व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नोहाची नोंदवही आपल्याकरता महत्त्वाची आहे का?

नोहाची नोंदवही आपल्याकरता महत्त्वाची आहे का?

नोहाची नोंदवही आपल्याकरता महत्त्वाची आहे का?

आपल्या उपस्थितीच्या आणि या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीच्या चिन्हाची भविष्यवाणी करताना, येशूने म्हटले: “नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.” (मत्तय २४:३, ३७) येशूने असे स्पष्टपणे भाकीत केले की, आज आपल्या दिवसात घडणाऱ्‍या घटना नोहाच्या काळात घडलेल्या घटनांशी समरूप आहेत. नोहानाच्या काळात घडलेल्या घटनांचा विश्‍वसनीय आणि अचूक अहवाल आपल्याकरता मौल्यवान खजिन्यासारखा असू शकतो.

नोहाची नोंदवही असा खजिना आहे का? ही नोंदवही खरा ऐतिहासिक दस्ताऐवज म्हणवण्यासारखी आहे का? हा प्रलय नेमका केव्हा आला हे आपल्याला ठरवता येईल का?

प्रलय केव्हा आला?

बायबलमध्ये कालक्रमानुसार दिलेली अचूक माहिती आपल्याला मानवी इतिहासाच्या सुरवातीला नेऊन पोचवते. उत्पत्ति ५:१-२९ मध्ये, आपल्याला पहिला मानव आदाम याच्या निर्मितीपासून नोहाच्या जन्मापर्यंतची वंशावळ मिळते. जलप्रलय “नोहाच्या वयाच्या सहाशाव्या वर्षी” सुरू झाला.—उत्पत्ति ७:११.

जलप्रलयाचा काळ ठरवण्यासाठी आपल्याला एखाद्या महत्त्वपूर्ण तारखेपासून सुरवात करावी लागेल. याचाच अर्थ, प्रापंचिक इतिहासात स्वीकृत असलेल्या व बायबलमध्ये नमूद केलेल्या एका विशिष्ट घटनेशी जुळणाऱ्‍या एखाद्या तारखेपासून आपण सुरवात केली पाहिजे. अशा एका महत्त्वपूर्ण तारखेपासून आपण गणना करू शकतो आणि सध्या प्रचारात असलेल्या ग्रेगरियन दिनदर्शिकेवर आधारित तारीख जलप्रलयाला देऊ शकतो.

एक महत्त्वाची तारीख आहे सा.यु.पू. ५३९. या वर्षी पर्शियन राजा कोरेश याने बॅबिलोनचा पाडाव केला होता. त्याच्या कारकीर्दीचा कालावधी बॅबिलोनियन पाषाणलेख आणि डायडोरस, आफ्रिकेनस, युसेबियस आणि टॉलमी यांच्या दस्ताऐवजांमधील प्रापंचिक सूत्रांमध्ये देण्यात आला आहे. कोरेशने फर्मावलेल्या एका आज्ञेनुसार, यहुद्यांचा एक शेष भाग बॅबिलोन सोडून सा.यु.पू. ५३७ मध्ये आपल्या मायदेशी परतला. याने यहुदाच्या ७० वर्षांच्या ओसाडीचा काळ समाप्त झाला जो बायबलमधील अहवालानुसार सा.यु.पू. ६०७ साली सुरू झाला होता. शास्त्यांच्या काळाची आणि इस्राएलच्या राजांच्या कारकीर्दीची गणना केल्यावर सा.यु.पू. १५१३ साली इस्राएली लोकांचे ईजिप्तमधून निर्गमन झाले हे आपल्याला ठरवता येते. बायबल आधारित कालक्रमानुसार आणखी ४३० वर्षे मागे गेल्यावर यहोवाने अब्राहामासोबत सा.यु.पू. १९४३ साली करार केला होता तेथपर्यंत आपण येतो. त्यानंतर आपण तेरह, नाहोर, सरूग, रऊ, पेलेग, एबर, आणि शेलह त्याचप्रमाणे “जलप्रलयानंतर दोन वर्षांनी” जन्मलेल्या अर्पक्षदचाही जन्म व त्यांची आयुर्मर्यादा विचारात घेतली पाहिजे. (उत्पत्ति ११:१०-३२) अशातऱ्‍हेने, सा.यु.पू. २३७० साली जलप्रलयाची सुरवात झाली असे म्हणता येईल. *

जलप्रलयाची सुरवात

नोहाच्या काळातील घटनांविषयी पाहण्याआधी कदाचित तुम्हाला उत्पत्ति अध्याय ७ वचन ११ ते अध्याय ८ वचन ४ पर्यंत वाचायला आवडेल. मुसळधार पावसाविषयी आपल्याला असे सांगण्यात आले आहे: “नोहाच्या वयाच्या सहाशाव्या वर्षी [सा.यु.पू. २३७०] दुसऱ्‍या महिन्याच्या सतराव्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली.”—उत्पत्ति ७:११.

नोहाने वर्षाचे विभाजन, प्रत्येकी ३० दिवसांच्या १२ महिन्यांमध्ये केले. प्राचीन काळी, पहिला महिना आपल्या दिनदर्शिकेतील सप्टेंबर महिन्याच्या सुमारे मध्यात सुरू होत असे. जलप्रलयाचा पाऊस “दुसऱ्‍या महिन्याच्या सतराव्या दिवशी” सुरू होऊन सा.यु.पू. २३७० सालाच्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांदरम्यान ४० दिवस व ४० रात्रींपर्यंत पडत राहिला.

जलप्रलयाबद्दल आपल्याला असेही सांगण्यात येते की, “दीडशे दिवसपर्यंत पाणी पृथ्वी व्यापून होते. . . . पृथ्वीवरचे पाणी एकसारखे हटत गेले; दीडशे दिवस संपल्यावर पाणी ओसरत गेले. सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी अरारात पर्वतावर तारू टेकले.” (उत्पत्ति ७:२४-८:४) त्यामुळे, पृथ्वी पाण्याने व्यापली तेव्हापासून पाणी हटेपर्यंत १५० दिवसांचा किंवा पाच महिन्यांचा कालावधी होता. अशाप्रकारे, सा.यु.पू. २३६९ च्या एप्रिल महिन्यात अरारात पर्वतावर हा तारू येऊन टेकला.

आता कदाचित तुम्हाला उत्पत्ति ८:५-१७ वाचायला आवडेल. पर्वतांचे माथे जवळजवळ अडीच महिन्यांनी (७३ दिवसांनंतर) “दहाव्या महिन्याच्या [जून] पहिल्या दिवशी” दिसू लागले. (उत्पत्ति ८:५) * तीन महिन्यांनी (९० दिवसांनंतर)—नोहाच्या “सहाशेएकाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी” किंवा सप्टेंबर महिन्याच्या मध्यात, सा.यु.पू. २३६९ साली—नोहाने तारवाचे छप्पर उघडले. तेव्हा त्याला “पृथ्वीचा पृष्ठभाग वाळला आहे असे” दिसले. (उत्पत्ति ८:१३) एक महिना आणि २७ दिवसांनंतर (५७ दिवसांनी), “दुसऱ्‍या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी [सा.यु.पू. २३६९ सालाच्या नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात] जमीन खडखडीत वाळली” होती. मग नोहा आणि त्याचे कुटुंब तारवाच्या बाहेर वाळलेल्या जमिनीवर आले. अशाप्रकारे, नोहा आणि इतरांनी तारवात एक चांद्र वर्ष आणि दहा दिवस (३७० दिवस) घालवले होते.—उत्पत्ति ८:१४.

घटना, तपशील आणि वेळेचा हा अचूक अहवाल काय सिद्ध करतो? केवळ हेच की: ज्या इब्री संदेष्ट्या मोशेने प्राप्त अहवालांवर उत्पत्तीचे पुस्तक आधारले तो काल्पनिक कथा लिहित नव्हता तर हकीकत सांगत होता. त्यामुळे, जलप्रलयाचे आज आपल्याकरता फार महत्त्व आहे.

इतर बायबल लेखकांनी जलप्रलयाबद्दल कसा दृष्टिकोन बाळगला?

उत्पत्तीच्या अहवालाखेरीज, बायबलमध्ये नोहाचे किंवा प्रलयाचे अनेक संदर्भ आहेत. उदाहरणासाठी:

(१) संशोधक एज्राने नोहा आणि त्याच्या पुत्रांना (शेम, हाम, याफेथ) इस्राएल राष्ट्राच्या वंशावळीत सामील केले.—१ इतिहास १:४-१७.

(२) डॉक्टर आणि शुभवर्तमानाचा लेखक लूक, येशू ख्रिस्ताच्या पूर्वजांची यादी देताना नोहाचा समावेश करतो.—लूक ३:३६.

(३) प्रेषित पेत्राने तर सहख्रिश्‍चनांना लिहिताना प्रलयाच्या अहवालाचा कित्येकदा उल्लेख केला.—२ पेत्र २:५; ३:५, ६.

(४) प्रेषित पौलाने, नोहाने आपल्या घराण्याचा बचाव करताना तारू बांधण्यासाठी दाखवलेल्या मोठ्या विश्‍वासाविषयी सांगितले.—इब्री लोकांस ११:७.

बायबलच्या या प्रेरित लेखकांनी जलप्रलयासंबंधी उत्पत्तीमधील हा अहवाल स्वीकारला याविषयी काही संशय असू शकतो का? तो अहवाल एक खरी घटना होती याविषयी त्यांना काहीच शंका नव्हती.

येशू आणि जलप्रलय

येशू ख्रिस्ताचे मानवपूर्व अस्तित्व होते. (नीतिसूत्रे ८:३०, ३१) जलप्रलयादरम्यान तो स्वर्गामध्ये एक आत्मिक प्राणी होता. त्यामुळे प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून येशू आपल्याला नोहा आणि जलप्रलयाविषयीचा अहवाल खात्रीशीर असल्याचा सर्वात मोठा शास्त्रवचनीय पुरावा देतो. येशू म्हणाला: “नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांस समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचेहि येणे होईल.”—मत्तय २४:३७-३९.

व्यवस्थीकरणाच्या येणाऱ्‍या समाप्तीची ताकीद देण्याकरता येशूने काल्पनिक कथेचा उपयोग केला असता का? मुळीच नाही! दुष्टांवर येणाऱ्‍या ईश्‍वरी न्यायदंडाचे एक खरे उदाहरण त्याने दिले ही खात्री आपल्याला आहे. यात लोकांचे जीव गेले हे खरे आहे पण नोहा आणि त्याच्या कुटुंबाला प्रलयातून वाचवण्यात आले या गोष्टीतून आपण सांत्वन प्राप्त करू शकतो.

‘नोहाचे दिवस’ आज अर्थात ‘मनुष्याचा पुत्र,’ येशू ख्रिस्ती याच्या ‘उपस्थितीदरम्यान’ हयात असलेल्यांकरता फार महत्त्वाचे आहेत. नोहाने जपून ठेवलेल्या जागतिक प्रलयाच्या माहितीचा तपशीलवार अहवाल वाचताना आपण ही खात्री बाळगू शकतो की हा एक खरा ऐतिहासिक अहवाल आहे. शिवाय, जलप्रलयाचा उत्पत्ती पुस्तकातील ईश्‍वरप्रेरित अहवाल आपल्याकरता फार महत्त्वाचा आहे. नोहा, त्याच्या पुत्रांनी आणि त्यांच्या पत्नींनी ज्याप्रमाणे बचावाकरता देवाने पुरवलेल्या माध्यमावर विश्‍वास ठेवला त्याचप्रमाणे आज आपणही येशूच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास प्रकट करून यहोवाच्या संरक्षणाखाली येऊ शकतो. (मत्तय २०:२८) नोहाच्या नोंदवहीतून माहीत होते त्याप्रमाणे तो आणि त्याचे कुटुंब त्या काळाच्या भक्‍तिहीन जगाचा अंत करणाऱ्‍या प्रलयातून जसे वाचले तसेच आपणही या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंतातून वाचणाऱ्‍यांपैकी असण्याची आशा बाळगू शकतो.

[तळटीपा]

^ परि. 7 जलप्रलयाच्या तारखेविषयी तपशीलवार माहिती पाहण्यासाठी, यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), खंड १, पृष्ठे ४५८-६० पाहा.

^ परि. 12 काईल-डेलिट्‌श कॉमेंटरी ऑन दि ओल्ड टेस्टामेंट, खंड १, पृष्ठ १४८ वर असे म्हटले आहे: “कदाचित तारवाला टेकून ७३ दिवस उलटल्यावर पर्वतांची शिखरे अर्थात तारवाच्या भोवतालच्या आर्मेनियन डोंगराळ प्रदेशाचा माथा दिसू लागला.”

[५ पानांवरील चौकट]

ते तितका काळ जगले का?

“नोहा एकंदर नऊशेपन्‍नास वर्षे जगला, मग तो मरण पावला,” असे बायबल म्हणते. (उत्पत्ति ९:२९) नोहाचे आजोबा, मथुशलह ९६९ वर्षे जगले—आतापर्यंत जगलेल्या मानवांपैकी हे सर्वात दीर्घ आयुर्मान आहे. आदामापासून नोहापर्यंतच्या दहा पिढ्यांची सरासरी आयुर्मर्यादा ८५० वर्षांहून अधिक होती. (उत्पत्ति ५:५-३१) त्या काळातील लोक इतकी वर्षे कसे जगत होते?

मानवाने सर्वकाळ जगावे हा देवाचा मूळ उद्देश होता. पहिला पुरुष आदाम याला निर्माण केले तेव्हाच त्याला कधीही न संपणारे आयुष्य मिळवण्याची संधी देण्यात आली होती; त्याला केवळ देवाला आज्ञाधारक राहायचे होते. (उत्पत्ति २:१५-१७) परंतु आदामाने अवज्ञा केली आणि ती संधी हातची गमावली. मृत्यूकडे ९३० वर्षांची हळूहळू वाटचाल करून आदाम शेवटी त्याला ज्या मातीतून निर्माण करण्यात आले होते तिला जाऊन मिळाला. (उत्पत्ति ३:१९; ५:५) पहिल्या मानवाने पाप आणि मृत्यूचा वारसा आपल्या सर्व संततीला दिला.—रोमकर ५:१२.

तरीसुद्धा, त्या काळातील लोक आदामाच्या मूळ परिपूर्णतेच्या जवळ होते आणि कदाचित या कारणासाठी ते नंतर आलेल्या लोकांपेक्षा अधिक काळ जगले. म्हणूनच, प्रलय-पूर्व काळात मानवाची आयुर्मर्यादा जवळजवळ एक हजार वर्षांची होती परंतु प्रलयानंतर ती एकदम घसरली. उदाहरणार्थ, अब्राहाम केवळ १७५ वर्षे जगला. (उत्पत्ति २५:७) आणि या विश्‍वासू पूर्वजाच्या मृत्यूच्या सुमारे ४०० वर्षांनंतर संदेष्ट्या मोशेने लिहिले: “आमचे आयुष्य सत्तर वर्षे—आणि शक्‍ति असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे.” (स्तोत्र ९०:१०) ही परिस्थिती आज फारशी बदललेली नाही.

[६, ७ पानांवरील तक्‍ता/चित्रे]

यहुद्यांना बंदिवासातून परतण्याची परवानगी देणाऱ्‍या कोरेशच्या आज्ञेपासून, नोहाच्या काळातील प्रलयापर्यंत मागे मोजणे

५३७ कोरेशची आज्ञा *

५३९ पारसच्या कोरेशने केलेला

बॅबिलोनचा पराभव

६८ वर्षे

६०७ यहुदाच्या ७० वर्षांच्या उजाडीची सुरवात

पुढारी, शास्ते आणि इस्राएलच्या

राजांची ९०६ वर्षांची देखरेख

१५१३ ईजिप्तमधून इस्राएलचे निर्गमन

४३० वर्षे इस्राएली लोक ईजिप्त आणि

कनानमध्ये होते तो ४३० वर्षांचा

कालावधी (निर्गम १२:४०, ४१)

१९४३ अब्राहामासोबत करार स्थापणे

२०५ वर्षे

२१४८ तेरहचा जन्म

२२२ वर्षे

२३७० प्रलयाची सुरवात

[तळटीप]

^ परि. 35 यहुद्यांना बंदिवासातून मुक्‍त करण्याची कोरेशने केलेली घोषणा “पारसाचा राजा कोरेश याच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी” अर्थात कदाचित सा.यु.पू. ५३८ किंवा सा.यु.पू. ५३७ च्या सुरवातीला करण्यात आली.