व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

टेहळणी बुरूज एप्रिल १, २००२, पृष्ठ ११, परिच्छेद ७ मध्ये असे का म्हटले आहे की सा.यु. ३३ मध्ये पेन्टेकॉस्टच्या दिवशी नव्याने सत्य मानणाऱ्‍या यहुद्यांचा पाण्याने बाप्तिस्मा ‘ख्रिस्ताच्याद्वारे देवाला केलेल्या आपल्या वैयक्‍तिक समर्पणाचे चिन्ह’ होते; तर पूर्वी असे समजले जायचे की सा.यु. ३३ पासून सा.यु. ३६ पर्यंत यहुद्यांच्या बाप्तिस्म्यासाठी अशा वैयक्‍तिक समर्पणाची गरज नव्हती?

सा.यु.पू. १५१३ मध्ये, यहोवा देवाने इस्राएली लोकांना एका अटीवर पवित्र राष्ट्र होण्याची संधी दिली; ती अट अशी होती, की त्यांनी पूर्ण खबरदारीने, ‘त्याची वाणी ऐकावी आणि त्याचा करार पाळावा.’ त्या सर्वांनी उत्तर दिले: “परमेश्‍वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू.”—निर्गम १९:३-८; २४:१-८.

मोशेचा नियमशास्त्र करार पाळण्याची तयारी दाखवून इस्राएली लोकांनी स्वतःला देवास समर्पित केले. त्यानंतरच्या यहुद्यांच्या सर्व पिढ्यांचा या समर्पित राष्ट्रात जन्म झाला. परंतु, सा.यु. ३३ पासून येशू ख्रिस्ताचे अनुयायी झालेल्या यहुद्यांच्या बाप्तिस्म्यात, समर्पित राष्ट्राचे सदस्य या नात्याने स्वतःस देवाला सादर करणे इतकेच समाविष्ट नव्हते. त्यांचा बाप्तिस्मा हा, येशू ख्रिस्ताद्वारे त्यांचा यहोवा देवाबरोबर एक नवीन नातेसंबंध सुरू होत असल्याचे चिन्ह होता. ते कसे?

सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी यरुशलेममध्ये एका माडीवरच्या खोलीत जमलेल्या १२० शिष्यांवर पवित्र आत्मा ओतण्यात आल्यानंतर, प्रेषित पेत्र उभा राहिला आणि तेथे काय चालले होते हे पाहायला आलेल्या यहुदी व यहुदी मतानुसारी लोकसमुदायाला प्रचार करू लागला. मग, ज्यांचा विवेक बोचू लागला होता अशा यहुदी लोकांना पूर्ण साक्ष दिल्यानंतर तो म्हणाला: “पश्‍चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या.” पेत्राच्या या आर्जवानंतर “ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.”—प्रेषितांची कृत्ये २:१-४१.

पेत्राच्या आर्जवानंतर बाप्तिस्मा घेतलेले ते यहुदी आधीपासूनच एका समर्पित राष्ट्राचे सदस्य नव्हते का? देवासोबत त्यांचा एक समर्पित नातेसंबंध नव्हता का? नाही. प्रेषित पौलाने लिहिले, की देवाने नियमशास्त्र ‘वधस्तंभाला खिळून रद्द केले,’ होते. (कलस्सैकर २:१४) सा.यु. ३३ मध्ये ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे यहोवा देवाने नियमशात्र करार—इस्राएली लोकांना आपल्याबरोबर एका समर्पित नातेसंबंधात आणण्याचा जो आधार होता तोच काढून टाकला होता. ज्या इस्राएल राष्ट्राने देवाच्या पुत्राला नाकारले होते त्या राष्ट्राला स्वतः देवाने नाकारले. ‘देहसंबंधाने इस्राएल’ असलेले, देवाला समर्पित असलेले राष्ट्र म्हणून दावा करू शकत नव्हते.—१ करिंथकर १०:१८, पं.र.भा; मत्तय २१:४३.

सा.यु. ३३ मध्ये नियमशास्त्र करार रद्द करण्यात आला पण यहुद्यांवरील खास अनुग्रहाचा व लक्ष पुरवण्याचा देवाचा समय तेव्हा पूर्ण झाला नाही. * तो समय सा.यु. ३६ पर्यंत चालणार होता; या समयादरम्यान पेत्राने कर्नेल्य नामक एका देव-भीरू इटालियन व्यक्‍तीला आणि त्याच्या घराण्याला तसेच इतर विदेशी लोकांना प्रचार केला. (प्रेषितांची कृत्ये १०:१-४८) कोणत्या आधारावर अनुग्रह मिळवण्याचा हा समय वाढवण्यात आला होता?

दानीएल ९:२७ म्हणते, की मशीहाने “पुष्कळ लोकांबरोबर एक सप्तकाचा पक्का करार” करावा. येशूचा बाप्तिस्मा आणि सा.यु. २९ मध्ये मशीहाच्या सार्वजनिक सेवेच्या सुरवातीपासून सात वर्षांसाठी अथवा ‘एका सप्तकासाठी’ जो करार जारी ठेवण्यात आला होता तो अब्राहामाचा करार होता. या करारात सहभागी होण्याकरता एखाद्या व्यक्‍तीला केवळ अब्राहामाच्या हिब्रू वंशातले एक असावयाचे होते. या एकपक्षीय करारामुळे एखाद्या व्यक्‍तीला यहोवाबरोबर समर्पित नातेसंबंध ठेवण्यास आधार मिळत नव्हता. म्हणूनच, सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्राचे भाषण ऐकल्यानंतर बाप्तिस्मा घेतलेले यहुदी, स्वाभाविक यहुदी म्हणून खास अनुग्रहाखाली होते तरी, नियमशास्त्र करार रद्द केल्यानंतर देवाबरोबर समर्पित नातेसंबंध असण्याचा कोणताही दावा करू शकत नव्हते. त्यांना व्यक्‍तिगतपणे देवाला स्वतःस समर्पित करण्याची गरज होती.

सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार असलेले यहुदी व यहुदी मतानुसारी यांना आणखी एका कारणासाठी व्यक्‍तिगतपणे समर्पण करण्याची गरज होती. प्रेषित पेत्राने आपल्या श्रोत्यांना पश्‍चात्ताप करून येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेण्यास आर्जवले. असे करण्यासाठी त्यांना जगाच्या रीतीरिवाजांनुसार चालण्याचे नाकारून येशू हा प्रभू व मशीहा, महायाजक आणि स्वर्गात देवाच्या उजव्या बाजूला बसला आहे, हे कबूल करावे लागणार होते. त्यांना तारण मिळवण्याकरता येशू ख्रिस्ताच्या नावाद्वारे यहोवा देवाच्या नावाचा धावा करण्याची गरज होती; यात, ख्रिस्तावर विश्‍वास ठेवणे व आपला नेता म्हणून त्याला स्वीकारणे समाविष्ट होते. देवाबरोबर नातेसंबंध ठेवण्याचा व पापांची क्षमा मिळवण्यासाठी असलेला मूळ आधारच पूर्णपणे बदलला होता. विश्‍वासात येणाऱ्‍या प्रत्येक यहुद्याला ही नवीन व्यवस्था स्वीकारण्याची गरज होती. ती कशी? देवाला समर्पण करण्याद्वारे व येशू ख्रिस्ताच्या नावाने पाण्यात बुडून आपले समर्पण जाहीर करण्याद्वारे. पाण्याने बाप्तिस्मा घेणे हे देवाला त्यांनी केलेल्या समर्पणाचे द्योतक होते; यामुळे ते येशू ख्रिस्ताद्वारे एका नवीन नातेसंबंधात आले.—प्रेषितांची कृत्ये २:२१, ३३-३६; ३:१९-२३.

[तळटीप]

^ परि. 7 येशू ख्रिस्ताचे स्वर्गारोहण झाले आणि त्याने आपल्या अर्पिलेल्या मानवी जीवनाचे मूल्य यहोवा देवाला सादर केले तेव्हा मोशेचा नियमशास्त्र करार रद्द करण्यात आला आणि भाकीत केलेल्या ‘नव्या कराराचा’ पाया घालण्यात आला.—यिर्मया ३१:३१-३४.