व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टेशन—समर्थक की पाखंडी?

टेशन—समर्थक की पाखंडी?

टेशन—समर्थक की पाखंडी?

आपल्या तिसऱ्‍या मिशनरी यात्रेच्या शेवटी प्रेषित पौलाने इफिस मंडळीतल्या वडील जनांसोबत एक सभा घेतली. त्याने त्यांस म्हटले: “मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. तुम्हापैकीहि काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.”—प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०.

पौलाच्या शब्दांच्या एकवाक्यतेत, सा.यु. दुसरे शतक हे बदल आणि भाकीत केलेल्या धर्मत्यागाचे शतक ठरले. ज्ञानवाद, या धार्मिक आणि तत्त्वज्ञानी व विश्‍वासू जनांच्या मनांना भ्रष्ट करणाऱ्‍या चळवळीला तेव्हा वेग आला होता. ज्ञानवाद्यांचा असा विश्‍वास होता की, केवळ आत्मिक गोष्टी चांगल्या आहेत, बाकीच्या सर्व गोष्टी दुष्ट आहेत. सर्वांचे देह दुष्ट आहेत असा तर्क करून त्यांनी विवाह आणि जनन यांना नकार दिला; या गोष्टी सैतानाकडून होत्या असे त्यांचे म्हणणे होते. त्यांपैकी काहींचा असा विश्‍वास होता की, केवळ आत्मिक गोष्टी चांगल्या असल्यामुळे एका मनुष्याने आपल्या शारीरिक देहाचा कसाही वापर केल्याने काही फरक पडत नाही. अशा विचारांमुळे एक तर संन्यास किंवा दैहिक सुखचैन अशी टोकाची भूमिका लोकांनी घेतली. ज्ञानवाद्यांचे म्हणणे होते की, केवळ गूढ ज्ञानवादाने किंवा आत्म-ज्ञानाने तारण होते; यामुळे देवाच्या वचनातील सत्य पूर्णपणे बाजूला सारण्यात आले.

ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍यांनी ज्ञानवादाच्या धोक्याबद्दल कशी मनोवृत्ती बाळगली? काही शिक्षित लोकांनी खोट्या शिकवणुकीविरुद्ध आवाज उठवला तर इतरजण त्याच्या प्रभावाखाली आले. उदाहरणार्थ, आयरिनेयुसने पाखंडी शिकवणुकींविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला. त्याला पॉलीकार्पकडून शिक्षण प्राप्त झाले होते; पॉलीकार्प प्रेषितांचा समकालीन होता. पॉलीकार्प येशू ख्रिस्त आणि त्याच्या प्रेषितांच्या शिकवणुकींचे तंतोतंत पालन करण्यावर जोर देत असे. परंतु, त्याच व्यक्‍तीकडून शिक्षण प्राप्त झालेला आयरिनेयुसचा मित्र फ्लोरिनस मात्र वॅलेंटायनसच्या शिकवणुकींकडे वळाला; वॅलेंटायनस हा ज्ञानवादी चळवळीचा प्रमुख नेता होता. तो काळ खरोखरच क्षुब्धतेचा होता.

त्या काळाच्या वातावरणाविषयी टेशनच्या लिखाणात माहिती मिळते; टेशन हा दुसऱ्‍या शतकातील नामवंत लेखक होता. टेशन कशाप्रकारचा मनुष्य होता? तो तथाकथित ख्रिस्ती कसा बनला? ज्ञानवादी पाखंडाच्या प्रभावाचा टेशनवर काही परिणाम झाला का? उत्सुकता वाढवणारी त्याची उत्तरे आणि त्याचे स्वतःचे उदाहरण आजच्या काळातील सत्य शोधकांकरता धडे आहेत.

“काही विदेशी लिखाणांच्या” संपर्कात

टेशन मूळचा सिरिया येथील होता. विविध ठिकाणचा प्रवास आणि वाचनाची आवड यांमुळे ग्रेको-रोमन संस्कृतीविषयी त्याला बरेच ज्ञान होते. प्रभावी वक्‍ता या नात्याने जागोजागी प्रवास करत असताना तो रोमला आला. आणि रोममध्ये असताना तो ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाला. तो जस्टिन मार्टर याच्यासोबत राहू लागला आणि कदाचित त्याचा शिष्यही बनला.

त्याच्या काळातील ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करतानाच्या रंजक अहवालात टेशन असा दावा करतो: “सत्य कसे मिळवता येईल यासाठी मी धडपड केली.” त्याला शास्त्रवचने वाचायला मिळाल्यावर काय वाटले याविषयी तो म्हणतो: “काही विदेशी लिखाणांच्या संपर्कात मी आलो; ग्रीकांच्या मतांशी तुलना केल्यास ती अत्यंत जुनी होती आणि त्यांच्या चुकांशी तुलना केल्यास अत्यंत श्रेष्ठ प्रतीची होती; त्यातील साधी भाषाशैली, लेखकांची प्रामाणिकता, भावी घटनांसंबधी दाखवलेले पूर्वज्ञान, नियमांची श्रेष्ठता आणि विश्‍वाच्या सरकाराचा एक सर्वशक्‍तिमान अधिकारी यांमुळे विश्‍वास करण्यास माझी खात्री पटली.”

त्याने निडरतेने आपल्या समकालीन लोकांना त्याच्या काळातील ख्रिस्ती धर्माचे परीक्षण करून विदेश्‍यांच्या धर्मातील अंधःकाराच्या तुलनेत त्यातील साधेपणा व स्पष्टता पाहण्यास उत्तेजन दिले. त्याच्या लिखाणांतून आपल्याला काय शिकायला मिळते?

त्याची लिखाणे काय प्रकट करतात?

टेशनच्या लिखाणांवरून तो एक समर्थक, विश्‍वासाच्या वतीने बोलणारा लेखक होता हे दिसून येते. मूर्तिपूजक तत्त्वज्ञानाला त्याचा कडा विरोध होता. ग्रीकांना भाषण (इंग्रजी) या त्याच्या लिखाणात टेशन, मूर्तिपूजेचा व्यर्थपणा आणि त्याला ठाऊक असलेल्या ख्रिस्ती धर्माची योग्यता यावर जोर देतो. तो ग्रीक रीतींची अत्यंत कडक शब्दांत टीका करतो. उदाहरणार्थ, तत्त्वज्ञानी हिराक्लिटसविषयी तो म्हणतो: “या मनुष्याच्या मृत्यूने त्याचा मूर्खपणा जाहीर केला; वैद्यकीय शास्त्र आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केल्यामुळे जलसंचयाने पीडित झालेल्या या मनुष्याने स्वतःवर शेणाचा लेप लावला होता; तो लेप जसा वाळत गेला तसे त्याचे संपूर्ण शरीर आकसले जाऊन त्याचे तुकडे झाले आणि शेवटी तो मरण पावला.”

एकच देव अर्थात सर्व वस्तूंचा निर्माणकर्ता आहे या विश्‍वासाला टेशन फार महत्त्व देत असे. (इब्री लोकांस ३:४) ग्रीकांना भाषण यामध्ये तो देवाला “आत्मा” असे संबोधून म्हणतो: “तो एकटाच असा आहे ज्याला सुरवात नाही आणि तो स्वतः सर्व वस्तूंचा उगम आहे.” (योहान ४:२४; १ तीमथ्य १:१७) उपासनेत मूर्तींचा उपयोग करण्याचा विरोध करून टेशन लिहितो: “ठोकळ्यांना आणि दगडांना मी देव कसे म्हणू?” (१ करिंथकर १०:१४) त्याचा असा विश्‍वास होता की, शब्द किंवा लोगोस स्वर्गीय पित्याच्या निर्मितीचा ज्येष्ठ या नात्याने अस्तित्वात आला आणि त्यानंतर भौतिक विश्‍व निर्माण करण्यास त्याचा उपयोग करण्यात आला. (योहान १:१-३; कलस्सैकर १:१३-१७) नियुक्‍त वेळी होणाऱ्‍या पुनरुत्थानाविषयी टेशन म्हणतो: “सर्व गोष्टींच्या समाप्तीनंतर देहांचे पुनरुत्थान होईल असा आमचा विश्‍वास आहे.” आपण का मरतो याविषयी टेशन लिहितो: “आपल्याला मरण्यासाठी निर्माण करण्यात आले नाही तर आपण स्वतःच्याच दोषामुळे मरतो. आपल्या स्वतंत्र इच्छेने आपला नाश केला आहे; स्वतंत्र असलेले आपण दास बनलो आहोत; पापाद्वारे आपण विकले गेलो आहोत.”

मृत्यूपश्‍चात मनुष्याचा एक अंश जिवंत राहण्याच्या शक्यतेविषयी टेशनने दिलेले स्पष्टीकरण गोंधळविणारे आहे. तो म्हणतो: “अहो ग्रीक लोकहो, आत्मा हा अमर नाही तर मर्त्य आहे. तरीही, न मरणे त्यास शक्य आहे. त्याला सत्य माहीत नसल्यास तो मरतो आणि शरीरासोबत नामशेष होतो, परंतु जगाच्या अंतसमयी तो पुन्हा शरीरासोबत उठतो आणि त्याला सर्वकाळाकरता मरणाची शिक्षा मिळते.” टेशनला या वाक्यांतून नेमके काय म्हणायचे होते ते अस्पष्ट आहे. एकीकडे, काही बायबल शिकवणुकींचे पालन करत असताना दुसरीकडे आपल्या समकालीन लोकांना संतुष्ट करण्याचा तो प्रयत्न करत होता आणि म्हणून मूर्तिपूजक तत्त्वज्ञानासोबत त्याने शास्त्रवचनांतील सत्यांची भेसळ केली असावी का?

टेशनचे आणखी एक सुप्रसिद्ध लिखाण आहे डायटेसॅरन किंवा चार शुभवर्तमानांतील एकसूत्रीपणा. सिरियातील मंडळ्यांना त्यांच्या मातृभाषेत शुभवर्तमान सादर करणारा टेशन पहिला होता. एकाच कथनात चार शुभवर्तमानांना जोडणारे हे साहित्य अत्यंत सन्मानाचे समजले जात होते. याचा उपयोग सिरियन चर्चमध्ये केला जात होता.

ख्रिस्ती की पाखंडी?

टेशनच्या लिखाणांचे जवळून परीक्षण केल्याने हे कळते की, शास्त्रवचने त्याला अवगत होती आणि त्यांच्याबद्दल त्याला आदरही होता. त्याच्यावर त्यांचा काय परिणाम झाला याविषयी तो लिहितो: “मला श्रीमंत होण्याची इच्छा नाही; मला लष्करी अधिकार नको; व्यभिचाराबद्दल मला घृणा आहे; संपत्ती मिळवण्याच्या ध्यासाने मला खलाशी बनायचे नाही; . . . प्रसिद्धीचे वेड मला नाही; . . . श्रीमंतीत किंवा गरिबीत जीवन जगणाऱ्‍यांसाठी एकच सूर्य आहे आणि एकच मृत्यू आहे.” टेशनने उत्तेजन दिले: “जगाला तुम्ही मृत असे व्हा, त्यातील मूर्खपणाचा त्याग करा. देवासाठी जगा आणि त्याला समजून घेऊन तुमचे जुने व्यक्‍तिमत्त्व बाजूला सारा.”—मत्तय ५:४५; १ करिंथकर ६:१८; १ तीमथ्य ६:१०.

तथापि, तारकाच्या शिकवणीनुसार परिपूर्णता (इंग्रजी) या शीर्षकाच्या टेशनच्या लिखाणाचे उदाहरण घ्या. आपल्या या साहित्यात तो विवाह स्थापन केल्याबद्दल सैतानाला दोषी ठरवतो. विवाह करून लोक मर्त्य जगात जखडले जात आहेत असा दावा करून टेशन विवाहाचा पूर्णपणे विरोध करतो.

असे दिसते की, सा.यु. १६६ च्या सुमारास जस्टिन मार्टरच्या मृत्यूनंतर टेशनने एक्रॉटीटस नामक वैरागी जीवनावर जोर देणारा एक पंथ सुरू केला किंवा त्या पंथात सामील झाला. त्या पंथाचे अनुयायी स्वतःच्या शरीरावर पूर्ण आत्म-नियंत्रण ठेवायचे आणि ते स्वतःच्या काबूत ठेवायचे. त्यांनी मद्य, विवाह आणि संपत्ती बाळगण्यापासून संन्यास घेतला होता.

शिकण्याजोगा धडा

टेशन शास्त्रवचनांपासून इतका दूर का गेला? तो ‘ऐकून विसरणारा होता’ का? (याकोब १:२३-२५) कल्पित कहाण्यांचा विरोध न केल्यामुळे टेशन मानवी तत्त्वज्ञानाला बळी पडला असावा का? (कलस्सैकर २:८; १ तीमथ्य ४:७, मराठी कॉमन लँग्वेज) त्याने ज्या चुकांचे समर्थन केले त्या मोठ्या चुका असल्याकारणाने तात्पुरत्या काळासाठी त्याचे मानसिक स्थैर्य हरवल्याची शक्यता आहे का?

कारण काहीही असो, एक गोष्ट मात्र खरी आहे की, टेशनच्या लिखाणांवरून आणि त्याच्या उदाहरणावरून त्याच्या काळातील धार्मिक वातावरणाची एक समज आपल्याला प्राप्त होते. त्यावरून हे दिसून येते की, जगीक तत्त्वज्ञानाचा प्रभाव किती हानीकारक असू शकतो. त्यामुळे आपण प्रेषित पौलाच्या या इशाऱ्‍याकडे लक्ष देऊ या: “अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतापासून दूर राहा.”—१ तीमथ्य ६:२०.