) या घटनांवरून तुम्हाला काही धडे शिकायला मिळाले का, जेणेकरून तुम्ही यहोवाचे मार्गदर्शन मागता तेव्हा तो तुम्हाला प्राप्त होईल?

“पारखून घेत जा”

११. इफिसकर ५:१० या वचनाचे आपण पालन करणे का गरजेचे आहे?

११ खऱ्‍या उपासनेत समर्पण करून पाण्याचा बाप्तिस्मा घेणे, मंडळीच्या सभांना जाणे आणि सार्वजनिक सेवाकार्यात सहभागी होणे यापेक्षा अधिक समाविष्ट आहे. यात आपले सबंध जीवन गोवलेले आहे. दररोज आपल्यावर अनेक दबाव येतात—काही प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष मार्गांनी. आणि या दबावांमुळे आपण सुभक्‍तीच्या मार्गातून पथभ्रष्ट होण्याची शक्यता आहे. आपण कशाप्रकारे या दबावांना तोंड देऊ शकतो? इफिस येथील विश्‍वासू ख्रिश्‍चनांना लिहिताना प्रेषित पौलाने त्यांना असे प्रोत्साहन दिले: “प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा.” (इफिसकर ५:१०) असे करणे किती शहाणपणाचे आहे हे शास्त्रवचनांतील कित्येक उदाहरणांवरून स्पष्ट होते.

१२. दाविदाने कराराचा कोश जेरूसलेमला आणवला तेव्हा यहोवाला ते का आवडले नाही?

१२ कराराचा कोश इस्राएलात परत आणल्यानंतर आणि किर्याथ-यारीम येथे तो अनेक वर्षे ठेवण्यात आल्यानंतर तो जेरूसलेम येथे आणावा असे राजा दाविदाच्या मनात आले. त्याने लोकांच्या नायकांचा सल्ला घेतला आणि म्हटले की “तुम्हास ठीक वाटत असेल आणि आपला देव परमेश्‍वर याची तशी मर्जी असेल” तर कोश आणला जाईल. पण या विषयावर यहोवाची इच्छा काय आहे हे जाणून घेण्याकरता पुरेसा प्रयत्न त्याने केला नाही. केला असता तर कोश कधीही एका गाडीवर लादून आणण्यात आला नसता. तर देवाने स्पष्टपणे आज्ञा केल्याप्रमाणे कहाथी लेव्यांनी तो खांद्यांवर वाहून आणला असता. दाविदाने वारंवार यहोवाकडे विचारले तरीसुद्धा याप्रसंगी त्याने योग्य रितीने असे केले नाही. याचा फार वाईट परिणाम झाला. दाविदाने नंतर कबूल केले: “आपण आपला देव परमेश्‍वर यास विधी प्रमाणे भजलो नाही म्हणून त्याने आपल्याला तडाका दिला.”—१ इतिहास १३:१-३; १५:११-१३; गणना ४:४-६, १५; ७:१-९.

१३. कोश यशस्वीरित्या हलवण्यात आल्यानंतर जे गीत गायिले गेले त्यात काय स्मरण करून देण्यात आले?

१३ शेवटी ओबेद-अदोम याच्या घरून देवाचा कोश जेरूसलेमला नेण्यात आला तेव्हा दाविदाने रचलेले एक गीत गायिले गेले. त्यात असे स्मरण करून देण्यात आले: “परमेश्‍वर व त्याचे सामर्थ्य यांवर भरवसा ठेवा; त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा. त्याने केलेली अद्‌भुतकृत्ये, त्याचे चमत्कार, व त्याने उच्चारिलेले निर्णय आठवा.”—१ इतिहास १६:११, १२.

१४. शलमोनाच्या उत्तम उदाहरणावरून व जीवनाच्या उत्तरार्धात त्याने ज्या चुका केल्या त्यांवरून आपण काय शिकू शकतो?

१४ आपला मृत्यू होण्याआधी दाविदाने त्याचा पुत्र शलमोन याला असा सल्ला दिला: “तू [यहोवाच्या] भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल.” (१ इतिहास २८:९) गादीवर आल्यानंतर शलमोन गिबोनास गेला जेथे दर्शनमंडप होता आणि तेथे त्याने यहोवाला बलिदान दिले. तेथे यहोवाने शलमोनाला विचारले: “तुला काय वर हवा तो माग.” शलमोनाच्या विनंतीनुसार यहोवाने त्याला इस्राएलचा न्याय करण्याकरता विपुल बुद्धी व ज्ञान दिले आणि त्यासोबतच धनसंपत्ती व ऐश्‍वर्य देखील दिले. (२ इतिहास १:३-१२) यहोवाने दाविदाला दिलेल्या रूपरेषेनुसार शलमोनाने एक भव्य मंदिर उभारले. पण स्वतःच्या वैवाहिक जीवनात शलमोनाने यहोवाचा शोध घेतला नाही. यहोवाची उपासना न करणाऱ्‍या स्त्रियांशी शलमोनाने विवाह केला. त्याच्या वृद्धापकाळात या स्त्रियांनी त्याचे मन यहोवाची उपासना करण्यापासून बहकवले. (१ राजे ११:१-१०) आपण कितीही प्रतिष्ठित, बुद्धिमान किंवा ज्ञानी असलो तरीही ‘प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जाणे’ अत्यंत महत्त्वाचे आहे!

१५. जेरह नावाचा कूशी यहूदावर चाल करून आला तेव्हा यहोवा यहूदाला सोडवेल या विश्‍वासाने आसा का प्रार्थना करू शकला?

१५ हे किती महत्त्वाचे आहे हे शलमोनाचा पणतू आसा याच्या कारकीर्दीच्या अहवालावरूनही स्पष्ट होते. आसा राजा बनला त्याच्या अकरा वर्षांनंतर जेरह नावाचा एक कूशी दहा लाख माणसांचे सैन्य घेऊन यहूदावर चाल करून आला. यहोवा यहूदाला या संकटातून सोडवेल का? ५०० वर्षांहूनही आधी यहोवाने आपल्या लोकांना स्पष्टपणे सांगितले होते की त्यांनी त्याचे ऐकले व त्याच्या आज्ञा पाळल्या तर काय परिणाम होतील आणि त्यांनी असे केले नाही, तर काय परिणाम होतील. (अनुवाद २८:१, ७, १५, २५) आपल्या कारकीर्दीच्या सुरवातीला आसाने खोट्या उपासनेकरता वापरल्या जाणाऱ्‍या वेद्या आणि स्तंभ नष्ट केले होते. त्याने लोकांना ‘यहोवाला शोधण्यास’ आर्जवले होते. हे सर्व करण्याकरता त्याने आपल्यावर संकट कोसळण्याची वाट पाहिली नाही. त्यामुळे पूर्ण विश्‍वास ठेवून आसा आपल्या लोकांच्या वतीने कार्य करण्याची यहोवाला विनंती करू शकत होता. परिणाम काय झाला? यहोवाने यहुदाला मोठा विजय प्राप्त करून दिला.—२ इतिहास १४:२-१२, पं.र.भा.

१६, १७. (अ) आसा विजयी झाला तरीसुद्धा यहोवाने त्याला कशाविषयी आठवण करून दिली? (ब) आसाने अयोग्य पाऊल उचलले तेव्हा त्याला कशाप्रकारे मदत देण्यात आली पण त्याची प्रतिक्रिया काय होती? (क) आसाच्या आचरणाविषयी विचार केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

१६ पण आसा विजयी होऊन परत आला तेव्हा यहोवाने अजऱ्‍याला राजा आसा यास भेटून असे सांगण्यास पाठवले की: “हे आसा, अहो यहूदी व बन्यामिनी लोकहो, मी म्हणतो ते श्रवण करा; तुम्ही परमेश्‍वराच्या बरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील; तुम्ही त्यास शरण जाल तर तो तुम्हास पावेल, पण तुम्ही त्यास सोडाल तर तो तुम्हास सोडील.” (२ इतिहास १५:२) तेव्हा अधिकच आवेशाने आसाने पुन्हा एकदा खऱ्‍या उपासनेला बढावा दिला. पण २४ वर्षे उलटल्यावर, पुन्हा युद्धाची भीती निर्माण झाली तेव्हा, आसाने यहोवाला शोधले नाही. त्याने देवाच्या वचनातून सल्ला घेतला नाही आणि कूशी सैन्याने यहूदावर चाल केली तेव्हा यहोवाने काय केले होते हे देखील त्याने आठवणीत आणले नाही. तर त्याने अरामाशी मैत्री करण्याचा मूर्खपणा केला.—२ इतिहास १६:१-६.

१७ या चुकीबद्दल त्याला ताडन देण्याकरता यहोवाने हनानी द्रष्ट्याला आसाकडे पाठवले. यहोवाचा दृष्टिकोन आसाला समजावून सांगण्यात आला तेव्हा देखील तो त्याचा फायदा करून घेऊ शकत होता. उलट तो क्रोधित झाला आणि त्याने हनानी यास अटकेत ठेवले. (२ इतिहास १६:७-१०) किती दुःखाची गोष्ट! आपल्याविषयी काय? आपण देवाचा शोध घेतो, पण सल्ला दिला जातो तेव्हा त्याचे पालन करत नाही असे आपल्याबाबतीत घडते काय? उदाहरणार्थ, आपण कदाचित जगिक गोष्टींत अधिकाधिक गोवले जात असल्यामुळे, आपल्याबद्दल काळजी असणारे एखादे समजूतदार वडील आपल्याला बायबलमधून सल्ला देतील; अशा वेळी, “प्रभूला काय संतोषकारक आहे” हे समजून घेण्यास आपल्याला प्रेमळपणे मदत केल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो का?

विचारण्यास विसरू नका

१८. एलीहूने ईयोबाला जे सांगितले त्याचा आपल्याला कशाप्रकारे फायदा होऊ शकतो?

१८ जीवनाच्या दबावाला तोंड देत असताना कित्येक वर्षांपासून यहोवाची सेवा करत आलेली व्यक्‍ती देखील चुकीचे पाऊल उचलू शकते. ईयोबाला एक घृणास्पद रोग झाला, त्याची मुलेबाळे व धनसंपत्ती त्याच्या हातून गेली आणि त्याच्या मित्रांनीही त्याच्यावर खोटे आरोप लावले तेव्हा काही काळासाठी तो अतिशय आत्मकेंद्रित बनला. एलीहूने त्याला आठवण करून दिली: “असे कोणीहि म्हणत नाही की . . . ‘माझा निर्माणकर्ता कोठे आहे?’” (ईयोब ३५:१०) ईयोबाला आपले लक्ष यहोवावर केंद्रित करण्याची आणि तो या परिस्थितीकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हे विचारात घेण्याची गरज होती. ईयोबाने या निर्देशनाचा नम्रपणे स्वीकार केला आणि त्याचे उदाहरण आपल्यालाही असेच करण्यास मदत करू शकते.

१९. इस्राएल राष्ट्रातील लोक सहसा काय करण्यात चुकले?

१९ इस्राएल लोकांना देवाने त्यांच्या राष्ट्राशी कशाप्रकारे व्यवहार केला होता हे माहीत होते. पण बऱ्‍याचदा, त्यांच्या जीवनात विशिष्ट परिस्थितीला तोंड देताना त्यांनी ही गोष्ट आठवणीत आणली नाही. (यिर्मया २:५, ६, ८) जीवनात निर्णय घेताना “यहोवा कोठे आहे” असे विचारण्याऐवजी ते स्वतःच्याच सुखाच्या पाठीस लागले.—यशया ५:११, १२.

“यहोवा कोठे आहे” असे विचारत राहा

२०, २१. (अ) आज यहोवाचे निर्देशन मिळवण्याच्या बाबतीत अलीशाच्या वृत्तीचे कोणी अनुकरण केले आहे? (ब) त्यांच्या विश्‍वासू उदाहरणाचे आपण कशाप्रकारे अनुकरण करू शकतो व त्यापासून फायदा करून घेऊ शकतो?

२० एलीयाच्या सार्वजनिक सेवेचा काळ संपला तेव्हा त्याचा सेवक अलीशा याने त्याच्या अंगावरून पडलेला झगा यार्देन नदीच्या पाण्यावर मारून म्हटले: “एलीयाचा देव परमेश्‍वर कोठे आहे?” (२ राजे २:१४) यहोवाने आपला आत्मा आता अलीशावर आहे हे प्रदर्शित करण्याद्वारे या प्रश्‍नाचे उत्तर दिले. यावरून आपण काय शिकू शकतो?

२१ आधुनिक काळातही असेच काहीतरी घडले आहे. ज्यांनी प्रचार कार्यात पुढाकार घेतला होता, असे काही अभिषिक्‍त सेवक हे जग सोडून गेले. तेव्हा, देखरेख करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली होती त्यांनी शास्त्रवचनांचे परीक्षण करून यहोवाला मार्गदर्शनाकरता प्रार्थना केली. “यहोवा कोठे आहे” हे विचारण्यास ते विसरले नाहीत. त्यामुळे यहोवाने आजवर आपल्या लोकांचे मार्गदर्शन केले आहे आणि त्यांच्या कार्याची भरभराट केली आहे. आपण त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करतो का? (इब्री लोकांस १३:७) असे केल्यास आपण यहोवाच्या संस्थेच्या निकट राहू, तिच्या मार्गदर्शनाला प्रतिसाद देऊ आणि येशू ख्रिस्ताच्या निर्देशनाखाली ही संस्था आज जे कार्य करत आहे त्यात पुरेपूर सहभाग घेऊ.—जखऱ्‍या ८:२३.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• “यहोवा कोठे आहे” असे आपण कोणत्या हेतूने विचारले पाहिजे?

• “यहोवा कोठे आहे” या प्रश्‍नाचे उत्तर आज आपण कसे मिळवू शकतो?

• देवाच्या मार्गदर्शनाकरता केलेल्या काही प्रार्थना अनुत्तरीत का राहतात?

• ‘प्रभूला काय संतोषकारक हे पारखून घेत जाण्याचे’ महत्त्व पटवून देणारी बायबलमधील काही उदाहरणे कोणती आहेत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

राजा यहोशाफाट याने कशाप्रकारे यहोवाचा शोध घेतला?

[१० पानांवरील चित्र]

शौलाने भूतविद्येत प्रवीण असलेल्या स्त्रीचा सल्ला का घेतला?

[१२ पानांवरील चित्रे]

‘यहोवा कोठे आहे’ हे जाणून घेण्याकरता प्रार्थना करा, अभ्यास करा आणि मनन करा