व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्त मंडळ्यांशी बोलतो

ख्रिस्त मंडळ्यांशी बोलतो

ख्रिस्त मंडळ्यांशी बोलतो

“जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करितो, . . . तो असे म्हणतो.” प्रकटीकरण २:१.

१, २. ख्रिस्ताने आशिया मायनर येथील सात मंडळ्यांना काय म्हटले हे जाणून घेण्यास आपण का उत्सुक असावे?

यहोवाचा एकुलता एक पुत्र, येशू ख्रिस्त हा ख्रिस्ती मंडळीचा प्रमुख आहे. आपल्या अभिषिक्‍त अनुयायांची मंडळी निष्कलंक राहावी म्हणून ख्रिस्त त्यांना शाबासकी देऊन आणि त्यांच्या चुका दुरुस्त करून त्यांच्यावर आपले मस्तकपद चालवतो. (इफिसकर ५:२१-२७) याची उदाहरणे प्रकटीकरण अध्याय २ व यांत आढळतात. या अध्यायांत आशिया मायनरमधील सात मंडळ्यांना उद्देशून येशूने दिलेले जबरदस्त व प्रेमळ संदेश सापडतात.

सात मंडळ्यांना उद्देशून बोललेले येशूचे शब्द ऐकण्याआधी प्रेषित योहानाला ‘प्रभूच्या दिवसाचा’ दृष्टान्त देण्यात आला. (प्रकटीकरण १:१०) हा ‘दिवस’, १९१४ साली मशीही राज्याची स्थापना झाली तेव्हा सुरू झाला. त्यामुळे ख्रिस्ताने त्या मंडळ्यांना जे सांगितले ते या शेवटल्या काळात आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याने दिलेले प्रोत्साहन आणि मार्गदर्शन या कठीण काळाला तोंड देण्याकरता आपले साहाय्य करतात.—२ तीमथ्य ३:१-५.

३. प्रेषित योहानाने पाहिलेले “तारे,” “दूत” आणि ‘सोन्याच्या समया’ लाक्षणिक अर्थाने कशास सूचित करतात?

दृष्टान्तात योहानाने गौरवशाली येशू ख्रिस्ताला पाहिले; त्याने ‘आपल्या उजव्या हातात सात तारे धारण केले आहेत’ व तो “सात समयांमधून” अर्थात मंडळ्यांमधून “चालतो.” हे “तारे” म्हणजे “सात मंडळ्यांचे दूत आहेत.” (प्रकटीकरण १:२०; २:१) प्रसंगी, तारे हे स्वर्गीय आत्मिक देवदूतांना सूचित करतात पण आत्मिक प्राण्यांकरता संदेश लिखित करण्यासाठी ख्रिस्ताने एका मानवाचा उपयोग केला नसता. तेव्हा हे “तारे” आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या पर्यवेक्षकांना किंवा वडील वर्गांना सूचित करतात हाच निष्कर्ष तर्कशुद्ध आहे. “दूत” हा शब्द, संदेशवाहक या नात्याने त्यांच्या भूमिकेस सूचित करतो. देवाच्या संघटनेत विस्तार झाल्यामुळे ‘विचारशील कारभाऱ्‍याने’ येशूच्या ‘दुसऱ्‍या मेंढरांतील’ सुयोग्य पुरुषांना देखील पर्यवेक्षक म्हणून नेमले आहे.—लूक १२:४२-४४; योहान १०:१६.

४. ख्रिस्त मंडळ्यांना काय सांगतो त्याकडे लक्ष दिल्याने वडिलांना कशाप्रकारे फायदा होऊ शकतो?

“तारे” येशूच्या उजव्या हातात—त्याच्या सत्तेखाली, नियंत्रणाखाली आहेत, तसेच, त्याची कृपादृष्टी व संरक्षण त्यांच्यावर आहे. त्याअर्थी, त्यांना त्याला हिशेब द्यावयाचा आहे. सात मंडळ्यांपैकी प्रत्येक मंडळीला बोललेल्या येशूच्या शब्दांकडे लक्ष दिल्याने आजच्या काळातील वडिलांना देखील मिळत्याजुळत्या परिस्थितींना तोंड देण्यास मदत मिळेल. अर्थात सर्वच ख्रिश्‍चनांनी देवाच्या पुत्राच्या मार्गदर्शनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. (मार्क ९:७) तर मग ख्रिस्त मंडळ्यांना जे सांगत आहे त्याकडे लक्ष दिल्याने आपण काय शिकू शकतो?

इफिस येथील दूताला

५. इफिस कशाप्रकारचे शहर होते?

येशूने इफिस येथील मंडळीला शाबासकी दिली व त्यांचे ताडन देखील केले. (प्रकटीकरण २:१-७ वाचा.) आशिया मायनरच्या पश्‍चिम किनाऱ्‍यावरील या धनाढ्य, व्यापारी व धार्मिक केंद्र असलेल्या शहरात महादेवी अर्तमीचे भव्य मंदिर होते. इफिस शहर हे अनैतिकता, खोटा धर्म आणि जादूटोण्याचे माहेरघर असले तरीसुद्धा प्रेषित पौलाने व इतरांनी या शहरात केलेल्या सेवाकार्यावर देवाचा आशीर्वाद होता.—प्रेषितांची कृत्ये, अध्याय १९.

६. आज निष्ठावान ख्रिश्‍चनांचे प्राचीन इफिस येथील ख्रिश्‍चनांशी कोणते साम्य आहे?

ख्रिस्ताने इफिस येथील मंडळीला असे म्हणून शाबासकी दिली: “तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत; तुला दुर्जन सहन होत नाहीत, जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहो असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केली; आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले.” आज येशूच्या खऱ्‍या उपासकांच्या मंडळ्यांचाही चांगली कृत्ये, परिश्रम आणि धीर याबाबतीत इफिस येथील मंडळीसारखाच उत्तम रेकॉर्ड आहे. ते स्वतःला प्रेषित म्हणवू इच्छिणाऱ्‍या खोट्या बांधवांना खपवून घेत नाहीत. (२ करिंथकर ११:१३, २६) इफिस येथील ख्रिश्‍चनांप्रमाणे आज निष्ठावान ख्रिश्‍चनांनाही “दुर्जन सहन होत नाहीत.” यहोवाच्या उपासनेची शुद्धता टिकवून ठेवण्याकरता आणि मंडळीचे संरक्षण करण्याकरता ते अपश्‍चात्तापी धर्मत्यागी व्यक्‍तींची सोबत करीत नाहीत.—गलतीकर २:४, ५; २ योहान ८-११.

७, ८. इफिस येथील मंडळीत कोणती गंभीर समस्या होती आणि आपण अशा परिस्थितीला कसे तोंड देऊ शकतो?

तरीसुद्धा, इफिस येथील ख्रिश्‍चनांना एक गंभीर समस्या होती. येशूने म्हटले: “तू आपली पहिली प्रीति सोडली ह्‍याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे.” या मंडळीच्या सदस्यांना, यहोवाबद्दल सुरवातीला वाटणारे प्रेम पुन्हा जागृत करणे गरजेचे होते. (मार्क १२:२८-३०; इफिसकर २:४; ५:१, २) आपण स्वतः देखील देवाबद्दल आपल्याला वाटणारे पहिले प्रेम गमवण्यापासून सांभाळले पाहिजे. (३ योहान ३) पण भौतिक धन किंवा सुखविलास यांसारख्या गोष्टी आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान घेऊ लागल्या असतील तर आपण काय करावे? (१ तीमथ्य ४:८; ६:९, १०) अशा इच्छाआकांक्षांऐवजी आपल्या मनात यहोवाबद्दल उत्कट प्रेम आणि त्याने व त्याच्या पुत्राने आपल्याकरता जे काही केले त्याबद्दल कृतज्ञता उत्पन्‍न करण्यास मदत मिळावी म्हणून आपण कळकळीने प्रार्थना केली पाहिजे.—१ योहान ४:१०, १६.

ख्रिस्ताने इफिसकरांना असे प्रोत्साहन दिले: “तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर; व पश्‍चात्ताप करून आपली पहिली कृत्ये कर.” त्यांनी असे न केल्यास काय घडेल? येशूने म्हटले: “तू पश्‍चात्ताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन.” सगळ्या मेंढरांची प्रथम प्रीती नाहीशी झाली तर साहजिकच ती “समई” अर्थात मंडळी अस्तित्वातच राहणार नाही. म्हणूनच, आवेशी ख्रिस्ती या नात्याने आपण, आपली मंडळी सदैव आध्यात्मिकरित्या चमकत राहावी म्हणून परीश्रम करत राहू या.—मत्तय ५:१४-१६.

९. फूट पाडण्याच्या प्रवृत्तीविषयी आपला कसा दृष्टिकोन असावा?

इफिसकरांविषयी एक चांगली गोष्ट होती, ती म्हणजे “निकलाइतांच्या कृत्यांचा” त्यांनी द्वेष केला. प्रकटीकरणात जी माहिती दिली आहे त्या व्यतिरिक्‍त या पंथाच्या उगमाविषयी, शिकवणुकींविषयी आणि प्रथांविषयी कोणतीही खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही. पण येशूने मनुष्यांचे अनुकरण करण्याविरुद्ध ताकीद दिली होती; त्यानुसार आपण इफिस येथील ख्रिश्‍चनांचे अनुकरण करून मंडळीत फूट पाडण्याच्या प्रवृत्तीचा नेहमी द्वेष केला पाहिजे.—मत्तय २३:१०.

१०. आत्मा काय म्हणतो याकडे लक्ष देणाऱ्‍यांना कोणते प्रतिफळ मिळेल?

१० ख्रिस्ताने म्हटले: “आत्मा मंडळ्यास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.” पृथ्वीवर असताना येशू देवाच्या आत्म्याच्या प्रभावाने बोलत असे. (यशया ६१:१; लूक ४:१६-२१) त्यामुळे आता देव पवित्र आत्म्याद्वारे येशूच्या माध्यमाने काय सांगतो याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आत्म्याच्या निर्देशनाने येशू अभिवचन देतो: “जो विजय मिळवितो त्याला, देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे, त्यावरचे फळ मी खावयास देईन.” आत्मा काय म्हणतो याकडे लक्ष देणाऱ्‍या अभिषिक्‍त जनांना स्वर्गातील “देवाच्या बागेत,” म्हणजे खुद्द यहोवाच्या सहवासात अमरत्व प्राप्त होईल. ‘मोठा लोकसमुदाय’ देखील आत्म्याची वचने ऐकतो आणि त्यामुळे त्यातील सदस्यांना पृथ्वीवरील परादीसात जीवनाचा आनंद लुटता येईल, जेथे ते ‘जीवनाच्या पाण्याच्या नदीतून’ पाणी पितील आणि तिच्या काठाशी असलेल्या ‘झाडांच्या पानांमुळे’ आरोग्य मिळवतील.—प्रकटीकरण ७:९; २२:१, २; लूक २३:४३.

११. आपण यहोवाविषयीचे प्रेम वृद्धिंगत करण्यात कशाप्रकारे योगदान देऊ शकतो?

११ इफिसकर ख्रिश्‍चनांनी आपली पहिली प्रीती गमावली होती, पण आजच्या काळात एखाद्या मंडळीत अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर? यहोवाच्या प्रेमळ कार्यांविषयी आपल्या बांधवांशी बोलण्याद्वारे आपण त्याच्याविषयीचे प्रेम वृद्धिंगत करण्याचा वैयक्‍तिक प्रयत्न करावा. देवाने आपला प्रिय पुत्र खंडणीकरता देऊन जी महान प्रीती दाखवली तिच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्‍त करू शकतो. (योहान ३:१६; रोमकर ५:८) मंडळीच्या सभांमध्ये उत्तरे देताना किंवा आपले भाग सादर करताना, योग्य ठिकाणी आपण देवाच्या प्रीतीचा उल्लेख करू शकतो. ख्रिस्ती सेवाकार्यात देखील यहोवाच्या नावाची स्तुती करण्याद्वारे आपण त्याच्याबद्दल आपले वैयक्‍तिक प्रेम व्यक्‍त करू शकतो. (स्तोत्र १४५:१०-१३) होय, आपले शब्द व कृती मंडळीची पहिली प्रीती पुन्हा जागृत करण्यात अथवा ती वृद्धिंगत करण्यात बराच हातभार लावू शकतात.

स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला

१२. स्मुर्णा व तेथील धार्मिक रितीभातींसंबंधी इतिहासातून काय कळून येते?

१२ स्मुर्णा येथील मंडळीला जो “पहिला व शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला,” त्या पुनरुत्थित ख्रिस्ताने शाबासकी दिली. (प्रकटीकरण २:८-११ वाचा.) स्मुर्णा (सध्याचे इझ्मिअर, टर्की) हे शहर आशिया मायनरच्या पश्‍चिम किनाऱ्‍यावर वसलेले होते. ग्रीक लोक या शहरात स्थायिक झाले होते पण सा.यु.पू. ५८० सालाच्या सुमारास लिडियन लोकांनी या शहराचा नाश केला. थोर सिकंदरच्या उत्तराधिकाऱ्‍यांनी एका नव्या ठिकाणावर स्मुर्णा शहराची पुनर्बांधणी केली. हे शहर आशियातील रोमी सत्तेखाली असलेल्या प्रांतात सामील झाले आणि एक समृद्ध वाणिज्य केंद्र बनले. या शहरात अनेक सुंदर सरकारी इमारती होत्या. शहरात टायबेरियस सीझरचे मंदिर असल्यामुळे हे शहर सम्राटपूजेचेही केंद्रस्थान होते. भाविकांना या मंदिरात चिमुटभर धूप जाळून “सीझर प्रभू आहे” असे म्हणावे लागत. ख्रिस्ती अर्थातच या प्रथेचे पालन करू शकत नव्हते, कारण त्यांच्याकरता “येशू प्रभु आहे.” परिणामस्वरूप, त्यांना छळ सोसावा लागला.—रोमकर १०:९.

१३. भौतिकरित्या निर्धन असूनही स्मुर्णा येथील ख्रिस्ती कोणत्या अर्थाने श्रीमंत होते?

१३ छळाव्यतिरिक्‍त, स्मुर्णा येथील ख्रिश्‍चनांना दारिद्र्‌यालाही तोंड द्यावे लागले; कदाचित सम्राट उपासनेत सामील न झाल्यामुळे त्यांच्यावर काही आर्थिक निर्बंध लावण्यात आले असावेत. यहोवाचे आजच्या काळातील सेवक देखील अशाप्रकारच्या परीक्षांतून सुटलेले नाहीत. (प्रकटीकरण १३:१६, १७) भौतिकरित्या गरीब असले तरीसुद्धा, जे स्मुर्णा येथील ख्रिश्‍चनांसारखे आहेत ते आध्यात्मिकदृष्ट्या श्रीमंत आहेत आणि हीच खरी श्रीमंती आहे!—नीतिसूत्रे १०:२२; ३ योहान २.

१४, १५. प्रकटीकरण २:१० यातून अभिषिक्‍त जनांना कशाप्रकारे सांत्वन मिळते?

१४ स्मुर्णा येथील बहुतेक यहुदी “सैतानाची सभा” होते कारण ते गैरशास्त्रीय परंपरांना धरून बसले होते, त्यांनी देवाच्या पुत्राला नाकारले आणि येशूच्या आत्म्याने अभिषिक्‍त अनुयायांची निंदा केली. (रोमकर २:२८, २९) पण ख्रिस्ताच्या पुढील शब्दांतून अभिषिक्‍त जनांना किती सांत्वन मिळते! तो म्हणतो: “तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको; पाहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकांस तुरुंगात टाकणार आहे; आणि तुमचे दहा दिवस हालअपेष्टांत जातील. मरेपर्यंत तू विश्‍वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुगूट देईन.”—प्रकटीकरण २:१०.

१५ यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या समर्थनार्थ आपला जीव अर्पण करण्यास येशूला भीती वाटली नाही. (फिलिप्पैकर २:५-८) सैतान आता अभिषिक्‍त शेषजनांविरुद्ध युद्ध करत असल्यामुळे एक समूह या नात्याने त्यांना जे सोसावे लागते—छळ, तुरुंगवास किंवा भीषण मृत्यू यांसारख्या गोष्टींस ते घाबरत नाहीत. (प्रकटीकरण १२:१७) ते जगावर विजय मिळवतील. आणि प्राचीन गैरख्रिस्ती खेळांत विजय मिळवणाऱ्‍यांना, जो सुकणाऱ्‍या फुलांचा मुगूट घातला जायचा त्याऐवजी ख्रिस्ताने पुनरुत्थित अभिषिक्‍त जनांना स्वर्गातील अमरत्वाच्या रूपात “जीवनाचा मुगूट” बहाल करण्याचे वचन दिले आहे. खरोखर, किती अमूल्य बक्षीस!

१६. प्राचीन स्मुर्णा येथील मंडळीसारख्याच एखाद्या मंडळीशी आपला सहवास असेल तर आपण कोणता वादविषय लक्षात ठेवला पाहिजे?

१६ आपली आशा स्वर्गीय असो वा पृथ्वीवरील जीवनाची, पण जर प्राचीन स्मुर्णासारख्या एखाद्या मंडळीसोबत आपला सहवास असेल तर आपण काय करू शकतो? देवाने आपल्या सेवकांचा छळ होऊ देण्यास परवानगी देण्याचे प्रमुख कारण लक्षात ठेवण्यास आपण आपल्या सहविश्‍वासू बांधवांना मदत करू शकतो. ते कारण म्हणजे विश्‍वव्यापी सार्वभौमत्वाचा वादविषय. यहोवाचा प्रत्येक विश्‍वासू सेवक हे सिद्ध करून दाखवतो की सैतान खोटा आहे; तो हे देखील दाखवून देतो की छळ सोसावा लागला तरी मनुष्य, विश्‍वाचा सार्वभौम या नात्याने शासन करण्याच्या देवाच्या हक्काचे एकनिष्ठपणे समर्थन करू शकतो. (नीतिसूत्रे २७:११) आपल्या ख्रिस्ती बांधवांना छळाला तोंड देण्याचे प्रोत्साहन देण्याद्वारे आपल्याला ‘पवित्रतेने व नीतीने आयुष्यभर,’ नव्हे सर्वकाळ ‘यहोवाची सेवा निर्भयपणे करण्याची’ सुसंधी लाभेल.—लूक १:६८, ६९, ७४, ७५.

पर्गम येथील दूताला

१७, १८. पर्गम कशाप्रकारच्या उपासनेचे स्थान होते आणि अशा मूर्तिपूजेत सहभागी न झाल्यास काय परिणाम भोगावे लागू शकत होते?

१७ पर्गम येथील मंडळीला शाबासकी व ताडन दोन्ही देण्यात आले. (प्रकटीकरण २:१२-१७ वाचा.) स्मुर्णा शहराच्या उत्तरेकडे ८० किलोमीटरच्या अंतरावर वसलेले पर्गम शहर मूर्तिपूजक धर्मांत बुडालेले होते. खास्द्यांचे मागी (ज्योतिषी) बॅबिलोनमधून पलायन करून येथे आले असल्याची शक्यता आहे. पर्गम येथे आरोग्य व औषधीची खोटी देवता असक्लीपियस हिचे सुविख्यात मंदिर होते व येथे आजारी लोकांची गर्दी असे. पर्गम शहरात कैसर औगुस्ताला वाहिलेले मंदीर असल्यामुळे या शहराला “आरंभीच्या साम्राज्यात राजाची उपासना करणाऱ्‍या पंथाचे प्रमुख केंद्र” म्हटले जाते.—एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका, १९५९, खंड १७, पृष्ठ ५०७.

१८ पर्गम शहरात झ्यूस देवतेला वाहिलेली अतिविशाल वेदी होती. हे शहर मानवांची उपासना करण्याच्या सैतानी प्रथेचेही माहेरघर होते. म्हणूनच तर येथील मंडळी “सैतानाचे आसन” असलेल्या ठिकाणी वसली आहे असे तिच्याविषयी म्हणण्यात आले! यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन करणाऱ्‍या व्यक्‍तीने सम्राटाची उपासना करण्यास नकार देणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. आजही हे जग दियाबलाच्या सत्तेखाली आहे आणि राष्ट्रीय प्रतिकांना लोक दैवत मानतात. (१ योहान ५:१९) येशू ख्रिस्ताने “माझा साक्षी, माझा विश्‍वासू अंतिपा जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला” या शब्दात ज्याचे वर्णन केले त्याच्याप्रमाणे पहिल्या शतकापासून आजपर्यंत अनेक विश्‍वासू ख्रिश्‍चनांना शहीद व्हावे लागले आहे. अशा या निष्ठावान सेवकांना यहोवा देव व येशू ख्रिस्त निश्‍चितच आठवणीत ठेवतात.—१ योहान ५:२१.

१९. बलामाने काय केले आणि सर्व ख्रिश्‍चनांनी कशाविषयी सावध राहावे?

१९ ख्रिस्ताने ‘बलामाच्या शिक्षणाचाही’ उल्लेख केला. भौतिक धनाच्या लालसेने संदेष्टा बलाम याने इस्राएलला शाप देण्याचा प्रयत्न केला. देवाने त्याच्या शापाला आशीर्वादात बदलले तेव्हा बलामाने मवाबी राजा बलाक याच्यासोबत कट रचला आणि अनेक इस्राएली लोकांना भूलवून मूर्तिपूजा व लैंगिक अनैतिकता यांत गुंतवले. ख्रिस्ती वडिलांनी नीतिमत्त्वाकरता, बलामाच्या कृत्यांचा विरोध करणाऱ्‍या फिनहासप्रमाणे दृढ राहिले पाहिजे. (गणना २२:१-२५:१५; २ पेत्र २:१५, १६; यहूदा ११) किंबहुना, सर्वच ख्रिश्‍चनांनी मूर्तिपूजेपासून आणि मंडळीत लैंगिक अनैतिकतेचा शिरकाव होऊ नये म्हणून सावध राहिले पाहिजे.—यहूदा ३, ४.

२०. जर एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीच्या मनात धर्मत्यागी विचार घर करू लागले असतील तर तिने काय करावे?

२० पर्गम येथील मंडळी अतिशय धोकेदायक परिस्थितीत होती कारण तिने ‘निकलाईतांच्या शिक्षणाप्रमाणे चालणाऱ्‍या लोकांना’ थारा दिला होता. ख्रिस्ताने या मंडळीला म्हटले: “पश्‍चात्ताप कर. नाही तर मी तुजकडे लवकरच येऊन आपल्या तोंडातल्या तरवारीने त्यांच्याबरोबर लढेन.” फूट पाडणारे, ख्रिश्‍चनांना आध्यात्मिकरित्या कमकुवत करू इच्छितात आणि मंडळीत अशाप्रकारची गटबाजी करण्याची किंवा फूट पाडण्याची वृत्ती असलेल्यांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. (रोमकर १६:१७, १८; १ करिंथकर १:१०; गलतीकर ५:१९-२१) कोणतीही ख्रिस्ती व्यक्‍ती धर्मत्यागी दृष्टिकोनांना आपल्या मनात घर करू देत असेल आणि मंडळीत त्यांचा प्रसार करू इच्छित असेल तर ख्रिस्ताच्या या स्पष्ट इशाऱ्‍याकडे तिने लक्ष द्यावे! स्वतःवर संकट ओढवायचे नसेल, तर तिने पश्‍चात्ताप करावा आणि मंडळीच्या वडिलांकडून आध्यात्मिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करावा. (याकोब ५:१३-१८) लगेच पावले उचलणे महत्त्वाचे आहे कारण न्याय बजावण्याकरता येशू लवकरच येत आहे.

२१, २२. “गुप्त राखलेल्या मान्न्यातून” कोणाला खायला दिले जाते आणि हे कशास सूचित करते?

२१ विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिस्ती व त्यांच्या निष्ठावान सोबत्यांना येणाऱ्‍या न्यायदंडाविषयी भीती बाळगण्याची गरज नाही. जे कोणी देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने दिल्या जाणाऱ्‍या येशूच्या सल्ल्याकडे लक्ष देतात त्यांच्याकरता आशीर्वाद राखून ठेवले आहेत. उदाहरणार्थ, जगावर विजय मिळवणाऱ्‍या अभिषिक्‍त जनांना “गुप्त राखलेल्या मान्न्यातून” खाण्याचे आमंत्रण दिले जाईल आणि त्यांना “नवे नाव” लिहिलेला एक “पांढरा खडा” दिला जाईल.

२२ देवाने इस्राएल लोकांना त्यांच्या चाळीस वर्षांच्या भ्रमंतीत जीवनदायक मान्‍ना पुरवला होता. या ‘भाकरीचा’ थोडा हिस्सा कराराच्या कोशात एका सुवर्णपात्रात ठेवण्यात आला आणि अशारितीने तो दर्शनमंडपातील परमपवित्रस्थानात, जेथे यहोवाच्या उपस्थितीस सूचित करणारा एक चमत्कारिक प्रकाश होता, तेथे लपवण्यात आला. (निर्गम १६:१४, १५, २३, २६, ३३; २६:३४; इब्री लोकांस ९:३, ४) हा गुप्त मान्‍ना खाण्याची कोणालाही परवानगी नव्हती. पण पुनरुत्थानानंतर येशूचे अभिषिक्‍त अनुयायी अमरत्व परिधान करतात; ‘गुप्त मान्‍ना’ खाण्याद्वारे हे सूचित होते.—१ करिंथकर १५:५३-५७.

२३. “पांढरा खडा” आणि “नवे नाव” यांची काय अर्थसूचकता आहे?

२३ रोमी न्यायालयांत काळा खडा दिला जाणे हे दोषी ठरवण्याचे चिन्ह होते, तर पांढरा खडा निर्दोष घोषित करण्याचे चिन्ह होते. विजय मिळवणाऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना येशू “पांढरा खडा” देतो यावरून असे सूचित होते, की त्याच्या लेखी ते निर्दोष, पवित्र व शुद्ध आहेत. रोमी लोक महत्त्वाच्या समारंभांत प्रवेश मिळवण्याकरताही खड्यांचा वापर करत होते; त्याअर्थी, “पांढरा खडा” एका अभिषिक्‍त व्यक्‍तीला स्वर्गात कोकऱ्‍याच्या लग्न समारंभात प्रवेश व जागा मिळण्यास सूचित करू शकतो. (प्रकटीकरण १९:७-९) “नवे नाव” येशूसोबत स्वर्गीय राज्यात सह-वारस होण्याच्या बहुमानास सूचित करते. या सर्व आशीर्वादांची प्रत्याशा अभिषिक्‍त जनांना व पृथ्वीवरील परादीसात जगण्याची आशा असलेल्या, यहोवाच्या सेवेतील त्यांच्या सोबत्यांनाही अतिशय प्रोत्साहित करते!

२४. धर्मत्यागाच्या संबंधाने आपण कशी भूमिका घ्यावी?

२४ पर्गम मंडळीवर धर्मत्यागी व्यक्‍तींमुळे कशाप्रकारे धोकेदायक परिस्थिती ओढवली होती हे आठवणीत ठेवणे शहाणपणाचे आहे. आपण ज्या मंडळीशी सहवास राखतो तेथेही अशाचप्रकारची परिस्थिती उद्‌भवल्यास आपण धर्मत्यागाचा पूर्णपणे धिक्कार करून सतत सत्यात चालत राहिले पाहिजे. (योहान ८:३२, ४४; ३ योहान ४) खोटे शिक्षक किंवा धर्मत्यागी प्रवृत्ती असलेल्या व्यक्‍ती सबंध मंडळीला दूषित करू शकतात, त्यामुळे आपण धर्मत्यागाविरुद्ध नेहमी खंबीर भूमिका घेतली पाहिजे आणि दुष्टपणाच्या भूलथापांमुळे सत्याचे पालन करण्यापासून आपण कधीही परावृत्त होता कामा नये.—गलतीकर ५:७-१२; २ योहान ८-११.

२५. पुढील लेखात ख्रिस्ताने कोणत्या मंडळ्यांना दिलेले संदेश विचारात घेतले जातील?

२५ आशिया मायनरच्या सात मंडळ्यांपैकी तीन मंडळ्यांना येशू ख्रिस्ताने बोललेले प्रशंसेचे शब्द आणि त्याने दिलेला सल्ला खरोखर विचारप्रवर्तक होता! परंतु, पवित्र आत्म्याने निर्देशन दिल्याप्रमाणे उरलेल्या चार मंडळ्यांना देखील त्याला बरेच काही सांगायचे आहे. हे संदेश थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया आणि लावदिकिया या मंडळ्यांना उद्देशून दिलेले आहेत व पुढील लेखात त्यांची चर्चा केली जाईल.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• ख्रिस्त मंडळ्यांना काय म्हणतो याकडे आपण लक्ष का दिले पाहिजे?

• मंडळीची पहिली प्रीती पुन्हा जागृत करण्यासाठी आपण काय योगदान देऊ शकतो?

• प्राचीन स्मुर्णा येथील भौतिकरित्या गरीब असलेले ख्रिस्ती खरोखर श्रीमंत होते असे का म्हणता येते?

• पर्गम येथील मंडळीच्या परिस्थितीविषयी विचार केल्यावर आपण धर्मत्यागी विचारसरणीविषयी कसा दृष्टिकोन बाळगावा?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील नकाशा]

ग्रीस

आशिया मायनर

इफिस

स्मुर्णा

पर्गम

थुवतीरा

सार्दीस

फिलदेल्फिया

लावदिकिया

[१२ पानांवरील चित्र]

“मोठा लोकसमुदाय” पृथ्वीवरील परादीसात जीवनाचा आनंद लुटेल

[१३ पानांवरील चित्रे]

छळ सोसणारे ख्रिस्ती जगावर विजय मिळवतात