व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रत्येक जण आपापल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल

प्रत्येक जण आपापल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल

प्रत्येक जण आपापल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल

मध्य पूर्वेकडील देशांत राहणारे सर्वजण कडक उन्हाळ्याच्या दिवसांत गार सावलीच्या शोधात असतात. कडक उन्हापासून संरक्षण देणाऱ्‍या कोणत्याही झाडाची सावली खासकरून एखाद्याच्या घराशेजारी लावलेल्या झाडाची सावली सर्वांना हवीहवीशी वाटते. मध्य पूर्वेतील भागात, इतर कोणत्याही झाडापेक्षा अंजिराच्या झाडाची सावली गार असते कारण, अंजिराच्या झाडाची पाने मोठी व पसरट तसेच त्याच्या फांद्या देखील दूरपर्यंत पसरलेल्या असतात.

बायबल काळातील झाडे (इंग्रजी) नावाच्या पुस्तकानुसार, “[अंजिराच्या झाडाची] सावली अधिक तजेलादायक व एखाद्या तंबूच्या सावलीपेक्षा गार असते असे म्हटले जाते.” प्राचीन इस्राएलमध्ये, द्राक्षमळ्यांच्या किनाऱ्‍याला लावलेल्या अंजिरांच्या झाडांच्या सावलीत शेतातले कामगार दुपारची डुलकी काढत असत.

उन्हाळ्यातल्या एका मोठ्या दिवसाच्या शेवटी, घरातील सर्व लहानथोर आपल्या अंजिराच्या झाडाच्या सावलीत बसून एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटू शकत होते. शिवाय, अंजिराचे झाड आपल्या मालकाला विपुल, पौष्टिक फळही देत असे. म्हणूनच, राजा शलमोनाच्या काळापासूनच, आपापल्या अंजिराच्या झाडाखाली बसणे, शांती, समृद्धता आणि विपुलता यांना चित्रित करत असे.—१ राजे ४:२४, २५.

अनेक शतकांपूर्वी, संदेष्टा मोशे याने वचनयुक्‍त देशाचे वर्णन ‘अंजिरांचा देश’ असे केले. (अनुवाद ८:८) वचनयुक्‍त देश किती सुपीक आहे याचा पुरावा देण्यासाठी बारा हेरांनी येताना अंजिरे आणि इतर फळे आणली. (गणना १३:२१-२३) १९ व्या शतकात, बायबल काळांतील देशांना भेट दिलेल्या एकाने असा अहवाल दिला की अंजिराची झाडे तिथे सर्वसामान्य आहेत. म्हणूनच तर, शास्त्रवचनांत अंजिरे आणि अंजिराच्या झाडांचा इतका सर्रास उल्लेख आढळतो!

वर्षातून दोनदा फळ देणारे झाड

अंजिराच्या झाडाला बहुतेक सर्वप्रकारची माती चालते आणि त्याची मुळे लांबपर्यंत पसरत असल्यामुळे मध्य पूर्वेच्या दीर्घकाळच्या व शुष्क उन्हाळ्यात ते तग धरून राहू शकते. हे झाड जरा अनोखे आहे कारण, जून महिन्यात पहिल्या बाराच्या अंजिरांचा एक मौसम असतो आणि नंतर ऑगस्टपासून पुढे सहसा दुसरे मुख्य पीक मिळते. (यशया २८:४) इस्राएली लोक सहसा पहिल्या बाराची फळे, ताजी फळे म्हणून खात असत. आणि नंतरची फळे ते वाळवून वर्षभर खात असत. वाळलेल्या अंजिरांपासून गोल ढेपा बनवता येत होत्या; आणि कधीकधी त्यात बदामही घातले जात. अंजिरांच्या या ढेपा सहज उपलब्ध होणाऱ्‍या, पौष्टिक आणि चविष्ट होत्या.

अबीगईल नावाच्या सुज्ञ स्त्रीने दाविदाला दाबलेल्या अंजिरांच्या २०० ढेपा दिल्या; भटकणाऱ्‍यांसाठी पौष्टिक अन्‍न असे समजूनच तिने कदाचित त्याला या ढेपा बनवून दिल्या असतील. (१ शमुवेल २५:१८, २७) दाबलेल्या अंजिरांचा औषध म्हणूनही वापर होत असे. एका गळव्यामुळे राजा हिज्कीयाचा जीव धोक्यात आला होता तेव्हा दाबून वाळवलेल्या अंजिरांचा लेप त्या गळव्यावर लावण्यात आला होता तरीपण, देवाने त्याला बरे केल्यामुळेच मुख्यतः हिज्कीया बरा झाला होता. *२ राजे २०:४-७.

प्राचीन काळांत, संपूर्ण भूमध्य प्रदेशांत वाळलेल्या अंजिरांची बरीच किंमत होती. मुत्सद्दी केटो याने रोमी सेनेटला कार्थेजविरुद्ध तिसरे प्यूनिक युद्ध करण्यास पटवण्यासाठी हातात एक अंजीर घेतले व ते तो हवेत फिरवत राहिला. रोममध्ये सर्वात उच्च प्रतीची वाळलेली अंजिरे आशिया मायनरमधील कॅरिया येथून येत. म्हणूनच, वाळलेल्या अंजिरांचे लॅटिन नाव कॅरिका असे पडले. सध्याच्या टर्कीच्या याच भागात आजही उच्च प्रतीची वाळलेली अंजीरे बनवली जातात.

इस्राएली शेतकरी सहसा अंजिरांची झाडे द्राक्षमळ्यांमध्ये लावत पण फळ न देणाऱ्‍या झाडांची ते छाटणी करत असत. चांगल्या व उत्पादनशील जमिनीचा तुटवडा असल्यामुळे, फळ न देणारी झाडे वाढवून जागा अडवली जात नसे. येशूच्या फळ न देणाऱ्‍या झाडाच्या एका दृष्टान्तात शेतकरी एका माळ्याला म्हणतो: “गेली तीन वर्षे मी ह्‍या अंजिरावर फळ पाहावयास येत आहे; परंतु मला काही आढळत नाही; ते तोडून टाक; उगाच त्याने जागा तरी का अडवावी?” (लूक १३:६, ७) येशूच्या काळात, फळ देणाऱ्‍या झाडांचा कर भरावा लागत असल्यामुळे, फळ न देणारे कोणतेही झाड अनावश्‍यक ओझ्याप्रमाणेच होते.

इस्राएली लोकांच्या आहारात अंजिराला खूप महत्त्व होते. त्यामुळे, अंजिराचे उत्पन्‍न कमी निघाल्यास, ते एखाद्या संकटाप्रमाणे होते आणि त्याचा संबंध, यहोवाकडून आलेल्या प्रतिकूल न्यायदंडाशी जोडण्यात येई. (होशेय २:१२; आमोस ४:९) संदेष्टा हबक्कूकने म्हटले: “अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्‍न बुडाले, शेतात धान्य न पिकले, . . . तरी मी परमेश्‍वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्‍या देवाविषयी मी उल्लास करीन.”—हबक्कूक ३:१७, १८.

विश्‍वासहीन राष्ट्राचे प्रतीक

शास्त्रवचनांत कधीकधी अंजिरांचा किंवा अंजिरांच्या झाडाचा लाक्षणिक अर्थाने उपयोग करण्यात आला आहे. जसे की, यिर्मयाने यहुदाच्या विश्‍वासू कैद्यांची तुलना एका टोपलीतल्या चांगल्या अंजिरांशी केली; ही अंजिरे पहिल्या बाराची अंजिरे होती जी सहसा ताजीच खाल्ली जात असत. परंतु, अविश्‍वासू कैद्यांची तुलना वाईट अंजिरांशी करण्यात आली जी खावयाजोगी नसल्यामुळे फेकावी लागत.—यिर्मया २४:२, ५, ८, १०.

फळ न देणाऱ्‍या अंजिराच्या झाडाच्या दृष्टान्तात येशूने दाखवले की यहोवा यहूदाच्या राष्ट्राशी किती धीराने वागत होता. आधी सांगितल्याप्रमाणे, तो एका मनुष्याविषयी सांगतो ज्याच्या द्राक्षमळ्यात एक अंजिराचे झाड होते. या झाडाला तीन वर्षांपासून फळ आले नव्हते त्यामुळे तो ते झाड छाटून टाकणार होता. परंतु द्राक्षमळ्याचा माळी त्याला म्हणतो: “महाराज, एवढे वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्याभोवती खणून खत घालीन; मग त्याला फळ आले तर बरे; नाहीतर आपण ते तोडून टाकावे.”—लूक १३:८, ९.

येशूने हा दृष्टान्त दिला तेव्हा, तो तीन वर्षांपासून प्रचार करत होता व यहुदा राष्ट्राच्या लोकांमध्ये विश्‍वास उत्पन्‍न करण्याचा प्रयत्न करत होता. येशूने आपले कार्य वाढवले अर्थात अंजिराच्या झाडाला—यहूदी राष्ट्राला—“खतपाणी” घातले व फळ धारण करण्यास एक संधी दिली. परंतु, येशूच्या मृत्यूच्या एक आठवड्याआधी यहूदा राष्ट्राने मशीहाला नाकारल्याचे स्पष्ट झाले होते.—मत्तय २३:३७, ३८.

पुन्हा एकदा येशूने या राष्ट्राची वाईट आध्यात्मिक स्थिती चित्रित करण्यासाठी अंजिराच्या झाडाचा उपयोग केला. आपल्या मृत्यूच्या चार दिवस आधी येशू बेथानीहून जेरूसलेमेस जात असताना त्याने एक अंजिराचे झाड पाहिले ज्याला पुष्कळ पाला होता परंतु एकही फळ नव्हते. पहिल्या बाराची अंजिरे पालवीबरोबरच येत असत आणि कधीकधी तर पालवी फुटायच्या आधीच येत असत; पण या झाडाला एकही फळ नव्हते त्यावरून ते काहीच कामाचे नव्हते हे दिसून आले.—मार्क ११:१३, १४. *

हिरव्यागार पालवीच्या निरोगी दिसणाऱ्‍या या झाडाप्रमाणे, यहुदी राष्ट्राचे देखील फसवे बाह्‍यस्वरूप होते. या राष्ट्राने देवाला आवडतील अशी फळे उत्पन्‍न केली नव्हती आणि कालांतराने तर त्याने यहोवाच्या पुत्राला अर्थात येशूला नाकारले. येशूने फळ न लागलेल्या त्या झाडाला शाप दिला आणि दुसऱ्‍या दिवशी ते वाळून गेल्याचे शिष्यांनी पाहिले. त्या वाळून गेलेल्या झाडाने, आपले निवडलेले लोक म्हणून देव यहुद्यांना कसे नाकारणार होता त्याचे उचित चित्रण केले.—मार्क ११:२०, २१.

“अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या”

आपल्या उपस्थितीविषयी एक महत्त्वपूर्ण धडा शिकवण्यासाठी देखील येशूने अंजिराच्या झाडाचा उपयोग केला. तो म्हणाला: “अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या; त्याची डहाळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता; तसेच तुम्हीहि ह्‍या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ, दाराशीच, आहे असे समजा.” (मत्तय २४:३२, ३३) अंजिराच्या झाडाची गर्द-हिरवी पालवी सहज डोळ्यात भरणारी व उन्हाळा जवळ आल्याचे निश्‍चित चिन्ह असते. तसेच, मत्तय अध्याय २४, मार्क अध्याय १३ आणि लूक अध्याय २१ यांतील येशूची महान भविष्यवाणी, सध्या तो स्वर्गीय राज्य अधिकारात उपस्थित असल्याचा स्पष्ट पुरावा देते.—लूक २१:२९-३१.

इतिहासाच्या या महत्त्वपूर्ण काळात आपण जगत असल्यामुळे, अंजिराच्या झाडापासून आपल्याला खरोखरच धडा घेण्याची इच्छा आहे. आपण असे केल्यास व आध्यात्मिक अर्थाने जागृत राहिल्यास, एका महान अभिवचनाची पूर्तता पाहण्याची आपल्याला आशा आहे: “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही; कारण सेनाधीश परमेश्‍वराच्या तोंडची ही वाणी आहे.”—मीखा ४:४.

[तळटीपा]

^ परि. 8 १९ व्या शतकाच्या मध्यात, बायबलमध्ये उल्लेखलेल्या देशांना भेट द्यायला गेलेले निसर्गतज्ज्ञ एच. बी. ट्रिस्ट्रॅम यांनी असे निरीक्षण केले की स्थानीय लोक अजूनही गळव्यांचा उपचार करण्यासाठी अंजिरांचा लेप लावतात.

^ परि. 16 ही घटना बेथफगे गावाजवळ घडली. बेथफगेचा अर्थ “पहिल्या बाराच्या अंजिरांचे गृह” असा होतो. यावरून असे सूचित होते, की पहिल्या बाराच्या फळांचे भरघोस उत्पन्‍न करण्यात हे क्षेत्र नावाजलेले होते.