व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आत्मा काय म्हणतो ते ऐका!

आत्मा काय म्हणतो ते ऐका!

आत्मा काय म्हणतो ते ऐका!

“आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.”प्रकटीकरण ३:२२.

१, २. प्रकटीकरणात उल्लेख केलेल्या सात मंडळ्यांना येशूच्या संदेशासंबंधी कोणता सल्ला वारंवार देण्यात आला आहे?

यहोवाच्या सेवकांनी बायबलमधील प्रकटीकरण या पुस्तकात उल्लेख केलेल्या सात मंडळ्यांना उद्देशून येशू ख्रिस्ताच्या आत्म्याने निर्देशित शब्दांकडे लक्ष दिले पाहिजे. या संदेशांपैकी प्रत्येक संदेशात हा सल्ला देण्यात आला आहे की, “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.”—प्रकटीकरण २:७, ११, १७, २९; ३:६, १३, २२.

इफिस, स्मुर्णा व पर्गम या मंडळ्यांच्या दूतांना किंवा पर्यवेक्षकांना येशूने दिलेले संदेश आपण याआधीच विचारात घेतले आहेत. पवित्र आत्म्याद्वारे त्याने इतर चार मंडळ्यांना काय म्हटले त्याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो?

थुवतीरा येथील दूताला

३. थुवतीरा शहर कोठे होते आणि हे शहर कोणत्या उत्पादनाकरता नावाजलेले होते?

“देवाचा पुत्र” थुवतीरा मंडळीला शाबासकी व ताडन दोन्ही देतो. (प्रकटीकरण २:१८-२९ वाचा.) थुवतीरा शहर (आताचे अखीसार) गदीझ (प्राचीन काळी, हर्मस) नदीच्या एका उपनदीच्या काठावर पश्‍चिमी आशिया मायनर येथे वसलेले होते. हे शहर विविध कलाकौशल्यांसाठी नावाजलेले होते. येथील सुप्रसिद्ध किरमिजी किंवा जांभळा रंग तयार करण्यासाठी या शहरातील कारागीर मंजीष्ठाचे मूळ वापरत होते. ग्रीसमधील फिलिप्पै शहराला पौलाने भेट दिली तेव्हा लुदिया नावाची जी स्त्री ख्रिस्ती बनली, ती मुळात “थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकीत असे.”—प्रेषितांची कृत्ये १६:१२-१५.

४. थुवतीरा येथील मंडळीला येशूने कशाविषयी शाबासकी दिली?

येशूने थुवतीरा मंडळीला तिची चांगली कृत्ये, प्रीती, विश्‍वास, धीर आणि सेवा यांबद्दल शाबासकी दिली. किंबहुना त्याने म्हटले की ‘त्यांची शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत.’ आपली पूर्वीची कार्ये अतिशय कौतुकास्पद असली तरीसुद्धा आपण कधीही आपल्या नैतिकतेविषयी निष्काळजी होऊ नये.

५-७. (अ) ‘ईजबेल नावाची स्त्री’ कोण होती आणि तिच्या प्रभावाला कशाप्रकारे तोंड द्यावयाचे होते? (ब) थुवतीरा मंडळीला ख्रिस्ताने पाठवलेला संदेश देवभीरू स्त्रियांना काय करण्यास मदत करतो?

थुवतीरा येथील मंडळी मूर्तिपूजा, खोट्या शिकवणुकी आणि लैंगिक अनैतिकता यांसारख्या गोष्टी खपवून घेत होती. या मंडळीत ‘ईजबेल नावाची स्त्री’ होती—कदाचित अशा स्त्रियांचा गट ज्यांच्यात इस्राएलच्या दहा-गोत्रांच्या राज्याची दुष्ट राणी ईजबेल हिच्यासारखे गुण होते. काही अभ्यासकांचे असे मत आहे की थुवतीराच्या ‘संदेष्ट्रिंनी’ ख्रिश्‍चनांना व्यापारी संघटनेच्या देवदेवतांची उपासना करण्याकरता आणि मूर्तींना अर्पण केलेल्या अन्‍नाशी संबंधित असलेल्या सणांत भाग घेण्याकरता फुसलावण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या ख्रिस्ती मंडळीत कोणीही स्वतःला संदेष्ट्री म्हणवून इतरांना आपल्या कह्‍यात घेण्याचा प्रयत्न करू नये!

ख्रिस्ताने म्हटले, “मी तिला अंथरुणाला खिळून टाकीन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणाऱ्‍या लोकांस, तिने शिकविलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्‍चात्ताप न केल्यास, मोठ्या संकटात पाडीन.” पर्यवेक्षकांनी कधीही अशा दुष्ट शिकवणुकींना आणि प्रभावाला बळी पडू नये; तसेच ‘सैतानाच्या गहन गोष्टी’ पूर्णपणे दुष्टाईच्या आहेत हे समजण्यासाठी कोणत्याही ख्रिस्ती व्यक्‍तीला आध्यात्मिक व शारीरिक व्यभिचार किंवा मूर्तिपूजा करण्याची गरज नाही. आपण येशूच्या इशाऱ्‍याकडे लक्ष दिल्यास, ‘जे आपल्याजवळ आहे ते आपण दृढ धरून राहू’ आणि आपल्यावर पापाचे प्रभुत्व राहणार नाही. पुनरुत्थित अभिषिक्‍त जनांनी अधार्मिक प्रथा, कुवासना, आणि महत्त्वाकांक्षा त्यागल्यामुळे त्यांना “राष्ट्रांवरचा अधिकार” दिला जातो आणि या राष्ट्रांचे चूर्ण करण्यात ते येशूला साथ देतील. वर्तमान काळातील मंडळ्यांजवळ लाक्षणिक तारे आहेत, आणि अभिषिक्‍त जनांचे स्वर्गात पुनरुत्थान होईल तेव्हा त्यांना “पहाटचा तेजस्वी तारा,” अर्थात वर, येशू ख्रिस्त, दिला जाईल.—प्रकटीकरण २२:१६.

थुवतीरा मंडळीला इशारा देण्यात आला की तिने धर्मत्याग पसरविणाऱ्‍या स्त्रियांचा दुष्ट प्रभाव सहन करू नये. ख्रिस्ताने या मंडळीला दिलेला आत्म्याने प्रेरित संदेश आजच्या काळातील देवभीरू स्त्रियांना देवाने त्यांना दिलेल्या स्थानी राहून कार्य करण्यास मदत करतो. ते पुरुषांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि कोणत्याही बांधवाला आध्यात्मिक अथवा शारीरिक व्यभिचार करण्याकरता मोहित करत नाहीत. (१ तीमथ्य २:१२) उलट या स्त्रिया देवाच्या स्तुतीकरता उत्तम कार्ये व सेवा करण्यात एक चांगला आदर्श मांडतात. (स्तोत्र ६८:११; १ पेत्र ३:१-६) मंडळीने आपल्याकडे जे आहे त्यास—अर्थात शुद्ध शिकवणूक व आचरण तसेच राज्याची अमूल्य सेवा यास दृढ धरून ठेवल्यास ख्रिस्त त्यांच्याकडे न्यायदंड घेऊन नव्हे तर आशीर्वाद घेऊन येईल.

सार्दीस येथील दूताला

८. (अ) सार्दीस कोठे होते आणि या शहराविषयी काही माहिती द्या. (ब) सार्दीस येथील मंडळीला मदतीची गरज का होती?

सार्दीस येथील मंडळीला तातडीच्या मदतीची गरज होती कारण ती आध्यात्मिकरित्या मृत होती. (प्रकटीकरण ३:१-६) थुवतीरापासून दक्षिणेकडे ५० किलोमीटर अंतरावर वसलेले सार्दीस हे एक समृद्ध शहर होते. व्यापार, सुपीक जमीन, तसेच लोकरीचे कापड व गालीचे यांचे उत्पादन यामुळे हे शहर एक वैभवशाली शहर होते ज्यात एकेकाळी ५०,००० नागरिक राहत होते. इतिहासकार जोसीफस याच्यानुसार सा.यु.पू. पहिल्या शतकात सार्दीस शहरात बरेच यहुदी रहिवाशी होते. या शहराच्या अवशेषांत एक सभास्थान आणि इफिसकर देवी अर्तमी हिचे मंदिर पाहायला मिळते.

९. आपली सेवा केवळ नाममात्र असेल तर काय केले पाहिजे?

ख्रिस्ताने सार्दीस मंडळीला सांगितले: “तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस.” आपण आध्यात्मिकरित्या जागृत आहोत असे लोकांना वाटत असेल; पण ख्रिस्ती विशेषाधिकारांबद्दल जर आपण उदासीन असू, आपली सेवा नाममात्र आणि आध्यात्मिकरित्या ‘मरणाच्या पंथास लागलेली’ असेल तर आपण काय करावे? असे असल्यास, आपण राज्याचा संदेश ‘कसा स्वीकारला व ऐकला ह्‍याची आठवण’ करून पवित्र सेवेत नव्या उत्साहाने कार्य करण्यास सुरवात केली पाहिजे. ख्रिस्ती सभांमध्ये पूर्ण मनाने सहभाग घेणे निश्‍चितच महत्त्वाचे आहे. (इब्री लोकांस १०:२४, २५) ख्रिस्ताने सार्दीस येथील मंडळीला बजावून सांगितले: “तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन; मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हे तुला मुळीच कळणार नाही.” आपल्या काळाविषयी काय? लवकरच आपल्याला जाब द्यावा लागेल.

१०. सार्दीस मंडळीसारख्या परिस्थितीतही काही ख्रिश्‍चनांबद्दल कोणते शब्द खरे ठरतील?

१० सार्दीससारखी एखाद्या मंडळीची परिस्थिती असली तरीसुद्धा काही थोडके जन असे असतील ज्यांनी ‘आपली वस्त्रे विटाळविली नाहीत आणि ते शुभ्र वस्त्रे परिधान करून ख्रिस्ताबरोबर फिरू शकतात कारण तशी त्यांची योग्यता आहे.’ ते आपले ख्रिस्ती ओळखचिन्ह कायम ठेवतात, आणि या जगाच्या नैतिक व धार्मिक मलीनतेपासून निष्कलंक व निर्दोष राहतात. (याकोब १:२७) त्यामुळे येशू ‘जीवनाच्या पुस्तकातून त्यांचे नाव खोडणारच नाही, आणि पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर तो त्यांचे नाव पत्करील.’ ख्रिस्तासोबत चालण्यास योग्य ठरवण्यात आलेला अभिषिक्‍त जनांचा त्याचा वधू वर्ग शुभ्र, स्वच्छ तागाचे तलम वस्त्र परिधान केलेला असेल; हे वस्त्र देवाच्या पवित्र जनांच्या नीतिमान कृत्यांस सूचित करते. (प्रकटीकरण १९:८) स्वर्गात त्यांच्याकरता राखून ठेवलेले अद्‌भुत सेवेचे विशेषाधिकार त्यांना या जगावर विजय मिळवण्यास प्रोत्साहन देतात. ज्यांना पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची आशा आहे त्यांच्याकरताही अनेक आशीर्वाद राखून ठेवलेले आहेत. त्यांची नावे देखील जीवनाच्या पुस्तकात लिहिली जातात.

११. आध्यात्मिकरित्या आपण सुस्तावू लागलो असू तर आपण काय करावे?

११ आपल्यापैकी कोणीही सार्दीस मंडळीसारख्या आध्यात्मिक दुर्दशेत येऊ इच्छित नाही. पण आध्यात्मिकदृष्ट्या आपण थोडे सुस्त होऊ लागलो आहोत असे आपल्या लक्षात आल्यास आपण काय करावे? स्वतःच्याच भल्याकरता आपण लवकरात लवकर पावले उचलली पाहिजेत. कदाचित आपण अधार्मिक गोष्टींकडे आकर्षित होत असू किंवा सभांची उपस्थिती अथवा सेवाकार्यातील सहभागात कमी पडत असू. असे असल्यास, आपण मनःपूर्वक प्रार्थना करून यहोवाची मदत मागितली पाहिजे. (फिलिप्पैकर ४:६, ७, १३) दैनंदिन बायबल वाचन आणि शास्त्रवचनांचा व ‘विश्‍वासू कारभाऱ्‍याने’ पुरवलेल्या प्रकाशनांचा अभ्यास, आपल्याला आध्यात्मिकरित्या जागृत राहण्यास मदत करेल. (लूक १२:४२-४४) मग आपणही सार्दीसच्या त्या सदस्यांप्रमाणे होऊ ज्यांना ख्रिस्ताची संमती प्राप्त झाली; तसेच आपल्या सहविश्‍वासू बांधवांकरताही आपण एक आशीर्वाद ठरू.

फिलदेल्फिया येथील दूताला

१२. प्राचीन फिलदेल्फिया येथील धार्मिक स्थितीचे तुम्ही कसे वर्णन कराल?

१२ फिलदेल्फिया येथील मंडळीला येशूने शाबासकी दिली. (प्रकटीकरण ३:७-१३ वाचा.) फिलदेल्फिया (सध्याचे अलासेहिर) एकेकाळी पश्‍चिमी आशिया मायनरमधील द्राक्षारस उत्पादित करणाऱ्‍या भागातील एक समृद्ध शहर होते. किंबहुना या शहरात खासकरून ज्या देवीला पूजले जायचे ती डायनायसस द्राक्षारसाची देवता होती. फिलदेल्फिया येथील यहुद्यांनी, मोशेच्या नियमशास्त्रातील काही प्रथा सुरू ठेवण्याकरता किंवा त्या पुन्हा सुरू करण्याकरता तेथील यहुदी ख्रिश्‍चनांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही असे दिसते.

१३. ‘दाविदाच्या किल्लीचा’ ख्रिस्ताने कशाप्रकारे उपयोग केला आहे?

१३ ख्रिस्ताकडे “दाविदाची किल्ली आहे” आणि राज्याची सर्व कार्ये व विश्‍वासाच्या घराण्याचे प्रशासन सर्वस्वी त्याच्यावर सोपवण्यात आले आहे. (यशया २२:२२; लूक १:३२) येशूने प्राचीन फिलदेल्फिया व इतर ठिकाणच्या ख्रिश्‍चनांकरता राज्याशी संबंधित असलेल्या संधींचे व विशेषाधिकारांचे द्वार उघडण्याकरता या किल्लीचा उपयोग केला. १९१९ सालापासून त्याने ‘विश्‍वासू कारभाऱ्‍यापुढे’ राज्य प्रचाराकडे नेणारे ‘मोठे द्वार’ उघडले आणि हे द्वार कोणत्याही विरोधकाला बंद करता येणार नाही. (१ करिंथकर १६:९; कलस्सैकर ४:२-४) अर्थात, जे “सैतानाच्या सभेचे” आहेत त्यांच्याकरता राज्याच्या विशेषाधिकारांचे द्वार बंद करण्यात आले आहे कारण हे आत्मिक इस्राएलात सामील नाहीत.

१४. (अ) फिलदेल्फिया येथील मंडळीला येशूने कोणती प्रतिज्ञा केली? (ब) ‘परीक्षाप्रसंगात’ पडण्यापासून रोखले जाण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

१४ येशूने फिलदेल्फिया येथील ख्रिश्‍चनांना ही प्रतिज्ञा केली: “धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहे म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनहि मी तुला राखीन.” प्रचाराकरता येशूसारखा धीर दाखवण्याची गरज आहे. त्याने कधीही आपल्या शत्रूपुढे हात टेकले नाहीत, तर आपल्या पित्याची इच्छा पुरी करत तो राहिला. म्हणूनच स्वर्गातील अमर जीवनाकरता त्याचे पुनरुत्थान करण्यात आले. आपणही यहोवाची उपासना करण्याच्या आपल्या निर्णयावर कायम राहिलो आणि सुवार्तेचा प्रचार करण्याद्वारे राज्याला सहयोग दिला तर “परीक्षाप्रसंग,” अर्थात सध्याच्या परीक्षेच्या काळात आपल्याला पडण्यापासून रोखले जाईल. ख्रिस्ताने दिलेले ‘जे आपल्याजवळ आहे ते आपण दृढ धरून राहू’ आणि ही राज्याची ठेव अधिक वाढवण्याचा प्रयत्न करू. असे केल्यामुळे अभिषिक्‍त जनांना अमूल्य स्वर्गीय मुगूट आणि त्यांच्या एकनिष्ठ साथीदारांना पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.

१५. जे “देवाच्या मंदिरातील स्तंभ” ठरतील त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे?

१५ ख्रिस्त पुढे म्हणतो: “जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन; . . . त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरूशलेम, म्हणजे माझ्या देवाची नगरी, हिचे नाव, आणि माझे नवे नाव लिहीन.” अभिषिक्‍त पर्यवेक्षकांनी खऱ्‍या उपासनेला पाठिंबा दिला पाहिजे. देवाच्या राज्याचा प्रचार करण्याद्वारे आणि आध्यात्मिकरित्या शुद्ध राहण्याद्वारे त्यांनी ‘नव्या यरूशलेमेचे’ सदस्य बनण्याची आपली योग्यता टिकवून ठेवली पाहिजे. जर त्यांना गौरवी स्वर्गीय मंदिरात आधारस्तंभ बनायचे असेल, देवाच्या नगरीचे स्वर्गीय नागरिक या नात्याने या नगरीचे नाव धारण करायचे असेल आणि ख्रिस्ताची वधू या नात्याने त्याचे नाव मिळवायचे असेल तर असे करणे अत्यावश्‍यक आहे. अर्थात, “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो” हे ऐकणारे कान देखील त्यांना असणे महत्त्वाचे आहे.

लावदिकीया येथील दूताला

१६. लावदिकीयाविषयी कोणती माहिती उपलब्ध आहे?

१६ लावदिकीया येथील आत्मसंतुष्ट मंडळीला ख्रिस्ताने ताडन दिले. (प्रकटीकरण ३:१४-२२ वाचा.) इफिसपासून पूर्वेकडे १५० किलोमीटर अंतरावर आणि ल्यूकस नदीच्या सुपीक खोऱ्‍यांतील महत्त्वाच्या व्यापार महामार्गांच्या केंद्रस्थानी वसलेले लावदिकीया शहर एक अतिशय वैभवी उत्पादन व आर्थिक केंद्र होते. या भागातील काळ्या लोकरीपासून बनलेली वस्त्रे अतिशय प्रसिद्ध होती. येथे एक सुविख्यात वैद्यकीय महाविद्यालय होते आणि फ्रिजियन चूर्ण नावाचे एक डोळ्यांकरता असलेले औषध कदाचित येथेच तयार केले जात असावे. औषधीचा देव असक्लीपियस या शहराच्या मुख्य देवतांपैकी एक होता. लावदिकीया शहरात यहुद्यांची जनसंख्या बरीच मोठी होती आणि यांपैकी काही यहुदी धनाढ्य होते.

१७. लावदिकीया येथील मंडळीला ताडन का देण्यात आले?

१७ लावदिकीया मंडळीला तिच्या ‘दूताद्वारे’ उद्देशून येशू ‘विश्‍वसनीय व खरा साक्षी, देवाच्या सृष्टीचे आदिकारण’ या नात्याने अधिकारवाणीने बोलतो. (कलस्सैकर १:१३-१६) लावदिकीया येथील ख्रिश्‍चनांना ताडन देण्यात आले कारण आध्यात्मिकरित्या ते धड ‘शीतही नव्हते आणि उष्णही नव्हते.’ कोमट असल्यामुळे ख्रिस्त त्यांना ओकून टाकणार होता. हे रूपक त्यांना समजायला अगदी सोपे असेल. या शहरापासून जवळच असलेल्या हायरापोलिस या ठिकाणी गरम पाण्याचे झरे होते आणि कलोसे येथे थंड पाण्याचे झरे होते. लावदिकीया शहराकरता बऱ्‍याच अंतरावरून पाणी नळांतून पोचवले जात असल्यामुळे शहरात पोचता पोचता ते कदाचित कोमट होत असावे. काही अंतर हे पाणी नहरातून वाहून नेले जाते असे. लावदिकियाच्या जवळ आल्यावर ते सीमेंटने जोडण्यात आलेल्या दगडी नळ्यांतून वाहात असे.

१८, १९. लावदिकीया येथील ख्रिश्‍चनांप्रमाणे ज्यांची स्थिती आहे अशा सध्याच्या काळातील ख्रिश्‍चनांना कशी मदत केली जाऊ शकते?

१८ लावदिकीयाच्या सदस्यांसारख्या व्यक्‍ती उष्ण पेयाप्रमाणे उत्साहवर्धकही नसतात आणि थंड पेयाप्रमाणे तजेलादायकही नसतात. कोमट पाण्याप्रमाणे त्यांना तोंडातून ओकून टाकले जाते! “ख्रिस्ताच्या वतीने वकिली” करणाऱ्‍या अभिषिक्‍त जनांच्या रूपात येशू त्यांना आपला प्रवक्‍ता म्हणून स्वीकारत नाही. (२ करिंथकर ५:२०) त्यांनी पश्‍चात्ताप न केल्यास राज्य प्रचारक या नात्याने त्यांचा विशेषाधिकार त्यांना गमवावा लागेल. लावदिकीयाचे सदस्य पृथ्वीवरील धनाच्या मागे लागले होते आणि ‘आपण कष्टी, दीन, दरिद्री, आंधळे व उघडेवाघडे आहोत, हे त्यांना कळले नाही.’ हे आध्यात्मिक दारिद्र्‌य, आंधळेपण व नागडेपण दूर करण्याकरता त्यांच्यासारख्या स्थितीत असलेल्या ख्रिश्‍चनांनी ख्रिस्ताकडून पारखलेल्या विश्‍वासाचे “शुद्ध केलेले सोने,” नीतिमत्तेची “शुभ्र वस्त्रे” आणि आध्यात्मिक दृष्टी सुधारणारे ‘डोळ्यात घालायचे अंजन’ विकत घेतले पाहिजे. ख्रिस्ती पर्यवेक्षक त्यांना त्यांच्या आध्यात्मिक गरजेची जाणीव करून देण्याकरता आनंदाने मदत करतील, जेणेकरून त्यांना “विश्‍वासासंबंधाने धनवान” होता यावे. (याकोब २:५; मत्तय ५:३) शिवाय, पर्यवेक्षकांना त्यांना हे आध्यात्मिक “अंजन” लावण्यास, अर्थात, येशूची शिकवणूक, मार्गदर्शन, आदर्श व त्याची चित्तवृत्ती स्वीकारून त्यानुसार चालण्यास मदत केली पाहिजे. हे “देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी” यांवर उत्तम औषध आहे.—१ योहान २:१५-१७.

१९ ज्यांच्यावर येशूचे प्रेम आहे त्या सर्वांना तो ताडन व शिक्षा देतो. त्याच्या हाताखाली कार्य करणाऱ्‍या पर्यवेक्षकांनीही असेच करावे. (प्रेषितांची कृत्ये २०:२८, २९) लावदिकीया येथील ख्रिश्‍चनांना ‘आस्था बाळगून पश्‍चात्ताप करण्याची’ गरज होती, अर्थात त्यांना आपल्या विचारसरणीत व जीवनात बदल करायचे होते. आपल्यापैकी काहीजणांना अशा जीवनशैलीची सवय झाली आहे का, जिच्यात देवाच्या पवित्र सेवेला फारसे महत्त्व दिले जात नाही? असे असल्यास, आपणही ‘येशूकडून डोळ्यात घालण्यास अंजन विकत’ घेऊ या, जेणेकरून आपले डोळे उघडतील आणि आवेशाने प्रथम राज्याचा शोध घेण्याचे महत्त्व आपल्याला समजेल.—मत्तय ६:३३.

२०, २१. आज येशूच्या ‘दार ठोकण्याला’ कोण योग्यरित्या प्रतिसाद देत आहेत आणि त्यांना कशाची आशा आहे?

२० ख्रिस्त म्हणतो, “पाहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन, आणि तो माझ्याबरोबर जेवील.” पृथ्वीवर असताना येशूने कित्येकदा जेवत असताना आपल्या शिष्यांना आध्यात्मिक शिक्षण दिले. (लूक ५:२९-३९; ७:३६-५०; १४:१-२४) आता तो लावदिकीयासारख्या मंडळीचे दार ठोकीत आहे. या मंडळीचे सदस्य त्याच्याकरता दार उघडतील का, त्याच्याविषयी त्यांना सुरवातीला असलेले प्रेम पुन्हा जागृत करतील का, त्याचे स्वागत करतील का आणि त्याचे शिक्षण स्वीकारतील का? त्यांनी असे केल्यास, ख्रिस्त त्यांच्यासोबत जेवेल आणि यामुळे त्यांना मोठा आध्यात्मिक फायदा होईल.

२१ आज “दुसरी मेंढरे” लाक्षणिक अर्थाने येशूला आत घेत आहेत; ही त्यांची कृती त्यांना सार्वकालिक जीवन मिळवून देईल. (योहान १०:१६; मत्तय २५:३४-४०, ४६) ख्रिस्त ‘जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसला तसा’ विजय मिळवणाऱ्‍या प्रत्येक अभिषिक्‍त जनाला तो ‘आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देण्याचा’ विशेषाधिकार बहाल करील. होय, विजयशाली अभिषिक्‍त जनांना येशू स्वर्गात त्याच्या पित्याच्या उजवीकडे आपल्याबरोबर सिंहासनावर बसण्याचे महान प्रतिफळ देण्याचे अभिवचन देतो. दुसऱ्‍या मेंढरांपैकी जे विजय मिळवतात ते राज्य शासनाखाली पृथ्वीवर एक अद्‌भुत स्थान मिळण्याची आशा करू शकतात.

आपल्या सर्वांकरता धडा

२२, २३. (अ) सात मंडळ्यांना बोललेल्या येशूच्या शब्दांचा सर्व ख्रिश्‍चनांना कशाप्रकारे फायदा होऊ शकतो? (ब) आपण कोणता निर्धार करावा?

२२ येशूने आशिया मायनर येथील मंडळ्यांना दिलेले संदेश सर्व ख्रिश्‍चनांकरता उपयोगी आहेत यात काहीही शंका नाही. उदाहरणार्थ, ख्रिस्ताने कशाप्रकारे योग्य शाबासकी दिली याकडे लक्ष देऊन प्रेमळ ख्रिस्ती वडील आध्यात्मिकरित्या चांगल्या स्थितीत असलेल्या व्यक्‍तींना व मंडळ्यांना शाबासकी देण्यास प्रवृत्त होतात. आणि काही कमतरता असल्यास हे वडील आपल्या सहविश्‍वासू बांधवांना शास्त्रवचनांतील उपाय लागू करण्यास मदत करतात. ख्रिस्ताने या सात मंडळ्यांना दिलेल्या मार्गदर्शनातील विविध मुद्द्‌यांचे प्रार्थनापूर्वक आणि विनाविलंब पालन केल्यास त्यांचा आपल्या सर्वांना फायदा होईल. *

२३ हे शेवटले दिवस आत्मसंतुष्ट, भौतिकवादी प्रवृत्तीला किंवा ज्यामुळे आपण देवाची केवळ नाममात्र सेवा करण्यास प्रवृत्त होऊ अशा कोणत्याही गोष्टीला बळी पडण्याचे नाहीत. तेव्हा, येशू ज्यांना आपापल्या स्थानी कायम ठेवील अशा समयांप्रमाणे सर्व मंडळ्यांनी सदोदित चमकत राहिले पाहिजे. विश्‍वासू ख्रिस्ती या नात्याने, आपण ख्रिस्त बोलतो तेव्हा लक्ष देण्याचा आणि आत्मा काय म्हणतो हे ऐकण्याचा निर्धार करावा. असे केल्यास आपल्याला यहोवाच्या गौरवाकरता ज्योतीवाहक होण्याचा चिरकालिक आनंद प्राप्त होईल.

[तळटीप]

^ परि. 22 प्रकटीकरण २:१–३:२२ या भागाची चर्चा, यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! या पुस्तकातील अध्याय ७-१३ यांतही करण्यात आली आहे.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• ‘ईजबेल नावाची स्त्री’ कोण होती आणि देवभीरू स्त्रिया तिचे अनुकरण का करत नाहीत?

• सार्दीस मंडळीत कशाप्रकारची परिस्थिती होती आणि तेथे राहणाऱ्‍या बहुतेक ख्रिश्‍चनांप्रमाणे होण्याचे आपण कसे टाळू शकतो?

• येशूने फिलदेल्फिया मंडळीला कोणती अभिवचने दिली आणि ती आज कशाप्रकारे लागू होतात?

• लावदिकीया येथील ख्रिश्‍चनांना ताडन का देण्यात आले पण आवेशी ख्रिश्‍चनांपुढे कोणत्या आशा आहेत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चित्र]

‘ईजबेल नावाच्या स्त्रीचे’ दुष्ट मार्ग आपण टाळले पाहिजेत

[१८ पानांवरील चित्रे]

येशूने आपल्या अनुयायांपुढे राज्य विशेषाधिकार मिळवून देणारे ‘मोठे द्वार’ उघडले आहे

[२० पानांवरील चित्र]

तुम्ही येशूचे स्वागत करून त्याचे ऐकता का?