व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा तुमच्या कार्यांची दखल घेतो का?

यहोवा तुमच्या कार्यांची दखल घेतो का?

यहोवा तुमच्या कार्यांची दखल घेतो का?

या प्रश्‍नाचे उत्तर तुम्ही काय द्याल? पुष्कळ लोक म्हणतील: ‘मोशे, गिदोन, दावीद यासारख्या लोकांच्या कार्यांची देवाने दखल घेतली होती असा माझा विश्‍वास आहे खरा, पण माझ्या प्रत्येक कार्याची तो दखल घेतो की नाही याविषयी मला शंका वाटते. कारण मी काही मोशे, गिदोन किंवा दावीद नाही.’

बायबल काळातील काही विश्‍वासू लोकांनी विश्‍वासाची असाधारण कार्ये केली, हे खरे आहे. त्यांनी “विश्‍वासाच्या द्वारे राज्ये जिंकली, . . . सिंहांची तोंडे बंद केली, अग्नीची शक्‍ति नाहीशी केली; ते तरवारीच्या धारेपासून बचावले.” (इब्री लोकांस ११:३३, ३४) परंतु इतरांनी साध्यासुध्या कार्यांनी आपला विश्‍वास प्रदर्शित केला; आणि बायबल आपल्याला आश्‍वासन देते, की देवाने त्यांच्याही कार्यांची दखल घेतली. उदाहरणार्थ, आपण शास्त्रवचनांतील, एक मेंढपाळ, एक संदेष्टा आणि एक विधवा यांच्या उदाहरणांचा विचार करू या.

एक मेंढपाळ बलिदान अर्पण करतो

आदाम आणि हव्वेचा दुसरा पुत्र हाबेल याच्याविषयी तुम्हाला काय आठवते? तुम्हाला आठवत असेल की त्याचा वध करण्यात आला होता; आपल्यापैकी फार कमी लोकांना असा कदाचित अनुभव येईल. पण देवाने हाबेलाची दखल एका वेगळ्या कारणासाठी घेतली होती.

एके दिवशी, हाबेलाने त्याच्या कळपातील सर्वात उत्तम प्राणी निवडून तो देवाला अर्पिला. आज कदाचित त्याची ही देणगी अगदी क्षुल्लक लेखली जाईल परंतु यहोवाने त्याच्या देणगीची दखल घेतली आणि आपली स्वीकृती व्यक्‍त केली. इतकेच नव्हे तर, सुमारे चार हजार वर्षांनंतर यहोवाने प्रेषित पौलाला इब्री लोकांस या पुस्तकात त्या देणगीविषयी लिहिण्यास प्रेरित केले. इतक्या वर्षांनंतरही देव ते साधेसे अर्पण विसरला नव्हता!—इब्री लोकांस ६:१०; ११:४.

कोणत्या प्रकारचे बलिदान अर्पण करायचे हे हाबेलने कसे ठरवले? बायबल याविषयी काही सांगत नाही पण हाबेलने कदाचित या गोष्टीचा गंभीर विचार केला असेल. तो एक मेंढपाळ असल्यामुळे त्याने निश्‍चित्तच आपल्या कळपातील एखाद्या प्राण्याचे अर्पण दिले असेल. परंतु त्याने जे अर्पिले ते सर्वात उत्तम—“पुष्टांतून” पुष्ट जे होते ते त्याने दिले. (उत्पत्ति ४:४) शिवाय, “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील,” असे जे यहोवाने एदेन बागेत सर्पाला म्हटले, त्यावरही कदाचित त्याने मनन केले असण्याची शक्यता आहे. (उत्पत्ति ३:१५; प्रकटीकरण १२:९) ही “स्त्री” आणि तिची “संतति” कोण आहे हे हाबेलला तेव्हा माहीत नसले तरीसुद्धा, स्त्रीच्या संततीची ‘टाच फोडण्यात’ रक्‍त सांडणे समाविष्ट होते हे कदाचित त्याने ताडले असावे. यासाठी, जिवंत प्राण्यापेक्षा मौल्यवान आणखी दुसरे काही असू शकत नाही हे त्याने निश्‍चित्तच ओळखले. परंतु, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने अर्पिलेले बलिदान खरोखरच उचित होते.

हाबेलप्रमाणेच आजही ख्रिस्ती लोक देवाला बलिदाने अर्पण करतात. ते कळपातील प्रथम जन्मलेले नव्हे तर “ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ . . . त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण” करतात. (इब्री लोकांस १३:१५) आपण इतरांना आपल्या विश्‍वासाविषयी सांगतो तेव्हा आपले ओठ जाहीर घोषणा करतात.

तुम्हाला तुमच्या अर्पणाचा दर्जा सुधारण्याची इच्छा आहे का? असल्यास, आपल्या क्षेत्रातील लोकांच्या गरजांचा काळजीपूर्वक विचार करा. त्यांना कोणकोणत्या गोष्टींची चिंता आहे? त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत? बायबलच्या संदेशांतील कोणते पैलू त्यांना आकर्षक वाटू शकतात? साक्ष दिलेल्या प्रत्येक संधींचा नंतर विचार करा, की तुम्ही तुमच्या प्रभावीपणात आणखी सुधारणा कशी करू शकता. तुम्ही यहोवाविषयी बोलता तेव्हा पूर्ण खात्रीने आणि अगदी मनापासून बोला. आपले अर्पण खरोखरचा “स्तुतीचा यज्ञ” बनवा.

अग्रहणशील लोकांना एक संदेष्टा प्रचार करतो

आता, संदेष्टा हनोखचे उदाहरण घ्या. यहोवा देवाचा साक्षीदार म्हणून तो अगदी एकटा असला असावा. तुम्ही देखील हनोखप्रमाणे, तुमच्या कुटुंबातून एकटेच यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करणारे आहात का? बायबल तत्त्वांचे पालन करणारे तुमच्या वर्गातील तुम्ही एकटेच विद्यार्थी किंवा कामाच्या ठिकाणी एकटेच कामगार आहात का? असल्यास, तुम्हाला कदाचित विरोधाचा सामना करावा लागेल. मित्रजन, नातेवाईक, वर्गसोबती किंवा सहकर्मचारी तुम्हाला देवाच्या नियमांचे उल्लंघन करण्याची जबरदस्ती करतील. ते म्हणतील: “तुम्ही काय केलं आहे ते कुणालाच कळणार नाही. आम्ही पण मूठ झाकूनच ठेवू.” बायबलच्या नैतिक दर्जांची काळजी करत बसणे निव्वळ वेडेपणा आहे कारण तुम्ही काय करता याची देवाला मुळीच काळजी नसते, असा आग्रह ते करतील. मग, तुम्ही त्यांच्याप्रमाणे विचार करत नाही, वागत नाही म्हणून चिडून कदाचित ते तुमची चिकाटी तोडण्याचा सर्वंकष प्रयत्न करतील.

अशा दबावाचा सामना करणे सोपे नसले तरी, ते अशक्यही नाही. आदामापासून सातवा पुरुष, हनोख याचा विचार करा. (यहूदा १४, १५) हनोखचा जन्म होईपर्यंत बहुतेक लोक आपली नैतिक शुद्ध गमावून बसले होते. त्यांचे बोलणे गलिच्छ होते, त्यांचे वर्तन “भक्‍तिहीन” अर्थात धक्कादायक होते. (यहूदा १४, १५) त्यांचे वर्तन जवळपास आजच्या लोकांप्रमाणेच होते.

हनोखने या सर्वाला कशाप्रकारे तोंड दिले? या प्रश्‍नाचे उत्तर आज आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हनोख हा तेव्हाच्या काळात एकटाच यहोवाचा उपासक असला तरी तो खरोखरच एकटा नव्हता. हनोख देवाबरोबर चालला.—उत्पत्ति ५:२२.

देवाला संतुष्ट करण्यावर हनोखचे जीवन केंद्रित होते. त्याला माहीत होते, की देवाबरोबर चालण्याचा अर्थ, केवळ एक शुद्ध नैतिक जीवन जगणे इतकेच पुरेसे नव्हते. त्याने प्रचार करावा असे यहोवा त्याच्याकडून अपेक्षा करत होता. (यहूदा १४, १५) यहोवाने लोकांच्या भक्‍तिहीन कार्याकडे दुर्लक्ष केले नाही याबद्दल त्यांना इशारा देण्याची गरज होती. हनोख देवाबरोबर ३०० पेक्षा अधिक वर्षे चालत राहिला—आपल्यापैकी कोणी इतक्या काळपर्यंत सहन केले नसते. त्याच्या मृत्यूपर्यंत तो देवाबरोबर चालत राहिला.—उत्पत्ति ५:२३, २४.

हनोखप्रमाणे आपल्यावर देखील प्रचार करण्याची कामगिरी सोपवली आहे. (मत्तय २४:१४) घरोघरी जाऊन साक्ष देण्याव्यतिरिक्‍त आपण नातेवाईकांना, व्यापार क्षेत्रातील ओळखीच्या लोकांना आणि वर्गसोबत्यांना सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु कधीकधी आपल्याला बोलायला लाज वाटू शकते. तुम्हाला कधी असे वाटले आहे का? निराश होऊ नका. आरंभीच्या ख्रिश्‍चनांचे अनुकरण करा आणि धैर्यासाठी यहोवाला प्रार्थना करा. (प्रेषितांची कृत्ये ४:२९) तुम्ही जोपर्यंत देवाबरोबर चालत आहात तोपर्यंत तुम्ही एकटे नाही.

एक विधवा भोजन तयार करते

कल्पना करा, एक साधेसे भोजन तयार केल्याबद्दल एका अनामिक विधवेला दोन आशीर्वाद मिळाले! ती इस्राएली नव्हती; ती सारफथ नावाच्या नगरात सा.यु.पू. दहाव्या शतकात राहणारी विदेशी होती. एका दीर्घकाळच्या दुष्काळाच्या शेवटी शेवटी तिचा अन्‍नसाठा संपत आला होता. स्वतःसाठी आणि आपल्या मुलासाठी एक शेवटचे भोजन करता येईल तितकेच, मूठभर पीठ आणि थोडेसे तेल तिच्याकडे उरले होते.

आणि अशातच, तिच्या घरी एक पाहुणा येतो. तो देवाचा संदेष्टा एलीया होता. तिच्याकडे जे तुटपुंजे उरले होते त्यातच तो तिला आपल्यासाठी देखील भोजन करण्यास सांगतो. तिच्याजवळ, तिच्या स्वतःचे आणि आपल्या मुलाचे पोट जेमतेम भरेल एवढेच अन्‍न होते तर ती आता या पाहुण्याला कशी देणार? पण एलीयाने तिला यहोवाच्या वचनाद्वारे हे आश्‍वासन दिले, की तिने जर त्याच्याबरोबर अन्‍न वाटून खाल्ले तर ती आणि तिचा मुलगा उपाशी राहणार नाहीत. तिच्यासारख्या विदेशी विधवेची दखल इस्राएलचा देव घेईल हे मानण्यास तिला विश्‍वासाची गरज होती. पण तिने एलीयावर विश्‍वास ठेवला आणि यहोवाने तिला प्रतिफळ दिले. “परमेश्‍वर एलीयाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीहि आटली नाही.” दुष्काळ संपेपर्यंत या स्त्रीला आणि तिच्या मुलाला दररोजची भाकर मिळत राहिली.—१ राजे १७:८-१६.

पण या विधवेला आणखी एक आशीर्वाद मिळणार होता. या चमत्कारानंतर काही काळ उलटून गेल्यावर, तिचा लाडका मुलगा आजारी पडून मरून गेला. एलीयाला तिच्यावर खूप दया आली आणि त्याने, तिच्या मुलाला जिवंत करावे म्हणून यहोवाकडे याचना केली. (१ राजे १७:१७-२४) या मुलाला मृतातून जिवंत करण्यासाठी एक अभूतपूर्व चमत्कार करावा लागणार होता.याआधीकोणाचे पुनरुत्थान झाल्याचा कोणताही अहवाल नव्हता! यहोवा पुन्हा एकदा या विदेशी विधवेला दया दाखवेल का? होय, त्याने दाखवली. मृत मुलाला पुन्हा जिवंत करण्यासाठी यहोवाने एलीयाला शक्‍ती दिली. या आशीर्वादित स्त्रीचा नंतर उल्लेख करून येशूने म्हटले: “इस्राएलात पुष्कळ विधवा होत्या; तरी . . . सीदोन प्रदेशातील सारफथ येथील एका विधवेकडे मात्र [एलीयाला] पाठविले होते.”—लूक ४:२५, २६.

आजची आर्थिक स्थिती, औद्योगिक देशांमध्येही डळमळीत आहे. काही मोठमोठ्या कंपन्यांनी, अनेक दशकांपासून एकनिष्ठपणे काम करणाऱ्‍या आपल्या कामगारांना नोकरीवरून काढले आहे. आपल्यावर बेकारीची पाळी येईल की काय, या भीतीमुळे एखादा ख्रिश्‍चन, आपली कंपनी आपल्याला नोकरीवर ठेवेल ही आशा बाळगून, होता होईल तितका कामात व्यस्त राहण्यास मोहीत होऊ शकतो. यामुळे, त्याला ख्रिस्ती सभांना उपस्थित राहायला, क्षेत्र सेवेत भाग घ्यायला किंवा आपल्या कुटुंबाच्या भावनिक व आध्यात्मिक गरजा पूर्ण करायला कमी वेळ मिळेल. त्याला असे वाटत असेल की काहीही झाले तरी आपण ही नोकरी गमवायची नाही.

अशा आर्थिकरीत्या अस्थिर परिस्थितीत एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीला चिंता लागणे साहजिक आहे. या दिवसांत नोकरी मिळणे कठीण आहे. आपल्यातील बहुतेक लोक श्रीमंत होण्यासाठी झटत नसले तरी, आपण सारफथच्या विधवेप्रमाणे निदान दोन वेळची भाकरी मिळावी म्हणून खटपट करतो. परंतु, “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही” या देवाने दिलेल्या आश्‍वासनाची प्रेषित पौल आपल्याला आठवण करून देतो. त्यामुळे आपण पूर्ण भरवशाने म्हणू शकतो: “प्रभु मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?” (इब्री लोकांस १३:५, ६) पौलाचा या अभिवचनावर संपूर्ण भरवसा होता आणि यहोवाने नेहमी त्याची काळजी घेतली. आपणही जर देवाला त्यागले नाही तर तोही आपल्याला त्यागणार नाही.

आपल्याला कदाचित असे वाटेल, की मोशे, गिदोन, दावीद यांसारख्या आध्यात्मिक लोकांची आपण स्वतःबरोबर तुलना करू शकत नाही, पण आपण निदान त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करू शकतो. शिवाय, हाबेल, हनोख आणि सारफथच्या विधवेने केलेली अगदी साधीसुधी विश्‍वासाची कार्ये आपण लक्षात ठेवू शकतो. यहोवा सर्वप्रकारच्या विश्‍वासाच्या कार्यांची—मग ती लहानसहान असली तरीसुद्धा दखल घेतो. देवाला भिऊन वागणारा विद्यार्थी आपल्याच वयाच्या मित्राकडून ड्रग्ज घ्यायला नकार देतो, एक ख्रिस्ती व्यक्‍ती आपल्या कामाच्या ठिकाणी अनैतिक लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या व्यक्‍तीला नकार देते, किंवा एक वृद्ध साक्षीदार थकून गेलेला आणि आजारी असतानाही विश्‍वासूपणे मंडळीच्या सभांना उपस्थित राहतो, तेव्हा यहोवा या सर्वांना पाहतो. आणि त्याला हे पाहून आनंद वाटतो!—नीतिसूत्रे २७:११.

तुम्ही इतरांची दखल घेता का?

आपण काय करतो त्याची यहोवा दखल घेतो. आपण देवाचे अनुकरण करणारे असल्यामुळे आपणही इतरांच्या प्रयत्नांची दखल घेतली पाहिजे. (इफिसकर ५:१) तुमच्या सहख्रिस्ती बंधूभगिनींना मंडळीच्या सभांना उपस्थित राहायला, क्षेत्र सेवेत भाग घ्यायला किंवा आपली दररोजची कामे देखील करायला किती कठीण जाते याची तुम्ही दखल का घेऊ नये?

तुमच्याबरोबर यहोवाची उपासना करणाऱ्‍या तुमच्या सहउपासकांना याची जाणीव करून द्या की तुम्ही त्यांच्या प्रयत्नांची कदर करता. तुम्ही त्यांच्या कार्यांची दखल घेतल्याबद्दल त्यांना आनंद वाटेल आणि यामुळे त्यांना ही खात्री मिळेल की यहोवाने देखील त्यांच्या कार्यांची दखल घेतली आहे.