व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आधी आणि पश्‍चात धुरकट गतकाळ, उज्ज्वल भविष्य

आधी आणि पश्‍चात धुरकट गतकाळ, उज्ज्वल भविष्य

“देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल”

आधी आणि पश्‍चात धुरकट गतकाळ, उज्ज्वल भविष्य

“देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, . . . मनातील विचार व हेतु ह्‍यांचे परीक्षक असे आहे.” (इब्री लोकांस ४:१२) असे प्रेषित पौलाने देवाच्या संदेशातील भेदक शक्‍तीविषयी म्हटले. अंतःकरणाचा ठाव घेण्याच्या त्याच्या क्षमतेची प्रचिती खासकरून सा.यु. पहिल्या शतकादरम्यान आली. त्या काळच्या वाईट प्रभावातही ख्रिस्ती बनलेल्यांनी नवीन मनुष्यत्व धारण केले.—रोमकर १:२८, २९; कलस्सैकर ३:८-१०.

देवाच्या वचनात अर्थात बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आलेल्या संदेशात असलेली बदल घडवून आणण्याची शक्‍ती, ही आजही तितकीच स्पष्ट दिसून येते. जसे की, रिकर्ट नामक एका उंचपुऱ्‍या, धिप्पाड मनुष्याचे उदाहरण घ्या. रिकर्टच्या जणू नाकावरच राग असायचा; थोडेसे जरी त्याला डिवचले की तो सरळ बुक्के मारायचा. तो सतत हाणामारी करायचा. इतकेच नव्हे तर तो एका बॉक्सींग क्लबमध्येही सामील झाला होता. तो बॉक्सींगमध्ये प्रवीण झाला आणि जर्मनीच्या वेस्टफालियाचा हेवीवेट बॉक्सींग गटातील विजेता खेळाडू बनला. रिकर्ट खूप मद्यपानही करायचा आणि नेहमी हमरीतुमरीवर उतरायचा. अशाच एका प्रसंगी, एक जण ठार मारला गेला आणि रिकर्टला तुरंगात टाकण्यात आले.

रिकर्टचे वैवाहिक जीवन कसे होते? तो म्हणतो: “बायबलचा अभ्यास सुरू करण्याआधी हाईकचा आणि माझा वेगवेगळा मार्ग होता. हाईक आपल्या मैत्रिणींबरोबर असायची आणि मी माझे छंद—मुख्यतः, बॉक्सींग, सर्फिंग आणि डायव्हिंग यांत व्यस्त असायचो.”

यहोवाच्या साक्षीदारांबरोबर हाईक आणि रिकर्ट बायबलचा अभ्यास करू लागल्यानंतर, देवाच्या वचनातील उच्च दर्जांच्या एकमतात आपली जीवनशैली आणण्याकरता अशक्य वाटणारे मोठमोठे बदल करावे लागतील या विचारानेच रिकर्टला असाहाय्य वाटू लागले. परंतु रिकर्ट जसजसा यहोवा देवाला ओळखू लागला, तसतसे त्याच्या मनात यहोवाला संतुष्ट करण्याची तीव्र इच्छा निर्माण होऊ लागली. रिकर्टने जाणले, की हिंसेची आवड बाळगणाऱ्‍या किंवा मनोरंजनासाठी हिंसा करणाऱ्‍या लोकांना देव स्वीकारत नाही. यहोवा, ‘जुलमाची आवड धरणाऱ्‍यांचा द्वेष’ करतो, हे रिकर्टला समजले.—स्तोत्र ११:५, पं.र.भा.

शिवाय, परादीस पृथ्वीवर चिरकाल जगण्याची आशा रिकर्ट आणि हाईक या दोघांनाही अतिशय आवडली. त्यांना दोघांना परादीसमध्ये एकत्र राहायचे होते! (यशया ६५:२१-२३) “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल,” या आमंत्रणाचा रिकर्टच्या मनावर गहिरा प्रभाव पडला. (याकोब ४:८) “जुलूम करणाऱ्‍याशी स्पर्धा करू नको. त्याची कोणतीहि रीत स्वीकारू नको. कारण परमेश्‍वराला कुटिलाचा वीट आहे. पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे,” या ईश्‍वरप्रेरित सल्ल्याचे अनुकरण करण्याचे मूल्य त्याने जाणले.—नीतिसूत्रे ३:३१, ३२.

आपली जीवनशैली बदलण्याची रिकर्टची उत्कट इच्छा होती तरीसुद्धा आपण हे आपल्या बळावर करू शकत नाही हे त्याने जाणले. याबाबतीत आपल्याला प्रार्थनेद्वारे देवाच्या मदतीची आवश्‍यकता आहे, ही गोष्ट त्याने कबूल केली. त्यानुसार मग, येशूने आपल्या प्रेषितांना जे सांगितले ते त्याने केले: “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्‍त आहे.”—मत्तय २६:४१.

हिंसा आणि राग याविषयी देवाचा काय दृष्टिकोन आहे हे शिकल्यावर रिकर्टला खात्री पटली की आपण बॉक्सींग खेळू शकत नाही. यहोवाच्या आणि रिकर्टबरोबर बायबल अभ्यास करणाऱ्‍यांच्या साहाय्याने त्याने हिंसा करण्याचे सोडून दिले. बॉक्सींग आणि मारामारीत भाग घेण्याचे त्यांने थांबवले आणि आपले कौटुंबिक जीवन सुधारण्याचे ठरवले. आता, यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मंडळीत सौम्य मनोवृत्तीचा पर्यवेक्षक या नात्याने सेवा करणारा रिकर्ट म्हणतो: “बायबलमधून सत्य शिकल्यामुळे मी, कोणतेही कार्य करण्याआधी थांबून विचार करण्यास शिकलो आहे. आता माझ्या पत्नीबरोबर व मुलांबरोबर मी प्रेमाने व आदराने वागतो. यामुळे आमच्या कुटुंबात जवळीक निर्माण झाली आहे.”

चुकीची माहिती मिळालेल्या लोकांनी कधीकधी यहोवाच्या साक्षीदारांवर असा आरोप केला आहे, की ते कुटुंबे उद्‌ध्वस्त करतात. परंतु, रिकर्टसारख्या लोकांची उदाहरणे लोकांचा हा खोटा आरोप हाणून पाडतात. वास्तविकतेत, ज्यांचा गतकाळ धुरकट होता अशा लोकांच्या कुटुंबात, बायबलमधील सत्यामुळे स्थैर्य येऊ शकते व त्यांना उज्ज्वल भविष्य प्राप्त होऊ शकते.—यिर्मया २९:११.

[९ पानांवरील संक्षिप्त आशय]

“पृथ्वीवरील परादीसच्या आशेने मला, परिवर्तन करण्यास प्रवृत्त केले”

[९ पानांवरील चौकट]

बायबल तत्त्वांचा परिणाम

बायबलचा लोकांच्या जीवनावर जबरदस्त प्रभाव पडू शकतो. येथे, हिंसक लोकांना बदलण्यास मदतदायी ठरलेली काही शास्त्रवचनीय तत्त्वे दिलेली आहेत:

“ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्‍यांपेक्षा श्रेष्ठ होय. आत्मसंयमन करणारा नगर जिंकणाऱ्‍यांपेक्षा श्रेष्ठ होय.” (नीतिसूत्रे १६:३२) बेलगाम क्रोध, शक्‍तीचे नव्हे तर कमजोरीचे चिन्ह आहे.

“विचारवंत मनुष्य मंदक्रोध होतो.” (नीतिसूत्रे १९:११, NW) एखाद्या व्यक्‍तीला, एखाद्या परिस्थितीबद्दल सूक्ष्मदृष्टी आणि समज असल्यास तिला, विरोधाच्या प्रसंगामागची खरी कारणे पाहून तत्काळ क्रोधित न होण्यास मदत होते.

“रागीट मनुष्याशी . . . संगति धरू नको; धरिशील तर त्याची चालचलणूक शिकून तू आपला जीव पाशात घालिशील.” (नीतिसूत्रे २२:२४, २५) ख्रिस्ती लोक, रागीट स्वभावाच्या लोकांबरोबर मैत्री करण्याचे सुज्ञपणे टाळतात.